Skip to main content

नरेंद्र दाभोलकरांची हत्या: आदरांजली

प्रखर विवेकवादी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष व 'साधना' साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात ओंकारेश्वर पुलाजवळ आज सकाळी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. 'अंनिस'च्या माध्यमातून समाजात विविध बदल घडवण्यासाठी त्यांनी योजलेले उपाय उल्लेखनीय होते. त्यांचा असा अंत दु:खदायक आणि उद्वेगजनक आहे.

समाजात परिवर्तन करणार्‍या या विवेकी व्यक्तीस 'ऐसी अक्षरे'च्या सदस्यांतर्फे विनम्र आदरांजली!

सदर धाग्यावर संबंधित घटनेवरील आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात व आदरांजली वाहण्यात यावी.

Taxonomy upgrade extras

सुहास द वन Tue, 20/08/2013 - 11:49

In reply to by विषारी वडापाव

धक्कादायक - का बरे! अनेक मोठ्या व्यक्तींच्या आणि कार्यकर्त्यांच्या हत्या अश्या प्रकारे होत असतात. मोठ्या मोठ्या शहरात असं होतंच असतं.
अहो! सवय झालीय आम्हाला.

संतापजनक - कोणाला संताप होणार आहे. ज्यांनी हत्या केली आणि जे अंधश्रद्धा सोडत नव्हते त्यांना बरेच वाटले असणार. आपला सुसंस्कृत समाज ज्याने अंधश्रद्धा सोडावी म्हणून ही संघटना कार्य करत होती तो समाज त्यांसाठी संतापणार आहे काय.
अहो! सवय झालीय आम्हाला.

असहिष्णू, भ्याड - अहं असं म्हणायचं नाही बा. मारेकऱ्याने खुलेआम हत्या केली आहे. आपण सारं सहन करायचं.
अहो! सवय झालीय आम्हाला.

सन्जोप राव Tue, 20/08/2013 - 11:17

मराठी माणूस असल्याची शरम वाटावी अशी घटना. विवेकाचे आणि विवेकी माणसांचे दिवस संपत आले आहेत याचे चिन्ह. 'ही कसली पौर्णिमा? ही तर अमावस्या !' हे वृत्तवाहिन्यांवरचे शीर्षक यथार्थ आहे.

चिंतातुर जंतू Tue, 20/08/2013 - 12:02

डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे पार्थिव दुपारी अडीचच्या सुमाराला 'साधना'च्या शनिवार पेठेतील कार्यालयात आणले जाईल.

शिवोऽहम् Tue, 20/08/2013 - 13:53

सुन्न करून टाकणारी घटना. खूप मोठा माणुस गेला. आपल्या प्रकाशासारख्या विचारांसाठी प्राणांची किंमत देणार्‍या मूठभर माणसांत आणखी एक भर.

माणुस गेला तरी विचार मरत नाहीत हेही तितकेसे खरे नाही. कारण उरलेल्यांना ते तितकेसे पटलेले असतीलच किंवा मांडता येतीलच असे नाही. शिवाय सर्वांना संभाळून घेणारे नेतृत्व आहे आपले. गेल्या काही वर्षातल्या घटना पाहता आपल्याला अशा घटनांना सामोरे जाण्याची तयारी केली पाहिजे. संतसूर्य तुकाराम घ्या, भांडारकर घ्या नाहीतर जात-पंचायतींची वाढती सुलतानी घ्या. महाराष्ट्र हा तोच का असे विचारण्याची वेळ आली आहे.

बॅटमॅन Tue, 20/08/2013 - 14:20

In reply to by शिवोऽहम्

महाराष्ट्र हा तोच का असे विचारण्याची वेळ आली आहे.

महाराष्ट्राचा यूपी बिहार होत चाललाय खरंच :( बापजाद्यांच्या पुण्याईवर काय जे चाल्लंय ते चाल्लंय.

