ए०आय० आणि मी
ए०आय० आणि मी
============
-राजीव उपाध्ये
सध्याच्या ए०आय० त्सुनामीमध्ये व्यक्तीगत पातळीवर ए०आय० कसा हानीकारक आहे, यावर परत-परत येणार्या नकारात्मक बातम्या बर्याच घातक आहेत. यात ए०आय०चा सल्ला कसा चुकीचा ठरला, हे मनावर बिंबविण्याचा प्रयत्न सतत केला जातो. पण ए०आय० ची चांगली बाजु भारतात तरी पुरेशी प्रकाशात आणली जात नाही, असे माझे मत बनले आहे.
ए०आय० या तंत्रज्ञानाप्रमाणे मी परिधानक्षम (वेअरेबल सेन्सर) तंत्रज्ञानाचा चाहता आणि खंदा समर्थक आहे. आज मितीला उपलब्ध असलेले तंत्रज्ञान योग्य तर्हेने वापरल्यास समाजातल्या अनेकांचे कल्याण करू शकते (विशेषत: चुकीचे सल्ले, अपमृत्यू टाळणे इ०) याची मला खात्री आहे. आधुनिक वैद्यकाचे व्यावसायिक तज्ज्ञ या साधनांच्या वापराबाबत अजूनही ठाम भूमिका घेऊ शकत नाहीत, ही दूर्दैवाची गोष्ट आहे.
वेळीच टाकलेला टाका पुढचे नऊ टाके वाचवतो, या उक्तीवर माझा ठाम विश्वास असल्याने स्वत:च्या तब्येतीची स्वत: सर्व तर्हेने काळजी मी घेतो. त्यासाठी मी अनेक साधने विकत घेऊन वापरून बघितली आहेत आणि काही तर रोज वापरत आहे. माझ्याकडे ३ इसीजी साधने (हृदयमापक), ३ इइजी साधने (मेंदूतील लहरींचे मापन), स्मार्ट अंगठ्या [१], रक्तदाब, रक्तशर्करा मोजणारी वेगवेगळी साधने आणि इतर बराच ऐवज मी गोळा करून वापरतो. आता काही लोकांना हा वेडपटपणा वाटेल, तर कुणाला वा्टेल की मला देखावा करायला आवडतं. पण निसर्गाने मला अमर्याद जिज्ञासा दिली आहे. त्यामुळे ती शमवणे हा हेतू असतोच, पण डॉक्टरांवरचा अनेक कारणांनी उडालेला विश्वास हे पण प्रमुख कारण त्यामागे आहे. मग मला अनेकजण मला प्रश्न विचारतात - "मग तुला डॉक्टरांची गरज काय?" या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर म्हणजे "कायदा मला स्वत:चे प्रिस्क्रिप्शन लिहायची परवानगी देत नाही."
पण ते जाऊ दे!
अलिकडेच मी म्युस २.० हा मेंदूच्या लहरींचे मोजमाप करणारा ५ चॅनेलचा हेडबॅण्ड विकत घेतला. या अगोदर १ चॅनेल आणि ८ चॅनेल असे दोन इइजी मापक मी वापरले होते. ध्यानाची परिणामकारकता मोजण्यासाठी "गुरुचे मार्गदर्शन" घेण्यापेक्षा, मेंदूच्या लहरींचे मोजमाप जास्त वस्तूनिष्ठ आणि परिणामकारक आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. म्युस २.० ची किंमत अमेझॉनवर बरीच असल्याने तो घ्यायचे अनेक वर्षे रेंगाळले होते. पण अचानक एका वेबसाईटवर जवळजवळ निम्म्या किमतीला हा हेडबॅण्ड उपलब्ध असल्याचे कळल्यावर मी "फसवणुकीचा धोका" असुनही चान्स घ्यायचे ठरवले. माझ्या नशीबाने सदर वेबसाईटकडून माझी कोणतीही फसवणूक न होता मला एक अस्सल, कोरा-करकरीत हेडबॅण्ड ऑर्डर केल्यानंतर १ महिन्यानंतर मिळाला (कुरीयर कंपनीने मात्र माझी माहिती सायबर चोरट्याना कळविल्यामुळे माझे बॅंकखाते लुटायचा प्रयत्न झाला, पण मी वेळीच सावध झाल्याने तो यशस्वी झाला नाही. त्याबद्दल नंतर कधीतरी). असो...
