गणिताच्या निमित्ताने – भाग ४ [गणितविभागाचे प्रमुख: प्राध्यापक मनोहर वर्तक]

गणिताच्या निमित्ताने – भाग ४ [गणितविभागाचे प्रमुख: प्राध्यापक मनोहर वर्तक]

बालमोहन लिमये

(आय. आय. टी. मुंबईतील गणितविभागाचा कायापालट करणारे आणि विद्यार्थी, शिक्षक व संशोधकांना प्रिय असणारे प्राध्यापक वर्तक यांचे मनोज्ञ चित्रण करणारा प्रा. बालमोहन लिमये यांच्या साप्ताहिक लेखमालेतील पुढील भाग. मागील भाग इथे.)

गणितविभागाचे प्रमुख

तो १९७४ सालचा नोव्हेंबर महिना होता. दादरहून स्थानीय रेल्वेने विक्रोळीपर्यंत, व तेथून ३९२ नंबरच्या बसने मी पवईला पोहोचलो होतो. आय. आय. टी.च्या आवारात शोधतशोधत मी गणितविभागाच्या कार्यालयापाशी आलो. त्या वर्षी मी गोव्यातील पणजी येथील पदव्युत्तर अध्यापन व संशोधन केंद्रात (Centre for Postgraduate Instruction and Research) काम करत होतो. काही कारणाने मुंबईला आलो असताना मला बातमी मिळाली की थोड्याच दिवसात आय. आय. टी.च्या गणितविभागात काही सहायक प्राध्यापक नेमले जाणार आहेत. म्हणून मला विभागप्रमुखांना भेटायचे होते. त्यावेळी विभागप्रमुख होते प्राध्यापक मनोहर नरहर वर्तक. त्यांनी माझी विचारपूस केली आणि सांगितले की मला मिळालेली खबर बरोबर आहे. दोनच दिवसांनी मुलाखती होणार होत्या, परंतु अर्ज करण्याची शेवटची तारीख केव्हाच उलटून गेली होती. मी खट्टू झालेला बघून ते म्हणाले की हवे असेल तर अजूनही अर्ज भरून द्या, मी तो निवड समितीपुढे ठेवीन. मला हायसे वाटले. मी अर्ज भरून दिला. मग असे ठरले की मुलाखतीच्या दिवशी मी कुलाब्यातील टिफ्रमध्ये (TIFR: Tata Institute of Fundamental Research) थांबायचे आणि फोनची वाट पाहायची. मी १९६९ सालापासून टिफ्रमध्ये काम करत असल्याने व तेथूनच प्रतिनियुक्तीवर (on deputation) मी गोव्याला गेलो असल्याने मला तिथे थांबणे सोयीचे होते. दुपारी दोन वाजता मला बोलावणे आले. पवईला पोचेपर्यंत चार वाजून गेले होते आणि शेवटच्या उमेदवाराची – डॉ. कपिल जोशी यांची - मुलाखत चालू होती. नंतर एका जादा उमेदवाराची म्हणजे माझी मुलाखत झाली. प्राध्यापक वर्तकांनी मला संभाव्यताशास्त्रातील (Probability Theory) काही प्रश्न विचारले. इतरांनीही काही प्रश्न विचारले. दुसऱ्या दिवशी मी गोव्याला परतलो.

माझी निवड झाल्यावर १९७५च्या मे महिन्यात मी आय. आय. टी.च्या गणितविभागात रुजू व्हायला आलो, तेव्हा सर्वप्रथम प्राध्यापक वर्तकांना भेटून मी त्यांचे आभार मानले. त्यावर ते इतकेच म्हणाले की मी फक्त तुमचा अर्ज निवडसमितीपुढे ठेवला, बाकी सगळे रीतसर झाले, मी काहीच विशेष केले नाही. ही प्रतिक्रिया ऐकून मी तात्काळ समजलो की मी एका अतिशय सत्शील माणसापुढे उभा आहे. तसे पाहिले तर त्यांना मला वाटाण्याच्या अक्षता कधीच लावता आल्या असत्या. केवळ त्यांच्या पुढाकारामुळे मला ही नवीन नोकरी मिळाली होती. पण आपण कोणतेही लहान-मोठे चांगले काम केल्यानंतर आता आपला सहभाग संपला असे मानून नामानिराळे रहाणे ही वर्तकसरांची सहजप्रवृत्ती होती.

Vartak in Maths Department

आय. आय. टी.च्या गणितविभागात (सुमारे १९७०)

आय. आय. टी.मधील माझी सुरुवात काही सुधेपणाने झाली नाही. वैद्यकीय तपासणी करताना एका डॉक्टरच्या लक्षात आले की माझ्या हृदयाचे ठोके पडताना त्यांत एक जास्त मरमर (murmur) आहे. मग ही मरमर माझ्या कामकाजावर घातक परिणाम करू शकते का असा प्रश्न उभा राहिला. छातीचे क्ष-किरण छायाचित्र काढले, तर माझे हृदय प्रमाणाबाहेर मोठे असल्याचे दिसून आले. माझ्यासाठी हे सगळे आश्चर्याचे धक्केच होते. गेल्या तीस वर्षांत माझ्या किती तरी वैद्यकीय तपासण्या झाल्या होत्या. माझी आई डॉक्टर असल्याने तिने नेहमीच माझ्या आरोग्याची कटाक्षाने काळजी घेतली होती. शाळा-कॉलेजात मी खोखो आणि आट्यापाट्या खेळत असताना कधीच काही जाणवले नव्हते. अमेरिकेला जाण्यापूर्वी व तिकडे गेल्यावरही कसून तपासण्या झाल्या होत्या. मी मनाने मोठा असल्याचा (गैर)समज बाळगत असलो, तरी मुळातच माझे हृदय फार मोठे असल्याचे मला माहीत नव्हते. डॉक्टर बिलियंगडी या आय. आय. टी.च्या जेष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याने (Senior Medical Officer) मला कायमची नोकरी न देता माझी काही वर्षांसाठी तात्पुरत्या करारावर नेमणूक करावी असा प्रस्ताव मांडला. शेवटी मला सेंट जॉर्ज हॉस्पिटल ह्या सरकारी दवाखान्यामधील हृद्रोगतज्ज्ञ डॉ. गोयल यांच्याकडून तपासणी करून घ्यायला लागली. त्यांनी स्वच्छ लिहून दिले की माझ्या हृदयातील मरमर ही कार्यात्मक (Functional) आहे, म्हणजे तो माझ्या हृदयाच्या कामाचाच एक भाग आहे व म्हणून ती निरुपद्रवी आहे. या सगळ्या प्रकरणात माझे दोन-तीन महिने अगदी तणावाखाली गेले. वैद्यकीय तपासणीचा समाधानकारक निकाल मिळाल्यानंतर बऱ्याच काळाने कुणी तरी मला सांगितले की माझ्या बाबतीत झालेला हा घोळ काही प्रमाणात हेतुपूर्वक होता. पण कोणाचा हेतू आणि काय हेतू हे प्रश्न त्यावेळी मला बुचकळ्यात टाकणारे होते. त्यांची उत्तरे मला नंतर काही अंशी मिळाली.

