Skip to main content

हे ssss इथं

आपण खुपदा एखाद्याशी बोलताना विचारतो कि अमुक अमुक रस्ता, बिल्डींग इ. कुठे आहे? उत्तर " हे इथंच तर आहे".
..हे इथच म्हणजे नक्की कुठं? काही दिशा वगैरे काही नाही....बऱ्याचदा एखादा पत्ता सांगतानासुद्धा लोक "हे इथच " असली भाषा वापरतात, आता याला काही अर्थ आहे का?
एकदा माझा एक काका दुसऱ्या शहरातून मुंबईत आला होता आणि स्टेशनावरून घरी यायला बसमध्ये चढला....तिसऱ्या थांब्यावरच घर होते पण त्याला काही थांब्याचे नाव आठवेना..
कंडक्टरने "कुठं ?" विचारल्यावर ह्याने "हे ssss इथं " सांगितलं आणि त्याने बरोबर तिकीट दिलं...

अजून एक किस्सा आठवला...पुण्यातला..
मी पुणे university त एका कामासाठी गेले होते आणि हवा तो विभाग कुठे आहे ते माहिती नसल्याने म्हंटल जरा विचारून सापडेल...तर एका इमारतीत गेले आणि एका प्यूनला विचारला...त्याने हि पुढची इमारत असं सांगितल्यावर "त्या पुढच्या " इमारतीत गेले आणि पार अगदी तिसऱ्या मजल्यावर जाऊनसुद्धा कोणी कुत्रासुद्धा, माफ करा कुत्रे तिथं बरेच होते तेव्हा कोणीच माणूस सापडेना..म्हणून तसेच फिरत फिरत हि नाही ती असेल करीत आजूबाजूच्या इमारतीत गेले...त्यातल्याच एका ऑफिसातल्या बाईंनी एका इमारतीत जा सांगितले आणि कसं जायचं (म्हणजे इथून उजवीकडे मग डावीकडे )ते सांगितलं....मग तसं गेले...तर तिसऱ्याच ठिकाणी...शेवटी वैतागून म्हंटल एखाद्या विद्यार्थ्याला नाहीतर रस्त्यावरच्या कोणालातरी विचारावं आणि एक महाशय जे शिक्षक असू शकतात हि शंका आली त्यांना विचारलं...त्यांनी काही प्रश्न विचारून मला हवा तो विभाग कोणता आणि इथे कसं जायचं ते सांगितलं....इथे गेले...

जरा आत गेल्यावर लक्षात आलं कि पहिल्यांदा ज्या ठिकाणी (जिथून प्युनने "हि पुढची" सांगितलं ) तिथंच स्वारी परत आलेली. इतका संताप आला आणि मग हसू आलं. त्या प्युनला झापावं तर तो मेला कुठं दिसेना. तो विभाग तळात होता. मग तिथल्या एका ऑफिसात जाऊन एका तरुण प्रोफेसरला भेटले आणि काम सांगितलं. त्यांनी मार्गदर्शन केलं आणि अजून एका ठिकाणी जायला सांगितलं. मी पत्ता विचारला तर इमारतीचं नाव देऊन महाशय म्हंटले कि "हि इथेच ए". मग मात्र राहवलं नाही..." अहो काय लावलंय? इथ यायच्या आधी याच ठिकाणच्या एका प्युनने ती पुढची बिल्डींग म्हणून इथून पाठवलं. प्रत्येकजण हि इथंच ए करत होते आणि याच इमारतीभोवती गेला दीड एक तास तरी मी गोल गोल फिरतेय...जरा नीट सापडेल असं पत्ता सांगायला काय होतंय? " असं वसकले.

असो,
पण एकंदरीत एखाद्याला आपला पत्ता सांगायचा नसेल किंवा घरी सहजासहजी किंवा अगदीच घरी येऊ द्यायचं नसेल तर बिनदिक्कत सांगावे "अरे त्यात काय मी हे sssssss इथच तर राहते/तो " ,
त्याने शंका काढली कि "कसं यायचं?" तर जसं काही आपण अमिताभ बच्चनसारखे अगदी प्रसिद्ध आहोत असं भासवून
"अमुक अमुक स्टेशनावर ये आणि खाली उतरून कोणालाही विचार" किंवा " अमुक अमुक बस स्टॉपवर उतर आणि कोणालाही विचार ",

आणि जर आपल्याला कोणी अशा पद्धतीचा पत्ता सांगितला तर समजावे की कोणालाच तो माणूस किंवा पत्ता माहिती नाही...अन आपली भरपूर पायपीट होणार आहे....इतके करूनही नशीब जोरावर असेल तरच पत्ता सापडेल ...त्यामुळे असा कोणी पत्ता सांगत असेल तर त्यांनाच घरी बोलवावे आणि म्हणावे "एक फोन टाक, मी स्टेशनावर घ्यायला येते/तो" आणि एकदम घाई असल्याचे किंवा बस आल्याचे किंवा अचानक कोणीतरी ओळखीचे पण खूप काळ न भेटलेले दिसले असे करावे आणि जरी आपल्याकडे त्या ह्या ओरिजिनल वेळखाऊचा फोन नंबर नसला तरी " मी तुला फोन करतो/ते, आता खूप घाईत आहे " वगैरे सांगून पळावे.

Node read time
3 minutes
3 minutes

भटक्या Mon, 24/10/2011 - 13:49

काय हो, हे इथे आणि तिथेही टाकलेत?

टारझन Mon, 24/10/2011 - 15:53

वा शिल्पाताई वा. दिवाळीच्या दिवसांमध्ये चकल्या,लाडू खात असा चटकदार लेख वाचणे म्हणजे पर्वणीच की.
टार्‍या बुडवे

हिटलर Mon, 24/10/2011 - 16:48

>>एक फोन टाक, मी स्टेशनावर घ्यायला येते/तो
मान गये!!

राजेश घासकडवी Mon, 24/10/2011 - 21:22

'हे इथेच...' हे ऐकण्याचे तोटे आणि सांगण्याचे फायदे असतात हे छान दाखवलंय.

मी एखादी पॅंट शोधत असलो आणि बायकोला विचारलं की ती म्हणते

'अरे तिथेच आहे...'
'तिथे म्हणजे कुठे?'
'त्या कपाटात.'
'अगं कुठच्या कपाटात? इकडे दोन कपाटं आहेत'
'डावीकडच्या'
'तेच कपाट बघतोय'
'ते नाही, काळं कपाट'
'ते उजवीकडे आहे'
'उजवीकडे कसं, डावीकडेच'
'अगं खोलीत शिरताना डावीकडे नाही का?'
'आत जाऊन त्या खुर्चीवर बसल्यावर ते उजवीकडेच येतं.'
'नाही दिसत'
'अरे सांगितलं नं तिथेच आहे म्हणून'
'मी उघडून बघतोय'
'नाहीतर मग ड्रॉवरमध्ये असेल'
'ड्रॉवरमध्ये? कुठच्या? इकडे पाच ड्रॉवर आहेत.'
शेवटी ती आत येते, सराईतपणे डावीकडचं (खोलीतून शिरताना बरं का) कपाट उघडते आणि ती पॅंट काढून देते आणि वर म्हणते
'जरा नीट बघायला नको...'

सोकाजीरावत्रिलोकेकर Tue, 25/10/2011 - 00:31

In reply to by राजेश घासकडवी

आमच्याकडेही असेश होते, शेम टु शेम.
एकदा चुकुन 'चोराच्या वाटा चोराला बरोब्बर माहित' असे गमतीने म्ह्णालो. आता त्यावर काय झाले असेल ते सांगायला नकोच, नाही का? :)

- (पस्तावलेला) सोकाजी

शहराजाद Tue, 25/10/2011 - 22:05

In reply to by राजेश घासकडवी

'कै च्या कै' श्रेणी देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

प्रियाली Wed, 26/10/2011 - 01:19

In reply to by राजेश घासकडवी

आमच्याकडे उलट होते.

मी क्लोजेटमध्ये काहीतरी शोधत असते. मिळत नाही. मग मी विचारते 'कुठे आहे?
तो म्हणतो, 'तिथेच'
मी म्हणते 'तिथे म्हणजे'
तो म्हणतो 'हँगरवर लावून ठेवलं असावं.'
'हँगरवर मिळत नाहीये'
'मग रॅक शोध.'
'तिथेही मिळत नाहीये.'
'हे घे. मी आलो तर मला डोळ्यासमोर दिसलं. हे इथे ठेवलं होतं.'
'तुला इथे ठेवायला कोणी सांगितलं?'
'कोणी नाही. तू स्वतःचं क्लोजेट स्वतः लावलंस तर मला ते इथे ठेवायलाही लागणार नाही.'

असो. ;-)

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 25/10/2011 - 02:24

पुण्यात 'हे इथंऽच' याचा अनुभव जास्त आला आहे. मुंबईत पत्ता सांगताना तिसरा राईट, दुसरा लेफ्ट असं सांगायची पद्धत जास्त आहे असं वाटलं. पण आता गूगल मॅप्समुळे चांगली सोय झाली आहे.

राजेश आणि सोकाजी, आमच्या घरचा टिपिकल संवादः
नवरा: "माझा तो टी-शर्ट कुठे आहे?"
मी: ("मी शेंगा खाल्ल्या नाहीत"च्या चालीवर) "मी तुझे कपडे उचलले नाहीत, मला विचारू नकोस."
कपडे आपोआप सापडतात.

गवि Tue, 25/10/2011 - 22:17

तिथून सरळ "वर" या..

वाड्याकडून सरळ "खाली" येत रहा, मग फाटा लागेल..

असे काहीतरी "वर" किंवा "खाली" कोडमधे डायरेक्शन्स ऐकल्या आहेत का कोणी?

गावात वरच्या अंगाला, खाल्ल्या अंगाला, पूर्वेकडे कोसभर वगैरे असं काही सांगायला लागले की मी भंजाळतोच. भर दुपारी इथे कोणाला पूर्व कळतेय? आणि खाल्लं अग म्हणजे कोणती बाजू?

जावंदे..

आळश्यांचा राजा Wed, 26/10/2011 - 01:03

In reply to by गवि

आमच्या गावाला एक 'खायली आळी' आहे. प्रत्यक्षात ती वस्ती थोडीशी उंचावर जाऊन मग खाली उतरल्यानंतर येते, तरी इतर गावाच्या मानाने खाली वगैरे नाही. पण तरी ती खायली आळीच आहे.

Nile Wed, 26/10/2011 - 01:09

In reply to by गवि

सांगलीला ही वर खाली भानगड बसेसच्या बाबतीत फार ऐकलीय. एकमेव बस रूट असेल, म्हणजे बस 'वर जाऊन पुन्हा खाली' येणारा तर मग हे हमखास ऐकायला येते. कोणीही येतो अन इतक्याची बस वर गेली का? तितक्याची बस खाली गेली का? पण ते शिंदळीचं वर आणि खाली म्हणजे नेमकं कुठे हे मला काही अजूनही कळलेलं नाही. मी आपला बोट करुन विचारत किंवा सांगत असे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 26/10/2011 - 10:38

In reply to by ............सा…

खुर्द आणि बुद्रुक म्हणजे लहान आणि मोठं.

खालचं-वरचं हे अगदीच 'डाऊनमार्केट' आहे नाही का? डाऊनटाऊन, अपटाऊन म्हटलं की लगेच भारी वाटेल तुम्हां परंपराविरोधकांना! ट्रेन्स नसतात का १०२२ अप वगैरे? ते चालतं ना! उगाच आरडाओरडा करता तुम्ही लोकं! (मी आधीच पाय लावून पळाले आहे; हातात लाठ्या काठ्या घेऊन मला शोधू नये.)

धनंजय Wed, 26/10/2011 - 01:22

एखाद्या बारमध्ये गप्पा मारणार्‍या तिर्‍हाइताने विचारले - कुठे राहाता? तर मी पुष्कळदा मोघम उत्तर देतो : "हे इथेच दोन-चार गल्ल्या पलीकडे". त्याचा मथितार्थ "मला पत्ता सांगायचा नाही, पण संवाद मात्र चालू ठेवायचा आहे."

टारझन Wed, 26/10/2011 - 11:29

वा वा.काय पण विषय आणि काय एकेक अप्रतिम प्रतिसाद.
शिल्पाताई, असेच उच्च दर्जाचे लिहित जा हो.ज्ञानपीठ फार दूर नाही.

संगणकस्नेही Wed, 26/10/2011 - 17:23

चांगला धागा आणि वाचनीय प्रतिसाद.

घंटासूर Wed, 26/10/2011 - 19:38

In reply to by संगणकस्नेही

चांगला धागा आणि वाचनीय प्रतिसाद.

तुम्हीच ते मिपावरचे सुप्रसिद्ध इंटेश्वर का म्हणतात तेच का?

मरीआई Thu, 27/10/2011 - 11:08

आम्च्या गावाकडं डावीकडची दिशा दाखवून 'इकडच्या उजवीकडं' आणि उजवी दिशा सांगून इकडच्या डावीकडं असंपण म्हणतात :))

शिल्पा, मस्त लिहितेस गं !