सप्तशैय्या पॅटिस
सप्तशैय्या पॅटिस
- सई केसकर
मध्यंतरी नाशिकमध्ये कुठेतरी उलटा वडापाव असा एक पदार्थ प्रसिद्ध झाला होता. त्यात पावाच्या आतमध्ये बटाटाभाजी भरून अख्खा पावच तळून काढला होता. खरंतर त्याला उलटा वडापाव म्हणणं चूक आहे. उलटा वडापाव म्हणजे सगळ्यात आत पाव, मध्ये बेसन आणि बाहेर बटाटा हवा. हा फारतर स्क्रॅम्बल्ड वडापाव होईल. यावर मी अनेकांशी फेसबुकवाद घातला पण सगळ्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर आंतरजालावर अनेक ठिकाणी असे आचरट प्रयोग बघितले. काहीही साधं-सरळ दिसणारं घ्यायचं आणि त्याला बेसनात बुडवून तळून काढायचं!
यावर विचार करून मग मीही अशी एक पाककृती तयार केली.
पुढे दिलेल्या पाककृतीचे सगळे हक्क माझ्याकडे आहेत. कुणाला जर या पदार्थाचा ठेला लावायचा असेल तर मला ५०% भागीदारी देणं (फायद्यात, कामात नव्हे) बंधनकारक असेल.
जिन्नस
१ मटारचा दाणा,
७-८ उकडलेले बटाटे (कुस्करून, एकसारखे करून घेतलेले),
१२ बलकासहित फेटून घेतलेली अंडी,
तांदूळ पिठी,
बेसन (याला डाळीचं पीठ असंही नाव आहे),
ब्रेड क्रम्ब्स,
१ कप न तोडता शिजवलेलं मसाला मॅगी,
स्ट्रिकी बेकन (म्हणजे डुक्कर),
रतलामी शेव,
तीळ,
मध,
मैदा,
तळायला भरपूर तेल (साधारण १ किलो),
लागेल तसं पाणी,
धने-जिरे पूड,
मीठ,
खजूर-चिंच पेस्ट.
कृती
१. बेसन सरसरीत भिजवून घ्या. एका मोठ्या कढईत तेल तापवायला ठेवा.
२. मटार बेसनात बुडवून तळून काढा. ही पहिली पायरी.
३. उकडलेल्या बटाट्याचा साधारण १० ग्राम भाग घेऊन त्यात धने-जिरे पूड आणि मीठ घालून कालवा. तळलेल्या मटारावर या बटाट्याचं आवरण तयार करा. साधारण लहान लिंबाएवढा आकार झाला की हा गोळा फेटलेल्या अंड्यात बुडवून तळून काढा. फेटलेलं अंडं बेसनापेक्षा जास्त गुणकारी आहे. पण भारतीय संस्कृतीत शाकाहाराचा आग्रह असल्याने ही कृती मागे पडली. पहिल्या थरात आपण शाकाहारी आहोत. त्यामुळे दुसरा थर मांसाहारी लोकांसाठी.
४. आता आपण तिसऱ्या थराकडे वळूया. उकडलेला बटाटा विथ अंडं तळून गार झालं की त्यावर स्ट्रिकी बेकनच्या पट्ट्या लावा. या पट्ट्या एकमेकींना चिकटवण्यासाठी पुन्हा एकदा फेटलेल्या अंड्याचा आधार घ्यावा. साधारण चिकटल्या, की तयार झालेला चेंडू ब्रेड क्रम्ब्समध्ये लोळवा. त्यानंतर पुन्हा एकदा तो फेटलेल्या अंड्यात बुडवा आणि पुन्हा एकदा तळून काढा.
५. तिसरा थर भारतातातील अल्ट्रा उदारमतवादी (बिगबास्केटवरून बेकन मागवणाऱ्या क्लूलेस मेरी आंत्वानेत) लोकांसाठी होता. पुढला थर भारतातील आम आदमी थर आहे. मॅगी शिजवताना गृहिणी करतात तसं (मुलांना खायला सोपं जावं म्हणून) त्याचे बारीक तुकडे करू नका. मॅगीचा न तोडता शिजवलेला ठोकळा, गुंता सोडवून दोऱ्यांसारखा सरळ पसरून घ्या. आपण तळलेला बेकन गोळा मग या मॅगीवरून फिरवा, जेणेकरून त्यावर मॅगीचे आवरण तयार होईल. एकीकडे थोडं मीठ घालून तांदूळ पिठी सरसरीत भिजवून घ्या. यामध्ये आपला मॅगी गोळा बुडवून पुन्हा तळून काढा.
६. आता आपण पाचव्या थराकडे वळू. पाचवा थर खास अशा लोकांसाठी ज्यांना पापडी चाट, भेळ, पाणीपुरी असले पदार्थ आवडतात. मॅगी चेंडू तळून गार झाला असल्यास, त्यावर पुन्हा उकडलेल्या बटाट्याचा थर द्यावा. यावेळी मात्र, बटाट्यात खजूर आणि चिंचेची पेस्ट घालावी. नंतर हा गोळा रतलामी शेवेत लोळवावा. शेवेला बांधून ठेवणारं असं काही हवं नाहीतर ती मुक्त होऊन तेलात पोहू लागेल. म्हणून हा गोळा पुन्हा एकदा फेटलेल्या अंड्यात (शाकाहारी लोकांची माफी मागून) बुडवावा. आणि तळून काढावा.
७. सहावा थर ज्यांना गोड पदार्थ आवडतात त्यांच्यासाठी. पापडी चाट चेंडू तळून गार झाला की तो मधात बुडवा आणि तांदूळ पिठीत घोळवा. सगळीकडून तांदूळ पिठी नीट लागली आहे याची खात्री करून पुन्हा तळून काढा.
८. सातवा आणि शेवटचा थर हा सर्वसमावेशक आणि सौंदर्यवर्धक आहे. त्यामुळे आधीच्या कृतीनंतर गार झालेला गोळा सरसरीत भिजवलेल्या मैद्यात बुडवा आणि मग त्यावर तीळ पेरा. हा गोळा पुन्हा तळून काढा. वरून दिसायला आकर्षक सोनेरी दिसला पाहिजे.
या सगळ्या सात पायऱ्या झाल्या की शांतपणे पदार्थ कचऱ्यात टाकून, सॅलड खाऊन झोपी जा.
विशेषांक प्रकार
(सवांतर)
‘पॅटिस’ या (मराठी) शब्दाची व्युत्पत्ती नेमकी काय असावी? (पदार्थाची नव्हे. शब्दाची.)
हा शब्द इंग्रजीसदृश वाटतो खरा, परंतु इंग्रजी-तत्सम वा इंग्रजी-तद्भव खासा नसावा. (Pattice असा कोठलाही शब्द इंग्रजीत आढळत नाही. बरे, Pattiesचा (Pattyचे अनेकवचन) अपभ्रंश म्हणावा, तर Patty असा जो काही खाद्यपदार्थ असतो, त्याचा पॅटिसाशी दूरान्वयानेही संबंध नसतो. शिवाय, पॅटिसास इंग्रजीत Puff असे संबोधतात, ही गोष्ट वेगळीच!)
मग ‘पॅटिस’ हा शब्द आला नक्की कोठून?
(शिवाय, ‘रगडापॅटिस’ हा (पॅटिसाशी संबंध नसलेला) पदार्थ वेगळाच. मात्र, त्यातील ‘पॅटिसा’चा कदाचित Pattyशी (बादरायण)संबंध जुळविता येईलही. (चूभूद्याघ्या.))
पफ पेस्ट्री
माझा असा अंदाज आहे, and this is just a hunch, की पॅटीस तयार करायला ज्या प्रकारची कणीक करावी लागते (God! I am now calling it कणीक!) तिला इंग्रजीत पफ पेसट्री म्हणतात. ती बहुतेक पहिल्यांदा फ्रान्समध्ये तयार झाली होती. आणि फ्रेंच patisserie ya शब्दाचे पॅटीस झाले असावे.
जुनं ट्रॅश नव्या रूपात!
जुनं ट्रॅश नव्या रूपात!