आमचा गणेशोत्सव-काही आठवणी-१

आमचा गणेशोत्सव-काही आठवणी-१

गणपती

मी, माझा धाकटा भाऊ अभय, गल्लीतील काही मित्र आणि इतर मुलांनी मिळून सुमारे ५० वर्षांपूर्वी कल्याममध्ये एक मंडळ स्थापन करून सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. नोकरी करणाऱ्या काही मोजक्या मोठ्या व्यक्तींचा अपवाद सोडला तर मंडळाचे बहुतांश कार्यकर्ते शाळा-कॉलेजमध्ये शिकणारी किशोरवयीन मुले होती. श्री उत्सव मंडळ असे या मंडळाचे नाव. कल्याण पश्चिमेकडील अहिल्यादेवी होळकर चौकात (अहिल्याबाई चौक) त्यावेळी असलेल्या मंगेश लॉजच्या (सुकेणकर वाडी) गल्लीत या मंडळाचा सार्वजनिक गणपती सुरु केला गेला. गल्लीतील पूर्वीच्या फडके वाड्यात बाहेरच्या बाजूला एक शेंदूर फासलेला दगड फार पूर्वीपासून होता. त्याच्यावर छोटी घुमटी बांधलेली होती. तो नेमका कोणता देव होता हे माहीत नाही. परंतु परिसरातील लोक त्याला देव मानून कित्येक वर्षे त्याची पूजा करीत असत व सायंकाळी दिवा लावीत असत. फडके वाडा डेव्हलप होऊन तेथे इमारत बांधली गेली तेव्हा बिल्डरने ते देवस्थान पाडून न टाकता नव्या इमारतीतही ते बाहेरच्या बाजूस, नव्याने बांधून कायम ठेवले. तीन बाजूंनी भिंती व पुढे लोखंडी ग्रिल असे सुमारे १२ बाय १५ फूट आकाराचे ते नवे देऊळ होते. या छोटेखानी देवळातच आम्ही हा गणेशोत्सव सुरु केला.

या देवळाला लागूनच इमारतीच्या तळमजल्यावर एका मोठ्या हॉलमध्ये पूर्वी जनसंघाचे व नंतर भारतीय जनता पार्टीचे कल्याण शहर कार्यालय होते. रात्री जागून गणपतीच्या सजावटीचे काम याच कार्यालयात केले जाई व मंडळातील मुलांना विश्रांती घेण्यासाठीही हे कार्यालय उपलब्ध असायचे. मंडळ स्थापन करणाऱ्या आम्ही मंडळींनी सुमारे आठ-दहा वर्षे गणेशोत्सवाचे आयोजन केले. पुढे नोकऱ्या लागल्यावर व लग्ने झाल्यावर या संस्थापक कार्यकर्त्यांचे मंडळात येणे कमी झाले. त्यांची जागा नव्या पिढीतील मुलांनी घेतली. आजही गल्लीतील त्याच जागी मंडळाचा गणेशोत्सव साजरा केला जातो.

आम्ही मंडळाचे काम करताना खूप भांडायचो पण तरीही एकदिलाने मनापासून कामही करायचो. मंडळाची सभासद वर्गणी अगदी माफक म्हणजे ५० रुपये होती. भांडणे व्हायची तेव्हा आमच्यापैकी बहुधा प्रत्येकाने रागाच्या भरात मंडळाच्या सभासदत्वाचा राजीनामा दिला. परंतु आमच्या या मंडळाची खासियत अशी होती की येथे कोणालाही रागावून बाहेर पडण्याची मुभाच नव्हती. त्यामुळे मंडळाचे सभासद मंडळ सोडून कधी बाहेर गेले नाहीत. काळानुरूप सभासद बदलत गेले व त्यांच्यात वाढच होत गेली.

आम्ही मंडळ चालवायचो तेव्हा आमची वये लहान होती व नीती-अनितीची चाड बाळगण्याएवढी प्रगल्भता नव्हती. त्यामुळे त्यावेळी मंडळाचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आम्ही प्रसंगी चोर्याा-माऱ्या आणि लांडीलबाडी केली हे आता आठवलं की मनाला बोचणी लागते. पण विचार करता असेही वाटते की त्यावेळचे आमचे वागणे त्या वयानुसार अगदीच चुकीचे नव्हते. प्रत्येक माणूस वयाच्या त्या टप्प्यावर, नंतर अयोग्य वाटावे, असे वर्तन करतच असतो. अशा वर्तनातूनच माणसाची जडण-घडण होत असते. तशी ती आमचीही झाली. किंबहूना मी तर म्हणेन की आम्ही त्या वेळी तसे वागलो व ते चुकीचे होते याची नंतर जाणीव ठेवली म्हणूनच आम्ही भावी आयुष्यात ‘चांगले’ होऊ शकलो.

