नासदीय सूक्त : मुळारंभाचे आख्यान

प्रस्तावना

“भारत, एक खोज” ही मालिका दूरदर्शनवर आली, त्यावेळेस मी अठरा वर्षांचा होतो. तिचे शीर्षकगीत ऋग्वेदातील नासदीय सूक्त (१०:१२९) आहे. सूक्तातील पहिल्या ऋचेचे मूळ संस्कृतात पठण आणि नंतर पहिल्या आणि शेवटच्या ऋचांचा प्रा. वसंत देव यांनी केलेला हिंदी भावानुवाद. संगीतकार वनराज भाटिया. निवड, दिग्दर्शक श्याम बेनेगल यांची.

ऐकून मी केवळ थरारून उठलो!

संस्कृतातील बरेच शब्द समजत नव्हते, पण हिंदी अनुवादातून गोषवारा कळला. हे काहीतरी थोर प्रकरण आहे आणि ते समजून घेतलेच पाहिजे हे पक्के लक्षात आले. पण IIT च्या लायब्ररीत काही सापडेना आणि अर्थात तेंव्हा आंतरजाल नव्हते. त्यामुळे हा विषय अनेक वर्षे अडगळीत पडला. मग अलिकडे त्याला हात घालता आला. आता संशोधनासाठी आवश्यक सगळ्या सुविधा उपलब्ध होत्या. माझी नास्तिक जडणघडण पुरेशी झालेली होती. आपल्या पूर्वजांना सारे काही – आधुनिक विज्ञानसुद्धा – कळत होते यावर विश्वास नव्हता. भौतिकशास्त्र आणि त्यातील विश्वोत्पत्तीचे सिद्धांत यांचे पुरेसे आकलन झालेले होते. त्यामुळे ऐहिक आणि चिकित्सक दृष्टीने नासदीय सूक्त समजून घ्यायला सुरुवात केली. त्या भूमिकेत ब्रह्म, आत्मा, माया, देव, धर्म इ. बाबींना बिलकुल थारा नव्हता.

गूगलबुवांनी समोर टाकलेल्या माहितीचा आकार गांगरून टाकणारा होता. नासदीय सूक्ताने किती देशी-विदेशी विद्वानांवर गारूड केलेले आहे, ते लक्षात आले. त्यात डझनावारी जागतिक कीर्तीचे तज्ज्ञ तर होतेच, पण माझ्यासारखे हौशीसुद्धा पैशाला पासरी होते.

मला महत्त्वाचे वाटलेले विद्वान आणि त्यांनी केलेली नासदीय सूक्ताची भाषांतरे यांचा ‘ठाय लयीत’ अभ्यास, आस्वाद आणि रवंथ गेली काही वर्षे सुरू होता. माझ्या भूमिकेतून त्याज्य वाटलेली काही भाषांतरे आणि भाष्ये यांतही काही भाग रोचक होता. माझे स्वत:चे भाषांतर मनात आकार घेत होते. लॉक्डाउनमधे त्याला गती आली.

माझे वडील पूर्वी इंग्रजीचे प्राध्यापक होते आणि त्यांना संस्कृतही येते. माझी आई पूर्वी तत्वज्ञानाची प्राध्यापक होती, तिचा विशेष अभ्यास पाश्चिमात्य तत्वज्ञांचा असल्यामुळे, नासदीय सूक्ताचे मला भावलेले, पाश्चात्य तज्ज्ञांनी केलेले अनुवाद आणि त्यांची भाष्ये यांमागची तात्विक पार्श्वभूमी थोडी समजून घेता आली. त्या निमित्ताने आईबाबांशी खूप बोलणे झाले आणि त्या संवादांतून आमच्यातील सख्य वाढले.

वेदकालीन संस्कृत समजून घेण्यासाठी मोलिए-विल्यम, मॅक्डॉनेल आणि आपटे यांच्या संस्कृत–इंग्रजी शब्दकोशांचा फार, फार उपयोग झाला. हे तीन शब्दकोश एकत्रितपणे देणारे एक iOS app सुद्धा सापडले!

संस्कृत भाषा किती सघन (गोळीबंद) आणि समृद्ध आहे हे पुन्हा एकदा जाणवले. अगदी थोड्या अक्षरांत मोठा आशय ठासून भरलेला. तेवढ्याच अक्षरांत भाषांतर अशक्य! एकाच शब्दाचे अनेक अर्थ, आणि एका अर्थाचे अनेक शब्द संभवतात. त्यात पुन्हा ऋग्वेदकालीन संस्कृतात त्याच शब्दाचे आणखी वेगळे, आणि क्वचित, नंतर रूढ झालेल्यांपेक्षा विरुद्ध अर्थ सुद्धा! त्यामुळे या अज्ञेयपर कवितेत कवीस नेमके काय म्हणायचे होते, तेही अज्ञेयच.

प्राचीन काळच्या [कदाचित इसवीसनपूर्व १५०० मधील - साडेतीन हजार वर्षांपूर्वीच्या - हमुराबीच्या कायद्यांशी समकालीन**] कुणा अज्ञात कवीच्या प्रतिभेची ही झेप स्तिमित करणारी - absolutely stunning - आहे, हे मात्र नक्की!

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भाषांतर

नास॑दासी॒न्नो सदा॑सीत्त॒दानीं॒
नासी॒द्रजो॒ नो व्यो॑मा प॒रो यत् ।
किमाव॑रीवः॒ कुह॒ कस्य॒ शर्म॒न्नम्भः॒
किमा॑सी॒द्गह॑नं गभी॒रम् ॥१॥

ना नसणे होते, ना होते असणे, मुळारंभी
(पृथ्वी नव्हती) वातावरण नव्हते, त्यापलिकडील अवकाश नव्हते
(मग झाकलेले काही होते का?) कशाने झाकलेले? कुठे? कुणाच्या ताब्यात (कोणी) ?
द्रव (तरी) होते काय? अगाध, अथांग?

Nothingness was not, nor was being in that epoch
Not only did the Earth not exist, even the Atmosphere did not, nor Space beyond it
What was covered? Wherein? Where and at whose behest?
Was there water - impenetrable, fathomless?

___________________________________________________________________

ना मृ॒त्युरा॑सीद॒मृतं॒ न तर्हि॒
ना रात्र्या॒ह्ना॑ आसीत्प्रके॒तः ।
आनी॑दवा॒तं स्व॒धया॒ तदेकं॒
तस्मा॑द्धा॒न्यन्न प॒रः किंच॒नास॑ ॥२॥

तेंव्हा मरण नव्हते, अमरत्व नव्हते
रात्र किंवा दिवसाचे
(कोणतेही) चिन्ह नव्हते
स्वतःच्या प्रेरणेने, हवेशिवाय (च) श्वसन करणारे 'ते एक' (होते)
त्याशिवाय, त्यापलिकडे काहीमात्र नव्हते.

Death was not, nor immortality then
There was no distinction between Night and Day
That One breathed autonomously sans air
Other than that, there was certainly nothing beyond

___________________________________________________________________

तम॑ आसी॒त्तम॑सा गू॒ळ्हमग्रे॑
अप्रके॒तं स॑लि॒लं सर्व॑मा इ॒दम् ।
तु॒च्छ्येना॒भ्वपि॑हितं॒ यदासी॒त्
तप॑/तम* स॒स्तन्म॑हि॒नाजा॑य॒तैक॑म् ॥३॥

सुरुवातीस अंधाराने झाकलेला अंधार होता
सारे काही अक्रम
(chaotic), उसळणारे होते
ज्याचे
(त्या एकाचे) टरफल होते संपूर्ण रिक्तपण
'ते एक' (अखेरीस) जन्मास आले त्या प्रचंड उष्णतेतून / महाअंध:कारातून*

At first, darkness was concealed in darkness
Surging Chaos was all there was
Thus far enclosed by pervasive emptiness
The One was born of that mighty heat / darkness*

___________________________________________________________________
काम॒स्तदग्रे॒ सम॑वर्त॒ताधि॒
मन॑सो॒ रेत॑: प्रथ॒मं यदासी॑त् ।
स॒तो बन्धु॒मस॑ति॒ निर॑विन्दन्
हृ॒दि प्र॒तीष्या॑ क॒वयो॑ मनी॒षा ॥४॥

मग त्यात (त्या एकात) उद्भवला काम
जे होते पहिले बीज (,) जाणिवेचे
असणे आणि नसणे यांतील बंध (धागा, म्हणजेच जाणीव) सापडला
कवींना विवेकी आत्मशोधातून

