ए१ / ए२ दूध म्हणजे नक्की काय?
सई केसकर
(ए१ आणि ए२ दूध आजकाल अनेकदा चर्चेत येताना दिसतं. दूध ए१ किंवा ए२ असणं म्हणजे नेमकं काय? त्याचा शरीरावर खरंच काही परिणाम होतो का? चढ्या किमतीनं ए२ दूध विकत घ्यावं का? आतापर्यंत याविषयी परदेशात आणि भारतात काय संशोधन झालं आहे? जाणून घेऊया या लेखातून.)
ए१ आणि ए२ दुधाकडे वळण्याआधी एकंदरीत दुधाविषयीच्या काही महत्त्वाच्या गोष्टींची नोंद घेऊ. दूध पूर्णाहार आहे. म्हणजेच, सस्तन प्राण्यांच्या पिल्लांना सुरुवातीला लागणारे सगळे पोषक घटक दुधात सापडतात. प्रौढ व्यक्तींच्या आहाराची फोड केली, तर शाकाहारात, म्हणजेच धान्यांमध्ये, डाळींमध्ये आणि भाज्यांमध्ये, प्रथिनं, कर्बोदकं आणि चरबी एकत्र एकाच प्रकारच्या अन्नात सहसा सापडत नाहीत. शाकाहारात मुख्यत्वे कर्बोदकं आणि काही अंशी प्रथिनं असतात आणि चरबीचा अभाव असतो. तुम्ही कुठल्याही शाकाहारी अन्नाचं उदाहरण घ्या, हेच दिसेल - पालेभाज्या (भरपूर सेल्युलोजयुक्त म्हणजेच कर्बोदकयुक्त, अत्यल्प प्रथिनयुक्त आणि चरबीरहित); गहू, तांदूळ, ज्वारी यांसारखी धान्यं वा बटाटा-रताळं यांसारखे कंद/मुळं (स्टार्चयुक्त म्हणजेच कर्बोदकयुक्त, अत्यल्प प्रथिनयुक्त आणि चरबीरहित), डाळी आणि कडधान्यं (भरपूर प्रथिनयुक्त म्हणजेच थोडं कर्बोदकयुक्त आणि चरबीरहित), फळं (भरपूर शर्करायुक्त म्हणजेच कर्बोदकयुक्त, थोडं प्रथिनयुक्त आणि चरबीरहित). याला अपवाद आहे बियांचा. शेंगदाणे, अक्रोड, बदाम, काजू, तीळ अशा बियांमध्ये हे तीनही घटक वेगवेगळ्या प्रमाणात सापडतात. मांसाहारात कर्बोदकांचा अभाव असतो. कारण, प्राण्यांच्या शरीरात कुठल्याच प्रकारची साखर ही रक्त आणि दूध वगळता त्यांच्या अवयवांमध्ये साखरेच्या कुठल्याही रूपांत (ग्लुकोज, लॅक्टोज किंवा इतर) साठवली जात नाही. ग्लुकोजच्या साखळ्यांपासून तयार झालेलं ग्लायकोजेन यकृतात काही प्रमाणात साठवलं जातं. यकृत साखरेचं रूपांतर सतत चरबीत करत असतं. त्यामुळे कुठल्याही प्राण्याच्या मांसात प्रथिनं अधिक प्रमाणात असतात आणि प्राण्याच्या किंवा पक्ष्याच्या जातीनुसार त्यातली चरबी बदलते. बकरीच्या, गायीच्या तुलनेत पक्ष्यांत आणि त्यांच्या अंड्यात, आणि माशांमध्ये कमी चरबी असते. पण प्रथिनं आणि चरबी हे मांसाहारी आहारातले मुख्य घटक असतात. मांसाहारात मोडत नसलं, तरी प्राण्यांपासून मिळणारं दूध मात्र याला अपवाद आहे. दुधात कर्बोदकं (दुग्धशर्करा), प्रथिनं आणि चरबी हे तीनही घटक असतात. त्यामुळे दूध भारतीय शाकाहारातला एक महत्त्वाचा घटक आहे.
सस्तन पशूंच्या दुधात नक्की काय काय पोषक घटक असतात याकडे ढोबळ मानाने बघितलं, तर साधारण ८०-८७% पाणी, ३-८% चरबी, ३-६% प्रथिनं, साधारण ५% दुग्धशर्करा म्हणजेच लॅक्टोज आणि ०.८ % इतके क्षार आणि खनिजं असतात. दुधाची बाजारातली किंमत दोन गोष्टींवर ठरते - त्यातलं चरबीचं प्रमाण (% fat content) आणि चरबीव्यतिरिक्त असलेले काही घन पदार्थ ज्यांना 'सॉलिड नॉट फॅट' (SNF) असं म्हणतात. दुधावरली साय म्हणजे मेद/चरबी; आणि सायीखालच्या पांढर्या द्रव्यातून पाणी वगळलं, तर उरणारं ते एसएनएफ. एसएनएफमध्ये दुग्धशर्करा, प्रथिनं आणि कॅल्शियमसारखे खनिज घटक असतात. दुधाच्या सायीत ९५-९९% 'ट्रायग्लिसराईड' असतात. ग्लिसरॉलला तीन स्निग्ध आम्लं (फॅटी ॲसिड) जोडली गेली, की एक ट्रायग्लिसराईड होतं. यापाठोपाठ काही डाय- आणि मोनोग्लिसराईड असतात. दुधाच्या चरबीचा अभ्यास केला, तर त्यात साधारण ६५% संपृक्त चरबी (saturated fat) असते, ३२% एकच दुहेरी बंध (double bond) असणारी असंपृक्त चरबी (Monounsaturated Fatty Acid, MUFA) असते आणि साधारण ३% अनेक दुहेरी बंध असणारी असंपृक्त चरबी (Polyunsaturated Fatty Acid, PUFA) असते [१].
दुग्धशर्करा उर्फ लॅक्टोज, ही डी-ग्लुकोज आणि डी-गॅलॅक्टोज या दोन शर्करांपासून तयार झालेली साखर आहे. अशा प्रकारच्या साखरेला डायसॅकराइड म्हणतात. आपल्या नेहमीच्या आहारात उसापासून तयार केलेली जी साखर येते, त्या सुक्रोजच्या गोडव्याच्या फक्त १६-३३% गोडवा लॅक्टोजमध्ये असतो [१]. पण त्यात ग्लुकोज असल्याने दुधाचं सेवन शरीरातल्या इन्सुलिनवर आणि त्यामुळे रक्तशर्करेवरही परिणाम करणारं असतं. म्हणून मधुमेह असणाऱ्या, किंवा आनुवंशिक मधुमेही व्यक्तींनी सुक्रोजबरोबरच लॅक्टोजचं सेवनही आटोक्यात ठेवायला हवं.
दुधात दोन प्रकारची प्रथिनं सापडतात. केसीन (८०%) आणि व्हे (२०%) [१] अशी त्यांची ढोबळ विभागणी असली, तरी ही दोनही प्रथिनं अनेक प्रथिनांच्या साखळ्यांपासून तयार झालेली असतात. केसीन या प्रकारातली प्रथिनं केसीन आणि कॅल्शियम फॉस्फेटने तयार झालेली असतात. तर व्हे या प्रकारातली प्रथिनं बीटा-लॅक्टोग्लोब्युलिन, अल्फा-लॅक्टोअल्ब्युमिन, सिरम अल्ब्युमिन अशा प्रथिनांपासून तयार झालेली असतात. यात एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी, की छोट्याछोट्या अमायनो आम्लांच्या अनेक साखळ्या जोडून ही प्रथिनं तयार होत असतात. जेव्हा आपण प्रथिनं खातो, तेव्हा आपल्या पचनसंस्थेत त्यांचं वेगवेगळ्या प्रकारे विघटन होतं. त्यातून आपल्या शरीरातल्या पेशींचं बांधकाम होत असतं. शरीराला अत्यावश्यक असलेल्या पोषक मूल्यांपैकी दोन मुख्य म्हणजे "essential fatty acids" (अत्यावश्यक मेदाम्ल) आणि "essential amino acids" (अत्यावश्यक अमायनो आम्ल). चरबी आणि प्रथिनांतून आपल्याला हे घटक मिळत असतात. आणि त्यांचा वापर शरीरातल्या पेशी तयार करायला तसंच विविध संप्रेरकांचा स्राव नियमित व्हावा यासाठी केला जातो.
प्रथिनांच्या या अशा शृंखलायुक्त असण्याने, पचनक्रियेदरम्यान त्यांचं विघटन आधी उल्लेखलेल्या आम्लांमध्ये होतं. पण ही आम्लं अगदी सुटीसुटी होत नाहीत. त्यांच्या मोठ्या साखळ्या तुटून अनेक छोट्या साखळ्या तयार होतात. यांना पेप्टाइड (peptides) म्हणतात [२]. यांतली काही पेप्टाइड पोषणाव्यतिरिक्तही कामास येतात. शरीराने तयार केलेल्या प्रथिनांशी (उदाहरणार्थ: संप्रेरकं) किंवा अन्नातून आलेल्याखनिजपदार्थांवर ही पेप्टाइड परस्पर प्रक्रिया करू शकतात. या क्रिया शरीरासाठी चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या असू शकतात. ही प्रथिनं शरीरात जाऊन स्वतंत्रपणे काही प्रक्रिया करू शकतात त्यामुळे त्यांना 'बायोॲक्टिव्ह पेप्टाइड' म्हणतात [३]. अशा प्रकारच्या बायोपेप्टाइडचा वापर शरीराच्या हितासाठी करून घेता येऊ शकतो; उदाहरणार्थ रक्तदाब कमी करण्यासाठी, रक्ताच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून किंवा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी [३]. त्यामुळे सध्या वेगाने वाढत असलेल्या न्यूट्रास्युटिकल क्षेत्रात बायोॲक्टिव्ह पेप्टाइडवर बराच अभ्यास सुरू आहे. पण अशा एका बायोपेप्टाइडला गेल्या काही वर्षांत खलनायक ठरवण्यात आलं आहे. ते म्हणजे आपल्याला एव्हाना माहिती असलेल्या ए१ प्रकारच्या दुधातलं बीटा-केसोमॉर्फीन-७.
ए१ आणि ए२ दूध अचानक चर्चेत येण्याचं कारण बीटा-केसोमॉर्फीन-७ किंवा BCM 7 नावाचं असंच एक बायोॲक्टिव्ह पेप्टाइड आहे [२]. आधी उल्लेखल्याप्रमाणे, दुधातल्या एकूण प्रथिनांमध्ये ८०% केसीन असतं. या केसीनमध्येही ४५% बीटा-केसीन सापडतं. या बीटा केसीनची त्याच्या साखळ्यांमध्ये असलेल्या रासायनिक गटांप्रमाणे अनेक रूपं आहेत. अशा रूपांना पॉलीमॉर्फ (polymorph) म्हणतात. बीटा केसीनच्या अशा तेरा रूपांचा आतापर्यंत शोध लागला आहे पण गाई-म्हशींच्या दुधात प्रामुख्यानं ए१, ए२ आणि बी ही तीन रूपं सापडतात, आणि आपण जे दूध घेतो त्यात अधिक्याने फक्त ए१ आणि ए२ बीटा केसीन सापडतं [४]. हीच ए१ आणि ए२ रूपं सध्या ए१ आणि ए२ दूध म्हणून प्रसिद्ध झाली आहेत.
ए१ आणि ए२ बीटा केसीनमधला नेमका फरक काय?
आकृती इथून साभार
बीटा केसीन ही २०९ अमायनो आम्लांनी तयार झालेली साखळी असते. आणि ए१ आणि ए२ रूपांमध्ये या साखळीच्या सदुसष्ठाव्या जागेवर फक्त एका अमायनो आम्लाचाफरक असतो. ए१ बीटा केसीनमध्ये या जागेवर हिस्टीडीन असतं; ज्यामुळे पचनक्रियेदरम्यान बीटा-केसोमॉर्फीन-७ तयार होतं. ए२ बीटा केसीनमध्ये या जागेवर प्रोलीन असतं, ज्यामुळे बीटा-केसोमॉर्फीन-७ तयार होऊ शकत नाही. या बीटा-केसोमॉर्फीन-७चा शरीरावर होणारा परिणाम अपायकारक आहे असा निष्कर्ष काही अभ्यासांतून निघाला होता. अपायकारक म्हणजे कसं? तर या पेप्टाइडच्या शरीरात असण्याने टाईप-१ डायबेटीस, स्वमग्नता (Autism), हृदयविकार होण्याची शक्यता वाढते असा दावा काही संशोधकांनी केला होता [२]. काही बायोॲक्टिव्ह पेप्टाइड आपल्या मेंदूतल्या ओपीओईड रिसेप्टरशी संवाद साधू शकतात. मेंदूतल्या या केंद्रांमध्ये व्यसनाधीनता, आपली प्रतिकारशक्ती, आणि विविध रोगांना बळी पडायची आपल्या शरीराची क्षमता ठरत असते. पण इथवर पोचायला या प्रथिनांना अनेक अडथळे पार करावे लागतात. आधी पचनक्रियेदरम्यान BCM7 तयार होणं, त्यानंतर ते आतड्यांतून रक्तात शोषलं जाणं आणि त्यानंतर रक्तातून मेंदूत या केंद्रांत पुन्हा शोषलं जाणं - या सगळ्या क्रिया झाल्या, तरच त्याचे शरीरावर अपायकारक परिणाम होऊ शकतात. आणि अजून कुठल्याच प्रयोगांतून असे परिणाम होतात हे निर्विवाद सिद्ध झालं नाही [२,११]. २००९ साली युरोपियन फूड सेफ्टी अथॉरिटीनं (EFSA) ए१ दुधावर झालेल्या सगळ्या संशोधनाचा आढावा घेतला. यामध्ये २००९पर्यंत प्रकाशित झालेल्या सगळ्या शोधनिबंधाचा अभ्यास करून एफसाने असा निष्कर्ष काढला की ए१ दुधाचं सेवन आणि डायबेटीस, ऑटिझम, हृदयविकार असे आजार यांची थेट सांगड घालता येत नाही [२]. पण २००९ साल जाऊनही आता तेरा वर्षं झाली आहेत. या तेरा वर्षांत एफसाचा निष्कर्ष खोडून काढणारे कुठलेही अभ्यास झाले नाहीत. बाहेरच्या देशांतले या बाबतचे संशोधन आता ए१ दुधामुळे पचनसंस्थेवर काही परिणाम होतो का, अशा प्रकारच्या किरकोळ आजारांवर सुरु आहे. पण भारतात मात्र अजूनही डायबेटीससारख्या आजाराची भीती दाखवून ए१ दुधाचा राक्षस उभा केला जातो आहे [१२].
ए१ आणि ए२ म्हणजे नेमकं काय?
जाफराबादी म्हैस
आपलं शरीर तयार होत असताना आपली जनुकं आपल्याला काही विशिष्ट गुणधर्म देत असतात. गुणसूत्रांमध्ये या गुणधर्म देऊ करणाऱ्या घटकांच्या जोड्या असतात (ही जोडी आईच्या २ जोड्या आणि वडिलांच्या २ जोड्या एकत्र येऊन तयार होते). त्यांना 'अलील' म्हणतात. जर जोडीतले दोन्ही अलील एकाच प्रकारचे असतील, तर तो प्राणी त्या गुणधर्मासाठी 'होमोझायगस' आहे असं म्हणतात. हे जर वेगवेगळे असतील तर तो प्राणी त्या गुणधर्मासाठी 'हेट्रोझायगस' आहे असं म्हणतात. आपण हे ए१ आणि ए२ दुधाला कसं लागू होतं ते बघू. ए१ दूध देणारी गाय तयार होण्यासाठी गायीच्या या गुणधर्माच्या जनुकांमध्ये दोन्ही ए१ए१ अलील असायला हवेत. आणि ए२ देणाऱ्या गायीच्या जनुकांमध्ये दोन्ही ए२ए२ अलील असायला हवेत. ए१ए२, म्हणजेच या गुणधर्मासाठी हेटेरोझायगस असलेली गाय दोन्ही प्रकारची प्रथिनं असलेलं दूध देईल. भारतातल्या 'देशी' गायीच्या सगळ्या जाती ए२ए२ आहेत. पण काही संकरीत जातीही आहेत. २००९ साली, हरियाणातील कर्नालमधल्या 'नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्सेस' या संस्थेने वेगवेगळ्या जातींच्या आठशेहून अधिक गायी-म्हशींचा अभ्यास केला. हा अभ्यास गाय किंवा म्हैस ए१ए१, ए१ए२ की ए२ए२ आहे हे शोधून काढण्यासाठी केला गेला. याला ‘जिनोटायपिंग’ म्हणतात. या अभ्यासाअंतर्गत तपासलेल्या गायींमध्ये (संकरित आणि देशी), बहुतांश गायी ए२ए२ आहेत असं निदर्शनास आलं, ए१ए२ गायीचं प्रमाण अत्यल्प होतं आणि एकही संपूर्ण ए१ए१ गाय या अभ्यासात सापडली नाही. म्हशींमध्ये तर १००% म्हशी ए२ए२ आहेत असं निदर्शनास आलं. देशी पशूंच्या सगळ्या प्रजातींमध्ये ए२ए२ आलील असलेल्या पशूंचे अधिक्य आहे असं या अभ्यासातून दिसून आलं [७]. सध्या सुरू असलेल्या ए१ आणि ए२ दुधाच्या चिकित्सेच्या गोंधळात, एक विशेष उल्लेखनीय निरीक्षण असं, की भारतातल्या १००% म्हशी ए२ए२ असूनही, बाजारात आक्रमक जाहिरात मात्र ए२ए२ गायीच्या दुधाची होताना दिसते.
ए२ दूध महाग असायला हवे का?
आपण ए१ आणि ए२ दुधामध्ये जैवरासायनिक फरक कसा आहे ते बघितलं. पण या दुधांच्या किमतींतही बराच फरक आहे. ए१ आणि ए२ असं दुधाचं वर्गीकरण सुरू होण्याआधी भारतात गायीचं आणि म्हशीचं दूध असं वर्गीकरण रूढ होतं. यामध्ये गायीचं दूध म्हशीच्या दुधापेक्षा स्वस्त असायचं, कारण गायीच्या दुधातलं चरबीचं प्रमाण कमी असतं. भारतात खाद्यपदार्थाच्या संदर्भातले नियम तयार करणारी आणि त्यांची अंमलबजावणी करणारी संस्था म्हणजे 'फूड सेफ्टी अॅन्ड स्टॅन्डर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया' (FSSAI). यांच्या मानकाप्रमाणे, एसएनएफ आणि मेद ह्यांचं किमान प्रमाण गायीच्या दुधात अनुक्रमे ८.३% आणि ३.२%, तर म्हशीत ते अनुक्रमे ९% आणि ५% हवं. या दोन गोष्टींवरून दुधाची किंमत ठरते. त्यामुळे म्हशीचं दूध महाग आणि गायीचं दूध स्वस्त असतं. एसएनएफ आणि मेदाच्या चाचण्या दूध-संकलन केंद्रांमध्ये सतत होत असतात. भारतातली बहुतांश दूध-केंद्रं अनेक शेतकऱ्यांकडून दुधाचं संकलन करताना सुरुवातीलाच या चाचण्या करून मगच दूध घेतात, जेणेकरून त्यात पाणी मिसळलं आहे का हे दूध विकत घेण्याआधीच लक्षात येतं. या चाचण्यांसाठी लागणारी उपकरणं स्वस्त असतात आणि ती अडीच हजार रुपयांपासून वेगवेगळ्या किमतीला ॲमेझॉनवरही उपलब्ध असतात.
सहिवाल देशी गाय
पाकीटबंद दूध विकणाऱ्या अधिकृत व्यवसायांना पाकिटावर ही घटकांच्या प्रमाणांबद्दलची माहिती छापणं बंधनकारक असतं. त्यामुळे आपण गायीचं किंवा म्हशीचं दूध घेत असू, तर त्यातलं मेद आणि एसएनएफ तपासलेलं आहे अशी खात्री आपल्याला बाळगता येते. आणि गायीचं (स्वस्त) दूध न घेता म्हशीचं (महाग) दूध घेणाऱ्यांना काही टक्के जास्त मेद मिळतंय अशी हमी मिळते. हे नुसतं दुधाच्या सायीवरूनही लक्षात येत असलं, तरीही यासाठी शास्त्रशुद्ध चाचण्या आहेत आणि त्या करून घेण्याची सक्ती आहे.
ए१ किंवा ए२ दूध नक्की ए१ किंवा ए२ आहे का, हे तपासण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली म्हणजे दूध-केंद्रामधल्या सगळ्या गायींचं/म्हशींचं जिनोटायपिंग करून प्रत्येक गायीला ए२ असल्याचं प्रशस्तिपत्रक द्यायचं. हे काम प्रचंड खर्चीक आहे आणि अशा प्रकारचं कुठलंही मानक भारतात अजून आलेलं नाही. आणि जरी प्रत्येक गायीसाठी असं प्रशस्तिपत्रक घेतलं, तरीही दूध-केंद्रामधून आपल्या घरी येणारं दूध प्रवासात दुसऱ्या दुधाची भेसळ न होता येतं आहे याची कुठलीही हमी देता येत नाही. आणि एखाद्याला अशा प्रकारची भेसळ पकडायची असेल, तर तो मार्ग सहजसाध्य नाही कारण आपल्याकडे येणारं दूध हे अनेक गायींच्या दुधांचं मिश्रण असतं. दुसरी पद्धत आहे दुधाची चाचणी करायची. यासाठी LC/MS/MS नावाचं महागडं (एका संचाची किंमत किमान १ कोटी रुपये) उपकरण लागतं. जशी मेद आणि एसएनएफची चाचणी संकलन केंद्रातच होऊ शकते तशी ती दुधातल्या प्रथिनांची होऊ शकत नाही. आणि दूध ही रोज संकलित होणारी नाशवंत वस्तू असल्याने रोज, दुधाच्या प्रत्येक बॅचचं अशा प्रकारे पृथक्करण करणं केवळ अशक्य आहे.
दुधात अँटिबायोटिक्स (प्रतिजैविकं) असू नयेत किंवा कीटनाशकांचे अंश असू नयेत म्हणून FSSAIने वर्षातून काही वेळा दूध-केंद्रांना या घटकांसाठीची तपासणी करून घेणणं बंधनकारक केलं आहे. जिथे दूध-केंद्रं 'फोर्टिफाईड' म्हणून अ आणि ड जीवनसत्त्व घालून दूध विकतात त्यांनाही वर्षातून काही वेळा त्यांच्या दुधात नक्की तितक्या प्रमाणात ती जीवनसत्वं आहेत की नाही हे तपासून घ्यावं लागतं. अशा प्रकारच्या सहामाही किंवा वार्षिक चाचण्यांतही, अजून तरी ए१ आणि ए२च्या चाचण्या समाविष्ट केलेल्या नाहीत.
सध्या बाजारातल्या ४ वेगवेगळ्या उत्पादकांनी लावलेल्या गायीच्या साध्या दुधाच्या किमतींची सरासरी किंमत ५१ रुपये प्रति लिटर आहे. म्हशीच्या दुधाची, जे वर पाहिल्याप्रमाणे संपूर्णपणे ए२ असतं असं गृहीत धरायला काहीच हरकत नाही, अशाच प्रकारे काढलेली सरासरी किंमत ६८ रुपये प्रति लिटर आहे. तर 'देशी गायीचं ए२ दूध' अशा नावाखाली विकल्या जाणाऱ्या दुधाची अशाच प्रकारे काढलेली सरासरी किंमत ९२ रुपये प्रति लिटर आहे! म्हणजे गायीच्या साध्या दुधासारखेच मेद आणि एसएनएफ असूनही त्या दुधापेक्षा जवळपास दुपटीने महाग. आणि जास्त मेद आणि एसएनएफ असणाऱ्या, खात्रीशीर ए२ असणाऱ्या म्हशीच्या दुधापेक्षा १.३ पटीने महाग! एवढंच नव्हे, तर वेगवेगळ्या उत्पादकांनी लवलेल्या किमती सरासरीपासून किती फारकत घेतात (स्टॅंडर्ड डिव्हिएशन) हे तपासलं, तर गायीच्या साध्या दुधाच्या किमतीत फक्त १.१ रुपयांचा फरक आहे, म्हशीच्या दुधात थोडा जास्त, म्हणजेच ८ रुपयांचा, तर ए२ दुधामध्ये हा फरक जवळपास २० रुपयांचा आहे! म्हणजेच, दोन वेगवेगळ्या उत्पादकांच्या ए२ दुधांच्या किंमतींमध्येही बराच फरक आहे.
जर एखादं दूध ए२ आहे हे सिद्ध करायच्या कुठल्याही चाचण्या केल्या जात नाहीत, आणि दूध ए२ असल्याने ते शरीरासाठी चांगलं असा दावा करून विकलं जातं आहे, तर या चढ्या किमतीचं नेमकं कारण काय असा प्रश्न ग्राहकांच्या मनात यायला हवा. लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या माहितीवरून तीन मुद्दे समोर येतात:
१. ए१ प्रकारचं दूध प्यायल्याने ऑटिझम, टाईप १ डायबेटीस असे आजार होतात हे निर्विवाद सिद्ध झालेलं नाही.
२. भारतातली बहुतांश दुभती जनावरं ए२ दूध देणारी आहेत.
३. म्हशीचं दूध निर्विवाद ए२ आहे.
या तीन मुद्द्यांचा विचार केला तर खरंतर दूध ए२ आहे किंवा नाही हे सिद्ध करणाऱ्या चाचण्यांचीही गरज नाही.
'देशी गायीचे ए२ दूध' अशा नावाखाली विकल्या जाणाऱ्या दुधाप्रमाणेच 'देशी गायीचे ए२ तूप' अशी तुपाची विक्रीही सध्या होते आहे. अर्थात, दुधाप्रमाणेच FSSAIमध्ये अशा प्रकारच्या तुपासाठीही कोणत्याच चाचण्या बंधनकारक नाहीत. आणि अशा दाव्याने होणारी तुपाची विक्री अक्षम्य आहे. कारण तुपात ९९.८% मेद असतं. उरलेल्या ०.२ टक्क्यात आर्द्रता असते. सुरुवातीला बघितल्याप्रमाणे ए१ आणि ए२ बीटा केसीन असणे हा दुधातील प्रथिनांचा गुणधर्म आहे. ज्या पदार्थात प्रथिनच नाही, त्या पदार्थाची विक्री तशा प्रकारचे लेबल लावून कशी काय होऊ शकते? जसा आपण दुधाच्या किमतींचा आढावा घेतला तसाच जर तुपाच्या किमतींचा घेतला, तर त्याहूनही भयानक सत्य समोर येतं. साध्या गायीच्या तुपाची (९ वेगवेगळे छाप) सरासरी किंमत ५७७ रुपये प्रति किलो येते. साध्या म्हशीच्या (४ छाप) तुपाची सरासरी किंमत ७१३ रुपये प्रति किलो एवढी येते, तर ए२ नावाखाली विकल्या जाणाऱ्या गायीच्या तुपाची (९ छाप) सरासरी किंमत २३३८ रुपये प्रति किलो एवढी येते (स्रोत : बिगबास्केट). दुधाप्रमाणेच इथेही सरासरीपासून किमतींचा फरक ए२ तुपात प्रचंड मोठा आहे. साध्या गायीच्या तुपातला हा फरक ४० रुपये एवढा, म्हशीचा १०९ रुपये एवढा तर ए२ तुपांतला हाच फरक ५१० रुपये एवढा आहे! म्हणजेच, तूप देशी गायीचं आहे आणि ए२ दुधाचं आहे म्हणून मनाला येईल त्या किमतीला ते विकलं जात आहे.