मनोहर वर्तक हे रामनारायण रुइया कॉलेजातून पदार्थविज्ञान हा मुख्य विषय घेऊन बी. एस्सी. झाले, व तेथूनच १९५० साली उपयोजित गणित (Applied Mathematics) या विषयात त्यांनी एम. एस्सी. पदवी मिळवली. १९४८ साली मुंबई विद्यापीठात सांख्यिकी विभाग सुरु झाला होता. त्या विभागातून १९५२ साली सांख्यिकी या विषयातदेखील त्यांनी एम. एस्सी. पदवी मिळवली. त्यानंतर कुलाब्यातील टिफ्र (TIFR) येथे संशोधक विद्यार्थी या नात्याने ते आधुनिक गणितातील मान अभ्यास (Measure Theory), बीजगणित (Algebra) व संस्थिति (Topology) हे तीन मुख्य विषय वर्षभर शिकले.

Young Vartak

तरुणपणी

पुन्हा मुंबई विद्यापीठाच्या सांख्यिकी विभागात येऊन पहिल्यांदा वरिष्ठ संशोधन अधिछात्र (Senior Research Fellow) असताना, व नंतर व्याख्याता (Lecturer) झाल्यावरही त्यांनी विभागप्रमुख डॉ. मुकुंद चंद चक्रबर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. या पदवीसाठी संशोधन केले. त्यांनी १९६१ साली ती पदवी मिळवली. भारतात अध्ययन करून सांख्यिकी विषयात डॉक्टरेट मिळवणाऱ्या सुरुवातीच्या काही थोड्या विद्यार्थ्यांत ते मोडतात. या काळात त्यांनी ॲनल्स ऑफ मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स, कॅनेडियन जर्नल ऑफ मॅथेमॅटिक्स, जर्नल ऑफ इंडियन स्टॅटिस्टिकल असोसिएशन अशा उत्तमोत्तम नियतकालिकांमध्ये सहा शोधनिबंध लिहिले, व त्या सगळ्यांचे ते एकटेच लेखक होते. १९६२ साली मुंबईच्या आय. आय. टी.मध्ये व्याख्याता म्हणून त्यांची नेमणूक झाली, व दोन वर्षांनी ते सहायक प्राध्यापक (Assistant Professor) झाले. १९६६ मध्ये बिटस (BITS: Birla Institute of Technology and Science), पिलानी येथे काम करणारे प्राध्यापक पी. सी. जैन मुंबईच्या आय. आय. टी.मध्ये आले व विभागप्रमुख बनले. त्यानंतर १९६९ साली आय. आय. टी. कानपूरमधून प्राध्यापक आर. डी. भार्गव आले, व ते विभागप्रमुख झाले. या दोघांनी गणितविभागात एकमेकांविरुद्ध कारवाया करायचा चंगच बांधला. दोघांचे एका बाबतीत मात्र मतैक्य होते, ते म्हणजे इतर कोणाला प्राध्यापक बनू द्यायचे नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत वर्तकसरांनी आपले शिकवण्याचे व संशोधनाचे काम कसोशीने चालू ठेवले. ते आपल्या सर्व विद्यार्थ्यांशी प्रेमादराने वागत. इतर ज्येष्ठ प्राध्यापक हे केवळ विद्यार्थ्यांशीच नाही तर आपल्या सहकारी शिक्षकांशी देखील मगरुरीने वागत, विद्यार्थ्यांना आपली व्यक्तिगत कामे, घरची कामे करायला लावत. या पार्श्वभूमीवर वर्तकसरांचे वागणे अगदी उठून दिसे.

वर्तकसरांचा सल्ला गणितविभागाच्या बाहेरचे शिक्षक-संशोधकही घेत असत. मेकॅनिकल एंजिनिअरिंग व इलेक्ट्रिकल एंजिनिअरिंग या विभागांतील कित्येक जण त्यांना आपले प्रश्न समजावून सांगत, व त्यातून मार्ग कसा काढायचा याबाबत सल्ला मागत. वर्तकसर उत्साहाने व मनापासून रस घेऊन त्यांना मदत करत. दरम्यान प्राध्यापक पुरुषोत्तम काशिनाथ (उर्फ पी.के.) केळकर हे मुंबई आय. आय. टी.चे निदेशक (Director) बनले होते. वर्तकसरांचे पारडे इतके जड होत गेले की जैन-भार्गव ही दुक्कल वर्तक सरांना प्राध्यापक बनण्यापासून थोपवू शकली नाही. शेवटी १९७३ साली मे महिन्यात वर्तकसर प्राध्यापक झाले. लगेच गणितविभागातील सदस्यांनी वर्तकसरांनाच विभागप्रमुख बनवण्याचा कौल दिला; जणू ते सदस्य या संधीची वाटच बघत होते. तो कौल निदेशक केळकरांनी मानला.

विभागप्रमुख झाल्यावर वर्तकसरांना वेगळ्याच गोष्टींचा सामना करावा लागला. प्राध्यापक जैन व भार्गव यांची सुंदोपसुंदी वर्तकांना पछाडू लागली. त्या दोघांच्या नाही-नाही त्या मागण्या पुरवणे कठीण होऊ लागले. उदाहरणार्थ, दोघांनाही मोठे-थोरले चार खणांचे कार्यालय (four bay office) हवे होते, तर एकाला प्रवेशद्वारावर ‘ज्येष्ठ प्राध्यापक (Senior Professor)’ अशी पाटी पाहिजे होती, तसे पद आमच्या संस्थेत नसतानाही. शेवटी निदेशक केळकरांनी गणितविभागातील एक कार्यक्षम व सत्प्रवृत्तीचे सदस्य डॉ. बी. एस. रामचंद्रराव यांना बोलावून घेतले. त्यांनी केळकरांना सांगितले की प्राध्यापक वर्तक कुणासाठी काहीही करायला नकार देऊ शकत नाहीत, अगदी ती गोष्ट स्वत:च्या गैरसोयीची असली तरी. केळकरांनासुद्धा वर्तकांचा हा स्वभाव माहीत झाला होता. त्यांच्या तोंडून एकच वाक्य सहज बाहेर पडले, ‘प्राध्यापक वर्तक हे धर्मराज आहेत’ असे. प्राप्त परिस्थितीवर मात करण्यासाठी निदेशक केळकर यांनी एक उपाय काढला. त्यांनी गणितविभागाचे सहयोगी प्रमुख (Associate Head) असे तात्पुरते पद निर्माण केले व त्यावर रामचंद्ररावांची नेमणूक केली. सगळी कागदपत्रे त्यांनी डोळ्याखालून घालायची व प्राध्यापक वर्तकांशी सल्लामसलत करून निर्णय घ्यायचे असे सांगितले. ह्या जोडगोळीने चांगली कामगिरी केली. रामचंद्रराव जणू वर्तकांच्या न्याय्य आचरणाचे संरक्षक बनले. एक वर्ष संपायच्या आत रामचंद्रराव केळकरांकडे गेले. त्यांनी केळकरांना वर्तकांची कारकीर्द आता सुरळीत चालू आहे व म्हणून सहयोगी प्रमुखाची गरज नसल्याचे सांगितले. रामचंद्ररावांनी जसे खंबीरपणे वर्तकांवरचे हल्ले थोपवले, तसेच काम झाल्यावर निःस्वार्थीपणे ते त्या अधिकारक्षेत्रातून बाहेरही पडले. हेच रामचंद्रराव काही वर्षांनी स्वतः प्राध्यापक झाले, व मग विभागप्रमुख बनले. नंतर त्यांनी संपूर्ण आय. आय. टी.च्या शैक्षणिक कार्यक्रमांचे संकायाध्यक्ष (Dean of Academic Affairs) या पदाची धुरा सांभाळली.