ॲमी Wed, 21/08/2013 - 09:50

आदरांजली _/\_
दाभोलकरांच्या कार्याला सर्वसामान्य माणुस कशा पद्धतीने पुढे नेऊ शकतो याविषयी मार्गदर्शन/चर्चा करावी.
मी स्वतः कुठलाही देवधर्म, रितीरीवाज पाळत नाही. अजुन काय करु शकतो?

सुहास द वन Tue, 20/08/2013 - 16:28

आपण जर प्रलंबित जादू टोणा विधेयक किंवा त्याची लिंक इथे देऊ शकलात तर बरे होईल.
हे विधेयक इतका वेळ का प्रलंबित आहे, त्यापाठी राज्य शासनाची आणि अंनिसची भूमिका काय होती, त्या अनुषंगाने इथे चर्चा पुढे चालविता येऊ शकेल.

हे नम्र आवाहन खासकरून ऋषिकेश यांना, आपण या विषयांत विशेष आहात म्हणून.....

ऋषिकेश Tue, 20/08/2013 - 16:47

In reply to by सुहास द वन

सदर बिल केंद्रात नव्हे तर राज्यस्तरावर सादर होणार होते.
अंनिसच्या संकेतस्थळावर याबद्दल माहिती मिळेल. या बिलासंबंधी मुद्देसुद गोषवारा त्याच स्थळावर इथे वाचता येईल.

बाकी विधानसभेतील विधेयके व मसुदे मिळण्यासाठी लोकसभा/राज्यसभेप्रमाणे संकेतस्थळ मला मिळालेले नाही त्यामुळे विधीभवनात त्यावर चर्चा झाली काय, असल्यास काय चर्चा झाली वगैरे प्रश्नांची उत्तरे सध्या तरी माहिती नाहित.

राजेश घासकडवी Tue, 20/08/2013 - 16:43

अत्यंत लाजिरवाणी आणि भयंकर घटना. संताप व्यक्त करायला शब्द पुरेसे नाहीत.

उत्क्रांतीविषयी वाचन केलं तेव्हा धार्मिकांच्या उत्क्रांतीवादाला असलेल्या विरोधाविषयी वाचलेलं होतं. मी विचार करत होतो की भारतात उत्क्रांतीच्या विचारांना असा विरोध का झाला नाही? त्यावेळी तरी मला असं वाटलं होतं की भारतात विचारांना विरोध वगैरे करण्याची फारशी गरज पडत नाही, कारण विचार मांडणाऱ्याकडे लक्ष कोण देतो? कोणी चार बुकं लिहिली म्हणून संस्थात्मक पातळीवर धर्मावर, बुवाबाजीवर ढिम्म परिणाम होत नाही.

हे अर्थातच आता तरी खरं नाही हे या हत्येवरून दिसून आलेलं आहे.

तिरशिंगराव Tue, 20/08/2013 - 17:15

In reply to by राजेश घासकडवी

ज्या कोणी हलकटांनी या थोर माणसाची हत्या केली त्यांना कठोरात कठोर शिक्षा तर व्हावीच, शिवाय ते अंधश्रद्ध असल्याने,त्यांना भीति वाटेल असे भयानक शाप, लोकांनी त्यांना द्यावेत. म्हणजे फाशीच्या प्रदीर्घ प्रतीक्षेत, त्या शापांच्या विचाराने त्यांचा मानसिक छळही होईल.

चिंतातुर जंतू Tue, 20/08/2013 - 16:51

सायंकाळी साडेपाच वाजता एस्. एम्. जोशी सभागृहामध्ये शोकसभा होईल. त्यानंतर हत्येविरोधात मूकमोर्चा निघेल.

