सत्याचा विजय - लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली (भाग ९)

सत्याचा विजय - लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली (भाग १)
सत्याचा विजय - लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली (भाग २)
सत्याचा विजय - लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली (भाग ३)
सत्याचा विजय - लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली (भाग ४)
सत्याचा विजय - लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली (भाग ५)
सत्याचा विजय - लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली (भाग ६)
सत्याचा विजय - लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली (भाग ७)
सत्याचा विजय - लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली (भाग ८)

लेन्स्कीपुढे श्लाफ्लीला काय उत्तर द्यायचं हा प्रश्न होताच. पहिल्या पत्राला 'आम्ही लिहिलेलं तरी नीट वाचून पहा' असं उत्तर दिलं होतं. पण श्लाफ्लीला असल्या क्षुद्र गोष्टींची तमा नव्हती. त्याने आपलं वकिली शस्त्र उपसलं होतं. 'तुम्ही कोणालाही मूळ विदा देण्यास बांधील आहात. आम्ही तो मागण्याचा हक्क बजावतो आहोत.' इतकंच त्याने पुन्हा म्हटलं होतं. हा माणूस केवळ उपद्रव देण्यासाठी मागणी करतो हे त्याला कळत होतं. पण उत्तर देणं तर भाग होतंच. ही परिस्थिती हातात तीन एक्के असताना समोरचा माणूस बोली चढवत असल्याप्रमाणेच होती. उपद्रवमूल्याच्या काही सत्त्या अठ्ठ्यांपेक्षा काही जड पानं श्लाफ्लीच्या हातात नव्हती हे उघड होतं. तरीही हा डाव एकदाचा संपवायला हवा म्हणून त्याने उत्तर लिहायला सुरूवात केली.

"तुझ्या पहिल्या पत्राला त्यातला उद्धट स्वर आणि अज्ञानाच्या प्रदर्शनाकडे दुर्लक्ष करूनही मी सौम्य आणि सुसंस्कृतपणे उत्तर दिलं. मात्र तुझा उद्धटपणा दुसऱ्याही पत्रात चालूच राहिल्याने आणि तुमच्या वेबसाइटवर आलेला बदनामीकारक आणि जाणूनबुजून अज्ञानाची कातडी डोळ्यांवर ओढणारा मजकूर पाहता माझा दुसरं प्रत्त्युत्तर हे तितकं नम्र असणार नाही. मात्र माझी अशी अपेक्षा आहे की ते तू तझ्या वेबसाइटवर पूर्णपणे लावावंस. तसं न झाल्यास मी इतर सूत्रांतर्फे लोकांत तो जाहीर होईल याची व्यवस्था करेन.

मी हे लांबलचक उत्तर लिहितो आहे कारण मी एक शिक्षक आणि शास्त्रज्ञ आहे. मला आशा आहे की तू या उत्तरातून काही शिकला नाहीत तरी काही वाचक निश्चितच शिकतील."

या सुरूवातीवरूनच लेन्स्कीने 'द ग्लोव्ह्ज आर ऑफ' ही भूमिका घेतलेली दिसते. सभ्यपणे होणारी दोन मान्यवरांतली ही चर्चा नाही. कारण त्याची परिणती कोर्टातल्या भांडणात आणि जनसामान्यांसमोरच्या भांडणात होणार हे उघड होतं. पण या भांडणात 'सत्य माझ्या बाजूला आहे, तेव्हा मी माघार घेणार नाही. तुझ्याच शस्त्रांनी तुझ्याशी लढण्याची मला भीती नाही' हे लेन्स्कीला स्पष्ट करायचं होतं. श्लाफ्लीने 'मी सर्व पत्रव्यवहार आमच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करणार आहे' असं सांगून लेन्स्कीवर उत्तर देण्यासाठी दबाव टाकला होता. लेन्स्कीने त्याच्याच शब्दाला त्याला बांधून टाकलं. 'प्रसिद्ध करच, पण एकही शब्द गाळू नकोस' असं म्हणून