वर्तकसर विभागप्रमुखपदी स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी एक महत्त्वाचे काम हाती घेतले. त्यावेळी गणितविभागात यामिकी (Mechanics) या विषयात काम करणाऱ्यांचा भरणा होता. त्यांच्यातही पुन्हा दोन गट होते, द्रायु यामिकी (Fluid Mechanics) करणारे व स्थायु यामिकी (Solid Mechanics) करणारे. खरे म्हणजे हे विषय ब्रिटिशांच्या काळात गणिताचा भाग समजले जात असले तरी आता त्यांना गणिताचा भाग मानणे कालबाह्य झाले होते. जगभरातील गणितविभागांत नवीन शाखा प्रचलित होत होत्या. आधुनिक गणितातील विश्लेषण (Analysis), बीजगणित (Algebra), संस्थिती (Topology), समचय (Combinatorics) या शाखांचे प्रतिनिधित्व करणारे जवळजवळ कोणीच आमच्या विभागात नव्हते, डॉ. देवीदास पै व डॉ. गिरीश पटवर्धन यांच्याशिवाय. वर्तकसरांनी गणितविभागाचा कायापालट करायचे ठरवले. संधि मिळताच नव्या शाखांत संशोधन करणाऱ्यांची भरती करायचे त्यांनी पक्के केले. डॉ. रामचंद्रराव यांच्यासारख्या काही सुज्ञ सदस्यांचा त्यांना पाठिंबा होता. विशेष म्हणजे वर्तकसरांचा मूळ विषय सांख्यिकी व रामचंद्ररावांचा यामिकी. पण त्या दोघांचे दृष्टिकोन विशाल होते. वर्तकसरांच्या मनात असलेल्या पायाभूत गोष्टी जमून येणे नेहमीच शक्य नव्हते. पण सुदैवाने १९७४ साली झालेल्या मुलाखतींनंतर जे चार नवे सदस्य गणितविभागात रुजू झाले ते सर्व गणिताच्या आधुनिक शाखांत काम करणारे होते: मी, डॉ. मधुकर देशपांडे, डॉ. कपिल जोशी आणि डॉ. प्रेम नारायण. गणितविभागातील काही सदस्यांना आमच्या आगमनाची निरर्थक भीती वाटू लागली, विशेषत: दुढ्ढाचार्य़ांना. त्यामुळे आमचे स्वागत यथातथाच झाले. याच संदर्भात माझ्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल लांबवण्याचा प्रयत्न झाला होता अशी कुणकुण मला नंतर लागली.

वर्तकसरांनी गणितविभागाला आधुनिक बनवण्यात घेतलेला पुढाकार फार दूरदृष्टीचा ठरला. जसजसे वयोपरत्वे विभागातील सदस्य निवृत्त होत गेले, तसतसे गणिताच्या नवनवीन शाखांत काम करणारे सदस्य आमच्या विभागात दाखल होऊ लागले. आज मुंबईच्या आय. आय. टी.मधील गणितविभाग संपूर्ण भारतातील कुठल्याही विद्यापीठाच्या अथवा संस्थेच्या गणितविभागाशी तुल्यबळ आहे. या प्रगतीची पायाभरणी वर्तकसरांनी व त्यांची कामगिरी पुढे नेणाऱ्या रामचंद्ररावांनी केली आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही.

वर्तकसर करत असलेल्या सर्वच गोष्टी पसंत पडत नसल्या तरी गणितविभागातील बहुसंख्य सदस्यांना त्यांची कारकीर्द सुखावह झाली. आय. आय. टी.मधील कुठल्याही विभागाचे प्रमुखत्व फक्त तीन वर्षांसाठी असते. त्यानंतर विभागातील सदस्यांच्या मतांनुसार दुसरे कोणी तरी प्रमुख बनते. ही गोष्ट खूप दृष्टींनी हितावह असते. पहिले म्हणजे एकाच माणसावर शासकीय जबाबदारीचे ओझे फार काळ पडत नाही. दुसरे असे की निरनिराळे दृष्टिकोन पुढे येण्यास वाव मिळतो, व लोकशाही कार्यपद्धतीची बीजे चांगली रुजू शकतात. वर्तकसरांच्या प्रमुखपदाची मुदत संपल्यावर आय. आय. टी.चे नवे निदेशक प्राध्यापक ए. के. डे यांनी गणितविभागातील सदस्यांची मते मागवली. बहुमताने वर्तकसरांचेच नाव पुढे आले. निदेशकांनी जराशा नाखुषीनेच वर्तकसरांची पुन्हा प्रमुखपदी नेमणूक केली, पण फक्त एकच जादा वर्षासाठी. ते वर्ष संपल्यावरही सर्व सदस्य आपल्या मतांवर ठाम राहिले. पण तेव्हा मात्र निदेशकांनी ते मानले नाही. आज मागे वळून पाहताना वाटते की निदेशकांनी एक वर्षाऐवजी तीन वर्षांसाठी वर्तकसरांची पुनर्नियुक्ती केली असती, तर १९७८ साली गणितविभागाला एम. एस्सी.च्या प्रवेशपरीक्षेबाबत ज्या दुर्धर प्रसंगातून जावे लागले, तो टळला असता. पण त्या प्रसंगाची वाच्यता इथे करायला नको.

सांख्यिकी या विषयातील ‘प्रयोगांचे संकल्पन’ (Design of Experiments) या भागात वर्तकसर विशेषज्ञ होते. शिवाय संक्रिया संशोधन (Operations Research) व आलेखशास्त्र (Graph Theory) यांमध्येही ते निपुण होते. त्यांच्या ज्ञानाचा आवाका फारच मोठा होता, गणितातील संस्थितीपासून (Topology) यामिकीपर्यंत (Mechanics). आम्हा सर्वांची अशी धारणा होती की कुणीही वर्तकसरांकडे गणित अथवा सांख्यिकी या दोन विषयातील कुठल्याही शाखेतील प्रश्न घेऊन गेले, तर रिकाम्या हाताने परत यावे लागणार नाही; त्यांच्याकडून काहीतरी उपयुक्त गोष्ट नक्की मिळेल. जरी संपूर्ण उत्तर नाही मिळाले, तरी एखादी सूचनिका (hint) किंवा निदान एखादा संदर्भ (reference) तरी मिळेलच. म्हणजे वर्तकसर जसे विशेषज्ञ (Specialist) होते, तसे सामान्यज्ञही (Generalist) होते. असा प्राध्यापक सापडणे आजकाल फार विरळ होत चालले आहे!

