दिवाळी* = वैताग

जयंत्या (विशेषतः हयात असलेल्यांच्या), मयंत्या, anniversaries (मराठी शब्द माहिती नाही), वर्धापनदिन, "थर्टीफर्स्ट" आणि कुठलेही सणवार इत्यादींचा मला फार वैताग येतो.

कोणत्याही "प्रथे"कडे मी जरा संशयानेच पाहतो. प्रथा जितकी जुनी, तितका माझा संशय ज्यास्त. याचे कारण ती प्रथा आजच्या काळात निरर्थक असण्याची - किंबहुना घातक असण्याची - शक्यताच ज्यास्त.

प्रथा म्हणून काही साजरे करणे (खरेतर मुद्दलात काहीही "साजरे" करणे), आणि त्यासंबंधी लोकांना 'अकारण भावुक' mass produced शुभेच्छा देणे मला अनावश्यक आणि यांत्रिकपणाचे वाटते. असल्या गोष्टींत खर्च होणारा वेळ, पैसे आणि नैसर्गिक संसाधने वाया जातात असे मला वाटते. या गोष्टी मोजता तरी येतात. मोजता न येणारे - पण मूल्यवान - असे व्यक्तींचे आणि समाजाचे लक्ष (attention) वाया जाणे हीदेखील मोठीच हानी होय. हे झाले inputs च्या बाबतीत.

आता यातून साध्य काय होते ते पाहू: भौतिक पातळीवर पाहता, मेदाम्लशर्करादि शारीरिक विकार वाढणे, पर्यावरणाचे विविध तऱ्हेने प्रदूषण होणे, इत्यादि नुकसान तर होतेच, पण नैतिक हानीसुद्धा होते, असे मला वाटते. उदा. चंगळवादाची स्पर्धा वाढीस लागणे, त्यातून आर्थिक विषमेचे चटके वाढणे. उगीचच आपण काहीतरी सकारात्मक करतो आहोत अशी खोटी भावना निर्माण होणे आणि त्यामुळे व्यक्ती, समाज आणि पर्यावरण यांच्यापुढचे खरे प्रश्न (तेवढ्यापुरते तरी) विस्मरणात जाणे.

या प्रथा पडल्या/रूढ झाल्या तेंव्हाही वरील दोष होतेच, पण ते एका वेगळ्या संदर्भात होत असे. उपभोगाच्या संधी, साधने आणि त्यासाठी लागणारी क्रयशक्ती या फार मर्यादित होत्या, आणि भारतापुरते बोलायचे झाल्यास त्या अगदी कूर्मगतीने विकसित होत होत्या. अगदी ४०-५० वर्षांपूर्वीपर्यंत. त्यानंतर त्या वेगाने वाढल्या आणि पूर्वीच्याकाळी फक्त सणासुदीला शक्य होणाऱ्या गोष्टी आता वर्षभर शक्य असतात आणि केल्याही जातात. मग पुन्हा त्या सणांच्यावेळी करणे यात काय शहाणपणा आहे?

दिवाळीपुरते बोलायचे तर, पूर्वी अंधार हा काहीसा भीतीदायक होता, आणि कृत्रिम उजेड करण्याची साधने परवडत नसत. त्यामुळे सणावारी ज्योती पाजळून त्याच्यावर "विजय मिळवणे" हे समजण्यासारखे होते. आता अंधारच दुर्मिळ झाला आहे आणि उलट कृत्रिम उजेडाचे प्रचंड प्रदूषण होते आहे. ग्रहतारे दिसणे त्यामुळे फार कमी होत चालले आहे. तेंव्हा आज खरेतर कृत्रिम उजेडावर विजय मिळवण्यासाठी सणावारी का होईना, सार्वत्रिक अंधार करण्याची गरज आहे! पूर्वी विविध रंगांची तेजाळ रोषणाई पाहण्यासाठी शोभेचे फटाके उडवणे हा एकमेव मार्ग होता. प्रचंड शक्तीचे विजेचे दिवे, Neon signs, LED आणि लार्ज स्क्रीन TV च्या युगात पुन्हा नळे-चंद्रज्योती आणि फुलबाज्या उडवणे निरर्थक आणि घातक नव्हे काय? तोच मुद्दा मोठ्या आवाजाचा. पण फटाक्यांवर नियंत्रण / बंदी हा आजही भावनिक विषय होतो (आणि आजकाल निर्लज्जपणे त्यात धार्मिक दडपशाही आहे असे प्रतिपादन केले जाते!). त्याऐवजी दिवाळीत सार्वत्रिक नीरव शांतता आणली तर किती चांगले होईल!

रंगपंचमी आणि होळीचे ही तेच आणि गणेशोत्सव, दसरा, गुढीपाडव्याचे (आजकाल बरेच लोक ज्याला 'गुडीपाडवा' ह्मणतात) ही. रस्ते अडवून, सुरक्षिततेचे नियम न पाळता दहीहंडी करणे हा अजून एक संतापजनक प्रकार. सणवार आणि अन्य कालबाह्य प्रथांची, त्या साजऱ्या केल्यामुळे होणाऱ्या तोट्यांची आणि न होणाऱ्या फायद्यांची यादी बरीच लांबवता येईल.

पण दुर्दैवाने सणवारादि प्रथा कालबाह्य न होता उलट दृढमूल होताना दिसतात - दसरा, दिवाळी, गणेशोत्सव वाढत्या उन्मादाने साजरे होतातच (केवळ कोव्हिडमुळे काही बंधने घालण्यात आली आहेत पण काही लोक तीही धुडकावून लावतात). 'अराजकीय' पक्ष आणि दीडदमडीच्या स्थानिक संघटना त्यात वर इंधन घालतात. आणि भारतीय सण पुरत नाहीत म्हणून की काय, भारतात आज काही लोक चक्क Haloween साजरा करतात. काही ठिकाणी तर थॅक्सगिव्हिंगही. या गतीने वर्षातील भाकड (कोणताही सणवार नसलेले) दिवसच राहतात की नाही असे वाटते.

याला अपवाद अर्थातच "अशुभ" समजल्या जाणाऱ्या दिवसांचा. कुठलेही महत्वाचे काम पितृपक्षात न करणाऱ्यांची संख्या वाढते आहे (किमान लोकसंख्येच्या प्रमाणात तरी). त्याला उतारा ह्मणून "मेरी पितृपक्ष" आणि "हॅपी सर्वपित्री अमावस्या" ह्मणण्याचा प्रघात मात्र नव्याने पाडला पाहिजे!

उत्सवप्रियता आणि प्रवाहपतितता यांतला फोलपणा बऱ्याच सुबुद्ध लोकांना कळतो. नाही असे नाही. पण त्यातल्याही बऱ्याच जणांना दिवाळीसारख्या सणात आजही काहीतरी सकारात्मक आहे असे आपले उगीचच वाटते, आणि मग ते काय असावे याचा खल करण्यात येतो. "वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा" च्या चालीवर. लोकसत्ता (जे त्यातल्यात्यात बरे मराठी दैनिक गणले जाते) मध्ये आठवडाभर दिवाळीबद्दल गळे काढणारे अग्रलेख येताहेत.

उत्सवबाजी करणाऱ्यांस आणि ती होऊ देणाऱ्यांस माझे एकच आवाहन आहे : वातावरणातील कार्बन डायॉक्साईड चे प्रमाण धोकादायक पातळीस पोचलेले आहे आणि ते चढत्या गतीने वाढते आहे. त्याचे दुष्परिमाण शास्त्रज्ञांना पूर्वी वाटत होते त्यापेक्षा पुष्कळच आधी दिसू लागले आहेत. आपला "भाकड दिवसांतील" उपभोग कमी करण्याचा प्रयत्न तर करूचया, पण सहज टाळता येण्यासारखा सणासुदीचा वाढीव उपभोग प्राधान्याने टाळूया. आपल्या ज्या मुला-नातवंडांना आपण उत्सवी हौसमौज करू देतो, त्यांना हवामान बदलाचे चटके आपल्यापेक्षा खूप ज्यास्त बसणार आहेत, म्हणून तरी.....

जाताजाता : *आणि हो, ख्रिसमस आणि ईद सुद्धा. नाहीतर उगीच पुरोगामी म्हणून संभावना व्हायची!

field_vote: 
4.25
Your rating: None Average: 4.3 (4 votes)

प्रतिक्रिया

जाताजाता : *आणि हो, ख्रिसमस आणि ईद सुद्धा. नाहीतर उगीच पुरोगामी म्हणून संभावना व्हायची! >>> Smile

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

आपल्या भारतीय लोकांना "बदल" आवडत नाही.
त्यामुळे जैसे थे रहाण्यालाच परंपरा म्हणून आपण त्याचे गोडवे गात रहातो.

