आस्तिकता, नास्तिकता, आणि अज्ञेयवाद

#संकीर्ण #समाजमाध्यम #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२४

आस्तिकता, नास्तिकता, आणि अज्ञेयवाद
- shripad.tembey

सर्वप्रथम या विषयाचा विचार करताना नास्तिक, आस्तिक व अज्ञेयवाद या संकल्पना माहीत असणे गरजेचे आहे. देव, धर्म, श्रुति, स्मृती, पुराणे इत्यादींवर पूर्ण श्रद्धा असणारी ती आस्तिक आणि देव, धर्म, श्रुति, स्मृती इत्यादीवर अजिबात विश्वास नसणारी, त्या गोष्टींना पाखंड समजणारी किंवा ‘देव दानवा नरे निर्मिले’ ही वृत्ती असणारी ती नास्तिक अशी रूढ कल्पना आहे. ब्रह्म, आत्मा, ईश्वरादी अतींद्रिय तत्त्वे अस्तित्वात असतीलही पण ती मानवी कक्षेत आलेली नाहीत असे प्रतिपादन करणारी विचारवंत अज्ञेयवादी होय. ती अंतिम तत्त्वाच्या स्वरूपाविषयी साशंक असते.

अत्यंत साधा वाटणारा प्रश्नच मनुष्याच्या वैचारिक जगाचा मूलभूत आधार ठरला आहे. दार्शनिक चिंतनाच्या इतिहासात चेतनेपासून भौतिक जगाची व्युत्पत्ती मानणाऱ्या समजुतीला भाववादी-अध्यात्मवादी म्हटले जाते. आणि पदार्थापासून चेतनेचा प्रारंभ मानणाऱ्या प्रवाहास भौतिकवादी-विज्ञानवादी म्हटले जाते. भिन्न पातळ्यांवरील विचार दोन वेगवेगळ्या जगांतील दृष्टिकोण, जीवनदर्शन आणि मूल्यबोध निर्माण करतात. याच्या प्रकाशात व्यक्ती त्यांच्या दैनंदिन समस्यांपासून ते आयुष्यातील मोठ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करते.

सर्वसामान्य ज्ञान असणाऱ्या व्यक्तीपासून तत्त्ववेत्ते, समाजसुधारक, शास्त्रज्ञ, धर्माचार्यांकडून आस्तिकतेचा अर्थ परमेश्वरासारख्या शक्तिमानाचा आस्थापूर्वक घेतला जातो. परमेश्वरच आमचा जीवनकर्ता, धर्ता, हर्ता, नियंता आणि सर्वश्रेष्ठ आहे. त्याचा साक्षात्कार होणेच मानवी जीवनातील मोठी फलश्रुती आहे. थोडक्यात ज्या व्यक्तीचा पुनर्जन्मावर आणि आत्म्यावर विश्वास आहे, ती आस्तिक आणि जिचा नाही ती नास्तिक ठरते.

भारतीय चिंतन परंपरेपासून आस्तिकतेला वेगळा आणि सखोल अर्थ प्रदान केला गेला आहे. आस्तिकतेमुळे वेदांवर श्रद्धा ठेवणाऱ्या तात्त्विक विचारांचा अर्थबोध होतो. आस्तिकता वेदप्रणित आहे, अर्थात ज्यांचा तात्त्विक किंवा तत्त्ववादी मार्गावर विश्वास आहे. श्रुति-स्मृतींना प्रमाण मानतात, ते आस्तिक आहेत. ज्यांची धर्मग्रंथावर, श्रुति-स्मृती, मंत्र संहिता, उपनिषदांवर परमश्रद्धा आणि वेदांच्या दिव्यतेवर आस्था आहे, अशांना संस्कृत साहित्यात आस्तिक म्हटले जाते. ज्यांचा वेदावर विश्वास नाही, वैदिक सिद्धांतावर तर्क-वितर्क करतात किंवा धर्मग्रंथांची निंदा, टीका करतात ते नास्तिक आहेत. वेदाला विरोध करणे अथवा स्वतंत्र चिंतन करणे सारखेच आहे.

नास्तिक म्हणजे जे परमेश्वराचे अस्तित्वच मान्य करत नाही असे लोक. त्यांच्या मते विश्वाचा पसारा, ही सृष्टी, उत्क्रांतीची सुरुवात हे केवळ एका वैश्विक योगायोगाचा परिणाम आहे. इथे एक ठरावीक कार्यकारणभाव आहे आणि दैव किंवा देव अशी कोणतीही गोष्ट सृष्टीत अस्तित्वात नाही असे नास्तिक लोकांचे ठाम मत असते.

