जिओचा डेटा आणि निळ्या डोळ्यांची बाळं
गेल्या वर्षीचा ख्रिसमस एका गोष्टीमुळे फार महत्वाचा ठरला. ख्रिसमसच्या मुहूर्तावर रणबीर कपूर आणि आलिया भट या उभयतांनी आपल्या पहिल्या अपत्याचं - राहाचं - जगाला मुखदर्शन घडवलं. मग बाकी सगळी महत्वाची कामं सोडून ‘नेटकरी’ ती कुणासारखी दिसते हे ठरवण्यात गुंतले. तिचे निळे डोळे राज कपूरसारखे आहेत, जिवणी नीतू सिंगसारखी आणि रंग कपूरांचा वगैरे चर्चा सुरु झाल्या. मला तर ती निळ्या डोळ्यांची आलिया वाटली. संध्याकाळी नवरा घरी आला तेव्हा मी त्याला आलियाच्या मुलीचे डोळे राज कपूरसारखे आहेत हे सांगितलं. त्यावर काहीशा अनपेक्षित सहजपणाने तो, "याला अटाविझम म्हणतात" असं म्हणाला. वास्तविक तो सज्जनपणे म्हणाला होता पण मी त्यावर उगाच एक फ्युज उडवून घेतला.
सिलीब्रीटी लोकांची बाळं (नंतर मुलं) हा सामान्य आणि निरुद्योगी जनतेच्या कुतूहलाचा विषय! साधारण दहा एक वर्षांपूर्वी टॉम क्रूझ आणि केटी होम्स यांची मुलगी सूरी हिच्या वतीने कुण्या एका बाईनं (इतकं चपखल विनोदी बाईच लिहू शकते) 'सूरीज बर्न बुक' या नावाचा ब्लॉग टम्बलरवर सुरु केला होता. तो माझा लाडका होता. त्यात सूरी इतर समकालीन सिलीब्रीटी अपत्यांवर खोचक टीका करते. ब्रॅड पिट आणि अँजलिना जोलीची 'शिलोह'; विलियम आणि केटचे 'जॉर्ज आणि शार्लेट'; बियॉन्सेची 'ब्लू आयव्ही'; किम कार्डाशियाची 'नॉर्थ वेस्ट' यांच्या कपड्यांवर आणि एकूणच त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक हालचालीवर सूरी, एखादी दक्षिण मुंबईस्थित गडगंज उच्चभ्रू मुलगी भारताच्या इतर भागांमध्ये राहणाऱ्या श्रीमंत मुलांची ज्या प्रकारे मापं काढेल तशी काढायची. आता ती सगळी मुलं मोठी झाली. आणि मीही मोठी झाले. पण तरीही, आजूबाजूच्या प्रसिद्ध व्यक्तींच्या आयुष्यात डोकावून दिवसाचे काही क्षण सुसह्य करणं काही सुटत नाही. इंग्रजीत यासाठी एक वाक्यप्रयोग आहे: 'टू लिव्ह व्हायकेरियसली थ्रू सम्वन'. म्हणजे इतरांच्या आयुष्यात डोकावून ते आपलंच आयुष्य असल्याचं समाधान मिळवणं.
खरंतर रणबीर किंवा राहापेक्षा जवळची अशी एक कपूर माझ्या आयुष्यात फार पूर्वीपासून आहे. २००० साली रेफ्युजी नावाचा एक सिनेमा आला. त्यातले नायक-नायिका दोघेही आजच्या भाषेत 'नेपो-बेबीज' होते. त्यातली नायिका केवळ करिश्माची बहीण, बबिता-रणधीरची मुलगी, राज कपूरची नात आहे म्हणून इतकी जाड असूनही खपून गेली असं मत आमच्या (पेठेतल्या) ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या समस्त पिझ्झा-वेफर्स खाऊन हडकुळ्या राहणाऱ्या मुलींनी व्यक्त केलं होतं. वास्तविक, गोरीपान, हिरव्या डोळ्यांची आणि कदाचित ब्लश न लावताच गुलाबी गाल असणारी करीना मला एकदम बघताक्षणी आवडली होती. आणि पुण्यात, सदाशिवपेठेत तिच्या शरीरावर होणारी ही टीका (तो काळ सोशलमीडियाचा नसल्याने) तिला ऐकूच येत नाही याचा मला फार आनंद झाल्याचं अजूनही स्मरणात आहे.