Vartak in Lecture

आय. आय. टी.त व्याख्यान देताना

वर्तकसरांची शिकवण्याची क्षमता तर अवर्णनीय होती. नेहमीच्या अभ्यासक्रमातील व त्याबाहेरील अगदी नव्याने प्रस्तुत केले जाणारे अनेक विषय ते शिकवत. मी आय. आय. टी.मध्ये शिकवायला सुरुवात केली तेव्हा एका सत्रामध्ये (semester) प्रत्येक जण एक किंवा फार तर दोन पाठ्यक्रम (courses) शिकवत असे, म्हणजे दर आठवड्यात चार किंवा फार तर आठ तास. वर्तकसर मात्र नित्यनेमाने दर आठवड्यात दहा ते बारा तास, तर कधी कधी पंधरा तास शिकवायचे. एखाद्या सत्रामध्ये आठऐवजी नऊ तास शिकवायला लागले तर आमच्यासारखे तरुण शिक्षक कुरकुरत असत, कारण त्यामुळे संशोधन करण्यातला वेळ कमी होत असे ना! पण वर्तकसर नवनवीन प्रश्नांबाबत संशोधन करायचे व भरपूर शिकवायचेही. कित्येक विद्यार्थ्यांना त्यांनी पीएच. डी.साठी मार्गदर्शन केले. तुमच्या हाताखालीच आम्हाला संशोधन करायचे आहे असा खूप विद्यार्थ्यांचा आग्रह असायचा. जर एखाद्या विद्यार्थ्याने वर्तकसरांच्या नेहमीच्या अभ्यासात नसलेल्या विषयात संशोधन करण्याची तीव्र इच्छा दाखवली तर ते स्वतः तो विषय आत्मसात करून त्याला मार्ग दाखवू शकत. जेव्हा रजनी जोशी या विद्यार्थिनीने आपल्या पीएच. डी.साठी पेशी व रेणू यांच्या जीवशास्त्रातील (cellular and molecular biology) काही प्रश्न संभवाधिष्ठित पद्धती (probabilistic methods) वापरून सोडवण्याचे मनात आणले तेव्हा असेच झाले. संस्थेच्या अनेक विभागांत जाऊन सेमिनार्स द्यायलाही वर्तकसर तयार असायचे. कुणी काही विनंती केली की त्याला हमखास होय असेच उत्तर त्यांच्याकडून मिळायचे. एके वेळी गंमत झाली होती. त्यांच्या देवदास आचार्य नावाच्या विद्यार्थ्याचा सेमिनार गणितविभागात होता. वर्तकसर आधीच वर्गात येऊन बसले होते. सेमिनार सुरू होऊन पाच मिनिटे होताहेत तो इलेक्ट्रिकल एंजिनिअरींग विभागातील एक प्राध्यापक लगबगीने वर्तकसरांना शोधत आले, कारण वर्तकसरांनी त्या विभागातील एका विद्यार्थ्याच्या त्याच वेळी आयोजलेल्या सेमिनारचे परीक्षक म्हणून काम स्वीकारले होते. आता इच्छा असूनही वर्तकसर एकाच वेळी दोन ठिकाणी कसे असू शकणार? वर्तकसर काकुळतीला येऊन म्हणाले की हा सेमिनार संपला की लगेच तिकडे येईन.

वर्तकसर भारतातील अनेक विद्यापीठांमध्ये व्याख्याने द्यायला, परिसंवादांत व कार्यशाळांत भाग घ्यायला खुशीने जात. त्यांचे कठीण संकल्पना समजवून सांगण्यातले कसब आणि आह्लाददायक व्यक्तिमत्व श्रोत्यांना एके जागी खिळवून ठेवी. भारताच्या बाहेरील विद्यापीठांकडून येणारी आमंत्रणे मात्र त्यांना आकर्षित करत नसत.

आमच्या गणितविभागात १९७७ सालापासून एम.एस्सी. करायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना संगणकशास्त्रात विशेषीकरण (Specialization) करता येऊ लागले. वर्तकसरांच्या भरघोस पाठिंब्यामुळे त्यापुढील वर्षापासून विद्यार्थ्यांना ‘सांख्यिकी आणि संक्रिया संशोधन (Statistics and Operations Research)’ या विषयातही विशेषीकरण करता येऊ लागले. त्यासाठी कितीतरी नवे पाठ्यक्रम निर्माण करावे लागले व ते शिकवण्याची जबाबदारी घ्यावी लागली. पण जिथे कुठे तुटवडा पडेल तो भरून काढायची वर्तकसरांची कायम तयारी होती. म्हणूनच हे नवे विशेषीकरण संगणकशास्त्रासारख्या लोकप्रिय विशेषीकरणाच्या तोडीचे ठरले. भारतातील उद्योगसमूहांच्या दृष्टीने ही एक फारच उपकारक घटना होती.

मुंबईच्या आय. आय. टी.मध्ये चोवीस वर्षे म्हणजे दोन तपे काम केल्यावर १९८६ साली वर्तकसर निवृत्त झाले. वर्तकसर आता आपल्या विभागात जातीने उपस्थित असणार नाहीत याची तीव्र जाणीव होत असे. प्रत्यक्षात निर्माण झालेली ही पोकळी भरून काढायचे प्रयत्न करणे भाग होते, पण ते काम सोपे नव्हते, व ते पूर्णत्वाने करणे शक्यही नव्हते. वर्तकसरांच्या सन्मानार्थ आमच्या विभागात ‘Optimization, Design of Experiments and Graph Theory’ या विषयांवर एक परिसंवाद झाला. अनेक ख्यातनाम सांख्यिक व गणिती उपस्थित राहिले, आणि त्यांनी शोधनिबंध प्रस्तुत केले. आमच्या विभागातीलच प्रा. एम. एन. गोपालन आणि प्रा. जी. ए. पटवर्धन यांनी या परिसंवादाचे कार्यवृत्त (Proceedings) संपादित केले. हे सुमारे ४८० पानांचे कार्यवृत्त १९८८ साली प्रसिद्ध झाले. त्यांतील चार शोधनिबंधांचे सहलेखक (joint author) स्वतः वर्तकसर होते. निवृत्तीनंतर वर्तकसरांनी पवईतीलच निटी (NITIE: National Institute of Industrial Engineering) या संस्थेत तीन वर्षे काम केले. निटीतले काम उरकल्यावर आमच्या, म्हणजे त्यांच्याच, विभागाला कधी कधी ते भेट द्यायचे. ते प्रसंग कायमचे आठवणीत आहेत.

प्राध्यापक वर्तकांनी आमच्या संस्थेच्या शैक्षणिक कार्यकलापात केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची पावती म्हणून आय. आय. टी.ने त्यांना १९८९ साली ‘गुणश्री प्राध्यापक (Professor Emeritus)’ या तहहयात पदाने गौरवले. १९८८ मध्ये आय. आय. टी.ने सुरु केलेल्या या उपक्रमाच्या पहिल्या वीस वर्षांत, म्हणजे २००८ सालापर्यंत, गणितविभागातील ते एकटेच गुणश्री प्राध्यापक होते. प्राध्यापक रोहित मनचंदा यांनी ‘Monastery, Sanctuary, Laboratory, 50 Years of IIT Bombay’ या शीर्षकाचे इतिहासवजा पुस्तक २००८ साली लिहिले. गणितविभागातील प्राध्यापकांपैकी फक्त वर्तकसरांच्या कामाचा त्यात उल्लेख आढळतो.