मार्केट करता येतात तेच सण- बाकी सगळं झूट ह्या अस्सल अमेरिकन तत्त्वावर आपणही चाललो आहोत. (खरं तर चुकलो, मार्केट करता येत नाही असं काही नाहीच = हे अस्सल अमेरिकन तत्त्व.)
एक महात्मा म्हण्ततात् तेच खरं - "असो, चालायचंच".

सहमत आहे.

ऐसीच्या अंकावर पण बंदी घातली पाहिजे. दिवाळी विशेषांक काढतात लेकाचे.

हो ना, त्याऐवजी पितृपक्ष विशेषांक काढला तर बरे होईल, असे मला वाटते!

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

"तुम्ही गळे काढण्याशिवाय दुसरं काय करणार?" हा अभिप्राय मिळाला असता.

... चंगळवादाची स्पर्धा वाढीस लागणे, त्यातून आर्थिक विषमेचे चटके वाढणे...

दिवाळीमुळे चंगळवाद वाढतो या कार्यकारणभावाबद्दल मला शंका वाटते. दिवाळीमुळे चंगळवाद दिसतो, आर्थिक विषमता दिसते, हे मान्य करणं मला सोपं वाटेल.

तीच बाब "मेदाम्लशर्करादि शारीरिक विकार वाढणे" याबद्दल. एरवी ठणठणीत असताना चार दिवस वेडंवाकडं खाऊन काही होईलसं मला वाटत नाही; पण मुळातच आरोग्याकडे दुर्लक्ष केलं असेल तर चार दिवस कावळा* बसून फांदी तुटू शकते.

*हो, हो, चार दिवसांचा कावळा!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुह्मी दिवाळीच्या आसपासचा महिना भारतात शेवटच्या कधी होतात? गेल्या काही वर्षात त्यावेळी चंगळवादाचे जे सार्वत्रिक थैमान उडते ते पहा. किती लोक ऋण काढून (गेल्या काही वर्षात क्रेडिट कार्ड्स चे पेनिट्रेशन वाढल्यामुळे नंतर “पठाणी” दराने व्याज देऊन) सण करतात आणि त्याचे दुष्परिणाम नंतर भोगतात, ते ही. पर्यटनस्थळी दरवर्षी आणखी लांबणाऱ्या मैलोगणती गाड्यांच्या रांगा लागतात आणि स्थानिकांचे जिणे कसे असह्य होते तेही. मग कदाचित तुह्मांस जाणवेल की दिवाळीच्या वेळी चंगळवाद वाढतो. अर्थातच you are entitled to your opinion.

खाण्यापिण्याचे परिणाम प्रकृतीवर अवलंबून असतात हे बाकी खरे.

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

दिवाळीमुळे लोक असं करतात, का दिवाळीचं निमित्त वापरलं जातं; रीण काढून सण करणं वगैरे म्हणी मराठीत कधीपासून आहेत; लग्नासाठी लोक किती खर्च करतात आणि ते दिवाळीमुळे कमी-जास्त होतंय का; चंगळवाद म्हणजे नक्की काय; भारतीय लोकांच्या डोक्यावरचं कर्ज वाढतंय का कसं, असे वेगवेगळ्या प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्नही विचारता येतात.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

होय, हे आणि इतर अनंत प्रश्न विचारता येतील आणि त्यातून प्रबोधन होईल. तरीही माझ्या मते उत्सवबाजी - आणि किमानपक्षी उत्सवी consumption - बंद किंवा खूप कमी करता आली तर अनेक फायदे होतील आणि तोटे शून्य किंवा नगण्य होतील. इतर वाईट प्रथांचे निर्मूलन व्हावे ह्मणून जसा प्रचार आणि प्रसार होतो (आणि हळूहळू का होईना, काही बाबतींत त्यामुळे त्या प्रथा कमी होतात) तद्वतच उत्सवबाजीबद्दलही व्हायला हवे. तसे प्रभावीपणे व्हायचे असेल, तर उत्सवबाजी सरसकट बंद व्हावी अशी भूमिका घेतली पाहिजे असे मला वाटते.

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

माझ्या मते ... तोटे शून्य किंवा नगण्य होतील

कदाचित अर्थतज्ज्ञ लोकांची मतं खूप निराळी असतील.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ते प्रत्येक गोष्टीत दोन हात वाले होय?

