Skip to main content

ए.आय -२०२६

मागे अबापटांनी करोना डायरीज, असा विषय मांडला होता . २०२०/२१/२२ त जग करोनाच्या विळख्यात सापडलं होतं तेव्हा एक नव्-अस्तित्व आपल्या आजूबाजूला पसरत होतं. आता मागे वळून बघितलं तर कित्येक नोंदी ह्या अशक्य, असंभव वाटतात.

तद्वतच, ए.आय गेल्या काही वर्षांत झपाट्याने आपला एक अवयव बनत चालला आहे.
उ.दा. -
- मी गेल्या अख्ख्या वर्षात एकही ओळ कोड लिहिला नाही. सगळं काम ए.आय अवजारं वापरून, त्यांच्याशी संवादून, बोलून, धमकावून करून घेतलंय.
- वैयक्तिक आयुष्यातही "गूगल सर्च"ची जागा आता "गूगल ए.आय" मोड किंवा तत्सम चॅटबॉट ह्यानी घेतली आहे.

पण मजा म्हणजे २०२४ साली मी इतका ए.आय वापरत नव्हतो, आणि २०२५ साली मी हीच अवजारं वापरून जे काही करीत होतो, आज २०२६ साली त्याहून फार पुढे गेलोय.

तर ह्या अशा नोंदी तुमच्याकडे असतील तर जरूर लिहा.
जग फार झपाट्याने बदलणार आहे - आणि मागे वळून बघताना स्वतःच्याच नोंदी कदाचित अविश्वसनीय भासल्या, तर त्यात काही नवल नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 27/04/2026 - 06:36

अस्वला, उत्तम विषय आहे.

मी गेल्या महिन्यापर्यंत एआय वापरून कोड लिहायला तयार नव्हते. पण गेले ३-४ आठवडे पटापट काम करायचं म्हणून एआय वापरलं; शिवाय नक्की काय करायचं हे माहीत होतं त्यामुळे एआय बरळायला लागलं तरीही ते सहज थांबवता येत होतं. त्यामुळे काम किती पटापट झालं, आणि तेही मी एकटीच कोड लिहीत असूनही, याची जाणीव झाली.

अजूनही मी माहीत नसलेल्या गोष्टी एआयच्या हवाली करणार नाही. विशेषतः फार पॉप्युलर नसणाऱ्या विषयांमध्ये. उदाहरणार्थ, उपग्रहातून मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सीला घेतलेल्या प्रतिमांचं काय करायचं - हे काम लवकरच सुरू करणार आहे. हे मला फार माहीत नाही आणि माझा एआयवर फार विश्वासही नाही. याबद्दल आणखी दोन वर्षांनी काय म्हणेन कोण जाणे!

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 27/04/2026 - 06:40

गेलं जवळजवळ वर्षभर माझ्याकडे ऑफिससाठी मायक्रोसॉफ्ट कोपायलट आहे - कोडवालं निराळं. "ती चार महिन्यांपूर्वी अमका-फलाणा मजकूर असलेली स्लाईड बघितली होती, ती शोधून दे" अशा छापाच्या गप्पा रोजच चालतात.

स्लाईड सुंदर बनवण्याचं काम मी कोपायलटकडूनच करून घेते. ते सौंदर्य थोडं पॉर्नसारखं असतं - बघितल्यावर समजतं, पण नक्की काय हवं ते सांगता येत नाही.

ऑफिसच्या महत्त्वाच्या मिटींगांमध्ये मी नोट काढणं सोडून दिलं आहे; ते कामही आता कोपायलट करतं. जिथे कोपायलट वापरता येत नाही, तिथे फार चिडचिड होते बिनडोक कामं करायला पर्याय असूनही वापरता येत नाही म्हणून.

सुधीर Tue, 28/04/2026 - 12:25

माझ्या मते कुठलं मॉडेल कुठल्या कामासाठी जास्त चांगलं आहे असा धागा पाहिजे...

कोडींगसाठी माझा अनुभवः

कोडेक्स आणि क्लॉड मध्ये मला क्लॉड जास्त स्मार्ट वाटलं. त्याने एक बग ( स्टॅक्ड बार चार्ट साठी ) जो Chart.js आणि AngularJS च्या वेगवेगळ्या व्हर्जनमुळे असलेला बग शोधून दिला.. व्हर्जन फिक्स करायला सांगितले.. कोड चालला... कोडेक्सने खूप फिक्सेस दिले पण चाललं नाही. पण कोडेक्स वाईट नाही. गीटहब कोपायलट मी वापरलेले नाही. पण कोडेक्स ती उणीव भरून देतो.. त्याला इन्क्रिमेंटल फीचर साठी काय बदल करावा लागेल हे सांगितले तर तो बरोबर फाइल्स शोधून बदल करून देतो.

क्लॉडचं मी सबस्क्रिप्शनघेतले.. कोवर्क साठी... लॅपटॉप/डेस्कटॉपची छोटी छोटी कामं ऑटोमेट करू शकेन हा विचार करून... पण ते फिचर्स इतके पण इम्प्रेसिव्ह नाही वाटले.. बघू अजून वापरून बघतो आहे. पण थोडक्यात क्लॉड मला थोडं अ‍ॅडव्हान्स्ड मॉडेल वाटलं (इन जनरल.. नॉट जस्ट फॉर कोडींग, पीडीएफ रिड करून अनस्ट्रक्चर डेटा स्ट्रक्चर्ड फॉर्म मधे घेऊन येणे इ. कामासाठी). बाकी छोट्या मोठ्या कामासाठी विंडोज कोपायलट पण खूप चांगलं आहे. मी गूगल सर्च च्या ऐवजी विंडोज कोपायलट जास्त वापरतोय... गुगलचं जेमीनी मला सगळ्यात लेचंपेचं मॉडेल वाटलं.. त्यामानाने चायनिज डीपसीक पण खूप चांगलं आहे. काल त्यांचं नवीन मॉडेल आलं पण ते तितकं काही खास नाही असा सूर ब्लूमबर्गवर दिसला... ही एआय आर्मरेस दिवसेंदिवस नेक टू नेक होत जाणार आहे असं वाटते...

अवांतर...

सध्या इंडियन आय टी सर्व्हिसेस इंडस्ट्री मध्ये "एआय डिफ्लेशन" हा शब्द मॅनेजमेंट कॉल्स आणि अ‍ॅनालिस्ट्स मध्ये चलनी झाला आहे... स्ट्रीट हे गृहीत धरून चालले आहे की, दरवर्षी साधारण २% ते ५% आयटी सर्व्हिसेसचे काम ऑटोमेट होईल... मला ५% टक्के पण खूप कन्झर्वेटीव्ह एस्टीमेट वाटते. कारण ५% च्या हिशेबाने पण ५०% टक्के काम ऑटोमेट करायला १०-१२ वर्ष जातील. पण एकंदर यामुळे आय टी सर्व्हिसेस इंडस्ट्रीचा रेव्ह्यून्यू धोक्यात आहे. आयटी इंडेक्स जवळ जवळ २०% ने पडला आहे. आणि त्याच्या अगदी उलट साउथ कोरीया आणि तैवान मध्ये एआय बूम चालू आहे.. दोनही इंडेक्स जवळ जवळ ३०% वर आहेत... गेल्या आठवड्यात न्यूझिलंडच्या कुठल्याशा फुटवेअर कंपनीने नावात ए.आय. काय केलं आणि स्टॉक ६००% (होय ६००%) वर गेला.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 29/04/2026 - 03:07

In reply to by सुधीर

माझ्या मते कुठलं मॉडेल कुठल्या कामासाठी जास्त चांगलं आहे असा धागा पाहिजे...

आत्ता कुठल्या कामासाठी कुठलं मॉडेल चांगलं आहे; असं म्हणता येईल.

गिटहब कोपायलट मला हाफीसात मिळतं म्हणून वापरते. त्यातही लफडं असं आहे की जीसीपी - गूगल क्लाऊड प्लॅटफॉर्मवर काम करायचं तर ते VSCodeमध्ये वापरणं सोपं नाही. माझ्या एक विश्वासार्ह मित्रानं त्याचा नाद सोडल्याचं सांगितलं म्हणून मीही फार तपास करत बसले नाही. तसं AWSचं नाही; ते आपल्या VSCode किंवा कुठल्याही एडिटरवर चालवता येतं. मग आपली भलभलती एलेलेमं तिथे वापरता येतात.

हल्ली आणखी एक विषय ऐरणीवर आल्यासारखा वाटतो. तुम्ही कुठल्या एडिटरमध्ये कोड लिहिता. डेटा सायन्ससाठी मी कित्येक वर्षं Atom, Jupyter Notebook/Lab आनंदानं वापरत होते. ॲटमचा अस्त झाला. ज्युपिटर लॅब ब्राऊझरवर वापरलं तर तिथे एलेलेम मिळत नाही. मग मी झक्कत VSCode आणि Cursor या पर्यायांवर आले.