आता वर्तकसरांच्या वैयक्तिक जीवनासंबंधी थोडे तरी लिहिल्याशिवाय राहवत नाही. त्यांचा जन्म मुंबईला १९२६ साली नोव्हेंबर महिन्यात झाला. शिष्यवृत्ती व अधिछात्रवृत्ती (fellowship) मिळवूनच त्यांना आपले शिक्षण पुरे करता आले. ते मुंबई विद्यापीठाच्या सांख्यिकी विभागात शिकवत असताना पुण्याच्या मंदाताई केळकर यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. मग त्या पार्ले कॉलेजमध्ये गणित शिकवू लागल्या. दोन मुलींचा जन्म होईतो वर्तकसर आय. आय. टी.त काम करू लागले होते. धाकटी मुलगी अवघी अडीच वर्षांची असतानाच सौ. मोहिनी वर्तकांचा मूत्रपिंडाच्या विकाराने अकाली मृत्यू झाला. वर्तकसरांवर कुऱ्हाड कोसळली. मुली काही वर्षे वर्तकसरांच्या आई-वडिलांकडे गिरगावामधील ठाकुरवाडीत राहायला गेल्या, आणि ते आय. आय. टी.च्या आवारातील निवासस्थानातच राहिले. झालेल्या भावनिक हानीचा सामना करता यावा म्हणून वर्तकसरांनी स्वतःला अध्यापन व संशोधन करण्यात झोकून दिले. वर्षभरानंतर मालतीबाई भावे यांच्याबरोबर पुनर्विवाह झाल्यावर त्यांनी एक गोष्ट काटेकोरपणे करायचे ठरवले; ती म्हणजे दिवंगत पत्नीबद्दल चकार शब्द काढायचा नाही. हा नियम त्यांनी इतक्या कसोशीने पाळला की त्यांच्या मुलींनादेखील आपल्या जन्मदात्या आईबद्दल फारशी माहिती नाही. मालतीबाईंच्या हाती संसाराची सगळी सूत्रे देऊन वर्तकसर स्वतः आपल्या कामात गढून गेले. यातला मुख्य हेतू म्हणजे आपल्या काही बोलण्याचालण्याने मुली व मालतीबाई यांच्यात थोडेही वितुष्ट येऊ नये. मालतीबाईंनीही वर्तकसरांना पुरेपूर साथ दिली. स्वतःला मुलगा व्हायच्या आधी आणि नंतर सर्व मुलांचे समान संगोपन केले, इतके की आपला मुलगा स्नातक (graduate) होईपर्यंत त्याला कल्पनाही येऊ दिली नव्हती की त्याच्या बहिणींची आई वेगळी होती! मालतीबाईंनी घालून दिलेला हा आदर्श आचरणात आणणे सोपे नाही. मोठी मुलगी मला एकदा सांगत होती की अखेरच्या आजारात तिचे बाबा पहिल्यांदाच तिच्या आईबद्दल काही बोलू पहात होते, पण तेवढ्यात कोणी तरी आले व तो विषय तिथेच राहिला. केवढा हा जन्मभर पाळलेला संयम आणि निर्धार!

वर्तकसर सर्वांशी अतिशय अदबीने वागत, मग तो माणूस वयाने किंवा योग्यतेने लहान असो वा थोर असो. भेटीच्या पहिल्या दिवसापासून ते मला ‘लिमये साहेब’ असे म्हणत. मी कितीही वेळा नापसंती दाखवली तरी त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मी त्यांच्यापेक्षा अठरा वर्षांनी लहान, गणितविभागात नुकताच रुजू झालेला, आणि ते विभागप्रमुख! मला किती ओशाळल्यासारखे होत असेल याची कल्पना करावी. कधी त्यांच्या आय. आय. टी. परिसरातील घरी जायचा प्रसंग आला तर ते स्वतः कॉफी बनवत, आधी थोड्या पाण्यात पावडर घोटून घोटून. मालतीबाई म्हणायच्या की ह्यांना वाटते त्यांच्यासारखी कॉफी दुसरे कोणी बनवू शकत नाही, मग मी कशाला मध्ये पडू! एकदा काही प्रवासाचा विषय निघाला असता मालतीबाईंनी आपल्या मनातली एक खंत बोलून दाखवली. सगळ्या सरकारी नोकरांप्रमाणे आय. आय. टी.त काम करणाऱ्यांनासुद्धा दर चार वर्षांतून एकदा आपल्या कुटुंबाला घेऊन भारतातील कोठल्याही स्थळाला भेट देण्यासाठी रजा मिळते, प्रवासखर्चासकट (LTC: Leave Travel Concession). मालतीबाई म्हणाल्या की उण्यापुऱ्या वीस वर्षांत वर्तकसर सहकुटुंब कुठेही गेलेले नाहीत! सर तिथेच होते. त्यांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य काहीतरी सांगत होते. आम्हा कुणाला कळले नाही, तरी मालतीबाई समजून होत्या. काही दिवसांपूर्वी वर्तकसरांची मोठी मुलगी बोलता बोलता सहज म्हणाली की आय. आय. टी.च्या आवारात इतकी वर्षे राहिल्याने आम्हा मुलांचा व्यक्तिविकास तर झालाच, पण आम्हाला आय. आय. टी.मध्ये शिक्षण घेण्यासाठी घरून उत्तेजन मिळाले असते तर बरे झाले असते असे वाटून जाते. जो माणूस एका मोठ्या दुनियेसाठी स्वत:ला वाहून घेतो त्याच्याकडून कुटुंबीयांच्या साध्या अपेक्षाही काही वेळा पूर्ण होत नाहीत हेच खरे.

निवृत्तीनंतर काही काळाने वर्तकसर विलेपार्ले येथे ‘विष्णुप्रसाद’ या इमारतीमधील त्यांच्या घरात राहायला लागले. त्यांच्या तिन्ही मुलांचे विवाह झाल्यानंतर त्यांना एक प्रकारचे समाधान प्राप्त झाले. तरूणपणापासून त्यांना मधुमेहाचा विकार होता. एकदा राहत्या इमारतीच्या प्रवेशद्वारासमोरील चांभाराकडे चपला दुरुस्त करायला ते गेले असता पाय अडकून पडले, त्यांच्या मानेला दुखापत झाली व कॉलरबोनचे फ्रॅक्चर झाले. त्यातून ते पूर्णपणे बाहेर येऊ शकले नाहीत. अखेर २१ जून १९९७ रोजी हृदयविकाराचा झटका येऊन ते मृत्यू पावले, अवघे ७० वर्षांचे असताना. त्यालाही आता २४ वर्षे होऊन गेली.

Vartak in 1996

मे १९९६ मध्ये

वर्तकसरांच्या वडिलांनी – नरहरपंतांनी – ‘मी आणि माझी माणसे’ या शीर्षकाचे एक हस्तलिखित तयार केले होते; त्यातील काही भाग मोडी लिपीत लिहिला होता. त्यांच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी ते पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले. त्यांत नरहरपंत म्हणतात, ‘सालसपणा व एकमार्गीपणा हे मनोहरचे गुण खरोखर अभिनंदन करण्यासारखे आहेत. कुशाग्र बुद्धीचा-मेहनती-हुशार-अभ्यासू-निगर्वी-चाणाक्ष-शीलवान-आज्ञाधारक-वडील मंडळींचा मान राखणारा-सत्यवचनी-सुसंगती असा हा मुलगा म्हणजे कुटुंबातील एक रत्नच होय. आमच्यामध्ये यातले किती गुण आहेत याचा विचार न करणे हेच बरे. असा हा मुलगा आमचा मुलगा आहे हाच आमचा मोठेपणा, हीच आमची थोरवी.’ हे वाचल्यावर ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा’ या तुकोबांच्या वचनाची मला आठवण झाली. अशा या मनोहारी व्यक्तिमत्वाला माझे शतश: प्रणाम!

(पुढील भाग इथे)
---

बालमोहन लिमये

(balmohan.limaye@gmail.com)

Balmohan Limaye 2020

लेखकाचा अल्प-परिचय : मुंबईच्या आय्. आय्. टी.मधील गणित विभागात ४२ वर्षे काम केल्यानंतर आता गुणश्री प्राध्यापक (Professor Emeritus). पवईलाच रहिवास.

