काय वाचावं आणि काय वाचू नये?
काही दिवसांपूर्वी, बालसाहित्याच्या संदर्भातला एक लेख वाचत असताना एका वाक्यानं लक्ष वेधून घेतलं.
“लहान मुलांसाठी लिहिलेल्या, निवडलेल्या साहित्यात नेहमी एक अदृश्य प्रौढ व्यक्ती असते.”
एखादं लहान मूल वाचायला बसतं तेव्हा त्यामागे असंख्य प्रौढ व्यक्तींच्या निर्णयांची एक शृंखलाच असते. लेखकाला काहीतरी लिहावंसं वाटतं, एखाद्या प्रसिद्ध कलामहाविद्यालयातून शिकलेली चित्रकार त्यासाठी रेखाटनं करते, मग प्रकाशक काय केल्यानं त्या पुस्तकाचा जास्तीत जास्त खप होईल असे बदल सुचवून ते छापतात. पुस्तक मुलांबरोबरच (किंवा मुलांपेक्षा) पालकांना आवडेल असं असावं हा विचारही सुप्तावस्थेत का असेना, पण प्रकाशकांच्या डोक्यात असतो. मुलांनी काय वाचावं याचा अंतिम निर्णय सुरुवातीची ठराविक वर्षं तरी, पालकांच्या हातात असल्यानं, बहुसंख्य मुलांचं नुकसानच होत असावं. लहान मुलांना नेमकं काय वाचायचं आहे हे या मधल्या सगळ्या प्रौढ माणसांना वजा करून स्पष्टपणे कदाचित कधीच समोर येणार नाही. लहान मुलांसाठी म्हणून केलेलं लेखनही कधीच त्यांच्या वर्तमानकाळातल्या दृष्टीकोनातून होणार नाही. याला मुलांचं लेखन आणि चित्रं छापणाऱ्या काही नियतकालिकांचे अपवाद आहेत. तरीही, 'मान्यताप्राप्त' लेखन कायमच प्रौढ व्यक्तींनी, त्यांच्या पूर्वानुभवातून केलेलं असणार.
आपली मुलं काय वाचतात? हा प्रश्न विशिष्ट वर्गातल्या आणि विचारधारेच्या पालकांच्या प्रतिष्ठेचादेखील असतो. पुस्तकांतून मुलांना समाजातल्या पारंपरिक ठोकळेबाज प्रतिमा दिसू नयेत असं वाटणारे पालक असतात. उदाहरणार्थ, आई स्वयंपाक करत आहे आणि बाबा वर्तमानपत्र वाचत बसले आहेत अशा प्रकारची चित्रं असू नयेत असं त्यांना वाटतं. जर बाबा स्वयंपाक करत असतील आणि आई वर्तमानपत्र वाचत बसली असेल, तर ते अधिक स्वागतार्ह असतं. अशा ठोकळेबाज प्रतिमा मोडून काढणं हे पुस्तकांचं आणि एकूणच प्रसारमाध्यमांचं कामच आहे, पण इथेही एक अदृश्य प्रौढ व्यक्ती हा निर्णय घेत असते. मुलांचं साहित्य बोधामृत पाजणारं नको असा कितीही आग्रह धरला तरीही, ती लहान मुलं, भावी नागरिक (जगाचे किंवा एकाच राष्ट्राचे) आहेत म्हणून काही गोष्टी अगदी धोरणात्मक पद्धतीनं केल्या जातात. त्याला कुणाचाच काही इलाज नाही. मुलांनी काय वाचावं या विचारातून जे काही प्रयत्न होतात त्यामुळे कुणाचं विशेष नुकसान होत नाही. तथाकथित पुरोगाम्यांना आणि तथाकथित परंपरावाद्यांना मुलांनी जे वाचावं असं वाटतं ते सगळं साहित्य सगळ्याच मुलांनी वाचलं तरी त्यांचं अजिबात नुकसान होणार नाही. कारण ती आजूबाजूचं खरं जगही वाचत असतात. आपल्या मुलांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचं लुडबुडयुक्त ब्रेनवॉशिंग करण्याआधी, आपली मुलं कधीतरी आपल्याविरुद्ध बंड करणार आहेत हा विचार करून त्या ब्रेनवॉशिंगची एकंदर दिशा आणि तीव्रता ठरवलेली बरी.
