आठवणीतले प्रवास दुचाकीवरचे - भाग १

कॉलेजात शिकत असताना एकदाची परीक्षा पार पडली की 'गंगेत घोडे न्हाले' म्हणायला आम्ही मोकळे असू. मग किमान एक महिना जन्मदात्या माउलीच्या भाषेत 'खायला काळ नि भुईला भार' होऊन राहणे यापरता दुसरा उद्योग नसे. अधून मधून इकडे तिकडे हिंडणे (आजच्या भाषेत 'ट्रेक'ला जाणे) सोडले तर करण्यासारखे काहीच नसे.
पहिले सत्र संपताना मी गोव्याला गेलो होतो. आणि त्याच वेळेस प्रेमातही पडलो होतो. प्रेम-प्रकरण Long Distance श्रेणीतले होते. त्यामुळे पत्रे लिहिणे, पोस्टमनची वाट पहाणे आणि खोल उसासे सोडणे या पलिकडे फारसे काही केले नाही. दुसरे सत्र संपताना the other party पुण्यात दाखल झाली. मग त्या उन्हाळ्यात लोहगड, सिंहगड आणि बनेश्वर झाले.
त्यातले बनेश्वर आणिक सिंहगड स्कूटरवर. त्या सहली खूप म्हणजे खूपच रोमँटिक होत्या. म्हणजे काय, तर सुरुवात करण्याआधीच 'आपण काहीतरी रोमँटिक करतो आहोत' हे जाणवून देण्यात आले होते. त्यामुळे 'रोमँटिक वाटू लागले आहे' असे झक मारत कबूल करण्यावाचून गत्यंतर होते कुठे?
प्रेम प्रकरण उभय पक्षांच्या सुदैवाने लवकरच विझले. दुसर्‍या वर्षाच्या दिवाळी सुटीत दिनकरबरोबर राजगडावर चार दिवस मुक्काम ठोकला. त्याबद्दल नंतर केव्हातरी. आणि तो प्रवास तसाही यष्टी आणि येताना दुधाचा ट्रक असा होता.
आणि दुसर्‍या सत्रानंतरच्या उन्हाळ्याच्या सुटीत स्कूटरवर कुठेतरी लांब जाऊन यायची मला उबळ आली. ही उबळ वारंवार येत राहील, आणि दम्याच्या उबळीपेक्षाही तीव्र आणि दीर्घ मुदतीची असेल हे तेव्हा जाणवले/कळले नाही.
मुख्य अडचणी दोन होत्या. एक म्हणजे घरात सगळी मिळून एकच स्कूटर होती. ती नेल्यास कुटुंबप्रमुखास रोज चतु:शृंगीसून शनिपारास्तोवर बसने प्रवास करावा लागला असता. यासाठी परमपूज्य पिताजींना राजी करणे सोपे नव्हते. दुसरी (आणि अधिक मोठी) अडचण म्हणजे कोंकणस्थ घर असल्याने स्कूटरच्या पेट्रोलचा खर्च मांडण्यात आला असता आणि यष्टीने (फारच चैन करायची असल्यास 'एशियाड'ने) जाणे कसे सोयिस्कर आहे हे रोखठोक सांगण्यात आले असते.
पहिली अडचण कशीबशी निभावली.
म्हणजे त्याचीही गंमतच झाली. पहिल्या वर्षी हजेरी पूर्ण नसल्याने कॉलेजने विषयामागे पंचवीस रुपये असा शंभर रुपयांचा भुर्दंड ठोठावला होता. तीस-बत्तीस वर्षांमागचे शंभर रुपये! दहा रुपयांच्या एका नोटेत एक एलपी येण्याचे ते दिवस (एलपी म्हणजे 'लाँग प्लेइंग' वा 'लक्ष्मीकांत प्यारेलाल' एवढेच अर्थ माहीत असणार्‍यांनी दोन चमचे गंगाजल पिऊन यावे; मी थांबतो).