बालमोहन लिमये यांचे इतर लिखाण

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

इतके छान मराठी प्रतीशब्द (mechanics = यामिकी, generalist=सामान्यज्ञ, Dean=संकार्याध्यक्ष) मिळाल्यामुळे यावेळी गणित नाही याकडे आधी लक्ष गेलं नाही. पण असायला हवं होतं असं नंतर वाटलं मात्र!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फारच छान लिहिला आहे! वर्तक सरांच्या सरांच्या ज्ञान आणि तितकाच साधेपणा याचा मी खूप अनुभव घेतला आहे.

माझ्या अल्पमतीने लिमये-जोशी-देशपांडे या त्रयीच्या गणित विभागात रुजू झाल्यानन्तर विभागाचा चेह्ररा-मोह्ररा प्रचण्ड बद्लला. तुम्हाला स्वत:ला
याचे पुष्कळ श्रेय जाते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शरद साने

तुमच्या निवडीबद्दल तुम्ही लिहिलेल मला माहीत नव्हते! माझीही मुम्बई विद्यापीठात पूर्ण प्राध्यापकपदी (full professor) निवड (१९८४) नन्तर अर्ज कमिटी पुढे ठेवूनच झाली!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शरद साने

साधा सोपा छान झाला आहे लेख.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख वाचून माझे मराठी आणखी प्रगत झाले, मराठी प्रतिशब्द आग्रहपूर्वक वापरण्याचा आपला शिरस्ता कौतुकास्पद आहे. मागील लेखांप्रमाणे गणिताविषयी एक दोन रंजक गोष्टी टाकल्या असत्या तर बरे झाले असते, लेख निव्वळ व्यक्तिकेंद्रित झाला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'सिमेस्टर' साठी 'सत्र' आणि 'कोर्सेस' साठी 'अभ्यासक्रम' हे शब्द न वापरल्याचे थोडे आश्चर्य वाटले. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एखाद्या आदरणीय व्यक्तीच्या नावाला 'सर' जोडणे हा मराठीत घुसलेला एक भंगार प्रकार आहे असे मला वाटते. असो. काही भंगार प्रकार अखेर रुळतात आणि भाषेचा अविभाज्य भाग बनतात, उदाहरणार्थ हिंदीतले "मैं तुम्हारे लिए वेट करूंगा."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भंगार मुळीच नाही. भारतात दुर्दैवाने व्यक्तिसम्बोधनास काडीमात्र प्रमाणीकरण (standardisation) नाही. तमिळनाडू सारख्या प्रगत राज्यात (जिथे सध्या मी बराच काळ राहतो), माझ्या संस्थेच्या tempo tracks ड्रायव्हरास सुद्धा सर असेच सम्बोधले जाते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शरद साने

तमिळनाडूचे माहित नाही - तिथे नट-नट्यांची मंदिरे बांधतात आणि ते/त्या निवर्तल्यावर आत्महत्याही होतात म्हणे. मराठीत श्री/श्रीमती पुरेल. पुरुषांस राव/पंत आणि स्त्रियांस ताई/बाई. अथवा डॅाक्टर, प्रोफेसरादि कमावलेल्या उपाध्या. किंवा counterintuitively, फारच थोरांस एकवचनीच योग्य, जसे की राम, कृष्ण, पार्वती, शिवाजी, आणि खेळाडूंना तर सर्रास एकवचनी. काही परिस्थितींत दोन्ही लिंगांच्या (किंवा इतर लिंगांच्याही) नावापुढे “जी” लावणे योग्य होईल.

मराठीत शिक्षकांव्यतिरिक्त कुणास ‘सर’ म्हणणे मलाही फार खटकते. आणि हा प्रकार गेल्या दोनेक दशकांत उगाचच बळावला आहे.

जाताजाता: शिवाजीला मुळात असलेल्या भारदस्त दाढीमिश्यांवर बिरुदावल्यांच्या आणखी दाढीमिश्या चिकटवणे, आणि तसे न केल्यास हिंसक होणे, हाही अलिकडचाच गैरप्रकार.

असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

मराठीत शिक्षकांव्यतिरिक्त कुणास ‘सर’ म्हणणे मलाही फार खटकते.

पण... पण... पण... इंग्रजी 'सर' हे मुळात sireचे अपभ्रष्ट रूप आहे ना? मग, (शिक्षक हे आपले (अनौरस) जन्मदाते (जन्मदात्रीचे 'वळू') असल्याखेरीज) शिक्षकांना तरी 'सर' म्हणणे हे उचित कसे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

https://en.wikipedia.org/wiki/Sir?wprov=sfti1

https://en.wikipedia.org/wiki/Sire?wprov=sfti1

नबा - तुमची माहिती चुकीची आहे. ☝️पहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

अशा गोष्टी मारून मुटकुन प्रत्येक भागात घुसडायचा माझा इरादा नाही. काही भागात मुळीच गणित नसेल, तर काही भागात फक्त गणितच असेल. ज्याला जे भावेल, त्याने ते वाचावे, नाही का? माझी इच्छा मात्र अशी आहे की सामान्यतः गणित समजून घेण्याकडे प्रवृत्ती व्हावी.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या विषयावर 'लाईफ मेंबर' नावाची एक मालिका फार पूर्वी सह्याद्री चानेलवर येऊन गेली होती. कॉलेजचे काही वरीष्ठ प्राध्यापकांना लाइफ मेंबर पद असतं. त्यांचे राजकारण, पोटदुखी आणि कुरापती.

पुण्यातीलच एका संस्थेत लाइफ मेंबर असणाऱ्या नातेवाइकामुळे तसल्या पोटदुखीचे डिटेल्स माहिती होते.
असो चालायचंच.
( अवांतर : मराठी साहित्य संमेलन, अध्यक्षपद, निवडणूक, फंड वगैरे नेहमीच गाजतं. )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या लेखमालेचा प्रस्तुत भाग हा मुख्यत्वेकरून प्रा. वर्तक ह्यांच्या विषयी आहे आणि त्यांच्या प्रति लेखकाची आदरभावना आणि कृतज्ञता त्यामधून पुरेपूर व्यक्त होते. अशा व्यक्तिमत्त्वाचा आम्हाला परिचय करून दिल्याबाबत लेखकाचे आभार.

आय आय टी सारख्या संस्थेमधील विद्वज्जन हेहि सर्वसामान्य कॉलेजातील प्राध्यापकांसारखेच राजकारण करत असतात हे कळल्याने ’घरोघरी मातीच्या चुली’ ह्या उक्तीची आठवण झाली.

लेखामध्ये नित्यपरिचित इंग्रजी शब्दांचे संस्कृताधारित मराठीमध्ये अनुवाद दिलेले आहेत. ही बाब प्रशंसनीय आहे. हे मराठी शब्द कोणी तयार केले आहेत? प्रा. लिमये स्वत: संस्कृतचे जाणकार आहेत. मला येथे तीन शक्यता दिसतात - शब्दनिर्मिति ही प्रा. लिमये ह्यांवीच आहे किंवा त्यांचे वडील आचार्य वि.प्र.लिमये ह्यांची ही निर्मिति आहे किंवा अन्य कोणाची आहे. ह्यावर थोडा प्रकाश पडल्यास बरे होईल.

काही शब्दांबद्दल थोडे अधिक स्पष्टीकरण चालेल. यामिकी (Mechanics), द्रायु यामिकी (Fluid Mechanics) आणि स्थायु यामिकी (Solid Mechanics) हे शब्द कसे तयार झाले आहेत? मोनिअर विल्यम्स पान १२६२ येथे ’स्थाणु’ standing firmly, stationary, immobile असा शब्द आहे. ’स्थाणु यामिकी’ असे तर म्हणायचे नाही ना? असेच स्पष्टीकरण संस्थिती (Topology), समचय (Combinatorics) येथेहि मिळावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'स्थायु' या शब्दाची निर्मिती नक्की कोणाची, याबद्दल कल्पना नाही, परंतु, आमच्या वेळच्या (१९७५-८१) भौतिकशास्त्राच्या (मराठी माध्यमाच्या) शालेय पाठ्यपुस्तकांतून हा शब्द (शुद्धलेखनाच्या नव्या नियमांस अनुसरून 'स्थायू' या स्वरूपात) पाहिल्याचे अंधुकसे आठवते. (चूभूद्याघ्या.)

(मला स्वतःला जुन्या पिढीतला 'घन' हा शब्द (कदाचित सवयीमुळे) अधिक भावतो, नि तो का बदलला असावा, हे कळत नाही. (शिक्षणखात्यात कोणालातरी सकाळीसकाळी पिसाळलेले सावरकर चावल्याचा परिणाम, दुसरे काय!) तसेच, fluidकरिता 'द्रायू' (द्रव + वायू अशा अर्थी) हा शब्दसुद्धा पाठ्यपुस्तकांतून तेव्हाच लागू करण्यात आला असावा, परंतु तो निदान कल्पक तरी वाटतो. (कदाचित, 'स्थायू'शी यमक जुळते, म्हणूनसुद्धा त्याची नेमणूक झाली असावी. चूभूद्याघ्या.)) असो चालायचेच.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रगत पारिभाषिक शब्द मूळ इंग्रजीतलेच वापरण्यास हरकत नसावी. ओढूनताणून तत्सम शब्द आणल्याने काय साधते? आणि पुन्हा कंसात मूळ इंग्रजी शब्द द्यावेच लागतात! मुळात esoteric विषय, त्यात पुन्हा संस्कृतचे ओझे कशाला, असे आपले मला वाटते. बाकी चालूद्या.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

आणले तर आहेत. ओढूनताणून का माहिती नाही. एकच शब्द बऱ्याचदा ऐकला आणि त्याचा अर्थ म्हणा किंवा कशाबद्दल आहे हे कळलं की तो रुळतो.
इथले गणित प्रगत आहे, किंवा सामान्य मनुष्याच्या विचारांच्या उपयोगाच्या बाहेरचे आहे. त्यामुळे त्यासाठी तत्सम मराठी किंवा पारिभाषिक शब्द दिले किंवा नाही दिले तरी अडत नाही. उपयुक्तता नाही पण शब्द मात्र आवडलेत.

सर्वच कार्यसंस्थांत/ कार्यालयांत रोजच्य रोज काही ना काही घटना घडत असतातच . तीन चार भागांत थोडीफार कल्पना आलीच आहे. मालिका फार लांबवण्यात मजा नाही. फार तर पुस्तक रूपात प्रसिद्ध करता येईल. व्यावसायिक लेखन म्हणा किंवा esahity dot com सारख्या साईटवर उपलब्ध करता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्यावसायिक लेखन म्हणा किंवा esahity dot com सारख्या साईटवर उपलब्ध करता येईल.

‘इ साहित्य’ला विशेष प्रतिष्ठा असावी असं दिसत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

इतर चांगल्या जागाही असतीलच. पण 'गणिताच्या निमीत्ताने' मध्ये गणित शिकणे, शिकवणे,गमतीजमती,आणि त्यातील शैक्षणिक किंवा संशोधन प्रवास सगळंच आहे.
फक्त गणित, त्यातील वेगवेगळे विषय, इतर विज्ञान शाखांंशी संबंध वगैरे लिहिलेलं पुस्तक Amazon वरही टाकता येईल. A brief history of maths असं काही तरी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वच कार्यसंस्थांत/ कार्यालयांत रोजच्य रोज काही ना काही घटना घडत असतातच . तीन चार भागांत थोडीफार कल्पना आलीच आहे. मालिका फार लांबवण्यात मजा नाही. फार तर पुस्तक रूपात प्रसिद्ध करता येईल. व्यावसायिक लेखन म्हणा किंवा esahity dot com सारख्या साईटवर उपलब्ध करता येईल.

यावरून एक जुना विनोद आठवला.

एका मित्राचे (स्वयंस्फूर्त) गाणे ऐकून दुसरा मित्र त्याला म्हणतो, "मित्रा, तू रेडिओत का गात नाहीस?"

त्यावर पहिला मित्र त्याला (विनयाने) म्हणतो, "छे रे! तेवढे काही माझे गाणे चांगले नाही."

दुसऱ्याचे प्रत्युत्तर: "छे छे! तुझे गाणे चांगले आहे, असे मी कधी म्हटले? परंतु, मित्रा, रेडिओ बंद करता येतो."

----------

असो. एक अतिसामान्य वाचक म्हणून एवढेच सुचवू इच्छितो, की मालिका छान चालली आहे, रोचक आहे. सबब, चालू ठेवावी. (इतरत्रसुद्धा प्रकाशित करावी, किंवा कसे, हा सर्वस्वी लेखकाचा प्रश्न; परंतु, येथे प्रकाशित करीत राहण्यास प्रत्यवाय नसावा.)

इत्यलम्|

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखकमहाशयांकडे श्टॉक भरपूर आहे . घटना आणि उचित प्रकाशचित्रेही. त्यामुळे तसं सुचवलं.
एकूण करमणूक झाली पाहिजे. पण सामान्य वाचक आणि गणित शिकलेले सर लोक आणि जरा प्रगत गणित जाणून घ्यायची इच्छा असलेले अशांसाठी वेगळी पुस्तके/ लेख आल्यास अधिक आनंद होईल. फोकस्ट ( लक्ष्यवेधक) होईल.
पार बंद वगैरे म्हणण्याचा हेतू नाही, पारिभाषिक शब्द देण्याचा खटाटोप वाचेल.

A brief history of time लिहितांना प्रकाशक हॉकिंग ला म्हणाला की गणिती सूत्रे अजिबात देऊ नका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मराठी शब्द किंवा प्रतिशब्द वापरण्यासंबंधी माझा दृष्टिकोण असा आहे. मराठीत लेखन करायचे, तर शक्यतो सगळे शब्द मराठीतील असावेत. काही शब्द रूढ नसले तरी ते बऱ्याच वेळा वापरल्यावर गुळगुळीत होऊन रुळू शकतात. तोपर्यंत सध्या वापरात असलेले इंग्लिश वा अन्य भाषांतील शब्द सोयीसाठी कंसात देणे जरूर आहे. प्रश्न अट्टाहासाचा नसून कुठल्या दिशेने वाटचाल करायची आहे याचा आहे. नवीन शब्द बनवताना संस्कृतचा चांगला उपयोग होतो हे खरे असले तरी त्याचे ओझे होऊ देता कामा नये. उदाहरणार्थ, chain या इंग्लिश शब्दासाठी साखळी हा मराठी शब्द असताना शृंखला हा संस्कृत शब्द वापरण्याची गरज नाही.

मी परिभाषा कोशांचा उपयोग करतो. ते marathibhasha.org वर उपलब्ध आहेत. एकाच शब्दासाठी अनेक मराठी प्रतिशब्द दिले असतील तर त्यांपैकी बरा वाटेल तो निवडतो; एकही प्रतिशब्द दिला नसेल तर डोके खाजवून जो सुचेल तो वापरतो. स्थायु यामिकी व द्रायु यामिकी हे शब्द परिभाषा कोशातीलच आहेत. तेथे स्थाणु चा अर्थ immmobile, stationary असा दिला आहे.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक2
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नवीन शब्द बनवताना संस्कृतचा चांगला उपयोग होतो हे खरे असले तरी त्याचे ओझे होऊ देता कामा नये. उदाहरणार्थ, chain या इंग्लिश शब्दासाठी साखळी हा मराठी शब्द असताना शृंखला हा संस्कृत शब्द वापरण्याची गरज नाही.