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

अं?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

“ Give me a one-handed economist! All my economists say, 'on one hand ... on the other.'”

Harry Truman

उत्सवबाजीबद्दल अर्थशास्त्रींना विचारलेत तर असेच काहीतरी संदिग्ध उत्तर मिळेल. उत्सवबाजीने GDP वाढते, आणि काही प्रमाणात रोजगार वाढतो, इत्यादि conventional wisdom आहेच, पण पर्यावरण ऱ्हासादि negative externalities ची किंमत जोडली, तर उत्तर बरेच वेगळे येऊ शकेल असे मला वाटते.

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

ट्रूमन हातोहात काय म्हणायचा प्रयत्न करत होता, हे मला समजलेलं नाही. पण ते फार महत्त्वाचं नसावं.

प्रश्न असा की आक्षेप चंगळवादावर आहे का दिवाळीवर?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उत्सवबाजीवर. जिचे ठळक उदाहरण दिवाळी. उत्सवबाजीचा एक प्रमुख तोटा ह्मणजे तीत होणारे consumption. इ. इ. पण जाऊद्या. या बाबतीत आपली कट्टी!

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

काही वर्षात त्यावेळी चंगळवादाचे जे सार्वत्रिक थैमान उडते ते पहा. किती लोक ऋण काढून (गेल्या काही वर्षात क्रेडिट कार्ड्स चे पेनिट्रेशन वाढल्यामुळे

कशावरून ठरवलं?
ते इन्कमपेक्षा अधिक उडवतात?
पठाणी व्याज देतात?

माझे दोन सहाध्यायी भारतातील मोठ्या बॅंकांत संचालक आहेत. त्यांच्या बॅंका लक्षावधी क्रेडिट कार्ड्स issue करतात. त्यांच्याशी झालेल्या संभाषणातून कळले. पुष्कळ खात्यांची (विशेषत: तुलनेने नव्या ग्राहकांची) देय रक्कम दिवाळीनंतर भरमसाठ वाढते. त्यावरचे व्याज (जे क्रेडिट कार्ड्स पठाणी दराने आकारतात) वर्षभरात मिळणाऱ्या व्याजाच्या ८०% असते. कित्येक लोक default करतात आणि कायदेशीर कारवाईस सामोरे जातात.

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

पण त्या साठी दिवाळी हा सण दोषी नाही.दिवाळी म्हणजे दिव्यांचा ustav,आणि काही गोडधोड बनवणे आणि ते नातेवाईक,मित्र,शेजारी ह्यांच्या शेअर करणे.
बस ह्याच्या पेक्षा जास्त नाही.
त्या साठी कर्ज होत नाही.
दिवाळी निम्मित फालतू खरेदी होते त्याचा दिवाळी शी काही संबंध नाही.
त्या मुळे कर्ज होते.
साधे उदाहरण देतो.
दोन माणसांना प्रवास करण्यासाठी स्कूटी किंवा 100 cc पर्यंत ताकत असणारी दोन चाकी मोटारसायकल खूप झाली.
पण मी गावाला बघितले .
बुलेट घेतात बुलेट.
350cc किंवा अगदी 650 cc chi पण.
किंमत दोन लाख पेक्षा जास्त उपयोग स्कूटर इतकाच.
आर्थिक स्थिती अतिशय नाजूक.
तरी कर्ज काढून लोक घेतात.
पेट्रोल टाकणे परवडत नाही अशी लोक.
दिवाळी च पण असेच झाले आहे त्या साठी सण दोषी नाही.
लोकांची वृत्ती जबाबदार आहे.

कोणतेच सण, ustav आवडत नसतील तर स्वतः त्या मध्ये भाग घेवू नका.
हा उपाय तर स्वतःच्या हातात आहे.
बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी आवडात नाहीत.
मग बाकी लोकांनी त्यांची इच्छा मारायच्या का?
तुम्हाला जे आवडत नाही ते करू नका.
बस.
लोकांस सुधारायचा प्रयत्न सोडून ध्या.
प्रत्येकाला बरे वाईट काय आहे ते उत्तम समजते.

“शहाणे करोनि सोडावे, सकळ जन” हे आमचे ब्रीद आहे ना!

