मल्ल्या

#ललित #ट्रॅश #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२२

मल्ल्या

- तुकाराम जमाले

आता मैदानाचा संबंध फक्त कडेला असलेल्या ट्रॅकवर चालण्यापुरताच असतो. मैदानावर, बहुतेक वेळा ज्यांचा खेळ पाहवत नाही असे, आपापली पोटं सांभाळत क्रिकेट खेळणारे, हौशी लोक असतात. ओळीने पाच-सहा बॉलर एका बॅट्समनला बॉलिंग करतात. रनिंग, फील्डिंग, विकेटकीपिंग ह्याव्यतिरिक्त चालणारं हे क्रिकेट मी इथं आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलं. त्या मानाने रात्री नऊनंतर इथं येणं जास्ती सोयीचं असतं, गर्दी नसते अन निवांत चालणं होतं. पण काही दिवसांपूर्वीच मैदानात चारी कोपऱ्यात चार मोठ्या 'फ्लड लाईट्स' बसवल्याने डोळ्यांना नको वाटणारा भडक उजेड सर्वत्र भरलेला असतो. काही लोक बॅडमिंटन खेळत असतात, काही आपल्या लहानग्यांना सायकल शिकवीत असतात.

एका रात्री असाच फिरत होतो अन आश्चर्य म्हणजे कधी न पाहायला मिळणारी खोखोची मॅच सुरू होती. दोन्ही टीम कसलेल्या अन नियमित खेळणाऱ्या असाव्यात. लांब शिट्टी वाजली, अन पहिले तीन खेळाडू मैदानात उतरले. एकेक मिनिट टिकून त्यातले दोन बाद झाले. 'एक नंबर' हा तिसरा खेळाडू टिकून होता अन काही केल्या त्यांना सापडत नव्हता. उंचीला सर्वात कमी पण विलक्षण चपळाईने तो सर्वांना चकवत होता. रिंगण, तीन-सात-नऊ , साखळी अशा विविध प्रकारे तो अत्यंत आत्मविश्वासाने मैदानात वावरत होता. सर्वसाधारणपणे अशा वेळी एकटा पळणारा दमून २-३ मिनिटांत बाद होणं अपेक्षित असतं, पण इथं ह्या पठ्ठ्यानं दुसऱ्या टीमच्या नऊही जणांना जेरीस आणलं होतं. 'ह्याला बाद करण शक्य नाही,' हे त्या नऊही जणांच्या देहबोलीतून स्पष्ट जाणवत होतं. शेवटची शिट्टी झाली अन डाव संपला. घामानं भिजलेल्या, अन बारीक हसू चेहऱ्यावर असणाऱ्या 'एक नंबर'भोवती सगळे जमा झाले होते. मी बराच वेळ पाहत राहिलो. नेहमी दहा राउंड्सचा आजचा वॉक दुसऱ्या राउंडवरच ह्या मॅचच्या निमित्ताने थांबला.

***

आज आठवलं तरी नवल वाटावं इतकी एखादी गोष्ट आपल्या आयुष्यातला काळाचा एक तुकडा संपूर्णपणे व्यापून टाकते. इयत्ता पाचवी ते आठवी, खोखोनं वेड लावलं होतं. दर वर्षी पावसाळी सामने होत, आंतरशालेय, तिथून पुढे तालुका, जिल्हा व विभाग पातळीवर. ह्या सामन्यांची तयारी चांगली पाचसहा महिने आधीपासून चाले. पहाटे ग्राउंडला चकरा, साइड सिट-अप्स, असा वॉर्म अप झाला की मग प्रॅक्टिस सुरू होई ती सकाळी आठ वाजेपर्यंत. ह्या सामन्याची आम्हा सर्वांना प्रचंड उत्सुकता असे. त्याचे फॉर्म्स भरताना पासपोर्ट साईझ फोटो काढावे लागत, आदल्या दिवशी व्यवस्थित हेअरकटिंग, पावडर, वगैरे मेकअप करून आम्ही ते 'ब्लॅक अँड व्हाईट' फोटो काढायला गावातल्या एकमेव स्टुडिओमध्ये गर्दी करायचो. स्थानिक २-३ शाळांमध्ये आमचा संघ दर वर्षी जिंकत असे. सतत विजयी होणारे आम्ही खरं तर 'वासरात लंगडी गाय शहाणी' असा प्रकार होता, आणि मग तो दिवस आला. जवळच्या एका लहान गावातील संघ खूप चांगला खेळतो आणि ह्या वर्षी तालुका पातळीवर सिलेक्शनसाठी आमच्यासोबत फायनल्समध्ये खेळणार असं कळलं.

गावातील तिन्ही शाळांतील शेकडो विद्यार्थी, शिक्षक आणि आणि बाहेरचे लोक ह्यांची जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदानावर प्रचंड गर्दी. लाल मातीवर पांढऱ्या फक्कीने ओढलेल्या रेषा, चारी बाजूंनी संघाला प्रोत्साहित करणारे प्रेक्षक आणि मुख्य म्हणजे आमची केवळ मुलींची तुकडी असल्याने सहसा न दिसणाऱ्या मुली! ओरडणारे प्रेक्षक, खेळताना उडणारी लाल धूळ, अंपायरच्या शिट्ट्यांचा आवाज - सगळं भारून टाकणारं वातावरण. शाळेचे नाव व नंबर लिहिलेल्या बनियन्स, शॉर्ट पँट्स, नीकॅप, वगैरे तयारीने मैदानात उतरताना अंगावर रोमांच उभं राही. आम्ही तसं बऱ्यापैकी खेळणारे होतो आणि पहिले तीनजण नऊपैकी पाच मिनिटं सहज टिकत असू. आमचा संघ सहज तालुका पातळी गाठणार ह्याबाबत कुणालाच शंका नव्हती. खेळ संपल्यावर आम्हाला ब्लॅंकेटमध्ये गुंडाळून थोपटायला, काकडी, लिंबूपाणी, वगैरे घेऊन आमचे पीटीचे सर सज्ज होते.

२, ३, ४… पाच मिनिटांचा खेळ संपला तरीही मल्ल्या हा त्यांच्या पहिल्या तिघांमधील खेळाडू बाद व्हायचं कुठलंच लक्षण दिसेना. आम्ही मल्ल्यावर फोकस केलाय ह्या विचारात गाफील असलेल्या एका प्लेअरला बेसावध गाठून अचानक डाइव्ह करत आमच्या एकाने बाद केलं आणि नवव्या मिनिटात अजून एकाला मोठ्या मुश्किलीने बाद केलं. 'आमचा संघ तालुक्यात सर्वोत्तम आहे अन हा सामना जिंकणं ही फक्त औपचारिकता आहे, असं गृहीत धरलेल्या आम्हा सर्वांनाच हा मोठा अनपेक्षित धक्का होता.

ज्या प्रकारे समोरचा संघ खेळत होता, त्यावरून आमचं हरणं जवळपास निश्चित होतं. अहंकाराचे कपडे फाटायला लागले की माणूस अगतिक होऊन कमरेखाली वार करतो. 'मल्ल्या मल्ल्या भूप', 'ए माकड', वगैरे आरडाओरडा आमच्या शाळेची पोरं करू लागली. मल्ल्याचा फोकस मात्र अजिबात ढळत नव्हता अन ह्याने आमच्या पोरांना अजूनच चीड येत होती. मला मात्र मनापासून कळलं होतं की आमच्या तुल्यबळ नाही तर अनेक पटींनी चांगल्या संघाशी आपली गाठ पडलीय आणि मी त्याचा खेळ मंत्रमुग्ध झाल्यासारखं पाहतच राहिलो. पोल डाइव्ह, चकवा खो, डायरेक्शनच्या फाटीवरून लाँग डाइव्ह करीत त्यांनी आमचे खेळाडू एकापाठोपाठ एक टिपले. नऊपैकी पाच जणांना एकट्या मल्ल्याने बाद केलं. आमच्या टीममधेही अनेकजण चांगला पोल डाइव्ह मारीत, पण मल्ल्याचा डाइव्ह विलक्षण होता. मणक्याला व शरीराला इतकं ताणून, पोलवरील एका हाताच्या बोटांवर व पोलजवळील एका पायावर शरीर तोलून दुसऱ्या बाजूला लांबपर्यंत शरीर झुकवण्याची कसरत मात्र मल्ल्यासारखी कुणालाच जमायची नाही. संपूर्ण शरीर धनुष्यासारखं ताणलं जायचं आणि दुसरा हात मधल्या फाटीच्या खूप लांबपर्यंत आत पोहोचायचा, मग प्लेअरला 'फ्री झोन' ह्या धोक्याच्या जागेत गाठणं त्याला सहज शक्य होई. हा प्रकार 'धनुर्वात डाव' म्हणून प्रसिद्धच झाला. 'डायरेक्शन' घेऊन तो उठला की समोरचा प्लेअर त्याला चुकवण्याचा विचारही करीत नसे आणि ताबडतोब मधली फाटी क्रॉस करून दुसऱ्या बाजूला सुरक्षित पोहोचण्याची धडपड करी. त्याचा डाइव्हही असाच विलक्षण होता. बहुतेक जण पुरेसा वेग घेऊन मग शेवटच्या क्षणी जम्प करतात, पण तो अशी कुठलीच चाहूल समोरच्याला लागू न देता अचानक उडी घेऊन समोरच्या खेळाडूला आश्चर्याचा धक्का देई. पायाच्या पंजाखाली स्प्रिंग आहेत की काय असं वाटावं असा रनअप न घेता लांब डाइव्ह तो करू शके.

मैदानावर शांतता होती अन अचानक आमच्या राखीव खेळाडूंमधला एक जण ओरडला "ऐ खेटर!" मल्ल्या जागेवर थांबला अन मागून येणाऱ्या मी त्याला सहज बाद केलं. त्याचे वडील पिढीजात चालत आलेला चांभारकीचा व्यवसाय करीत, हा जातीवाचक टोमणा त्याच्या जिव्हारी लागला असणार. दोन डाव आम्ही हरलो होतो अन शेवटचा औपचारिक डाव उरला होता. ह्या वेळी मात्र मल्ल्याने स्ट्रॅटेजी बदलली. वेगाने धावताना आपले हात सर्वात पुढे अन पाय सर्वात मागे असतात. पाठलाग करून प्लेअर आवाक्यात यायच्या वेळी वेग जराही कमी न करता अचानक तो कमरेतून वाके. वाकून वेगानं पळणं मोठं जिकिरीचं काम आहे, अशा प्रकारे पळताना वाकलं तर वेग आपोआपच कमी होतो. मल्ल्या मात्र त्याच कमाल वेगाने वाकून समोरच्याच्या पायाकडे पोहचे. टाचेला आडव्या दिशेने फटका दिला की समोरचा प्लेयर दोनतीन कोलांट्याउड्या खात पडे अन अनेक फूट घसरत जाई. नऊपैकी तिघांना मल्ल्याने असंच बाद केलं, कुणाचा ओठ, कुणाचं दात, तर कुणाचे गुडघे/कोपरे रक्तबंबाळ! ह्यानंतर कधीही मल्ल्याला खेटर म्हणून डिवचायचं धाडस कुणी केलं नाही.

***

उंच अन सडपातळ शरीर, लांब नाक, बसके गाल, उन्हात रापून काळा झालेला सावळा रंग - बघून हा कुणी खेळाडू असेल असं अजिबात वाटायचं नाही. मैदानात मात्र सतत सरावाने एक बाजूने निमुळता होत जाणाऱ्या दुधीभोपळ्यासारख्या दोन्ही पायाच्या घोटीव दिसणाऱ्या पोटऱ्या, आणि हातापायांवरील शिरा लक्ष वेधायच्या. तो धावायला लागला की वेगाने फिरणारी पंख्याची पाती जशी वेगवेगळी दिसायची बंद होतात, तसे त्याचे पाय वाटत. पाहताच लक्षात येणारी अजून एक गोष्ट म्हणजे प्रचंड बोलके अन समोरच्याचा खोल वेध घेऊ पाहणारे मोठे डोळे.

दहावीचं, त्यानंतर बारावीच्या बोर्डाचं वर्ष, ट्युशन्स, परीक्षा, वगैरे घाईतून उसंतच मिळत नसल्याने नंतर माझा खोखो सुटलाच, पण दर वर्षी पावसाळी सामने मात्र आवर्जून बघायला जायचो. मल्ल्यासाठी मात्र खोखो म्हणजे त्याचा श्वास होता, त्या आडगावात पोरं जमा करून त्यानं उत्तम संघ बनवला होता, पुढचे अनेक वर्ष अजिंक्यच राहिलेला. जिल्हा, विभागीय, राज्य अशा सगळीकडे तो खेळत असे. माझ्याहून एखाद्या वर्षाने मोठा होता पण आमची चांगलीच गट्टी जमली. जिल्ह्याच्या ठिकाणी त्याचे सामने बघायला तो मला बसने घेऊन जायचा.

मल्ल्याचे वडील गावातील पोस्टात चपराशी होते. पिढीजात चालत आलेला चांभारकीचा छोटा व्यवसायही होता. घरी त्याची आई, दोन मोठ्या बहिणी असत. लहान असल्यापासून त्याचे आजोबा त्याला आंबे 'उतरायला' नेत. सर्वात कठीण फांदीवरील आंबे काढायला हा असे. "हे माकड चूकून माणसाच्या पोटी जन्मलंय,' असं माझा आजा म्हणे. मल्ल्या हे टोपण नाव दिलं ते त्यानेच" हा त्याच्या विचित्र नावाचा इतिहास. तो कितवीत आहे हे मी त्याला पहिल्यांदा विचारलं तेव्हा तो म्हणाला, 'मी शाळेत आहे एवढंच मी सांगू शकतो.' परीक्षा किंवा शाळातपासणी असल्या आणीबाणी सोडल्या तर तो कधीच वर्गात नसे. शाळेत गेला तर तो खोखोच्या ग्राउंडवर माती सारखी करणे, पाणी मारून ते व्यवस्थित तयार करणे, फक्कीच्या पाट्या मारणे, असा व्यग्र राही.

त्याच्या वडलांच्या नोकरीमुळे खरं तर आर्थिक परिस्थिती बरी म्हणावी अशी होती. पण आजोबा गेल्यावर मात्र वडलांच्या दारू अन मटक्याने दारिद्र्य ओढावलं.

वडलांचं दुकान हळूहळू चालेना झालं. पगाराचा पैसा व्याज देण्यात, दारू अन मटक्यासाठी पुरत नसे, मग ह्यांचे खायप्यायचे वांदे व्हायला लागले. अर्धा वर्ष सुरू अन उरलेला काळ काहीबाही कारणामुळे बंद राहणारं एक सिनेमा थेटर गावात होतं, तिथे हा 'हरकाम्या' म्हणून काम करायचा. नवीन सिनेमा आला की सिनेमाचं अन त्यातील कलाकारांची नावं लिहिण्याचं काम करी, इंटर्वलमध्ये चणा उसळीचा गाडा लावी, अन कधीकधी तिकीट विकायलाही बसलेला दिसे. उन्हाळ्यात 'आंबे उतारी' म्हणून आजूबाजूच्या गावातून फिरे, मजुरी म्हणून मिळालेले आंबे तालुक्याच्या बाजारात विकायला नेई. दर मोसमात असं काहीतरी नवीन काम शोधे. पहाटेच तो त्याच्या गावातून सायकलीवर निघे अन १०-१५ किलोमीटर दूर इथं येई. मग १-२ तास पेपर टाकायचं काम असे, त्यानंतर सहा वाजेपर्यंत ग्राउंडवर पोहोचे अन आठ-साडेआठ वाजेस्तोवर प्रॅक्टिस. नंतर नऊ वाजायच्या आत वडलांचं दुकान उघडे, तिथं सफाई करे अन थेटरात हजेरी लावे. नवीन सिनेमाचं एका मोठ्या आयताकृती काळ्या बोर्डवर पिवळ्या अक्षरात नावं लिही, सिनेमाची पंचलाइन तर हा स्वतःच बनवी, 'तुफान हाणामारीचा', 'रजनीकांतच्या तुफान स्टाईलचा' असं काहीबाही लिहीत असे. ऱ्हस्वदीर्घाच्या चुका मी येता-जाता त्याला सांगे अन मग तो दुरुस्त करी. इंटर्वलमध्ये त्याचा सायकलच्या चार चाकांवर मोठी चौकोनी फळी लावून बनलेला गाडा लावी. ह्यावर सोडावॉटर, लिम्लेट, चणाउसळ असं काहीकाही असे. कुणाला तरी गाडा सांभाळायला सांगून दुपारी जेवण करून येई.

संध्याकाळी सहा ते नऊचा शो संपला की मग आवराआवर करून, रिकामा गाडा घेऊन त्याच्या वडलांना शोधायला निघे. गाडा सोबत असणं आवश्यक असे कारण ते दारूच्या गुत्त्याजवळ बेशुद्धावस्थेत पडलेले असत. ते इतके लठ्ठ होते की मल्ल्याला एकट्याला उचलायचे नाहीत, मग तो इतर थोड्या शुद्धीत असलेल्या वडलांच्या मित्रांची मदत घेऊन, त्यांना त्या गाड्यावर टाकून घरी घेऊन जाई. असा त्याचा पहाटेपासून रात्रीपर्यंत व्यग्र कार्यक्रम असे. एका भाड्याच्या खोलीत हे पाच जणांचं कुटुंब राही. घरासमोर एक बाज टाकलेली असे अन वडील जेव्हा घरी असत तेव्हा त्यावर पडलेले दिसत. मल्ल्या तर दिवसरात्र ग्राउंड किंवा थेटरवरच असायचा. जेवायला, काही सामान न्यायला किंवा रात्री वडलांना गाड्यावरून परत घरी पोचवायला येई तेवढंच.

पावसाळी सामन्याच्या तीनचार महिने आधी मात्र सगळा वेळ खेळाला. टीमच्या एकेका पोरावर मेहनत करून त्यानं सुरेख संघ बांधला होता. त्याच्या मेहनतीचं चीज होत होतं. आशियायी खोखो फेडरेशनच्या १९९६च्या खेळांमध्ये त्याच सिलेक्शन झालं, त्यासाठी तो डेहराडूनला गेला. 'सोलापूर संचार'मध्ये त्याची बातमी फोटोसकट आली, तेव्हाच अनेकजणांना त्याच खरं नाव - किरण तांदळे - कळलं.

***

शाळा संपली अन गाव सुटलं. स्थळ-काळाची अंतरं निष्ठुर असतात, कधी काळी जीव लावलेली माणसंही दुरावतात, विस्मृतीत जातात. नंतर होणारी 'गेट-टुगेदर' वगैरे फक्त उपचार ठरतो. त्या काळच्या बहुतेक मित्रांचा एखाददुसरा फोन सोडला तर संपर्क तुटलाच, नंतर तर हळूहळू फोनही बंदच झाले. चुकून कुणी भेटलाच तर चौकशांपलीकडे गाडी जात नाही. जेव्हा गावी जाई तेव्हा मल्ल्याला मात्र थेटर किंवा ग्राउंडवर जाऊन आवर्जून भेटत असे. फेडरेशनच्या सामन्यानंतर काही दिवसांतच त्याचे वडील वारले. योगायोगाने त्यादरम्यान गावीच होतो, संध्याकाळी ग्राउंडवर भेटलो. त्याचे मोठे डोळे दूरवर एकटक लावत म्हणाला, "बाप मेल्यावर सगळे इतके आरडाओरड करत होते, पण तुला खरं सांगू? माझ्या डोळ्यातून पाणीच येईना. आई, बहिणी सुटल्या. शुद्धीवर असला की गुरासारखं मारायचा त्यांना, मग कधीकधी आईच दारू पाजून शांत करायची. सगळी जमीन सावकाराकडे गहाण ठेवलीय, किती लोकांकड्न किती कर्ज घेतलंय ह्याचा हिशोब नाही."

