वेदवाणी :मत्सर: वैयक्तिक अधोगतीपासून ते राष्ट्रीय प्रगतीच्या विरोधापर्यंत
मानवी मनाच्या दुर्गुणांमध्ये ‘मत्सर’ (ईर्ष्या किंवा जळफळाट) हा सर्वात घातक विषारी विकार आहे. अथर्ववेदातील हा सूक्त मानवाला आत्मपरीक्षण करण्याचा आणि मत्सररूपी विकाराला मनात उमलताच मुळासकट उपटून नष्ट करण्याचा सखोल आध्यात्मिक व मानसिक संदेश देतो. वेद आपल्याला सावध करतात की, मत्सर इतरांचे वाईट करण्यापूर्वी स्वतः आपलीच आंतरिक शांती आणि सारासार विवेक भस्म करून टाकतो. अथर्ववेदात ऋषि म्हणतात,
ईर्ष्याया ध्राजिं प्रथमां प्रथमस्या उतापराम्।
अग्निं हृदय्यं शोकं तं ते निर्वापयामसि॥ (अथर्ववेद ६/१८/१)
दुसऱ्याची प्रगती, यश किंवा आनंद पाहून आपल्या मनात जी मत्सराची ठिणगी पडते, तिच्या पहिल्या तीव्र वेगाला आपण लगेच शांत केले पाहिजे. जर काही कारणास्तव तो पहिला आवेग थांबला नाही, तर त्यानंतर निर्माण होणाऱ्या दुसऱ्या आवेगाला तरी निश्चितच शांत केले पाहिजे. हे माणसा! तुझ्या अंतःकरणात धगधगणारी ही मत्सराची आग आणि त्यातून उत्पन्न होणारा शोक-संताप आम्ही पूर्णपणे विझवून शांत करतो.
पहिल्या ओळीत ऋषि म्हणतात, ‘ईर्ष्याया ध्राजिं प्रथमां प्रथमस्या उतापराम्’ मत्सर एका प्रचंड झंझावाताप्रमाणे मनात प्रवेश करतो. जेव्हा आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला किंवा सहकाऱ्याला पुढे जाताना पाहतो, तेव्हा मनात पहिला विचार सहजपणे मत्सराचा किंवा तुलनेचा येऊ शकतो. मंत्र सांगतो की, त्या पहिल्या आवेगाला (झटक्याला) तिथेच रोखा. जर तो विचार अनावधानाने मनात रुजलाच, तर त्यातून निर्माण होणारी दुसरी मंद किंवा कायमस्वरूपी भावना (द्वेष, षड्यंत्र) तरी कोणत्याही परिस्थितीत विझवून टाकली पाहिजे.
कार्यालयात (Office) जेव्हा तुमच्या सहकाऱ्याला बढती मिळते, तेव्हा "ही मला का नाही मिळाली?" असा पहिला विचार मनात डोकावू शकतो. हा पहिला आवेग आहे. समजूतदार व्यक्ती लगेच स्वतःला समजावते की, "त्याने मेहनत केली, त्याला फळ मिळाले; मीही अधिक प्रयत्न करेन." अशा प्रकारे तो पहिला आवेग शांत होतो. मात्र जो स्वतःवर ताबा ठेवत नाही, तो मनातल्या मनात जळफळत राहतो आणि हळूहळू त्या सहकाऱ्याविरुद्ध कटकारस्थाने रचू लागतो.
ऋषि पुढे म्हणतात, ‘अग्निं हृदय्यं शोकं तं ते निर्वापयामसि’ मत्सर ही बाहेर नसून हृदयाच्या आत धगधगणारी आग आहे. ही आग केवळ समोरच्या व्यक्तीलाच नाही, तर सर्वात आधी त्या मत्सरी माणसालाच मानसिक संताप, तणाव आणि दुःखात लोटून देते. वेद सांगतात की, ही अंतर्गत आग तातडीने विझवणे हेच कल्याणकारी आहे.
मत्सराने ग्रासलेल्या माणसाचे खाणेपिणे आणि झोप उडते. दुसऱ्याची प्रगती पाहून तो दिवस-रात्र स्वतःच दुःखी राहतो. हळूहळू त्याचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडू लागते, रक्तदाब, नैराश्य, निद्रानाश इत्यादि व्याधींनी तो ग्रस्त होतो. मत्सराच्या आगीत तो स्वत:च विनाश ओढवून घेतो. वआपल्या आप्तेष्टांची, मित्रांची किंवा सहकाऱ्यांची प्रगती पाहून आनंद वाटणे हे निरोगी मानसिकतेचे लक्षण आहे. परंतु जेव्हा माणूस मत्सराने पछाडला जातो, तेव्हा त्याचा विवेक नष्ट होतो:
समोरच्या व्यक्तीने स्वतःच्या कर्तृत्वाने किंवा कष्टाने यश मिळवले आहे, हे तो मान्यच करू शकत नाही. "त्याने नक्कीच काहीतरी गैरमार्ग अवलंबून प्रगती केली असणार," असे तो गृहीत धरतो. तो नकारात्मक विचाराने ग्रस्त होऊन अकार्यक्षम बनतो. नौकरी धंद्यात अपेशी ठरतो.
मत्सराचे रूपांतर हळूहळू द्वेषात आणि नंतर सूडबुद्धीत होते. समोरच्या व्यक्तीची प्रतिमा डागाळण्यासाठी तो खोटा प्रचार करू लागतो, त्याच्या मार्गात अडथळे निर्माण करतो आणि शेवटी त्याचे वैभव नष्ट व्हावे अशी इच्छा बाळगू लागतो. ही अवस्था माणसाला नैतिकदृष्ट्या पूर्णपणे अधःपतित करते. आजकाल तर सोशल मीडियावर अश्या खोट्या बातम्यांचा पूर आलेला आहे.
कधी कधी मत्सर केवळ व्यक्तीपुरता मर्यादित नसतो; तो सामूहिक आणि बौद्धिक पातळीवर देशविरोधी रूपही धारण करतो. जेव्हा एखादा देश स्वतःच्या पायावर उभा राहून स्वावलंबी होऊ लागतो, तेव्हा काही संकुचित प्रवृत्ती आणि विरोधी शक्तींना ती प्रगती पचनी पडत नाही.
भारताच्या इतिहासात जेव्हा-जेव्हा स्वावलंबन आणि ऐक्याची चर्चा झाली, तेव्हा अंतर्गत मत्सर आणि संकुचित विचारांनी देशाचे मोठे नुकसान केले. जयचंदसारखी ऐतिहासिक मानसिकता याच गोष्टीचा पुरावा आहे, जिथे स्वतःच्याच शेजारील राज्याची प्रतिष्ठा सहन न झाल्यामुळे परकीय आक्रमकांना आमंत्रण दिले गेले.
सध्याच्या काळात जेव्हा भारत तंत्रज्ञान, उद्योग आणि जागतिक पटलावर नवी शिखरे सर करत आहे, तेव्हा काही तथाकथित विचारवंत आणि माजी धोरणकर्ते या प्रगतीमुळे अस्वस्थ होताना दिसतात.
नुकतेच सेमीकंडक्टर (चिप निर्मिती) क्षेत्रात भारताने स्वावलंबी होण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलले, काही दिवसांपूर्वी उच्च पदांवर राहिलेल्या एका व्यक्तीने असा युक्तिवाद केला की, "भारताला स्वतः चिप्स बनवण्याची काय गरज आहे, त्याची तर तस्करी (smuggle) केली जाऊ शकते." तसेच त्या व्यक्तीने जर भारताला कुणावर ही आक्रमण करायरचे नाही तर मोठ्या प्रमाणात शस्त्र अस्त्रांची निर्मिती करायाची गरज का?
हे केवळ एक बेजबाबदार विधान नाही, तर बौद्धिक दिवाळखोरी आणि राष्ट्राच्या प्रगतीबद्दल असलेल्या मत्सराची परिसीमा आहे. उच्च पदावर राहिलेली व्यक्ती जेव्हा देशाला आत्मनिर्भर पाहण्याऐवजी बेकायदेशीर तस्करीवर अवलंबून राहण्याचा सल्ला देऊ लागते, तेव्हा हे स्पष्ट होते की मत्सर आणि पूर्वग्रह माणसाची देशभक्ती आणि प्रतिष्ठा पायदळी तुडवतात. अशा प्रवृत्तींना देश कधीही जागतिक मंचावर ताठ मानेने उभा राहिलेला आवडत नाही.
अथर्ववेदातील ही अमर ऋचा आपल्याला जीवन जगण्याचा शाश्वत मार्ग दाखवते. मत्सर हे असे विषारी बीज आहे, जे आधी मनात रुजते, मग चारित्र्य पोखरते आणि शेवटी समाज व राष्ट्राच्या विकासात धोंड बनते. वैयक्तिक जीवनात इतरांची प्रगती पाहून प्रेरणा घेणे हाच विकासाचा खरा मार्ग आहे. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय जीवनात देशाच्या प्रत्येक कामगिरीचा. मग ती तांत्रिक असो, आर्थिक असो वा वैज्ञानिक, अभिमान बाळगणे आणि त्यात हातभार लावणे हेच खरे नागरिकत्व आहे. मत्सराची आग वेळीच विझवणे हीच व्यक्ती आणि राष्ट्र या दोघांच्याही सुख, शांती आणि अखंड प्रगतीची पहिली अट आहे.
लेख आवडला! फक्त तुमचे विचार…
लेख आवडला!
फक्त तुमचे विचार तुमच्याच संघटनेत, पक्षात पुरेसे झिरपलेले दिसत नाहीत. तळागाळातल्या कार्यकर्त्यांची गोष्ट आणखी निराळी.
आपण एक प्रयोग करू या!
मोहन भागवतानी केलेली ताजी विधाने आणि तळागाळातल्या स्वयंसेवकांची त्यावर प्रतिक्रिया यांचे नियमित सर्वेक्षण. अशा शिस्तबद्ध अभ्यासातून संघाच्या शीर्षस्थ नेत्यांना अनेक बोध घेण्यासारख्या गोष्टी सापडतील, असे वाटते.
पुन्हा तेच बोलतो
हा माणूस सरकारी सेवेत होता आणि असंख्य चुकीची काम केली असणार ती उघड होऊ नयेत म्हणून. अगदी खोटे सरकार dharjine दावे करत असतो.
1) भारतात उच्च शिक्षित लोकांना रोजगार योग्य संधी च नाही जें योग्य पगार देतील त्या मुळे सर्व उच्च शिक्षित विदेशात जात आहेत.
2) भारतातील रस्ते काय लायकीचे आहेत लाखो video आहेत. पूर्ण ट्रक खढ्यात गेला आहे.
3) भ्रष्ट प्रशासन आणि भ्रष्टाचार मध्ये भारत जवळ जवळ 1 नंबर ला आहे.
4) लायकी नसणारी लोक अधिकार पदावर आहेत.
हे सर्व साफ असताना फक्त ह्या व्यक्ती लाच भारत प्रगती करत आहे असे का वाटते.
अडाणी अंबानी ची फुकट ची संपत्ती बघून वाटते का?
देशाची प्रगति पाहून अनेक…
देशाची प्रगति पाहून अनेक विद्वानांनाचे मानसिक संतुलन इर्षेने बिघडले आहे. त्याचे उदाहरण नाव न घेता दिले आहे. तुम्हाला आणिक माहीत असेल तर द्यावे.