म्युस हेडबॅण्डमुळे माझी ध्यानातली प्रगती "समाधानकारक" असल्याचे लक्षात आलेच, पण या हेडबॅण्डचा अभ्यास करताना असे लक्षात आले की मेंदूच्या लहरींचा कच्चा विदा (रॉ-डेटा) पण यात संशोधन किंवा तत्सम अभ्यासासाठी मिळवता येतो. या नव्या खेळण्याबरोबर खेळत असताना एक दिवस कल्पना सुचली की हा कच्चा विदा ए०आय० ला दिला तर ए० आय० त्याचा नक्की काय ’चिवडा’ करेल, हे करून बघावे? तेव्हा मी चॅटजीपीटीला हा विदा ’भरवला’ आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला...
चॅटजीपीटीने बनवलेला चिवडा (विश्लेषण) भलताच खुसखुशीत निघाला. अनेक निष्कर्ष केवळ अचूकच नाही तर उपयुक्त होते. त्यातले इथे सांगण्यासारखे दोन म्हणजे - ध्यान परिणामकारक होण्यासाठी माझे श्वसन कसे असायला हवे, आणि २. माझी एकाग्रतेची क्षमता फक्त २० मि० आहे हा निष्कर्ष.
माझी एकाग्रतेची क्षमता (अटेंशन स्पॅन) २० मि० आहे, हे अचूक निदान मला "घरच्या-घरी" अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानामुळे, फकत ५ मि०चा विदा नोंदवून करता आले, पण यामुळे पूर्वायुष्यातील बर्याच गोष्टींवर लख्ख प्रकाश पडला - मी कोणत्या अवस्थेमध्ये कार्यक्षम असतो किंवा नसतो, याचे मेंदूच्या पातळीवरील उत्तर मला फार महत्त्वाचे वाटते.
अहवालाच्या सुरुवातीलाच -अटेंशन स्पॅन कमी म्हणजे कमी बुद्धीमत्ता असा अर्थ लावायचा नाही, असे पण चॅटजीपीटीने बजावले! एकाग्रता कमी असण्याची कारणे अनेक असतात. माझ्यासारख्या कमी एकाग्रतेची अनेक नामवंत व्यक्तीमत्त्वे असल्याचे चॅटजीपीटीने सांगितले (यात नावांची थापेबाजी असू शकते). मुद्दा असा की आजुबाजुचे वातावरण योग्य असेल तर कमी एकाग्रता हा प्रगतीमधला अडथळा ठरू शकत नाही.
चॅटजीपीटीला मी मग मनाचे समाधान होई पर्यंत अनेक प्रश्न विचारले आणि अर्थातच त्याची उलटतपासणी पण घेतली. हे सर्व मला मानवी तज्ज्ञाकडुन मिळवण्यासाठी वेळ, पैसा, उर्जा, नको ते सल्ले आणि त्यांची मिजास सांभाळणे अशा अनेक पातळ्यांवर अवघड गेले असते, हे नक्की.
तात्पर्य - ए०आय० चिरायु होवो!
चीनमध्ये इइजी हेडबॅण्डचा उपयोग मुलांच्या ग्रहणक्षमतेचा अभ्यास करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होतो असे कळले [२]. परिधानक्षम साधनांचे तंत्रज्ञान अत्यंत गुणी आहे, असे निश्चितपणे म्हणता येते, पण ’योजक: तत्र दूर्लभ:’ हे मात्र तितकेच खरे!
केवळ इइजीच नाही तर इतर अनेक तंत्रे वापरून माझे आणि माझ्या कुटुंबाचे हित मी पहात आहेच - पण भारतासारख्या नैसर्गिक साधन-संपत्तीची नासधूस करणार्या देशात याबाबतीत कधी उजाडेल हे मात्र असलेला नसलेला परमेश्वरच जाणे!
[१] लग्नामध्ये वधूवरांनी एकमेकांना सोन्याच्या अंगठ्या देण्याऐवजी स्मार्ट अंगठ्या द्याव्यात.
[२] https://www.youtube.com/watch?v=JMLsHI8aV0g
.
मी अलीकडेच व्यायामाचं मोजमाप चालू केलं आहे. आणि माझ्या लेखात सांगितल्याप्रमाणे, पाण्यातल्या laps मोजताना माझ्या घड्याळाची गडबड होते. त्याचप्रमाणे एका डॉक्टरने मला सांगितलं आहे की या उपकरणांमध्ये जी हार्ट रेट व्हेरिएबिलिटी दाखवली जाते (HRV) तीही बहुतेकवेळा चूक असते. आता अंतराचा पडताळा आपण अंतर मोजून करू शकतो पण मेंदूच्या लहरींचे व्हेरिफिकेशन कसे करणार? मुळात ही उपकरणं पारंपरिक उपकरणांशी व्हालिडेट केलेली आहेत का आणि त्याची काही विदा उपलब्ध असते का?