त्यातही कधीकधी मला एलेलेम नको असतात. मला माझा विचार करूनच कोड लिहायचा असतो. तेव्हा ते बंद करणं VSCodeमध्ये सोपं नाही; पण तिथे आधीच मी सगळी एलेलेमची जोडणी करून ठेवली आहे. आता मी विचार करत्ये की कर्सरही वापरायचं, त्यात एलेलेम ठेवायचं नाही. इकडून तिकडे उड्या मारायच्या. मी तशीही या कामासाठी कीबोर्ड शॉर्टकट फार वापरत नाही; त्यामुळे चालून जाईल.

गवि Tue, 28/04/2026 - 20:00

रोचक विषय. माझेही चार आणे जमतील तसे ॲड करेन.

उबरची बातमी वाचलीच असेल. वर्षभराचे पूर्ण बजेट एका क्वार्टरमधे चट्टामट्टा. आणि उबर एकटी नाही. आता यावर कंट्रोल ठेवायला पाहिजे होता ही पश्चातबुद्धी अनेक कंपन्यांना होते आहे.

मॉडेल फार जागतिक पातळीवर (विषय) ट्रेन झालेलं असण्यापेक्षा खास विषयासाठी डिस्टिल करून किंवा डाउनलोड करून वापरल्याने टोकनावरी पैसे जाणे टाळता येते. शिवाय एक लेअर मध्ये ठेवून प्रत्येक वेळी पूर्ण कन्टेन्ट मॉडेलकडे न पाठवता नेमका भाग पाठवणे असे उपाय केल्यास बॅलन्स होईल. नाहीतर मनुष्यबळ चाळीस टक्के कमी करणे आणि कोडिंग, डिलिव्हरी वेग दुप्पट वाढवणे या नादात बिले दहापट होत आहेत.

अस्वल Tue, 28/04/2026 - 21:59

हापिसातली कामंच नव्हेत, तर घरीही ह्याचा वापर होतो आहे.
मागल्या महिन्यात कुठल्याश्या मसण्या साईटने "सगळी डॉक्युमेंट्स ५ एम्बी" च्या आतच अपलोड करा असा फतवा काढला.
मी घाबरलो नाही. कोपायलटला एक स्क्रिप्टायला सांगितलं, त्याने छानबीन करून मला माझी २० एक कागदं त्या ५ एम्बीच्या आत व्यवस्थित बसवून दिली.
२०२५ पूर्व मी ह्यासाठी स्वतः एक कोड लिहिला असता, आणि तो जीवापाड जपून पुन्हा वापरायला म्हणून सुरक्षित लपवला असता. आता नाही.
"कोड" आता टाकाऊ आहे- २० वर्षं प्रोग्रॅमिंग केल्यावर हे पटायला फार अवघड आहे, पण तरीही वस्तुस्थिती अशीच आहे.
कोड आता क्षणभंगुर आहे. त्याने काम झाल्याशी मतलब.

आणखीही बर्‍याच गोष्टी आता मला घरच्या घरी "करून पाहता" येतात आणि आवडल्या नाही तर मी ते सगळं मोडून टाकायला कचरत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 29/04/2026 - 03:53

कोड कशासाठी लिहिला आहे त्यानुसार तो टाकाऊ आहे का नाही हे ठरेल. बारक्या कामांसाठी लिहिलेले छोटे-मोठे कोड आधीही टाकाऊ होत असतीलच. आता ते चटपट टाकाऊ होतील.

उलटपक्षी, जर बरे लोक प्रॉडक्शन कोड लिहीत असतील तर तो कदाचित जास्त बरा लिहितील - विशेषतः हे (माझ्यासारखे) कन्सल्टन्ट छापाचे लोक पाट्याटाकू कोड लिहिताना आजूबाजूला दिसतात, त्यांना कदाचित बरा कोड लिहिता येईल.

अस्वल Wed, 29/04/2026 - 08:04

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कोड क्षणभंगुरत्व - हे जास्त बरोबर आहे.
लिहिलेला कोड वेगाने बदलू शकतो, आणि त्यात काही वावगं नाही - हे पचायला अवघड आहे.
ह्या वर्षी म्हणे गिटहबात प्रचंड वेगाने कोड लिहिला जातो आहे, अर्थात एजंट कोडकाम त्वरेने आणि अचूक करू लागलेत.
आणखी वर्षांत जावा, सी++ ,सी ,पायथन वगैरे मंडळी असेंब्ली लॅंग्वेजसदृश झाल्या असतील.

