डब्लिनर

डब्लिनर

लेखिका - रुची

गोष्ट नेहमीप्रमाणे एका नदीकाठी सुरू होते. 'लिफी' नदी शहराच्या मधोमध वाहते, शहराच्या दक्षिण - उत्तर दिशांमधली ऐतिहासिक तेढ अधोरेखित करत. तिच्या काठाशी मी अनेकदा थांबलेय; ढगाळ हवेत, उडणारे केस सावरत मी अनेकदा तिच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न केलाय. काय आहे तिच्या पाण्यात असं विशेष? नदीसारखी नदीच, खरंतर गंगा-नाईल वगैरेंच्या तुलनेत नालाच तो! पण आकार हे तिचं वैशिष्ट्य नव्हे. रंगही नव्हे. राजेशाहीपणा तर नव्हेच नव्हे. पण तरीही ह्या नदीच्या पाण्यात एक जादू आहे. सात्त्विकता नाही, पण मादकपणा आहे, रांगडेपणा आहे. गिनीसच्या फेसाळत्या पेल्याप्रमाणे किंचित कडवट, गढूळ, पण अंगाला भिडणारी नशा आहे.

तिच्या पात्रात डोकावून पाहिलं, तर बेकेट कानाशी बोलू लागतो:

"The general appearance of the river flowing between its quays and under its bridges, had not changed. Yes, the river still gave the impression it was flowing in the wrong direction."

भाबडेपणानं मीही नदीच्या पात्रात डोकावून पाहते… जणू त्याचे शब्द पडताळण्यासाठी; आणि त्याच क्षणी आपल्या कृतीतली अर्थहीनता लक्षात येऊन मी स्वत:शीच हसते. शब्दांचे अर्थ शोधायला नदीत कशाला डोकावायला पाहिजे? त्याच्या असामान्य शब्दांपुढे मला माझं खुजेपण जाणवतं, पण तरीही शेजारी लिफीचं वाहणं आश्वासक वाटतं.

अनेक वर्षांपूर्वी पहिल्यांदा ह्या शहरात आले तेव्हा बेकेटची जन्मशताब्दी चालू होती. त्याच वर्षी जॉर्ज बर्नार्ड शॉच्या जन्मालाही १५० वर्षं झाली होती. शहरात सर्वत्र त्यांच्या नाटकाच्या प्रयोगांच्या, चर्चासत्रांच्या जाहिराती लागल्या होत्या. पंढरीत आषाढी वारी पोहोचली होती, टाळ-भजनं ह्यांच्या जयघोषात निघालेल्या दिंडीत मीही नकळत ओढले गेले.

Photo 6
क्राइस्टचर्च

त्या सुरुवातीच्या उत्सुकतेच्या काळात बरीच पायपीट करायचे. अनोळखी रस्त्यांवर निरुद्देश फिरताना अचानक काही ओळखीच्या प्रसिद्ध खुणा सापडायच्या.

"ते ट्रिनिटी कॉलेजच्या समोर..."
"ऑस्कर वाईल्डच्या घराशेजारी..."
"जॉर्ज बर्नाड शॉच्या घराच्या गल्लीत.."
"येट्सच्या पुतळ्यापाशी.."
"डब्लिन रायटर्स म्युझियमच्या कडेने..." असे संवाद. हे सारं मिसळलेलं नेहमीच्या वाणसामानाच्या बाजाराबरोबर, फोटो प्रिंटच्या दुकानाबरोबर, कारच्या गॅरेजबरोबर!

Photo 1
डब्लिन डोअर्स. एका (बहुतेक बनावट) कथेप्रमाणे इंग्लंडचा कुठलातरी राजा (किंवा राणी) मेल्यानंतर तत्कालीन सरकारनं असा फतवा काढला की, शोक व्यक्त करण्यासाठी सगळ्यांनी घराची दारं काळी करावीत. ब्रिटिशांबद्दल आयर्लंडमध्ये फारसं प्रेम नसल्यामुळे लोकांनी तत्परतेनं दारं रंगीबेरंगी करून टाकली. डब्लिनमध्ये सरसकट सगळीकडे जॉर्जियन पद्धतीचं एकसारखं दिसणारं विटांचं बांधकाम असल्यामुळे इमारतीला वैशिष्ट्य आणण्याची जबाबदारी तिच्या दारावर येऊन पडते.

असंच एकदा शॉचं जन्मस्थळ पाहायला धावत पळत पोहोचलो. त्या दिवशीपासून उन्हाळ्यापुरतं त्याचं जन्मस्थळ सर्वांना पाहण्यासाठी उघडणार होतं. वाटलं, मोठी रांग वगैरे असेल, पण तिकडे कोणीच नाही. दारावर लावलेल्या 'शॉचे जन्मस्थळ' अशा पाटीखेरीज इतर काहीच चाहूल नाही. बाजूच्या घरात राहणारे सामान्य कुटुंब, त्यांची बाग, घरासमोरच्या गाड्या वगैरे पाहत अवघडून उभे राहिलो, तर एक बाई धापा टाकत आली. आम्हांला ताटकळत उभे पाहून दिलगिरी व्यक्त करत तिनं आमच्यासाठी दार उघडून दिलं. मग उत्साहानं आम्ही त्या सामान्य जॉर्जियन घरात, शॉच्या असामान्यतेच्या खुणा शोधायला लागलो. माणूस कुठे जन्मला, तो लहान असताना त्याच्या खोलीच्या खिडकीतून त्याला काय दृश्य दिसायचं किंवा त्याच्या लहानपणी तो भावंडांबरोबर कुठे खेळायचा, ह्याचा त्याच्या विनोदबुद्धीशी, त्याच्या चातुर्याशी आणि त्याच्या एकंदरीत कर्तृत्वाशी नसलेला संबंध तपासताना त्यातल्या निरर्थकतेचं हसू येत होतंच, पण तरीही 'आपलेही पाय पंढरीला लागले' ह्यातला रोमांच अनुभवायला मनातला वारकरी आसुसलेलाच होता.

त्यानंतर दोनच आठवड्यांनी समजलं की, आपलं नवीन कार्यस्थळ शॉच्या घराच्या पुढच्याच गल्लीत आहे. त्यानंतर अनेक वर्षं जवळजवळ दररोज जेवणाच्या सुट्टीत त्याच्या घराजवळून जायचे, पण तरीही एकटी असले तर त्याचं एक वाक्य हमखास आठवायचं:

"It took me years of self-restraint and natural decay of my faculties for British society to accept me as a serious person!"

डब्लिनमधे जितकी अधिक रुळले, तितकं त्या वाक्यानं मला अधिकच हसू यायचं. खास आयरिश शैलीत काढलेलं ब्रिटीश सोसायटीचं सार आहे ते वाक्य! उभं आयुष्य इंग्लंडात घालवून, तिथेच नावारूपाला आलेल्या ह्या आयरिश लेखक-कवींच्या त्या देशाबद्दलच्या भावना वाचून मला नेहमीच मौज वाटते, पण त्या एकूणच अवघडलेल्या नात्याचा इतिहास आणि त्यातल्या खाचाखोचा समजल्यानं त्याचं आश्चर्य मात्र मुळीच वाटत नाही. अशी ही इमारतीसारखी इमारत; तिच्या गळ्यात मिरवत असलेल्या 'शॉचे जन्मस्थळ' ह्या बिरुदामुळे मला काही क्षणांसाठी थांबवायची आणि 'अजून हे हे वाचायचं राहिलंय' अशी आठवण द्यायची.

ऑस्कर वाइल्डच्या घराची खूणही शहराच्या मध्यवर्ती 'मेरियन स्क्वेअर'पाशी आहे. नेहेमीचा येण्याजाण्याचा रस्ता, पण तरीही प्रत्येक वेळी तिथं थोडं थबकायला व्हायचं. अॅबी थिएटरमधे बसून 'इंपॉर्टन्स ऑफ बिइंग अर्नेस्ट' पाहण्याचा अनुभव असो, किंवा स्टीफन्स ग्रीन उद्यानात 'पोर्ट्रेट ऑफ डॉरियन ग्रे' वाचणं असो, त्यातला रोमांच अनुभवताना आयुष्यानं आपल्याला नुसतंच तर्ककठोर आणि रुक्ष न बनवता थोडं भावनिक कवित्व दिलं आहे, ह्याबद्दल कृतज्ञता वाटायची.