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

हे तुम्ही मान्य केलेच आहे.मंदिर ,मशीद किंवा कोणत्या ही प्रार्थना स्थळात जाणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे.
ह्याचा अर्थ सरळ आहे लोकं ना लेक्चर देवून ते सुधारणार नाहीत.
कायदा करून जबरदस्ती केली तर सण,ustav जोरात करण्याचे प्रमाण खूप प्रचंड वाढेल.
त्या मुळे उगाच कष्ट घेवू नका लोक शहाणी होणार नाहीत तुम्हाला मात्र वेडे ठरवतील हे नक्की.

बहुसंख्य समाज जर अधोगतीच्या गर्तेत सापडला असेल आणि सो कॉल्ड संस्कृतीची विनाशाकडे वाटचाल चालू असेल तर, मुठभर शहाण्या अल्पसंख्यांनी चिंता का करावी ? माचीवर बसून त्रयस्थपणे त्याचे निरीक्षण करावे.

मी केवळ उत्सवबाजीबद्दल बोलतोय. अधोगती, विनाश वगैरेंबद्दल नव्हे.

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

हे फक्त धार्मिक सण नसतात.
१) लग्नाचा उस्तव.
१५० खाण्याचे प्रकार असतात.
२) pre-wedding.
हा नवीनच प्रकार आहे आकाशात काय,पाण्यात काय नको नको ते प्रकार.
३) जन्म दिवस
काय तो साजरा करतात दारू काय,pub मध्ये पार्टी काय,भेट वस्तू काय.
लय ustav साजरे करतात लोक.
विचारू नका.
धार्मिक सण खूप म्हणजे खूप च नगण्य आहेत त्या पुढे.

“आपला "भाकड दिवसांतील" उपभोग कमी करण्याचा प्रयत्न तर करूचया, पण सहज टाळता येण्यासारखा सणासुदीचा वाढीव उपभोग प्राधान्याने टाळूया.”

सर्वच तऱ्हेचा लक्षणीय उपभोग (conspicuous consumption) शक्य तितका कमी केला पाहिजे, हे खरेच. त्याशिवाय कार्बण्डायॅाक्सैड नियंत्रणात येणार नाही. त्यासाठी Conspicuous consumption वर जबरदस्त कार्बन टॅक्स लावावयास हवा. But I digress.

उत्सवबाजी - किमानपक्षी उत्सवी उपभोग (बोले तो, consumption) बंद झाले पाहिजे या मुद्द्यास तुमची हरकत दिसत नाही.

ते न करता “पण इतर conspicuous consumption चे काय?” असे विचारणे, ही व्हॅाटबाउटरी होईल असे माझे मत आहे.

आज आपण ज्याला ग्राह्य आणि सकारात्मक मानतो असे प्रत्येक मत एकेकाळी “विक्षिप्त” गणले जात होते, हे लक्षात ठेवायला हवे.

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

अधिकाधिक विकत घ्यायचे, ते ल्यायचे, खायचे, वापरायचे, भेट म्हणून द्यायचे, समवर्गीय नातेवाईक, मित्रांच्या भेटी घ्यायच्या, हिरीरीने उत्सव साजरा करायचा, भ र पू र फटाके फोडायचे, जे असे करू शकत नाहीत त्यांच्या मनात उगाच गंड निर्माण करायचा, आणि मुळात नुसती मजा घेणे महत्वाचे नसून ती इन्स्टा, फेबुवर अपलोड करून तिची प्राणप्रतिष्ठा करायची हे चंगळवादी, आधुनिक, जाहिरातप्रधान मुल्यांनी भारतियांच्या साध्यासुध्या दिपावळीची केलेली विटंबना आहे. पण आहे तेही ठीक आहे असे म्हणुन गप्प बसणे ईष्ट. मला यावेळी घराभोवती उजळलेले दिवे, कंदील आणि नवेनवे कपडे घातलेली छोटी मुले हाच या चित्रातील सुंदर भाग वाटतो.

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

बातमी आहे की यंदाच्या दिवाळीत केवळ सणासुदीशी संबंधित खरेदी सव्वा पद्म रुपयांची (एक लाख पंचवीस हजार कोटी रुपये) झाली. त्याच्या एक पंचमांश - म्हणजे २५,००० कोटींची - केवळ दिल्ली नामक बांडगुळ शहरात. हा गेल्या दहा वर्षांतला उच्चांक आहे ह्मणे (त्यापूर्वीचा विदा बहुधा उपलब्ध नसावा). हे आकडे पुरेसे बोलके आहेत.

https://www.business-standard.com/article/companies/diwali-festive-sale-...

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!