आता अज्ञेयवादी म्हणजे असे लोक की जे मान्य करतात की काही गोष्टी अगम्य आहेत. कार्यकारणाचे नियम तिथे लागू होत नाहीत आणि अशा गोष्टींना फक्त वैश्विक योगायोग मानणे त्यांना चुकीचे वाटते. अशा लोकांच्या मते काहीतरी अगम्य शक्ती या सृष्टीमागे कार्यरत आहे पण ती परंपरेनुसार चालत आलेल्या देवाच्या कल्पनेसारखी नसून वेगळी असू शकते.

या ठिकाणी सांगायचे म्हणजे देवाच्या अस्तित्वाचा शास्त्रीयदृष्ट्या पुरावा देता येत नसला तरी नसल्याचा ठोस पुरावा देता येत नाही. पण त्यामुळे देव मानायलाच पाहिजे असेही नाही. अनेक अनेकजण अज्ञेय असल्यामुळे मंदिरातदेखील जातात, पण न पटणारे कर्मकांड करायला जात नाही. त्यामुळे जे लोक देव आहे की नाही याचा विचार न करता आपला जीवनप्रवास साधा-सोपा करून चालू ठेवतात त्यांच्याबद्दल कोणताही किंतु-परंतु किंवा आकस असण्याचे कारण नाही.

तत्त्वज्ञानातील एका विचारप्रणालीप्रमाणे अज्ञेयवाद हा आंशिक संशयवाद आहे. संशयवादाची भूमिका अतिरेकी नास्तित्वाची असते. मानवाला कोणत्याच प्रकारचे सर्वमान्य ज्ञान पूर्णपणे कधीच प्राप्त होऊ शकत नाही हे निर्विवाद सत्य आहे. अशा प्रकारची संशयवादाची शिकवण असते. परंतु अज्ञेयवाद इतक्या अतिरेकी थराला किंवा टोकाच्या भूमिकेला जात नाही. मानवाच्या बुद्धीला प्रत्यक्ष अनुभवातील इंद्रियगोचर म्हणजे एखाद्या गोष्टीचा किंवा कार्याचा दुसऱ्या गोष्टीवर होणारे परिणाम म्हणजेच निसर्गसृष्टीचे ज्ञान होऊ शकते. पण अनुभवातील सद्वस्तु आणि चिरंतन, निरपेक्ष सत्य ही मात्र ज्ञात होऊ शकत नाहीत. या सर्व गोष्टी सर्वथा अज्ञेयच राहतात. अशी अज्ञेयवादाची शिकवण आहे. एकूण अज्ञेयवाद स्वीकारणे म्हणजे मानवी ज्ञानाला मर्यादा, सीमा आहेत आणि ज्ञानार्जन शक्ती मर्यादित आहे अशी भूमिका स्वीकारते.

लिओनार्दो दा विंची मानवी शरीर

आधुनिक काळात ब्रिटिशांच्या राजवटीदरम्यान, भारतीय आणि त्यांतल्या त्यात काही मराठी विचारवंतांना जेव्हा प्रथमच इंग्रजी भाषेच्या माध्यमातून पाश्चात्त्य विद्येचा परिचय झाला, तेव्हा त्यांच्या हाती प्रामुख्याने हक्सली, स्पेन्सरचे अज्ञेयवादी ग्रंथ पडले. संशयवादाच्या खोल गर्तेत न पडता, आपल्या देशातील अंधश्रद्धेच्या जुनाट वातावरणातून मोकळा श्वास घेण्यासाठी, सुटका होण्यासाठी वैचारिक मार्ग त्यांना या अज्ञेयवादाने दाखवला. अंधश्रद्धेला बाजूला सारून, श्रद्धेला न दुखविणारा, तसेच ईश्वरवाद आणि निरीश्वरवाद या दोन्ही टोकांना वळसा देऊन सुवर्णमध्य साधणारा अज्ञेयवाद त्या वेळच्या पाश्चात्त्य विद्याविभूषित बुद्धिजीवी भारतीयांना, विशेषत: मराठी जनांना अतिशय आकर्षक वाटला. या वादाने आपल्याकडील बंडखोर विचारवंतांना एक नवा वैचारिक मार्ग मिळाला आणि समाजसुधारणेचा त्यानुसार मंत्र दिला. तत्कालीन भारतीयांवर या अज्ञेयवादाचा किती प्रभाव पडला होता. ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी आपल्या गीतारहस्यात स्पेन्सरचा मतांचा सविस्तर परामर्श घेतला आहे, त्यावरून स्पष्ट दिसून येते.

माझ्या मते नास्तिक लोकही स्वत:चा एक धर्म पाळत असतात. कुठल्याही जटिल, गुंतागुंतीच्या गोष्टीला वैश्विक योगायोग म्हणून डोळे बंद करून मानणे हे देखील अंधविश्वास ठेवल्यासारखेच आहे. अज्ञेय असल्याचा उपयोग म्हणजे आपण प्रत्येक अनुभव खुल्या मनाने समजून घ्यायचा प्रयत्न करू शकतो. एकदा का आपण सगळे देवांमुळे होते असे मानले की की बुद्धीचे दरवाजे आपोआप बंद होतात. नास्तिक असला, आणि तिथे विज्ञानाच्या मर्यादा येतात. अशा गोष्टींनादेखील विनाकारणच गृहीत धरलेल्या गोष्टींच्या आधारे जबरदस्ती गळी उतरवायचा प्रयत्न केला तर हे देखील एकप्रकारे बुद्धीचे दरवाजे बंद करण्यासारखेच आहे.

सृष्टीत घडणाऱ्या घटना या गुंतागुंतीच्या आणि अनाकलनीय आहेत. उदाहरणार्थ, पर्जन्य, ऋतू, महासागरातील प्रवाह, प्राणीजगत, शरीरसंरचना, मधमाश्यांचे परागकणवहन, किरणोत्सार अशा अनेक गोष्टी विज्ञानाच्या माध्यमाने समजावून घेता आल्या तरी या सर्वांचे प्रयोजन काय हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. सर्व गोष्टी अतिशय सुंदरपणे एकमेकांसोबत इतक्या चपखल बसल्या आहेत की यांना फक्त वैश्विक योगायोग मानणे खरंतर पटत नाही. आणि जी गोष्ट समजत नाही ते परमेश्वराचे असतं म्हणून सोडून देणेही पटत नाही.

माझ्या मते आपल्या आजूबाजूला जरी परमेश्वराचे अस्तित्व मानणारे बहुसंख्य असले तरी खरे तर माझ्या मते त्यांतले बरेच नास्तिक असावेत. कारण परमेश्वराला मनापासून मानत असते तर दुसऱ्यांसाठी दु:खद, क्लेशदायक गोष्टी निर्माण करताना त्यांनी निदान दहा वेळा विचार नक्कीच केला असता. सोयीनुसार परमेश्वराला किंवा त्याच्या अस्तित्वाला मानणे या गोष्टीला काहीच अर्थ नाही. काही लोक परमेश्वराचे अस्तित्व असते म्हणून समाजामधील बऱ्याच अपप्रवृत्तींनाही विरोध करत नाहीत. याची अनेक उदाहरणे आपल्याला बघायला मिळतात.

अभ्यासाचा म्हणा, कुतूहलाचा भाग म्हणा जसेजसे विज्ञान, तंत्रज्ञान विकसित होत आहे तसेतसे आपल्याला ह्या विश्वाचा पसारा अमर्याद, अनंत आहे अशी जाणीव होत आहे. अशा अनंत विश्वाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात केवळ योगायोगामुळे कुठलीही गोष्ट घडणे, होणे हे गणितीदृष्ट्या शक्य आहे याबाबत शंका नाहीत.

अज्ञेयवाद हा असा दृष्टीकोन आहे की देवाचे अस्तित्व जाणणे अथवा सिद्ध करणे अशक्य आहे. ज्या मर्यादित ज्ञानसाधनाला त्याच्या मर्यादेमुळे काही सदैव अज्ञेयच राहणारे असेल, त्यातून इतर ज्ञान-साधनाला मात्र तो अज्ञेय राहणार नाही. परमेश्वर हा तर्कगम्य नसेल, म्हणून तो क्षेत्रापुरता अज्ञेय झाला. म्हणून तो सर्वथैव अज्ञेय असतो असे नाही. जो तर्काला, बुद्धीला प्राप्य नाही ते भावनेला, प्रज्ञेला, स्फूर्तीला, इंद्रियातील अनुभूतीला प्राप्य होऊ शकतो असे संतांचे साक्षात्कारवाद्यांचे, भक्तांचे म्हणणे आहे. त्यामुळे या ठिकाणी अज्ञेय या शब्दाचा मुख्य अर्थ आहे ज्ञानावाचून. अज्ञेयवाद नास्तिकवादाचे बौद्धिकरित्या अधिक सुधारित स्वरूप आहे असे म्हणता येईल. नास्तिकवाद असे म्हणतो किंवा दावा करतो की परमेश्वर अस्तित्वात नाही. हे सिद्ध न करता येणारे मत आहे. अज्ञेयवाद म्हणतो की परमेश्वराचे अस्तित्व सिद्ध किंवा असिद्ध करता येत नाही त्यामुळे परमेश्वर अस्तित्वात आहे किंवा नाही हे माहीत होणे अशक्य आहे. या संदर्भात अज्ञेयवादाचे म्हणणे बरोबर आहे. कारण परमेश्वराचे अस्तित्व सिद्ध किंवा असिद्ध करता येत नाही, आणि करता आलेले नाही.

त्याचप्रमाणे अज्ञेयवादी परमेश्वराच्या अस्तित्वासाठी किंवा त्याविरुद्ध कुठल्याही प्रकारचा निर्णय घ्यावयास कधीच इच्छुक नसतात. थोडक्यात असे म्हणता येईल अज्ञेयवादी कुंपणावर बसलेले आहे. दुसऱ्या शब्दांत ना इकडे ना तिकडे. परमेश्वरावर विश्वास ठेवणारे असा विश्वास ठेवतात की परमेश्वर आहे. नास्तिकवादी असा विश्वास धरतात की परमेश्वर नाही. अज्ञेयवादी असा विश्वास ठेवतात की आपण परमेश्वराच्या अस्तित्वावर विश्वास किंवा अविश्वास ठेवता कामा नये, कारण दोन्ही बाबी जाणून घेणे अशक्य आहे.

थोडक्यात सांगायचे झाले तर आस्तिकवादी, नास्तिकवादी, आणि अज्ञेयवादी या विचारांचे विभाजन काळाची गरज अशी राहिली असे म्हणता येईल. आपल्या सामाजिक मानसशास्त्राच्या दृष्टीने आस्तिकतेप्रती स्वीकारबोध, नास्तिकता म्हणजे नकारभाव आणि अज्ञेयवादी म्हणजे नरो वा कुंजरो वा असल्याने आजही सामाजिक क्षेत्रात आस्तिकता आदरणीय आणि नास्तिकता म्हणा अज्ञेयवादी म्हणा त्याज्य, निंदनीय समजले जातात.

सध्याच्या गतिमान आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मानव नव्या नव्या तंत्रज्ञानांचा वापर मात्र स्वत:च्या मनाला म्हणजेच स्वत:ला अधिकच कमकुवत करण्यासाठी करत आहे. पूर्वीच्या काळी अमुक एका देवाच्या नावाने किंवा बाबा, महाराज यांच्या नावाने साखळीपत्र पाठवण्याचा प्रकार एकदम जोरात होता. तोच प्रकार आताच्या स्मार्टफोन, फेसबुक, इन्स्टाग्राम, इत्यादी माध्यमांद्वारे चालू आहे. असे संदेश धाडणाऱ्याचे कसे भले झाले आणि ते संदेश पुढे न धाडणाऱ्याचे कसे वाईट झाले याचे रसभरित वर्णन यामध्ये असतात. हे प्रकार बघितले की असे वाटते मानवाने स्वत:च्या फायद्यासाठी आणि स्वत:च्या अकार्यक्षमतेवर पांघरूण घालण्यासाठी साक्षात त्या ब्रह्मांडनायकाला, परमेश्वरालादेखील सोडलेले नाही. सध्या तर अक्षरशः परमेश्वराची मंदिरे म्हणजे व्यावसायिक बाजारपेठा झाल्यासारख्या वाटू लागल्या आहे.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ब्रह्म, आत्मा, ईश्वरादी अतींद्रिय तत्त्वे अस्तित्वात असतीलही पण ती मानवी कक्षेत आलेली नाहीत असे प्रतिपादन करणारी विचारवंत अज्ञेयवादी होय.

अज्ञेयवाद हा ज्ञान आहे की नाही यासंबंधित सांगतो. शक्यता, अशक्यता ह्याबद्दल अज्ञेयवाद काही टिप्पणी करत नाही. अतींद्रीय गोष्टी असण्या किंवा नसण्याबाबत ज्ञान नसणे म्हणजे अज्ञेयवाद.

आणि हया गोष्टींच्या अस्तित्वावर विश्वास असणे किंवा नसणे इथे येतो आस्तिक किंवा नास्तिक. म्हणजे हे एक फोर बाय फोर मॅट्रिक्स आहे. एका अक्षावर ज्ञान आणि दुसऱ्या अक्षावर विश्वास. (Belief and knowledge)

त्यामुळे अज्ञेयवाद हा तिसरा पर्याय नसून आस्तिक किंवा नास्तिक ह्यांना लागणारे विशेषण आहे. Either you have belief or you dont. इथे कुंपणाचा सवाल येतच नाही, बायनरी प्रश्न आहे.

बहुतांशी नास्तिक हे अज्ञेयवादी नास्तिक असतात - ज्यांची भुमिका असते की परमेश्वराच्या अस्तित्वाचे किंवा अस्तित्वाच्या नसण्याचे काहीही पुरावे नाहीत. पण नल पोझीशन अथवा शून्य भूमिका हि पुरावा नसलेल्या गोष्टींवर विश्वास न ठेवणे आहे.

काही आस्तिक मात्र ज्ञेयवादी (?) (Gnostic) असतात. त्यांना बायबल, कुराण, गीता आदी गोष्टी सबळ पुरावा वाटतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आस्तिकता जैविक-पातळीवर समजाऊन घ्यायची असेल तर हे पुस्तक अवश्य वाचावे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0