सन्जोप राव Tue, 20/08/2013 - 17:06

शोकाचा आणि संतापाचा पहिला कढ ओसरल्यावर काहीशा शांत मनाने दाभोळकरांनी आम्हाला नेमके काय दिले याचा मागोवा घेणे शक्य झाले आहे.
दाभोळकरांनी विवेकाचा आणि बुद्धिप्रामाण्यवादाचा सतत न कंटाळता आणि (शक्य तोवर) न चिडता पाठपुरावा करायला शिकवले. सभोवताली कर्मकांडांचे आणि बुवा, माता, गंडे, अंगारे, उपासतापास आणि नवस यांचे जोरदार पीक आलेले असताना दाभोळकरांनी वैज्ञानिक दृष्टीकोनाची कास धरायला शिकवले. दाभोळकरांनी आम्हाला चिकित्सा करायला शिकवले. कोणत्याही गोष्टीवर अंधपणाने विश्वास न ठेवता आपल्या मतीवर आणि विवेकावर त्या गोष्टीचा कस बघून मगच ती स्वीकारायची की नाही हे ठरवायचे आम्ही दाभोळकरांकडून शिकलो.
या सगळ्याहून महत्त्वाचे म्हणजे आजूबाजूला सगळेच दीप मंदावत असताना हातात एक मिणमिणती का होईना पण जिवंत पणती घेऊन एखाद्याला वाटचाल करता येते हा विश्वास दाभोळकरांनी दिला. विचारांची लख्ख स्पष्टता, शब्दांची अचूक निवड आणि तल्लख बुद्धिमत्ता याच्या आधारावर दाभोळकरांनी विवेकवादाचे एक रोपटे तरारते ठेवले. सगळ्या लोंढ्याच्या विरुद्ध जाऊन 'नाही' म्हणायला दाभोळकरांनी शिकवले.
या सगळ्या पार्श्वभूमीवर दाभोळकरांचे जाणे अतीव क्लेशदायक आहे. त्याहूनही अधिक म्हणजे ज्या सनातन शक्तींचा आज क्षणभर तरी विजय झाला आहे, त्या शक्तींच्या फोफावण्याची शक्यता मनात काहूर माजवणारी आहे.

चिंतातुर जंतू Tue, 20/08/2013 - 17:30

In reply to by सन्जोप राव

सहमत. आणखी एका मुद्द्याची भर घालेन, आणि तो म्हणजे त्यांची सहृदयता. साने गुरुजी आणि त्यांच्या 'साधना' परिवारातून आलेली त्यांची सहृदयता इतकी पराकोटीची होती की विरोधक कितीही खालच्या पातळीवर जावोत, नरेंद्र दाभोलकरांच्या तोंडून एक अनुचित शब्द पडलेला कधी ऐकायला आला नाही. अशी माणसं विरळा.

ऋषिकेश Tue, 20/08/2013 - 17:07

मनःपूर्वक आदरांजली.

ज्याप्रमाणे महात्मा गांधीच्या भ्याड हत्येमुळे मूलतत्त्ववाद्यांना बॅकफूटवर जावे लागले आणि अहिंसेला व सहिष्णुतेला असलेली राजमान्यता आणि जनमान्यता अधिकच दृढ झाली; तसेच, या भ्याड व उद्वेगजनक हत्येनंतर श्रद्धावाद्यांचे विरोध बोथट होऊन ,विवेकवादाला राजाश्रय व जनाश्रय मिळू लागेल अशी मनःपूर्वक आशा व्यक्त करतो.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 20/08/2013 - 18:49

प्रचंड संताप झाला ही बातमी वाचून.

"त्यांनी चूक केली तर आम्ही का नाही करायची" असे उफराटे तर्क मांडणार्‍यांनी प्रत्यक्ष बळी घेतला.

डॉ. दाभोलकरांच्या भाषणाची एक फीत:

राजन बापट Tue, 20/08/2013 - 18:57

दाभोळकर यांना आदरांजली.
-------------------------------------------------------------------------------------------
चेचेन्यात जन्माला आलो असतो तर
मारला गेलोसतो
रशियन सैनिकांकडून

व्हिएतनाममध्ये
चुकवता आला नसता
अमेरिकन विमानांचा ससेमिरा

युगांडात
कुठल्यातरी भीषण रोगाच्या साथीत
पडलासतो बळी

पाकिस्तानमध्ये
कापला गेलासतो शिया-सुन्नींच्या
वाढत्या दंगलीत

जर्मनीमध्ये ज्यू म्हणून
आफ्रिकेत नागवला गेलासतो
वर्णद्वेषाच्या मुस्कटदाबीत

कंदहारमध्ये धडावेगळा झालासतो
फतव्याविरुद्ध सिनेमा पाहिला
मोठ्यांदा हसलो म्हणून

कोलंबोत किंवा हमासमध्ये
सतत वावरत राह्यलोसतो गर्दीच्या ठिकाणी
मानवी बाँबच्या भीतीनं

सौदीत
तोडून घेतलेसते हातपाय
चुकून बाईला धक्का लागला म्हणून

कुठे नं कुठे
मारलातुडवलाकापलाकिंवाउडवला गेलाच असतो
भारतात काय किंवा इतर ठिकाणी काय ?

- कवी वर्जेश सोलंकी.

राजेश घासकडवी Tue, 20/08/2013 - 20:57

आधार घेण्याची वास्तवता आणि आहारी जाण्याची भयग्रस्तता याचा नीरक्षीर विवेक व्यक्तीने सतत करावयास हवा. माणूस आधार घेता-घेता कधी आहारी जातो व मानसिक गुलामगिरी स्वीकारतो हे कळत नाही. म्हणूनच सजगता हवी, चुकीच्या संस्कारावर विचाराने मात करून त्याचे विवेकी आचारात रूपांतर करावयास लावणे हे खरे चळवळीचे काम असते. त्यासाठी लोकांवर संतापून भागणार नाही आणि 'काय हा मूर्खपणा!' म्हणून त्याची टिंगलटवाळी करून चालणार नाही. त्याच्याशी सतत व सहृदयतेने संवाद साधत राहावयास हवे. मार्ग खूप लांबचा आहे पण तोच इष्ट आहे. शेवटी लढा आहे माणूस बदलण्याचा आणि त्यासाठी क्रोधापेक्षा करुणेची व उपहासापेक्षा आपुलकीची खरी गरज आहे.
- डॉ. नरेंद्र दाभोलकर

करुणेचा आणि सहृदयतेचा संदेश एका नास्तिकाकडून यावा, आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून तथाकथित धार्मिकांकडून बंदुकीच्या गोळ्या याव्यात! आयरनी आयरनी म्हणतात ती हीच असावी.

प्रकाश घाटपांडे Tue, 20/08/2013 - 21:04

पुरोगामी लोकांना एकत्र ठेवण्याचे संघटन कौशल्य डॊ दाभोलकरांच्यात होते. अनेक वर्षांच्या व्यक्तिगत स्नेहामुळे बातमी समजल्यावर धक्काच बसला.माझी आदरांजली पण आणि श्रद्धांजली पण!

ऋषिकेश Wed, 21/08/2013 - 08:53

In reply to by मी

जरा बदल.. गृहित हे कृत्य धार्मिक लोकांनी केले असे नसून धर्मवादी लोकांनी केले असल्याचे आहे.
मी वरच्या प्रतिसादात श्रद्धाळू, श्रद्धावंत वगैरे शब्द जाणीवपूर्वक टाळून 'श्रद्धावादी' हा नसलेला शब्द योजला आहे.

रुची Tue, 20/08/2013 - 23:18

अहो त्यांनी 'तथाकथित धार्मिकांकडून' असे म्हटले आहे. सरसकट सर्व धार्मिकांना जबाबदार धरले आहे असे मला वाटले नाही.

बॅटमॅन Tue, 20/08/2013 - 23:51

In reply to by रुची

अहो ती दरवेळची रड आहे. काही झाले की तथाकथितांवर टीका करतो म्हणायचे आणि सरसकट सर्वांवर टीका सुरूच ठेवायची. यावरही बरेच लिहिता येईल पण प्रसंग तसा नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 21/08/2013 - 05:32

In reply to by बॅटमॅन

यदाकदाचित ह्या नाटकात कर्णाचं पात्र सारखं ’हा आपला अपमान आहे’ असं बोलतं..तेव्हा दुर्योधन त्याला आठवण करुन देतो की हा आपला नाही तुझा अपमान आहे.
इथून चोप्य-पस्ते

नितिन थत्ते Wed, 21/08/2013 - 10:37

In reply to by बॅटमॅन

नुकतीच जावेद अख्तर यांची एक मुलाखत पाहिली होती.