करीना आणि मी समकालीन. मला खात्री आहे, जेव्हा मी बाटाच्या कॅनवस बुटांमध्ये पाय कोंबून सकाळी सकाळी आयडियल कॉलनीच्या ग्राऊंडला धापा टाकत फेऱ्या मारायचे, तेव्हा करीनाही जुहू किंवा बँड्रामधल्या एखाद्या श्रीमंत लोकांच्या मैदानात तिच्या आदिदास नाहीतर नायकी बुटांत फेऱ्या मारत असणार. शेवटी मध्यमवर्गीय काय आणि श्रीमंत काय, (निदान त्या काळी तरी) व्यायाम केल्याशिवाय वजन कमी होत नसे. आणि माझ्या कोथरुडी, पेठेत कॉलेजला जाणाऱ्या मैत्रिणींच्या नाकावर टिच्चून ती नटी झाली याचा मला सार्थ अभिमान होता (नंतर, कभी ख़ुशी कभी गम मध्ये तिचा 'पुह' अवतार बघून, यातल्याच काही आपल्याला लोक करीना कपूर म्हणतात असं सांगू लागल्या).

मला करीना आवडते असं स्पष्टपणे, न लाजता सांगायला मी अलीकडेच शिकले आहे. ती काही स्मिता पाटील, दीप्ती नवल, शबाना आझमी किंवा कोंकणा सेन नाही. किंबहुना ती यांपैकी कुणीही नाही म्हणूनच मला ती आवडते. स्वतःबद्दल अजिबात शंका न घेणारे काही लोक या पृथ्वीतलावर वावरत असतात. त्यांपैकी करीना एक आहे असं मला वाटतं. या प्रकारात मोडणारी दुसरी नटी म्हणजे काजोल. काजोल कोणत्याही भूमिकेत काजोल म्हणूनच वावरते. मध्यंतरी त्रिभंग नावाच्या सिनेमात तिनं, ओडिसी नृत्यांगना काजोलच्या रूपात कशी दिसेल याचा अभिनय करून दाखवला होता. पण आंधळ्या आत्मविश्वासाच्या स्पेक्ट्रमवर करीना काजोलच्या बरीच अलीकडे असल्यानं (आणि 'ओमकारा'मध्ये दिग्दर्शकाचं नीट ऐकलं असावं म्हणून) मला आवडते. खरंतर स्वतःबद्दल साशंक असणं ही एकप्रकारे देणगी आहे. अनेकदा, एखादा विचार, मनाच्या तव्यावर उलट-सुलट भाजत बसल्यानं तो व्यक्त करायची वेळ निघून जाते. असं करणं बऱ्याचदा माझ्या हिताचं ठरलं आहे. पण एखादी गोष्ट डोक्यात आल्या आल्या धाडकन बोलून टाकण्यासाठी जो आत्मविश्वास लागतो, तो माझ्यामते करीनाकडे मुबलक प्रमाणात आहे. मुलाचं नाव तैमूर ठेवल्यांनंतर चार लोकांनी खूप आरडाओरडा केला. तेव्हा खुद्द नवाब पतौडी अस्थिर होऊन मुलाचं नाव बदलूया का असा विचार करू लागले. पण करीना खंबीरपणे तैमूर नावामागे उभी राहिली. आणि आता भारतीय लोकांना ‘तैमूर’ हे नाव घेतलं की पांढरा युनिफॉर्म घातलेल्या, हसऱ्या नॅनीच्या कडेवर बसलेलं गोंडस निळ्या डोळ्यांचं बाळच आठवतं. तैमूर आणि माझा मुलगाही समकालीन आहेत. करीनाच्या आयुष्यातला माझा रस टिकून राहायचं हेही एक कारण म्हणता येईल. अर्थात, नवऱ्याच्या कुटुंबात हिरवे, शेवाळी ते अगदी निळे डोळे असलेले चिकार पूर्वज असूनही आमच्या नशिबात काही निळ्या डोळ्यांचं अटाविझम आलं नाही. आमच्या मुलाचे डोळे मॉलटिझर चॉकलेटच्या रंगाचे आहेत. माझ्यासारखेच.