पहिल्या वर्षी अशी 'कामगिरी' झाल्याने घरी माझा स्टॉक फारच खालावला. त्यामुळे पुढच्या वर्षी मी सतर्क झालो. बुद्धी बरी असल्याने वर्गातल्या काही सहाध्यायींना मी शिकवण्याचे काम (इंडस्ट्रिअल केमिस्ट्री, लिनीयर अल्जिब्रा आणि इलेक्ट्रॉनिक्स-२) केले होते. त्यातले काही सहाध्यायी 'कसब्या'तले होते (तीस-बत्तीस वर्षांपूर्वीची 'कसबा पेठ' माहीत नसेल तर पान उलटून पुढे जा. किंवा एक 'एलपी' घेऊन या). तर त्यांच्या 'गुरूजींना' (पक्षी: मला) पहिल्या वर्षी दंड भरावा लागला हे कळाल्यावर त्यांचा सात्त्विक संताप उफाळून आला ('सात्त्विक' हा शब्द 'संताप' याबरोबर जोडीने म्हणून आला आहे. उगाच खरोखरचा अर्थ घेऊ नका). दुसर्‍या वर्षासाठी या 'अखिल कसबा मित्रमंडळाने' माझ्यासाठी जोरदार 'फिल्डींग' लावली.
आमच्या कॉलेजात प्रत्येक विभागाची खासियत अशी आहे (अजूनही आहे! ) की दुपारच्या चहाच्या वेळी सगळी अध्यापक मंडळी त्या त्या विभागातल्या 'टी रूम' मध्ये निष्ठेने हजर होतात. Tradition is the most important thing in Oxford, and Pune is the Oxford of the East वगैरे वगैरे. ही Tradition कुणी सुरू केली देव जाणे. टिळक आणि आगरकर आपापल्या पगड्या सावरत चहाची वेळ गाठायला लगबगीने निघाले आहेत असे दृश्य डोळ्यांसमोर आणणे अवघड आहे.
ही Tradition माझ्या मित्रमंडळाने सफाईने आपल्या (माझ्या) भल्यासाठी वापरली. एक दिवस निवडून त्या दिवशी Tea Time मध्ये विभागागणिक दोन (एक कर्ता, दुसरा सवरता; 'आयटी'च्या भाषेत एक मेकर, एक चेकर) 'मित्र' अध्यापकांच्या 'कॉमन रूम' मध्ये शिरले आणि त्यांनी त्या त्या अध्यापकांच्या मेजांवरून आमच्या वर्गाचे(च) हजेरीपत्रक लंपास केले. आणि ग्राऊंडजवळच्या 'जिम'मागे त्या सगळ्या हजेरीपत्रकांची होळी करून टाकली. बात खतम. बांबूच नाही तर लागेल कसा?
अशा रीतीने मुद्दलच गहाळ झाल्याने कॉलेज त्या वर्षी काही व्याज लावू शकले नाही. आणि त्यामुळे कुटुंबप्रमुखासमोर माझी कॉलर (जरा) टाईट होती. येणेप्रमाणे पहिली अडचण निभली.
दुसर्‍या अडचणीसाठी मी 'मुद्दा लावून धरणे' एवढे (आणि एवढेच) निष्ठेने चालू ठेवले. 'पण एकदा जाऊन यायला काय हरकत आहे? ', 'आपल्या स्कूटरला एवढे काही पेट्रोल लागत नाही, बसपेक्षा थोडेसेच जास्त पैसे जातील ('थोडेसेच' म्हणजे दुप्पट हे कशाला बोलू? 'नरो वा कुंजरो वा' झिंदाबाद)', 'आत्ता नाही तर कधी जाणार (कॉलेज संपल्यावर मुकाट नोकरीला लागणे हे त्यावेळेस गृहीत धरण्यात आलेले होते)' या आणि अशा वाक्यांची उलटापालट (आणि सरमिसळ) करीत मी किल्ला लढवत राहिलो. मुरारबाजी, बाजीप्रभू आदि मंडळींनी माझ्याकडे (टपाली) शिकवणी घ्यावी इतक्या निष्ठेने मी किल्ला लढवला.
आणि जिंकलो. 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता' हे खरे होते तर.
तयारीला लागलो. स्कूटर मेकॅनिककडे नेऊन आणली. चाकांची हवा पाहिली. प्लग साफ केला. कार्ब्युरेटर साफ केला. सामानाची बांधाबांध केली. स्कूटरच्या डिकीत काय मावेल आणि काय बाहेर ठेवायला लागेल याची यादी केली. पुढची आणि मागची डिकी सामानासाठी गृहीत धरून एक Ecolac बॅग स्टेपनीला बांधावी लागेल एवढा अंदाज आला. अर्थात सामानाचा अंदाज माझा होता, आणि तो 'कोल्हापूर आणि परत' एवढाच नव्हता. पण ते उघड करण्याची वेळ अजून आली नव्हती.
डायरी लिहिण्याचा माझा स्वभाव नाही (स्वतःशीच का होईना, एवढे खरे बोलणे मला झेपत नाही), त्यामुळे निघण्याची तारीख नोंदवू शकत नाही. क्षमस्व. पण मे महिन्याची सुरुवात होती एवढे निश्चित. त्यामुळे लौकरच उजाडे एव्हढेच नव्हे, तर लौकरच चटचटायलाही लागे. त्यामुळे लौकर म्हणजे अगदी पहाटे चारलाच निघण्याचा बेत ठेवला.
आणि आदल्या रात्री 'कोलायटिस'ने कोलदांडा घालायचा एक सणसणीत प्रयत्न केला. हा 'कोलायटिस' मी गोव्याच्या एनसीसी कँपमधून सोबत आणला होता. तो मधूनअधून आपले अस्तित्व जाणवून देत असे. पण यावेळेस स्वर जरा चढा होता. त्यामुळे रात्रभर पोट आवळून पडून राहिलो, झोप अशी आलीच नाही. साडेतीनला गजर झाल्यावर उठलो, तयार झालो आणि ओठांवर दात आवळून स्कूटरमध्ये सामान भरू लागलो. दोन्ही डिक्या भरल्यावर Ecolac भरली, दोरीने स्टेपनीला घट्ट बांधून टाकली आणि स्कूटरला लाथ घातली.
सेनापती बापट रस्ता पहाटे चारला लख्ख रिकामा होता. किंबहुना, स्वारगेटला पोहोचेपर्यंत कुणी फारसे आढळलेच नाही. पण स्वारगेटनंतर फारच जास्ती प्रमाणात ट्रक आढळू लागले.
ट्रकवाल्यांचाही इलाज नव्हता. कात्रज देहूरोड बायपास तेव्हा फक्त शगोपंच्या कल्पनेतच असावा.
अडचण एव्हढीच होती की 'प्रिया'चा दिवा म्हणजे 'तो लागला आहे की नाही हे बघायला दुसरा दिवा घेऊन जावा' या श्रेणीतला होता. त्यामुळे समोरचा रस्ता कसाबसा दिसत होता. समोरून ट्रक आला की डोळे दिपत आणि समोरचे काहीच दिसत नसे. अशा वेळेस स्कूटर मुकाट डावीकडे थांबवणे एव्हढेच हातात होते.
अशा रीतीने मजल-दरमजल करीत कात्रजचा घाट ओलांडला आणि शिरवळ-खंडाळ्याच्या दिशेने कूच केले. खंडाळा गाठेस्तोवर साफ दिसू लागले होते. पण त्यामुळेच बहुधा गडबड झाली. खंबाटकीच्या घाटात एक मोठासा दगड रस्त्यात डाव्या बाजूला पडला होता, त्याकडे माझे ध्यान गेलेच नाही. मी आपल्याच तंद्रीत सरळ त्या दगडावर स्कूटर घातली. तो दगड माझ्या बाजूला निमुळतासा होत गेला होता, त्यामुळे धडकून पडण्याऐवजी माझी स्कूटर त्या दगडावरून टेक-ऑफ घेतल्यासारखी उडाली. उडाली म्हणजे एक-दीडच फूट. पण सुदैवाने परत दोन चाकांवरच भूमातेला स्पर्श करती झाली. त्या सेकंदभरात मीही खडबडून जागा झालो आणि दोन चाकांवरची दुचाकी दोन चाकांवरच ठेवण्यात यशस्वी झालो.
तिथपासून पुढचा प्रवास सुरळीत चालू राहिला. सातारा बायपास तेव्हाही कार्यरत होता, त्यामुळे बाहेरच्या बाहेर कराडच्या दिशेने निघालो. माझा प्रयत्न होता की शक्यतो न थांबता जितके जाता येईल तितके जावे.
सातारा-कराड रस्ता तसा सरधोपट आहे. वळण-वाकण फारसे नाही. पण एव्हाना पुण्यासून निघाल्यावर कुठेही न थांबल्याचे परिणाम जाणवू लागले होते. 'बजाज'च्या स्कूटर्स म्हणजे कुठल्याही 'यूजर सॅटिस्फॅक्शन सर्व्हे'मध्ये 'निगेटिव्ह (क्लोज टू इन्फिनिटी)' हा शिक्का लेवूनच जन्माला आलेल्या. 'बजाज'च्या स्कूटर्सनी जेव्हढे 'स्पाँडिलॉसिस'चे रुग्ण तयार केले तेव्हढे कर्करोगाचे रुग्णही भारतातल्या सगळ्या सिगारेट कंपन्यांनी मिळून केले नसावेत. बसल्या बसल्या खांदे, पाठ, पाय हे जमेल तेव्हढे ताणून घेत स्कूटर दामटत राहिलो. कराडला पोहोचेपर्यंत मात्र पारच भुस्कट पडले.
मग आठवले की माझ्या मिरजेच्या बालमित्राचे, उमेशचे, कुटुंब आता कराडला आले होते. त्याच्या वडिलांची बँक ऑफ इंडियाच्या कराड शाखेत बदली झाली होती. ओळखी आणि नातेसंबंध आपल्या गरजेच्या वेळेस वापरायचे नाही तर केव्हा? तो जमाना सेलफोनचाच काय, पण फोनचाही नव्हता. 'लँडलाईन' हा शब्दही तेव्हा कुणास ठाऊक नव्हता. त्यामुळे जाण्याआधी सटासट फोन मारणे (आता कराडात पोहोचलोय; आता नाक्यावर पोहोचलोय; आता गल्लीत पोहोचलोय; आता तुमच्या दारात आहे इ इ) गंमत तेव्हा नव्हती. पण धाडकन कुणीतरी (Persona Non Grata नसलेली) व्यक्ती दारात उभी राहिल्यावर होणारा अवचित आनंद भरपूर होता.
मी बँक शोधून काढली. त्या काळात तरी बँक मॅनेजरच्या क्वार्टर्स शक्यतो बँकेच्या इमारतीतच असत. कराडलाही होत्या.
उमेशच्या घरी एकदम ऐसपैस दिलदार देशस्थी स्वागत झाले. आधी उमेशच्या बाबांनी "दमला असशील, जरा आंघोळ करून घेतोस का? " असा मायेचा सवाल टाकला. त्यांना मी कराडात मुक्कामाला आलो नाही हे सांगावे लागले. मग उमेशच्या आईने "परवानगी बरी दिली तुला आईने" म्हटले. थोडक्यात, उमेशला असला आचरटपणा करण्याची परवानगी मिळणार नाही हे कळले.
पण पठ्ठ्या एकदमच तयारीचा निघाला. तेव्हा नव्हे, पण दहा वर्षांनी का होईना, तो सायकलवरून कन्याकुमारीला जाऊन आला. अजूनही 'सहज' म्हणून कोल्हापूरपर्यंत (तो डॉक्टर होऊन कराडातच स्थायिक झाला आहे) जाऊन येतो. म्हणजे असे सांगतो तरी. मला त्याचा हेवा वाटतो की तो खोटारडा असल्याची खात्री पटते हे Sobriety scale वर मी कुठे असेन त्यावर ठरते. असो.
तासभर बसून, चहापोहे आदि (आदि म्हणजे उमेशची धाकटी बहीण ज्योती तेव्हा नुकतीच स्वयंपाकघरात हालचाल करू लागली होती; तिने केलेली थालिपीठे) उदरस्थ करून मी स्कूटर परत चालू केली. एव्हाना नऊ वाजले होते. ऊन जाणवायला लागले होते. पण आता तासाभराचाच पल्ला होता. त्याप्रमाणे दहा वाजण्याच्या सुमारास मी राजारामपुरी गाठली. कॉलेजमित्र हर्‍याकडे मुक्काम ठोकायचा बेत होता.
हर्‍याच्या बाबांनी जुनाट दुचाकीवरून एवढा पल्ला एकट्याने काटल्याबद्दल आधी माझी खरडपट्टी काढली. मग हर्‍याच्या आईंना आतून बोलावले आणि त्यांना मला ओवाळायला लावले.
कोल्हापुरात निवांतपणे आठवडा काढला. एक दिवस मिरजेला जाऊन आलो. जवळपास दहा वर्षांनी जात होतो. आणि त्या दहा वर्षांत उंची दोनेक फुटांनी तरी वाढली होती. लहानपणीचे 'मोठ्ठे' वाटणारे गाव आता फारच भातुकलीतले वाटले. आणि मिरज सांगली एव्हढे जवळ आहे हे कळल्यावर माफक धक्काही बसला. लहानपणी मिरजेहून सांगलीला जायचे म्हणजे वेरवलीसून रत्नांग्रीला येण्यासारखी तयारी असायची.
एक पन्हाळा ट्रिपसुद्धा मारली. परत तिथे जाण्यात अर्थ नाही एव्हढे कळले. तेव्हाही तिथे धनिक-वणिक बाळे 'मजा आना चाहिये' हे ब्रीदवाक्य घोकत दाखल होत.
त्यादरम्यान पुढल्या टप्प्याची आखणी करून टाकली. म्हणजे काय केले, तर रत्नागिरीला मधूकाकांना फोन ठोकला. मी कोल्हापूरपर्यंत आलो आहे हे कळल्यावर त्यांची प्रतिक्रिया अपेक्षेप्रमाणेच होती.
त्याचे काय होते, तर मधूकाकांचा स्वभाव एकंदरीतच नातीगोती, सगेसोयरे यांच्यात रमणारा आहे. मोजूनमापून वागणार्‍या कोंकणस्थांपेक्षा घोळबाज देशस्थांत शोभेल असा. त्यामुळे "ते काही नाही, कोल्हापूरपर्यंत आलाच आहेस तर आता रत्नांग्रीला येऊनच जा. मी बोलेन दादाशी" हा संवाद झडला आणि त्याप्रमाणे तीर्थरूपांशी मधूकाकांनी संपर्क साधला. पाहुण्याहातून साप मेला.
कोल्हापूर रत्नागिरी रस्ता अजूनही बराचसा प्रेक्षणीय आहे. त्यावेळी तर तो लॉरा लिनीच्या हास्यासारखा मोहक होता. पंचगंगेवरचा पूल ओलांडला की दुबाजूंना हिरवीगार शेती सुरू होई. मलकापूरला लाल मातीची झलक मिळायला सुरुवात होई. आंबा घाटातला रस्ता अरुंद होता त्यामुळे वाहतूक निवांतपणे चालत असे.
खाली साखरप्याला उतरल्याबरोबर कोंकणी दमटपणाने गदमदायला लागले. पण कोंकणचा हिरवागार वास वातावरणात भरून राहिला होता त्यामुळे उकाड्याकडे दुर्लक्ष करता आले. तेव्हाचा साखरपा-पालीऱ्हातखंबा-रत्नागिरी रस्ता किती अतिशय अतिशय होता हे लिहिणे माझ्या बोटांबाहेरचे आहे.
मधूकाका एव्हाना मारुतीमंदिरच्या घरात राहायला आले होते. त्यांच्याकडे पोहोचलो आणि पुढच्या तयारीला लागलो.
माझा एक लांबचा आतेभाऊ महाडला शिक्षक होता. माझ्या बालपणी तो आमच्याकडे शिकायला होता. मी मधूकाकांकडे त्याची चौकशी सुरू केली. "अप्पा काय म्हणतोय? नवथर गाठ पडलेली काय? मी तर काय गेल्या पाचसात वर्षांत भेटलेला नाही त्याला". मधूकाकांनी अपेक्षेप्रमाणेच "आता एवढा आलाच आहेस इथवर तर जाताना महाडावरूनच जा. थोडेसेच लांब पडेल. " मला पाहिजे होते ते साध्य झाले, मी कशाला नाही म्हणू? तीर्थरूपांना परत एकदा मधूकाकांचा फोन गेला.
रत्नागिरीहून जवळपासचे टप्पे आठवड्याभरात मारले. एक दिवस कोट-लांजा-वेरवली. एक दिवस गोळप-पावस. एक दिवस केळे-मजगांव. किल्ल्यावर तर सूर्यास्त पाहण्यासाठी रोज संध्याकाळी फेरी असेच.
केळे-मजगांव फेरीत स्कूटरने जरा विसंवादी सूर छेडला. तशी तिचीही चूक नव्हती म्हणा. रस्ता म्हणून मी ज्या मार्गावर स्कूटर दामटली होती ती जेमतेम पायवाट होती. त्यातला कुठलातरी दगड लागून सायलेन्सर मूळ स्कूटरपासून विलगला आणि फटर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र आवाजाने कानठळ्या बसू लागल्या. सुदैवाने मारुती मंदिरच्या कोपर्‍यावर मेकॅनिक होता, त्याने क्लँपचे नट आवळून दिले.
दुसर्‍या दिवशी महाडला प्रस्थान ठेवले. संगमेश्वर ओलांडून धामणीला पोहोचता पोहोचता सायलेन्सर परत एकदा सुटावला. तिथे कुणी मेकॅनिक असा नव्हता. 'सावर्ड्याला मिळेल' असा आशीर्वाद घेऊन कानठळ्या बसवून घेत पुढे निघालो. हॉर्न वाजवायची गरज मिटली.
सावर्ड्याच्या मेकॅनिकने परत क्लँप आवळून दिला. एव्हाना ऊन चटकायला लागले होते. त्यामुळे चिपळुणात शिरण्याचा विचार रद्द करून स्कूटर दामटत राहिलो. परशुरामाच्या घाटीमध्ये 'वाशिष्ठी दर्शन' नामक एक 'पॉइंट' आहे. तिथून खालची नदी आणि परिसराचे विहंगम दृश्य विलोभनीय दिसते. रस्ता रुंदावला, रहदारी वाढली, तरी अजूनही ते दृश्य पहायला हमखास थांबणे होते.
लोट्याच्या माळावर तेव्हा केवळ घर्डा केमिकल्स आणि नोसिल एव्हढेच होते. ते ओलांडून खेडच्या दिशेला लागलो आणि सायलेन्सरने परत दगा दिला. आता खेड नाक्यावर थांबणे आले. तिथल्या मेकॅनिकचे देणे देऊन पुढे सरकलो.
कशेडीच्या घाटात माझ्यापुढे एक ट्रक जाड धातूचे शीट्स घेऊन चालला होता. त्या शीट्स मागचे सगळे फाळके पाडून आडव्या अंथरल्या होत्या आणि त्यांना दोरखंडांनी बांधले होते. त्या ट्रकला ओव्हरटेक करण्यासाठी मला नीटसा चानस गावेना. दोनेक किलोमीटर प्रयत्न करून पाहिला आणि वैतागून मागेच थांबलो. आणि थांबलो म्हणून वाचलो.
झाले असे, की त्या भूसमांतर टाकलेल्या धातूच्या शीट्स दोरखंडांनी बांधलेल्या होत्या. पण शीट्स हलून हलून ते दोरखंड काचले होते आणि दोन वळणे पुढे ते दोरखंड तुटले. त्यातले एकेक शीट एकेक क्विंटलचे होते (असे त्या ड्रायवरने नंतर सांगितले). मी जर मागोमाग राहालो असतो तर ते शीट्स माझ्या डोक्याच्या उंचीवरून मागे सांडत असताना मी त्यांच्याखाली वा त्यांच्यासमोर आलो असतो.
खणाण खण्ण आवाज कसला झाला म्हणून मी पुन्हा पुढे झालो तर हे दृश्य दिसले.
घाटमाथा ओलांडून उतरायला लागलो. पोलादपूर गाठेपर्यंत घामाने भिजायला झाले होते. उजवीकडे महाबळेश्वरचा रस्ता गेला. आता शेवटचा टप्पा म्हणून स्कूटर हाणली. महाडच्या आधी एक मोकळा रस्ता मिळाला म्हणून 'प्रिया' पळवली. किती पळते ते बघू म्हणून. ८० चा वेग गाठलान तिने. पण मग लगेच ती बाळ कोल्हटकरांच्या नाटकातल्या पात्रांसारखी भावनातिरेकाने थरथरू लागली. मुकाट वेग कमी केला.
जेवणवेळ ओलांडून महाडला दाखल झालो. अप्पाचे घर आईस फॅक्टरीच्या जवळ होते. 'आईस फॅक्टरीच्या जवळ' आणि 'ओकमास्तर' यापैकी एखाद्याही खुणेवर त्याकाळी कुठल्याही गावात निर्वेधपणे पत्त्यावर पोहोचता येई.
अप्पा कुठेतरी बाहेर गेलेला होता, पण त्याची बायको आणि मुले घरात होती. स्नेहावहिनीला मी त्याआधी कधी भेटलो नव्हतो. मुले खेळत होती. त्यांना शेजारच्या आईस फॅक्टरीत पिटाळून वहिनीने बर्फ मागवला आणि कच्च्या कैरीचे गारेगार पन्हे देऊन आधी माझा जीव थंड केला. तेवढ्यात अप्पा आलाच. मी स्कूटरवर आलो आहे असे कळताच "अरे वा, रहा चार दिवस. रायगडला जाऊन येऊ" असे तो वदता झाला. मग वहिनीच्या हातची डाळिंब्यांची उसळ आणि तांदळाच्या ताज्या भाकर्‍या असे तुडपून जेवलो नि ताणून दिली.
संध्याकाळी चवदार तळे पहायला गेलो नि स्कूटरचा सायलेन्सर परत दगावला. अप्पाचा एक मेकॅनिक मित्र होता, त्याने एकंदर परिस्थिती बघून सुचवले की क्लँप आवळत बसण्यापेक्षा सायलेन्सर मूळ बॉडीला वेल्डच करून टाकावा. जेव्हा डीकार्ब (स्कूटरचा सायलेन्सर दीडदोन वर्षांनी काढून त्यात साठलेली काजळी आणि तेल साफ करणे ही अगदी नेहमीची गोष्ट होती; जुन्या स्कूटरधारकांना काय ते कळेल) करण्यासाठी काढायची वेळ येईल तेव्हा कापूनच काढावा. त्याप्रमाणे वेल्डच करून टाकला. नंतर डीकार्ब करण्याची वेळ येण्याआधीच आम्ही ती स्कूटर विकून टाकली.
रायगडचा रस्ता अगदीच एकेरी होता. स्कूटर असल्याने फारसा प्रश्न नव्हता. पण काहीकाही वाकणे आणि चढ एकदम परीक्षा पाहणारे होते. पाचाडला स्कूटर लावून किल्ल्यावर चढायला लागलो. पायर्‍या नीट असल्या आणि कुठेही 'तोरणा' वा 'तुंग' यासारखे प्रस्तरारोहण करावे लागले नसले तरी पार घामटा निघाला. वरती गेल्यावर कळले की आता तिथे जिल्हा परिषदेने एक नीटसे गेस्ट हाऊस बांधले आहे. तिथे राहाण्याजेवणाची व्यवस्थित सोय होते. आम्हांला झकास जेवण मिळाले.
किल्ल्याचा आवाका पाहता किमान तीन दिवस राहिले तरच तो मनासारखा हिंडता येईल याचा अंदाज आला. त्याप्रमाणे दोनच आठवड्यांनी दिनकर आणि वसंताला घेऊन करूनही टाकले. ते नंतर केव्हातरी लिहीन.
उन्हाळ्यात रहायला महाड हे चिपळुणाइतकेच बेकार गाव आहे.
आता शेवटचा टप्पा. वरंध घाटातून वर चढायच्या ऐवजी गोवा रस्त्याने सरळ जाऊन पनवेल गाठावे, शाळेतल्या दोस्तांच्या गाठीभेटी घ्याव्यात, पनवेल परत नीट न्याहाळून पहावे आणि खंडाळ्याच्या घाटाने वर चढावे असा विचार होता. महाडच्या पोस्टातून घरी फोन लावला (तीर्थरूप नसतील अशा वेळेस) आणि "येताना पेणवरून रामधरण्यांचे पापड घेऊन येतो" असे सांगून माऊलीला माझ्या पक्षात वळवून घेतले. शेवटच्या टप्प्यात का होईना, तिची नाराजी कमी झाली.
महाड पनवेल रस्ता अगदीच कंटाळवाणा आहे. एक तर माणगांव (आणि नंतर जरासे आत असलेले पेण) सोडले तर मोठेसे गाव नाही. आणि रोहा-नागोठणे टप्प्यातल्या रासायनिक कारखान्यांमुळे उग्र दर्प पसरवत जाणारे टँकर्स पदोपदी आडवे येतात. रस्ता (अजूनही) डिव्हायडर नसलेला दोनपदरी आहे.
पनवेलला असताना मी स्कूटर चालवायला शिकलेलो नव्हतो. त्यामुळे मिरजेला झाले तेच इथेही झाले. सगळे गाव अगदीच छोटे वाटू लागले.
पापड घेण्यासाठी परत पेणला येऊन मग खोपोली गाठणे असा बेत केला. त्यानिमित्ताने 'कर्नाळा'ही करता आला. तेव्हा कर्नाळा आजच्या तुलनेत शतपट शांत होता.
पेण गाव तेव्हा अगदीच निवांत होते. आताचा डोके उठवणारा किचाट तेव्हा पीएन/डीएन पाटलांच्या वा धारकरांच्या कल्पनेतच असला तर असता. दातार आळीतल्या तळ्याकाठी असलेले वडाचे झाड, तळ्यात असलेली विहीर, काठाकाठाने डुंबणार्‍या म्हशी, सगळे कसे अगदी मोजूनमापून चित्र काढावे तसे होते. रामधरण्यांकडचे पापड घेऊन मी बाजारपेठेतून एक चक्कर मारली. पांढर्‍या कांद्यांची माळही घेऊन मातोश्रींच्या बुकात अजून एक गुण वाढवला.
पेण खोपोली रस्ता (अजूनही बराचसा) सुंदर आहे. त्याकाळी तर पेणपुढची कराड डॉक्टरांची पोल्ट्री सोडली की पंचवीसेक किलोमीटर अगदी शांत शांत होते. विनोबा भाव्यांचे गागोदे त्याच रस्त्यावर. पण ते दर्शवणारे फलकही दशकभरानंतर आले.
खोपोलीला महामार्गाची गजबज सुरू झाली. एक्स्प्रेसवे तेव्हा स्वप्नातल्या स्वप्नातही नव्हता. 'रमाकांत' ओसंडून वाहत होते. तिथले मॅनेजर तीर्थरूपांच्या ओळखीचे असल्याने (बँक मॅनेजरची ओळख असणे ही तेव्हा व्यवसाय-धंद्यातल्या लोकांच्या दृष्टीने गरजेची गोष्ट होती; खाजगी बँकेचा प्रतिनिधी तुमच्या दारात येण्याचे दिवस यायला भरपूर वर्षे होती) मला जागा आणि गरम वडा दोन्ही पटकन मिळाले.
खंडाळ्याचा घाट चढताना मात्र कस लागला. विशेष करून शिंगरोबाच्या देवळापासच्या वळणदार चढावर. त्यावेळेस एकच रस्ता होता, त्यामुळे वाहतूक कोंडी नित्याची. त्याप्रमाणे घाट तुंबलेलाच होता. दुचाकी होती म्हणून मी कडेकडेने सुटलो. त्यादिवशी अलिबाग पुणे एस्टीला पुणे गाठायला आठ तास लागले असे नंतर कळाले.
अशा रीतीने सगळा मिळून हजाराहून अधिक किलोमीटरचा दुचाकीवरचा पहिला लांब पल्ल्याचा प्रवास बराचसा निर्वेध पार पडला.
पूर्वप्रसिद्धी: 'मनोगत'

field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

सध्या फक्त थोडाफार वरवर चाळालाय.
रुमाल टाकून थेवतोय.
सविस्तर नंतर लिहीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

वा! पूर्वी वाचलं आहे, पण पुन्हा वाचून मजा आली. अजून लिहा की... नवीन काही 'ऐसी'साठी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पूर्वी वाचले आहे तरी परत वाचताना कंटाळा नाही आला.
नेहेमी लिहित जा हो इथे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लिहीलय. मजा आली वाचायला.
'ते नंतर केव्हातरी लिहीन' असे दोनदा म्हणालाय, ते पण येउद्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मज्जा आली!
एल.पी. म्हटल्यानंतर माझाही अंमळ गैरसमजच झाला होता. पण त्यात माझी काहीही चूक नाही; मी एकटी प्रवास करायला लागले तेव्हा एल्पीचं नावं फक्त स्टॉपवरच दिसायचं. दुकानात, हॉटेलात वेगळेच ब्रँड दिसतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एल्पी म्हणजे लंडन पिल्सनर. ही एक पोप्युलर बियर होती.बियरचा (पोप्युलर) दुसरा ब्रॅण्ड म्हणजे गोल्डन ईगल. तिसरा म्हणजे स्टड. या तिन्ही बियर्सचा आपापला चाहता वर्ग होता.(मारामारीकरण्याइतपत कट्टर). अजून 'किंगफिशर' उदयाला आलेली नव्हती. बियरचे इंटरनॅशनल ब्रँड तर कालपरवा आले.
त्यावेळी 'मोहन मिकीन्स' हा टॉप प्रोड्युसर होता. असो...चुभुद्याघ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile मस्त..
आवडेश.. सौम्य तरीही टोकदार विनोद लेख खुशखुशीत करून गेला आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ओघवतं प्रवाही वर्णन. खूप आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0