चवथ (गणेश चतुर्थी)
चवथ हा शब्द नुसता उच्चारला तरी माझ्या मनात अनेक आठवणींची गर्दी होते. एखाद्या प्राथमिक शाळेची मधली सुट्टी झाली की लहान मुलं शाळेच्या आवारात कशी घोळक्या-घोळक्याने दिसतात, हसतात, खिदळतात, एकमेकांना ढकलून पुढे येतात तश्या ह्या आठवणी. चवथ दहा दिवसांवर आली की आजोबा चौकीच्या एका कोपऱ्यात निट झाकून ठेवलेला भला भक्कम शिसवी देव्हारा उघडायचे, स्वतः सगळी कोळीष्टकं झाडून काढायचे आणि एका वाटीत खोबरेल तेल घेऊन जुन्या चिंधीने तो पूर्ण देव्हारा मन लावून पुसायचे. तेलपाणी केलं की देव्हारा कसा काळा कुळकुळीत व्हायचा, नुकतीच अंघोळ घालून तीट लावलेल्या बाळासारखा ताजातवाना दिसायचा.
चवथीच्या एक-दोन दिवस आधी मग भिकरू यायचा, आपल्याबरोबर अजून एक-दोघे मजबूत गडी घेउन. तिघेही मग तो देव्हारा उचलून देव पुजायच्या ठिकाणी नेउन ठेवायचे. एवढा जड तो देव्हारा नेताना त्यांच्या दंडातल्या बेडक्या तटतटून फुगायच्या. मग सुरु व्हायची सजावट. साधीच असायची. बाजारातून रंगीबेरंगी कागद आणून ते टेबलाला चिकटवायचे. त्याला बेगडीची किनार करायची. नवीन गौरणा आणून ती फोटो फ्रेम ला चीकटवायची. त्यातुनही गौरी डावीकडे की महादेव डावीकडे हा वाद व्हायचाच दरवर्षी. मग कुणीतरी वडील माणूस आपल्या अधिकाराखाली हा दावा निकालात काढायचे. गौरी-महादेवाचे चेहरे वर्षानुवर्षे तसेच. देवांसारखे वाटायचेच नाहीत. घरातल्याच कुणा देखण्या, प्रेमळ काकांसारखा दिसायचा महादेव आणि गौरीत तर आईचा, आजीचाच चेहेरा दिसायचा.
हरताळकेच्या दिवशी घरातल्या बायकांचा उपास असायचा, त्यासाठी आजोबा मग मुद्दाम पाडेली बोलावून माडावरची कोंवळी आडसरे पाडवून घायचे. देवीपुढे ठेवायच्या सौभाग्यवाणांसाठी तरणे नारळ पाडले जायचे. देवीपुढे मुठ-मुठभर तांदळाचे ढीग आणि त्यावर ठेवलेला एक-एक नारळ. नारळावर एकेक निरंजन. आरतीच्या वेळेला ती सगळी निरांजनं पेटवली जायची आणि देवीचा शांत, सुंदर सोशिक चेहेरा त्या मंद उजेडाने उजळून जायचा.
पुजेची तयारी करण्यात घरातली सगळीच माणसं गुंतलेली असायची. आम्ही मुली पत्री, फुलं गोळा करण्यात, मखर सजवण्यात, मुलं माटोळीचं समान आणण्यात, जर मोठे चुलतभाऊ, काका वगैरे मंडळी देव्हारा सजवण्यात, मागे इलेक्ट्रिकच्या दिव्यांची आरास मांडण्यात आणि घरातल्या बायकांचं तर काही विचारूच नका. फराळ, पूजेचं सामान, नैवेद्याची जेवणं, पंगतीला बसणाऱ्या लोकांचा स्वयंपाक, नैवेद्याचं दर दिवशी नवं गोडधोड, आल्या-गेल्या पाहुण्याची सरबराई, उकडीचे मोदक, पुरणाच्या नेवऱ्या अशी अष्टावधानं सांभाळण्यात त्यांचा पूर्ण दिवस जायचा. आईच्या तर पायाचे नुसते तुकडे पडायचे.
एरवी सकाळी उठायला कायम अळमटळम करणारी मी, चवथीच्या दिवशी मात्र आईच्या पहिल्या हाकेला ताडकन उठून बसायची. पटकन अंघोळ उरकून, नवे कपडे घालून तयार होवून बसायची कारण गणपती आणायला जायचं असायचं. आमचे शेजारी प्रकाशभाऊ त्यांची बस पाठवायचे गणपती आणायला चित्रशाळेत, वाड्यावरची बहुतेक मंडळी त्या बसमधूनच जायची. चित्रशाळेत ही गर्दी असायची. फळीवर रंगून ठेवलेले, मंद स्मित करत असलेल्या अनेक श्रींच्या मूर्ती, लहान-मोठ्या आकाराच्या, वेगवेगळ्या वाहनांवर आरूढ झालेल्या आणि त्यांना निरखणारे, हरखून गेलेले कितीतरी चेहेरे. लहान-मोठे, पण प्रत्येकाच्या तोंडावर आनंद, आवडता पाहुणा औटघटकेसाठी का होईना पण घरी येणार याचा ओसंडून वाहणारा आनंद.
