Skip to main content

सासर्‍याचा सैपाक: पित्झा

गेल्या शनिवारी सकाळी सौ. माहेरी गेली. आता घरात मुलगा, सून आणि मी. सौ. नसताना अस्मादिकांना खाण्याचे नवीन प्रयोग करायला स्वैपाकघर मोकळे होते. माझी सून म्हणाली बाबा आपण रविवारी ब्रेकफास्ट साठी डोमिनो मधून पित्झा मागवू. मी उत्तर दिले, बाजारातून महागडा पित्झा मागविण्यापेक्षा स्वैपाक घरात ओवन आहे घरीच पित्झा बनवू. ओवनचा काही उपयोग तरी होईल. या शिवाय विदेशी कंपनीचा पित्झा मागवून आपल्या देशाचे नुकसान कशाला करायचे. आमच्या लेकाने माझ्या मताशी सहमति दाखविली. बाजारात जाऊन चार पित्झा बेस (त्यावर दोन फुकट मिळाले), अमूलचे ग्रेटेड चीज आणि पनीर, शिमला मिरची, बिन्स आणि बेबी कॉर्न आणले. घरात स्वदेशी कंपनीचा चिली सौस आणि टमाटो सौस आणि पित्झा वर टाकण्यासाठी हर्ब ही होते (फोटू टाकला आहे). पित्झावर भपुर सौस पसरवावे लागते म्हणून तो ही तैयार करण्याचा विचार केला. एक किलो लाल भडक हायब्रिड टमाटो शनि बाजारातून विकत आणले. रविवारी सकाळी चहा पिताना चार टमाटो, दोन हिरव्या मिरच्या, सहा सात काळी मिरी, एक छोटा अदरकचा तुकडा इत्यादि साहित्य एका भांड्यात घालून अर्धा वाटी पाणी टाकून उकळून घेतले. थंड झाल्यावर टमाटोचे साल काढून सर्व साहित्य त्यात थोडे लाल तिखट आणि मीठ टाकून मिक्सित ग्राइंड करून टमाटो प्यूरी बनवून घेतली. प्यूरी थोडी पातळ वाटली म्हणून गॅस वर थोडी गाढी करून घेतली.

पित्झा बाजार सारखा बनविण्याची एक ट्रिक आहे. माइक्रो ओवन खालून जास्त हिट देत नाही. त्या मुळे पित्जा बाजार सारखा करारा बनत नाही. आधी ओवन 200 डिग्री वर प्री हिट करून घ्यावे. नंतर पित्झा घेऊन खालच्या बाजूने तीन मिनिटे कन्वेंशन मोड वर शेकून घ्यावे. यामुळे पित्झाची खालची बाजू थोडी करारी होते. आता तो पित्झा घेऊन वरच्या बाजूला घरात बनविलेला भरपूर टमाटो पसरवून घेतला. त्या नंतर पनीर, कांदे, टमाटो, बारीक कापलेले बींस, बेबी कॉर्न, पनीर आणि शेवटी ग्रेटेड चीज पित्झा वर पसरविले. नंतर चिली सौस आणि बाजारातील विकत घेतलेले टमाटो सौस पित्झा वर शिंपडले. आता पित्झा ओवन मध्ये स्टँड वर ठेऊन 20 मिनिट कन्वेंशन मोड वर शेकून घेतला. अश्यारीतीने बाजार सारखा करारा पित्जा तैयार झाला. त्यावर हर्ब टाकून गर्मा-गर्म पित्झाचे तीन हिस्से करुन लगेच खायला घेतले. चार पित्झे आम्ही तिघांनी तासाभरात फस्त केले. पित्झाचे फोटू काढून सौ.ला व्हाट्सअप वर पाठविले. तिची प्रतिक्रिया इथे देणे उचित नाही. पण मजा आली. दोन पित्झा उरले होते. दुसर्‍या दिवशी पनीर आणि शिमला मिरी नव्हती. पण भरपूर चीज आणि टमाटो कांदा स्वीट कॉर्न टाकून पुन्हा पित्झा नाश्ता केला. पहिला फोटो दुसर्‍या दिवशीचा आहे.