Then desire overwhelmed it
That was the primal seed of consciousness
Which connects being with nothingness, discovered
Sages through wise introspection

___________________________________________________________________

ति॒र॒श्चीनो॒ वित॑तो र॒श्मिरे॑षाम्
अधः स्वि॑दा॒सीदु॒परि॑ स्विदासीत् ।
रे॒तो॒धा आ॑सन्महि॒मान॑ आसन्
स्वधा अ॒वस्ता॒त्प्रय॑तिः प॒रस्ता॑त् ॥५॥

(मग) त्यांचा (कवींना सापडलेला) धागा (म्हणजे जाणीव) प्रकाशकिरणासारखा (त्या अंध:कारमय पोकळीत) आडवा (छेद देत) पसरला
(त्या धाग्याच्या, अर्थात, जाणिवेच्या) खाली काय बरे होते? आणि वर तरी काय होते? (किंबहुना, वर आणि खाली या दिशा तरी होत्या का?)
बीजारोपण करणारे होते, (आणि) महान (प्रसव) क्षमता होत्या
(जाणिवेच्या) खाली प्रेरणा आणि वर (जाणीवपूर्वक) प्रयास

The ray of their consciousness extended across the void
What could have been below it and what above?
There were sowers, and there were great fertile powers
Impulse below, endeavour above

___________________________________________________________________

को अ॒द्धा वे॑द॒ क इ॒ह प्र वो॑च॒त्
कुत: आजा॑ता॒ कुत॑ इ॒यं विसृ॑ष्टिः ।
अ॒र्वाग्दे॒वा अ॒स्य वि॒सर्ज॑ने॒न
अथा॒ को वे॑द॒ यत॑ आब॒भूव॑ ॥६॥

कोण खरेच जाणतो, (आणि) कोण इथे खात्रीने सांगू शकेल?
(हे सारे) कुठून आले? कुठून आली ही विपुल सृष्टी?
देव त्या सृजनाच्या समाप्ती नंतरचे (!)
मग कोण जाणे, हे सारे कुठून उद्भवले?

Who truly knows and who can assert at this point?
Whence came this diverse creation?
The gods came after its culmination
Then who knows from where it has arisen?

___________________________________________________________________
इ॒यं विसृ॑ष्टि॒र्यत॑ आब॒भूव॒
यदि॑ वा द॒धे यदि॑ वा॒ न ।
यो अ॒स्याध्य॑क्षः पर॒मे व्यो॑म॒न्
सो अ॒ङ्ग वे॑द॒ यदि॑ वा॒ न वेद॑ ॥७॥

ही वैविध्यपूर्ण सृष्टी कुठून उद्भवली?
ती (कुणी) निर्मिलेली (तरी) आहे, की नाही?
तो साक्षी, सर्वोच्च अंतरिक्षातला
तो नक्की जाणतो, किंवा कदाचित
(तो ही) जाणत नाही

Whence came about this diverse creation?
Was it even created or not?
That Overseer who is in the highest heavens
He certainly knows, or possibly even he knows not….

सूक्तातील काही ओळींचे स्पष्टीकरण

१.१ ओळीतील (आणि अर्थात सूक्तातीलही) पहिलाच शब्द - ‘नासदासीत्’ (नसणे नव्हते) विस्मयकारक आहे. इतका, की सूक्ताचे नावच या शब्दावरून ठेवलेले आहे. पहिल्या ओळीतील शेवटचा शब्द - ‘तदानीम्’ - हासुद्धा विशेष आहे. त्याचे शब्दश: भाषांतर ‘त्या वेळी’ असेच होते पण सूक्ताच्या संदर्भात त्यात आणखी मोठा आशय दडलेला आहे, असे मला वाटते. त्यासाठी इंग्रजीतील ‘in that epoch’ ही शब्दयोजना चपखल आहे. तद्नुसार मराठीत ‘महत्त्वाचा काळ’ किंवा ‘युगारंभ’ म्हणता येईल. पण ‘मुळारंभ - अर्थात, सर्व आरंभांचा आरंभ - हा, या सूक्ताच्या गर्भितार्थाच्या दृष्टीने मला सर्वात समर्पक वाटला. मुळारंभी अभाव नव्हता, भाव नव्हता - अर्थात, विचार, तर्क आणि भाषा यांना गम्य असणारे असे काहीच नव्हते. ही स्थिती फक्त कवीच्या प्रतिभेस गम्य आहे, आणि तिचे वर्णन शब्दांत करण्याचे शिवधनुष्य कवीने कसे उचलले आहे, हे पाहणे फार रोचक आहे. सायण म्हणतो:

प्रत्यक्षेणानुमित्या वा यस्तुपायो न बुध्यते। एनं विन्दन्ति वेदेन, तस्मात् वेदस्य वेदता॥

स्वैर अनुवाद: सत्य जाणून घेण्याचे तीन मार्ग आहेत. प्रत्यक्ष, अनुमान आणि वेद. जेंव्हा प्रत्यक्ष किंवा अनुमान यातून सत्याची प्राप्ती होत नाही, तेंव्हा वेदांचा आश्रय घ्यावा. नासदीय सूक्त हे याचे उत्तम उदाहरण ठरावे!

१.२ इथे ‘भूर्भुवस्व:’ किंवा ‘दिवंच पृथिवींचांतरिक्षं‘ या वेदकालीन लोकत्रयींचा संदर्भ आहे, त्यामुळे “पृथ्वी नव्हती” हे अध्याहृत आहे. वाताच्या विरुद्ध, निर्वात अशी स्थिती असते, हे ऋग्वेदकाळात माहिती होते की नाही, हे मला ठाऊक नाही. पण हवेचा दाब (उदा. एखाद्या नळीत) कमीजास्त होऊ शकतो, हे दैनंदिन अनुभवातून माहिती असणार. शिवाय सपाटीपासून जसजसे वर चढत जावे तसतशी हवा विरळ होत जाते, त्यामुळे जमिनीपासून फार वर निर्वात स्थिती असणार असा कयास बांधता आला असणार. त्यामुळे अवकाशास ‘निर्वात’ हे विशेषण मी योजलेले आहे. याचा उपयोग पुढे, १.४ चा अर्थ लावताना होतो.

१.३ वरील ओळींत सांगितलेले काही नव्हते, तर मग कुणी, कुठे, एखाद्या आवरणाखाली (लपविलेले) काही होते का? तसे करण्याचा उद्देश असणारे कुणी होते का? तर नाही. आवरण घालणारा (कर्ता) आणि आवरण घालण्याचे कर्म नव्हते. ‘कुठे’ चे उत्तरही, माझ्या मते नकारसूचक आहे, याचा अर्थ, स्थल (space) नव्हते. (पुढे दुसऱ्या ऋचेत काल सुद्धा नव्हता असे सुचविलेले आहे).

१.४ जर घन, वायु आणि निर्वात नव्हते, तर मग चौथी स्थिती/शक्यता, द्रव, ती तरी होती का?

१.३ आणि १.४ मधील सर्व प्रश्नांची उत्तरे अज्ञेय किंवा नकारसूचक आहेत. बहुतेक हाच सूर नासदीय सूक्तात जिथे प्रश्न विचारलेला आहे तिथे लागतो. त्यामुळे, सूक्तातील बरेच प्रश्न वक्तृत्वक (rhetorical questions) वाटतात. आणि सूक्त ऐकणाऱ्यांनी किंवा वाचणाऱ्यांनी त्या प्रश्नांसंबंधी सखोल विचार करावा आणि आपापली उत्तरे शोधावीत अशी कवीची अपेक्षा दिसते.

२.१ आणि २.२: जन्ममृत्यू, दिवसरात्र ही उदाहरणार्थ वापरली आहेत. त्या अनुषंगाने येणारे प्राण, प्रकाश (तेज, हे पंचमहाभूतांतील उरलेले पाचवे) इत्यादि सुद्धा नव्हते. ‘त्या स्थितीत कोणताही बदल होत नव्हता’ असाही अर्थ आहे. याहीपुढे जाऊन, घटनाचक्र नव्हते, कारण काल (time) च नव्हता असे कवीस सुचवायचे असावे.