तैमूरला काही वर्षं सिनियर असलेली आराध्या बच्चन खरंतर भारतीय पॅपराझींचा पहिला प्रोजेक्ट होती. ऐश्वर्या गरोदर आहे किंवा नाही यावर साधारण तीन-चार वर्षं बारीक लक्ष ठेवल्यानंतर शेवटी एकदा ती गोड बातमी सांगायला बच्चनसाहेब कुठल्याश्या हॉस्पिटलच्या दारात उभे राहिले. ऐश्वर्याला मूल होण्याआधी अनेकांना मुलं झाली. आमिर, शाहरुख, माधुरी यांना प्रत्येकी दोन दोन झाली. श्रीदेवी त्यामानाने आधीची, तिलाही दोन मुली झाल्या ज्या आता इन्स्टावर दिसायच्या थांबतच नाहीत. एक दिवस अचानक उगवून लाथा झाडायला लागलेला टायगर श्रॉफ त्याआधी किमान वीस वर्षंतरी जन्माला आला असावा. तैमूरचीच अर्धभगिनी सारा अली खान, अधूनमधून पुणे टाइम्स किंवा तत्सम पेपरांत दिसायची. तैमूरची मामी आणि राहाची आई - महेश भटची मुलगी आहे हे तिचा पहिला सिनेमा येईपर्यंत मला माहिती नव्हतं. मुळात महेश भटला पूजा भट सोडून अजूनही मुलं आहेत हेच मला माहिती नव्हतं. या लोकांबद्दल रोजच्या पेपरात फार काही छापून येत नसे. कधीतरी स्टारडस्टसारख्या मासिकांच्या चकचकीत पानांत अमिताभचा बंगला किंवा चित्त्याच्या कातडीची बिकिनी घातलेली बिपाशा दिसायची. पण असली मासिकं वर्गणी भरून विकत घेणारं एकही कुटुंब माझ्या ओळखीत नव्हतं. त्यातल्या त्यात सिमी गरेवालच्या रॉन्देवूमध्ये काही स्टार मंडळी सहकुटुंब यायची. पण त्या मुलाखती सिमीच्या इंग्रजीइतक्याच इस्त्री केलेल्या असायच्या. तारकांच्या बालकांचे फोटो बघून भारतीयांना वात्सल्याचे उमाळे येतील असं एकतर तेव्हाच्या पत्रकारांना वाटलं नसेल, किंवा अशा गोष्टींसाठी शाई वाया घालवायची त्यांना परवानगी मिळत नसेल. त्यामुळे, तैमूरचं आगमन भारतीय सिनेमातसृष्टीतल्या भावी नेपो-बेब्यांसाठी फारच फायदेशीर ठरलं. याकडे थोड्या जागतिक घडामोडींच्या परिपेक्ष्यातून बघितलं तर लोकांना उधळायला मुबलक प्रमाणात डेटा मिळू लागला त्या आसपासच तैमूरचा जन्म झाला. त्यानं वेळ बरोबर साधली. करीनानं एके काळी भारतीयांना साईझ झिरो म्हणजे काय हे जसं शिकवलं तसंच तैमूरनं, प्रसिद्ध लोकांच्या मुलांचे फोटो समाजमाध्यमांवर 'क्लिकबेटी' बातम्या देण्यासाठी वापरता येऊ शकतात हे शिकवलं. "तैमूर पुढच्या सीटवर बसल्यानं जेहनं (त्याचा लहान भाऊ) पसरलं भोकाड! करीनानं काय केलं ते पाहा!" अशी बातमी त्या भावंडांच्या फोटोसकट परवा दिसली. मी क्लिक केलं नाही. काय केलं असेल करीनानं फार तर फार? धपाटा देईन अशी धमकी दिली असेल.
