जैविक लिंगाचा वर्णपट : निसर्गाची गुंतागुंत आणि समाजाची बौद्धिक दिवाळखोरी[2]
जैविक लिंगाचा वर्णपट : निसर्गाची गुंतागुंत आणि समाजाची बौद्धिक दिवाळखोरी[2]
राजीव उपाध्ये
भाग 1 - जैविक लिंगाचा वर्णपट : निसर्गाची गुंतागुंत आणि समाजाची बौद्धिक दिवाळखोरी[१] | ऐसीअक्षरे
भाग २
जैविक लिंग (biological sex) ही सरळ-साधी गोष्ट नाही. त्यात गुणसूत्रे आहेत, प्रजननग्रंथी आहेत, हार्मोन्स आहेत, गर्भावस्थेतील विकास आहे, बाह्य जननरचना आहे, अंतर्गत जननरचना आहे आणि शरीर हार्मोन्सना कसा प्रतिसाद देते हे आहे. या सर्व घटकांचा एकमेकांशी नेहमी परिपूर्ण मेळ बसेल अशी कोणतीही सक्ती उत्क्रांती करत नाही (Hughes et al., 2006). म्हणूनच काही व्यक्तींच्या बाबतीत गुणसूत्रे एक गोष्ट सांगतात, हार्मोन्स दुसरी, शरीररचना तिसरी आणि अनुभव चौथी. यात कोणाचेही षड्यंत्र नसते. हा जीवशास्त्राचा स्वभाव आहे. हे समजत नसेल तर समस्या निसर्गात नाही; समस्या आपल्या अपेक्षांमध्ये आहे.
Complete Androgen Insensitivity Syndrome (CAIS) ची स्थिती वाचली की साध्या उत्तरांबद्दलचा भ्रम उतरतो. गुणसूत्रे XY असतात. अंडकोष अस्तित्वात असतात. पण शरीर टेस्टोस्टेरॉनला प्रतिसाद देत नाही. परिणामी बाह्यरूप पूर्णपणे स्त्रीसदृश विकसित होते. ती व्यक्ती स्वतःला स्त्री म्हणूनच ओळखते, स्त्री म्हणूनच वाढते आणि स्त्री म्हणूनच जगते. नंतर एखाद्या वैद्यकीय तपासणीत अचानक XY गुणसूत्रे आढळतात. त्या क्षणी समस्या त्या व्यक्तीमध्ये नसते. समस्या आपल्या वर्गीकरणाच्या सवयीत असते. कारण वास्तवाने पुन्हा एकदा आठवण करून दिलेली असते की निसर्गाला आपल्या खात्रींचे काहीच देणेघेणे नसते (Quigley et al., 1995).
5-alpha reductase कमतरतेची उदाहरणे तर आणखी रोचक आहेत. Dominican Republic च्या काही भागांत या स्थितीचे प्रमाण तुलनेने जास्त आढळले. Imperato-McGinley et al. (1974) यांच्या अभ्यासात जन्मतः मुलगी वाटणारी मुले यौवनावस्थेनंतर पुरुष वैशिष्ट्ये विकसित करतात असे दिसून आले. तिथे त्यांना "guevedoces" म्हणजे "वयाच्या बाराव्या वर्षी अंडकोष येणारे" असे म्हणतात. या उदाहरणामुळे संगोपन, हार्मोन्स आणि जैविक विकास यांच्यातील संबंध किती गुंतागुंतीचे आहेत हे स्पष्ट होते. पण सार्वजनिक चर्चेला गुंतागुंत नको असते. गुंतागुंतीचा विचार करावा लागतो. घोषणा देण्यासाठी विचाराची गरज नसते. हाच फरक आहे: शास्त्रज्ञ विचार करतात; योद्धे घोषणा देतात.
वैद्यकीय इतिहासात David Reimer चे प्रकरण या संदर्भात विशेष उल्लेखनीय आहे. John Money यांचा विश्वास होता की लिंग ओळख मुख्यतः संगोपनाने घडते. एका दुर्दैवी सुंतेच्या अपघातानंतर Reimer ला मुलगी म्हणून वाढविण्यात आले. अनेक वर्षे हे प्रकरण वैद्यकीय यशोगाथा म्हणून मिरवले गेले (Money & Ehrhardt, 1972). नंतर संपूर्ण कथाच कोसळली. Reimer ने ती ओळख नाकारली. त्याने पुन्हा पुरुष म्हणून जगण्याचा मार्ग निवडला. पण त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते. तो 2004 मध्ये आत्महत्येने मरण पावला (Colapinto, 2000). या घटनेतून एक महत्त्वाचा धडा मिळतो: विज्ञान चुका करू शकते. पण संस्थात्मक अहंकार अधिक धोकादायक असतो. चुकीची कल्पना सोडणे हे चुकीची कल्पना मांडण्यापेक्षा कठीण असते. Money यांनी आपल्या चुकीचा कधीही प्रामाणिक हिशेब दिला नाही. Reimer ने मात्र त्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य मोजले.
कायद्याची अडचण वेगळी आहे. कायद्याला स्पष्ट कप्पे हवे असतात. जन्मदाखले, पासपोर्ट, विवाह कायदे, वारसाहक्क, सैन्य, तुरुंग, क्रीडा स्पर्धा: सर्व व्यवस्था वर्गीकरणावर उभ्या असतात. निसर्गातील गुंतागुंत मान्य केली तर प्रशासनाला स्वतःचा पुनर्विचार करावा लागतो. आणि स्वतःचा पुनर्विचार करणे हे सरकारी संस्थांना सर्वात कठीण काम असते. सत्य बदलण्यापेक्षा फॉर्म बदलणे अधिक कठीण वाटते. म्हणूनच अनेक देशांनी तिसरे पर्याय, X चिन्हे किंवा इतर प्रशासकीय उपाय शोधले आहेत. प्रश्न सुटला नाही. पण कमीतकमी प्रश्न अस्तित्वात आहे हे त्यांनी मान्य केले. भारतात 2014 च्या NALSA निकालाने तृतीय लिंगाला कायदेशीर मान्यता दिली (Supreme Court of India, 2014). हा एक पाऊल पुढे होता. पण प्रत्यक्ष अंमलबजावणीची अवस्था पाहिली की तो पाऊल किती तोकडा पडतो हे उघड होते.
क्रीडाक्षेत्रात हा संघर्ष विशेषतः उघडा पडतो. कारण इथे तत्त्वज्ञान नव्हे तर मीटर, सेकंद आणि किलोग्रॅम यांचा प्रश्न असतो. सरासरी पुरुष आणि सरासरी स्त्री यांच्यात जैविक फरक आहेत. हे वास्तव आहे. त्याच वेळी काही व्यक्ती पारंपरिक वर्गीकरणात सहज बसत नाहीत हेही वास्तव आहे. Caster Semenya चे प्रकरण याचे सर्वात प्रसिद्ध उदाहरण आहे. तिला 46,XY DSD (Difference of Sex Development) ही स्थिती असून नैसर्गिकरित्या जास्त टेस्टोस्टेरॉन असते. तिने ते निवडले नव्हते. निसर्गाने दिले होते. पण World Athletics ने त्याला नियमांचा विषय बनवला आणि Court of Arbitration for Sport ने 2019 मध्ये तिच्याविरोधात निकाल दिला (CAS, 2019).
Michael Phelps ची आठवण इथे अपरिहार्य आहे. त्याला असामान्य शरीरयष्टी मिळाली: उंचीपेक्षा जास्त बाहूंचा विस्तार, दुहेरी सांधे, मोठे हात आणि शरीर सामान्यांपेक्षा कमी lactic acid निर्माण करते. आपण त्याला प्रतिभा म्हणतो. Semenya च्या नैसर्गिक टेस्टोस्टेरॉनला मात्र नियमभंग म्हणतो. ही सीमा नेमकी कुठे आखायची याचे समाधानकारक उत्तर आजही कोणाकडे नाही. दोन्ही बाजू घोषणा देत आहेत. विज्ञान अजूनही आकडे मोजत आहे. पण आकडे मोजणार्याना वेळ द्यायला आपण तयार नसतो.
मानसिक स्वस्थ बिघडलेला
सर्व मूर्ख मीच हुशार हे मानसिक स्वस्थ बिघडलेक्या मानसिक रोग्याच प्राथमिक लक्षण आहे.