पुढच्या परिच्छेदांत त्याने परत एकदा आपले पेपर नीट न वाचण्याबद्दल खरडपट्टी काढली. "I did skim Lenski's paper..." हे श्लाफ्लीनेच लिहिलेले शब्द उद्धधृत केले. नंतर त्याच्या मूळ पत्रांमध्ये असलेल्या चुकीच्या विधानांमधल्या त्रुटी दाखवल्या. त्या त्रुटी नक्की कुठून आल्या असाव्यात हेही त्याने दाखवून दिलं. (श्लाफ्लीच्या एका पाठिराख्याने वाचून काढलेले निष्कर्ष). "तिसरं म्हणजे मलाच काय पण तुमची ऑनलाइन चर्चा वाचणाऱ्या इतर अनेकांना हे जाणवलेलं आहे की तुझे विदा मागण्यामागचे इरादे नेक नाहीत. तुला या विषयात काहीच गती नाही - हे तुमच्या पाठिराख्यांनीही तुम्हाला सांगितलेलं आहे. पण तू आणि तुझं लांगुलचालन करणारांनी अशांना पोकळ बडबड करणारे म्हटलेलं आहे, आणि काहींना त्या चर्चेत भाग घेता येऊ नये म्हणून तिथून काढूनही टाकलं होतंत" [हा पत्रव्यवहार कंझर्व्होपीडियावर अर्थात छापला गेलेला आहे. मात्र या वाक्यापुढचा दुवा 'स्पॅम फिल्टर' या नावाखाली काढून टाकलेला आहे.]

यानंतर तो मुख्य मुद्द्याकडे वळतो. विदा. तो म्हणतो की "तुला बहुतेक असं वाटतं आहे की आमच्याकडे फक्त कागदपत्रं आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कुठलीतरी वेगळ्याच इ कोलाय जीवाणू पाहिल्याच्या नोंदी आहेत. या नोंदींत जर काही त्रुटी आढळल्या तर तुला सापडतील अशी आशा असावी. जर चुका सापडल्या नाहीत तरी तुला कदाचित आमच्या नोंदी विश्वासार्ह नाहीत असा दावा करता येईल असं तुला वाटत असावं. त्यासाठी अर्थातच तुला काही कारणं द्यावी लागणार नाहीत. पण बहुतेक तू आमचे पेपर्स वाचले नसल्यामुळे म्हणा किंवा तुझी बुद्धिमत्ता फार प्रखर नसल्यामुळे म्हणा, तुझ्या डोक्यात हे शिरलेलं नाही, की आमच्याकडे गेल्या वीस वर्षांचे जितेजागते बॅक्टेरिया आहेत. थोडक्यात आम्ही कुठच्यातरी जादूई बगिच्यात युनिकॉर्न बघितला अशा नोंदी केलेल्या नसून आमच्याकडे आख्खी बाग भरून युनिकॉर्न आहेत! http://en.wikipedia.org/wiki/The_Unicorn_in_the_Garden. आणि तू माझ्यावर खोटेपणाचा आरोप करण्याआधी सांगतो माझ्याकडे खरेखुरे युनिकॉर्न नाहीत. मी युनिकॉर्न हा शब्द रूपकात्मक पद्धतीने वापरतो आहे. http://en.wikipedia.org/wiki/Allusion "

वरचे दोन्ही दुवे खरोखर लेन्स्कीने दिलेले होते. एखाद्याच्या अकलेचे वाभाडे काढायचे तर ते सभ्य शब्दात कसे काढावे याचा हा परिपाक आहे. हे करून झाल्यानंतर लेन्स्की बोली चढवतो. श्लाफ्लीच्या वेबसाइटवर झालेल्या चर्चेत फक्त एकाच व्यक्तीला हा मुद्दा समजला होता. आणि त्याने मूळ बॅक्टेरिया तपासायची मागणी केली हती. तिचा उल्लेख करून तो म्हणतो,

