स्त्री जन्माची (जैविक) कहाणी

पुरूषी नजरेतून सुशिक्षित स्त्री
* अती विद्येने स्त्रिया व्यभिचारी होतील
* स्त्रियांस सोङचिठ्ठी द्यावयाची असेल तरच स्त्री शिक्षणाविषयी अनुमोदन करावे.
* अनेक स्त्रिया करण्याची पुरूषांना आज मोकऴीक आहे. आपल्या हातून कदाचित परद्वारी गमन होते. स्त्रिया शिकल्या की त्या प्रश्न करतील “आम्हांला मोकळीक का नसावी ”
* स्त्रियांस शिकवून भाक-या भाजाव्या काय ?
* स्त्रिया विद्वान झाल्यातर भ्रतार, आप्तपुरूष, वङील माणसे त्यांचा वचक बाळगणार नाहीत.
* स्वंयवर, पुर्नविवाह, पुरषासारखे अधिकार मागणे याकरिता स्त्री बंड करेल.
* बायका शिकू लागल्या तर त्यांचे नवरे मरतात.
* बायकांना शाळेत पाठवले तर पुरषांच्या दर्शनाने भीड मर्यादा राहणार नाही
* शाळेमध्ये कलावंतीण/हीन जातीच्या संसर्गाने पवित्रता व सदाचार जाईल.

स्त्रियांना शिक्षण देऊ नये यासाठी अट्टाहास करणारे वर उल्लेख केलेले मुद्दे ‘ज्ञान प्रसारक‘ या मराठी मासिकाच्या जानेवारी 1852 च्या अंकात प्रसिद्ध झाले होते. यावरुन स्त्रियाबद्दल, स्त्री शिक्षणाबद्दल त्याकाळी व्यक्त होत असलेली घृणा, तिरस्कार यांचा अंदाज येईल. गेल्या दीडशे वर्षात पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेले आहे. टोकाच्या मतांची धार बोथटली आहे. परंतु पुरुषी मनाच्या कोप-यात यातील अनेक अवशेष अजूनही शिल्लक आहेत. याचा प्रत्यय प्रसार माध्यमाद्वारे आपल्याला पदोपदी येत असतो. पारंपरीक पुरषांना स्त्रीची सतत लाजरी, बुजरी, संकोची, वर मान करुन न बोलणारी अशीच प्रतिमा आवडते. सुशिक्षित स्त्री मात्र त्या प्रतिमेला धक्का देत असते. पुरुषांच्या जगात स्त्रीचे नेमके काय स्थान आहे. याविषयी मोठ्या प्रमाणात अभ्यास होत असून वर्तनशास्त्राच्या संशोधकांनी याविषयीच्या अनेक मिथकांचा भांङाफोड केला आहे.

बाहुली-भातुकली विरुद्ध चेंडू-गाड्या
पुरुष व स्त्री याच्यांत सांस्कृतिकरित्या समानता आणण्यासाठी सत्तरच्या दशकात मुलांच्या हातात बाहुली व भातुकलीची खेळणी व मुलींच्या हातात गाड्या, चेंङू सारख्या खेळणी देत होते. स्त्रियांची चूल-मूल ही प्रतीमा बदलून पुरषासारखे सशक्त, सक्षम, सबल करण्याचा हा क्षीण प्रयत्न होता. खेळणी बदलल्यामुळे फरक पडू शकतो या गैरसमजुतीचा हास्यास्पद प्रकार होता. आज ते का शक्य नाही कळत आहे. मुलगा व मुलगी उपजतच काही परस्पर विरोधी गुण-विशेष घेऊन जन्माला येतात. खेळणींची निवङसुद्धा त्यानुरच होत असते.
मुलगा वा मुलगी – स्त्री वा पुरुष – यांची जडण-घडण उत्क्रांतीतून झालेली आहे, व त्यांच्या वर्तनात फरक आहे, याबद्धल आज तरी दुमत नाही. परंतु यातील कुठले गुणविशेष जैविक उत्क्रांतीतून तावून सुलाखून आलेल्या आहेत व कुठले गुण विशेष सामाजिक, सास्कृंतिक व कालमान परिस्थितीच्या दबावातून आलेल्या आहेत, हा संशोधनाचा विषय असून याचा अजूनही नीटसा अंदाज आलेला नाही.

