Skip to main content

व्हॅलेंटाईन दिनाच्या निमित्ताने

लॉंग जाॅन सिल्व्हर दुःखी होता.

त्याचं असं झालं - ट्रेझर आयलंडहून परतीचा प्रवास करताना हिस्पॅनिओला जहाज एका बंदरात थांबलं असताना थोडेफार पैसे चोरून त्याने पलायन केलं होतं, आणि मजल दरमजल करत तो पुन्हा इंग्लंडला पोहोचला होता. आपलं पुढचं आयुष्य एखादी खानावळ चालवत व्यतीत करण्याचा त्याचा मानस होता. पण त्याला एक धक्कादायक बातमी मिळाली - त्याच्या सखीनेही पलायन केलं होतं, आणि तेदेखील सगळा पैसाअडका, दागदागिना, स्थावरजंगम मालमत्ता घेऊन. एकवेळ संपत्तीचं ठीक होतं, पण लॉंग जाॅन सिल्व्हरला समजून घेणाऱ्या त्याच्या सखीने पलायन केल्यामुळे जणू त्याच्या पायाखालील जहाज स्थिर झालं होतं.

मूळ किंवा रिप्लेसमेंट सखीच्या शोधात लॉंग जाॅन सिल्व्हर समुद्र फुटेल तिथे फिरू लागला. "ब्रिस्टाॅल से गया घाना, घाना से ट्रिपोली" असं गाताना 'सजनी' या शब्दाशी यमक जुळणारं शहर किंवा देश न आठवल्यानं "फिर भी ना मिली सजनी" म्हणायचा बेत त्याला रहित करावा लागला. चाचेगिरी सोडून लग्न करायला तो एका पायावर तयार होता, पण त्याला (मूळ किंवा रिप्लेसमेंट) सखी गवसत नव्हती.

(मूळ किंवा रिप्लेसमेंट) सखीच्या शोधाच्या भटकंतीत लॉंग जाॅन सिल्व्हर कधीकधी भारतातही येत असे. त्याच्या नावाची व व्यवसायाची माहिती मिळाल्यावर मुले (स्वतःच्या चातुर्यावर) आनंदित होऊन गात -

"जाॅन चाचा तुम कितने अच्छे
तुम्हे प्यार करते सब बच्चे"

पण लॉंग जाॅन सिल्व्हर दुःखीच होता. त्याला रमदेखील कडू लागत नसे.

आणि एके दिवशी अचानक लॉंग जाॅन सिल्व्हरला एका सिनेमाचं पोस्टर दिसलं. त्याला महदाश्चर्य वाटलं आणि परमानंद झाला. आपला व्यवसाय आणि स्वभावविशेष यांना अनुरूप अशी सखी आपल्याला मिळेल अशी आशा त्याच्या मनात पुन्हा पल्लवित झाली.

दोस्तांनो, तो दिवस होता १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाइन डे. आणि तो सिनेमा होता - चाची चारसोबीस.

'न'वी बाजू Tue, 21/02/2023 - 07:39

"ब्रिस्टाॅल से गया घाना, घाना से ट्रिपोली" असं गाताना 'सजनी' या शब्दाशी यमक जुळणारं शहर किंवा देश न आठवल्यानं "फिर भी ना मिली सजनी" म्हणायचा बेत त्याला रहित करावा लागला.

'गज़नी' चाललं असतं, पण मग तिथे जहाजाने जाण्याची किञ्चित अडचण आली असती. (मध्ये जहाज बदलून दुसरे वाळवंटातले घेतल्याखेरीज.)

नाहीतर मग 'ग्रॉझ्नी' चालतंय का बघा. (खरं तर हे मी तुम्हाला सुचवावं लागावं हा दैवदुर्विलास आहे. तो सगळा तुमचा प्रांत!) नदीवर आहे, म्हटल्यावर जहाजानं नाही तर निदान होडक्यानं तरी जाता येईलच.

बिटकॉइनजी बाळा Tue, 21/02/2023 - 15:58

In reply to by 'न'वी बाजू

ब्रिस्टाॅल से गया घाना, घाना से ट्रिपोली,

फिर भी ना मिली सजनी सहेली ?

मूळ कनेस्प्टमध्ये सखी आहे, साजणी नाही.

चिमणराव Tue, 21/02/2023 - 16:08

चांगलं घडलं वा वाईट घडलं तरी त्याचा दिवस अजरामर करायचं मार्केटिंग त्यांनाच जमतं. तुमच्या मह्याने काही शक्कल लढवली असेलच.
महाबळेश्वरला आर्थर सीट(व्ह्यू पॉइंट) आहे. तिथे तो बसायचा म्हणे खालची सावित्री नदी पाहात. तेव्हा दिसायची म्हणतात. ( त्या नदीतून होडक्याने येताना बायको मुलगा बुडून मेले होते.) त्यांची वाट पाहायचा. त्याच्या सीटवरच काम भागवलं. दिवस वगैरे नाही ठेवला.
बायको मुलगा { अचानक} गेल्याचा दिवस. आर्थर डे.

गवि Tue, 21/02/2023 - 17:33

गाताना 'सजनी' या शब्दाशी यमक जुळणारं शहर किंवा देश न आठवल्यानं

आमच्या कोंकणातले बसणी चालेल का? किंवा वायंगणी? घाटावर चालत असेल तर निपाणी, वणी वगैरे. मधलेच हवे तर पांचगणी.

shantadurga Wed, 22/02/2023 - 11:29

हा हा! भारी गोष्ट आहे! सिडनी लांब पडेल पण लॉंग जाॅन सिल्व्हरला चालतेय का पहा. चाचीची वस्तुस्थिती समजल्यावर पुन्हा दुःखी होणार बिचारा.

बिटकॉइनजी बाळा Wed, 22/02/2023 - 16:02

In reply to by shantadurga

हायला सिडनी बसतंय की सजनीच्या यमकात.

'न'वी बाजू Fri, 10/01/2025 - 02:16

(धागा वर आणण्याकरिता तथा जुने प्रतिसाद दृश्य करण्याकरिता.)