'कोंड्या'

लहानपणी आमचं एकत्र कुटुंब. शेतीकामाला चिक्कार गडीमाणसं असायची. कोंड्या त्यापैकीच एक.कातकरी समाजातला. इतर गडी शेतीच्या हंगामापुरतेच कामाला यायचे. पण कोंड्या मात्र वर्षभर आमच्याच घराशी आणि शेताशी बांधलेला असायचा. वडिलधार्‍यांकडुन ऐकायला मिळायचे की,लहान असताना त्याचा बाप आमच्याच शेतात राबायचा. एकदा गुरे चारायला गेला असताना बापाच्या अंगावर वीज पडली. संध्याकाळी गुरे एकटीच गोठ्यात आल्यावर त्याची शोधाशोध झाली. माळावर तो हातात काठी आणि तोंडात तंबाखु अशा अवस्थेत गवतात गतप्राण झालेला सापडला. तेव्हापासुन बापाची गुराख्याची काठी कोंड्याने सांभाळली. आमच्या घरातच तो लहानाचा मोठा झाला.
रोज सकाळीच तो न बोलावता घरी हजर व्हायचा. अंगावर नेहमीच एक जाड खाकी रंगाचा विटलेला जुनापुराणा डगला आणि कमरेला मळकट अर्धा पंचा. गालावर भरगच्च विस्कटलेली दाढी आणि डोक्यावर केसांचं जंगल. डोळ्यात कुतुहलशुन्य भाव. पायात फाटक्यातुटक्या चामड्याच्या चपला आणि हातात काठी. ओटीवर कोपर्‍यात बसुन पितळेच्या पेल्यात चहा प्यायचा आणि यांत्रिकपणे कामाला लागायचा.
पावसाळ्यात आवणीच्या हंगामात तो शेतात झटुन खपायचा. डोक्यावर घोंगडीची खोळ तो ऐटदारपणे बांधायचा. त्या खोळेचा डोक्याच्या मागे काढलेला तुरा त्याच्या एरव्ही सुस्त वाटणार्‍या व्यक्तिमत्वाला डौल आणायचा. शेतात नांगर हाकताना तो बैलांशी त्यांची नावे घेउन संवाद करायचा. बैल नांगर ओढुन थकले की,'आरं चल रं माज्या राजा,निगुनसा र्‍हायलंय आता!'अशी विनवणी बैलांना करायचा. स्वतःच्या थकण्याची पर्वा मात्र त्याला नसायची.
भात लावणीसाठी चिखल केलेल्या शेतात प्रुष्ठ्भाग सपाट करण्यासाठी नांगराच्या जागी आडवी फळी फिरवावी लागे. त्या फळीवर दाब देण्यासाठी बर्‍याचदा दगड ठेवत किंवा लहान मुलांना बसवत. आम्हाला ती सवारी भारी आवडायची. आम्हा लहान मुलांची स्पर्धा लागायची फळीवर बसण्यासाठी. कोंड्याचं आणि माझं कुठलं नातं जुळलं होतं कुणास ठाऊक. तो नेहमी सर्वांआधी मलाच संधी द्यायचा. 'ए थांब रं,माज्या सायबाला बसु दे आधी'असं म्हणुन मुलांना दटावायचा. आणि मग सुरु व्हायचा चिखलावरचा माझा अधांतरी प्रवास. तो प्रवास कधी संपुच नये असं वाटायचं.
कधी काम लवकर आटोपले तर त्याला नदीवर जाळं घेऊन मासे पकडायला पाठवायचे. सुटी असेल तेव्हा मीही त्याच्याबरोबर जायचो. मासे पकडताना त्याच्या सुस्त शरिरात अचानक वीज संचारायची. त्याच्या हालचाली चपळ व्हायच्या.नजरेतली कुतुहलशुन्यता झटकुन तो पाण्याखालच्या माशांचा नेमकाच शोध घ्यायचा. त्याला अशा रुपात पाहणे मला खुप आवडायचे. मग रात्री माशांचा बेत असायचा. त्या रात्री आजोबांनी दिलेल्या पैशातुन कोंड्या कुठुनतरी थोडी दारु पिऊन यायचा. रात्री जेवण न्यायला आल्यावर कोपर्‍यात बसुन लाजुन गालातल्या गालात हसायचा. माझ्याकडे पाहुन मिश्किलपणे डोळे मिचकवायचा. शेजारुन गेलो की बसल्या जागेवरुन माझ्या डोक्यावर टपली मारायचा. मासे पकडतानाचा त्याचा आनंद रात्री टिपेला पोहोचलेला असायचा. आजी त्याला म्हणायची,"तुझं विमान पोहोचेल ना रे तुझ्या वाडीत बरोबर?"
जंगलात असलेल्या शेतावर जाताना ओहोळ पार करुन जावे लागयचे. पावसाळ्यात ओहोळाला पुर असेल तेव्हा गळाभर पण्यातुन कोंड्या मला खांद्यावर बसवुन पलिकडे न्यायचा. त्याच्या लाब कुरळ्या केसांना मी दोन्ही हातांनी घट्ट पकडायचो. तोही एका हाताने मला घट्ट पकडुन दुसर्‍या हातातील काठीने पण्याच्या खोलीचा अंदाज घ्यायचा. हाताची घट्ट पकड माझ्या बालमनाला भितीचा स्पर्शसुध्दा होऊ द्यायची नाही. ते तीस-चाळीस फुटांचे पात्र पार केल्यावर मला सात समुद्र ओलंडुन आल्याचा आनंद व्हायचा.
शेतावर असताना विजा कडकडु लागल्यावर मात्र कोंड्याची चलबिचल व्हायची. तो घाबरुन जायचा. सारखं आकशाकडे पाहायचा. याच विजांनी त्याच्या बापाला हिरावुन नेले होते. बालपणीच्या त्याच भितीने त्याच्या मनात घर केले असावे.
रोज रात्री तो पितळेच्या ताटात वाढलेलं जेवण घेऊन घरी जायचा. त्या एकाच ताटात त्याचं कुटुंब भुक भागवत असे बर्‍याचदा. जेवण वाढलेलं ताट हातात घेतल्यावर कोंड्या त्याकडे पाहयचा तेव्हा तो मुलाबाळांच्या भुकेचा अंदाज घेतोय असा भास व्हायचा. मी अनेकदा स्वयंपाकघरात जाऊन त्याच्या ताटात जास्त भात वाढण्याचा हट्ट धरायचो.
कधी तो तापाने फणफणायचा तेव्हा मी वडिलांबरोबर त्याच्या कातकरी वाडीत जायचो. त्याच्या फाटक्या कपड्यांपेक्षाही फाटक्या असलेल्या त्याच्या इवल्याशा गवताच्या झोपडीत तीन दगडांची चुल,तीनचार कळकट भांडी,गोणपाटाचे अंथरुण आणि फाटकी घोंगडी याशिवाय काही दिसायचे नाही. कोपर्‍यात तो अंगाची वळकटी करुन झोपलेला असायचा. झोपडीतला गच्च अंधार आणि ओल्या काटक्यांचा चुलीतुन निघणारा धुर पाहुन उदासी यायची. त्यादिवशी शाळेत मन रमायचे नाही. तो कामाला नसतानाही त्याला जेवण बाकी दिले जायचे. एक दोन दिवसातच तो ठणठणीत बरा होऊन सकाळीच चहा घ्यायला ओटीवर कोपर्‍यात बसलेला असायचा. माझा जीव भांड्यात पडायचा.
सणावराला कोंड्याचा अवतार पार बदललेला असे. तो नवीन बनियन्,पंचा नेसुन गळ्यात नवा टॉवेल अडकवुन यायचा. कामे आटोपल्यामुळे तो दाढी सफाचाट करुन केसही कापायचा. अशावेळी मला मात्र तो परका वाटायचा. दाढी-केस वाढलेल्या आणि चिखलाने माखलेल्या कोंड्यानेच मनात घट्ट घर केले होते.
काळ सरला. एकत्र कुटुंबे फुटली. शेतांच्या वाटण्या झाल्या. सालबंदीने गडीमाणसे ठेवणे आता मागे पडले. कोंड्या आता रोजंदारीने कामाला येऊ लागला. चार दिवस इकडे,चार दिवस तिकडे असा धावु लागला. कुटुबाचा घटक बनलेला कोंड्याही विभागला गेला. शेतांशी जुळलेली नाळ तुटत चालली. एखादे दिवशी कामाला आला नाही तर त्याला आता जेवण मिळणार नव्हते. तो गावात इतरांच्या घरीही कामाला जाऊ लगला. आमच्या शेतावर तो कामाला आला की मला अजुनही अनामिक आनंद व्हायचा. मी नेहमीप्रमाणे आईकडे त्याला जास्त भात वाढण्यासाठी हट्ट करायचो.
कोंड्या आता म्हातारा होत चालला होता. पुर्वीसारखे काम त्याला झेपत नव्हते. त्याला आताशा नीट दिसतही नव्हते. मुले लहान वयातच आपापले संसार थाटुन रानपाखरांसारखी पसार झाली होती. अलिकडे तो नुसताच आमच्या मोठ्या घरात येऊन बसायचा. त्याला पितळेच्या पेल्यात चहा दिला जायचा. शिळेपाके वाढले जायचे. मी घरात जाऊन नेहमीप्रमाणे दोन घास जास्त वाढण्याचा हट्ट करायचो.
-अरुण देसले

