ऑस्टिया अँटिका

(सूचना: येथील काही चित्रे IE मध्ये दिसत नाहीत असे मला वाटते. Chrome/Firefox मध्ये तशी काही अडचण दिसली नाही.)

रोमच्या मुक्कामात 'ऑस्टिया अँटिका' ह्या जागी भेट देऊन यायचा इरादा केला होता. बहुतेक प्रवासी इकडे फिरकत नाहीत कारण पॉम्पेचे ग्लॅमर आणि प्रसिद्धि ह्या जागेच्या वाटयाला आलेले नाहीत पण मी अर्धा दिवस खर्चून तेथे गेलो ह्याचा मला फार आनंद झाला.

'ऑस्टिया'म्हणजे नदीचे मुख. टायबर नदी रोममधून उत्तर-दक्षिण प्रवास करून अखेर रोमच्या दक्षिण-पश्चिमेला सुमारे २५ किमी अंतरावर समुद्रात मिळते. रोम हे प्राचीन काळातील अतिशय समृद्ध शहर. त्याची वस्तीहि त्याच्या सर्वात भरभराटीच्या काळात १० लाखाच्या घरात असावी असा अंदाज आहे. इतक्या मोठ्या वस्तीला अन्नधान्य, कपडा, ऑलिवचे तेल, मद्य अशा रोजच्या वापराच्या वस्तूंपासून नाना प्रकारच्या चैनीच्या गोष्टी प्रत्यही लागत. रोम समुद्रापासून थोडे आत आहे पण शत्रूचे आक्रमक सैन्य समुद्रमार्गाने येऊन टायबरच्या मुखातून घुसून शहरावर हल्ला करण्याची शक्यता होतीच. ह्या दोन्ही दृष्टींनी टायबरच्या मुखावर प्रथम एक लष्करी ठाणे इ.स.पूर्व काळात निर्माण झाले आणि त्याचीच वाढ होऊन ते पुढे रोमचे बंदर म्हणून विकसित झाले. ईजिप्तचे धान्य, इटलीच्या अन्य भागातून तेल, मद्य, दूदूरच्या प्रदेशांमधून जिंकलेले गुलाम माल सारखा आयत होत राहिल्यामुळे समुद्री व्यापार करणारे तेथे राहण्यास आले आणि लवकरच तेहि एक समृद्ध शहर झाले. बाहेरून येणार्‍या ह्या सर्व गोष्टी समुद्री जहाजांमधून उतरवून घेऊन छोटया मचव्यांमधून टायबरच्या पात्रातून रोमकडे रवाना होत. रोमची अर्थव्यवस्था फार मोठया प्रमाणात गुलामांच्या श्रमावर अवलंबून होती. हे मचवे नदीच्या पात्राविरुद्ध रोमपर्यंत ओढून न्यायचे काम गुलामच करीत असत. (अतिशय मेहनत लागणारे हे काम कसे असे हे पाहायचे असेल तर इल्या रेपिन ह्या प्रसिद्ध रशियन चित्रकाराचे Burlaki - Barge Haulers on the Volga हे गाजलेले चित्र पहा. स्रोत - विकिपीडिया.)

२-३शे वर्षांत व्यापार वाढत गेला तसे बंदर आवश्यकतेहून लहान पडू लागले म्हणून जवळच हेड्रियनच्या काळात दुसरे मोठे बंदर उभारण्यात आले. मधल्या काळात नदीचे पूर शहरात गाळ भरायला लागले. नदीने दोनतीनदा आपला प्रवाह बदलला आणि ऑस्टिया बंदर म्हणून मागे पडू लागले. तीनशे वर्षे भरभराटीचे दिवस पाहून नंतर शहर उजाड होऊ लागले. रोमन साम्राज्यावरहि उत्तरेकडून टोळीवाले हल्ले करून साम्राज्याचे लचके तोडू लागले आणि चौथ्या पाचव्या शतकापासून शहर उजाड झाले. पडक्या, बिनवापरातल्या इमारती, मंदिरे ह्यांची पडझड होऊन शहर अर्धेमुर्धे जमिनीत पुरले गेले. पुढची सुमारे १००० वर्षे ते जवळजवळ विस्मरणात गेले होते. नंतर पॉम्पेप्रमाणेच येथेहि इमारतींच्या सामानाच्या चोरीच्या हेतूने खणाखणी सुरू झाली आणि गेल्या दीडदोनशे वर्षात त्या खणाखणीला शास्त्रीय उत्खननाचे स्वरूप येऊन आत रोमचे पुरातन बंदर असे ते एक प्रवासी आकर्षण बनले आहे. १५००-२००० वर्षांपूर्वीचे जसेच्या तसे राहिलेले शहर म्हणून अभ्यासकांना त्याचे महत्त्व वाटते.

तेथे जाणे तसे सोपे आहे. रोमच्या मेट्रोच्या एका तिकिटात सुमारे ४५ मिनिटात तेथे पोहोचता येते.

तिकडे जायला आम्ही निघालो पण अगदी वाटेवर आमच्या हॉटेलपासून ५ मिनिटांच्या अंतरावरील 'सान पिएत्रो इन विंकोली' ह्या चर्चलाहि आधी भेट दिली. मायकेलअँजेलोच्या कडून सिस्टीन चॅपेल रंगवून घेणारा पोप ज्यूलिअस दुसरा ह्याचे दफनस्थान म्हणून ह्या चर्चची उभारणी सुरू झाली. हे काम मायकेलअँजेलोकडे होते. सर्वप्रथम ह्या कामामध्ये त्याने मोझेसचा एक पुतळा बनवला. त्याच्या फ्लॉरेन्समधील 'ङेविड', सेंट पीटर्स कॅथीड्रलमधील 'पिएता' ह्यांसारखाच त्याचा 'मोझेस'हि जगद्विख्यात आहे. त्याचेच छाराचित्र शेजारी पहा. हा पुतळा त्याने निर्माण केल्यानंतर पोपने पैसा कमी पडेल असे वाटून हे कमिशन रद्द केले आणि मायकेलअँजेलोला सिस्टीन चॅपेलच्या कामाकडे जायला भाग पाडले.

त्याच्या शेजारच्या चित्रामध्ये ज्या बेडया दिसत आहेत त्यांच्यामागे एक श्रद्धा आहे. रोममध्ये नव्या ख्रिश्चन समुदायाचा पुढारी पीटर ह्याला नीरोच्या आदेशानुसार इ.स. ६४ साली बेडया घालून क्रूसावर चढविण्यात आले असे मानले जाते. पीटरच्या अंगावरील त्याच ह्या बेडया आहेत. त्या बेडया कॉन्स्टँटिनोपलमध्ये एलिया युडोसियाकडे इसवी सनाच्या चौथ्या शतकात होत्या अशी नोंद आहे आणि तिने त्या आपली मुलगी युडोक्सिया, सम्राट वॅलेंटिनियन तिसरा ह्याची बायको, हिच्याकडे पाठविल्या, तिच्याकडून त्या पोप लिओ पहिला (पोप असण्याचा काळ ४४०-४६१ इसवी) ह्याच्याकडे आल्या आणि तेव्हापासून म्हणजे ५व्या शतकापासून त्या रोममध्ये आहेत आणि तदनंतर केव्हातरी 'सान पिएत्रो इन विंकोली' ह्या चर्चमध्ये त्या पोहोचून तेथे आता प्रमुख स्थानी ठेवण्यात आल्या आहेत.


चर्चच्या छोटया भेटीनंतर आपण आता आपले जायचे प्रमुख स्थान 'ऑस्टिया अँटिका' इकडे जायला रोम मेट्रोने निघू. स्थळाचे आकाशदृश्य असे दिसते. आपण त्याच्या पूर्व बाजूने प्रवेश करून नैऋत्येकडे जाणार आहोत. पुढील वर्णनात तेथील ज्या जागांची छायाचित्रे घालण्यात आली आहेत त्या जागा आकाशदृश्यात क्र. १ ते ६ अशा संख्यांनी दर्शविले आहेत.


गावाच्या रस्त्यांचे आणि त्याभोवतीच्या संरक्षक भिंतीचे पुढील वर्णन पहा. त्यात वर्णिलेले Cardo Maximus आणि Decumanus हे दोन प्रमुख रस्ते य आणि क्ष अक्षांप्रमाणे गावाच्या मध्यावर काटकोनात एकमेकांस छेदतात आणि गावाची रचना त्यांभोवती केली जाते असा रोमन नगररचनाशास्त्राचा नियम होता. पूर्व टोकाला Porta Romana म्हणजे रोम दरवाजा क्र.१ येथे होता.



