आईसक्रीमवाले गंदे अंकल..

घरापासून थोड्या अंतरावर, पण हाउसिंग कॉम्लेक्समधेच मेडिकलचं दुकान.

आमचं आरोग्य असं की केमिस्टचं अर्धं दुकान गिळून जिवंत रहावं लागतंय. पण ते आता ठीकच. मी ठरीव गोळ्या मागितल्या. त्यानेही माझ्यासाठी ष्टॉक करुन ठेवलेल्या होत्या त्यातल्या काढून दिल्या.

मेडिकलवाला म्हणजे फक्त केमिस्ट आणि ड्रगिस्ट नव्हे. मेडिकलच्या दुकानात मॅगी, ब्रेड, बटर, कोक-पेप्सी आणखीही काय काय मिळतं.
तसंच आईसक्रीमही मिळतं. बाहेरच क्वालिटी वॉल्सचा आईसक्रीम फ्रीझर ठेवला आहे.

पुन्हा एकदा तंगडतोड करायची टळावी म्हणून घरी फोन केला,"काही आणायचं आहे का?"

"आईसक्रीम आण", अर्धांगाकडून आवाज आला.

"कोणतं आणू", मी नेमकेपणा शिकलो आहे. बरीच वर्षं झाली लग्नाला.

"तुला माहीत आहे मला कुठलं आवडतं. नसेल आठवत तर काहीच आणू नको", अपेक्षित उत्तर आलं.

तिढे पिळणं हे जुनाट संसारात फार वाईट, त्यामुळे आईसक्रीम न नेण्यात अर्थ नव्हता. मग आठवलं की हिला आईसफ्रूटच्या कांड्या आवडतात. रासबेरी वगैरे. आता वॉल्सच्याही मिळतात अशा कांड्या.. पॅकिंगमधे. हायजेनिक असतात.. म्हणजे वायाळ काही खाल्ल्याचा फील नको.

नेमकं जे हवं ते वेळीच आठवल्याने आनंदलो. मग लक्षात आलं की घरी पत्नीखेरीज अजून एक पोर आहे. त्याच्यासाठीही आणखी एक आईसकांडी घेतली पाहिजे. तीही हुबेहूब त्याच फ्लेवरची आणि त्याच मापाची. अन्यथा घरी पोचल्यावर काटेकोर तुलनेतच दोन्ही विरघळून जातील.

विचारप्रक्रियेनुसार केमिस्टला तो फ्रीझर उघडायला लावून दोन रासबेरी कांड्या घेतल्या.

माझ्याच बाजूने आणखी एक छोटासा हात त्या फ्रीझरमधे घुसला. त्या हाताने एक चॉकोबार उचलला आणि उलटसुलट करुन न्याहाळायला सुरुवात केली.

ती एक पाच-सहा वर्षांची छोटी पोरगी होती. सोसायटीतलीच कुणी. तिच्या दुसर्‍या हातात दहाची एक नोट होती.

न्याहाळता न्याहाळता तिचा चेहरा एकदम उतरला आणि तिने तो चॉकोबार परत फ्रीझमधे ठेवला.

मग तिने दुसरी फ्रूटवाली कांडी उचलली. स्ट्रॉबेरीवाली.

तीही घाईघाईने न्याहाळली. उलटसुलट करुन.

वरुन ऊन मेंदूला वितळवत होतं. केमिस्ट वेंगला होता.

"जल्दी ले लो जो लेना है..फ्रीझ खुलवाओ मत बार बार..आईसक्रीम पिघल जाती है..", तो मुलीवर ओरडला.

मुलगी एकदमच घाईत आली. "एक मिनिट अंकल", असं म्हणत पटापट एकेक आईसफ्रूट उचलून त्याची किंमत शोधायला लागली. तिला विचारायला ऑकवर्ड होत होतं.

तो खत्रूड "अंकल" माझी दोन आईसफ्रुटं घेऊन कॅरीबॅगेत टाकायला आत गेला. तेवढ्याने पोरीला थोडी उसंत मिळाली आणि ती आणखीनच घाईने वेगवेगळ्या फ्लेवरच्या आणि आकाराच्या आईसकांड्या उचलून बघायला लागली.

मीही मग त्यात ओढला गेलो.

तशी व्हरायटी खूप जास्त नव्हती. तिच्या हाती त्याच त्याच प्रकारच्या कांड्या पुन्हा पुन्हा यायला लागल्या. सर्वांचं पॅकिंग आकर्षक. पण किंमत वीस किंवा तीस रुपये.

केमिस्टअंकल परत आला.

"अंकल .. दसवाला कोई है?", तिने पराभव स्वीकारला.

"नही.. बीस से स्टार्ट..", त्याने खाडकन फ्रीझचं दार सरकवून बंद केलं.

माझा हात एकदम पुढे झाला. तोंडात शब्द आले "उसे दे दो जो भी चाहिये.. और मेरे टोटल में जोड दो.."

पण ते शब्द बाहेर आले नाहीत.

मी माझ्या लहानपणी कितीदातरी अशी आईसक्रीम सुकल्या ओठांनी सोडली आहेत.. एखादा रुपया कमी असल्याने. त्या मुलीलाही घरची गरीबी होती असं दिसत नव्हतं. पण एक भलतीच विचित्र भावना माझ्या मनात येत होती.

चॉकलेटवाले गंदे अंकल.. बिटर चॉकलेट.. असे शब्द मनात भरुन राहिले होते. बातम्या दाखवणार्‍या बर्‍याच चॅनेल्सनी गेल्या काही दिवसात डोक्यात ठोकून घट्ट केलेले शब्द.

मी माझ्या पोरासाठी आईसक्रीम नेत होतो.. त्या पोरीइतकाच माझा पोरगा.. त्या पोरीचं मन ज्या आईसक्रीमवर आलंय ते मी तिच्या हातातल्या पैशात थोडीशी भर घालून तिला घेऊन देऊ जात होतो.. पण..

पण माझ्या लहानपणी कोणी अनोळखी अंकल पटकन पैसे काढून जी ऑफर करु शकत होते ती करायला गेलो तेव्हा आज मी गोठलो. आईसकांडीच्या गारठ्याने बोटं गोठली होती.. पण तेवढंच कारण नाही.

...

हिला मी आईसक्रीम दिलं तर त्या उतरलेल्या चेहर्‍यावर लग्गेच हसू फुलेल.

मग उद्या ही मुलगी तिच्या आईबाबांसोबत बागेत, सोसायटीत सायकल चालवताना कुठेही भेटली की माझ्याकडे बघून पुन्हा तसंच हसेल.. ओळखीचं..

मीही हसेन.

मग तिचे आईवडील तिला खोदून खोदून विचारतील.. "कोण आहेत हे?"

ती म्हणेल "आईसक्रीमवाले अंकल"..... ????

....

ते रागावतील तिला.. अनोळखी लोकांकडून आईसक्रीम घेतलंसच कसं? असं म्हणून.. दिल्लीच्या केसमधे असंच चॉकलेट देऊन तिला घेऊन गेला होता.

तिला ते नवीन पद्धतीनुसार शिकवतील.. स्पर्शातला फरक ओळखायला.. टीव्हीवर दाखवत होते तसं.. बॅड टच.. गुड टच..

त्यांचंही बरोबर आहे. मी कोण टिक्कोजीराव म्हणून मला त्यांनी सज्जन समजावं आपोआप.. हल्ली तर बापही असे निघतात..

....................................

नकोच ते..

तिला आईसक्रीमची इच्छा मारु दे आणि मला तिचं हसू पाहण्याची..

......

मी आईसक्रीमवाला गंदा अंकल ? नाही

मी तिचा कोणीच नाही.. म्हणून गंदाही नाही..

"आईसक्रीमवाले अच्छे अंकल" असा ऑप्शन शिल्लक नाही माझ्यासाठी.

तिच्यासाठी मी केमिस्टच्या दुकानात दिसलेला आणखी एक कोरडा ठणठणीत प्रौढ चेहरा. तोच बरा.

.......................

माझी कॅरीबॅग उचलून एका अनोळखी नात्याचा गळा घोटत मी नात्याच्या लोकांकडे परतण्यासाठी चालू पडलो.

field_vote: 
4.25
Your rating: None Average: 4.3 (12 votes)

प्रतिक्रिया

छान मुक्तक..... आवडलं.

नाइलाजको क्या इलाज?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मुक्तक आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

छान लिहायलाही नको वाटतंय.. पण ... छान आहे मुक्तक! Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

खणखणीत...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुक्तक आवडले, अगदी समयोचित. पण का कुणास ठाऊक, त्या मुलीचा निरागस आनंद हिरावला गेला असे वाटले. तुम्ही द्यायला हवे होते तिला आईसक्रीम! तिच्या आईवडिलांना नाही कळले तरी तिला तर कळेल, अच्छे आईसक्रीमवाले अंकल, कोणाला म्हणायचं ते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुक्तक फारच छान. पण काही लोकांच्या वाईट वागणुकीमुळे आपण आपली चांगली वागणूक का बंद करावी असा प्रश्न निर्माण होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुक्तक आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिखाण आवडले.

पण काही गोष्टींच्या बाबत संवेदनाशीलता गुंडाळून ठेवणे श्रेयस्कर या मताचा मी आहे.

माझा एक मित्र घटस्फोटित आहे. त्याला एक सहा सात वर्षांची मुलगी आहे. मित्राला मुलीबद्दलचे व्हिजिटींग राईट्स फक्त शनिवार-रविवारपुरते, त्या मुलीला स्वतःच्या घरी आणण्यापुरते आहेत. एका शनिवारी मित्राला काम होते आणि मुलीला काही तास सांभाळण्याकरता कुणाची मदत होती. नेमका मी त्यावेळी घरी होतो आणि माझी पत्नी कामाकरता बाहेर असणार होती. त्यावेळी मी आणि माझ्या मित्राने कॉफी पिता पिता या परिस्थितीबद्दल गप्पा मारल्या. आणि आम्ही दोघांनीही हे हसत हसत मान्य केले की काहीही झालं तरी मी या परिस्थितीत त्या मुलीला सांभाळू शकणार नाही. मी त्या मुलीला आमच्या एका दुसर्‍या मित्राच्या कुटुंबाकडे सोडण्याची सोय केली.

यातला (प्रस्तुत संदर्भातला ) लक्षणीय मुद्दा इतकाच की, मी आणि माझा मित्र, आम्हा दोघांनाही मी त्या मुलीला सांभाळणे या बाबीबद्दल कुठेही अविश्वास, संशय नव्हता आणि तरीही, इमर्जन्सी नसेल तर हे टाळणेच योग्य याबद्दल आम्ही दोघेही अगदी सहज सहमत होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

एक साधासा प्रसंग अतिशय छान रंगवला आहे. त्यातून सहज उद्भवलेला गंभीर प्रश्नही संतुलितपणे मांडला आहे. मुलांचं रक्षण करण्यासाठी आपण काळजी घेतो. घ्यायलाच हवी. वाईट माणसं असतात आसपास काही. पण त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी इतक्या सगळ्या चांगल्या माणसांच्या चांगूलपणाचं व्यक्त होणं थांबवायचं का? कदाचित तो त्याग गरजेचा असेल. पण पूर्ण खात्री नाही वाटत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिखाण आवडले.
यावरुन आठवले. माझ्या पत्नीच्या एका मैत्रिणीच्या वडीलांचे गंभीर ऑपरेशन होते. आणि तिच्या तीन-चार वर्षाच्या मुलाला सांभाळायला घरी कुणी नव्हते. त्या मैत्रिणीने तिच्या मुलाला काही तास आमच्या घरी ठेवले. घरी फक्त मी आणि माझा मुलगा होतो. माझा मुलगा त्या मुलाचा समवस्क होता. ते काही तास खूप छान गेले. दरम्यान त्या मुलाचे आमच्या घरी खाणे-पिणे, इतर विधी हे सगळे झाले. तो मुलगा होता आणि खूप लहान होता.(याही गोष्टी आजकाल असंबद्ध झाल्या आहेत) आज मी जिथे राहातो, त्या इमारतीत काही लहान मुली आहेत. त्या येता जाता भेटतात, हसतात, 'काय काका, कसे आहात?' असे विचारतात. परीक्षांत पास झाल्या की घरी पेढे आणून देतात, वाकून नमस्कार करतात. त्यांच्या घरच्यांशीही आमचे शहरात जितके असतात तितके बरे संबंध आहेत. पण माझी खात्री आहे, यातल्या एकाही मुलीला तिची आई काही तास घरी थांबायचे असल्यास 'काकांकडे थांब तू' असे म्हणणार नाही. हे क्लेशदायी आहे, पण खरे आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

मला आत्ताच माझ्या बाबतीतला एक प्रसंग आठवला. नुकताच अमेरिकेत आलो होतो. महाराष्ट्र मंडळाच्या नाटकात काम करत होतो. नाटकात काम करणारे सगळे मध्यमवयीन -- माझ्यापेक्षा बरेच मोठे. त्यांच्यापैकी कोणाशी मैत्री अशी खास जमलेली नव्हती. अमेरिकेत सेटल झालेले, पोरंबाळं असलेले लोक. त्यांचे विषय वेगळे आणि माझा रस वेगळा. असो. तर नाटकात एका लहान मुलीचंही काम होतं. ते त्यावेळी पाचवीत असलेली, त्या चमुपैकीच एका जोडप्याची मुलगी करायची. तिची माझ्याशी बऱ्यापैकी गट्टी. मी तिथे नवा, आणि ती मला तिच्या नावाचा उच्चार 'क' ने नसून 'ख' ने होतो वगैरे शिकवायची.

तर झालं असं की या नाटकाचे प्रयोग इतर आसपासच्या शहरांमध्येही करण्याची प्रथा होती. तर एक व्हॅन घेऊन आम्ही पाचसहा तासांच्या प्रवासाला निघालो. कसं झालं कोण जाणे पण मी आणि ती मागे बसलो. आमच्या चिक्कार गप्पा चालू होत्या. तिने मला '९९ बॉटल्स ऑफ बिअर ऑन द वॉल, ९९ बॉटल्स ऑफ बिअर ऑन द वॉल, टेक वन आउट पास इट अराउंड ९८ बॉटल्स ऑफ बिअर ऑन द वॉल' हे 'एक चिमणी आली एक दाणा उचलला भुर्रकन उडून गेली' स्टाइलचं गाणं शिकवलं. नंतर तिने मला दुसरा खेळ शिकवला. आपल्याला कुठचीही गाडी दिसली तर तिची नंबरप्लेट बघायची. तिच्यावरच्या आकड्यांचा क्रम तोच ठेवून मध्ये कुठचीही चिन्हं घालायची आणि उत्तर चोवीस आणायचं. हा अतिशय अॅडिक्टिव्ह खेळ आहे. त्या मोठ्या लोकांच्या कसल्यातरी रेसेशन, नोकऱ्या, महागाई, घरांच्या किमती, मराठी मंडळाची राजकारणं वगैरे गप्पांपेक्षा मला हे केव्हाही आवडलं असतं.

मला वाटतं नंतर एकंदरीतच मोठ्या मंडळींमध्ये 'हा तरुण पोरगा आपल्याबरोबर वेळ घालवण्याऐवजी हिच्याबरोबरच का बोलत असतो?' अशा प्रश्नाने भुवया उंच झाल्या असाव्यात. मला एक्झॅक्टली काही सांगता येत नाही, पण वागणुकीत, नजरेत किंचित बदल झाल्याचं जाणवलं. मी त्यांना दोष देत नाही. पण हे विचार प्रत्येक आईबापाच्या मनात असतात. त्याला इलाज नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला आणि ही प्रामाणिक प्रतिक्रियाही. अनेकदा मनात विचार येतो की आमच्या लहानपणी आईवडीलांनी भाबडेपणाने मित्रमंडळी नातेवाईक यांच्यावर विश्वास ठेवला आणि सुदैवाने बालवयात या व्यक्तींकडून कोणताच कटू अनुभव आला नाही हे केवळ माझे सुदैव की बहुतांश लोक भलेच असतात याची ग्वाही? अर्थात त्या वयात नाही तरी कळत्या वयात अगदी नातेसंबंधातल्या व्यक्तीकडून अप्रस्तुत (इनअप्रोप्रिएट) स्पर्श करण्याच्या प्रयत्नांचा अनुभव आहेच. त्यामुळे माझ्या पालकांच्या पिढीतला भाबडेपणा माझ्या पिढीतून गेला आहे हे नक्की. मुलीला खेळायला कोणाच्या घरी पाठवायचे असेल तर जिथे जाणार त्या घरातली आई असली तरच असाच प्रघात आहे.
दुसर्या बाजूने सांगायचे तर मुलीच्या शाळेत व्हॉलेंटियर म्हणून काम करायचे असल्यास पोलिस क्लियरन्स मिळावा लागतो म्हणून मी त्यासाठी अर्ज केला होता पण इथे ़किमान एक वर्ष राहिल्याखेरीज असा क्लियरन्स मिळणार नाही अशी लाल फीत आहे. ते सर्टीफिकेट मिळाल्याशिवाय तुला काम करता येणार नाही हे सांगताना शिक्षिकेचा चेहेरा खूप अपराधी झाला होता आणि मलाही विचित्र वाटले होते पण इलाज नाही...दोन्ही बाजूंचा अनुभव घेऊनही याला पर्याय नाही असेच वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शीर्षक वाचून घाबरतच लेख उघडला की काहीतरी कुरुप घटना बद्ध केलेले ललीत वाचायला मिळणार (ललीत कुरुप नाही पण त्यातील घटना कुरुप म्हणायचे आहे). वाचल्यानंतर जीव भांड्यात पडला.
बाकी थत्ते यांच्यासारखे "नाइलाज को क्या इलाज" असेच म्हणते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी सामान्य वाटू शकणारी घटना तितकीच प्रभावीपणे मांडून समाजजीवनातील सल समतोल साधून मांडलेय, जियो गवि! व पुं ची आठवण झाली.
ओल्याबरोबर सुकंही जळतं, समाज बदलतोय तसे हे त्रास होणारचं असं वाटतं.
कधी कधी वाटतं आपलं मनही सालं काय काय विचार करतं, जे लोक विचार करत नाहित ते शहाणे आणि मस्तीत मस्त जीवन जगू शकणारे! म्हणजे, त्या मुलीला देऊ की नये आयस्क्रीम साठि पैसे हा विचारच नसता उठला मनात तर.. हे एखाद्या निरागस मनाला (ज्याला ह्याच्या परिणामांची ते कळत नसल्याने चिंता नाही) तरी शक्य आहे किंवा एकदम निर्ढावलेल्या (काय फरक पडतो असं म्हणणार्‍या!) साला आपण मध्ये लटकतो म्हणून हे हाल!
प्रतिसादांतले अनुभव लक्षात राहाण्यासारखे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- प्रशांत उपासनी

लेख आवडला. साध्या शब्दात, अतिशय गंभीर विषयाला वाचा फोडली आहे. मी आणि माझ्या बहिणी, आमच्या मुलींबाबत अतिशय जागरूक असतो! पण जेव्हा मी माझ्या आईशी बोलले तेव्हा तिला या सगळ्या गोष्टी अचंबित करणार्या आणि अविश्वसनीय वाटल्या. या गोष्टी पूर्वी होत नसतील का? अर्थातच होत असणार. पण त्या झाकून ठेवणे हेच शहाणपणाचे वाटायचे तेव्हा. त्यामुळे त्याचा काही गाजावाजा होत नसे. पर्यायाने माझ्या आईसारख्या लोकांना असं काही होऊ शकतं याचीही जाण नसायची. अज्ञानातलं सुख! पण आता स्त्रीवर्गही जागरूक झाला आहे, आणि प्रसारमाध्यमेही या गीष्टीना प्रसिद्धी देतात. त्यामुळे "आमच्या वेळी असं नव्हतं होत." असं म्हणताना काही लोक द्रोपदीसारख्या राणीचे भरसभेत वस्त्रहरण झाले होते ते जाणीवपूर्वक विसरतात.

पण तरीही या गोष्टी आजकाल जास्त वाढल्या आहेत का? सिने-मासिकातून घडणारे लैंगिक दर्शनामुळे, अवतीभोवती, इंटरनेटवर या विषयाची जास्त माहिती उपलब्ध असल्याने, माणसांच्या लैंगिक गरजा वाढल्या आहेत का? आणि त्या आपल्या संस्कृतीच्या परिघात न बसल्याने रेपचे प्रमाण वाढले असेल का?

आणि पाचसहा वर्षांच्या मुलीला, एकटीला सोसायटीबाहेरच्या दुकानात सोडण्याजोगा विश्वास तिच्या आईवडिलांना अजूनही वाटू शकतो हि गोष्ट आशादायक कि भीतीदायक?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुक्तक आवडले.

घटना सत्य की काल्पनिक ह्याबाबत कुतुहल नाही.पण काहीही असले तरी,

स्वाभाविक सहज वृत्ती,प्रेरणा आणि त्या प्रेरणेला अटकाव करणारे, तिच्यापेक्षा जास्त प्रभावी ठरणारे,तिच्यावर मात करणारे दुसरे फ़ोर्सेस, ह्यातलं द्वंद लेखकाने सहज शब्दात टिपले आहे.ह्या द्वंदातही संघर्षापेक्षा शरणागती जास्त उठून दिसणारी, आणि शरणागती परत समर्थन शोधते हे ही परत स्वाभाविक आणि सहज वृत्तीला शोभणारेच. एका साध्या घटनेचा संदर्भ घेऊन लेखकाने हे व्यवस्थित टिपले आहे.आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0