देशी गायीचं दूध आणि तूप चढ्या किमतीनं विकण्याची इतरही कारणं आहेत. ग्राहकांना ती समजावून सांगितली, तर पटण्यासारखी आहेत. मुळात शुद्ध देशी गायींची दूध तयार करण्याची क्षमताच म्हशींपेक्षा किंवा संकरित गायींपेक्षा कमी असते. चांगलं दूध तयार होण्यासाठी गायीला चांगला खुराक द्यावा लागतो. त्यामुळे गुंतवणुकीचा परतावा मिळेल अशी दुधाची किंमत असायला हवी, तरच उद्योग चालू राहू शकतो. गायीच्या दुधावर साय कमी येत असल्याने गायीचं तूप, तेही शुद्ध देशी तूप (दूध विरजून तयार केलेलं) महाग असणं साहजिक आहे. पण अशा पारंपरिक पद्धतीनं तयार केलेल्या तुपाचा आणि दूध ए२ असण्याच्या काही संबंध नाही.
गायीच्या दुधाचं आणि तुपाचं महत्त्व आयुर्वेदातही सांगितलं आहे. तसंच, सध्या देशी पशूंच्या जातींच्या संवर्धनासाठी देशभरात अनेक उपक्रम राबवले जात आहेत. ही सगळी पार्श्वभूमी ग्राहकांसमोर ठेवली, तर ज्यांना मुळात देशी गायीचंच दूध आणि तूप घ्यायचं आहे ते ग्राहक आवर्जून हे दूध खरेदी करतीलच पण अशा प्रकारच्या प्रामाणिक बाजारविक्रीमुळे इतरही लोक या दुधाकडे वळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. ज्या आर्थिक वर्गात गायीचं ए२ दूध किंवा तूप घेतलं जातं तो आर्थिक वर्ग आधी दिलेल्या कारणांसाठीही थोडी जास्त किंमत मोजायला तयार होईल. अर्थात, पुन्हा इथे ग्राहकांकडे पोहोचणारं दूध देशी गायीचंच आहे किंवा नाही ही खातरजमा करायचे मार्ग उपलब्ध असायला हवेत. निव्वळ श्रद्धेवर अशी खरेदी होऊ नये. ते ग्राहकांवर अन्याय करणारं आहेच; पण त्याचबरोबर ते सचोटीने काम करणाऱ्या उद्योगांसाठीही अन्यायकारक ठरेल.
---
संदर्भ :
१. Milk Composition and Its Constituents, Dr. Narendra K. Kayak, Department of Livestock Products and Technology, College of Veterinary Science and A&H, Mhow (Madhya Pradesh, India).
२. Scientific Report of EFSA prepared by a DATEX Working Group on the potential health impact of β-casomorphins and related peptides. EFSA Scientific Report (2009) 231, 1-107.
३. Food-Derived Bioactive Peptides in Human Health: Challenges and Opportunities, Chakrabarti S, Guha S, Majumder K., Nutrients. 2018;10(11):1738. Published 2018 Nov 12. doi:10.3390/nu10111738.
४. A1- and A2-Milk and Their Effect on Human Health, Shehadeh Kaskous, Journal of Food Enginnering and Technology, Vol 9, Issue 1, 2020.
५. Detection of A1 and A2 genetic variants of beta-casein in Indian crossbred cattle by PCR-ACRS, M. Raies Haq, Rajeev Kapila, U.K. Shandilya, A.K. Dang, Suman Kapila, Milchwissenschaft 67 (4) 2012.
६. Advances in Animal Experimentation and Modeling,Chapter 30 - Harnessing potential of A2 milk in India: an overview, MonikaSodhi, Manishi Mukesh, Vishal Sharma, Ranjit Singh Kataria, RanbirChanderSobti,https://www.sciencedirect.com/science/article/pii/B9780323905831000167#!
७. Status of milk protein, ß-casein variants among Indian milch animals., Mishra, B., Manishi Mukesh, B. Prakash, Monika Sodhi, R. Kapila, A. Kishore, R. Kataria et al. ,Ind J Anim Sci 79.7 (2009): 722-725.
८. Genetic variants of β-casein in cattle and buffalo breeding bulls in Karnataka state of India., Ramesha, K. P., Akhila Rao, M. Basavaraju, Rani Alex, M. A. Kataktalware, S. Jeyakumar, and S. Varalakshmi.,Indian Journal of Biotechnology Vol. 15,178-181 (2016).
९. A Study on β-Casein Gene Polymorphism in Crossbred Cattle and Murrah / Graded Murrah Buffalo in Tamil Nadu.,R.S. Kathiravan,C.M. Vandana, M. Malarmathi, R. Chitra, N. Murali, M. Arthanarieswaran., Indian Journal of Animal Research, 2021.
१०. Bovine Milk: A1 and A2 Beta Casein Milk Proteins and their Impact on Human Health: A Review.,P. Chitra,Agricultural Reviews (2020).
११. Milk Al and A2 Peptides and Diabetes, Roger A. Clemens, Milk and Milk Products in Human Nutrition 67 (2011): 187-195.
१२. Research on A1 and A2 milk: A1 milk is not a matter of health concern.,Hegde, Narayan G., Indian J Anim Sci 89, no. 7 (2019): 707-711.
अतिशय महत्वाचा लेख. आभार
अतिशय महत्वाचा लेख.
आभार
+१
माहितीपूर्ण.
+2
उत्तम माहितीपूर्ण लेख
शंका निरसन झालं!
A2 दूध घेत नसल्याने मी फार दूषणं ऐकली होती. ती देणार्यांना उत्तर म्हणून हा लेख पाठविण्याची ईच्छा आहे. पण तो पाठवला तरी न वाचता आपण महाग म्हणजे उत्तम दूध पितो आहोत अशी त्यांची अंधश्रध्दा कायम राहील. असो बापडे. A2 दूध न घेण्यामागे लेखात दिलेल्या माहिती पेक्षा त्रोटक माहिती होती, ती समग्र आणि अभ्यासपूर्ण रित्या सांगितल्याबद्दल धन्यवाद!
अचूक आणि नेमकं
लेख अतिशय आवडलेला आहे. ए१ आणि ए२ बद्दल इतके गैरसमज होते ते हा लेख वाचून पूर्ण दूर झाले. तसेच आपण लहानपणापासून फक्त ए२ च(म्हशीचे) दूध पीत होतो आणि आहोत ही दिलासा देणारी बाब ठरली. कोथरुड राष्ट्रातून साने डेअरीपर्यंत निव्वळ ए२ गायीच्या दुधासाठी येणाऱ्या माझ्या मित्रास हा लेख तात्काळ पाठवला आहे.
काळी बेन्द्री असु दे, आमची म्हसच बरी!
उत्तम, अभ्यासपूर्ण लेख.
उत्तम, अभ्यासपूर्ण लेख.
मला एक आनुषंगिक प्रश्न आहे. हे ए२ दुधाचं मार्केट कितीशे/हजार कोटींचं असेल?
दुधात 87% पाणी
हे मान्य केले तर 5% च fat असतात.
म्हणजे 1000 ml दुधातून 50g च तूप मिळाले पाहिजे .
म्हणजे 1kg तूप बरोबर 20 ltr दूध.
पण रिअल मध्ये असे प्रमाण बघायला मिळत नाही.
त्याचे काय कारण.
?
प्रत्यक्षात साधारणतः काय प्रमाण पाहावयास मिळते?
किंमत पाहिली तर तुपाची किंमत
किंमत पाहिली तर तुपाची किंमत ते तयार करण्यासाठी लागणाऱ्या दुधापेक्षा कमी आहे हे खरं आहे. पण दुधात फॅटपलीकडे इतरही पदार्थ असतात जे दही, ताक म्हणून विकता येतात.
औद्योगिक प्रक्रिया
विकतचं तूप त्यामानाने स्वस्त असण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे औद्योगिक प्रक्रियेत साय विरजून तूप करत नाहीत. तशा प्रकारे तूप केलं तर थोडं फॅट वाया जातं. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर असं तूप करणं अनेक गोष्टींमुळे अडचणीचं आहे. म्हणून आधी centrifugation करून sweet cream butter तयार करतात. जे बटर आपण पॅक बंद विकत घेतो त्यालाही विरजण पद्धत वापरलेली नसते. यामुळे खाली उरलेल्या द्रव्याचा अनेक गोष्टींसाठी वापर करता येतो आणि त्या सगळ्या streams मधून पैसे मिळतात.
नीट विरजण लावून कढवलेल्या तुपाला मार्केट आहे. विकतचं तूप न आवडणारे बरेच मराठी मध्यमवर्गीय असतात. अर्थात, गायीच्या दुधावर जश्या प्रकारची साय येते ती बघितली तर १ किलो तूप करायला एक वर्षही लागू शकेल असं वाटतं.
'ए१ / ए२ दूध' प्रकरण
'ए१ / ए२ दूध' प्रकरण नीट उलगडून सांगितल्याबद्दल धन्यवाद. काही प्रश्न;
१. 'बीटा-केसोमॉर्फीन-७' शरीराला अपायकारक आहे असा निष्कर्श काही संशोधकानी काढला होता. त्यानंतर EFSA ने २००९ मधे निष्कर्श काढला की ए१ दूधाच्या सेवनाचा आणि डायबेटीस वगैरें होण्याचा काहीही संबंध नाही. पण त्यानी काही मुळात 'बीटा-केसोमॉर्फीन-७' नेच काही अपाय होत नाही असं नाही म्हंटलंय. म्हणजे ए१ दूधामुळे शरीरात तयार होणाऱ्या 'बीटा-केसोमॉर्फीन-७' चं कुठल्यातरी प्रकाराने निराकरण होतं का? तुम्ही दिलेल्या संदर्भात, २ आणि ११, कदाचित ही विस्तृत माहीती असेल पण ते सदस्यानाच उपलब्ध आहेतसं दिसतंय त्यामुळे वाचता नाही आले.
२. लोणी आणि पॅक बंद बटर: या दोन्हिंच्या स्निग्ध पदार्थात काय फरक असतो? की विरजणाच्या क्रियेने स्निग्ध पदार्थांचा फारसा कायापालट होत नाही? सर्रासपणे लोणी = बटर म्हणतात त्यामुळे ही शोधाशोध गुगलवर करणं सोपं नसावं बहुदा.
३.
- एक वर्ष? अर्थात अक्षरश: नाही पण बराच काळ लागेल म्हणताय ते कळलं. पण का? निदान मानांकनाप्रमाणे तरी गाईच्या दूधात ३.२% आणि म्हशीच्या दूधात ५% स्निग्ध द्रव्यं हवीत. हा फरक काही फार नाहीये.
४.
: ही टक्केवारी आहे ती कुठल्याही दूधाला, गाईचं असो वा म्हशीचं, लागू होते का? (तुमचा या विषयाचा अभ्यास दिसतोय त्यामुळे बहुदा तुम्हाला हे माहीत असावं म्हणून गुगलवर शोधण्याआधी तुम्हाला विचारतोय!)
.
>>१. 'बीटा-केसोमॉर्फीन-७' शरीराला अपायकारक आहे असा निष्कर्श काही संशोधकानी काढला होता. त्यानंतर EFSA ने २००९ मधे निष्कर्श काढला की ए१ दूधाच्या सेवनाचा आणि डायबेटीस वगैरें होण्याचा काहीही संबंध नाही. पण त्यानी काही मुळात 'बीटा-केसोमॉर्फीन-७' नेच काही अपाय होत नाही असं नाही म्हंटलंय. म्हणजे ए१ दूधामुळे शरीरात तयार होणाऱ्या 'बीटा-केसोमॉर्फीन-७' चं कुठल्यातरी प्रकाराने निराकरण होतं का? तुम्ही दिलेल्या संदर्भात, २ आणि ११, कदाचित ही विस्तृत माहीती असेल पण ते सदस्यानाच उपलब्ध आहेतसं दिसतंय त्यामुळे वाचता नाही आले.
तो संदर्भ गूगल केल्यास पीडीएफमध्ये डाउनलोड करता येईल. पण अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर जे अभ्यास झाले ते आधी उंदरांवर झाले. तेव्हा त्यांतून पचनक्रियेदरम्यान BCM७ तयार होतं हे सिद्ध झालं होतं. पण मानवी चाचण्यांमध्ये कधी ते तयार होतंय हेच ठामपणे सिद्ध करता आले नाही, तर कधी आतड्यांमधून ते रक्तात शोषलं जाऊ शकतं हे सिद्ध करता आलं नाही.
>>२. लोणी आणि पॅक बंद बटर: या दोन्हिंच्या स्निग्ध पदार्थात काय फरक असतो? की विरजणाच्या क्रियेने स्निग्ध पदार्थांचा फारसा कायापालट होत नाही? सर्रासपणे लोणी = बटर म्हणतात त्यामुळे ही शोधाशोध गुगलवर करणं सोपं नसावं बहुदा.
पॅकबंद बटर दूध-दही-ताक अश्या प्रक्रियांमधून जात नाही. दुधातलं फॅट सेंट्रीफ्युगल मशीन वापरून वेगळं केलं जातं आणि त्यातून हे बटर तयार करतात.
त्यामुळे लोण्याचा वास वेगळा असतो. अर्थात याची फॅटी ॲसिड प्रोफाइल वेगळी असणार. पण त्याबद्दल मला अधिक माहिती नाही.
>>पण का? निदान मानांकनाप्रमाणे तरी गाईच्या दूधात ३.२% आणि म्हशीच्या दूधात ५% स्निग्ध द्रव्यं हवीत. हा फरक काही फार नाहीये.
मी विनोद केला. पण गायीच्या दुधातली साय नीट जमा करता न येणे, ती पातळ असणे इत्यादी, ही मी माझ्या स्वयंपाकघरात नोंदवलेली निरीक्षणं आहेत. त्याला काही शास्त्रीय आधार नाही.
>>दुधाच्या चरबीचा अभ्यास केला, तर त्यात साधारण...
इथे ३-८ % चरबी म्हणलं आहे. यात गायीचं आणि म्हशीचं दूध दोन्ही येतात.
homogenized
>>पण गायीच्या दुधातली साय नीट जमा करता न येणे,...
पिशवीबंद गायीचे दूध साधारणपणे homoginised असते. रंग आणि गंध जाणवू नये यासाठी हा उपद्व्याप डेरी वाले करतात म्हणे. पण homoginised दुधाला साय सुटी होणे थांबते. गवळ्याच्या गायीच्या दुधाला बऱ्यापैकी साय जमते.
म्हशीचे दूध homoginised बघितले नाही. साय हीच USP असल्याने करत नसावेत.
#४ - माझा प्रश्न...
.....sataturated fats / MUFA / PUFA च्या बद्दल होता. ही प्रमाणं गाईच्या आणि म्हशीच्या दूधात सारखीच असतात का? असो. बाकी स्पष्टीकरणासाठी धन्यवाद.
माहितीपूर्ण लेख. बऱ्याच शंका
माहितीपूर्ण लेख. बऱ्याच शंका दूर झाल्या.
दुधातून फॅट काढून स्कीम मिल्क म्हणून विकले जाते त्यामुळे तुप कमी किमतीला विकणे शक्य होते.
लेख आवडला.
(नेहमीप्रमाणे) किचकट संकल्पना मराठीत चांगल्या समजावून सांगितल्या आहेत; आणि ग्राहकांसाठी महत्त्वाच्या विषयाला हात घालण्याबद्दल विशेष आभार.
दुग्धव्यवसाय फारसा आकर्षक
दूधामधल्या घटकांची शास्त्रीय माहिती उपयुक्त वाटली.
ए२ दूधाचे मार्केट नेमके किती ते माहित नाही. पण भारतात एकंदर दुग्धव्यवसाय फारसा आकर्षक नाही किंवा त्यात भरपूर आव्हाने असावीत. (अगदी विक्री साखळीतल्या शेवट्च्या विक्रेत्यांसाठी सुद्धा), त्यामुळे कदाचित अशा क्ल्युप्त्या दूध व्यावसायिक वापरत असावेत.
अमूल यात दादा आहे. साधारण +४०,००० कोटीची वार्षिक उलाढाल आहे. पण अमूल खाजगी व्यवसाय असल्याने त्याची तपशीलवार आकडेवारी उपलब्ध नाही. त्यामुळे अमुलच्या "देशी ए२ काउ मिल्कचा" (https://amul.com/products/amul-cow-a2-milk-info.php) उलाढालीतला हिस्सा किती? आणि एकंदर व्यवसाय किती आकर्षक आहे याची नेमकी कल्पना नाही.
अमूलने गेल्या काही वर्षात बेकरी व्यवसायात घुसखोरी केल्यावर, ब्रिटानिया ही बेकरी व्यवसायातली दादा कंपनी, छोट्या स्केलवर, भारताच्या काही भागात या व्यवसायात नशीब आजमावता येते का याची चाचपणी करते आहे. पण खूप मोठे आव्हान आहे. फ्रेंच कंपनी डॅननने या व्यवसायातून २०१८ मधून भारतातून माघार घेतली आहे (https://www.youtube.com/watch?v=4mBiFEspcIM - या क्लिप मध्ये २०१८ ची भारतातल्या दूधाची आकडेवारी आहे.). मुंबईची गोदरेज अग्रोव्हेट (जर्सी ब्रँड - साधारण १,१०० कोटीची वार्षिक उलाढाल) पण गेली काही वर्षे या व्यवसायात हातपाय मारते आहे. पण म्हणावा तसा अजून नफा नाही आहे. काही तिमाहीत अजूनही मधून मधून ऑपरेटींग लॉसेस ते दाखवतात. २,००० कोटींची उलाढाल असलेली पराग मिल्क नावाची अजून एक पब्लिक लिस्टेड कंपनी आहे (गोवर्धन दूध आणि तुपाचा ब्रँड, गो हा ताक, चीज, बटरचा ब्रँड मुंबईत डी-मार्टमध्ये मिळतो), त्यांच्या वाटचालीतही बरेच अडथळे आहेत.
हातसन डेयरी
ही अजून एक दाक्षिणात्य कंपनी.
येस..
६,००० कोटींची उलाढाल असलेली दक्षिण भारतातली ही कंपनी (https://www.hap.in/) - आरोक्य हे दूध आणि दह्याचे ब्रँड आणि अरूण हा आईस्क्रीमचा ब्रँड असेलेली कंपनी बर्यापैकी तग धरून आहे.
उत्तम लेख
झिरो बजेटवाले पाळेकर आणि त्यांचे पूर्वसुरी यांनी मध्यंतरी उच्छाद मांडला होता.
देशी गायीचे दूध चढ्या भावाने विकायला काहीच हरकत नाही कारण व्यवसाय आतबट्टयाचा होण्यात अर्थ नाही. परंतु देशी गायीच्या दूधाच्या विक्रीला प्रिमियम देताना झालेली फसवणूक चीड आणणारी आहे. उदा. देशीगायींना खायला दिले जाणारे हार्मोन्सयुक्त पशुखाद्य. म्हणजे ज्या गोष्टीसाठी प्रिमियम द्यायचा तिथेच फसवणूक करायची.
हा मुद्दा महत्त्वाचा आहे. मार्केटिंग करताना काहीच्या काही क्लेम केले जातात. घटक पदार्थांचे फायदे हे क्लेममध्येच वापरायचे तर मी तर पाण्याची मोकळी रिकामी बाटलीही जीवनरक्षक आहे असे म्हणेन. कारण मोकळ्या बाटलीत हवा आहे आणि हवेत ऑक्स्जीजनचे प्रमाण असतेच त्यामुळे ती रिकामी बाटली तर साक्षात जीवनदायिनी आहे. आजकाल प्रत्येक खाण्याच्या उत्पादनात शरीरशुद्धी, रक्तशुद्धी, मूत्रशुद्धी, मलशुद्धी, वातशुद्धी करण्याऱ्या पदार्थांची जाहिरात करण्याची काय खुमखुमी आहे. पदार्थ संधीवातापासून एचायव्हीपर्यंत सगळ्यावरच गुणकारी असतो!!! क्लेम करताना तारतम्य बाळगायलाच हवे. उदा. ह्या गुळाचे क्लेम्स पाहाना.
प्रामाणिक मार्केटिंग
प्रामाणिक मार्केटिंग असे काही नसतो हो! प्रामाणिक म्हणजे काय? गारढोण भातासोबत थंड पडलेले माशाच्या प्रेताचे तुकडे की स्वादिष्ट जपानी सुशी ?
मार्केटिंग म्हणजे ग्राहकांच्या मनातलाच खोटेपणा आकर्षक भाषेत पुढे मांडणे. चांगुलपणा किंवा फायदे दाखवणारे निवडक रिव्यू, प्रॅाडक्टची जाहिरात करणारे कलाकार, त्या प्रॅाडक्टमुळे सर्वत्र दिसणारे आरोग्य, संपत्ती, आनंदीआनंद हे प्रामाणिकपणे दाखवता येत नाही. आले तर त्याला मार्केटिंग म्हणत नाही.
उत्तम लेख.
एकदम मजबूत लेख. मराठीत वैज्ञानिक माहिती लिहतांना लेखकाला अनेक दिव्यांना सामोरे जावे लागते आणि कधीकधी लेख जटील होउन बसतो. तुम्ही माहिती आणि शैलीचा ओघ फार कन्सिस्टंट ठेवलाय. बाकी मराठीतले 'प्रथिन' आणि इंग्रजीतले 'protein' ह्या शब्दांचे प्रचलित वाच्यार्थ जरा तोकडे आहेत. जनरल पॉप्युलेशनमध्ये प्रथिन वा प्रोटीन म्हटले की हे काहीतरी 'डायेट प्लॅन' संबधीत प्रकरण आहे असा अर्थ ध्वनित होतो. ह्या शब्दांच्या आसपास मोठ्या प्रमाणावर बायोलॉजीकल वाचन केलेले असेल किंवा डॉक्युमेंटर्या पाह्यल्या असतील तर प्रोटीन शब्द किती मोठ्या अवकाशातला आहे ते कळते आणी मराठी वाचनात प्रथिन शब्द आल्यावर मुळ विषयही आकलनास सोप्पा होतो. तुमच्या लेखात आलेला प्रथिन शब्द मोठ्ठ्या अवकाशातला आहे. एरव्ही डायेटप्लॅनवाल्यांचे प्रोटीन म्हटले की डाळींबीची उसळ आठवते.
?
डाळिंबीच्या उसळीत नक्की काय वाईट आहे?
(आपल्याला तर आवडते, ब्वॉ!)
ओके
नाही डाळींबीच्या उसळीत काही वाईट नाही. तिच्यात विपुल प्रमाणात प्रथिने उपलब्ध असतात.
??
कोठल्याही द्विदल धान्यात असणारच ना?
मला फरक वाटला होता
दही लावून त्या पासून बनलेले तूप हे उत्तम दर्जाचे असणार असे मला वाटत.
काही घरात मी दुधावरची साय जमा करून ठेवतात आणि त्याचे तूप काढतात. असे बघितले आहे.
पण दही बनण्याची प्रक्रिया वेगळी असते तिथे वेगळी रासायनिक क्रिया होते त्या मुळे दही जुने झाले तरी त्याचा कुबट वास येत नाही.
पण साय जमा करून ठेवली जाते तिथे वेगळी रासायनिक क्रिया घडत असावी कारण त्या साठवलेल्या sayi च वास खूप भयंकर येतो.
थोडा कुजकट येतो.
कुजण्याची प्रक्रिया चालू असावी असे वाटते
फक्त फ्रिज मध्ये असल्या मुळे त्याची तीव्रता जाणवत नाही.
अकाल मृत्यु
अकाल मृत्यू होण्याचे प्रमाण आता वाढले आहे.
माझ्या मते त्याला वर्गीकरण हे कारण आहे.
मिनरल,व्हिटॅमिन,प्रथिने ह्यांना वेगळे केले.
पण हे सर्व मिळून येतात तेव्हाच ते फायद्याचे असतात.
मग विशिष्ठ व्हिटॅमिन च्या गोळ्या.पण ते व्हिटॅमिन एकटेच असते त्याचे बाकी जोडीदार नसतात.
शरीर सरळ कचऱ्यात फेकून देते.
Kk. पासून अनेक लोक ही सर्व नियम पाळत होती ते अकाली गेले.
त्याला हेच कारण आहे.
पाहिले आपण जसे होतो तसेच रहा आणि तोच आहार घ्या.
आहार हा खूप क्लिष्ट विषय आहे 4 ते 5 वर्ष कोर्स करून कोणी सर्व ज्ञानी होत नाही
मानवी आहाराचा विषय लाखो वर्ष जुना आहे आणि अनेक अनुभव वर उभा आहे
पश्चारायझेशन
'पहिले' आपण दूध पश्चाराइझ न करता प्यायचो तेव्हा लोक अकाली ट्युबरक्यूलॉसिस होऊन मरायचे.
? (कुतूहल)
पाश्चराइझ न केलेले दूध आणि क्षयरोग यांच्यात नक्की काय कार्यकारणभाव? समजले नाही.
Mycobacterium Bovis
https://en.wikipedia.org/wiki/Mycobacterium_bovis
हल्ली 'आधी होतं तेच थोर होतं' अशा प्रकारच्या रोमँटिक कल्पनांमुळे अनेक प्रगत देशांतही लोक रॉ मिल्क म्हणजेच पाश्चराइझ न केलेलं दूध घेऊ लागले आहेत. त्यामुळे काही प्रगत देशांत टीबी रुग्ण पुन्हा सापडले आहेत. नीरसं दूध नुसतं उकळल्याने (म्हणजे उतू जाईपर्यंत) निर्जंतुक होत नाही. कमीत कमी अर्धा तास एका विशिष्ट तापमानाला ते उकळावं लागतं. आणि उतू जाऊ नये म्हणून तापवायची वेगळी व्यवस्था (डबल बॉयलर इत्यादी) करावी लागते.
ट्युबरक्यूलॉसिस अकालीच असतो ना?
घरच्या गुरांचे, माहितीच्या निरोगी माणसांनी काढलेले दूध असेल तर असे होण्याचे काही कारण दिसत नाही. धारोष्ण दूध माझ्या आजोळी फक्त घरचेच प्यायले जायचे.
गवळ्याचे दूध सर्वसाधारणपणे उकळल्याशिवाय वापरले जाताच नाही.
खरे तर वर्गीकरण च चूक
कोणताही आहार घेतला तरी हवं ते स्वीकारणे आणि नको ते बाहेर टाकणे ही यंत्रणा शरीरात नैसर्गिक रित्या आहे
अतिरेक झाला तर ती यंत्रणा योग्य काम करत नाही.
आहार तज्ञ,ते करत असलेले वर्गीकरण,काय खा काय खावू नका हे सल्ले हेच व्यापारीकरण आहे.
भारतीय लोकांना फुल गोबी सोडून ब्रॉक्कली खायला सांगतील.
शेंगदाणे सोडून बदाम खायला सांगतील.
शेवटी काय स्वीकारायचे आणि काय नाकारायचे हे शरीर ठरवत.
आणि ती क्रिया आपल्या हातात नाही.
विविध जिन्स,आणि बाकी यंत्रणा ते ठरवत असतात.
मी दोन लिटर नीरस दूध एका वेळेस रोज पित असे .ते पण म्हैसी चे
आज ५२ वर्ष वय आहे .
ना मधुमेह,ना बीपी, ना पोटात गॅस काही समस्या नाहीत.
आणि ते नीरस दूध खूप वर्ष मी पिले आहे.
आता शहरात असल्या मुळे शक्य नाही.
मानवी शरीर खूप जटिल आहे
त्या मुळे आवल्यात c vitamins आहे ते फळ खा हा सल्ला च फालतु आहे
आवळा खूप लोकांचे शरीर स्वीकारणार च नाही.
C vitamins साहित त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल
दोन लिटर?
>>मी दोन लिटर नीरस दूध एका वेळेस रोज पित असे .ते पण म्हैसी चे.
हा माझ्यासकट माझ्या परिसरातील सर्व मर्त्य मानवांना "अतिरेक " वाटेल.
आपण पैलवान आहात का? होता का? होण्याची इच्छा होती का?
.
(धागा वर आणण्याकरिता तथा जुने प्रतिसाद दृश्य करण्याकरिता.)