[अ‍ॅसिमोवच्या मल्टिवॅकची आठवण येते आहे]

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 29/04/2026 - 04:00

कॅलिफोर्निया राज्यासाठी आम्ही एक प्रकल्प विकण्याच्या प्रयत्नात आहोत. तिथे मेडिकेडचं (राज्याकडून मिळणारा आरोग्य विमा) जेव्हा नूतनीकरण करण्याची वेळ येते, वर्षातून एकदा, तेव्हा लोकांच्या घरी छापील अर्ज जातात. लोकांची जितकी माहिती राज्याकडे आहे, ती यात भरून पाठवतात, आणि जी माहिती बदललेली असेल ती लोकांनी भरून अर्ज परत पाठवायचा. बहुसंख्य लोक हा अर्ज ऑनलाईन भरतात. तरीही महिन्याला दोनेक लाख अर्ज असे पत्राद्वारे येतात.

हे हातानं भरलेले अर्ज मग लोक हातानं टंकून माहिती पूर्ण करतात. हे काम ऑटोमेट करण्यासाठी जनरेटीव्ह एआय, भाषिक मॉडेलं वापरता येतील, असा आमचा प्रकल्प आम्ही कॅलिफोर्नियाला विकायच्या प्रयत्नात आहोत.

त्यात गंमत अशी की या विम्यासाठी पहिल्यांदा अर्ज करतात तेव्हा अर्जाची पीडीएफ तयार होते, आणि हे केस वर्कर लोक ती पीडीएफ बघून पुन्हा ती सगळी माहिती टंकतात. (हे ऐकून मी कपाळाला हात मारला होता.)

या केस वर्कर लोकांना ताशी २५ डॉलर वगैरे पगार असतो. लॉस एंजेलिसमध्ये जास्त असेल आणि इतर काही गरीब परगण्यांमध्ये कमी असेल. हे लोक फार काळ तिथे टिकत नाहीत. मग नवे लोक येतात. नव्या लोकांना नवीन ट्रेनिंग द्यावं लागतं. तेही हल्ली उरकून टाकतात, असं मला सांगण्यात आलं. मग त्यांच्या मदतीसाठी आणखी चॅटबॉट बनवायचे. यासाठी मोठमोठ्या कन्सल्टिंग कंपन्यांना चिक्कार पैसे द्यायचे. त्यांनी आणखी पैसे खर्चून हे बॉट वगैरे बनवायचे, म्हणजे लोक फटाफट नोकऱ्या बदलत राहिले तरी कामात चुका कमी होतील. 

मग मुळातच या केस वर्कर लोकांना जास्त पैसे आणि जास्त ट्रेनिंग दिलं असतं तर ते सोडून जायचं प्रमाण होईल आणि कमी चुका होतील ना? असले प्रश्न मी विचारायचे नाहीत, कारण त्यातून माझी नोकरी धोक्यात येईल!

सुधीर Wed, 29/04/2026 - 07:53

क्लॉड कोवर्कने काल माझ्या एका फोल्डरमधल्या १०० एक CSV फाईल्समध्ये एक व्हॅल्यू (टिकर चेंज LTIM -->LTM) फक्त चॅट इन्स्ट्रक्शनवर बदलून दिली...

अशा कामासाठी एआयला अगोदर युटिलिटी कोड लिहायला सांगावं लागायचं, मग तो स्वतः रन करावा लागायचा... आता ती पण झंझट नाही. त्याला फोल्डर अ‍ॅक्सेस दिला की तो फक्त इन्स्ट्रक्शनवर काम करून देतो.

ना युटिलिटी कोड लिहून घेणे, ना कोड रन करणे, ना सेव्ह करण्याची कटकट.

"Copilot Tasks" पण अशीच कामं करून देईल असं वाटतं. इथे भारतात तरी अजूनही “You’re on waitlist” असं दाखवतंय...तुम्हा कुणाला अ‍ॅक्सेस मिळाला का?

तर्कतीर्थ Wed, 29/04/2026 - 20:06

मी काहीवेळा पूर्वी युट्यूबवर सफर करत असताना महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनी ए०आय० चा स्वीकार केलेला पाहून आश्चर्यचकीत झालो. ज्या वेगाने या वर्गात ए०आय० पसरला आहे, त्यावरून भारतीय शेतीचे भविष्य उज्ज्वल आहे, असे वाटते.