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (6 votes)

प्रतिक्रिया

इतकं घट्ट गूंफलं आहे की शालेय पाठ्यपूस्तकात धडा म्हणूनही सामावीश्ट करता येइल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्यक्तिचित्रण प्रभावी आहे
थोडस अपूर्ण वाटलं

गदिमांच्या माणदेशी माणसं मधील एका व्यक्तिरेखेची आठवण झाली
नाव आठवत नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

रामा मैलकुली का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

बहुतेक
नेमकं पुस्तक आता जागेवर सापडत नाहीये
कथेचा आशय असा
लेखक थोड्या दिवसाकरता गावाला आलेला असतो
त्याचा गडीमाणूस धोतर मागतो स्वतच्या मुलीकरता
त्याचा उपयोग ती साडीसारखा करते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

गदिमांच्या माणदेशी माणसं गदिमांच्या माणदेशी माणसं मधील एका व्यक्तिरेखेची आठवण झाली

थोरली नाही, धाकली पाती. अण्णा नाही , तात्या. गदिमा नाही, व्यंकटेश माडगूळकर Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

हो तुमचं बरोबर आहे
गदिमा नव्हे व्यंकटेश माडगूळकर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

व्यंकटेश माडगूळकरांच्या म्हणायचे आहे का?

(edit - स्वारी, वरचे प्रतिसाद पाहिले नाहीत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर लिहिले आहे.
क्रमशः राहिले आहे का? शेवट अपूर्ण वाटतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

व्यक्तिचित्रणापेक्षा अतिशय सहज शब्दांत लेखन करण्याची तुमची हतोटी फार आवडली. यावेळेस व्यक्तिचित्रण अपुरं वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेवटच्या परिच्छेदात टिपलेलं स्थित्यंतर मार्मीक आहे. पण हा परिच्छेद अगदी अचानक थांबला. म्हणजे, त्याला ठाशीव समारोप नाही लाभला. काही तरी किरकोळ गोष्ट राहून गेली. समेवर येणं घडलं नाही.
लेखन उत्तम. व्यक्तिचित्रण म्हणून ताकद दर्शवणारे. तसे, तुमचे याआधीचेही वाचले आहे. पैलतीरावर. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्यक्तिचित्र आवडले. डोळे भरून आल्याशिवाय कारूण्य म्हणजे काय हे तुमच्या लिखाणातून दिसत आहे.

लिहीत रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

छान. तुमचे लेखन आणि शैली आवडते. आवडते, म्हणून पुढील छिद्रान्वेषी टीका करतो आहे.

काही साचेबद्ध वाक्ये टाळली असती तर प्रभाव+सहजता आणखी असते. उदा :

कोंड्याचं आणि माझं कुठलं नातं जुळलं होतं कुणास ठाऊक.

(का बरे? हा मुलगा घरात लहानाचा मोठा झाला तर कुठलेतरी नाते जुळणारच. मालक नोकराचे का असेना. पण इथे मथितार्थ आहे, की कुठलेसे हृद्य नाते जुळले. ते तर प्रामाणिक कथनात स्पष्टच आहे. तसे असताना हे वाक्य उगाच नाटकी, भरीस टाकलेले वाटते.)

(चिखलावरचा) तो प्रवास कधी संपुच नये असं वाटायचं.

? कमजोर.

मासे पकडताना त्याच्या सुस्त शरिरात अचानक वीज संचारायची.

आदल्या परिच्छेदात स्वतःच्या थकण्याची पर्वा न करणारा सुस्त कसा? काहीतरी चुकचुकते आहे. हे वाक्य टाळता आले असते का? किंवा "सुस्त" शब्द टाळता आला असता का? किंवा त्याआधी तो कधी सुस्त होता, त्याचा काही संदर्भ द्यायला पाहिजे. जसे लिहिले आहे, तसे "सुस्त शरिरात वीज" म्हणजे इफेक्टकरिता "टाकलेले" वाक्य वाटते.

- - -
पुन्हा सांगतो : अशी एखाददोन बेचव वाक्ये सोडली तर अतिशय प्रभावी लेखन आहे. (सोने आहे खरे. तरी मन घट्ट करून भट्टीत तापवून त्यातील कचरा जाळून टाकावा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचताना तुमच्या मधला शिक्षक ले़खणीतुन स्पष्ट डोकावतो आणि आपण या गुर्जींचं बोट पकडुन कधि त्याच्याबरोबर चालायला, पहायला लागतो...ते ध्यानातही येत नाही.(शेवट काहिसा अपुरा वाटला.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre

व्यक्तिचित्र आवडले. काहीजण अपुरं म्हणत असले, तरी तुम्हाला ते लिहिताना जे व्यक्त करावंसं वाटलं तसं आणि तितकंच लिहावं हे खरं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोंड्याचे व्यक्तिचित्र आवडले.
वर दुर्लक्ष यांनी लिहिल्यासारखा शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करता येईल असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

छान. उत्तम व्यक्तिचित्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा लेख सवडीने वाचू वाचू म्हणत बाजूला ठेवला होता. अतिशय ओघवत्या भाषेत लिहिलेला म्हणून प्रभावी झाला आहे. अगदी थोडक्या शब्दांमध्येही कुशल हाताने पेन्सिलीचे चार फराटे मारून व्यक्तिरेखा उभी केलेली आहे. त्याला मुलं होती हे अगदी शेवटी कळतं, आणि त्याच्या आयुष्याचा एक मोठा कप्पाच न दिसल्याचं लक्षात येतं. एकंदरीतच लेखाला धूसर झालेल्या जुन्या फोटोप्रमाणे आठवणींची अंधुकता आणि त्यातून दिसणाऱ्या काही ठळक रेषा असं स्वरूप आहे. म्हणूनच त्याचा अपुरेपणा थोडी हुरहूर लावणारा वाटला.

धनंजय यांच्या छिद्रान्वेषणाशी सहमत. पण अर्थातच ते वरकरणी, छोटेसे खड्डे आहेत, गेपिंग होल्स नव्हेत.

असंच लिहीत रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>लेखाला धूसर झालेल्या जुन्या फोटोप्रमाणे आठवणींची अंधुकता
राजेश घासकडवींशी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> जेवण वाढलेलं ताट हातात घेतल्यावर कोंड्या त्याकडे पाहयचा तेव्हा तो मुलाबाळांच्या भुकेचा अंदाज घेतोय असा भास व्हायचा. मी अनेकदा स्वयंपाकघरात जाऊन त्याच्या ताटात जास्त भात वाढण्याचा हट्ट धरायचो. >>
या वाक्याने हे स्फुट खूप उंचीवर नेऊन ठेवले आहे. डोळ्यात पाणी आले वाचून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोरड्या व्यक्तिचित्राला थोडं ओलं करण्याचा प्रयत्न असला तरी ते रूक्षच जास्त प्रभावी वाटलं असतं असं वाटतं. माझ्या शेताच्या, खेडेगावतल्या आठवणी रूक्षच आहे, पण नकोश्या नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मस्त
बागलान का

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0