सूक्तात इथवर, नव्हते / नसावे अशा भाषेत बरेच काही सांगितले आहे. त्याचे सिंहावलोकन केल्यास, खालील गोष्टी नव्हत्या:

सत्, असत्

पैकी, सताची उदाहरणे:

 • विचार, तर्क, भाषा
 • उद्देश, कर्ता, कर्म
 • स्थल (space)
 • पंचमहाभूते: पृथ्वी, आप (पाणी), तेज (प्रकाश, अग्नी), वायू आणि आकाश (निर्वात)
 • सूर्यचंद्र आणि ग्रहतारे
 • प्राण (जन्म आणि मृत्यू यांतील भेद)

काल (time) होता अथवा नाही, याबद्दल कवीची भूमिका संदिग्ध दिसते. काल नव्हता असे सूचन आहे. आणि कालवाचक शब्दही वापरलेले आहेत. ते परत वेगवेगळे आहेत - तदानीम्, तर्हि, अग्रे, इ. हे कथानकाची प्रगती दाखविण्यासाठी असू शकेल.

सूक्तात यानंतर, मग प्रथम काय होते, आणि पुढे काय झाले, हे सांगितले आहे.

२.३ आणि २.४ मग मुळारंभी काय होते? याचे उत्तर कवी, “ते एक” इतकेच, अतिसंक्षिप्त देतो. ते जे काही होते, ते गुणधर्मरहित होते. (इथे ‘निर्गुण-निराकार’, हे शब्द वापरण्याचा मला मोह झाला, पण त्या शब्दांवर बरीच अनावश्यक ओझी लादलेली आहेत, त्यामुळे तो आवरला!).

‘ते एक’ स्वयंभू (स्वत:चीच प्रेरणा असलेले), आणि स्वयंपूर्ण (‘हवेशिवायच श्वसन करणारे’) होते. ‘त्या एकाचे’ अस्तित्व आधीच्या सर्व वर्णनाशी सुसंगत, आणि त्या सर्व मर्यादांना ‘पुरून उरलेले’ होते.

‘ते एक’ नेमके काय होते, हे कवीने हेतुत: सांगितलेले नाही, असे माझे मत आहे.

३.४ *नासदीय सूक्ताचे दोन उपलब्ध पाठ (texts) आहेत. ऋक्पाठ आणि तैत्तिरीय ब्राह्मण पाठ. या दोहोंमध्ये पाठभेद जवळपास नाहीच. या ऋचेतील पहिल्या शब्दात मात्र आहे, आणि तोही केवळ एका अक्षराचा.

ऋक्पाठ: “तप॑स॒स्तन्म॑हि॒नाजा॑य॒तैक॑म्” तर तैत्तिरीय पाठ: “तस॒स्तन्म॑हि॒नाजा॑य॒तैक॑म्”

तप = उष्णता, तम = अंधार

बहुतेक विद्वान ऋक्पाठच प्रमाण मानतात, पण येथे मला “तम” शब्दसुद्धा समर्पक वाटतो. तम होता हे ऋचेत सांगितले आहेच. पण उष्णता कोठून आली ते उघड नाही. उसळणाऱ्या अक्रम स्थितीतून (surging chaos) निर्माण होणारी उष्णता असू शकेल. मूळ कवीस काय म्हणायचे होते, कोण जाणे?

४. त्या एकास, ‘आपण अनेक व्हावे’ अशी उत्कट इच्छा झाली. ती इच्छा, हे जाणिवेचे प्रथम बीज होते असे कवी म्हणतो. संस्कृतातील ‘मन’ शब्दाचे भाषांतर मराठीत ‘मन’ (mind) असे न करता, ‘जाणीव’ (consciousness: the faculty of discrimination or judgement) असे मी योजले आहे. यात ‘perception’, ‘reflection’, ‘purpose’, ‘intent’ या अर्थांच्या छटाही आल्या. जाणिवच नसेल, तर अभाव आणि भाव यांत काही फरकच नाही. त्यामुळे, जाणीव, जी संपूर्ण स्वरूपात केवळ मनुष्यप्राण्यास असते, तिच्या माध्यमातूनच अभावापासून भाव वेगळा होऊ शकतो. आता fast forward. जाणीव हाच भाव आणि अभाव यांना जोडणारा धागा, हे कवींच्या प्रतिभेस (विवेकी आत्मशोधातून) सापडले. त्यायोगेच कवी विश्वोत्पत्तीचे चिंतन आणि चिकित्सा करते झाले. मग साहजिकच त्यांना उत्पत्तीसंबंधी प्रश्न पडले. पूर्वी काय झाले असावे यासंबंधी त्यांनी काही कयास मांडले आणि जे प्रश्न अनुत्तरितच राहिले, त्यांची उत्तरे ते शोधू लागले.

५. पाचवी ऋचा समजण्यास सर्वात अवघड आहे. तिचा सयुक्तिक अर्थ त्या ऋचेपुरता लावणे तर कठीण आहेच, पण सूक्ताचा आशय आणि कथनक्रम यांच्याशी सुसंगत असा अर्थ लावणे ज्यास्तच कठीण आहे. मी आजवर वाचलेल्या कोणत्याच भाषांतरात मला तो योग्य लावलेला दिसलेला नाही. तो योग्य तसा लावण्याचा मी येथे प्रयत्न केला आहे….

 • ५.१ कवींची जाणीवपूर्वक चिकित्सा त्या अंधाऱ्या, अज्ञात पोकळीत प्रकाशकिरणासारखी किंवा रज्जूसारखी आरपार गेली. इथे ‘रश्मि’ चा प्रचलित अर्थ (किरण) आणि जुन्या संस्कृतातील आता अप्रचलित अर्थ (रज्जू = दोर = वादी) दोन्ही लागू पडतात, पण प्रकाशकिरण अंधाराला उजळून टाकतो, त्यामुळे अगम्य विश्व गम्य होते, हा अर्थ ज्यास्त योग्य आहे.
 • ५.२ जाणिवेच्या अवचेतन (subconscious) आणि प्रकट (conscious) बाजूंना काय होते? जाणिवेस या दोन बाजू असतात तरी का? संस्कृतात ‘स्विद्’ शब्द आश्चर्य किंवा संशयवाचक आहे. त्याचा येथे खुबीने वापर केलेला आहे. त्यावरचा भर दर्शविण्यासाठी, नासदीय सूक्त गाताना ‘स्विद्’ शब्दाचा उच्चार अतिदीर्घ करण्याचा प्रघात आहे.
 • ५.३ इथे बीजारोपण करणारे पुरुषतत्व आणि महान प्रसवशक्ती असलेले प्रकृती / स्त्रीतत्व कवीस अभिप्रेत आहे.
 • ५.४ क्षमतेचे किंवा उत्कट इच्छेचे रूपांतर जाणिवेच्या द्वारा उपक्रमात होते, आणि त्यामुळे ‘असणे’ निर्माण होते.

६. “देव नंतर आले” मधील औद्धत्य (cheekiness) केवळ लाजवाब! विश्वनिर्मितीत ज्यांना काही भूमिकाच नाही, ते कसले देव?

७. नासदीय सूक्त त्रिष्टुप् छंदात आहे (प्रत्येक ओळीत अकरा अक्षरे). ७.२ - सव्वीसावी (शेवटून तिसरी) - ओळ मात्र नऊच अक्षरांची आहे, त्यामुळे त्या ओळीच्या शेवटी एक अनपेक्षित विराम निर्माण होतो. हा अपवाद कवीने, वाचकाचे लक्ष वेधण्यासाठी हेतुपुर:सर केलेला आहे, असे मला खात्रीने वाटते. कारण सृष्टीला कर्ताच नसावा असे कवीस सुचवायचे आहे.

**ऋग्वेद अनेक शतकांच्या कालावधीत लिहिला गेला. त्यातील सर्वात जुना भाग इ.स.पूर्व १५०० च्या सुमारासचा आहे असे बहुसंख्य तज्ज्ञ म्हणतात. ऋग्वेदातील दहावे मंडल (ज्यात नासदीय सूक्त समाविष्ट आहे) मात्र त्यामानाने पुष्कळ अर्वाचीन (इ.स.पूर्व ७०० च्या आसपास लिहिलेले) आहे असे काही तज्ज्ञांचे मत आहे.

--------- समाप्त --------

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

ह्या लेखाच्या ताजमहालाला माझी "वीट" लावणे ठीक नाही म्हणून स्वतंत्र धागा काढला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान!
हा टायटल ट्रॅक मला नेहेमीच आवडायचा पण पार्श्वभूमी आज कळली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाह छान आहे भाषांतर. पण संस्कृत कळत नसल्याने किती तंतोतंत आहे ते कळणार नाही. हां आपले इन्टरप्रिटेशन आवडले. किती गहन आहे जगाचे मूळ पचनी पडणे. थांगहीन, अनंत, अपरिमित.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मागे मीसुद्धा नासदीय सूक्ताच्या भाषांतराचा प्रयत्न केला होता :
http://mr.upakram.org/node/2256

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमचा लेख आवडला. समव्यासंगी भेटल्याचा आनंद झाला!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

मागे मीसुद्धा शासकीय सूक्ताच्या भाषांतराचा प्रयत्न केला होता :

अं... शासकीय सूक्त???

हे काय असते ब्वॉ?

(Preamble to the Constitution वगैरे? "We the People of the United States, in Order to form a more perfect Union, establish Justice, insure domestic Tranquility, provide for the common defence, promote the general Welfare, and secure the Blessings of Liberty to ourselves and our Posterity, do ordain and establish this Constitution for the United States of America." (अर्थात, 'यापूर्वी काहीही नव्हते', अशा अर्थाने?))

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुधार केला आहे.
सहमत आहे -- राज्यघटना आणि कायदे हे आजच्या संदर्भात न्यायालयात शास्त्रार्थ-चर्चा करायचे ग्रंथ आहेत. पूर्वी धर्मपीठांत श्रुति-स्मृतिग्रंथ असत.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तेव्हा श्रुती म्हणजेच वेद असे धर्मपीठात ठेवलेले असायचे का? कारण वेद हे मौखिक परंपरेने जपलेले असत. ते लिखित नसतील अशी शंका वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"तेव्हा" म्हणजे वेगवेगळ्या शतकांतील शास्त्रार्थचर्चा ना? वेगवेगळ्या शतकांत लिखित ग्रंथ कमी किंवा अधिक उपलब्ध होते.
पण कोणत्याही विवक्षित काळात लेखनाची कमी किंवा अधिक उपलब्धता श्रुती आणि स्मृती दोघांना समसमान लागू असणार.
पण श्रुती म्हणजे वेद, हे तुम्ही म्हणता तसेच योग्य आहे. स्मृती म्हणजे अन्य धर्मग्रंथ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मूळ लेख आणि धनंजय यांचे भाषांतर दोन्ही सुरेख! वेद अथवा उपनिषदे यांच्यात मांडलेले विचार म्हणजे मला neocortical indulgence वाटतो. हे जे कोणी ऋषी मुनी होते त्यांच्या ऐहिक गरजा नीट पूर्ण होत असल्या पाहिजेत. कारण त्याशिवाय असे विचार करायला लागणारी मनाची स्वस्थता येत नाही. मात्र केवळ ऐहिक गरजा (needs) मग इच्छा (wants) आणि मग चैन (luxuries) अशा न संपणाऱ्या भौतिक इच्छांच्या जालात न अडकता they chose to indulge in much more sustainable way!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जिज्ञासा९१८ यांचा प्रतिसाद वाचून मॅस्लोची “गरजांची उतरंड” (hierarchy of needs) आठवली. प्रतिसादात मांडलेला प्राधान्यक्रम बहुधा योग्य आहे. मात्र, self-actualisation ची आस किमान गरजा जेमतेम पूर्ण झाल्यावर लगेचच लागते, असे मला वाटते. त्यासाठी मधील पायऱ्यांमधून पार व्हावे लागतेच असे नाही. हंटर गॅदरर्सनीही कला निर्मिलेली आहे, आणि पृथ्वीवरच्या जवळपास सर्व पुरातन समाजांनी creation myths रचलेल्या सापडतात. त्यामुळे जाणीव आली, की विश्वोत्पत्तीचे प्रश्नही आलेच, असे मला वाटते. त्यामुळे हे सगळे फक्त भरलेल्या पोटाचे चोचले आहेत वगैरे मार्क्सवादी विचार एक महत्त्वाची गरज डोळ्याआड करतात की काय, असे वाटते.

तद्वतच, ज्यास्तीतज्यास्त उपभोग, हेच ज्यांचे साध्य आहे असेही लोक आढळतात. त्यांना neocortical indulgence शक्य असूनही साधत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

"Religion is the heart in a heartless world, the sigh of the oppressed AND opiate of the masses!" : Karl Marx.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

I have referred to Marxist thought, not to Marx’s thoughts!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!