Photo 2
ट्रिनिटी कॉलेज

माझ्या निर्वाहाच्या, निवासाच्या, विसाव्याच्या ठिकाणाजवळची ही चिन्हं इथल्या समृद्ध इतिहासाची साक्ष देणारी! खरंतर आयर्लंडच्या बाबतीत 'समृद्ध इतिहास' असं लिहितानाच थोडं खटकायला होतं. इथला इतिहास ढोबळपणे दारिद्र्याचा, वंशवादाचा, धार्मिकतेचा, असंतोषाचा… पण ह्याच इतिहासाच्या मागे 'साहित्यिक' असे शब्द लावले की ही गणितं साफ बदलून जातात. इथला साहित्यिक इतिहास सुरू होतो तो ट्रिनिटी कॉलेजमध्ये जपून ठेवलेल्या 'बुक ऑफ केल्स'पासून! ट्रिनिटी कॉलेजपाशी नेहमी भटकायचे, पण तिथे पहिल्यांदा प्रवेश केला तो फार नंतर. इथे राहून ट्रिनिटी कॉलेजमध्ये न जाणं म्हणजे रोममध्ये राहून व्हॅटिकनला भेट न देण्यासारखं आहे. वाइल्ड, जॉईस, बेकेट वगैरेंची परंपरा सांगणारी होली ट्रिनिटीच ती! तिथलं चारशे वर्षं जुनं वाचनालय आणि आठव्या शतकात बनलेलं 'बुक ऑफ केल्स' वगैरे पाहिलं किंवा डब्लिन रायटर्स म्युझियमला भेट दिली, की ह्या गोष्टींना केवळ ऐतिहासिक मूल्य म्हणूनच महत्त्व नाही, तर त्यांतून इथल्या वर्तमानाकडे पाहण्याचा एक अधिक भरीव दृष्टीकोन मिळतो हे उमगायचं. ह्या मातीत इतक्या मोठ्या प्रमाणात असामान्य साहित्य निर्माण होण्यामागे योगायोग नव्हे, तर एक प्रकारचा साहित्यिक रेनेसान्स होता, हे जाणवायचं.

त्याचबरोबर ह्याचीही जाणीव तीव्रतेनं व्हायची की, हे जे साहित्य जागतिक नकाशावर मानाच्या जागा पटकावून बसलं आहे, ते सारं इंग्रजीत आहे. कुठे गेली ती आयरिश भाषा? त्या भाषेत असं समृद्ध साहित्य का नाही निर्माण झालं? ते झालं असतं, तर ते माझ्यापर्यंत पोहोचलं असतं का? 'ईस्टर अपरायजिंग'नंतर आयरिश भाषेच्या पुनरुज्जीवनाचे अनेक प्रयत्न झाले… आताही प्रत्येक शाळेतून ती भाषा सक्तीनं शिकवली जाते, पण तरी ती मृत का बनत चालली आहे? राष्ट्रीयत्वाची भावना, सांस्कृतिक इतिहासाचं जतन वगैरे शब्द, धार्मिकता, वगैरेंमुळे जॉईससारख्यांना आयर्लंडमधून बाहेर ढकलण्याशिवाय नक्की काय निष्पन्न झालं? आयर्लंडमधून उद्वेगानं बाहेर पडलेले हे लेखक डब्लिनच्या गोष्टी लिहीत आयुष्यभर बाहेर राहिले आणि नावारूपालाही आले. पण आयरिश भाषा मात्र स्वातंत्र्यानंतरही मृतावस्थेकडेच जात राहिली… पण श्शू… असे म्हणू नये. मृतावस्था हा फार वाईट शब्द आहे!

इथे मला त्यांच्या आणि आपल्या सांस्कृतिक इतिहासातलं साम्य, वसाहतवादाच्या जखमा, राष्ट्रीयत्वाच्या भावनांचं राजकारण, त्यातून तयार झालेले साहित्यिकांतले तट, स्वातंत्र्यासाठीची रक्तरंजित क्रांती… वगैरेतली साम्यस्थळं दिसायला लागतात. 'स्टीफन्स ग्रीन' उद्यानात येट्सच्या पुतळ्याशेजारीच उभारलेला रवींद्रनाथांचा पुतळा पाहिला, की हे 'कलोनियल कझिन्स' म्हणून तयार झालेलं नातं किती जुनं आहे हे अधोरेखित व्हायचं.

येट्सच्या कवितांपैकी एक कविता त्यातल्या शब्दांमुळे फार लक्षात राहिलीय:
"I am of Ireland, And the Holy Land of Ireland,
And time runs on," cried she.
"Come out of charity, Come dance with me in Ireland."

त्याची प्रेयसी, तिची राष्ट्रीय अस्मिता, त्यांची अपूर्ण आणि असफल प्रेमकहाणी ह्यांपलीकडे जाऊन ही कविता ह्या विस्थापित साहित्यिकांची आपल्या देशातल्या राष्ट्रीय अस्मितांकडे पाहण्याची एक अवघडलेली भावना दाखवते.