साहित्य

पित्झा

गवि Sat, 07/12/2024 - 12:39

मस्त झालाय पिझा.. देशी पिझा छान लागतो. अमूल पिझा या नावाने मुंबई स्ट्रीटफूड मध्ये प्रसिद्ध आहे.

'न'वी बाजू Sat, 07/12/2024 - 18:18

In reply to by गवि

उलटपक्षी, डॉमिनोज़चा पिझ्झा आत्यंतिक सुमार असतो. डॉमिनोज़ ही प्रमाणाबाहेर ओव्हररेटेड कंपनी आहे. (आणि त्यातसुद्धा, दिवसेंदिवस त्यांचा आधीच सुमार असलेला दर्जा अधिकाधिक खालावत चालला आहे, ही आणखीनच वेगळी गोष्ट.)

परंतु, सोयिस्कर आहे. घरी पिझ्झा बनविण्यात वाईट गोष्ट एकच आहे, ती म्हणजे रिस्क फॅक्टर. जमले, तर ठीक. नाहीतर सत्यानाश. एक तर पिझ्झा बेसपासून ते इतके सारे सुटे जिन्नस कोठूनतरी आणायचे. एवढी सगळी फाईट मारायची. एवढे करून एंड प्रॉडक्ट खाण्यालायक तरी होतो की नाही, याची धाकधूक. कोण एवढी कटकट करत बसतो? (अहो, साध्या बाजारात मिळणाऱ्या तयार फ्रोझन पिझ्झाची भाजताना वाट लावणारे आम्ही! सुट्या भागांपासून कसले पिझ्झा बनवतोय? आजतागायत ते धाडस केलेले नाही.) त्यापेक्षा डॉमिनोज़ सर्वार्थाने सोयिस्कर आहे. चटकन (पूर्वी फोनवरून किंवा नंतरनंतर वेबसाइटीवरून, नि आता अॅपवरून) ऑर्डर दिली, गाडीने घरापासून दोन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या डॉमिनोज़मधून पिझ्झा उचलला, घरी आणला, खाल्ला, ‘भिकार आहे!’ म्हणून डॉमिनोज़ला मनसोक्त शिव्या हासडल्या, खोका (आणि उरलेला पिझ्झा) कचऱ्यात फेकून दिला. मामला खतम. अत्यंत सोयिस्कर! पूर्वी तर घरपोच डेलिव्हरीसुद्धा होत असे. म्हणजे, अजूनही होते, परंतु आता डेलिव्हरी चार्जेस काहीच्या काही वाढवून ठेवलेले आहेत. पूर्वी जेव्हा साडेतीन डॉलरमध्ये घरपोच डेलिव्हरी होत असे, तेव्हा (तोंड वाकडे करीत का होईना, परंतु) परवडायचे. आता, घरापासून दोन मिनिटांवर असलेल्या दुकानातून घरपोच डेलिव्हरीचे पाच डॉलर (अधिक डेलिव्हरीवाल्याला टिप) देणे जिवावर येते. (डॉमिनोज़चा पिझ्झा तितकाही काही वर्थ नसतो.) शिवाय, टेकआउट ऑर्डर दिल्यास दहापंधरा मिनिटांत कौंटरवर तयार असणारा पिझ्झा डेलिव्हरीने मागविल्यास सावकाश, तासाभरानंतर वगैरे घरी येतो. त्यामुळे…

——————————

खरे तर, पिझ्झा ही संकल्पनाच मुळात आमच्या लेखी प्रमाणाबाहेर ओव्हररेटेड आहे. म्हणजे, दुसरे पर्याय जर उपलब्ध असले, तर मी शक्यतो आवर्जून पिझ्झा खाईनच, असे नाही. मात्र, क्वचित कधीकधी एखाद्या बारक्यासारक्या वन-ऑफ, मॉम-अँड-पॉप, नॉन-चेन, किंवा स्मॉल-चेन दुकानातला पिझ्झा बहार आणू शकतो. परंतु, डॉमिनोज़? डॉमिनोज़ला आमचा विरोध आहे तो ती कंपनी विदेशी आहे, म्हणून नव्हे — खरे तर आमच्याकरिता ती ‘स्वदेशी’च आहे — तर (पूर्वी) सुमार (आणि आता भिकार) म्हणून आहे. असो चालायचेच.

'न'वी बाजू Sat, 07/12/2024 - 18:26

बनविलेला पदार्थ (फोटोमध्ये तरी) चांगला दिसतो आहे.

पिझ्झ्यावर मका टाकण्याची कल्पना रोचक.

चिमणराव Sat, 07/12/2024 - 19:19

तुम्हाला खतरा उरक आहे. पिझ्झा चांगला दिसत आहे.

मी खात नाही ते वाळकूट तुकडे.
सर्व साहित्याचा विचार केला तर ...काही पर्यटन ठिकाणीटोमाटो कांदा भुर्जी { शाकाहारी} मिळते. ती आंबट तिखट भाजी पावाबरोबर खाणे चांगली लागते. भाकरी/ पोळीबरोबरही खाल्ली आहे. आवडीप्रमाणे भोंगी मिरची (क्याप्सिकम), चीज, पनीर, चटण्या टाकाव्यात. तर हे काम स्वस्तात होते.आणि घरात जे काही असेल (कांदा, टोमाटो तिखट सॉस, अमूल बटर हे पदार्थ असतातच) ते टाकावे.

प्रयोग आवडले.
_____________
#१ माथेरान, भंडारदरा.

'न'वी बाजू Sat, 07/12/2024 - 20:26

इथे हा शब्द देवनागरीत वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतींनी लिहिलेला आहे. (गविंनी ‘पिझा’ असा, मी आणि चिमणरावांनी ‘पिझ्झा’ असा, तर पटाइतांनी ‘पित्झा’ असा.)

बोले तो, झी-ला झी (मराठीत: झेड-ला झेड) लागलेला पाहून आम्ही डोळे झाकून तो शब्द देवनागरीत ‘पिझ्झा’ असा लिहितो, आणि, त्या अनुषंगाने, त्याचा उच्चारही तसाच करतो. (सवय!) मात्र, ते बरोबर असण्याबाबत प्रचंड साशंक आहे.

पटाइतांनी हा शब्द ‘पित्झा’ असा लिहिलेला आहे. (नाही, त्याबद्दल अजिबात तक्रार नाही!) हा शब्द देवनागरीत अशा प्रकारे लिहिला गेलेला कधी माझ्या पाहण्यात तरी आलेला नाही, परंतु, हा पाठभेद बहुधा मूळ उच्चाराच्या सर्वाधिक जवळ जाणारा असावा, असा माझा अंदाज आहे. (किंबहुना, तो पटाइतांकडून आला, याचे मला आश्चर्य वाटले.)

‘पिझा’ हा उच्चार मात्र अगदीच चुकीचा असावा, असे वाटते. रोमन लिपीत व्यंजनाची द्विरुक्ती झाली, तरी त्याचा उच्चार द्विरुक्त करायचा नसतो, हा नियम इंग्रजीकरिता सामान्यतः जरी लागू असला, तरी रोमन लिपी वापरणाऱ्या इतर भाषांना तो लागू असेलच, असे नाही, आणि इटालियनला बहुधा लागू नसावा. (किंबहुना, इंग्रजीतसुद्धा, निदान अमेरिकन इंग्रजीत तरी, अनेकांना हा शब्द ‘पिट्झा’ असा (किंवा क्वचित्प्रसंगी ‘पीऽट्झा’ असासुद्धा) उच्चारताना ऐकलेला आहे.) असो.

——————————

म्हणजे, (मुंबईतल्या) ‘सॅण्टा क्रूझ’ला ‘सांताक्रूझ’ म्हणणाऱ्यांना आपल्यात अनेकदा गावठींमध्ये गणले जाते, परंतु, खरे पाहायला गेले, तर त्या नावाचा मूळ उच्चार ‘सांताक्रूझ’ असाच आहे, तद्वत.

विवेक पटाईत Tue, 10/12/2024 - 11:56

In reply to by 'न'वी बाजू

गूगल देवतांनी "पित्झा" हा पर्याय दिला म्हणून टाकला. बाकी हा विदेशी शब्द असल्याने मूळ हिंदीत किंवा मराठीत कशा रीतीने लिहायचा हे अजूनही मला तरी कळलेले नाही.

Rajesh188 Tue, 10/12/2024 - 12:59

In reply to by विवेक पटाईत

विशेष नाम.

कोणती ही वस्तू, शहर etc.
ह्यांची नाव व्याकरण च्या सिद्धांत नुसार भाषे नुसार बदलत नाहीत.

उदाहरणं.

मुंबई हे शहराचे नाव आहे विशेष नाम आहे कोणत्या ही भाषेत त्याला मुंबई च बोलले गेले पाहिजे हा व्याकरनाचा सिद्धांत आहे.

अति शाहने लोक व्याकरण ची वाट लावतात.
आणि त्या बरोबर भाषे ची पण

सई केसकर Sat, 07/12/2024 - 20:59

आणि शिवाय हा खरा खरा पित्झा आहे! कुण्या हेल्थ काँशस व्यक्तीनं ज्वारीच्या भाकरीवर मोत्सारेला पसरून "हेल्दी मिलेट पित्झा" असं त्याचं बारसं केलं नाहीये!
व्यवस्थित मैद्याचा बेस, नीट अमूल चीज, वरती शिंपडायला पूर्वी डॉमिनोजमधून मागवलेल्या ओरेगानोच्या आणि मिरचीच्या पुड्या - ही देसी पित्झ्याची यशस्वी रेसिपी आहे.

'न'वी बाजू Sat, 07/12/2024 - 21:20

In reply to by सई केसकर

माझ्या अंदाजाप्रमाणे, 'मिलेट' बोले तो ज्वारी नसावी.

'मिलेट' बोले तो बाजरी. ज्वारी बोले तो 'सोरघम'. (असे वाटते. चूभूद्याघ्या.)

सई केसकर Sun, 08/12/2024 - 11:50

In reply to by 'न'वी बाजू

बरोबर आहे. स्वीट सोरघम असं ज्वारीचं नाव ऐकतच मी प्रबंध लिहिला. त्याकाळी ज्वारीचे इथनोल करायची लाट आली होती. पण अलीकडे ज्वारी, बाजरी, नाचणी अशा धान्यांना millets ही umbrella term वापरली जाते. ही धान्यं लोकांनी खावीत आणि त्यांची लागवड वाढावी यासाठी भरपूर स्कीम निघाल्या आहेत. या स्कीमीकरणाचा एक भयानक परिणाम म्हणजे या सगळ्या धान्यांचे "श्रीधान्यं" असे नवीन बारसे झाले आहे. त्यामुळे तुम्ही हेल्थकाँशस, प्रखर देशाभिमानी आणि भाषेबद्दल काटेकोर असाल तर तुम्ही भाकरी पिझ्झ्याला "आरोग्यपूर्ण श्रीधान्य पिझ्झा" म्हणाल. पिझ्झा हा शब्दच काय तो परका राहतो. त्यासाठीही काहीतरी संस्कृत शोधलं पाहिजे.
https://en.m.wikipedia.org/wiki/Sorghum

चिमणराव Sun, 08/12/2024 - 15:06

In reply to by सई केसकर

ज्वारी आणि बाजरीपैकी बाजरी इकडे आली चेंगिझ खानाच्या टोळ्यांकडून.

२०२३ जानेवारीत मिलेट फेस्टिवल झाला दिल्लीत. बाजरीचा होता. बाजरी धान्य शरिरात उष्णता निर्माण करते. राजस्थान, गुजरातमध्ये पावसाळी पीक घेतात. थंडीत खातात. थंडीत जिरं, बडिशोप, कसुरी मेथी, धणे पिकवतात. बाजरीची धाटं गुरें खाऊ शकत नाहीत. कुसं असतात त्यात. पण काटक्या जळण म्हणून वापरतात किंवा गोठा शाकारायला. बाजरीची भाकरी गुळ आणि कढीबरोबर खातात.
ज्वारी महाराष्ट्रात आणि कर्नाटकात पावसाळी होते. शरिराला थंड आहे. ज्वारिच्या धाटांना गुरं आवडीने खातात. याची भाकरी वांग्याची भाजी, पिठलं ( झुणका), मुळ्याची तुरीची आमटी याबरोबर खातात. शिळी भाकरी दुधात चुरून फार आवडीने खाल्ली जाते. कण्या शिजवून ताक घालूनही खातात.

तसा ज्वारी बाजरीत खूप फरक आहे. एक सामान्य गोष्ट म्हणजे डाइबेटिसवाले खातात.

सई केसकर Sun, 08/12/2024 - 15:37

In reply to by चिमणराव

ज्वारी = ग्रेट मिलेट
नाचणी = फिंगर मिलेट
बाजरी = मिलेट
वरीचे तांदूळ = बार्नयार्ड मिलेट
कांगराळं = फॉक्सटेल मिलेट

हे मला माहिती असलेले काही सध्याच्या भाषेतले मिलेट.बकव्हीट नक्की मिलेट आहे किंवा नाही याबद्दल ठोस माहिती मिळाली नाही पण अलीकडे आहारात बकव्हीट घेणारे लोकही वाढले आहेत.

'न'वी बाजू Sun, 08/12/2024 - 18:33

In reply to by सई केसकर

आमच्या एका कॉलेजकालीन, हरयाणवी मित्राला, महाराष्ट्रात ज्वारीची भाकरी खातात, ही गोष्ट सांगितली असता त्याबद्दल प्रचंड आश्चर्य वाटले होते, असे आठवते.

त्यांच्यात म्हणे ज्वारी ही फक्त गुरांना खाऊ घालतात. किंबहुना, ज्वारी हे मानवी अन्न होऊ शकते, ही संकल्पनाच त्याला पटायला तयार नव्हती.

चालायचेच.

चिमणराव Sun, 08/12/2024 - 19:00

In reply to by सई केसकर

बरोबर. बकव्हीट म्हणजे राजगिरा. तृणधान्य नसलेले शक्तिमान धान्य.
Amaranth, कोदा, मंडवा . उष्णता देणारे गरिबांचे धान्य. या सुंदर उपयोगी झाडाचे पाच प्रकार सापडतात.
https://youtu.be/8xi4QWxkjDE?si=IT-ZsOr1G0zEJe2r

जपानी लोक तांदुळाच्या पिठात याचे पीठ मिसळून नूडल्स करतात.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 12/12/2024 - 06:49

In reply to by सई केसकर

एवढ्या वेळेस देवनागरीत 'मिलेट' हा शब्द वाचून 'मिले(ट) सुर मेरा तुम्हारा' आठवलं.

'न'वी बाजू Thu, 12/12/2024 - 06:55

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

त्यातला शेवटचा ‘टी’ सायलेंट आहे (‘फिले’तल्याप्रमाणे) अशा (गैर)समजुतीखाली ते हिंदीतले गाणे म्हटले गेले असावे.

'न'वी बाजू Sun, 08/12/2024 - 18:12

In reply to by चिमणराव

ज्वारी आणि बाजरीपैकी बाजरी इकडे आली चेंगिझ खानाच्या टोळ्यांकडून.

हे खानसाहेबांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत.

(अतिअवांतर: हे खानसाहेब मुसलमान नव्हते म्हणे. किंबहुना, हे खानसाहेब काय, किंवा त्यांचे चिरंजीव काय, यांचा मुसलमानांशी ३६चा आकडा होता, म्हणतात. यांच्या चिरंजीवांनी तर मुसलमानांच्या बगदादमधील तत्कालीन सर्वोच्च धर्मपीठावर हल्ले चढवून लुटालूट केली होती, म्हणतात. इतकी, की इस्लामी जगतात त्याबद्दल आजही ते बदनाम आहेत.

मात्र, पुढे दोनतीन पिढ्यांतच यांचे वंशज मुसलमान झाले, नि पुढेपुढे तर खुद्द बाबर आपली वंशावळ यांच्याशी जोडू लागला. चालायचेच.)

Rajesh188 Sun, 08/12/2024 - 22:45

In reply to by 'न'वी बाजू

खरीब आणि रब्बी हंगामात ज्वारी घेतली जाते.

पहिली आरगड ही जात मला आठवत आहे पण ती आता नष्ट झाली आहे तिची माहिती पण गूगल वर मिळत नाही पण मी बघितली आहे.

उंच वाढणारी आणि पांढऱ्या शुभ्र भाकऱ्या तिच्या बनायच्या.

नंतर संकरीत जात आली तिला हायब्रीड म्हणत उंची ला कमी, ज्वारी च दर्जा खूप लो, काळ्या भाकरी होत.ही हायब्रीड हरियाणा मध्ये जनावर ना खाद्य म्हणून वापरत असावेत.
हरायणा वाल्याना शाळू हा प्रकार च माहित नसावा. त्या मुळे ज्वारी आम्ही खात नाही असे काहीतरी ते बोलत असतात.
हा प्रकार खरीब मध्ये केला जायचा तो प्रकार पण आता बंद झाल आहे.

ज्याला आता ची लोक ज्वारी म्हणतात त्याचे नाव शाळू आहे, ( त्याच्या विविध जाती आहेत, maldandi, दगडी, असे )ही जात महाराष्ट्र मध्ये पिकावली जाते आणि खाल्ली पण जाते.
सुंदर सफेद भाकरी होतात.
ह्याचे खोड गोड असते ( अगदी साखर बनवायला पण हरकत nahi) त्या मुळे जनावर आवडीनी खातात.
उंच वाढते.

शाळू हा प्रकार च सध्या अस्तित्वात आहे.
बाकी सर्व प्रकार विलुप्त झाले आहेत.

चिमणराव Sun, 08/12/2024 - 05:55

एक साहित्य पाककलाकार इथे वाढला आहे.

यावरून आठवलं. मागच्या आवारात (backyard) खराखुरा अवन बांधणारा पिवळा डांबिस.

अबापट Sun, 08/12/2024 - 13:06

विदेशी कुंपनीचा पित्झा (व त्यातून परदेशी जाणारा पैसा )
याविषयी पटाईत काकांकडून मार्गदर्शन हवे आहे.

'न'वी बाजू Sun, 08/12/2024 - 17:59

In reply to by अबापट

‘मेक इन इंडिया’ स्कीमखाली विदेशी कंपन्यांनी भारतात विमाने बनविलेली चालतात, तद्वत, आमच्या डॉमिनोज़ या विदेशी (अमेरिकन) कंपनीने भारतात जर पित्झा बनविला, तर तो पावन (मराठीत: कोशर) करून घेता का येऊ नये?

(मोदी है, तो (साला कुछ भी) मुमकिन है।)

अनुप ढेरे Fri, 20/12/2024 - 15:03

डोमिनोज परदेशी कम्पनि असली तरी भारतात (भरतिया नामक माणसाची) ज्युबिलन्ट फूड नामक कम्पनि डोमिनोजची हाटेले चालवते. अर्थात डोमिनोजला रोयल्टी जात असणारच नक्की पण भारतातील डोमिनोज पिझा मागवल्यास सगळा पैसा परदेशात नाही जात. इथल्या गहूवाल्याना, भाजीवाल्याना, डिलिव्हरी बोयना, डोमिनोज नावाने ते हाटेल चालवणाऱ्यांना पैसा मिळतो.

बाकी घरी पिझा करणे तापदायक असते. पन्धरा-वीस एक मिनिटे घालवुन एक पिझा बनतो. तो दोन मिनिटात संपतो तिघात. मग पुन्हा थाम्बा वीस मिनिटे.

गवि Fri, 20/12/2024 - 17:56

In reply to by अनुप ढेरे

पन्धरा-वीस एक मिनिटे घालवुन एक पिझा बनतो. तो दोन मिनिटात संपतो तिघात. मग पुन्हा थाम्बा वीस मिनिटे.

अगदी अगदी. यामुळेच त्यात फारसे समाधान नाही. वाट्याला येणाऱ्या दर दोन तुकड्यांच्यामध्ये वाट बघून बघून भूक मरते.

अमेरिका आदि देशांत भले मोठे ओव्हन असल्याने मोठे पिझ्झा किंवा एकावेळी अनेक पिझ्झे बेक होत असू शकतील.

चिमणराव Fri, 20/12/2024 - 18:05

In reply to by गवि

टोस्टरमध्ये पाव उभे राहतात.

पण टोस्टरच उभा केला तर पाव आडवे राहतील. आणि त्यात चारपाच पिझ्झा तुकडे राहण्याची सोय केली तर ?