जन्मजात गुणविशेष
काही वर्षापूर्वी अमेरिकेतील हार्वर्ङ विघापीठाचे कार्याध्यक्ष, लॅरी समर्स यांनी स्त्रियामधील उपजत गुणामुळेच त्या अत्यंत जवाबदारीच्या वा निर्णय क्षमतेची गरज असलेल्या भौतिकी, गणितीय व अभियांत्रिकीच्या उच्च पदापर्यंत पोचू शकत नाहीत असे विधान केल्यानंतर हलकल्लोळ माजला होता. यावरुन स्त्री-पुरूषातील गुणविशेषांचा प्रश्न किती नाजूक व संवेदनशील आहे याची कल्पना येईल. चर्चेचा प्रस्ताव म्हणूनसुद्धा हे विधान स्वीकारार्ह नाही. मानवी स्वभावाचे स्पष्टीकरण म्हणून केलेले हे विधान अस्पष्ट व उघडउघड सुप्रजनास (युजेनिक्स) उत्तेजन देते आणि स्त्री-पुरूष विषमतेच्या दरीत भर घालते असा आरोप केला जात होता. नव-डार्विनवादी स्त्री-पुरूषांतील भेद दाखवणार-या काही उपजत गुणविशेषांचा मागोवा घेत आहेत. मेंदूच्या स्कॅनिंगचा अभ्यास करुन हे ठळक भेद कुठले आहेत याची त्यांना कल्पना येत आहे. त्यामुळे यासंबंधीच्या आपल्या पूर्वग्रहदूषित मतांना धक्का बसत आहे.
स्त्री म्हणजे काही संप्रेरकयुक्त पुरूष असा समज एकेकाऴी होता तो पूर्णपणे चुकीचा असून मेंदूतील स्थित्यंतरामूळे स्त्रीत्व घङते असा दावा आज केला जात आहे. आठव्या आठवड्यापर्यंतच्या भ्रूणावस्थेतील स्त्री-पुरूष मेंदूत फरक नसतो. इतर शारीरिक अवयवाप्रमाणे गर्भावधी व प्रसूतीनंतरचा काही काळ या अवधीत टेस्टोस्टेरोन या संप्रेरकाच्या स्रावामुळे स्त्री-पुरूष मेंदूत फरक पङत जातो. या संप्रेरकात भिजून चिंब झालेला मेंदू मोडतोड करण्यासारख्या पुरूषी वर्तनाला उत्तेजन देतो. वर्तनातील हा फरक फार लवकर जाणवू लागतो. जन्माला आल्यानंतरच्या एका दिवसाची मुलगी, पाहणा-यांच्या चेहर्‍याकङे जास्त वेळ निरखून पाहते. तर मुलगा त्यांच्या जवळील मोबाइलकङे निरखून पाहतो. गर्भावस्थेत टेस्टोस्टेरोन स्त्राव जास्त झालेली मुलगी मुलांची खेळणी हातळण्यात रूची घेते व मुलगा आईच्या चेह-याकङे जास्त वेळ बघत नाही. संप्रेरकाचा स्त्राव कमी झालेल्या मुलात शब्दसंग्रह जास्त असतो. हा अभ्यास अजून प्राथमिक अवस्थेत असून संशोधन होत आहे. एक वर्षाच्या आतच मुलगा व मुलगी यांच्यातील खेळणांच्या निवङीतील व्यत्यास लक्षात येऊ लागतात. मुलांना बंदूक, चेंङू, गाड्या आवङतात. मुलींना बाहुल्या, भातुकलीतील खेळणी आवङू लागतात. या गुणविशेषांवर सांस्कृतिक साचेबंदपणाचा आरोप करता येत नाही.