पण मुलांनी वाचू नये म्हणून ज्या गोष्टी निर्मितीच्या शृंखलेतल्या पहिल्या काही स्टेशनांवरच बाद होतात, त्या काय आहेत याचा विचार करणं आणि त्यावर शक्य असल्यास चर्चा करणं गरजेचं आहे. अलीकडच्या काळात, अमेरिकेत ज्या पुस्तकांवर वेगवेगळ्या राज्यांत बंदी घातली गेली आहे त्यातली बरीच LGBTQIA, या लिंगभाव आणि लैंगिकतेच्या संकल्पनांबद्दल असणारी आहेत. समलिंगी पालकांच्या मुलांच्या गोष्टींचा यात समावेश आहे. अशी पुस्तकं समोर आली की वाचून दाखवणाऱ्या व्यक्तीला अर्थातच, दोन आया का असतात किंवा दोन बाबे का असतात या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. त्या अवघडलेपणातून सुटका व्हावी; धार्मिक शिकवणींना तडा जाऊ नये; आणि अगदी टोकाची भीती म्हणजे हे वाचून आपलं मूल समलिंगी होऊ नये अशा विविध काळज्यांतून या पुस्तकांवर बंदी यावी अशी मागणी होते. याउलट जुन्या पुस्तकांमध्ये जिथे वांशिक भेदभाव दर्शवणारी, शारीरिक व्यंगावर किंवा दिसण्यावर विनोद करणारी भाषा आहे, ती स्वच्छ करून त्याचं पुनर्लेखन व्हावं अशीही मागणी होताना दिसते. या दोन्ही मागण्या दोन विरुद्ध टोकावरच्या विचारधारा असलेल्या पालकांकडून होतात.
.
लहान मुलांसमोर अवघडलेपण येऊ नये म्हणून जन्म, आणि लहान मुलांना दुःख होऊ नये म्हणून मृत्यू हेदेखील बऱ्याचदा कात्रीत सापडतात. पण पुस्तक असो वा नसो, आपण कसे झालो आणि लोक का मरतात, हे प्रश्न साहजिक आणि महत्त्वाचे आहेत. ते सगळ्याच मुलांना कधीतरी पडत असावेत.
विलियम स्टीग या प्रतिभावंत लेखकाच्या 'ब्रेव्ह आयरीन' या पुस्तकावर अशीच बंदी घातली गेली होती. आयरीन आणि तिची आई बर्फाळ प्रदेशात राहात असतात. आयरीनची आई शिवणकाम करत असते आणि एका श्रीमंत बाईचा झगा एका मोठ्या समारंभासाठी तिला घरपोच द्यायचा असतो. पण तिची तब्येत बरी नसल्यानं ती आयरीनला पाठवते आणि रस्त्यात आयरीन एका हिमवादळात अडकते. त्यातून ती सुखरूप सुटून, काम पूर्ण करून घरी परत येतेदेखील. पण हिमवादळात अडकलेली असताना भीतीनं, चिंतेनं ग्रासलेली आयरीन, 'मी आता मरून गेले तर बरं होईल' असं एक वाक्य म्हणते. त्यासाठी या पुस्तकावर अमेरिकेतल्या काही राज्यांत बंदी घातली गेली. वास्तविक, पुस्तक वाचत असताना, मुलांना हिमवादळात अडकलेल्या छोट्या मुलीचं पुढे काय होणार याबद्दल प्रचंड उत्सुकता वाटते, ती त्यातून सुखरूप बाहेर येऊन पुन्हा घरी परत येते यात, आधी जो प्रचंड ताण केवळ शब्दांतून आणि चित्रांतून तयार झाला आहे, त्यामुळे मुलांना कदाचित एखादा सिनेमा बघितल्यासारखं वाटावं! पण हिमवादळातली निराशा, वाचणाऱ्या प्रौढ व्यक्तींसाठी थोडी जास्त झाली असावी.
विलियम स्टीगचंच असंच दुसरं पुस्तक - यलो अँड पिंक. यावर बंदी आली नसली तरी हे मुलांसाठी (आणि प्रौढांसाठीदेखील!) लिहिलेलं एक उत्तम अस्तित्त्ववादी पुस्तक आहे. एका सुताराने रंगवून वाळवत ठेवलेल्या पिवळ्या आणि गुलाबी रंगाच्या दोन लाकडी बाहुल्या जिवंत होतात आणि बोलू लागतात. त्यांना आपल्या असण्याबद्दल बरेच प्रश्न पडू लागतात. ते प्रश्न, 'हं! आता मला मुलांना यातून असं असं सांगायचं आहे' असं ठरवून लिहिलेले नाहीत. उदाहरणार्थ, एखादी आस्तिक प्रौढ व्यक्ती त्या प्रश्नांना देवाकडे वळवू शकेल आणि एखादी भौतिकवादी व्यक्ती त्या प्रश्नांना उत्क्रांतीकडेही वळवू शकेल. पण ज्याला या कशाबद्दलच काहीच माहिती नाही, ते लहान मूल मात्र या प्रश्नांवर त्याला शक्य असेल त्या सगळ्या मार्गानं विचार करू शकेल.
'आपण कसे झालो?' या प्रश्नाला व्यक्तिगत, सामाजिक, नैसर्गिक असे कितीतरी दृष्टीकोन आहेत हे पुस्तक वाचताना जाणवतं, आणि त्यावर जर चर्चाच घडवून आणायची असेल तर ती अनेक अंगांनी करता येईल किंवा एकाच दिशेला घेऊन जाता येईल इतकी ती गोष्ट 'मोकळी' आहे.
डॅनिश लेखक ग्लेन रिंगवेद आणि चित्रकार शार्लेट पार्दी यांचं, 'क्राय, हार्ट, बट नेव्हर ब्रेक' (इंग्रजी अनुवाद:रॉबर्ट मलथ्रॉप) असंच एक मरणाबद्दलचं पुस्तक.
एका छोट्याशा घरात एक आजी आणि तिची चार छोटी नातवंडं राहात असतात. आजारी आजीला न्यायला एक दिवस मृत्यू येतो. घरात लहान मुलं आहेत हे ओळखून तो त्याचा विळा बाहेरच ठेवून येतो. मुलांनाही यथावकाश समजतं की हा मृत्यू आहे आणि तो आपल्या आजीला न्यायला आला आहे. मग ती सगळी मुलं त्यानं आजीला नेऊ नये म्हणून त्याला रात्रभर कॉफी पाजतात. पण मग मृत्यूच हळुवारपणे त्यांना एक गोष्ट सांगतो, जेणेकरून आजी गेली तरी ती दुःखानं खचून जाणार नाहीत. या गोष्टीत कुठेही, 'आजीचा तारा होईल'; 'तिचं झाड होऊन ती परत येईल'; 'तिचा पुनर्जन्म होईल', अशा प्रकारचं सौम्यकरण नाही. उलट, मरण हा जगण्याचाच एक भाग आहे हे पटवून देणारी हळुवार मांडणी आहे. आधीच्या दोन उदाहरणांच्या तुलनेत ही गोष्ट थोडी जास्त 'घडवलेली' वाटते. पण वाचणाऱ्या मुलांना अंतर्मुख करेल, पुन्हा पुन्हा विचार करायला लावेल अशी नक्कीच आहे.
मला आवडलेली लहान मुलांची पुस्तकं वाचताना असं लक्षात येतं की त्यातले लेखक कमरेतून वाकून, गुडघ्यांवर हात ठेवून एखाद्या लहान मुलाशी बोलावं तसे लिहीत नाहीत. ते सगळेच थोडे विक्षिप्त, काहीसे चक्रम लोक आहेत. कदाचित त्यांना लहान मुलांसाठी लिहायचंही नसावं. त्यांतल्या अनेकांची चरित्रं वाचली तर लक्षात येतं की त्यांना स्वतःची मुलंही नाहीत. त्यामुळे पुढच्या पिढीचं काय होणार याचा ताणही नाही! त्यांना जे काही लिहायचं होतं ते स्वतःसाठीच लिहायचं होतं. 'बालसाहित्या'बद्दल त्या सगळ्यांनीच फार कमी विचार केला असावा. कदाचित अशाच लोकांकडून कालजयी साहित्याची निर्मिती होत असावी.
प्रतिक्रिया
धन्यवाद!
धन्यवाद!
वाचून पाहीन.
नेमकं. त्यामुळे ही पुस्तकं वाचताना "अलेले, कित्त्त्ती गोड!" हे कृत्रीम फीलिंग येत नाही.
ह्याच कॅटेगरीतली माझी काही आवडती पुस्तकं -
१. अप द माऊंटन पाथ - (ॲमेझॉन लिंक)
लुलु नावाच्या छोट्या मांजरीला बॅजरकाकू एका टेकडीच्या पायथ्याशी भेटतात. बॅजरकाकूंचा हा नेहेमीचा रस्ता आहे, त्या नियमीतपणे टेकडीवर फेरी मारून येतात. लुलू मांजरीलाही त्या आपल्यासोबत घेऊन जातात. मात्र काही काळाने बॅजरकाकूंचं वय होतं. आता लुलू काय करणार?
२. हेन्री'ज नाईट (लिंक)
'हेन्री डेविड थोरो' वर बेतलेल्या ह्या पुस्तकसंचातलं माझं सर्वात आवडतं पुस्तक.
हेन्री हे एक स्वच्छंदी अस्वल आहे, त्याला रात्री झोप काही लागत नाही. वेगवेगळे आवाज त्याला साद घालतात आणि शेवटी न रहावून तो घराबाहेर पडतो, त्या आवाजांच्या शोधात. पुढे रात्री त्याला कोण कोण भेटतं? हेन्री घरी परत येतो की नाही?
आणखीही आहेत नंतर लिहीन.
अजून कुणाला अशी पुस्तकं आवडत असतील तर सुचवा.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
.
पहिलं वाचलं आहे.
दुसरं मिळवून वाचते.
इतर पुस्तकांची नावं जरूर कळवा. मराठी माहिती असतील तर तीदेखील.
.
प्रस्तुत विषयाशी याचा बेताचाच संबंध आहे, पण एक किस्सा नुकताच वाचला तो सांगतो. पुण्यात एकदा रविवारी दुपारी सतीश आळेकरांच्या ‘मिकी आणि मेमसाहेब’ या नाटकाचा प्रयोग लावला होता. ‘मिकी’ या नावावरून हे बालनाट्य आहे असा गैरसमज होऊन अनेक पालक त्यांच्या मुलांना घेऊन आले. या पालकांनी तिकीट काढण्याआधीच आळेकरांनी स्वत: थेटराबाहेर उभं राहून ’हे मुलांचं नाटक नाही’ असं त्यांना सांगून परतवून लावलं. नाटकाला गर्दी आधीच फार तुटपुंजी असल्यामुळे सहकलाकार आळेकरांवर वैतागले होते. माझं मत असं की मुलांनी बघितलं असतं तरी काहीसुद्धा बिघडलं नसतं. उलट त्यांना मजाच वाटली असती.
असं थोडंफार असतंच. ‘गलिव्हर्स ट्रॅवल्स’ हे बालवाङ्मय आहे हा गैरसमज दूर न करण्यातच मानवजातीचं हित आहे.
----
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
.
बहुतेक अमित वर्माच्या एका पॉडकास्टमध्ये त्यानं घरातल्या पुस्तकांच्या कपाटाचं वर्णन केलं होतं. आणि त्याला धड वाचताही येत नसताना त्यातून काढून बघितलेली पुस्तकं पुढे त्याची कशी लाडकी झाली याबद्दल एक किस्सा सांगितला आहे.