Come dance with me in Ireland… ही ओठावर रेंगाळणारी ओळ मात्र मी माझ्याच रंगात रंगवत जाते... ह्या ओळीबरोबर मी कोणाच्या तरी गच्चीवरून पाहिलेल्या 'सेंट पेट्रिक्स डे'च्या परेडमध्ये सामील होते, फिडल्स वाजायला लागतात, नाचणारी मुलं आठवतात, झोंबणार्‍या वार्‍याबरोबर स्ट्यूचा गंध पसरतो आणि हिरव्या रंगाच्या असंख्य छटा डोळ्यांसमोर नाचतात…

"Be advised my passport is green.
No glass of ours was ever raised to toast the queen."

शेमस् हिनी. अजून एक आयरिश कवी, अजून एक नोबेल विजेता. हा प्रेमकवी नव्हे… ह्याच्या कविता दुष्काळाच्या, रक्तपाताच्या, हिरव्यागार देशाच्या, लालभडक इतिहासाच्या. अलीकडेच शेमस् हिनी गेल्याचं कळलं, हृदयात थोडी कालवाकालव झाली. त्याच्या फार कविता वाचल्या नव्हत्या. त्या आता वाचल्या आणि डब्लिनच्या आठवणींवर आणखी एक काव्यात्मक आवरण चढलं.

डब्लिनच्या मधोमध लिफीच्या प्रवाहावर एक भळभळती जखम आहे; अश्वत्थाम्याच्या चिरंतन जखमेसारखी जळजळती! 'हापेनी ब्रिज'च्या रूपानं ती जखम शहराची श्रीमंत दक्षिण दिशा ही गरीब उत्तरेला जोडते. ब्रिटिशांच्या काळात उत्तरेकडून दक्षिणेकडे जायला हा एकच पूल होता आणि तो ओलांडायला अर्ध्या पेनीचा कर होता. उत्तरेकडच्या कष्टकरी लोकांना कामासाठी दक्षिणेला येता तर यावे, पण तरी शहराचा दरिद्री भाग उच्चभ्रू भागापासून दूर राहावा अशी खास ब्रिटिश पद्धत! आजही ह्या ब्रिजच्या अलीकडचं आणि पलीकडचं डब्लिन ह्यांत कमालीचं अंतर आहे.

Photo 5
हापेनी ब्रिज. हा १८१६ साली बांधला गेला. सुरुवातीला काही वर्षं त्यावरून जाण्यासाठी अर्धा पेनी टोल द्यावा लागत असे.

सगळी मातब्बर साहित्यिक मंडळी सर्वसाधारणपणे दक्षिणेकडची, पण उत्तरेकडचा 'शॉन ओ केसी' त्याच्या कष्टकरी उत्तरेच्या दरिद्री पार्श्वभूमीवर उठून दिसतो. त्याच्या नाटकातली पात्रं आयरिश-इंग्रजी बोलतात, दारिद्र्य-व्यसनाधीनतेशी झगडतात, कट्टर कॅथलिक धार्मिकतेला शरण जातात, जिंकतात... पण बरेचदा हरतात; आयरिश रांगडेपणानं आपली हार स्वीकारतात... पुन्हा गाणी गातात.

Photo 3
प्रसिद्ध आयरिश नाटककार शॉन ओ केसीचं जन्मघर

अॅबी थिएटरला 'जूनो अँड् द पेकॉक्' पहायला गेलो होतो, समोर दस्तुरखुद्द केरॉन हाइंड्स आणि शनेड कुसॅक 'पेकॉक्' आणि 'जूनो' बनून उभे होते. व्यसनी, आळशी, पण दिलखुश पेकॉक्, त्याची कष्टाळू बायको जूनो, त्यांचा आय.आर.ए.च्या तावडीत सापडलेला आणि अपंग झालेला मुलगा, तरुण स्वप्नाळू… आणि लग्नाआधी गरोदर झालेली मुलगी ह्यांची गोष्ट! कधी न पाहिलेलं ऐश्वर्य मिळाल्यावर जमिनीवरचे पाय सुटणारा अठरा-विसवे दारिद्र्य असलेल्या माणसांचा भाबडेपणा, हिंसा, कॅथलिक व्यवस्थेपुढे शरण गेलेला समाज… कोणताही अभिनिवेश न आणता, साध्या वाटणार्‍या गोष्टींतून किती प्रभावी भाष्य केलंय केसीनं! नाटकाच्या शेवटापर्यंत डब्लिनच्या अप्रिय इतिहासाच्या तुकड्याबरोबर शॉन ओ केसीचं मापदेखील माझ्या पदरात पडलं होतं.

त्याचं उत्तरेकडचं घर पाहायला एकदा गेलो होतो; जुन्यापुराण्या पडायला आलेल्या कळकट इमारतीवर केलेल्या ग्रॅफिटीखेरीज काहीच दिसलं नाही. लेखकांच्या घरांचं स्मारक बनवायला सरकारकडचे पैसे संपले होते. 'जूनो आणि पेकॉक्' गेल्या दशकात पुन्हा घडलं. आर्थिक भरभराटीनं अनेक पाय जमिनीवरून उचलले गेले, माणसं बदलली, मूल्यं बदलली, अजून न मिळालेली संपत्ती उपभोगताना अनेकांचा तोल सुटला. संपत्ती नाहीच मिळाली, पण कर्जबाजारीपणा मात्र नशिबी आला. व्यसनाधीनता आधी आणि नंतर होती तशीच राहिली. पण तरी हा रांगडा समाज पुन्हा गात उभा राहील, टेम्पल बारमध्ये कोणीतरी फिडल्स वाजवायला सुरुवात केली की पुन्हा गाण्यांतून गोष्टी सांगितल्या जातील, नदीच्या दोन्ही तीरांवरची पब्लिक हाऊसेस् पुन्हा नक्की गजबजतील.

जॉईसच्या 'युलिसिस' कादंबरीतल्या पात्रांचे पाय असेच लिफीच्या दोन्ही तीरांवर घुटमळत रहातात. दर वर्षी 'ब्लूम्स डे'ला अनेक उत्साही युलिसिसप्रेमी 'लेपॉल्ड ब्लूम्' आणि 'स्टीफन डीडलस्'च्या पाऊलखुणा शोधत त्याच रस्त्यांवरून पायपीट करतात. मीही तो नकाशा फार काळजीपूर्वक वाचण्याचा प्रयत्न केलाय; ती स्थळं, ती नदीच्या कोणत्या तीरांवर आहेत ह्यामागची सांकेतिकता तपासून पाहायचा प्रयत्न केलाय. पण हा गडी सहजासहजी हाताला काहीच लागू देत नाही. त्याची पुस्तकं वाचताना फार हताश व्हायला होतं. कोणीतरी आपल्याला येत असलेल्या भाषेत बोलतंय, पण आपल्यापर्यंत त्यांचं बोलणं नीट पोहोचत नाहीय, असंच वाटत राहतं. माझी चिडचिड मी मनातल्या मनात जॉईसला शिव्या देत काढत राहते: "कोण समजतोस तरी तू कोण स्वत:ला? तू भलीमोठी सात-आठशे पानांची कोडी लिहायचीस, पिढ्यान् पिढ्या आम्ही ती सोडवत बसायची आणि तू गंमत पाहणार थडग्यामागून! मोठ्ठा इगो कुरवाळला जात असेल ना तुझा!" एक ना दोन. पण तरी चिवटपणे मी ते पुस्तक काही सोडत नाही आणि तो थडग्यामागून मिश्कीलपणे हसतोय, ही भावना काही पुसली जात नाही.

Photo 4
'युलिसिस' ह्या जेम्स जॉईसच्या कादंबरीचं कथानक डब्लिनमध्ये १६ जून १९०४ ह्या तारखेला घडतं. रशियन कादंबरीकार (आणि नंतर इंग्रजीचा प्राध्यापक) व्लादिमिर नाबोकोव ह्याची ही आवडती कादंबरी. कॉर्नेल विद्यापीठात त्यानं चालवलेल्या इंग्रजी साहित्यावरच्या कोर्समध्ये ती तो आवर्जून शिकवत असे. कादंबरीतलं कोणतं पात्र केव्हा कुठे जातं, ह्याचा हिशेब ठेवण्यासाठी नाबोकोवनं चितारलेला डब्लिनचा नकाशा.

'डब्लिनर'मध्ये मात्र मला ही कोडी सुटतात. अचानक सोपा पेपर निघावा, आणि सामान्य बुद्धिमत्तेच्या मुलालाही पहिला वर्ग मिळावा आणि त्यानं हुरळून जावं, तसंच काहीसं. पण डब्लिनरमधली काही माणसं मला भेटली आहेत, काही माझी आपली झाली आहेत, काहींची पूर्वीची ओळख निघाली आहे. एवढ्याश्या पुस्तकात डब्लिनच्या रंगीत दारांमागची कितीतरी माणसं भरली आहेत. त्यांच्याकडे पाहताना, त्यांच्या गोष्टी सांगताना जॉईस तटस्थ राहतो. त्यांचा निवाडा करत नाही आणि त्यांच्या भावविश्वाच्या जवळ जाताना भावुकही होत नाही... तरीही 'द डेड्'मध्ये मला तो माणूस म्हणून भेटतो. त्याचं त्याच्या 'फादरलँड'बरोबर असलेलं अवघडलेलं नातं भेटतं, त्याचा भ्रमनिरास कळतो, त्याचा उद्वेग कळतो, पण त्याचबरोबर त्याचं अपरिहार्य प्रेमही कळतं. डब्लिनरमध्ये मला भेटत नाही ती फक्त माझी गोष्ट; माझ्या स्थलांतराची, माझ्या डब्लिनची गोष्ट. त्याच्या काळात फक्त आयर्लंडबाहेर जाणारे रस्ते गजबजलेले असायचे. आत येणार्‍या वाटा भरायला लागल्या, तिथून माझी गोष्ट सुरू झाली; माझ्यासारख्यांची गोष्ट सुरू झाली. मला नेहमी प्रश्न पडतो: कशी लिहिली असती त्यानं माझी गोष्ट? पाहुणं म्हणून आलेल्या आणि ह्या देशाच्या प्रेमात पडून, परत जाताना विव्हळ झालेल्या हळवेपणाची गोष्ट कशी लिहिली असती त्यानं? माझ्या भावुकतेचा निवाडा केला असता? माझ्या भाबडेपणाची हेटाळणी केली असती? माझ्यातल्या विसंगती दाखवल्या असत्या की सहानुभूतीनं त्यानं माझं प्रेम स्वीकारलं असतं?
मला त्याचं प्रेम समजतं:
"I will not serve that in which I no longer believe, whether it call itself my home, my fatherland, or my church: and I will try to express myself in some mode of life or art as freely as I can and as wholly as I can, using for my defence the only arms I allow myself to use — silence, exile and cunning."

असं तो म्हणतानाही मला ते दिसतं. स्वत:च्या मुळांवर प्रेम करत असले, तरी त्याच्या कठीण इतिहासाकडे पाहिल्याशिवाय आणि त्यातल्या उद्वेगाचा स्वीकार केल्याशिवाय पूर्ण व्यक्तच न होऊ शकणारं प्रेम. माझं प्रेम मात्र वेगळंच आहे; ते आहे सोळाव्या वर्षी पहिल्यांदाच प्रेमात पडलेल्या प्रेमिकेचं! एखाद्याच्या दोषांकडे पाहूनही त्याच्यावर भाळलेल्या, त्याच्याकडे आकर्षित झालेल्या अल्लड मुलीचं थोडं उथळ, पण मनस्वी प्रेम आहे ते! हे प्रेम केसांत माळून मी लिफीच्या काठावर अनेकदा उभी राहिलेय, होथचा शिरजोर समुद्री वारा माझ्या कानांत शिरताना प्रेमळ शब्द पुटपुटून गेलाय, विकालोच्या टेकड्यांवरचा हिरवा रंग माझ्या हातांवर एक शब्द कायमचा गोंदून गेलाय… डब्लिनर!

हाऊथ पायर Photo 7
सॅम्युएल बेकेट ब्रिज न्यू ग्रेंज (नदी: बॉईन)
field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

बाकी प्रतिक्रिया फुरसतीत देते; सध्या फोटोंचा लुत्फ लुटत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

डब्लीन मधे रुचीला, रुची गवसली!!!!

सुरेख लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही एक छान सफर घडवून आणलित Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Observer is the observed

अहाहा! सुंदर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सुंदर लेख!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम लेखन... लेखासोबत वाहत जाणं आनंददायक!
आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

डब्लिनबद्दल बोलता बोलता लेखक आणि वाचक एकदम आयरिश साहित्यात हरवून जातो, पण लेख जरा लांबला असता तरी चालला असता, एका-एका साहित्यिकावर एक लेखांक यावा एवढा मुद्देमाल आहे. बघा जमलं तर प्रयत्न करुन बघा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप सुंदर लेख. संपायला नको होता असं वाटलं शेवटी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

लेख आवडला. डब्लिन मध्ये घडणारी गोष्ट असलेल्या 'वन्स' चित्रपटाची आठवण झाली-त्यातही काव्य भरपूर आहे जसे ह्या लेखात जाणवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरेख!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0