Skip to main content

कला तुमच्या झिरपत असते....

3 minutes

पप्पांनी दोन दिवसात बनवलेला हा गणपती. निमित्त असं की आमच्या दोन लहान सवंगड्यांच्या शाळेत चिकनमातीचा गणपती बनवण्याचा उपक्रम झाला. तेव्हापासून त्यातल्या मोठ्या सवंगड्याने जणू त्याच्या घरी गणपतीचा कारखानाच उघडलेला. चिकनमातीचे गणपती बनवून हौस फिटल्यावर, मग खराखुरा म्हणजे शाडू मातीचा गणपती बनवायची त्याने टूम काढली. दादांनीही पोरांची हौस मनावर घेतली आणि माती हजर केली. पण वहिनांचा घसा मात्र गणपती आधी बसला... मग घरभर अख्खी माती-माती. त्यात गणपती येण्याआधी घरी माझं आगमन झालं. मग काय कारखान्याची रवानगी थेट आमच्या घरात....वेदूचा माझ्यावर आणि माझ्यातल्या कलेवर प्रचंड विश्वास(मला त्याची खूप कमाल वाटते. मग काय बॅगा टाकल्या आणि "आराम हराम है" म्हणत मी पीठाऐवजी माती मळायला बसले....आणि मातीचे गोळे रचायला सुरुवात केली...आपण काही पार्वती नाही ...पण मस्का लावायचं काम चांगलं करू शकतो हे वेळीच लक्षात आल्यामुळे मग अधूनमधून दुरून कटाक्ष टाकणार्‍या पप्पांना चांगला भरभरून मस्का लावला. मस्का फळला आणि पप्पांचा पवित्रा बदलला. माझ्यावर टीकाटिप्पणी करून मातीचा ताबा त्यांनी घेतला आणि गणपती आकार घ्यायला लागला. पप्पाही मग गणपती पुरा होईपर्यंत रमलेही. दोन दिवसात विना साच्याच एकहाती गणपती तयार....
दरम्यान मी मनानं गावच्या घरातल्या कारखान्यात आणि मागे सुटलेल्या आठवणीत जाऊन आले...आषाढ लागला की लगबग सुरू व्हायची. भाऊबाबा(मोठे काका) माती मळायचं कंत्राट बायकांकडे द्यायचे...कितीतरी पोती माती मळली जायची...मग आम्ही भावंडं, काक्या, वैन्या मातीला चेचायचो...या काळात वादावदी कमी व्हायची....माती मळून झाली की साचे लिपांयला घ्यायचे....आम्ही बारकी मंडळी ते भरून द्यायचो. मग मोठे भाऊ आणि बाकीचे काका फायनल टच....दोन दिवस साचे बांधून ठेवले जायचे, मग ते काढल्यावर त्याला, हात, सोंड, दागिने जोडण्याचा कार्यक्रम, ते रंगवण्याचा कार्यक्रम हे सगळंच अगदी तीन चार महिने साग्रसंगीत सुरू असायाचं. आमचं घरंच अगदी गणपतीमय रंगशाळा होऊन जायचं...रंगांचा, मातीचा गंध, त्यात श्रावणात घरी होणारं ग्रथांचं पारायण, आजूबाजूचा रानवट गंध, कोवळ ऊन, नाचणारा पाऊस, वार्‍यावर डोलणारी भातं, त्यात भांवडांची मजा मस्करी हे सगळ अगदी आल्हादानं सुरू असायचं. पप्पा सैन्यात म्हणून मग या सगळ्यात पप्पा क्वचित असयाचे. कधी जर सुट्टीवर आले तर पप्पा हातभार लावायचेच....मग आम्ही दोघी त्यांच्या मागे मागे. पण संपूर्ण गणपती लिंपताना मी त्यांना कधी याची देही याची डोळा बघितंलेलं नाही. ते सांगतात तसं सैन्यात भरती होण्याआधी केलेलं आहे हे सगळं पण त्याची मी साक्षी नाही. पण तीन-चार महिन्यांचा हा सोहळा मजेशीर असायचा....
माझ्या घरात सगळेच कलाकार...आमचं 40 माणसांचं कुटुंब. सगळ्यांच्या हाताला या ना त्या प्रकारची सुबकता. त्यामुळेच आज कधी जरासं चित्रबित्र काढलं की हा वारसा आणि कला कुठून कशी झिरपत माझ्यापर्यंत आली हे जाणवतं राहतं. असो. तर या सगळ्या नॉस्टेलजियातून बाहेर आले तोवर इकडे पप्पांनी गणपतीचा बेसिक आकार तयार केला आणि माती लिपायला सुरुवात केली.....आणि मग अगदी निगूतीने मनातला गणपती साकारला....मी, दिदी आई आणि ते स्वतः सुद्धा चकीत झाले..तेेवढ्यातच कारखान्याचा प्रस्ताव घरात घुं-घुं करत होता त्यात भर पडली शेजार्‍यांची..."आता रिटायर्ड झालात तर मग टाकाचं कारखाना" आता कलाकाराची एवढी किर्ती समोर दिसतेय तर आम्ही कच्चे लिंबू मातीच मळत बसलो.. आमची लूडबूडही एवढा चांगला गणपती बघून कमी झाली...पण मग आमच्या कलेचा मोर्चा आम्ही गणपती ठेवायचा कसा, मकर कसं बनवायचं याच्या नियोजनाकडे वळवला. तर कारखान्यातला एकलुता एक गणपती मकरात बसायला तयार आहे....
पप्पा आजवर तुमची नोकरीमुळे, आम्हाला आकार देता देता मागे पडत गेलो. पण अंगात असलेली ही कला आता विसाव्याच्या क्षणी बहरत राहूदे....असे रमत रहा...
तर डोळ्यांत साठलेली टीपं हलेकच पुसून पप्पा पुढच्या वर्षी कारखाना टाकायच्या आधी पोस्ट करून टाकली...तेवढाच त्यांच्या कलेला माझा हातभार....

ता.क. : पाटवरची नक्षी मी काढली आहे....मधेमधे लुडबूड करायच्या सवयीनुसार.

- श्रेya

Node read time
3 minutes

मिसळपाव Fri, 25/09/2026 - 01:15

अं.......लेख आवडला पण छायाचित्रं कुठायत?

'न'वी बाजू Fri, 25/09/2026 - 04:31

In reply to by मिसळपाव

…आगाऊ पात्रपरिचयाची नितांत गरज आहे.

म्हणजे, सामान्यतः तशी गरज लागली नसती, परंतु, इथे पप्पा, दादा, वहिनी, दोन सवंगडी (हे जे कोणी असतील ते), आणि इतरही अनेक आनुषंगिक नेहमीचेच यशस्वी (मी मोजदाद सोडली!)… इतके सगळे जण अक्षरशः रानोमाळ भटकताहेत. कोठला कोण कोणाचा कोण पत्ता लागत नाहीये.

परंतु, कथाबीज चांगले आहे.

(असो चालायचेच.)

'न'वी बाजू Fri, 25/09/2026 - 04:48

In reply to by 'न'वी बाजू

आगाऊ सूचना तथा श्रेयाव्हेर१.

प्रस्तुत आयडी हा स्त्रीलिंगी निघाल्यास तो निव्वळ योगायोग असून या घटनेस मी व्यक्तिशः कोठल्याही प्रकारे जबाबदार नाही.

(सूचना समाप्त.)


१ (अक्षरशः!)

सई केसकर Fri, 25/09/2026 - 06:28

In reply to by 'न'वी बाजू

कधी कधी एखादी गोष्ट वाचून तुमचं "अक्षरश:" प्रोग्रामिंग बिघडतं. मग तुम्ही गळ्यात रुंड माळा घालून, केस सोडून, जीभ बाहेर काढून, डोळे वटारून त्या लेखावर तांडव नृत्य करू लागता. आणि तुम्हाला काहीतरी खटकलं आहे हे मान्यच असतं. पण त्यावरची तुमची प्रतिक्रिया कदाचित तुमच्याही हातात नाही असं वाटावं इतकी ती भयानक असते. जणू काही असं काही वाचलं की तुमच्या अंगात एखाद्या मेलेल्या (आणि जिवंत असताना मनासारखा मान न मिळालेल्या) साहित्यिकाचं भूत शिरतं.

सई केसकर Fri, 25/09/2026 - 15:06

In reply to by 'न'वी बाजू

तुम्ही तुमचे तांडव नृत्य केवळ तुमच्या लेखनाची सवय असलेल्या लेखिकांच्या लेखनावर मर्यादित ठेवावे ही विनंती. नाहीतर ऐसीवरचे डेब्यू कलाकार तुमची प्रतिक्रिया वाचून कायमचे पळून जातात. मग आपल्याला एआय अमुक एआय तमुक वाचत बसावं लागतं.

मारवा Fri, 25/09/2026 - 21:11

In reply to by सई केसकर

सामान्य भाषेत याला ragging असे म्हणतात.
आणि नवोदितांची रॅगिंग झाल्यास ते जनरली (गेंड्याच्या कातडीचे नसल्यास किंवा कविता वगैरे लिहिणारे असल्यास किंवा दोन हात करण्यात "पटाईत" नसल्यास ) नाउमेद होऊन लिहिणे थांबवतात.
म्हणून मी नवोदितांच्या रॅगिंग विरोधात आहे (कितीही मोह झाला कितीही फुलटॉस आला तरी तो आवरण्याचा प्रयत्न केला पाहिजे). बाकी ज्येष्ठांनी ज्येष्ठांची खेचलीच पाहिजे असे माझे परखड मत आहे.

काही लोक आयआयटी किंवा तत्सम ठिकाणी शिकतात. आणि मग आयुष्यभर आपण याचं रॅगिंग आधी केलं नाही तर हा/ही आपलं करेल या भीतीने, किंवा रॅगिंग शिवाय इतर कोणत्याच भाषेत बोलता येत नसल्याने किंवा एखाद्या माणसाला भावना आहेत हे तपासून बघायचा एकमेव मार्ग म्हणजे त्या दुखावून बघणे (आणि त्या दुखावल्या तर आपला विजय झाला असे समजणे) असतो. त्यात त्यांचा काही दोष आहे असं मला वाटत नाही.
शतकानुशतकं आपल्याकडे भावना असणे म्हणजे काहीतरी कमीपणाचे मानले जाते. पण अलीकडे याला छेद देणारे बरेच संशोधन झाले आहे. मुळात भावना आहेत म्हणूनच बुद्धी आहे. किंवा असं म्हणता येईल की बुद्धिमान व्यक्तीकडे बुद्धिमत्तेचे पूर्ण पॅकेज भावना असतील तरच असते.
पण हे काही सगळं नबांना लागू नाही. त्यांना भावना आहेत आणि त्यांच्या स्वतःच्या भावना जरी दुखावल्या जात नसल्याचा ते वारंवार उल्लेख करत असले, तरी ते काही दुष्ट आहेत किंवा pretentious आहेत असं मला वाटत नाही. अनेकदा त्यांनी दिलेले स्मरणरंजन प्रतिसाद कुठेतरी कॉपी करून ठेवावेत असं मनात आलं आहे.
It takes a certain type of courage to be vulnerably open about the things you love and defend them. त्यामुळे त्यांनी नव्या माणसाचे रॅगिंग करू नये. आम्ही काय आहोतच!

मारवा Fri, 25/09/2026 - 22:34

In reply to by सई केसकर

तुम्ही भावनेविषयी जे म्हणालात ते अगदी खर आहे. हे वाचून मी भावूक झालो कारण मी नुकतंच अतिशय सुंदर असं भावनेवरील अत्यंत मार्मिक असं पुस्तक वाचलं ज्याचे नाव Language of emotions आहे याच्या लेखिका Karla mclaren आहेत. तुम्ही जमल्यास जरूर वाचा. अलीकडील काळातील emotions वर लिहिलेल्या सर्वात प्रगल्भ अशा पुस्तकांमध्ये याची गणना केली जाते. त्यात त्यांनी मुळात positive आणि negative अशी जी emotions जी आपण विभागणी करतो ती कशी आणि किती चुकीचे आहे, भावनांचे suppression कसे चुकीचे असते हे जरी आता बऱ्यापैकी establish झालेले असले तरी त्याचे expression सुद्धा केवळ त्याची विरोधी भूमिका आणि चुकीची कशी असते त्याऐवजी भावनांचे channelization,कसे आणि का करणे आवश्यक आहे इत्यादी फार सुंदर असा ते समजावून सांगतात. कमालीची वैचारिक स्पष्टता त्यांच्या लेखनात आहे. आणि एकीकडे सखोल मांडणी आणि त्याच बरोबर प्रॅक्टिकल solutions आणि tools सुद्धा त्या देतात.
आणि जी लोक वरकरणी सिनिकल काटेरी फणस असतात ती कमालीची भावूक असतात असा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. तो केवळ एक पवित्रा असतो एक डिफेन्स mechanism असतो.
असो अती अवांतरासाठी क्षमस्व

मिसळपाव Fri, 25/09/2026 - 21:03

In reply to by 'न'वी बाजू

जी मै कुछ...... समझा नही! जुन्या हिंदी पिक्चरातल्या डायलॉगच्या चालीवर म्हणावे हे :-D

…आगाऊ पात्रपरिचयाची नितांत गरज आहे.
का बुवा? दादा, वहिनी, काका वगैरे पुरेसं नाही? तुम्हाला त्यांची नावं अपेक्षित होती? ईन फॅक्ट, एक नाव आहे - "वेदूचा माझ्यावर.... ". आता ही 'वेदू' कोण? मुलगी?? पण हे सगळं जाउंदे. अहो श्रेयापांचाळ, छायाचित्र कधी टाकणार आहात? का हे असंच रहायचं?? तो अभ्या एक डॉइश -वॉईशचं मधाचं बोट लाऊन आता "आम्ही नाही जा" म्हणून मोकळा झालाय. छ्या....

जयवंत दळवींची 'रथचक्र' आठवली. (बहुदा तीच - कोकणातलं घर, मुलगा हुशार, नवरा संसार/मुलं टाकून गोसावडा झालेला ती कादंबरी) तर त्यात पात्रांची नावं नाहीतंच. "थोरला आला होता", "धाकटीने तरी ते का करावं?" वगैरे. पण काही अडलं नाही. नबा, तुम्ही नका वाचू - आवडली तरी प्रचंड मनस्ताप होईल!