सगळ्या गर्दीला ओलांडून आम्ही आमच्यासाठी राखून ठेवलेल्या आटोपशीर मूर्तीकडे जायचो. मूर्तीकाराचा माणूस फडक्याने मूर्ती साफ करून द्यायचा आणि वर निगुतीने वर्तमानपत्र बांधायचा. मूर्तीचा बंद केलेला चेहेरा आता थेट घरी पोचल्यावरच उघडायचा. एका मोठ्या जीर्ण खाते वहीत वहीवाटीच्या गणपतींची नावे लिहिलेली असायची. त्या वहीत पाहून मूर्तिकार किंमत सांगायचा आणि त्याप्रमाणे पैसे देऊन आम्ही गणपती घरी आणायचो. एखाद्या लहान बाळाला कौतुकाने, काळजीपूर्वक मांडीवर बसवून आणावं तसा गणपती जपून घरी आणला जायचा. दारातच आईने पाट मांडून ठेवलेला असायचा. दोन्ही बाजूला मंद तेवणाऱ्या समया आणि आरतीचं तबक.च काका हातातली मूर्ती अलगद पाटावर ठेवायचा, घराकडे तोंड करून. नवीन साडी नेसलेली आई, किंवा काकी किंवा वहिनी हसतमुखाने गणपतीचं औक्षण करायची, कणकेचे गोळे मूर्तीवरून उतरून चारी दिशांना फेकायची, कुंकुममिश्रित पाणी दाखवायची आणि गणपती आत यायचा. आमच्या घरातल्या माणसासारखाच, जिव्हाळ्याने.
मूर्ती देव्हाऱ्यातल्या पाटावर बसवली की कशी तृप्त, हसरी, शांत, समाधानी दिसायची! दोन्ही बाजूना दोन समया कायम तेवत असायच्या. घरातलं कुणी न कुणी दर दोन-तीन तासांनी वात पुढे करून, काजळी बाजुला सारून, तेल बघून जायचं. रात्रीतून आजोबा किंवा पापा दोन-तीनदा उठून समईतल्या वाती नीट करून जायचे. भाऊ सकाळी सकाळी गावाबाहेरच्या तळ्यात जाऊन पाय चिखलाने बरबटवून घेऊन साळकं आणायचे, त्यातली गणपतीला लाल रंग प्रिय, म्हणून तांबडी साळकं आणायचा अट्टाहास असायचा. कंबरभर पाण्यात जाउन भाऊ एक तरी तांबडं साळक विजयी मुद्रेने घेऊन यायचाच!
पूजा करताना मग ते तांबडं साळक गणपतीच्या मुगुटावर किंवा सोंडेत ठेवलं जायचं. पूर्ण फुललेलं ते हसरं फूल श्रीगणेशाच्या सोंडेत कसं साजून दिसायचं! पूजेचे तीन दिवस घरात एक सुंदर वास कायम दरवळत राहायचा. कापराचा तिखट वास, चंदनाचा मंद दरवळणारा वास, तुपाच्या निरांजनाचा खरपूस, किंचित जळका वास, उदबत्तीचा धुंद सुगंध आणि कितीतरी प्रकारच्या फुलांचा संमिश्र सुगंध, गुलाबाचा उग्र, जाईचा मंद, मोगऱ्याचा नाकात भरून राहणारा वास, कमळांचा जाणवेल न जाणवेल असा सूक्ष्म दरवळ. असे कितीक वास घरी पाहुणे आलेले. चवथ संपली तरी ते वास कितीतरी दिवस नाकात रेंगाळत राहायचे.
दुपारच्या पूजेत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व्हायची. माझ्या लहानपणी बाप्पी, म्हणजे माझे चुलत आजोबा पूजा करायचे, ओल्या दुर्वांची टोकं श्रीगणेशाच्या छातीला लावून मंत्र म्हणताना त्यांची स्थिर, अचल दृष्टी मूर्तीच्या डोळ्यांकडे लागलेली असायची. जणू ते आपलं सर्वस्व खरंच मूर्तीला अर्पण करत असावेत. मूर्ती खरंच सजीव, सगुण वाटायची मग.
पूजा झाली की आरत्या व्हायच्या. नेहमीच्या तीन तर व्हायच्याच पण लोकाग्रहामुळे पूजा सांगणारे विनुभाऊ, आमचे शेजारी, त्यांच्या खास ठेवणीतल्या दोन आरत्या म्हणायचे. 'आरती ही तुजला गण…राया' ही आरती म्हणताना लय एकदम द्रुत व्हायची. टाळ वाजवता वाजवता हात दंडातून भरून यायचे.
आरत्या झाल्या कि जेवणं व्हायची. गौरीचं नैवेद्याचं पान जेवताना फार मोठा बहुमान मिळाल्यासारखं वाटायचं. पानात गरम गरम पातोळ्या असायच्याच असायच्या. वरची हळदीची पानं हळुवारपणे बाजूला करताना हळदीचा वास नाकात अगदी भरून जायचा.
जेवणं झाली, मागची झाक-पाक उरकली की सगळी माणसं एकतर गप्पांचे फड टाकायची किंवा पत्त्यांचे डाव. सगळे काका, चुलतभाऊ, आम्ही मुलं असे सगळे कितीतरी महिन्यातून भेटत असायचो साहजिकच गप्पांना उसंत नसायची. कधी राजकारणावर गरमगरम चर्चा व्हायची तर कधी हास्य-विनोदाचे इमले चढायचे. आम्ही मुलं कधी फोग लावण्यात गुंतलेलो असायचो तर कधी मोठ्या माणसांच्या गप्पांत. फोग कसला तर चार-दोन भुइनळे, एक दोन चंद्रज्योतींचे बोक्स, भुइचक्र आणि बाण. मोठे बॉम्ब, किमती फटके वगैरे नसायचेच तेव्हा. असेल तो इवला फोग पुरवून पुरवून लावायचा.
रात्री परत पंचोपचार पूजा व्हायची, पण महानैवेद्य वाढायचा नसल्यामुळे पूजा आटोपशीर व्हायची. जेवणंही लवकर उरकायची. परत एकदा गप्पा रंगायच्या आणि उशिरा कधीतरी पेंगाळलेले डोळे घेऊन सगळे झोपायला जायचे. दिवे बंद व्हायचे. फक्त देवासमोरच्या समया अखंड तेवत असायच्या. शेजारी कुणाच्या तरी घरी आरती चाललेली असायची, तिचा अस्पष्ट आवाज कानावर यायचा. बाकी सगळं शांत झालेलं असायचं. समयांच्या मंद उजेडात श्री गणेशाचे शांत, तृप्त डोळे अजूनच प्रेमळ दिसायचे. सगळे झोपायला गेले की मी हळूच उठून मूर्तीपुढे उभी राहायचे. वाटायचं की ही मूर्ती नाहीच आहे, हा खरा गणपती आहे आणि तो आत्ता सोंड उघडून माझ्याशी काहीतरी बोलणार आहे. अंगावर शहारा यायचा. नमस्कार करून झोपायला गेले तरी कितीतरी वेळ माझ्या मिटल्या डोळ्यापुढे गणपतीचे ते रेखीव, सुंदर, शांत, आश्वासक डोळे तरळत असायचे!
शब्दार्थ
शब्दांचे अर्थ थोडक्यात देते
गौरणा - गोव्याला हरतालकेच्या दिवशी नुसती गौरी-महादेवाच्या कागदी चित्रांची पूजा असते. तीन रंगात छापलेली गौरी महादेवाची चित्रं बाजारात मिळतात त्याला गौरणा म्हणतात. पोर्तुगीजांच्या काळात मृण्मय मूर्तीची पूजा करण्यावर बंदी होती. फार लपून छपुन सगळं करावं लागायचं. कागदी चित्रं त्यामानाने घरी ठेवायला सोपी, धाड पडली पोलिसांची की पटकन लपवता यायची. पूर्वी गणपतीचं देखील चित्रच असायचं. मृण्मय मूर्ती बऱ्याच उशिरा मिळायला लागली.
फोग - शोभेचं दारूकाम. पोर्तुगीज शब्द आहे.
आडसर - कोवळा नारळ. हरतालकेच्या उपासाचा खास फराळ.
साळक - कमळ
माटोळी - गोव्यात गणपतीसमोर फळाफुलांची आरास मांडली जाते. छताला लाकडी पट्टे ठोकून त्याची एक कायम स्वरूपी चौकट केलेली असते आणि त्याला सगळी फळे- रानफुले बांधली जातात. फक्त लोकल भाज्या, रानफुलं आणि फळे.
धन्यवाद... बेगडी म्हणजे? (एक
धन्यवाद...
बेगडी म्हणजे? (एक विशेषण म्हणून हा शब्द माहिती आहे पण इथे तो नाम स्वरूपात दिसला.)
फोग आणि साळक चे अर्थ संदर्भामुळे अंदाजे कळले होते. 'फोग पुरवून वापरायचे' म्हणजे ते काय असतात..फुलबाजी सारखे काही का जे पूर्ण न जाळता पुरवून थोडे थोडे रोज जाळायचे?
आडसर हा शब्द ऐकलाच होता पण आठवत नव्हता कुठे ते. गौरणा आणि माटोळीचा अर्थ विस्तारात सांगितल्याबद्दल धन्यवाद.
लेखनाचा विषय माझ्या एरवीच्या
लेखनाचा विषय माझ्या एरवीच्या वाचनातला नसला तरी त्यात अनेक माझ्यासाठी कमी परिचयाचे असलेले शब्द दिसले म्हणून वाचत गेले. उदाहरणार्थः चवथ,बेगडी,गौरणा,पाडेली,आडसरे ,साळकं,फोग -हे शब्द महाराष्ट्रातल्या कुठल्या एखाद्या प्रदेशातले आहेत का? या शब्दांचा थोडक्यात अर्थ दिलात तर आभारी असेन.