नंतर थेटर बंद झालं, अन त्याच हक्काचं काम सुटलं. फेडरेशनची महिन्यामहिन्याची शिबिरं असायची डेहराडूनला. एकदोनदा आम्ही मित्रांनी पैसे जमवून बळेबळे त्याला पाठवलं. नंतर मात्र त्याला हे सगळं झेपेना अन तो सगळं सोडून दहावी पास व्हायच्या मागे लागला. पास झाला तर वडलांच्या जागी नोकरीची शक्यता होती. दोनतीनदा प्रयत्न करूनही जमलं नाही, नोकरीची शक्यताही संपली. सटरफटर कामं करून कसंबसं घर चाले. ह्या काळात 'दारिद्र्याचे दशावतार' म्हणतात ते त्याने अनुभवले, पण त्याला कधीच निराश झालेलं पाहिलं नाही. "तू कधी दवाखाना टाकणारंयस गावात, मला कंपाउंडर म्हणून ठेवणार ना?" असं हसत विचारी.

***

राष्ट्रीय महामार्गावरून एक फाटा फुटतो अन गुळगुळीत हायवेवरचा आमचा लक्झरी प्रवास संपून गावाकडचा दीडेकशे किलोमीटरचा कटकटीचा रस्ता सुरू होतो. तिथून सव्वाशे किलोमीटरवर अजून एकदा बस बदलावी लागते, तिथं योग्य वेळेत पोहोचलं तर शेवटची रात्री आठची बस मिळते नाही तर त्या बस स्टँडवर दोन वेळा हिवाळ्यातल्या रात्री घालवल्याच्या बोचऱ्या थंड आठवणी आहेत. एकदा नेमकं पोहोचायला अन बस सुटायला गाठ पडली. अशा वेळी मागून ओरडणाऱ्या माणसावर दया येऊन कंडक्टर बेल वाजवेल अन गाडी थांबवेल अशी बाळबोध अपेक्षा कुणीही करीत नाही. सुदैवाने एक जीपवाला दिसला अन पटकन उरलेली शेवटची सीट पटकावून मी बसलो. नेहमीप्रमाणे गाडीचा क्षमतेच्या दीडपट लोक एकमेकांना खेटून, दाटीवाटीनं बसलेले. ह्याबद्दल कुणाची तक्रार नव्हती अन 'वाहन मिळालंय' ह्याचाच आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. मला फक्त एकाच गोष्टीची काळजी होती ती म्हणजे ड्रायव्हरच्या बाजूला एकाच्या जागी तीन जण बसलेले होते अन अर्धी ड्रायव्हर सीट एका प्रवाशानं व्यापली असल्याने ड्रायव्हरचं जवळपास अर्धं बूड गाडीबाहेर अधांतरी होतं. ड्रायव्हरच्या एकूण हालचाली बघता त्यानं नुकतीच 'टाकली' असणार हे निश्चित. जीव मुठीत धरून मी बसून होतो. ड्रायव्हर मात्र ह्या 'विचित्रासनाला' सरावलेला होता अन शिताफीनं गाडी हाकीत होता. गार वारं आत शिरून सगळे गारठले होते. गाव जवळ आलं तस एकजणाने "मल्ल्या, नाक्यावर थांबव, उतरायचंय इथंच," म्हणताच माझं लक्ष ड्रायव्हरच्या चेहऱ्याकडे गेलं. हो, मल्ल्याच तो! पंधरा वर्षांपूर्वी शेवटचं भेटलो तेव्हापेक्षा किमान दुप्पट वाढलेलं वजन, दारूच्या अमलाने लाल झालेला चेहरा, पानानं तोबरा भरल्यामुळे सुजलेला चेहरा अजूनच फुगलेला; मी त्याच्याकडे बघत राहिलो, पण त्याच्या तारवटलेल्या डोळ्यांत अजिबातच ओळख नव्हती. 'किरण तांदळेच आहे का हा?' असं एका शेजारच्या माणसाला विचारून खात्री केली अन गुपचूप पैसे देऊन घरी निघालो.

