Skip to main content

एक भयानक अनुभव्

या आठवड्यात मला एक जरा वेगळा आणि भनायक अनुभव आला
अहमदाबाद मधे दोन तीन दिवसांच्या कामासाठी गेलो होतो.
ऑफिसने हॉटेल बुक केले होते. पण जी रूम मिळाली त्या रूमला एकही खिडकी नव्हती. रूम वातानुकूलीत असल्याने खिडकी नसल्यामुळे काही फरक पडणार नव्हता म्हणून घेतली. सकाळी बाथरूम मधे गेलो. बाथरूमला ही अर्थातच खिडकी नव्हती, व्हेंटीलेशन साठी छतावर एक एक्झॉस्ट फॅन होता. अंघोळ करून बाथरून मधून बाहेर जाण्यासाठी दार उघडायला गेलो तर लक्ष्यात आले की दाराचे लॅच लॉक झाले आहे. आणि दार उघडता येत नाहिय्ये.
दाराला हँडल ऐवजी एक गोल नॉब होता त्यावरच लॅच उघडण्यासाठी एक बटन होते. बटन दाबले की त्यामुले लॅच च्या कळीची हालचाल होऊन दार ओढले की उघडले जायचे. हात ओले झाल्यामुळे ओढणे शक्य होत नव्हते. त्यात ओले असल्यामुळे हात सटकत होते.
परिस्थिती अशी होती की माझा मोबाईल बाहेर रूम मधे होता. आतून ओरडून कोणाला बोलायचे तर आवाज बाहेर जाणे शक्य नव्हते.
दहा एक मिनीटे शांत बसलो. लॅचचा नॉब टॉवेल ने पुसून काढले. आणि दाराच्या चौकटीला पाय लावून लॅच दोन्ही हातानी दाबून दार एकाच झटक्यात जोर लावुन ओढले. दार उघडले गेले आणि जीव भांड्यात पडला.
हे लिहीताना आता मनात विचार येतोय की समजता ते ओढताना जर तो दाराचा नॉब तुटला असता तर?
माझी रूम आतून कडी लावून बंद केलेली होते त्यामुळे क्लीनिंग स्टाफला आत किल्ली लावूनही रूमचे दार उघडता आले नसते.
बाथरूम मधे फोन नेला असता तर निदान फोन करून तरी स्टाफला कळवता आले असते. पण तेही शक्य नव्हते.
ते दहा मिनीट मात्र माझ्या मनात काहीच्याकाही विचार येऊन गेले.
समजा दार उघडलेच गेले नाही तर? इथे गुदमरून आपले काही झाले तर? इथपासून ते हॉटेलच्या रूम मधे मृत्यू आल्या च्या बातम्या डोळ्यासमोर येवून गेल्या. समजा आपले काही असे झाले तर आपल्या कुटूंबीयाना आपल्या बद्दल कसे कळेल?
तुम्हाला आलाय का असा अनुभव कधी?

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 02/08/2023 - 02:21

मी एकदा कुठल्या तरी युरोपीय देशात परिषदेसाठी गेले होते. हॉटेलात जिना दिसला, लिफ्ट का वापरा, म्हणून जिन्यात शिरले. जिन्याला प्रत्येक मजल्यावर दरवाजे. खाली गेल्यावर समजलं की ते दरवाजे बाहेरून बंद आहेत, कुलूपबंद.

हे सगळं २००५च्या आसपासचं. स्मार्टफोन यायला ४-५ वर्षं बाकी होती. खिशात फोन घेऊन फिरायची सवय नव्हती; पण सुदैवानं माझ्याकडे फोन होता. पण इंटरनॅशल फोन करावा लागला असता. मी शिकत होते, म्हणून पैशांचीही तंगी. ते सोडलं तरी फोन करणार कुणाला?

मग बरोबरच्या मित्राला फोन केला. त्याचा फोन त्याच्याकडे होता. त्यानंही पैसे खर्चून फोन उचलला. आणि दरवाजा उघडला.

अजूनही, अमेरिकेतही, अशा कुठल्या जिन्यात शिरताना मी जिना कुलुपबंद नाही ना, ते तपासून घेते.

Rajesh188 Wed, 02/08/2023 - 16:20

हे त्या काळात अनेक ठिकाणी बसवले जायचे .आणि विजू भा ऊ
म्हणतात तसे ते अनेक वेळा खराब व्हायचे.

Main door ल पण तशीच लॉक अनेक ठिकाणी असायची.
रूम मध्ये कोणीच नाही आपण एकटेच आहे तर बाथरूम चा दरवाजा बंद करायची काही गरज नाही.
सरळ उघडा ठेवायचा..
लिफ्ट आता आधुनिक आहेत पण पहिल्या तशा नव्हत्या तेव्हा लिफ्ट मध्ये अडकून पडल्याच्या पण खूप घटना होत असत

सई केसकर Wed, 02/08/2023 - 23:30

माझ्या आयुष्यात असं काही खरं घडलं नाही पण मला अशा प्रकारची स्वप्नं नेहमी पडतात. तीदेखील इतकीच तापदायक असतात. अशावेळी मनाची एक बाजू आपल्याला सांगत असते की हे स्वप्न आहे पण त्यातून बाहेर येता येत नाही. हल्ली मी फार कष्टानं अशा स्वप्नातून बाहेर पडते आणि उठून चॅनल बदलते. पण अनेकदा पुढचं स्वप्नही असंच काही असतं.

बिटकॉइनजी बाळा Thu, 03/08/2023 - 20:35

In reply to by सई केसकर

सरळ झोपत असाल तर स्वामींचा उघडा फोटो बेडशीटखाली ठेवून झोपत जा. पोटावर, एकांगावर झोपत असाल तर छताला किंवा भिंतीला स्वामींचा उघडा फोटो चिकटवून पाहा.

(क्रॉस ड्रेसर फोटो काम करत नाही असा अनुभव आहे)

प्रकाश घाटपांडे Sun, 13/08/2023 - 10:06

In reply to by सई केसकर

अशावेळी मनाची एक बाजू आपल्याला सांगत असते की हे स्वप्न आहे पण त्यातून बाहेर येता येत नाही.

हा अनुभव मला काही वेळा आलेला आहे. स्वप्नात स्वप्न मला पडते.कधी स्वप्न की सत्य या अवस्थेत बराच काळ जातो.

'न'वी बाजू Thu, 03/08/2023 - 02:08

समजा दार उघडलेच गेले नाही तर? इथे गुदमरून आपले काही झाले तर?

विशेष काही नाही; हा लेख इथे छापून आला नसता.

(बाकी, एक शंका, 'जंगलात जर झाड पडले, आणि ते पडण्याचा आवाज ऐकायला आजूबाजूला जर कोणी नसले, तर ते पडण्याचा आवाज होतो का?'च्या धर्तीवर. हॉटेलातल्या खोलीतल्या बाथरूममध्ये विजुभाऊ जर अडकून पडले, आणि त्या खोलीकडे ढुंकूनही पाहायला अनंत काळापर्यंत जर कोणी टपकले नाही (कोविडोत्तर काळात हे सहज शक्य असावे.), तर मुळात हॉटेलातल्या खोलीतल्या बाथरूममध्ये विजुभाऊ अडकले का?)

तुम्हाला आलाय का असा अनुभव कधी?

हो आलाय ना! (म्हणजे, हॉटेलातल्या खोलीतल्या बाथरूममध्ये नव्हे, परंतु इतरत्र, साधारणत: अशाच प्रकारचा अनुभव.) पण तो इथे मांडून पब्लिकला उगाच कशाला पकवू?

तिरशिंगराव Fri, 04/08/2023 - 07:09

आम्रिकेतच एकदा डोसा खायला गेलो. त्यांच्या वॉशरुममध्ये गेलो. नंतर आतुन दरवाजाच उघडेना. एक मिनिट घाम फुटला. मग दार बाहेर ढकलुन पाहिले, ते सहज उघडले! तेंव्हा ट्युब पेटली की ते दार बाहेर उघडणारे होते आणि मी आत खेचायचा प्रयत्न करत होतो.