मेंदूवरील संशोधन
स्त्री-पुरूषातील वर्तनातील व्यतास हा त्यांच्या मेंदूरचनेतील फरकांचा फलित असावा. फरक नक्कीच आहे परंतु त्यातून निष्कर्ष काढणे जिकिरीचे आहे. उदाहरणार्थ पुरूषांचा मेंदू तुलनेने नऊ टक्के मोठा आहे. पुरूषाची बुद्धीमता जास्त आहे हे ठसवण्यासाठी याचा उपयोग यापूर्वी केला जात असे. परंतु मुळातच पुरूष हा स्त्रीपेक्षा जास्त आकारमानाचा असल्यामुळे मेंदूच्या आकारातील हा फरक असून बुद्धीमत्तेशी त्याचा संबध लावता येत नाही.
अलीकङे मेंदू बद्दलच्या ज्ञानात मोठ्या प्रमाणात भर पडत आहे स्त्री मेंदूत करड्या द्रावाचे (ग्रे मॅटर) प्रमाण तुलनेने जास्त आहे. स्त्री मेंदूतील काही भागात मज्जा-पेशींची वीण जास्त घट्ट आहे. यामुळे एकूण मज्जा-पेशींच्या संख्येत कुठलाही फरक पङला नाही. परंतु मेंदूच्या दोन्ही अर्धगोलांना जोङणारी पांढ-या द्रव्यापासून तयार झालेली कॉर्पस कॅलोसमचा आकार स्त्रीच्या तुलनेने पुरषांच्यात लहान असतो. म्हणूनच जटिल समस्येचे उत्तर शोधताना पुरुषाचा मेंदू एकाच अर्ध गोलाची निवड करतो तर स्त्री दोन्ही अर्ध गोलाची निवड करते.
मेंदूची रचना व नस जोडणीतील हे व्यत्यास बुध्यांकाच्या चाचणीवर कुठलाही परिणाम करत नाहीत. फक्त या चाचणीचा प्रतिसाद स्त्री पुरूषांच्या मेंदूत वेगेवेगळ्या रीतीने मिळतो. गणितीय तर्क व पुरुषातील टेम्पोरल लोब प्रक्रिया यांचा एकमेकाशी संबंध आहे हे लक्षात आले असून स्त्रियांच्या संदर्भात हा संबंध आढळला नाही. बुध्यांकासाठी पुरूष करड्या द्रव्यावर तर स्त्रिया पांढ-या द्रव्यावर विसंबून असतात.
मेंदूचा आकारमान व त्याची अंतर्गत/बाह्य रचना आणि स्त्री-पुरूषांतील वर्तन व्यत्यास किती गुंतागुंतीची असू शकेल याची कल्पना येऊ शकेल. मेंदूची रचना व वर्तन यांचा अन्योन्य संबध आहे असे क्षणभर मान्य केले तरी या गोष्टी उपजत आहेत असे विधान आपण करू शकणार नाही. आत्तापर्यंतचे सर्व संशोधन प्रौढ व्यक्तींच्यावर केल्या आहेत. वर्तनातील व्यत्यासांना केव्हापासून सूरुवात होते याची अजून कल्पना नाही. मेंदूत प्रौढ वयातसुद्धा उत्परिवर्तन (म्युटेशन) होऊ शकते. माणसातील त्रिमितीय गुण-विशेषांसाठी कारणीभूत असलेल्या मेदूजवळील हिप्पो कॅम्पस या भागातील मज्जापेशींचे पुनरूत्पादन संप्रेरकामुळे होत असते व त्या पेशी टिकून असतात. स्त्रियांचा मेंदू या दृष्टीने फार लवचिक असतो. गर्भारपण, ऋतुनिवृत्ती व यौवनावस्थेत पदार्पण या कालावधीत मोठ्या प्रमाणात त्यांच्यात फरक होत असतो.

मानसशास्त्रीय संशोधन
स्त्री-पुरूषात मानसिकरित्या भेद आहेत की नाही, याचा अनेक संशोधकानी अभ्यास केला आहे. अभ्यासकांनी व्यक्तिमत्व, सामाजिक वर्तन, स्मरणशक्ती व काही क्षेत्रातील त्यांची क्षमता यावर लक्ष केंद्रित करून निष्कर्ष काढले आहेत. पुरूष जास्त आक्रमक व गणितीय विश्लेषणात प्रभुत्व असलेले तर स्त्रिया जास्त भावूक व वाक्-सामर्थ्य असलेले आहेत असा निष्कर्ष काढण्यात आला.
या प्रकारच्या अभ्यासांच्या पण काही समस्या आहेत. मुळातच संशोधकांचा केवळ सकारात्मक निष्कर्षांना प्रसिद्धी देण्याकङे कल असतो. त्यामुळे ज्यात फरक आढळत नाही त्यांना प्रसिध्दीच मिळत नाही. काही वेळा लिंगभेदातील किरकोळ फरकांनासुध्दा अमाप प्रसिध्दी मिळते, व प्रसार माध्यमं अशा गोष्टीचें उदात्तीकरण करून दिशाभूल करतात. म्हणूनच अपु-या व चुकीची माहिती असलेल्या ‘ मेन फ्रॉम मार्स व विमेन फ्रॉम व्हिनस’ सारख्या पुस्तकांच्या लाखो प्रती खपतात. उदाहरणार्थ, पुरूषांपेक्षा स्त्रियामध्ये संभाषण क्षमता जास्त आहे, असा एक समज आहे. शब्दसामर्थ्य वा वाचनाचे रसग्रहण यांचे अनेक चाचण्या घेतल्यानंतरसुद्धा मुलं व मुलीमंदध्ये तसा फार फरक जाणवला नाही. पौढ स्त्रिया मात्र तुलनेने जास्त बोलघेवडे असतात व त्यांच्याकङे विपुल शब्दभांङार असतो. विशेष म्हणजे हा फरकसुध्दा जाणवण्याइतका मोठा नव्हता.

सांख्यिकी मापदंड
लिंगभेदाची तुलना करण्यासाठी ‘डी’ या सांख्यिकी मापदंङाचा वापर संशोधक करत आहेत. दोन गटातील – स्त्री व पुरूष – सरासरी व्यत्यासाला कुठल्या घटकांचा हिस्सा कारणीभूत आहे हे दर्शविणारे ते एक मानक आहे. स्त्री व पुरूषामधील सरासरी उंचीतील फरक दर्शवणा-या 'डी' चे मूल्य 2 आहे. कुठल्याही स्त्री-पुरूष गटाचा अभ्यास केल्यास पुरूषांची सरासरी उंची स्त्रियांपेक्षा जास्त आहे, याबद्दल दुमत नाही. वर्तणूक व मानसिक दृष्यघटनेंच्या संदर्भात ‘डी’ चे मूल्यांकन केले असून डी चे मूल्य 0.8 असल्यास जास्त 0.6 असल्यास माफक, व 0.2 असल्यास कमी असे समजले जाते. 0.2 पेक्षा कमी मूल्य असल्यास व्यत्यास किरकोळ आहे. या मूल्यांकनाचा वापर करून लिंगभेदा-संबंधातील काही घटकांचे संख्याशास्त्रीय प्रमाणित विश्लेषण केले आहे. यासाठी गणितीय क्षमता, वाक्-सामर्थ्य व आक्रमकवर्तन हे गुणविशेष निवडले होते. यातील काही महत्वाचे निष्कर्ष खाली नमूद केले आहेत.
( + पुरूषासाठी, - स्त्रियासाठी )
पुरूषांची सरशी: डी
त्रिमितीय संकल्पना +0.73
आक्रमक वर्तन +0.6
गणितीय क्षमता (15-25 वयोगट) +0.32

किरकोळ व्यत्यास: डी
शब्द संग्रह -0.02
वाचन रसग्रहण -0.03
गणितीय क्षमता (11-14 वयोगट) -0.02

स्त्रिंयाची सरशी: डी
स्मित हास्य -0.4
स्पेलिंग -0.45
अप्रत्यक्ष आक्रमक वर्तन -0.74 ते +0.05

शारीरिक क्षमता: शारीरिक क्षमतेच्या बाबतीत मात्र पुरूष स्त्रियापेक्षा वरचढ आहेत. (चेंडू जास्त वेगाने फेकणे +2.14, चेंडू लांब अंतरापर्यंत फेकणे +1.98) या क्षमता पुरूषाच्या शारीरिक उंचीवर अवलंबून असल्यामुळे यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. लैंगिक गुणविशेषांचा अभ्यास करताना हस्त मैथुनाची वारंवारता (+0.96) व विवाहबाह्य संबंध (+0.81) पुरूषांच्यात जास्त प्रमाणात आढळतात. लैंगिक समाधानाबाबतीत मात्र स्त्री-पुरूषात काही व्यत्यास नाही.

आक्रमकता: आक्रमकतेच्या बाबतीत पुरूषांची सरशी आहे (+0.6) याबद्दल दुमत नाही. पंरतु यावरून निर्ष्कष काढण्यात घाई करण्यात अर्थ नाही. एका अभ्यासानुसार पुरूषांच्या आक्रमकतेत दिखाऊपणा जास्त असतो. याउलट स्त्रीला कुठलेही दुष्परिणाम होणार नाहीत याची खात्री असल्यास तीसुध्दा जास्त आक्रमक बनते. हिंस्त्र बनते. हिंस्त्र असो वा नसो, स्त्रिया आपला राग दीर्घकाळ जोपासतात. या रागाचे पुढे काय होते याचा अभ्यास करताना पुरूष शारीरिक इजा करून मोकळे होतात परंतु स्त्रियांचा कल शारीरिक इजा करण्यापेक्षा टोचून बोलणे, अफवा पसरवणे, निंदा करणे इत्यादी प्रकाराने मानसिक इजा करण्याकङे असतो, हे लक्षात आले. स्त्रियांचे मातृहदय त्यांना शारीरिक इजा करण्यास अनुमती देत नसेल.

गणितीय क्षमता: गणितीय क्षमतेच्या बाबतीत असलेला मोठा फरक हासुध्दा चर्चेचा विषय आहे. यौवनावस्थेत पदार्पण करेपर्यंत मुलं व मुलींच्या याबाबतीतील क्षमतेत फरक नाही. यामुळे स्त्री पेक्षा पुरूष सर्व वयोमनात गणितीय संकल्पनाची जाण, संगणन (कॉम्प्युटेशन) इत्यादी कौशल्यात स्त्री वा पुरूष असा भेद करता येत नाही. फक्त गणितांची उत्तरं शोधण्याच्या कौशल्यात प्रौढ पुरूषांची सरशी आहे.
स्त्रिंयापेक्षा पुरूष त्रिमितीय वस्तूंची कल्पना करण्यात, मनातल्या मनात त्या वस्तू फिरवण्यात, सुटे भाग जोङण्यात जास्त सक्षम आहेत. (+0.73) अभियांत्रिकीत, रचनाशास्त्रात या प्रकारच्या कौशल्याची गरज भासते. पुरूषातील ही क्षमता कदाचित गर्भावस्थेतील टेस्टोस्टेरोन संप्रेरकाच्या अती स्त्रावामुळे आली असण्याची शक्यता आहे. म्हणूनच याच्या अतीस्त्रावामुळे काही मुलींच्या त्रिमितीय संकल्पनेच्या क्षमतेत वाढ झालेली असते हे लक्षात आले.
परंतु अवकाशासंबधीच्या कामात पुरूषांचा वरचष्मा असतो असा त्याचा अर्थ होत नाही. पुरूष या बाबतीत जास्त कुशल आहेत हा एक भ्रम आहे. पुरूष व स्त्रिया मार्ग निदर्शनाच्या बाबतीत समान आहेत. फक्त हे कार्य कशा प्रकारे केले जाते याबद्दल भेद आहेत. स्त्रिया मार्गातील खाणाखुणा लक्षात ठेऊन मुक्कामापर्यंत पोचतात. पुरूष मात्र त्रिमितीच्या आधारे दिशा व अंतर यांचा अंदाज घेत घेत मुक्कामाला पोचतो.

पुरूषांच्या गणितीय कौशल्याबाबतीतसुद्धा असाच भ्रम पोसला जात आहे. यासाठी गणित व विज्ञानाच्या प्राध्यापिकांची कमी संख्या याकडे बोट दाखवले जात असते. सरासरी क्षमता लक्षात घेतल्यास स्त्री व पुरूष यात व्यत्यास नाही. या क्षमतेच्या वितरण वक्राचा (ङिस्ट्रिब्युशन कर्व्ह) अभ्यास केल्यास वक्राच्या दोन्ही टोकांच्या भागात पुरूषांची संख्या जास्त आहे. हे लक्षात येईल यावरून काही पुरूष तद्दन मूर्ख किंवा विलक्षण बुध्दिवंत असू शकतात, असा अनुमान काढता येईल.
डॉ लॅरी समर्स यांनी केलेल्या विधानाचा परामर्श घेत असताना गेल्या पन्नास वर्षात शैक्षणिक व इतर ज्ञानक्षेत्रात स्त्रियांनी केलेल्या अभूतपूर्व प्रगतीकङे दुर्लक्ष करता येत नाही. शिस्तीचे पालन करत व वाटेतील सर्व अडथळे पार करत वरच्या सोपानापर्यंत त्या पोचल्या आहेत. इतर कुठल्याही मनो-यापेक्षा शैक्षणिक क्षेत्राच्या हस्तिदंताच्या मनो-यापर्यंत पोचणे आज जरी दुरापास्त वाटत असेल. तरी यासाठी वैज्ञानिक, गणितीय व अभियांत्रिकी क्षेत्रातील उच्च पदासाठी स्त्रियांचा नगण्य सहभागास त्याच्यांतील उपजत किंवा उत्परिर्वतक गुणविशेषांचा योगदान कितपत आहे याचा पुन्हा एकदा अंदाज घ्यावा लागेल
उपजत असू शकेल पंरतु उत्परिवर्तक नाही असे म्हणता येणार नाही. त्रिमितीय क्षमतेची वाढ प्रशिक्षणातून, प्रोत्साहनातून शक्य आहे. अभियांत्रिकीतील प्रशिक्षणामुळे कौशल्य प्राप्त झालेल्या स्त्रियांचे प्रमाण 47 टक्क्यापरून 77 टक्क्यापर्यंत गेलेली उदाहरणं आहेत. त्या आता संक्रमणावस्थेतून जात आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील हस्तिदंताच्या मनो-यापर्यंत त्या नक्कीच पोचतील.
जीवशास्त्र आपल्या जडण घडणीला कारणीभूत आहे हे मान्य असले तरी जीवशास्त्र हाच आपल्या मुक्कामाचे स्थान आहे असे म्हणण्यात अर्थ नाही.

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (4 votes)

प्रतिक्रिया

चांगले लेखन
हे वर्गीकरण 'ढोबळ' स्वरूपात समजले तर चांगले आहेच. मात्र हे कार्याचे/स्वभावाचे/आवडींचे वर्गीकरण करताना साचेबद्धता येऊ नये याची मात्र काळजी घेतली जात नाही. एखादी सवय/आवड ही स्त्रीयांची / पुरुषांची असेच लेबल लागते. मग 'टॉम बॉय' किंवा 'बायल्या' म्हणून हिणवणे वगैरे ओघाने आलेच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उत्तम सूप पिऊन मेन कोर्स ऑर्डर करावा तर हाटेल बंद झालंय असं वाटलं. यातले काही मुद्दे इतरत्र चर्चिले गेले आहेत, तरी येखादी विस्तृत लेखमाला ल्याहावी अशी विनंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अंगभूत क्षमता आणि संस्कारांतून आलेल्या क्षमता यांच्यातला फरक सहज सांगता येत नाही. आजपर्यंत ज्या अंगभूत क्षमता म्हणून समजल्या गेल्या आहेत त्या कदाचित लिंगभूमिकांच्या सामाजिक दबावामुळे आल्या असतील असा साधारण लेखाचा रोख दिसतो. तो पटण्यासारखा वाटतो.