तैमूर प्रकाशझोतात आल्यानंतर हळूहळू आझाद हिंद राव (किरण-आमिर), नितारा-आरव (ट्विंकल-अक्षय), आराध्या, रेहान-रिधान (सुझान-ह्रितिक) अशी त्याला सिनियर असलेली सिलीब्रीटी-मुलंही प्रकाशझोतात आली. खरंतर यांना भावी नेपो-बेबी म्हणणं चूक आहे कारण त्यांनी कुणी अजून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलेलं नाही. अलीकडे भारतीयांना घराणेशाहीचा निरातिशय तिटकारा आलेला असताना, आणि जिथे तिथे घराणेशाहीच्या नावाने शंख होत असताना या मुलांवर आधीच घराणेशाहीचा शिक्का मारणं अन्यायकारक आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत तर करण जोहरनं घराणेशाही चालवणारी एक असेम्ब्ली लाईनच टाकली आहे. दर दोन अडीच वर्षांनी, तो काही नेपो-बेब्यांना घासूनपुसून लोकांसमोर सादर करत असतो. त्याचं एकूण बरं चाललेलं असतं. पण त्याच्यावरही चित्रपट सृष्टीतल्या सेल्फ-मेड लोकांचा दात आहे. हे असं अनंत काळापर्यंत चालत राहणार. भांडवलशाही, लोकशाही आणि घराणेशाही यांच्या क्रमपरिवर्तनातून जो काही गुंता भारतात झाला आहे तो बघून खरंतर निहिलीझम ही योग्य विचारधारा वाटावी. त्यामुळे आजच्या घराणेशाहीला विरोध करून मी काय मोठा तीर मारणार आहे? आणि समजा, उद्या तैमूर मोठा होऊन सीए झाला आणि चेंबूरमधल्या थ्री बिएचकेतून क्रेटा किंवा तत्सम नवश्रीमंत गाडीतून ट्रॅफिक तुडवत अंधेरीला ऑफिसला जाऊ लागला तर त्याचं इन्स्टाग्रॅमवर किती दिवस कौतुक होणार आहे? उलट कपूर-भट शुभविवाह झाला तसे अनेक होऊन शेवटी सगळ्या घराण्यांचा एकच नेपो-प्रतिनिधी तयार व्हावा. सिमीच्याच रॉंदेवूमध्ये एकदा करीनाला विचारलं होतं की तिला कुणाशी लग्न करायला आवडेल. त्यावर अतिशय गंभीर चेहऱ्यानं तिनं राहुल गांधीचं नाव घेतलं होतं. माझं घराणं आणि त्याचं घराणं ही दोन महत्वाची घराणी आहेत असं त्यावर स्पष्टीकरणही दिलं होतं! ते लग्न झालं असतं, तर आज नेहरूंना राज कपूरचा थोडा आधार वाटला असता.
पोस्ट-तैमूर काळातले पालक मात्र सावध झाले. राणी-आदित्य यांची अदिरा, विराट-अनुष्का यांची वामिका, शिल्पा-राज यांची समिशा, प्रियांका-निक यांची मरी-मालती ही सगळी बाळं त्यामानाने फार उशिरा जगासमोर आली. पण त्यांनाही कधी ना कधी यावं लागलंच. आपल्या मुलाचे फोटो कुठे कुठे डकवले जाणार यावर आपलं काहीच नियंत्रण नसावं, आपलं मूल त्याला काही कळायच्या आधीच असंख्य लोकांच्या करमणुकीचं साधन व्हावं, घराबाहेर पडल्यापडल्या त्याला असंख्य कॅमेऱ्यांची फडफड ऐकायला लागावी, आणि त्याच्या बालसुलभ हट्टाचं, रुसून बसण्याचं विश्लेषण करून आपल्या आईपणावर कुणी भराभर कॉलम लिहावेत यांसारख्या गोष्टींची सामान्य माणसानं फक्त कल्पनाच करावी. शेवटी तैमूरची आजी म्हणते तेच खरं!
लेखात 'क्लिकबेटी'पणा आणण्यासाठी यातल्या कोणत्याच बाळाचे फोटो वापरावे असं वाटलं नाही. त्यामुळे ज्यांना उत्सुकता असेल त्यांनी ते आपापले शोधून बघावेत.
सांगताय काय?
तुमच्या काळात,
१. पिवळट पुस्तके सार्वजनिक वाचनालयांतून मिळायची?
२. पिवळट पुस्तकांतून सदाशिव पेठेची वर्णने असायची?
(बाकी, तुमच्या काळात तुम्ही पिवळट पुस्तके वाचत असाल, याबद्दल शंका उपस्थित करू इच्छीत नाही. किंबहुना, मी तर म्हणेन, की तुमच्या काळात जर तुम्ही पिवळट पुस्तके वाचली नसतील, तर तुम्ही पुरुष नाहीत. (महापुरुष आहात, किंवा कसे, ते नंतर पाहून घेऊ.))
का???
इथल्या लोकांचे बरे बघवत नाही काय?
(तरी त्यातल्या त्यात एक वेळ सकाळीसकाळी काजोलचे थोबाड पाहावे लागणे मी चालवून घेईन. (डिस्क्लोझर: काजोल मला आवडते.) मात्र, ती करीना कपूर! तिचे थोबाड पाहिल्यावर, अगोदर वरणभात जेवून त्या खरकट्या हातांनी तिच्या कानाखाली सणसणीत जाळ काढावा, ही एकमेव भावना माझ्या ठायी (का कोण जाणे, परंतु) अनावर होते.)
पण पण पण
पण पण पण
करिश्मा अगोदर आणि नंतर करिनाने पिच्चरमध्ये जाण्याने जरा कपूर खानदान चिडले असेल ते असो पण हाताने जाळ वगैरे काढणे हा राग म्हणजे आखाड सासरा होणे वाटतंय. कारणांची चर्चा करणे सोशल मिडियावर बरं नसतं. ते सोडून. जरा आश्चर्य वाटलं. जाणण्याची उत्सुकता दाबून ठेवत आहे.
बाकी लेखाला आणि तैमूरला गालबोट.
.
एखाद्याचं थोबाड न आवडणं हे कारण पुरेसं आहे इतक्या तीव्र भावना उत्पन्न करायला. आणि नबा, वरणभात आणि करीना कपूर एकत्र येण्याची शक्यता अगदीच नगण्य आहे. त्यामुळे तिच्यावर असा काही प्रसंग ओढवेल असं वाटत नाही.
पण काजोल फक्त दिसायला आवडत असेल तर एकवेळ ठीक आहे. काजोलचा एकूण आंतरजालावरील आणि विविध चॅट शोजमधला वावर बघता ती कुणालाही का आवडेल असा प्रश्न मात्र पडतो. उदाहरणार्थ, एकदा करण जोहरच्या शोमध्ये ती नेहमी ठराविक प्रकारच्या भूमिका करते आणि प्रयोग का करत नाही असं विचारलं असता ती म्हणाली होती की ती पुरेशी "गरीब" दिसत नाही! इथे गरीब हा चंट किंवा चालू या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द नसून श्रीमंत या शब्दाचा आहे. पुढे मी एखादी अंगठी विकून अनेक लोकांना विकत घेऊ शकीन असंही ती म्हणाली. इतका भयावह टोनडेफपणा करण्यासाठी अंगी फक्त मठ्ठपणा एवढा एकच गुण लागतो.
.
पण काजोल फक्त दिसायला आवडत असेल तर एकवेळ ठीक आहे.
हो दिसायलाच म्हटले पाहिजे. एकदोन सिनेमांबाहेरील तिच्या वावराशी माझा संबंध आलेला नाही.
काजोलचा एकूण आंतरजालावरील आणि विविध चॅट शोजमधला वावर बघता
प्रस्तुत वावराशी मी वाक़िफ़ नसल्याकारणाने याबद्दल काही मत बाळगण्यास असमर्थ आहे.
पुढे मी एखादी अंगठी विकून अनेक लोकांना विकत घेऊ शकीन असंही ती म्हणाली.
हम्म्म्म्म्म्… या विधानाच्या आग्यापिछ्याबद्दल कल्पना नाही, परंतु, सकृद्दर्शनी भयंकर टोनडेफच नव्हे, तर अत्यंत माजोरी वाटण्यासारखे वाक्य आहे खरे. आय स्टँड करेक्टेड.