रोम दरवाज्यापाशी पोहोचण्याचा आधी आपण गावाबाहेर असलेल्या एका दफनभूमीतून जातो. रोमन प्रथेनुसार मृतांचे दहन करून त्यांच्या अस्थि भांडयात ठेवून ते अस्थिकुंभ दफनभूमीमध्ये कायमचे ठेवत असत. सर्वसामान्यांच्या अस्थि साध्या मातीच्या भांडयांमध्ये जतन केल्या जात तर राजघराण्यातील वा अन्य धनवान कुटुंबातील मृतांच्या अस्थि मोठया किंमती पेटीमध्ये - sarcophagus - जतन केल्या जात. खालील चित्रांपैकी पहिले चित्र अस्थिकुंभ ठेवण्याच्या कोनाडयाचे आहे. चित्रात दिसणारा कोनाडा दुसर्‍या मजल्यावर आहे कारण पहिला मजला आता जमिनीखाली आहे. अस्थिकुंभ ठेवण्यासाठी असे कोनाडे असलेल्या अनेक जागा - ज्यांना columbarium असे म्हणत असत - येथे आसपास भग्नावस्थेत दिसत आहेत. दुसरे चित्र अस्थि ठेवण्याच्या दगडामधून कोरलेल्या पेटीचे आहे. पेटीवर मृत व्यक्तीचे नाव आणि अन्य माहितीहि कोरलेली दिसते. ही दगडी पेटी तशी साधीसुधी आहे. राजघराण्यातील वा अन्य धनवान कुटुंबातील मृतांच्या अस्थि ठेवण्याच्या किंमती पेटया पुढील दोन चित्रांमध्ये दिसतात. (ह्या पेटया येथील नाहीत, वॅटिकन म्यूझिअममधील पेटयांची ही चित्रे आहेत.) ह्या दोन्ही किंमती पेटया 'पॉर्फीरी' ह्या ईजिप्तमध्ये मिळणार्‍या दगडामधून कोरलेल्या आहेत. ईजिप्तमधून आणलेला असा दुर्मिळ दगड केवळ धनिकांनाच परवडणार! त्यानंतरची दोन चित्रे म्हणजे तेथीलच एका घराच्या जमिनीवरची मोझेइक चित्रे आहेत. त्यांपैकी एकामध्ये दोन डॉल्फिन मासे दिसत आहेत. हे गाव बंदराचे आणि समुद्रावर अवलंबून असल्यामुळे समुद्राशी संबंधित चित्रे येथे मिळणे साहजिक आहे. दुसर्‍या मोझेइकमध्ये ग्रीकांचा पेगॅसस नावाचा पंख असलेला घोडा,एक अन्य प्राणी आणि एक मानवाकृति दिसत आहे.




ह्यानंतर आपण रोम दरवाज्यापाशी - Porta Romana - येऊन पोहोचतो. (आकाशचित्रातील क्र. १) शहराचे हे प्रमुख प्रवेशद्वार. मुळात दोन मजल्याइतके उंच असलेल्या ह्या दाराचा केवळ वरचा अर्धा भाग आत थोडाफार शिल्लक उरला आहे. बाकीचे दार अर्धे जमिनीच्या खालीच आहे. दरपाशीच तेथेच सापडलेले काही शिलाखंड कडेला लावून ठेवलेले आहेत. त्यांपैकी एकावरचा लेख मधल्या चित्रात दिसत आहे. जालावर मिळालेल्या माहितीनुसार त्यावर लिहिलेला लेख
"SALVTI CAESARIS AVGVST
GLABRIO PATRONVS COLONIAE D(ecreto) D(ecurionum) F(aciundum) C(uravit)"
असा आहे. ह्या लेखावर एक शिल्प उभे होते. त्याचे नाव 'सम्राट् ऑगस्टसचे दीर्घायुरारोग्य'. ही एक स्त्रीदेवता दाखविली असून शहरातील एक प्रमुख नागरिक ग्लब्रिओनस ह्याने हे शिल्प करवून घेतले होते. शहरात प्रवेश करणार्‍यांना आश्वासक म्हणून रोम दरवाज्याच्या जवळच एका मोकळ्या जागेत विक्टोरिया मिनर्वा ह्या ग्रीक देवतेचा पुतळा उभा आहे.


येथून पुढे निघून आपण क्र. २ ह्या दुकानांच्या जागेपाशी येऊन पोहोचतो. ह्या जागा म्हणजे आयात झालेल्या वस्तूंची गोदामे असावीत असा तर्क आहे.


ह्याच्या पुढची जागा म्हणजे क्र.३ नेपच्यूनचे स्नानगृह. रोमन सामाजिक जीवनात ह्या स्नानगृहांचे विशेष स्थान होते. प्रत्येक गावात आणि शहरात एक वा अधिक अशी ही सार्वजनिक स्नानगृहे असत आणि सम्राट आणि त्याचे अधिकारी, धनिक लोक अशी स्नानगृहे बांधून जनतेला खूष ठेवण्याचा प्रयत्न करीत. गंभीर चर्चा, हलक्याफुलक्या गप्पा, कुचाळक्या, कारस्थाने करण्यासाठी एकत्र यायची हीच जागा. ऑस्टियामध्ये अशी दोन स्नानगृहे आहेत. एक हे, नेपच्यूनच्या नावाचे आणि दुसरे फोरमजवळील, तेथे आपण नंतर जाऊ.

हे स्नानगृह त्यातील विस्तृत मोझेइक कामासाठी विख्यात आहे पण सध्या मोझेइकची देखभाल चालू आहे म्हणून आत प्रवेश बंद आहे असे सांगणारी सूचना लावली आहे. तिच्यावर आतील मोझेइकचे चित्र आहे पण त्यावरून काहीच कळत नाही. त्यापेक्षा जास्ती गंमत म्हणजे तिच्यातील भाषा:

,

The mosaic of Neptune is covered for maintenance. We excuse there for the uneasiness.

The Direction.


दुरूनच अर्धवट दिसणार्‍या मोझेइकची काही छायाचित्रे घेऊन पुढे क्र. ४ कडे जाऊ.



क्र.४ मध्ये अ‍ॅम्फीथिएटर आणि त्याला लागून असलेली दुकानांची जागा अशा दोन गोष्टी आहेत. थिएटर पुष्कळच सुस्थितीत आहे. चढत्या पायर्‍यांची बनविलेली प्रेक्षकांची बसायची जागा (cavea), वादकांची बसायची जागा (orchestra) आणि अभिनय करणार्‍यांसाठी उंचावर स्टेज (skena)असे त्याचे स्वरूप आहे. सुमारे २००० प्रेक्षकांची येथे सोय आहे. प्रेक्षकांसाठी पायर्‍यांच्या मागे चार जिने आहेत, ज्यावरून प्रेक्षक प्रथम वर येऊन तेथून आपल्या जागेकडे जातात. मुख्य प्रवेशद्वारातूनहि पायर्‍यांच्या खालून बोगद्यासारख्या वाटेने आत येता येते पण तो प्रवेश केवळ अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीच राखीव आहे. पायर्‍यांच्या खाली अनेक खोल्या आहेत, ज्यांचा उपयोग दुकाने, साठवणीची जागा असा केला जाई. प्रवेशद्वाराहि सुबक बांधणीचे आणि विटा आणि रोमन पद्धतीचा चुना वापरून बांधलेले आहे. अशी कैक बांधकामे वारा-पाऊस-थंडी-ऊन्ह ह्यांना तोंड देत २००० वर्षे उभी आहेत ही गोष्ट लक्षणीय आहे. बाजूलाच थिएटरच्या शोभेचा भाग म्हणून असलेली आणि नाटकात वापरायच्या मुखवटयांसारखी दिसणारी तीनचार शिल्पे आपल्या जागा सोडून पडलेली आहेत. त्यांपैकी एकाचे छायाचित्र येथे आहे.


प्रवेशद्वारावर लॅटिनमध्ये एक लेख आहे. त्याचे छायचित्र मी घेतले होते. नंतर जालावर शोधल्यावर त्याचा अर्थहि सापडला. लॅटिन शिलालेख कसे असतात हे जाणण्याची इच्छा असलेल्यांसाठी मूळ लेख आणि त्याचा इंग्रजी अनुवाद येथे देत आहे. लेख बराचसा मोडतोड झालेला आहे. चित्रातील काळसर भाग मूळचा आणि पांढरट भाग अलीकडे पुनः बसविला आहे. (लेखात उल्लेखिलेला कमोडस म्हणजे 'ग्लॅडिएटर' चित्रपटातील हीरो मेरिडिअस - Russell Crowe - ह्याचा प्रतिस्पर्धी.)