गणेशोत्सवाच्या त्या आठ-दहा वर्षांत घडलेले काही प्रसंग व घटना एवढया अद्‌भुत आणि विलक्षण होत्या की जणू काही ते सर्व काल-परवाच घडले असावे एवढ्या त्यांच्या आठवणी ताज्या आहेत. यातील काही प्रसंग व घटना मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. परंतु त्या सर्व एकदम लिहिल्या तर तुम्हालाही ते वाचायला कंटाळवाणे होईल. म्हणून आजपासून पुढील काही दिवस दररोज एक अशा प्रकारे हे प्रसंग व घटना मी लिहिणार आहे.

आज पाहू या भटजीचा किस्सा :

आम्ही हा गणेशोत्सव करण्याचे ठरविल्यावर आमच्या आईने आम्हाला बजावले. ‘नुसता थिल्लरपणा करू नका. गणपती आणणार आहात तर त्याची रोज रीतसर पूजा व दोन वेळेला आरती व्हायला हवी. ते जमणार असेल तरच गणपती आणा’.

आईचे म्हणणे आम्हाला पटले. पण रोज पूजा व आरती होईलच याची खात्री कोणी द्यायची? ती जबाबदारी घ्यायला कोणी तयार होईना. मग आम्ही एक शक्कल लढविली. आमच्या ओळखीचे दीक्षित नावाचे एक पोस्टमन होते. गणपतीच्या दिवसांत ते नोकरी सांभाळून भटजी म्हणूनही काम करायचे. आम्ही त्यांना मंडळाच्या गणपतीची केवळ पूजा सांगण्याचे नव्हे तर रोज पूजा व दोन वेळा आरती करण्याचे काम ‘घाऊक’ पद्धतीने दिले. बरेच आढवेढे घेतल्यावर ते हे काम करायला तयार झाले. परंतु त्यांनी या कामाची दक्षिणा म्हणून जी रक्कम सांगितली ती आम्हाला खूप जास्त वाटली. त्याऐवजी आम्ही त्यांना गणपतीसमोर १० दिवस जेवढे पैसे दर्शनाला येणारे लोक टाकतील ते सर्व दक्षिणा म्हणून देण्याचा पर्याय दिला. त्यांनी तो आनंदाने स्वीकारला.

आम्ही नवखे होतो व गणपतीसमोर किती पैसे गोळा होऊ शकतात याची आम्हाला जराही कल्पना नव्हती. परंतु गणपतीसमोर पैसे टाकण्यासाठी ठेवलेला मोठा थाळा रोज नोटा वा नाण्यांनी ओथंबून भरून जात असल्याचे पहिल्या दोन-तीन दिवसांतच आमच्या लक्षात आले. १० दिवसांत जमणारे एवढे पैसे दिले तर ती रक्कम दीक्षित दक्षिणा म्हणून मागत होते त्याहून कितीतरी जास्त होईल, हे आम्हाला जाणवले. आमची नियत लगेच फिरली. १०व्या दिवशी दीक्षित यांना पैसे द्यायची वेळ आली तेव्हा आम्ही मुद्दाम भांडण उकरून काढले व १० दिवस देवापुढे जमतील तेवढे सर्व पैसे देण्याचे मुळात कबूल केलेच नव्हते, असा आम्ही बेमालूमपणे कांगावा केला..
दीक्षित यांनी आधी दक्षिणा म्हणून जेवढी रक्कम मागितली होती त्याहून जास्त ५० रुपये आम्ही बळजबरीने त्यांच्या हातात कोंबले व ‘घ्यायचे तर एवढे घ्या. नाही तर तेही मिळणार नाहीत’, असा वरून दम दिला. कधी कोणालाही उलटूनही न बोलणाऱ्या बिच्चाऱ्या दीक्षितांचा नाईलाज झाला व आम्ही ‘चोरावर मोर’ठरलो. हा प्रकार घरी कळल्यावर आमच्या आई-वडिलांनी आमची मनसोक्त कानउघाडणी केली. या प्रसंगातून आम्ही शहाणे झालो आणि त्याच्या पुढच्या वर्षापासून गणपतीची पूजा वेळी-अवेळी का होईना पण आमची आम्ही करत राहिलो!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

गल्लीतील पूर्वीच्या फडके वाड्यात बाहेरच्या बाजूला एक शेंदूर फासलेला दगड फार पूर्वीपासून होता. त्याच्यावर छोटी घुमटी बांधलेली होती. तो नेमका कोणता देव होता हे माहीत नाही. परंतु परिसरातील लोक त्याला देव मानून कित्येक वर्षे त्याची पूजा करीत असत व सायंकाळी दिवा लावीत असत. फडके वाडा डेव्हलप होऊन तेथे इमारत बांधली गेली तेव्हा बिल्डरने ते देवस्थान पाडून न टाकता नव्या इमारतीतही ते बाहेरच्या बाजूस, नव्याने बांधून कायम ठेवले. तीन बाजूंनी भिंती व पुढे लोखंडी ग्रिल असे सुमारे १२ बाय १५ फूट आकाराचे ते नवे देऊळ होते. या छोटेखानी देवळातच आम्ही हा गणेशोत्सव सुरु केला.

घ्या! म्हणजे, जनजागृती करण्यासाठी टिळकांनी मुळात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. (जनजागृतीकरिता जन गोळा करण्यासाठी जनांतील उत्सवप्रियतेचा त्यांनी उपयोग करून घेतला असेलही, परंतु, उत्सवप्रियतेला चालना हा मूळ उद्देश खचितच नसावा; जनजागृती हा असावा.) आणि इथे, कोठलातरी शेंदूर फासलेला रँडम दगड, ज्याला (कोठला, कोण जाणे, परंतु) देव मानून लोक पुजत होते, आणि नवीन इमारत बांधताना बिल्डरानेसुद्धा जो काढून न टाकता तसाच ठेवून ज्याभोवती मंदिर बांधले होते, नेमक्या त्याच मंदिरात आपला सार्वजनिक गणेशोत्सव थाटून तुमच्या मंडळाने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मूळ उद्दिष्टालाच हरताळ फासला, म्हणायचा की! म्हणजे, जनजागृती राहिली बाजूला, उलट अंधश्रद्धा आणि उत्सवप्रियता दोहोंना एकसमयावच्छेदेकरून खतपाणी!

टिळकांच्या आत्म्यास काय वाटले असेल?

----------

तळटीपा:

टिळक आपल्या थडग्यात गरागरा फिरत असतील, असे लिहिणार होतो, परंतु, थडग्यात गरागरा फिरणारे टिळक१अ ते वेगळे, हे वेळीच लक्षात आल्यामुळे आवरते घेतले. असो चालायचेच.

१अ कविवर्य नारायण वामन, उपाख्य 'रेव्हरंड'.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही गणेशोत्सव सुरू केला तेव्हाची आमची वये पाहता आमची प्रेरणा जनजागृतीहून उत्सवप्रियता हिच अधिक होती, हे तुमचे म्हणणे आता पश्चातबुद्धीने मीही नाकारणार नाही. पण तुम्ही म्हणता तसा आम्ही टिळकांच्या उदेशाला हेतूपुरस्सर हरताळ फासला, हे मात्र मला मान्य नाही. आम्ही त्या छोटेखानी मंदिरात गणेशोत्सव सुरू केला तो तेथील शेंदूर फासलेल्या निनावी देवावरील अंधश्रद्धात्मक भक्तीपोटी नव्हे तर ती जागा रिकामी व सोयीची होती म्हणून. त्यामुळे `टिळक आपल्या थडग्यात गरागरा फिरत असतील, असे लिहिणार होतात ते वेळीच आवरते घेतलेत तेच बरे झाले. परिचित मला `तिरसटराव` म्हणतात. पण तुमच्या तिरसटपणाला माझा सलाम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण तुम्ही म्हणता तसा आम्ही टिळकांच्या उदेशाला हेतूपुरस्सर हरताळ फासला, हे मात्र मला मान्य नाही.

अर्थात! हेतुपुरस्सरतेचा आरोप मीदेखील तुमच्यावर केलेला नाही. परंतु, अभावितपणे का होईना, हरताळ फासला गेला, एवढेच म्हणायचे आहे.

परिचित मला `तिरसटराव` म्हणतात. पण तुमच्या तिरसटपणाला माझा सलाम!

तिरसटाचा पोवाडा तिरसटानेच गावा, म्हणतात. सबब, आदाब अर्ज़ है, मियाँ! Smile

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परिचित मला `तिरसटराव` म्हणतात.

मग योग्य ठिकाणी आला आहात! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेखन करणाऱ्या लेखकाने कधी काय अनुभव घेतला .
गणेश उस्त्वाचा त्याची तारीख टाकावी आणि स्वतः ते तेव्हा किती व्हायचे होते ते त्याचा पण उल्लेख करावा.
ह्यांचे सर्व लेख कृत्रिम वाटत आहेत त्या मध्ये जिवंत पना नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0