पंधरा वर्षं त्याची भेट झाली नव्हती. त्याच्या बहिणींची लग्नं झाली होती आणि आई बऱ्याच वर्षांपूर्वी वारली. खोली सोडून तो दुसरीकडे कुठंतरी राहतो, ड्रायव्हिंग करतो, दारू-मटका ह्याच्या आहारी गेलाय असं कळलं. गावी गेलं की ग्राउंडकडे अन थेटरकडे चक्कर मारायचा माझा शिरस्ता असतो, पण ह्या वेळी मात्र तिकडे जायचं धाडस होईना. एकदा वाटलं त्याला शोधावं, 'तू हे काय करून घेतलंयस स्वतःचं,' असं विचारावं, ह्या दलदलीतून त्याला बाहेर काढावं, ग्राउंडवर घेऊन जावं, दिवस मावळतीला निवांत गप्पा माराव्यात. पण मला माहीत असलेला मल्ल्या तर केव्हाच संपला होता, आता उरलेला होता तो माणूस मला पूर्णपणे अपरिचित होता.

अवेळी पडलेल्या जबाबदाऱ्या पेलणाऱ्या, नेहमी उलटे डाव टाकणाऱ्या आयुष्याशी हसतमुखाने दोन हात करणाऱ्या मल्ल्याचं असं का व्हावं? खेळ होता तोपर्यंत तो अजिंक्य होता, खोखो संपला आणि त्याची लढायची उमेदच संपली. वेळीच दहावी पास झाला असता तर? त्याला कुणी 'स्पॉन्सर' मिळाला असता तर? त्या मोक्याच्या वेळी कुणी आर्थिक मदत केली असती तर? ह्या सगळ्या प्रश्नांना आता काय अर्थ होता? गरीबीच्या तडाख्यात जे सापडले त्यांच्या आयुष्यात शक्यता अन संधी ह्यांचा मेळ बसणं किती अवघड असतं? त्याच्यासारखे वडील अन विपन्नावस्था तेव्हा आपल्या नशिबी असती तर? लौकिक अर्थाने ज्याला यश म्हणतात त्यातलं किती मिळवू शकलो असतो आपण? हा विचारच अंगावर शहारा आणतो व मल्ल्याचे ते अफाट शक्यता असलेले मोठे डोळे आठवून माझे पाय जमिनीवर येतात.

थेटर बंद पडून पाचसात वर्षांहून जास्त काळ झाला होता, ती मोठी इमारत काही भिंती, छप्पर पडून ओसाड झालेली होती अन सरकारी बाभळीचं जंगल तिथं माजलेलं होत. त्या ग्राउंडवर तर आता खोखोचे पोलही उरलेले नाहीत, तिथं आता शेळ्यामेंढ्यांचा आठवडी बाजार भरतो.

field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

उत्तम लिखाण. नेमकं वर्णन करण्याची क्षमता आणि ओघ ह्या गोष्टी हेवा करण्यासारख्या आहेत. खोखोबद्दलचं माझं ज्ञान नगण्य नसतं तर काही वर्णनं जास्त चांगली समजली असती, पण तो दोष अर्थात लेखकाचा नव्हे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

हेच म्हणतो.
खो-खोची डिट्टेल वर्णनं सुरेख आहेत - पण मला काडीचाही खो-खो येत नसल्याने तो भाग हुकला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्यक्तीचित्रण उत्तम जमले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0