Skip to main content

कर्तरी व कर्मणी क्रियापदे, प्रथमा व तृतिया विभक्ती

खालिल सहा वाक्ये पहा -
१. गुंजन खाना लायी है ।
२. गुंजन ने खाना लाया है ।
३. गुंजन खाना खायी है ।
४. गुंजन ने खाना खाया है ।


५. गुंजनने जेवण आणले आहे.
६. गुंजनने जेवण खाल्ले (केले) आहे.

पहिल्या चार हिंदी वाक्यांपैकी १ व ४ बरोबर आहेत. २ व ३ अर्थहिन आहेत. असे हिंदी लोकांच्या बर्‍यापैकी लोकांचे म्हणणे आढळले. पुढे जाऊन, इथे गुंजन एक मुलगी आहे म्हणून, 'गुंजन ने खाना लाया है।' म्हणणे म्हणजे तिला टॉमबॉइश म्हटल्यासारखे आहे असेही बर्‍याच लोकांचे म्हणणे होते.

मराठीत दोन्ही क्रियापदे (आणणे, खाणे) कर्मणी आहेत असे वाटते, हिंदीत मात्र असे आहे असे दिसत नाही. का ते मला आजपावेतो कळले नाही.

एरवी माझ्या हिंदीची स्तुती करणार्‍या माझ्या ऑफिसातल्या लोकांनी मला चूकून (?) 'गुंजन ने खाना लाया है।' म्हटल्यावर मी कसा मूळचा अहिंदी आहे ते सांगीतले.

आपले मत काय आहे?

नितिन थत्ते Tue, 01/10/2013 - 17:56

मला मराठीतले कर्तरी आणि कर्मणि प्रयोग नीट कळलेले नाहीत.

बबन कमळ बघतो हा कर्तरी प्रयोग आहे असे मी शिकलो आहे. याचे कर्मणि रूप कसे करायचे हे ठाऊक नाही. मी शाळेत जे शिकलो त्यात कर्मणि रूपांतर करताना वाक्य वर्तमानकाळातून भूतकाळात नेले जाते असे आढळते. काळ न बदलता कर्मणि प्रयोग कसा करतात ते कळत नाही. आणि हेच वाक्य भूतकाळात कर्तरी प्रयोगात (जसे गुंजन खाना लायी है) कसे लिहितात तेही ठाऊक नाही.

अजो१२३ Tue, 01/10/2013 - 18:23

In reply to by नितिन थत्ते

याचे कर्मणि रूप कसे करायचे

क्रियापदे कर्तरी, कर्मणी वा दोन्ही (वा दोन्ही नाही?) अशी असतात. म्हणून त्याच अर्थाचे तेच क्रियापद वापरलेले वाक्य कर्तरीचे कर्मणी वा उलट करत नाहीत. म्हणजे डायरेक्ट , इनडायरेक्ट वाक्ये असा प्रकार त्यांच्यात नसतो, असे प्राथमिक मत आहे.

मिहिर Tue, 01/10/2013 - 19:05

In reply to by नितिन थत्ते

बबन कमळ बघतो हा कर्तरी प्रयोग आहे असे मी शिकलो आहे

बरोबर आहे. कारण इथे बबन हा कर्ता असून कर्त्याच्या लिंग, वचनानुसार क्रियापद बदलते.

मराठीत वर्तमानकाळात कर्मणिप्रयोग नसतो. भूतकाळात किंवा इतर क्रिया पूर्ण झालेले दाखवणाऱ्या काळात सकर्मक क्रियापदासाठी कर्मणिप्रयोग असतो. उदा. बबनने कमळ बघितले, बबनने उद्यापर्यंत कमळ बघितले असेल इ.)

कर्तरिकर्मणिप्रयोगात गोंधळ होण्यामागे असण्यामागे इंग्रजीतील ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉईसशी केली जाणारी तुलना आणि संस्कृतमधील कर्तरी व कर्मणिप्रयोगाचे मराठीपेक्षा वेगळे असणे कारणीभूत असावे असे वाटते. इंग्रजीतील ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉईस हे संस्कृतमधील कर्तरी व कर्मणिप्रयोगाशी जवळपास समान आहेत असे वाटते. संस्कृतातही 'बबनः भोजनं करोति' ह्या कर्तरी वाक्याचे 'बबनेन भोजनं क्रियते' असे कर्मणी वाक्य करता येते. संस्कृतमध्ये कर्तरी आणि कर्मणिप्रयोग हे वाक्यात प्रधान कोण आहे ह्यावरून ठरते. क्रियापदाचा कर्त्याशी आणि कर्माशी असणारा अन्वय हे त्याबरोबर आपोआप येत असावे. मराठीत आणि इतर काही आधुनिक इंडो-आर्यन भाषांमध्ये भूतकाळी रूपांत संस्कृतमधील वर उल्लेखलेला कर्तरिप्रयोग कालौघात गळून गेला. तसेच मराठीत कर्ता वा कर्माशी अन्वय करणारा अशी कर्तरी व कर्मणिप्रयोगाची व्याख्या प्रचलित झाली असावी.

१. हे तसे खरे नाही. दिसायला अगदी साधा असा कर्मणिप्रयोग करता येत नाही. पण इंग्रजीतल्या पॅसिव्ह वळणाचा (ज्याला मराठीत नवकर्मणिप्रयोग म्हटल्याचेही वाचले आहे) बबनकडून कमळ बघितले गेले किंवा बबनकडून कमळ बघण्यात आले असा कर्मणिप्रयोग करता येतो. हा कर्मानुसार अन्वय ह्या मराठीच्या कर्मणिप्रयोगाच्या व्याख्येशी सुसंगत आहे.

२. मो. रा. वाळंबेंच्या मराठी व्याकरणाच्या पुस्तकात अन्वयाधारित व्याख्या दिली आहे.

मूळ लेखाबद्दलः सर्वसाधारणपणे भूतकाळात सकर्मक क्रियापद कर्मणिप्रयोगात वापरले जाते व अकर्मक क्रियापद कर्तरिप्रयोगात. उदा. बबनने आंबा खाल्ला (कर्मणी), बबन झोपला (कर्तरी). मराठीत 'शिकणे' हे सकर्मक क्रियापद असूनही भूतकाळात कर्तरी चालते. उदा. तो चार भाषा शिकला (त्याने शिकल्या नव्हे!)
हिंदीतही असे असावे, पण अपवाद जास्त असावेत. तारा मोहनन यांच्या आर्ग्युमेंट स्ट्रक्चर इन हिंदी ह्या पुस्तकात हिंदीत असा ठोस निष्कर्ष काढता येत नाही (म्हणजे सकर्मक असल्यास कर्मणी, अकर्मक असल्यास कर्तरी) असे म्हटले आहे.

नितिन थत्ते Wed, 02/10/2013 - 10:43

In reply to by मिहिर

खरे तर बबन कमळ बघतो याचे कर्मणि रूपांतर बबनकडून कमळ पाहिले जाते असे वर्तमानकाळी करता येईल. पण शाळेत तरी तसे शिकवीत नाहीत.

अजो१२३ Tue, 01/10/2013 - 22:32

आपल्या हिंदीच्या ज्ञानाप्रमाणे कोणाकोणास वाक्य दोनचे व्याकरण चूक आहे किंवा असले हिंदी बोलत नाहीत असे वाटते? माझ्या परिचयाच्या बर्‍याच हिंदी भाषिकांनी हे वाक्य साफ चूक आहे असे सांगीतले. मला हे पटतच नाहीय.

अक्षय पूर्णपात्रे Tue, 01/10/2013 - 23:10

'गुंजन जेवण घेऊन आली आहे' असे वाक्य चालेल का? 'लेके आना' चे हिंदीत लाना झाले आहे का?

'न'वी बाजू Tue, 01/10/2013 - 23:29

In reply to by अक्षय पूर्णपात्रे

('ले आयी' = 'लायी'?)

बाकी, 'गुंजन ने पानी लाया' असे आपल्या डोक्यातल्या मराठी-टू-हिंदी-इंटरप्रीटरपोटी मराठीजनांस करण्याची सवय असावी, आणि या सवयीपोटी आपणांस त्यात चूक वाटत नसावे. मात्र, हिंदीभाषक 'गुंजन पानी लाया' असेच म्हणत असावा; 'गुंजन ने पानी लाया' म्हणत असण्याबद्दल साशंक आहे.

यावरून आठवलेले काही अवांतर: 'मला तेथे जायचे आहे', 'मला हिंदी शिकायची आहे', 'मला शिक्षा थोडीच भोगायची आहे?' वगैरेंसाठी, एक मराठीभाषक म्हणून, 'मुझे वहाँ जाना है', 'मुझे हिंदी सीखना है (किंवा, फारच झाले तर, सीखनी है)', 'मुझे सज़ा थोड़ी ही भुगतनी है?' अशा वाक्यरचना माझ्या डोक्यात चटकन येतात. त्या कितपत बरोबर किंवा चूक आहेत, याबद्दल नक्की कल्पना नाही. परंतु दिल्लीत/दिल्लीकरांकडून अशीच वाक्ये मी 'मैं ने वहाँ जाना है', 'मैं ने हिंदी सीखनी है', 'मैं ने सज़ा थोड़ी ही भुगतनी है?' अशा प्रकारे ऐकलेली आहेत. (पंजाबीचा प्रभाव?)

(अतिअवांतर: दिल्लीत असेच कधीतरी अपरिचितांशी संवादातून मध्येच 'आप की काष्ट क्य है?' असाही सवाल अचानक (आणि खुल्लमखुल्ला) ऐकलेला आहे. याचे अपेक्षित उत्तर सामान्यतः 'देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण' किंवा 'चांद्रसेनीय कायस्थ प्रभू' असे नसून, 'मलहोत्रा', 'सिन्हा', 'गुप्ता' - किंवा, ईक्विवॅलंटली, 'रानडे', 'पत्की' किंवा 'जाधव' असे असते - थोडक्यात, सामान्यजन बहुतकरून 'आडनावा'करिता इंग्रजीतून 'सरनेम' अशी संज्ञा न वापरता 'काष्ट' अशी वापरतात - असे काहीसे आठवते.)

मिहिर Tue, 01/10/2013 - 23:59

In reply to by 'न'वी बाजू

ही 'मैने करना है' छाप वाक्ये पंजाबी वापरतात अशा प्रकारची टीका हिंदीभाषक मित्रांकडून ऐकली आहे. एक जण तर म्हणत असे की, एक वेळ 'मेरे को करना है' परवडले, पण 'मैने करना है' नको!
पण 'मैने' प्रकारची वाक्ये काही प्रमाणात मराठी भाषकही वापरत असावेत असे वाटते. 'तू मला पाचशे रुपये द्यायचे आहेस', 'मी काम केले पाहिजे' इ. साठी 'तूने मुझे पाँच सौ रुपयें देने है', 'मैने काम करना चाहिए' अशा प्रकारची वाक्ये मराठीभाषकांकडून ऐकली आहेत. ह्याबद्दल हिंदीभाषक मित्राला तक्रार करतानाही ऐकले आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 02/10/2013 - 00:11

In reply to by मिहिर

या 'तेरे को', 'मेरे को' यातला 'को' आला कुठून? हिंदी भाषिक पट्ट्याच्या अन्य शेजारी भाषांचा, बंगाली, कश्मिरी, हिंदीवर काही बरावाईट प्रभाव पडतो/पडला आहे का?

'न'वी बाजू Wed, 02/10/2013 - 03:22

In reply to by मिहिर

'तू मला पाचशे रुपये द्यायचे आहेस', 'मी काम केले पाहिजे'

हे बहुधा अलिकडे प्रचलित होऊ लागलेले भ्रष्टीकरण (?) असावे काय? म्हणजे, असे वाक्प्रचार ऐकू येतात खरे, पण 'मला काम केले पाहिजे', 'तुला मला पाचशे रुपये द्यायचे आहेत' (विरुद्ध 'तू मला पाचशे रुपये देणे लागतोस' - पूर्णपणे वेगळा प्रयोग आहे!) हे कानाला अधिक परिचयाचे वाटते.

पण मग भ्रष्टीकरण म्हणावे, तर याचा स्रोत नक्की कुठला?

धनंजय Wed, 02/10/2013 - 00:05

मराठी आणि बहुतेक प्राकृतोद्भव "प्रमाण" भाषांमध्ये :
अकर्मक क्रियापदे साधारणपणे विध्यर्थ-व-आख्यात सोडून कुठल्याही आख्यातात ("tense/mood") कर्तरिच वापरली जातात :
प्रथम त-आख्यातात (वर्तमान) भाऊ बसतो, बहीण बसते, मूल बसते
ल-आख्यातात (भूत) भाऊ बसला, बहीण बसली, मूल बसले
अपवाद व-आख्यातात (विध्यर्थ) भावे वापर होते : भावाने बसावे, बहिणीने बसावे, मुलाने बसावे

सकर्मक क्रियापदे त-आख्यातात कर्तरि वापरली जातात आणि ल-आख्यातात कर्मणि
प्रथम त-आख्यात (वर्तमान) भाऊ कैरी खातो, बहीण आंबा खाते, मूल पोळ्या खाते
ल-आख्यात (भूत) भावाने कैती खाल्ली, बहिणीने आंबा खाल्ला, मुलाने पोळ्या खाल्ल्या

एखाददोन सकर्मक क्रियापदे जुनाट पद्धतीने ल-आख्यातात कर्तरि आणि कर्मणि दोन्ही प्रकारे वापरली जातात, पैकी सामान्य वापरातले "म्हणणे"
भाऊ गाणे म्हणाला, भावाने गाणे म्हटले, बहीण पाढा म्हणाली, बहिणीने पाढा म्हटला.

खड्या (पश्चिम उत्तर प्रदेशातल्या, "प्रमाण") हिंदीतही सामान्य नियम असाच आहे. सकर्मक "खा"चे उदाहरण घेऊया :
त-आख्यात (वर्तमान) लड़का जलेबी खाता है । लड़की हलुआ खाती है ।
य-आख्यात (भूत) लड़केने जलेबी खायी । लड़कीने हलुआ खाया ।

मराठीत जशी काही जुनाट क्रियापदे (म्हणणे) भूतकाळात दोन्ही रूपे घेऊ शकतात, त्याच प्रमाणे हिंदीतही "लेना" वगैरे काही अपवादात्मक क्रियापदे दिसतात. (मूळ धाग्यात उदाहरण दिलेलेच आहे.) दोन्ही रूपे सोडा, हे अपवादात्मक क्रियापद कर्तरिच रूप घेते. लड़का जलेबी लाया है, लड़की हलुआ लायी है ।

पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारच्या बोलीत मात्र फक्त थोडेथोडके अपवाद नाही, सर्वच क्रियापदे भूतकाळातील य-आख्यात कर्तरिप्रयोगात वापरतात.
लड़का जलेबी खाया । लड़की हलुआ खायी ।
मात्र असा वापर प्रमाण हिंदीत विचित्र आणि अयोग्य मानला जातो. या वापरावरून बोलणारा "पूरबिया" असे ओळखता येते.

अजो१२३ Wed, 02/10/2013 - 15:21

In reply to by प्रकाश घाटपांडे

राम कागज लाया | सीता कागज लायी| हे ऐकायला चूक वाटत नाही. राम कागज लायी | सीता कागज लाया| हे चूक आहे.
प्रश्न तो नाही.
देवगुरुजींना राम/सीता ने कागज लाया है। हे म्हटल्यावर ही बडवावेसे वाटायचे का?

प्रकाश घाटपांडे Wed, 02/10/2013 - 21:24

In reply to by अजो१२३

त्यांच्या मते तो हिंदीचा खून होता. बडवल्याशिवाय कसे लक्षात राहणार तुम्ही चूक करता आहात. दया क्षमा शांती तेथे राक्षसांची वसती असे म्हणुन छडीने बडवत असत.

अजो१२३ Thu, 03/10/2013 - 10:57

In reply to by प्रकाश घाटपांडे

रामने/रामाने कागद आणला चे राम ने कागज लाया है। करणे चूक म्हणजे वाईट प्रकार आहे. आत्मग्लानी यायला लागली आहे. :D