IMP CAES DIVI MARCI ANTONINI PII FILIVS
DIVI COMMODI FRATER DIVI ANTONINI PII
NEPOS DIVI HADRIANI PRONEP DIVI TRAIANI
PARTHICI ABNEPOS DIVI NERVAE ADNEPOS
L. SEPTIMIVS SEVERVS PIVS PERTINAX AVG
ARABICVS ADIABENICVS PP PONTIF MAX
TRIBVNIC POTEST IIII IMP VIII COS II ET
MARCVS AVRELIVS ANTONINVS CAESAR
DEDICAVERVNT

इंग्रजी भाषान्तर: Imperator Caesar, son of the divine Marcus Antoninus the pious (= Marcus Aurelius),brother
of the divine Commodus, grandson of the divine Antoninus Pius,
great-grandson of the divine Hadrian, great-great grandson of the divine Trajan,
conqueror of Parthia, great-great-great grandson of the divine Nerva,
L. Septimius Severus, the pious, Pertinax Augustus,
conqueror of Arabia, conqueror of Adiabene, father of the fatherland (PP - pater patriae), supreme priest (pontifex maximus),
having the tribunician power for the fourth time, imperator for the eighth time, consul for the second time and
Marcus Aurelius Antoninus Caesar (= Caracalla)
dedicated.


ह्यापुढील चार छायाचित्रे थिएटरच्या मागे असलेल्या विस्तृत जागेशी संबंधित आहेत. पहिले छायाचित्र थिएटरमधून घेतलेले आहे हे पायर्‍यांवरून कळत आहे. ही जागा म्हणजे मध्यभागी कोणाएका देवतेचे मंदिर - त्याचा चौथरा आणि दोन स्तंभ काय ते उरले आहेत - आणि मंदिराच्या चोहो बाजूस स्तंभांच्या पलीकडे असलेल्या नाना प्रकारच्या आयात-निर्यात संबंधी दुकानांच्या जागा. येथे आयत-निर्यातीचे व्यवसाय एकत्रित होते हे तेथील मोझेइक्सवरून दिसून येते. पुष्कळ दुकानांसमोर व्यवसायाचे नाव आणि तेथे कसला व्यापार होतो हे सुचविणारी चित्रे प्रवेशद्वारात दिसून येतात. त्यांपैकी दोन येथे दाखवीत आहे. त्यांपैकी पहिल्या चित्रात दोन डॉल्फिन्स आणि एक धान्य मोजायचे माप दिसत आहे आणि SNFCC अशी अक्षरे आणि त्यापलीकडे NAVICVLARI CVRBITANI D(e) S(uo) असे शब्द दिसत आहेत. जालावर मिळालेल्या अर्थानुसार SNFCC म्हणजे S(tatio) N(egotiatorum) F(rumentariorum) C(oloniae) C(urbitanae, कुर्बा (ट्यूनिशिया) ह्या कॉलनीमधून आयात होणार्‍या धान्याच्या व्यवसायाची जागा. तसेच NAVICVLARI CVRBITANI ह्यावरून कुर्बाशी समुद्रमार्गे व्यापार अशी काहीशी सूचना दिसते कारण लॅटिनमध्ये navicula म्हणजे नौका. दुसर्‍या मोझेइकमध्ये समुद्रदर्शक असा डॉल्फिन मासा, दोन शिडाची जहाजे आणि मध्ये एक दीपगृह दिसत आहे.



आता आपण क्र.५कडे जाऊ. शहराच्या मध्यस्थानी असलेली ही जागा अनेक पायर्‍यांच्या वर बांधलेली असून नगरातील अन्य सर्व बांधकामांपेक्षा भव्य आहे. ज्यूपिटर, जूनो आणि मिनर्वा ह्या Capitoline Triad ह्या नावाने ओळखल्या जाणार्‍या त्रिमूर्तींचे हे देऊळ असावे असा तर्क केला जातो. अशी देवळे सर्व शहरात मुख्य भागी बांधलेली असत. सध्या देवळासमोरील स्तंभ आणि त्याच्या उंच भिंती सोडल्या तर पूर्वीच्या भव्यतेचा काहीच पुरावा उरलेला नाही देवळासमोरील मोकळ्या मैदानाच्या सभोवती स्तंभांवर तोलून धरलेल्या मार्ग होता. हा शहराचा फोरम. फोरमसमोर रोमा आणि ऑगस्टस ह्यांना वाहिलेले देऊळहि होते पण पडक्या भिंतींव्यतिरिक्त तेथे आता काहीच दिसत नाही.


फोरमनंतर आपण क्र.६ फोरम स्नानगृहाकडे जाऊ. वाटेत एका मोकळ्या जागेत एक मस्तकरहित पुतळा उभा आहे मात्र तो कोणाचा आहे हे कळत नाही. त्याशेजारी स्नानगृहाचा प्लॅन दर्शविला आहे. त्यामध्ये थंड, कोमट आणि कढत पाण्याची सोय असलेल्या खोल्या, पाणी गरम करण्यासाठी मोठया शेगडयांचा जागा, खाद्यपदार्थ मद्य विकण्याची जागा अशा सर्व गोष्टी भग्नावस्थेत स्पष्ट ओळखता येतात. स्नानगृहातील काही चित्रे अशी आहेतः खाद्यपदार्थ आणि मद्य विकण्याची जागा, स्नानाचा हौद आणि मागे बैलावर बसलेल्या युरोपा देवतेचे चित्र, समुद्रातील मासे आणि अन्य जीव, तसेच पाच मजल्यांचे दीपगृह ह्यांचे भिंतीवरील मोझेइक, ट्रायटन (हातात शंख धरलेला) आणि बैलासह युरोपा.


फोरम आणि स्नानगृह जवळ असल्याने येथे माणसांचा वावर बराच असणार. त्यांच्यासाठी केलेली सोय पहा.


येथील आपली धावती भेट आता शेवटाला येत आहे. परतीच्या मार्गावर स्टेशनच्या आवारात पुढील स्मृतिशिला दिसली. उत्खननात १८६३ साली सापडलेली ही शिला गुलामगिरीमधून सुटका केल्या गेलेल्या एका जोडप्याची दिसते. त्यांना मुक्तता बहाल करणार्‍या त्यांच्या धन्याचे नावहि तेथे नोंदवले आहे. आपल्या मुक्ततेबद्दल चिरस्थायी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा मार्ग आहे काय असे वाटून जाते. शिलेवरील मजकूर आणि त्याचा अर्थ असा आहे: of Montana Manlia, freedman of Marco, of Felicula Manlia, freedwoman of Marco.

(फोरम स्नानगृहातील चित्रे http://www.ostia-antica.org/ येथून)

field_vote: 
4.166665
Your rating: None Average: 4.2 (6 votes)

प्रतिक्रिया

मजा आली या जागेच्या भेटीत- मी तिथे जाऊन मिळवेन त्यापेक्षा अशीच वाचून जास्त माहिती मिळत्ये.
गेल्याच आठवड्यात कामा निमित्त एक दिवसाची रोम सहल झाली. काम संपवून ४ तास पायी फिरले. तेर्मिनी स्टेशन ते कलोसिअम हा भाग फिरले. मला वाटतं मी 'सान पिएत्रो इन विंकोली' शेजारून गेले होते- आत गेले नाही तिथे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोममधे ऐतिहासिक गोष्टी कोणत्या आहेत हे अन्यथा कदाचित समजलं नसतं. या स्नानगृहातली चित्रं रंगीत होती का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दरवेळी "माहितीपूर्ण" या शब्दाला कोणता नवा प्रतिशब्द / प्रतिवाक्य शोधायचं या विचारात आहे! Smile
फारच छान.. मला सगळीच माहिती नवी आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सेम हियर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अगदी अस्सेच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऑस्टिया अँटिका बद्दल माहिती नव्हती!!!! मस्त लेख एकदम. याहुनि विशेष आता काय लिहिणे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अप्रतिम लेखमाला _/\_
गाईडेड टुर प्रमाणे लिहीण्याची शैलीदेखील खूप आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0