बॅटमॅन यांच्याशी सहमत. लेखाचं नाव वाचून नर-मादी फरक उत्क्रांतीतून कसा निर्माण झाला याबाबत काही लिहिलं असेल असा समज झाला. या संशोधनाचे संदर्भ मिळतील का? 'डी' हे नक्की काय एकक आहे? तुम्ही त्याची किंमत किती असेल तर फरक बराच, आणि किती असेल तर नगण्य या मर्यादा दिल्या आहेतच, पण तरीही ती किंमत कशी काढली जाते हे जाणून घ्यायला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या विषयी आधिक माहितीसाठी कृपया Effect sizegender differences वर क्लिक करावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बॅटमॅन आणि राजेश यांच्या प्रतिसादांशी सहमत. यावर विस्तृत लिखाण करावंत ही विनंती.

सामान्य मान्यतेप्रमाणे स्त्रिया (पुरुषांपेक्षा) वाईट ड्रायव्हर्स असतात.

युकेमधे तरूण पुरुषांना विम्याचा हप्ता अधिक भरावा लागत असे. (ही हप्त्याची गणितं आता युनिसेक्स पद्धतीने केल्यामुळे स्त्रियांना अधिक हप्ता भरावा लागणार असल्याची बातमी ऑक्टोबरमधे होती. त्या बातमीप्रमाणे चाळीशीच्या आतल्या स्त्रियांचा विमा हप्ता पुरुषांपेक्षा ३०% कमी होता/आहे.) अन्य काही प्रगत देशांमधे स्त्री असो वा पुरुष विम्याचा हप्ता सगळ्यांना सारखाच भरावा लागतो. स्त्रिया जर वाईट ड्रायव्हर्स असतील तरीही त्यांना कमी किंवा समान हप्ता आकारण्याची गणितं करण्यामुळे कंपन्यांचा काही खास फायदा होत असेल असं सकृतदर्शनी दिसत नाही. त्यामुळे स्त्रिया वाईट ड्रायव्हर्स असतात हा ही असाच एक जोपासलेला गैरसमज असावा असं वाटतं. या संदर्भात अधिक माहिती आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अदिती, स्त्रीया सामान्यपणे वाईट ड्राएव्हर असतात असा समज असला तरी त्या अधिक अपघात करवितात असे नाही. म्ह्णजे सामान्यपणे स्त्रिया वाहन चालवताना ज्या प्रकारच्या चुका करतात त्या प्रकारच्या चुकांनी मोठे जीवीतहानी होण्यासारखे अपघात होत नसावेत. याउलट टेस्टोस्टेरोनच्या अधिक प्रभावाखाली वीस ते तीस वयोगटातले पुरुष सर्वाधिक अपघातांना कारणीभूत होत असल्याने या वयोगटांतील पुरुषांना सर्वाधिक विमाहप्ता भरायला लागतो असे वाचल्यासारखे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टेस्टोस्टेरोनच्या अधिक प्रभावाखाली वीस ते तीस वयोगटातले पुरुष सर्वाधिक अपघातांना कारणीभूत होत असल्याने ...

हे मलाही वाचल्या/ऐकल्यासारखं वाटतं.

उगाच काहीतरी: स्त्रियांनी वाहतुकीचे नियम आणि गाड्यांच्या रचना केल्या तर काही फरक पडेल का असा प्रश्न पडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.