आणि नबा, वरणभात आणि करीना
आणि नबा, वरणभात आणि करीना कपूर एकत्र येण्याची शक्यता अगदीच नगण्य आहे.
नबा आणि वरणभात एकत्र येण्याची शक्यता तितकीही नगण्य नाही. (खरे तर, अजिबात नगण्य नाही. किंबहुना, मी स्वतः बनविलेला वरणभात मला प्रचंड आवडतो!) हं, आता, करीना कपूरच्या खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल मला कल्पना नसल्याकारणाने, करीना कपूर आणि वरणभात एकत्र येण्याच्या शक्यतेबद्दल मी काहीही भाष्य करू शकत नाही. परंतु, नबा आणि करीना कपूर एकत्र येण्याची शक्यता नगण्य आहे, हे पटते.
मात्र, कर्मधर्मसंयोगाने हे तीन घटक एकत्र जरी आलेच, तरीसुद्धा, rest assured, तिच्यावर प्रत्यक्षात असा काही प्रसंग ओढविणार नाही.
हे बघा.
https://youtu.be/BMwWanJE3UE?si=LzQ14mnvYGJjyEGO
नबांची गॉसिपसाक्षरता वाढवल्याचं आज समाधान मिळालं.
?
मुलाचं नाव तैमूर ठेवल्यांनंतर चार लोकांनी खूप आरडाओरडा केला. तेव्हा खुद्द नवाब पतौडी अस्थिर होऊन मुलाचं नाव बदलूया का असा विचार करू लागले. पण करीना खंबीरपणे तैमूर नावामागे उभी राहिली.
हे नेमके कोणते ‘नवाब पतौडी’ (खरे तर पटौदी; परंतु महाराष्ट्रात ‘पतौडी’ चालते. चालायचेच.) म्हणायचे?
मन्सूर अली खान पटौदींचा मृत्यू २०११ सालचा. तैमूरचा जन्म २०१६ सालचा. मग हे कसे काय घडले बुवा? मन्सूर अली खान पटौदींना प्लँचेट करून विचारले होते काय?
पटौदीचे शेवटचे राज्यकर्ते (ruling) नवाब बोले तो मन्सूर अली खानांचे वडील. तर पटौदीचे शेवटचे नामधारी (titular) नवाब बोले तो मन्सूर अली खान पटौदी. सैफ अली खान हा माझ्या माहितीप्रमाणे ‘नवाब ऑफ पटौदी’ या किताबाचा अधिकृत धारक नाही; फार फार तर pretender असू शकेल.
(भारताच्या २६व्या घटनादुरुस्तीस अनुसरून, १९७१ साली भारतातील संस्थानिकांचे किताब (आणि त्या अनुषंगाने त्यांबरोबर येणारे तनखे) रद्द करण्यात आले.)
करिना मलाही आवडायची नाही. पण
करिना मला आवडायची नाही आधी. पण छ्म्मक छल्लो गाणे पाहिल्यापसुन एकदम आवडायला लागली. फारच छान दिसते यात.
.
हो! हा सिनेमा आला तो काळ तिचा एकदम हिट काळ होता. लेखात जो फोटो टाकला आहे तोही साधारण त्याच काळातला आहे.
https://www.youtube.com/watch?v=2_BOt-1_yiM
माझं हे सगळ्यात आवडतं. आणि तिची अशोका सिनेमातली काही गाणीही आवडतात मला.
क्लिकबेटी'पणा आणण्यासाठी
क्लिकबेटी'पणा आणण्यासाठी शीर्षकातले शब्दही पुरेसे आहेत.
जिओचा डेटा.
एकूण छान लेख.सध्याची स.पे. पूर्वीपेक्षा निराळी वाटते का? म्हणजे लेखकांनी(पुलं वगैरेंनी) आमच्यापर्यंत पोहोचवलेली. अर्थात त्या काळी असा डेटा आम्हास सार्वजनिक वाचनालयाच्या पिवळट पुस्तकांतूनच पोहोचला होता.