स्वल्पविराम
- - -
कसल्याशा स्वप्नात होऊन खुट्ट -
चटकन खटकन मोडली झोप.
डोळे मग होईचनात बंद,
पुन्हा उघडले मिटता घट्ट.
घड्याळ ठिबकतंय टप्-टप्
एक-एक सेकंद-सेकंद -
दोन : सतरा : चौतीस.
दोन : सतरा : पस्तीस.
त्यांच्या तालास ना लयीस
जुळतात ह्याचे निजले श्वास -
ना धुसफुसणारी शीळ,
ना खरचटले उत्छ्वास.
या न-सरत्या रात्रीतील
नसोही क्षणात आराम...
बधीर दोन दिवसांतील
स्वल्प झालीये विराम.
- - -
दुवादान
'थिंक आऊटसाईड द बॉक्स'चे आचरण करण्याचा क्षीण प्रयत्न :)
बहुतेक दुवादानाच्या कोडमध्ये गोंधळ झाला असावा. पुन्हा (दुसरा दुवा देण्याचा) प्रयत्न करतो - [url=http://www.moma.org/collection/object.php?object_id=79018]दुवा[/url]
आशय आवडला.
आशय आवडला. दोन बधीर शब्दांमधला स्वल्पविराम क्षणभर जागा झाला, आणि आपल्या स्तब्धतेकडेच निरखून पाहिलं. दिवसांच्या बधीरपणाचा ओझरता उल्लेखही खूप सांगून जातो.
पण रचनेच्या दृष्टीने कविता थोडी अर्धीकच्ची वाटली. पहिल्या चारसहा ओळीतील वृत्त, यमकपद्धती, शब्दांची निवड व शेवटच्या ओळींतील वृत्त, यमक शब्द यांच्याशी जुळत नाही. वरच्या व खालच्या ओळी बधीर शब्दांच्या ठेवून मधल्या ओळींत वेगळी रचना आली असती तर निदान आशयाशी सांगड लागली असतो.
ना धुसफुसणारी शीळ
त्यांच्या तालास ना लयीस
जुळतात ह्याचे निजले श्वास -
ना धुसफुसणारी शीळ,
ना खरचटले उत्छ्वास.
हा अधुऱ्या प्रणयाकडे तर इशारा नाही ना? कविता चांगलीच आहे. स्वल्प झालाय हे कानांना खटकणार नाही.
वर घासकडवी ह्यांनी म्हटलंय,
पण रचनेच्या दृष्टीने कविता थोडी अर्धीकच्ची वाटली. पहिल्या चारसहा ओळीतील वृत्त, यमकपद्धती, शब्दांची निवड व शेवटच्या ओळींतील वृत्त, यमक शब्द यांच्याशी जुळत नाही. वरच्या व खालच्या ओळी बधीर शब्दांच्या ठेवून मधल्या ओळींत वेगळी रचना आली असती तर निदान आशयाशी सांगड लागली असतो.
माझ्यामते यमकपूर्ती किंवा पादपूर्ती केल्यामुळे काव्यरचना पक्की होत नसते. किंबहुना तुम्ही जे सुचवतायत ते कवीलाही माहीत असावे अशी मला दाट शंका आहे. माझ्यामते या कवितेने तिचा फॉर्म घेतलाय.
माझ्यामते यमकपूर्ती किंवा
माझ्यामते यमकपूर्ती किंवा पादपूर्ती केल्यामुळे काव्यरचना पक्की होत नसते.
आग्रह यमकांचा नाही, तर एकदा ती बंधनं स्वीकारल्यानंतर, अचानक बदलण्याला आहे. उदाहरण शरीर (आशय) व कपड्यांचं (आकारबंध) देतो. एके काळी कवितेचं शरीर कपड्यांनी झाकलंच असलं पाहिजे असं बंधन असे. आता ते नाही. पण एकदा कपडे घातल्यानंतर ते बेंगरूळ असतील तर शोभा कमी होते इतकंच म्हणणं आहे. त्यातही डोक्यावर मुस्लीम स्त्रियांप्रमाणे केस घट्ट झाकणारं वस्त्र, चेहऱ्यावर भरतनाट्यम नर्तकीचा मेकप, खांदा ते कंबर यात नुसतीच पोल्का डॉट बिकिनीची ब्रा, कंबरेला स्कॉटिश क्विल्ट आणि पायात हंटर शूज घातले तर ती स्त्री कितीही सुंदर असली तरी या निवडीविषयी प्रश्न येणारच. तिला हवे ते कपडे तिने घातले आहेत हे उत्तर पुरेसं नाही. तिला हेच कपडे का हवेत असा प्रश्न आहे.
कपड्यांच्या निव्वळ परस्परविरोधालादेखील आक्षेप नाही. या विरोधातून काही आशयाशी सुसंबद्ध विधान होत असलेलं दिसायला हवं.
मनोरंजक
पण एकदा कपडे घातल्यानंतर ते बेंगरूळ असतील तर शोभा कमी होते इतकंच म्हणणं आहे. त्यातही डोक्यावर मुस्लीम स्त्रियांप्रमाणे केस घट्ट झाकणारं वस्त्र, चेहऱ्यावर भरतनाट्यम नर्तकीचा मेकप, खांदा ते कंबर यात नुसतीच पोल्का डॉट बिकिनीची ब्रा, कंबरेला स्कॉटिश क्विल्ट आणि पायात हंटर शूज घातले तर ती स्त्री कितीही सुंदर असली तरी या निवडीविषयी प्रश्न येणारच. तिला हवे ते कपडे तिने घातले आहेत हे उत्तर पुरेसं नाही. तिला हेच कपडे का हवेत असा प्रश्न आहे.
तुमच्या निरीक्षणाला मनोरंजनमूल्य आहे हे निश्चित. पण कवितेबाबत तुमची ही मते पटण्यासारखी नाहीत.
कपड्यांच्या निव्वळ परस्परविरोधालादेखील आक्षेप नाही. या विरोधातून काही आशयाशी सुसंबद्ध विधान होत असलेलं दिसायला हवं.
या कवितेत आशयाशी सुसंबद्ध विधान असेलही नसेलही. परंतु आशयाशी सुसंबद्ध विधान होत असलेलं दिसायला हवं हे तुमचं मतही पटण्यासारखं नाही.
सर्वांचे आभार
सर्वांचे आभार.
काही स्पष्टीकरणे :
@प्राजु, मुक्तसुनीत, चिंतातुर जंतू, विसुनाना, सुबोध साने
"स्वल्प झालीये विराम" मध्ये "झाली"चा अन्वय "रात्र"शी आहे. (कडव्यातील पहिल्या ओळीत "रात्रीतील" शब्द आहे. तो विषय "व्याकरणातले उद्देश्य" होऊन पूर्ण कडव्यात चालतो.)
("होणे/झाला" क्रियापदाचा लिंग-अन्वय वाक्यातील कुठल्या शब्दाने ठरतो? उदाहरणार्थ : "(संसदेच्या कामकाजात) टू-जीचा घोटाळा (हा) मोठी अडचण झाला आहे." किंवा "(ही) मोठी अडचण झाली आहे." दोन्ही वाक्ये व्याकरणाच्या दृष्टीने चालतात. मात्र अर्थच्छटेत काही सूक्ष्म फरक होतो. लिंग-अन्वयासाठी साठी जो शब्द निवडला आहे, तो उद्देश्य - टेंपररी टॉपिक ऑफ कॉन्व्हर्सेशन - म्हणून उचलला जातो.)
"स्वल्प झालाय विराम" मध्ये अध्याहृत आहे, की विराम दीर्घ हवा होता, पण तो स्वल्प झाला, ही तक्रार आहे.
"स्वल्प झालीये विराम" : रात्रीच्या तळमळीला "विराम" म्हटले, आणि आगल्या-मागल्या दिवसांबाबत त्यापेक्षाही मोठी तक्रार अध्याहृत आहे.
@क्रेमर : "थोडीशी शब्दबंबाळ" करिता "शब्दसंपन्न" हा मृदू शब्द आवडला :-)
@नंदन : "पर्सिस्टन्स ऑफ मेमरी"च्या चित्राची मनातली नवीन आवृत्ती डिजिटल घड्याळांसकट केली ना?
@ सुबोध साने
ह्याचे निजलेले श्वास ... हा अधुऱ्या प्रणयाकडे तर इशारा नाही ना?
योग्य विचार आहे. ही बाब अंधुकपणे मनात यावी.("हा" शेजारी निजलेला व्यक्ती आहे.)
@राजेश घासकडवी आणि सुबोध साने यांच्यातील संवाद :
यमके आणि लय यांची रचना जशी आहे, तशी अनेक आवृत्त्यांच्या नंतर - म्हणजे सहेतुक - झालेली आहे. सुरुवातीच्या चार-पाच ओळी वाचून काय "बंधन स्वीकारले" आहे, ते सहज लक्षात येऊ नये, असे वाटते. "यमके आहेत, आणि गद्यापेक्षा तरी लय नियमित असावी" हे इतकेच समजते. यमकांचा क्रम आणि आघातांचेचे वितरण थोडेसे अस्ताव्यस्त आहे. त्यामुळे मुक्त-"वृत्त" काय आहे, आणि कुठले यमक किती ओळींच्या नंतर पुन्हा येईल ते लक्षात येणार नाही. माझ्यातरी लक्षात येत नाही. कवितेच्या शेवटापर्यंत यमकांची स्कीम आणि ठेका जवळजवळ नियमित होऊ बघतात. पण पुरते नियमित होत नाही. हा प्रवास हे स्वीकारलेले बंधन आहे.
अस्वस्थ रात्रीतल्या अवचित जागरणात होणार्या संवेदनांमध्ये अनेक लयी आहेत - त्या विसंवादी आहेत ही सुरुवातीची अस्वस्थता आहे. आणि शेवटास त्या विसंवादाची काहीतरी अस्वस्थ "बिग पिक्चर - विहंगावलोकी" व्यवस्था लावलेली आहे. वगैरे. नाटकातल्या बेंगरूळ पात्राला रूढार्थाने बेंगरूळ वेशभूषच शोभते - कथानक बेंगरूळ पात्राचे, आणि कपडे-मेक-अप मात्र टापटीप असे नको. मात्र तो बेंगरूळपणा (वेशभूषाकार+नट+नाटककार एकत्र पॅकेज) बेंगरूळपणाचे कार्यक्षम प्रदर्शन करण्यासाठी चांगला वठला आहे की नाही? की अकुशलतेमुळे असा काही गबाळेपणा आहे - आणि बेंगरूळपणाचे प्रकटनच अकार्यक्षम झालेले आहे? हा प्रश्न पडू शकतो. ही टीका अर्थातच कोणी केली तर मी मनापासून नीट ऐकून घ्यायला पाहिजे. मात्र मी अकार्यक्षमतेबाबत टीका मानून घ्यायला तयार आहे, नुसत्यास अव्यवस्थेबाबत नव्हे! (कारण माझ्या मते प्रदर्शनासाठीची अव्यवस्था पूर्ण पॅकेजमध्ये बंधन म्हणून स्वीकारलेली आहे.)
ठरवलेल्या भावनिक कथानकाकरिता शब्द/यमक/लय रचनाच चित्र बनली आहे, असे कविता माझे रचतानाचे मत होते.* (अजूनही तसेच मत आहे. पण अर्थातच कविता रचून हाताबाहेर गेली असल्यामुळे "कवितेत सांगितलेल्या घटनाक्रमातले अन्य भावनिक कथानक अधिक गहिरे आहे, त्यास पूरक रचना हवी होती" अशी एखाद्या वाचकाची प्रतिक्रिया असली, तर तीसुद्धा ग्राह्य पर्यायांपैकी मानतो.)
*कविता रचताना "मेटा"रचनेचा साचा आधी बनवून शब्द मारून मुटकून बसवलेले नाहीत ; तर कविता रचताना अनेक पर्यायी शब्दयोजना मनात येत असताना शब्द आणि "मेटा"रचना सहविकसित होत गेले. वरील विश्लेषण हे मीदेखील रचना "पक्की" केल्यानंतर त्रयस्थ नजरेने - पण स्मृतीची साधनसामग्री घेऊन - केलेले आहे.
"स्वल्प झालीये विराम" :
"स्वल्प झालीये विराम" : रात्रीच्या तळमळीला "विराम" म्हटले, आणि आगल्या-मागल्या दिवसांबाबत त्यापेक्षाही मोठी तक्रार अध्याहृत आहे.
हे मनात आले होते. मात्र सुलभतेला प्राधान्य देण्याच्या प्रवृत्तीने झालाय सुचवले.
यमके आणि लय यांची रचना जशी आहे, तशी अनेक आवृत्त्यांच्या नंतर - म्हणजे सहेतुक - झालेली आहे.
सहेतुक असण्याची दाट शंका मी माझ्या आधीच्या प्रतिसादात व्यक्त केली होती. तुमच्या प्रतिसादामुळे रिअॅश्युर झालो.
(माझ्या या आधीच्या प्रतिसादाला उपेक्षित 3 ही श्रेणी मिळाली आहे. ही श्रेणी मला नीटशी कळलेली नाही.)
कविता वाचली तेव्हा
कविता प्रथम वाचली तेव्हाच 'तरुण आहे रात्र अजुनी...' ही कविता मनात रुंजी घालू लागली.
इथे हा अवकाश, ही पोकळी वक्त्याच्या बाजूने व्यक्त होत आहे. आणि तो केवळ शारीर नाही.
हा स्वल्पविराम कधीतरी प्रत्येक प्रेमी युगुलात येत असावा.
एकत्र आयुष्याच्या संयुक्त वाक्याचा अर्थ लागण्यासाठी कुठेतरी असा स्वल्पविराम हवा असतो. नाहीतर ती केवळ शाब्दिक गुंतावळ होते.
पण त्या स्वल्पविरामाचा पुढे अर्धविराम वा पूर्णविराम होऊ नये असेही वाटते.
बाकी अजूनही 'झालीये की झालाय' हे काही पक्के होत नाही.:(
नक्की सांगता येणार नाही
उशीरा वाचली.. मला कळली कि नाही सांगता येऊ नये मात्र जोडीदाराने (कामामुळे?) एकुणच कमी होत चाललेल्या एकत्रित जीवनावर -- कमी होत चाललेल्या एकत्रित स्वल्पविरामामुळे व्यक्त केलेली रुखरुख - खंत असा या कवितेचा विषय असावा असे वाट्ते.
अती कार्यामुळे (घडाळ्याशी बांधलेल्या आयुष्यात शेवटी दमून शेजारी) झोपलेल्या जोडीदारासमवेतच्या रात्री केवळ आठवतच नाहियेत तर त्याच्या 'लयीतील' फरकही जाणवतो आहे. मग ही खंत अश्या शब्दात व्यक्त होतेय.. असं काहिसं मनात आलं. आता हा अर्थच आहेच की नाकी कोण जाणे
रचना आवडली.. वेगळ्या शब्दयोजनेमुळे एकप्रकारची पुसटशी अनामिक हुरहुर दाटली
प्रतिसाद
कविता आवडली. समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे.
बधीर दोन दिवसांतील
स्वल्प झालीये विराम.
याचा अन्वय कसा लावायचा ? "विराम स्वल्प झाली आहे" ? हे तर काही बरोबर वाटत नाही. मग काय स्वल्प झाली आहे ?
ताजा कलम : "प्रिव्ह्यू" बरोबरच लगोलग प्रतिसाद प्रकाशित करण्याचा पर्याय दिल्याबद्दल आभारी आहोत.