Skip to main content

पाऊसगाणी

सूर्य बुडे पायथ्याशी
रंग ओंजळ भरुन
गाव जाता अंधारुनी
येतो सावल्या घेऊन

एका अंगणी पावसाची
होती धून घनधुंद
कुण्या बाहुलीचा होता
वेड्या सुखाचा प्रपंच

त्याने पापांच्या पायाने
तिचे उष्टावले फूल
उंबर्‍यात अनाथ झाले
भोळ्या तुळशीचे मूळ

धुक्यात हरवले घर
पात्रात अडकली नाव
लाज सावराया आला
उभा आंधळाच गाव

उभा काठावर जीव
येई डोहातुनी हाक
एका ईवल्या डोळ्यांची
हले पापणीही मूक

रडुनिया निजे पाखरु
भ्रमित उत्तरांची मिठी
ती शरिर घेऊनी येता
निघे फकिर भरल्या पोटी

दुःख कोवळे पुरताना
ती सोडुन देते वेणी
का स्पर्श कुणाचे येतील
घेऊन भरली पाऊसगाणी?

राजेश घासकडवी Mon, 21/11/2011 - 03:37

प्रतिमांचा वापर चांगला झाला आहे.

कवितेच्या वृत्ताबाबतीत थोडी धरसोड झालेली दिसते. सुरूवात अष्टाक्षरीने झालेली आहे. पण मधूनच वेगळ्या घाटाच्या ओळी येतात. त्याने रसभंग होतो.

हरवलेल्या जहाज… Mon, 21/11/2011 - 11:35

In reply to by राजेश घासकडवी

बरोबर आहे तुमचं म्हणणं. पुढच्या वेळी या सुचनेचा नीट विचार करुनच लिहेन. धन्यवाद

चिंतातुर जंतू Mon, 21/11/2011 - 18:30

ग्रेसचा मोठा प्रभाव जाणवतो.

मंदार Wed, 23/11/2011 - 21:24

वरील दोघांशीही सहमत आहे. इतकी छान सुरूवात वाचून "अरे वा, आणखी एक छंदबद्द कवितेची मेजवानी!" म्हणून सरसावून बसता ताल लागतो न लागतो तोच दुसर्‍याच क्षणाला दाताखाली खडा आल्यासारखं झालं. पुढल्या तीन ओळी पुन्हा मस्त लयीत गेल्यानं म्हटलं चला एखादा डाग चंद्रावरही असायचा, चालायचंच. पुढे खडेच खडे लागत गेल्याने रसच गेला. कंटाळा आला. मग पुढं वाचवलं नाही.
मग छंद-वृत्ताबद्दलच्या अपेक्षा बाजूस ठेवून वाचली. ग्रेस आठवले. पुन्हा पुन्हा वाचली. लाज सावरायला आलेला आंधळा गाव, तुळशीच अनाथ मूळ पासून सगळ्या प्रतिमा आवडल्या! वृत्ताची सांगड बसली असती तर अजून भिडली असती कविता असे वाटून गेले.

पुलेशु. असंच अजून सुंदर काव्य येऊ दे (वृत्ताची घडी नीट बसलेलं) :)