त्यात ऑपोझिट ऑफ रिलिजस (धार्मिक) इज एथिस्ट (नास्तिक) अ‍ॅण्ड ऑपोझिट ऑफ सेक्युलर इज फॅसिझम असे म्हटल्याचे आठवते. (मला हे प्रतिपादन आवडले याचे कारण जालावर किंवा इतरत्रही जे धर्मवादी -सावरकर, ठाकरे, जीना, मोदी- लोक दिसतात ते धार्मिक नसतात असे निरीक्षण आहे).

त्या अर्थाने हत्या धार्मिकांनी केलेली नसून कम्यूनल लोकांनी केली असावी.

पाषाणभेद Wed, 21/08/2013 - 04:48

जे झाले ते फारच दु:खदायक आहे. एका महान विचारांची हत्या झाली. निषेध करावा तितका थोडाच.
डॉ. नरेन्द्र दाभोळकरांना श्रद्धांजली.

ऋषिकेश Wed, 21/08/2013 - 09:33

In reply to by सुहास द वन

दाभोलकर वायले आणि दाभोळकर वायले. हे दाभो'ल'कर होते असे वाटते कारण त्यांच्या पुस्तकांवर त्यांचे नाव तसे लिहिले जायचे

मस्त कलंदर Wed, 21/08/2013 - 11:12

दाभोलकरांची दोन-तीन पुस्तके वाचली होती. बरेचसे प्रसंग माझ्या आसपासच्या गावांतले-जिल्ह्यातलेच होते आणि गल्लीबोळात सोकावलेल्या भोंदू बाबांचा माझा रागराग आणखीच वाढला होता.

नक्की कधी ते आठवत नाही पण साधारण १९९५-९६ च्या सुमारास तासगांवात नरेंद्रमहाराजांचं जरा अधिकच वाढू लागलं होतं. उपाय काय तर दर गुरूवारी नाणीजला वारीला या, तिथे इतक्या रूपयांच्या उदबत्त्या रोजच्या बाजूला काढून ठेवा व वारीच्या दिवशी तिथे वाहा, इतके नारळ द्या, इतकी देणगी द्या, वगैरे वगैरे. त्यांच्या 'गजानन विजय ग्रंथा"च्या चालीवर लिहिलेली पोथ्यापुराणांनी तर वात आणला होता. आमचे दुर्दैव असं की आमच्या भिंतीला भिंत लागून असलेले शेजारी दर गुरूवारी शक्य तितक्या लोकांना बोलावून हा गोंधळ घालायचे आणि आम्हाला काहीच करता यायचे नाही. भरीत भर म्हणून तेव्हाचे सगळ्यात मोठे मंगलकार्यालय आमच्याच गल्लीत असल्याने तिथेही यांचे कार्यक्रम चालायचे, कधीकधी आमच्या शाळेच्या आवारातदेखील हे प्रकार चालत.

अंनिसचा या प्रकारांना विरोध असे. त्यातूनच एकदा नरेंद्र महाराज आयोजित 'सामुदायिक विवाह'कार्यक्रमास अंनिसने विरोध केला होता. खरंतर सामुदायिक विवाह फक्त नावाला आणि खरा उपक्रम सगळा माल गोळा करून नाणीजला नेण्याचा होता. अंनिसच्या विरोधाला प्रत्त्युत्तर म्हणून त्या लोकांने सरळ नंग्या तलवारी उपसल्या. याचा निषेध म्हणून सर्व व्यापार्‍यांनी लगोलग बंद पुकारला आणि आम्ही सर्वांनी गावातून मूक निषेध मोर्चा काढला होता.

काल बातम कळाली तेव्हाच धक्का बसला होता. आज सकाळी लोकसत्त्तामध्ये (बहुधा) कुमार सप्तर्षींचा दाभोलकरांना सभेदरम्यान धमकावण्याच्या प्रकाराबद्दलचा लेख वाचला आणि ही आठवण आज इथे लिहाविशी वाटली.

दाभोलकर गेले तरी सारासार विचार करणार्‍यांची मते बदलणार नाहीत, पण त्यांच्या चळवळीला नक्कीच त्यांची उणीव जाणवत राहील.

चिंतातुर जंतू Wed, 21/08/2013 - 11:50

>> हा प्रकार धार्मिक लोकांनी केला असल्याच्या गृहितकावर इथल्या वैचारिक प्रतिक्रिया अयोग्य वाटतात.

हे गृहितक कदाचित चुकीचं ठरू शकेल, पण ज्या संस्थेकडे संशयाची सुई आहे त्या 'सनातन' संस्थेचे अभय वर्तक काल एका वाहिनीच्या पॅनलवर असं म्हणत होते, की ह्या हत्येमागे 'अंनिस' संस्थेचा आर्थिक गैरव्यवहार किंवा दाभोलकरांचे एखाद्या बाईशी अनैतिक संबंध असं काहीही असू शकतं. एकीकडे वाहिनीवर अंत्यसंस्काराची लाइव्ह दृश्यं दाखवत होते आणि एकीकडे ह्यांचं हे चालू होतं. लोक आपापली पातळी दाखवून देतात, एवढंच सध्या मी म्हणेन.

सन्जोप राव Wed, 21/08/2013 - 12:05

ह्या हत्येमागे 'अंनिस' संस्थेचा आर्थिक गैरव्यवहार किंवा दाभोलकरांचे एखाद्या बाईशी अनैतिक संबंध असं काहीही असू शकतं.
अशाने 'सनातन' चा या हत्येची संबंध असल्याचा संशय बळावेल. राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया तर एकेकाला जोड्याने मारावेसे वाटेल इतक्या भोंदू आहेत. ज्या विनोद तावडेंनी फेसबुकवर दाभोलकरांच्या हत्त्येचा निषेध वगैरे आपल्या फोटोसकट टाकले आणि उथळ्सम्राटांनी ते लगोलग आपापल्या भिंतींवर शेअर केले आहे त्याच तावडेंनी या विधेयकाला किती विरोध केला हे दाभोलकरांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितले आहे. भाजप आणि शिवसेना हे विधेयक कधीच संमत होऊ देणार नाहीत असे दाभोलकरांना वाटत असे. त्यांची त्यातल्या त्यात मदार होती ती काँग्रेस - राष्ट्रवादी सरकारवर. पण अगदी विलासरावांपासून चव्हाण-आराराबांपर्यंत सगळ्यांनी त्यांच्या तोंडाला पानेच पुसली.
भाजप आघाडीचे सरकार केंद्रात आणि/ किंवा राज्यात आले तर हे विधेयक कधीच संमत होणार नाही आणि झाले तर ते अगदी पुचाट स्वरुपातले नावापुरते असेल असे आता वाटू लागले आहे. काँग्रेस आणि भाजप यांच्यात कोण कमी धोकादायक या प्रश्न याआधीही होता, आता तर तो अधिक उग्र झाल्यासारखा वाटतो आहे.

सन्जोप राव Thu, 22/08/2013 - 05:31

In reply to by सन्जोप राव

वरील प्रतिसाद लिहून काही तास उलटताच तोच महाराष्ट्र सरकारने जादूटोणा विरोधी वटहुकूम काढत असल्याचे जाहीर केले आहे. मूळ मसुद्यातील आता फक्त अकराच कलमे या वटहुकुमात समाविष्ट केली जाणार आहेत. दाभोलकरांनी सुचवलेल्या सुधारित मसुद्यातल्या तेरा कलमांपैकी कोणती कलमे या वटहुकुमात गाळली हे मंत्रीमहोदय शिवाजीराव मोघे यांना प्रसारमाध्यमांशी बोलताना आठवत नव्हते!
दरम्यान सनातन संस्थेने पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या मते जे उपद्रवी आहेत त्या लोकांना 'टारगेट' करणे आपण बंद करणार नाही असे म्हटले आहे.