मला नेहमी बिग बँग थियरी मधील शेल्डन आणि पेनी आठवतात. एकदा ते दोघे एकत्र पळायला जायचं ठरवतात तेव्हा शेल्डन सर्व प्रकारची उपकरणं लावून येतो आणि पेनी मात्र कसं काहीही न घालता येते. त्यावर तो म्हणतो की तू व्यायाम मोजत नाहीस? तर ती म्हणते:
I just run until I am tired and then eat a bear claw.
हार्ट रेट व्हेरिएबिलिटी =…
हार्ट रेट व्हेरिएबिलिटी = हृदयगतीची लवचिकता (हृगल)
हृगल चे मोजमाप टाईम डोमेन आणि फ्रिक्वेन्सी डॊमेन असे दोन प्रकारे केले जाते. तसेच मोजण्याचा कालावधी किती होता यावर बरेच काही ठरते. २.५ मि, ५ मि० २४ तास असे काही प्रमाणित कालावधी संशोधनात वापरले जातात. तसेच टाईम डोमेन मधले मोजमाप तांत्रिक पार्श्वभूमी असलेल्याने थोड्या प्रयत्नाने समजते. त्यात परत एस०डी०एन०एन० (मॅक्रो) आणि आर०एम०एस०एस०डी (मायक्रो) असे दोन पॅरामिटर्स महत्त्वाचे असतात. तुम्ही व्यायाम करता तेव्हा हृदय पूर्वपदाला येते की नाही हे एस०डी०एन०एन० वरून समजते. तुम्ही स्वस्थ असता तेव्हा शरीराची स्वास्थ्य रक्षक यंत्रणा किती कार्यक्षम आहे, हे आर०एम०एस०एस०डी (मायक्रो) वरून समजते. तसेच आर०एम०एस०एस०डी (मायक्रो) सतत घसरण भावी आरोग्य विषयक कटकटीची निदर्शक असते.
परिधानक्षम साधनांमध्ये नक्की काय मोजतात एस०डी०एन०एन० की आर०एम०एस०एस०डी हे उत्पादक जाहिर करत नाहीत. उदा० ॲपलच्या घड्याळात एस०डी०एन०एन० हा पॅरामिटर ठराविक अंतराने मोजला जातो. हे मला एका युट्युब व्हिडीओ मुळे कळले. मी वापरतो त्या अंगठीत आर०एम०एस०एस०डी हा पॅरामिटर मोजला जातो. पण ते माझे मला शोधावे लागले.
हे सर्व समजाऊन सांगायला डॉक्टरांना वेळ आणि उत्साह नसतो. बर्याच वेळा माहित पण नसते.
>>>मेंदूच्या लहरींचे व्हेरिफिकेशन कसे करणार?
ही सर्व उपकरणे बर्याच चाचण्यामधून तावून सुलाखुन गेलेली असल्याने "निअर क्लिनिकल ग्रेड" मानली जातात. लांडगा आला रे (फॉल्स पॉझिटीव्ह) हा एक ठळक दुर्गुण यांच्या भाकीतात असू शकतो.
पबमेड वर यासंबंधी भरपूर संशोधन मिळेल.
सावध रहा! जपून पाऊल टाका!!
तेव्हा मी चॅटजीपीटीला हा विदा ’भरवला’ आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला...
लेख छान जमलाय
अजून वाचायला आवडेल. ही गॅजेट्स(इसीजी, इइजी, म्युस इत्यादी) कशी वापरता, डेटा कसाऑर्गनाईझ करता आणि ए आय वापरून कसे विश्लेषण करता ते.
>> तेव्हा मी चॅटजीपीटीला हा विदा ’भरवला’ आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला...
>> चॅटजीपीटीने बनवलेला चिवडा (विश्लेषण) भलताच खुसखुशीत निघाला
>> अनेक निष्कर्ष केवळ अचूकच नाही तर उपयुक्त होते.
या बाबतीत बी केअरफूल. चॅटजीपीटी (आणि इतर) बरेचदा तुम्हाला जे आवडेल तीच माहिती सांगतात.
डेविल्स एडवोकेट पण पाहिजे.