"तर मग देणार का आम्ही बॅक्टेरिया तुम्हाला तपासायला? अर्थातच हो, पण ज्यांना तो हाताळता येईल अशांनाच." हे वाचल्यावर मला 'अ फ्यू गुड मेन' मधल्या कर्नल जेसपचा "यु वॉंट द ट्रुथ? यु कांट हॅंडल द ट्रुथ!" हे उद्गार आठवले. अर्थात त्या सिनेमात कर्नल जेसप भ्रष्ट असतो आणि त्याची उलटतपासणी घेणारा वकील सत्य शोधत असतो. इथे परिस्थिती उलटी आहे, त्यामुळे त्या विधानाला आणखीनच जोर येतो. कागदपत्रं, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स कसले मागतोस, हे घे मी तुला प्रत्यक्ष बॅक्टेरिया देतो. आहे कुवत घ्यायची? आपली शक्ती पुढे दाखवत तो म्हणतो. " आता मी जर हलकटपणाच करायचा ठरवला तर मी तुला वीस वर्षांपूर्वीचे मूळ बॅक्टेरिया देईन आणि तुमच्या शास्त्रज्ञांना 20 वर्षं प्रयोग करत बसायला लावेन. किंवा मी जर कमी हलकट असेन तर त्या शास्त्रज्ञांना काही वर्षांपूर्वीचे पोटेंशियेटेड बॅक्टेरिया (ज्यांमध्ये पहिली काही म्युटेशन्स झाली आहेत पण ज्या म्युटेशनने सायट्रेट पचवण्याची क्षमता आली ते म्युटेशन न झालेले बॅक्टेरिया) देईन. त्यानंतरही अनेक वर्षं पुढचे प्रयोग त्यांना करावे लागतील, जे माझ्या हाताखाली डॉक्टरेट करणाऱ्या झॅकरी ब्लाउंटने प्रयोग केलेले आहेत. त्याने 40 ट्रिलियन (40,000,000,000,000) पेशींचा अभ्यास केला आणि त्यातुन 19 आणखीन सायट्रेट पचवणारे म्युटंट तयार झाले. पण मी हलकट नाही, चांगला माणूस आहे. त्यामुळे कोणी जर नम्रपणे विचारलं तर मी त्याला आत्ता सायट्रेटवर जगणाऱ्या बॅक्टेरियाचं सॅंपल पाठवेन. एखादा लायक मायक्रोबायॉलॉजिस्ट एखाद्या चांगल्या मोलेक्युलर जेनेटिसिस्टच्या मदतीने त्यांचे गुणधर्म तपासून पाहू शकेल."

यानंतर तो हे गुणधर्म कोणते व ते कसे तपासायचे याची व्यवस्थित यादी देतो. ती स्पष्ट शब्दांत असली तरी ती वाचून सामान्य वकीलाची छाती दडपून जावी अशी त्याने मुद्दामच योजना केली असावी. मुद्दा एकच 'ये तेरे बस की बात नही, लल्लू. जा, ज्यांना कोणाला या बाबतीत कळतं अशांची मदत घे.'

"पण मी सॅंपल पाठवण्याआधी मला योग्य शास्त्रीय पद्धतींनुसार मागणी करणाऱ्या शास्त्रज्ञाची गुणवत्ता आणि तपासून बघता यायला हवी. 1. ज्या युनिव्हर्सिटी किंवा रीसर्च सेंटरकडे बॅक्टेरिया ठेवण्यासाठीच्या सुविधा (-80 डिग्री से. फ्रीझर), हाताळण्याची उपकरणं (इन्क्युबेटर वगैरे) आणि बॅक्टेरिया नष्ट करण्याची क्षमता आहे अशांच्या योग्य केंद्राशी संलग्नता. 2. त्या शास्त्रज्ञाला बॅक्टेरिया हाताळण्याचा अनुभव असल्याचे काही पुरावे (उदाहरणार्थ पीअर रिव्ह्यूड जर्नल्समध्ये प्रसिद्ध झालेले पेपर.) जेणेकरून मी व माझ्या युनिव्हर्सिटीला आपण बॅक्टेरिया ऐऱ्यागैऱ्याच्या हाती पाठवत नाही याची खात्री होईल. आमच्याकडचे बॅक्टेरिया सर्वसाधारणपणे धोकादायक नसले तरी चुकीच्या पद्धतीने हाताळल्यास काहींना धोका निर्माण होऊ शकतो. शिवाय कोणालाही सॅंपल देण्याआधी माझ्या मटेरियल ट्रान्स्फर ऍग्रीमेंट करण्याची माझ्या युनिव्हर्सिटीची अट आहे. त्यामुळे ज्यांना हे सॅंपल मिळेल त्यांना ते वापरून आपलं संशोधन प्रसिद्ध करण्यात काहीच अडचण येणार नाही. मात्र कोणी त्याचा गैरवापर करून चुकीचे आरोप केले तर इतर मान्यवर शास्त्रज्ञ यात उतरतील आणि सगळे पुरावे तपासून कोणाचं बरोबर कोणाचं चूक याचा निवाडा करतील. विज्ञान असंच पुढे जातं.

... तेव्हा आम्ही PNAS च्या धोरणाला मान देऊन कोणाही जबाबदार शास्त्रज्ञाला आमची सॅंपल्स पाठवू. मात्र त्यांनी युनिव्हर्सिटीच्या मटेरियल ट्रान्स्फर ऍग्रीमेंट आणि इतर कायद्याच्या बाबी पाळायला हव्या. अशी कुठचीही विनंती पूर्ण करण्यासाठी जर वेळ अथवा खर्च आला (आमच्याकडे हजारो सॅंपल्स आहेत) तर तो विनंती करणाऱ्याने करावा अशीही माझी अपेक्षा आहे.
तर हे असं आहे. मी थोडं कमी नम्रपणे लिहिलं आहे याची मला कल्पना आहे, पण तुझा उद्धटपणा, वेड पांघरून पेडगावला जाण्याची पद्धत आणि बदनामीकारक वर्तन पहाता तुझ्या लायकीपेक्षा बरंच जास्त नम्रपणे लिहिलेलं आहे. आणि तुझ्या लायकीपेक्षा तुला उत्तर देण्यात बराच जास्त वेळ घालवलेला आहे. पण मी आधी म्हटल्याप्रमाणे, मी एक शिक्षक आहे आणि शिक्षण गंभीरपणे घेतो. मला माहित आहे की इतर अनेक जे हा पत्रसंवाद वाचतील त्यांच्याप्रमाणेच तुझ्या काही पाठिराख्यांपैकी काहींकडे अजूनही विचार करण्याची क्षमता आणि इच्छा आहे.

सिन्सियरली,
रिचर्ड लेन्स्की"

शेवटच्या काही परिच्छेदांत लेन्स्कीने श्लाफ्लीला कळेल अशा भाषेतले मुद्दे मांडले. 1. बॅक्टेरिया निर्धोक नाहीत, त्यामुळे ते लायक माणसाच्या हाती पडतील याची काळजी घेणं ही आमची कायदेशीर जबाबदारी आहे. 2. तुमच्याकडे असा लायक माणूस आहे, आणि ते हाताळण्यासाठी आवश्यक यंत्रणा आहे हे सिद्ध करणं तुमची जबाबदारी आहे. 3. ही देवाणघेवाणीची प्रक्रिया सोपी नाही, त्यासाठी युनिव्हर्सिटीच्या वकिलांशी तुम्हाला बोलणी करून योग्य तो करार व्हायला हवा. 4. या देवाणघेवाणीसाठी जो खर्च येईल तो श्लाफ्लीला करायला लागेल. 5. एवढं सगळं करूनही तुम्ही काहीतरी खोटे निष्कर्ष काढण्याच्या फंदात पडू नये, कारण ते तपासून बघण्याची व्यवस्था आहे.

स्वतःची बाजू भक्कम आहे हे माहित असताना ती किती भक्कम आहे हे दाखवणारं हे पत्र. माझ्याकडे सत्य आहे, आणि तेही तुझ्यासारख्या ऐऱ्यागैऱ्याने यावं आणि उधळून लावावं अशा अवस्थेत नाही हे लेन्स्की सांगतो. ते सांगताना श्लाफ्ली, व पर्यायाने त्याची विचारसरणी किती अज्ञानाने भरलेली आहे हेही तो अत्यंत संयतपणे सांगतो. पण पत्र इथे संपत नाही. त्याला तो चार ताजा कलम जोडतो. आता इमेलला खरं तर ताजा कलम जोडण्याची गरज नसते, पण श्लाफ्लीची भूमिका किती कद्रूपणाची आहे हे तो दाखवून देतो.

ता. ता. क. ज्या रविवारी तू आणि तुझे पाठीराखे माझ्यावर व आमच्या संशोधनावर चिखलफेक करणाऱ्या पोस्ट टाकत होतात आणि इतर अशा पोस्ट्सना प्रोत्साहन देत होतात (असलं कृत्य सबाथला करणं थोडं हीन आणि त्या पवित्र दिवसाचा अवमान करणारं नाही का?) त्या दिवशी मी चर्चमध्ये एका लग्नासाठी गेलो होतो. आणि तुला माहित्ये त्या दिवशी ओल्ड टेस्टामेंटमधला कुठचा पाठ वाचला? तो होता जेनेसिस 1:27-28, देवाने पुरुष आणि स्त्रीला निर्माण केलं. ती अगदी साधी आणि आकर्षक कथा आहे, आणि मी त्यांना काही प्रश्न विचारले नाहीत. किंवा ज्याकाळी ते लिहिलं गेलं त्यावेळी विज्ञान अस्तित्वात नव्हतं म्हणून तावातावाने पुरावे मागितले नाहीत. कारण त्यावेळी मी एका आध्यात्मिक आणि परस्परसन्मानाच्या वातावरणात होतो. मी एक धर्मगृह आणि वैज्ञानिक प्रयोगशाळा यात गल्लत केली नाही. आणि तो लग्नसोहळाही फार छान झाला.

ता. ता. ता. ता. क. तुमच्या वेबसाइटवरचा तुझा एक आवडता लेख 'खोटारडेपणा/फसवणूक' या विषयावरचा आहे असं तूच म्हटल्याचं वाचलं. त्या लेखाची सुरूवात अशी "खोटारडेपणा/फसवणूक म्हणजे एखादं सत्य मुद्दाम वेडंवाकडं करून सांगणं किंवा कोणाला तरी गंडवण्यासाठी सत्य नाकारणं. ख्रिश्चॅनिटी आणि ज्यू धर्म हे दोन्ही खोटारडेपणा/फसवणूक वाईट आहे असंच शिकवतात. उदाहरणार्थ ओल्ड टेस्टामेंटमध्ये म्हटलेलं आहे 'तुम्ही तुमच्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देता कामा नये' " इतरांविरुद्ध खोट्या साक्षी देण्याअगोदर तू या देवाज्ञेत काय सांगितलं आहे याचा मनापासून विचार करावास.

इतक्या भारी बोलीपुढे ब्लफ करून अजून पैसे लावायला श्लाफ्ली तयार नव्हता. गेल्या पाच वर्षांत या पत्राला उत्तर देण्याच्या भानगडीत पडलेला नाही. तो मुकाट्याने फोल्ड झाला हे उघड आहे.

(या लेखात मी लेन्स्कीच्या संपूर्ण पत्राचं भाषांतर केलेलं नाही. थोडक्यात महत्त्वाचं सांगण्यासाठी मुख्य भाग निवडून काही छोटे मुद्दे गाळले आहेत किंवा त्यांचं नुसतं वर्णन केलेलं आहे. संपूर्ण पत्रव्यवहार मुळातून इथे वाचायला मिळेल. )

क्रमश:

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

मस्त _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर लेखमाला. आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

लै भारी!
आता पुढील भागात काय असेल याची अधिकच उत्सूकता आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेन्स्कीचं हे पत्र म्हंजे संयम ठेवून पण बिनपाण्याने केलेली हजामत आहे. इतकी भादरल्यावर खरेतर श्लाफ्ली गप्प बसायला पाहिजे होता, पण क्रमशः वाचून प्रश्न पडलाच, अजून काय असेल पुढे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars