विवादी सूर : चौकटीपालिकडले काही
ये मोह मोह के धागे
तेरी उंगलियोंसे जा उलझे
कोई टोह टोह ना लागे
किस तरह गिरह ये सुलझे
है रोम रोम एक तारा.....
अहाहाहा...... आत्तासुद्धा मनातल्या मनात हे गुणगुणताना कपाळावर एक 'मीठी टीस सुहानी' उमटलीच ना? तो एक सूर हसत खेळत जाणाऱ्या यमनला एकदम पुरिया धनश्रीची खोली देतो. दाट, एकजीव, भरपूर हळद-हिंग असलेली चविष्ट डाळ खात असताना अचानक दाताखाली आलेल्या मोहरीच्या दाण्याने मुखात अजूनच स्वादाची आतषबाजी करावी तसा आलेला तो तारा वरचा पॅपॉनचा कातिल सूर. शिऱ्याबरोबर आंब्याचं लोणचं किंवा पुरणपोळीबरोबर फोडणीची मिरची, साजूक तुपातल्या रसरशीत बटर चिकनला कोळश्याचा करकरीत वास लागावा... किंवा नारळाचं दुध घातलेल्या माश्याच्या कालवणाच्या मैफिलीमध्ये एकाच आमसुलाच्या जहाल तुकड्याने ताशा वाजवून बहार उडवून द्यावी तसा... म्हणायला विवादी - पण लज्जत अजून वाढवणारा.
खरंतर ना ह्या विवादी सुरांनीच आयुष्यात बहार आणली आहे. जगण्यात जे काही नावीन्य, जी अनपेक्षितता, अपूर्वाई, नवलाई, अद्भुतता आहे ती ह्या विवादी सुरांमुळे. मुळात 'प्रस्थापित व्यवस्थेविषयीचं असमाधान' हा ह्या विवादी सुरांना एकत्र गुंफणारा राग.
आता असं बघा... कुठल्याही कारणानं का होईना - पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाली (एकदम बेसिकलाच हात घातला!). तो एकपेशीय अमीबा लाखो वर्षं टाइमपास करत होताच की. पण तिथेही कुठल्याश्या विवादी स्वराला "वाटलं" की "कायत्त्री चेंज पायजे यार." And the rest is history.
कोणत्याही कलेचा, खेळाचा किंवा एकंदरच मानवी कर्तृत्वाचा इतिहास पाहिला, तर लक्षात येतं की खरी उत्क्रांती कधीही केवळ नियमांचं तंतोतंत पालन करणाऱ्यांनी घडवून आणली नाही. प्रत्येक क्षेत्रात, मग ते समाजकारण असो, राजकारण असो, उद्योगक्षेत्र, विज्ञान, तंत्रज्ञान... कोणतंही असो - अशी माणसं अचानक अवतरतात—जी तत्कालीन समीक्षक आणि जाणकारांच्या लेखी 'अयोग्य' किंवा 'बंडखोर' असतात. जेव्हा एखादा उद्योगपती प्रस्थापित प्रमाणं धुडकावून लावत लोकांना कवडीमोलाने इंटरनेटची दारं उघडी करून देतो. एखादा शास्त्रज्ञ स्थापित शास्त्रीय ठोकताळ्यांना बाजूला ठेऊन केवळ आपल्या "इन्ट्यूशन" च्या जोरावर गणिताच्या "पुराव्याशिवाय शोध नाही" ह्या गृहितकालाच आव्हान देतो, एखादा समाज उद्योजक दुग्धपालनाला डेमोक्रटाइझ करून 'ऑपरेशन फ्लड" घडवून आणतो, एखादा महात्मा जातीयतेची बंधनं झुगारुन शिक्षणाच्या वाटा खुल्या करतो - तेव्हा तो विवादी सूरच असतो.
तसंच जेव्हा एखादा फलंदाज तंत्राच्या पोथीबाहेर जाऊन नवा फटका शोधून काढतो, जेव्हा एखादा नाटककार समाजाच्या सोयीस्कर नैतिकतेला लाथाडून नग्न वास्तव रंगभूमीवर मांडतो, किंवा एखादा गायक घराण्याच्या बंदिस्त तिजोऱ्या उघडून लोकसंगीताच्या मोकळ्या हवेला शास्त्रीयतेचा दर्जा देतो—तेव्हा व्यवस्थेची पहिली प्रतिक्रिया अस्वस्थतेची असते. पण काळ पुढे सरकतो तसतसं लक्षात येतं, की ज्याला एकेकाळी ‘विवाद’ मानलं गेलं, तेच उद्याच्या परंपरेचं मुख्य सूत्र बनलं आहे. तालयोगी पं. सुरेश तळवलकर म्हणतात - परंपरेने नवे प्रवाह दाखवले नाहीत तर ती शिळी होऊन तिची रूढी होते आणि नवतेला परंपरेचं पाठबळ नसेल तर तो निव्वळ उठवळपणा होतो. परंपरा ही वारसा जपणारी असते, पण कधी कधी तिच्यावर साचलेपणाचं शेवाळ चढतं. अशा वेळी व्यवस्थेला, रूढींना आणि स्थापित चौकटींना एक समर्थ धडक देणारा ‘विवादी’ पिंड लागतो.
मुळात विवादी स्वराचा स्वभाव हा विध्वंसाचा नसतो, तर तो नवनिर्मितीचा असतो. तो विद्यमान व्यवस्थेला नकार देत नाही, तर त्या व्यवस्थेची मर्यादा दाखवून देऊन तिला अधिक समृद्ध करतो.अशा विवादी प्रवृत्तीच्या धुरिणांनी लावलेला प्रत्येक वेगळा सूर आज आपल्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग झाला आहे.
अहो आमच्या खेळांमध्ये सुद्धा असे कित्येक "सुधारक" होऊन गेले ज्यांनी तो खेळ खेळण्याच्या, पाहण्याच्या, समजण्याच्या पद्धतीतच क्रांती घडवून आणली. शेवटी खेळ सुद्धा संगीत, नाट्क, चित्रकला, नृत्यकलेसारखाच आपला आवाका वाढवण्याचा माणसाचा प्रयत्न. खेळाच्या मैदानावर परंपरेचा आदर बाळगूनही नव्या क्षितिजांचा वेध घेणाऱ्या अशाच काही अलौकिक विवादी स्वरांची, त्यांच्या कर्तृत्वाची, आवेगाची, आणि त्यांनी घडवलेल्या युगप्रवर्तक बदलांची ही दाद...... लवकरच !
© जे.पी.मॉर्गन
या प्रतिसादाला माझा विवादी सूर!
या प्रतिसादाला माझा विवादी सूर! मॉर्गनराव, तुम्ही ChintoChimnaji च्या (ते आधीच 'जी' आहेत त्यामुळे आणखी 'राव' जोडून डब्बल ब्यारल करत नाहीये!) सूचनांनुसार बदल केलेत तर कृपया या आत्ताच्या शैलीतपण एक व्हर्जन माझ्यासाठी लिहित रहा!!
लेखी माध्यमांची मर्यादा असते...... पण विरामचिन्हे, ....., कंसातला मजकूर, एकाच्या जागी चार उपमा वगैरेंचा वापर करून लिखाण अजून जरा गप्पा मारल्यासारखं, प्रत्यक्ष सांगितल्यासारखं करायला मदत होते. आणि अगदी ChintoChimnaji सांगितलंय तस्स्स्स्सं लिहा पण लिहित रहा - च्यायला ए. आय. च्या गुणगानाने आणि स्वगुणवर्णन प्रसंशेने कान किटलेत अगदी !!!
ChintoChimnaji : "सुरेशजी"....". म्हणजे कोण? जरा अधिक माहिती द्याल का?
पन्डित सुरेश तळवलकर
हा व्हीडीओ पहा : https://www.youtube.com/watch?v=UHx-_61KrJE
उत्तम विवेचन आहे. पुष्कळ प्रयोग केले आहेत पन्डीतजीनी.
ए आय बद्दल : एखादी प्लगिन ए आय ने प्रसविलेला मजकूर शोधून त्याचे मानवासाठी रुपान्तर करून देत असेल, तर फार बरे होईल. वैताग आला आहे स्लॉप चा.
उत्तम लिखाण!डॉ० अशोक रानडे…
उत्तम लिखाण!
विवादी सूर/रंग विरोधाभास (कॉन्ट्रास्ट) निर्माण करतात, एकसूरीपणा (मोनॉटॉनी) मोडतात. पण ते मिठासारखे वापरले जातात.
डॉ० अशोक रानडे यांचे ’खट’ रागावर केलेले निरूपण आठवले.
https://www.youtube.com/results?search_query=Ashok+Ranade+Khat+
उत्तम कल्पना
तुमची कल्पन उत्तम आहे. काही अनाहूत सल्ले -
१. विरामचिन्हे : ते ... जर खड्यासारखे लागतात. थोडे जपून वापरा ... :)
२. तुमच्याकडे भरपूर उपमा आहेत. पपोन च्या स्वरासाठी तुम्ही ५ उपमा वापरल्या आहेत! त्या आहेत सगळ्या झकास, पण लेख रेन्गाळतो जरा त्यामुळे. सर्वोत्तम १ निवडा , बाकीच्या निर्दयीपणे बाजूला ठेवा.
३. सुरेशजी प्रत्यक्ष भाषण आणि डेमो देऊन मान्डतात , तेव्हा तो परम्परा आणि नवता मुद्दा छान कळतो. तो लेखी स्वरुपात वाचताना शब्दान्चा फुलोरा, पण अर्थहीन असलेला असा वाटतो. त्याला अर्थातच इलाज नाही, ती लेखी माध्यमाची मर्यादा आहे. एकन्दरितच परफोर्मिन्ग आर्ट बद्दल लिहिताना येणारी समस्या आहे.
हे माझे इतके दिव्य शुद्धलेखन पाहून ( जय गमभन स्क्रिप्ट!) , इति लेखनसीमा म्हणण्याशिवाय पर्याय नाही.