_/\_. फार थोड्या जणांना हे भान असते.

(शाळेत जीवशास्त्राच्या तासाला (बहुधा medulla oblongataकरिता) 'पश्चमस्तिष्कपुच्छ' या शब्दाने जीवशास्त्राची धास्ती घातली. इतकी, की नंतर पहिल्या संधीला तो विषय सोडला. (आणि अशा रीतीने प्रथम भारत नि नंतर मग अमेरिका एका सेकंडरेट (स्वतःलाच थर्डरेट (किंवा फोर्थरेट) म्हणवत नाही, म्हणून) डॉक्टरला मुकली.) त्यापेक्षा, अगोदरच्या पिढीतला 'लंबमज्जा' हा शब्द बरा होता. आणि, 'मोठा मेंदू', 'छोटा मेंदू', 'मज्जारज्जू' वगैरे जुन्या पिढीतील मंडळी मुद्दाम बदलून 'प्रमस्तिष्क', 'उपमस्तिष्क', 'चेतारज्जू' वगैरेंना त्या ठिकाणी नियुक्त करण्याचीसुद्धा वस्तुतः काहीही गरज नव्हती. परंतु, नाही! शिक्षणखात्यात कोणालातरी सकाळीसकाळी पिसाळलेले सावरकर चावलेच! (किंवा, कदाचित, सकाळीसकाळी पिसाळलेले आम्ही चावलेले असण्याची शक्यतासुद्धा अगदीच नाकारता येत नाही. 'हिंदुस्थानचे जर भले व्हायचे असेल, तर सर्वप्रथम पारंपरिक हिंदू थेरडेशाहीचा निःपात झाला पाहिजे.' हे आमचे ब्रीद जरा जास्तच गांभीर्याने घेतलेले दिसते. त्याच ब्रीदाच्या '(हिंदुस्थानचे भले झालेच पाहिजे, असा आग्रह नाही.)' या (त्यापुढील) भागाकडे सपशेल दुर्लक्ष करून.) असो चालायचेच.)

स्थायु यामिकी व द्रायु यामिकी हे शब्द परिभाषा कोशातीलच आहेत.

तरीसुद्धा, 'यामिकी' या संज्ञेच्या व्युत्पत्तीबद्दल कुतूहल आहे. ('यांत्रिकी' अधिक इंट्यूटिव (मराठी?) वाटत नाही काय?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

मराठीची वाटचाल आता र्‍हस्व आणि दीर्घ ह्यांमधील फरक संपण्याकडे चाललेली दिसते. 'नविन', 'सुचना' वगैरे शब्दांच्या पाट्यांचा सध्या सुकाळ आहे. तसेच बहुजन समाजातल्या बर्‍याच लोकांना 'न' आणि 'ण' ह्यातला फरक कळत नसल्यामुळे बर्‍याच शब्दांची दोन रूपे प्रचलित होऊ लागलेली दिसतात. (दैनिक सकाळ मराठीच्या ह्या वाटचालीला भरपूर हातभार लावत आहे). 'किती वाजले' ऐवजी 'टाइम काय झाला' वगैरे झोपडपट्टी छाप मराठीही बोकाळले आहे.

इंग्रजीविषयी बोलायचे तर ब्रिटिशांचा जमाना संपला आणि अमेरिकनांचा सुरू झाला. आज आपण 'computer programme' असे न लिहिता 'computer program' असे लिहितो. शाळांमध्ये मुलांना आता अमेरिकन पध्दतीने 'color', 'odor' वगैरे लिहिण्याची मुभा आहे का? मला माहीत नाही, पण अशी मुभा दिली पाहिजे. (आमच्या काळात 'colour' ऐवजी 'color' लिहिले असते तर मुस्काटात बसली नाही तरी छडीचा प्रसाद खावा लागला असता).

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या प्रतिसादातल्या शीर्षकातला शब्दच प्रमाण आहे असे मुंबईतल्या गल्लोगल्ली दिसते. आमच्या शाळेतल्या इंग्रजी शिक्षीकेने candal आणि tourch ही स्पेलिंग्ज लिहीण्यास भाग पाडले होते ते आठवते. एका द्सऱ्या शिक्षीकेने अच्युत पालवना दुमात्रेतली एक मात्रा अक्षरावर आणि दुसरी कान्यावर असते हे फारच आत्मविश्वासाने माझ्यासमोर सांगितलेले आठवते. म्हणजे प्रॉब्लेमचं रूट बघा... इ. इ.
त्यामुळे ओव्हरॉल मराठी डझन्ट हॅव्ह एनी भविष्य बरंका.
एक पणजोबा तर ऱ्हस्वदीर्घ संपवण्याची मोहीमच घेऊन बसलेत. फारा वर्षांपूर्वी पाडला होता मी धागा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

आमच्या शाळेतल्या इंग्रजी शिक्षीकेने

'शिक्षीकेने', हं? Wink

असो. आमच्या लहानपणीचे (ब्लॅक अँड व्हाइटच्या जमान्यातले) 'सकाळ' की अशाच कोठल्याश्या सामान्य तथा प्रचलित मराठी दैनिकातले एक व्यंगचित्र या निमित्ताने आठवले. एका सरकारी इमारतीवरील पाटी रंगविण्याचे काम करणारा एक रंगारी ती पाटी 'दुर्दर्शन केंद्र' अशी रंगवितो. त्याचा पर्यवेक्षक/मुकादम/त्या-पदावरील-मनुष्यास-जे-काही-म्हणत-असतील-ते त्याला दम भरतो. "तुला पाटी रंगवायला सांगितले होते; आपले मत मांडायला नव्हे."

अर्थात, हा विनोद आमच्या शालेय वयातील काळातला आहे. (सर्का १९७५-८०.) आजमितीस हा विनोद किती जणांना समजेल, याबद्दल साशंक आहे. कालाय तस्मै नम:|

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जेव्हा dwtvवरच्या डॉक्युमेंट्रीज पाहतो तेव्हा त्यामध्ये कधीकधी पन्नास साठ वर्षांपूर्वीचे फोटोही दाखवतात. घटनावर्णन आणि फोटो यामुळे एक चांगले रेकॉर्ड तयार होते.
तर असे काही पुस्तक करण्यास भरपूर वाव आहे. घरच्या डायऱ्यांतील संग्रह प्रकाशित केल्यास एक रेकॉर्ड तयार होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाचतोय त्याची पोचपावती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुंदर लेख.

मराठीत विज्ञान-तंत्रज्ञान या विषयांबद्दल लेखन होणं गरजेचं आहे; आणि मराठीत लिहिताना मराठी शब्दच वापरणं, या दोन्हींमुळे तुमची लेखमाला आणखी जास्त आवडत आहे. विज्ञान-तंत्रज्ञान म्हणजे फक्त संकल्पना आणि त्यांची स्पष्टीकरणं नाहीत. विषय पुढे जाण्यासाठी माणसं गरजेची असतातच; आणि त्यांच्याबद्दल लिहून त्या-त्या विषयांसंदर्भातली भाषा आणखी भरजरी होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.