काही(च्या) काही(ही) कविता

कविता -१

गदिमांची माफी मागून...

कोकणची माणसं साधी भोळी
समुद्राबाजूच्या जागा नेत्यांच्या गळी
पंचतारांकित हॉटेले व्यापारांच्या भाळी
भू माफिया देतात अधिकाऱ्यांना हाळी

कोकणी युवांनो दशावतार दाखवा
मुंबैचा चाकरमानी गणपतीत येवा
भूमिपुत्रांना कमी पगारी नोकरी देवा
गावातील टपऱ्या,दुकानं भैय्यांनो चालवा

आंबा, सुपारी कमी भावात उचला
काजू, कोकम उत्पादनं ठेकेदाराला
भावकीच्या जमीनींचा दिवाणी खटला
फार्महाऊसच्या बागा मंत्र्यांच्या दिमतीला

© भूषण वर्धेकर
२६ एप्रिल २०२३
पुणे

-------------------------------------------------------------

कविता-२

हा पण विद्रोही
तो पण विद्रोही
पण तो नंतरचा विद्रोही
हा मात्र मुळचा विद्रोही
तो जातीवंत विद्रोही
हा नवा विद्रोही
तो जुना विद्रोही
हा पुरातन विद्रोही
तो नवजात विद्रोही
तो अस्सल विद्रोही
हा सलणारा विद्रोही
तो कडवड विद्रोही
हा तिखट विद्रोही
तो सर्वसमावेशक विद्रोही
हा झुंजार विद्रोही
तो प्रस्थापित विद्रोही
हा विस्थापित विद्रोही
तो सरकारमान्य विद्रोही
हा समाजमान्य विद्रोही
तो कार्यकर्ता मग्न विद्रोही
हा मंत्रालय मग्न विद्रोही
तो अनुदान प्राप्त विद्रोही
हा विनाअनुदानित विद्रोही
तो कायमस्वरूपी विद्रोही
हा कालानुरूप विद्रोही
तो कोकणस्थ विद्रोही
हा देशस्थ विद्रोही
तो ब्राह्मणांचा विद्रोही
हा ब्राह्मणद्वेषी विद्रोही
तो नुसताच बामण विद्रोही
खरा तोचि एक ब्राह्मणी व्यवस्थेचा विद्रोही
प्रस्थापितांशी संघर्ष करणारा विद्रोही
वंचितांच्या न्याय, हक्कासाठी लढणारा विद्रोही

© भूषण वर्धेकर
२४ एप्रिल २०२३
पुणे

-------------------------------------------------------------

कविता -३

पुरस्कार - विडंबन (मूळ कविता केशवसुतांची - तुतारी)

एक पुरस्कार द्या मज आणुनि
मिरवीन मी जो मुक्तकंठाने
भडकूनी टाकिन सगळी माध्यमे
प्रदीर्घ ज्याच्या त्या चित्काराने
असा पुरस्कार द्या मजलागुनी

शासनाच्या परीटघडीचे
व्यवहार असे जे आजवरी
होतील ते मला सत्वरी
भाषणे देता त्या समयी
कोण पुरस्कार तो मज देईल?

इकोसिस्टिम त्यांची खंबीर
प्रशासन आंदण तुम्हाला
हळूच ढापती लीलया
महामेळावा जनसागराला
पुरस्काराचे समालोचन हवे तर?

सत्कार! ते बक्षिसे घेऊनी
सुंदर, सोज्ज्वळ मोठी शिल्पे
अलिकडले टीकाकार ते
ओरडती धरुनी आपटूनी बोटे
चित्कार करुद्या सर्वांना

निषेध जाऊ द्या वाऱ्यावरती
फेकुनी किंवा दुर्लक्ष करा
न कळता प्रतिमा उंचवा
हळूच! ठरवा पुढचे पुरस्कार
कंपूत चला डोकं बुडवूनी

सांप्रत काळ हा मिरवण्याचा
सोशल मेडिया आहे साथीला
गर्जूनी त्यावर फॉरवर्ड करा
बसल्या जागी व्हायरल करा
दिखाऊ पणा करु चला तर!

लाळ घुटमळूनी सैल संचार
गावोगावी हिंडून मैलभर
गत इतिहासाची मढी उकरुन
रक्तरंजित वसा उगाळून
पाहिजेत रे! पुरस्कारांची रीघ

जातपातधर्माचे भांडणं लावून
जनसेवेला आणिती अडथळे
एकामागोमाग सैरभैर मुद्दे
अनैतिकता पदसिद्ध भले
पुरस्कारार्थी होतसे इथे

©भूषण वर्धेकर
१९ एप्रिल २०२३

-------------------------------------------------------------

कविता -४

काव्यमय वडापाव

काळ्याकुट्ट मातीत मुळाशी गाडलेला
टुम्म फुगीर रुंद बटाटा पसरलेला
घाऊक बाजाराच्या रचलेल्या पोत्यातून
भल्यामोठ्या पातेलात रटारटा शिजवून

ठेचून चेंदामेंदा झालेली लक्तरे
कांदा मिरची मसाल्याचे फवारे
गोलमटोल गोळे पीठात बुचकळून
ओतीव कढईतल्या तेलात उकळून

लालचुटुक चुराचटणी कणीदार
घोटलेल्या चिंचेचा अर्क पाणीदार
मऊ लुसलुशीत पावात कोंबून
चवीला मीठमिरची कांदा कापून

अटक मटक खवय्यांची चटक
तहानभूक भागवायचं मिथक
दंत ओष्ठ्य जीव्हा खाण्यात दंग
उदरभरण नोहे अखंड अभंग

©भूषण वर्धेकर
२२ मार्च २०२२

-------------------------------------------------------------

कविता -५

आमची लढाई, तुमची लढाई
त्यांची लढाई, ह्यांची लढाई
आतली लढाई, बाहेरची लढाई
गल्लीतील लढाई, दिल्लीतील लढाई

मनातील लढाई, घरातील लढाई
एकट्याची लढाई, दुकट्याची लढाई
शांततेसाठी लढाई, वर्चस्वासाठी लढाई
रक्षणासाठी लढाई, संरक्षणासाठी लढाई

मिरवण्याची लढाई, दिखाव्याची लढाई
आस्तित्वाची लढाई, निकराची लढाई
अटीतटीची लढाई, मेटाकुटीची लढाई
शहाण्यांची लढाई, मुर्खांची लढाई

गटागटात लढाई, तटातटात लढाई
सामाजिक लढाई, राजकीय लढाई
जातीअंताची लढाई, जातीपातीची लढाई
विचारांची लढाई, आचारांची लढाई

सत्तेची लढाई, खुर्चीची लढाई
मंत्र्यांची लढाई, नेत्यांची लढाई
पदांची लढाई, प्रतिष्ठेची लढाई
भक्तांची लढाई, गुलामांची लढाई

अंधश्रद्धेशी लढाई, प्रथांशी लढाई
रुढींशी लढाई, परंपरांशी लढाई
दैववादी लढाई, विवेकवादी लढाई
सांस्कृतिक लढाई, सदाचारी लढाई

पक्ष वाढवण्याची लढाई, पक्ष संपवण्याची लढाई
बंड क्षमवण्याची लढाई, बंड पेटवण्याची लढाई
सरकार करण्यासाठी लढाई, सरकार पाडण्यासाठी लढाई
विरोधकांची अंतर्गत लढाई, विरोधकांची कमीशनची लढाई

जनतेची जगण्याची लढाई, महागाईशी कमाईची लढाई,
बेरोजगारीशी बेकारांची लढाई, शेतकऱ्यांची निसर्गाशी लढाई
कर्जबाजाऱ्यांची बॅंकेशी लढाई, मजूरांची भांडवलदाराशी लढाई
मानवतेची माणसाशी लढाई, सौहार्दाची ढोंगाशी लढाई

©भूषण वर्धेकर
३१ मे २०२२
पुणे -४१२११५

--------------------------------------------------------------

भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा विजय असो!

स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सगळेच लढले
कोणी दक्षिणेकडे कोणी पश्चिमेकडे लढले
उत्तरेतील, पुर्वेकडील कैक फासावर चढले
अनेकांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले

काही जीवानिशी मेले काही होरपळले
विस्कटलेल्या चळवळीत कैक बिथरले
बंड पुकारून कैक त्वेषाने निकराने लढले
राष्ट्रवादी लेखणीचे चित्कार सर्वदूर पोचवले गेले

परदेशांतून जहालांनी हादरून सोडले
ब्रिटिशांना देशातलेच मवाळ बरे वाटू लागले
हुशारीने राजे राजवाडे आधीच ताब्यात घेतले
संस्थानिकांना हेरून करारबद्ध गुलाम केले

बेरकीपणे काही आंदोलने प्रॉक्टर्ड केली
लोकसहभागातून काही उस्फुर्त झाली
दुसऱ्या महायुद्धात वाताहत अंगलट आली
संभाव्य लष्करी उद्रेकामुळे पाचर बसली

ज्वलंत राष्ट्रवाद्यांच्या जरबेने गांगारुन गेले
मवाळांतील सत्तापिपासू हेरले गेले
ब्रिटिशांनी धर्माधिष्ठित राष्ट्रास बळ दिले
सर्वधर्मसमभावाचे कंबरडेच मोडले

सगळ्यात आधी ब्रिटीशांनी वापरले
नंतर कॉंग्रेसने सत्तेसाठी मिरवले
सर्वदूर सत्य अहिंसा ठसवले गेले
प्रत्यक्षात अहिंसा असत्य वठवले गेले

कित्येक दशकं गांधी बिचारे वापरले गेले
जाज्वल्य सावरकर अडगळीत फेकले गेले
सुटाबुटातून संविधान अंमलात आणले गेले
बाबासाहेब जातीच्या कोंडाळ्यात ढकलले गेले

पंचवार्षिक योजनेचे दिवास्वप्न दाखवले गेले
गोताळ्यातील समाजवादी धनिकांना रेटले गेले
गावोगावचे जमीनदार सावकार एकवटले गेले
सेक्युलर म्हणवून संस्थानिकं भक्कम केले गेले

व्यक्तींकडून कुटुंबं उच्चभ्रू प्रस्थापित झाले
विकासाच्या आडून गोरगरीब विस्थापित झाले
नेहरुंचे गुडी गुडी राष्ट्रनिर्भर स्वप्न मिरवले गेले
प्रत्यक्षात मात्र घराणेशाहीचे वारस लादले गेले

भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा विजय असो!

२७ नोव्हेंबर २०२२
भुकूम, पुणे

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कविता वाचताना आमची वैतागाशी लढाई

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वैतागाची त्रागाशी लढाई
Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

खूप उत्तम कविता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू