Skip to main content

श्री गणेशा - मराठी मेनू

नमस्कार मंडळी,
एक 'चमत्कृती' घेऊन दाखल होत आहे 'ऐसी अक्षरे' च्या टीम मध्ये. सुरवात गोडानेच करावी हा प्रघात मोडून जरा झणझणीत मेनू घेऊन आले आहे.
असो, तर आज ख़ास मराठमोळा मेनू घेउन प्रत्यक्ष सहभागी व्हायचं ठरवलं.

सुरवात वांग्याच्या भाजी ने करू.

वांग्याची भाजी : साहित्य -
५-६ हिरवी वांगी,
लसुण ५-६ पाकळ्या (अगदी मोठ्या असतील तर ३-४) ,
कोथिम्बिर १/२ वाटी बारीक़ चिरून,
दाण्याच कूट १ वाटी
चवीनुसार जिरे पूड, धणे पूड, तिखट, मिठ, फोडणीसाठी तेल, जीरे, मोहरी, हिंग, हळद, कडीपत्ता

वांग्याच्या मध्यम आकाराच्या फोड़ी करून पाण्यात ठेवा. कढईत तेल घेउन अगदी कडकडीत तापले की त्यात मोहरी, जीरे, हिंग, आणि कडीपत्ता घालून मस्त चरचरीत फोडणी करा.
आता या फोडणीमधे ठेचलेला लसुण आणि १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिम्बिर घाला. लसुण चांगला तळला गेला पाहिजे. थोड़ी हळद घाला. फोडणीतच थोडं तिखट घाला त्यामुले भाजीला चांगला लाल रंग येतो. नंतर यात दाण्याच कूट घालून थोडा वेळ परता.
आता वांग्याच्या फोड़ी भाजलेल्या कुटात घालून थोडा वेळ परता. नंतर आपल्याला झेपेल त्या प्रमाणात तिखट, चवीनुसार मीठ, जिरे पूड, धणे पूड घाला.
राहिलेली कोथिम्बिर घालून सगळे एकदा नीट मिसळून घ्या.
साधारण सगळी भाजी बूड़ेल इतपत पाणी घालून झाकण लावून शिजू दया. १० एक मिनिटानी भाजीचा अंदाज घ्या. भाजी अजुन शिजली नसेल तर आणखी पाणी घालून शिजू दया. जास्त शिजली आहे असे वाटत असल्यास झाकण काढून थोडा वेळ मोठ्या आचेवर पाणी आटवून घ्या. (मी अशीच ट्रायल एंड एरर करून भाजी शिजवते ;) आणि ही प्रोसेस बराच वेळ चालू राहिली तर वांग्याची पेस्ट खायला लागते...स्वानुभवावारून :P)
आणि सर्व काही व्यवस्थित जमुन आले असेल तर थोड्या वेळात भाजीचा वासच सांगतो, 'I am ready'. की मग गॅस बंद करायचा.

Vangyachi Bhaji

आता काय मस्त गरम गरम भाकरी बरोबर चापायाची भाजी..वाट कशाची बघता राव ! थांबा, थांबा, एवढ्यावर कसं भागेल? खरडा नको का याच्याबरोबर?
५ मिनिटांच काम,.... आता एवढं केलं तर खरडा रहायला नको.
१०-१२ कोवळया हिरव्यागार मिरच्या,
लसुण २-३ पाकळ्या, जीरे, मीठ, तेल
तापलेल्या तव्यावर तेल टाकुन त्यावर मिरच्या अणि लसुण पाकळ्या परतून घ्या (मिरच्या अगदी चांगल्या भाजल्या गेल्या पाहिजेत). मिक्सर मधे या भाजलेल्या मिरच्या, लसुण, जीरे, अणि मीठ घालून चांगले बारीक़ वाटुन घ्या. घ्या झाला खरडा तयार, सांगितलं नव्हतं का ५ मिनिटाचं काम आहे म्हणुन, मग ? हाय काय अन नाय काय! (तिखट पणा कमी करायचा असेल तर थोडं दान्याचं कूट घाला. आणि ज्याना झेपतो त्यानी तसाच हदडा.)
एवढा सगळा झ ण झ णी त मेनू , त्याला काही तरी उतारा पाहिजे की, लगेच वाटी भरून दही काढून ठेवा ताटात. आणि, आता आणि काय राहिलं म्हणाल, ग्लास भर थंडगार ताक थोडं जीरे मीठ टाकुन घ्या. (आवडत असेल तर) जोडीला भाजलेले शेंगदाणे असू द्यात तेवढीच मजा वाढते !!!

Pic1

Pic2

आता म्हणाल ही बया खाऊ देणार आहे की नुसतच आपलं हे करा ते करा सांगत बसणार आहे, तेंव्हा आता काही हयगय न करता, पुढचा मागचा काही विचार न करता, सरळ ताव मारायला सुरु करा.

आता हे सगळ खावुन आत्मा (पोटाचा) असा काही तृप्त होतो की ज्याचं नाव ते!

जय महाराष्ट्र !

आवड/नावड

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 25/10/2011 - 01:42

सुरवात गोडानेच करावी हा प्रघात मोडून जरा झणझणीत मेनू घेऊन आले आहे.

मग तर एक नंबर आवडली पाकृ :-)

एक प्रश्न आहे, वांग्याच्या फोडी पाण्यात का घालायच्या?
फोटो झकास आहेत. त्यावरून माझा अंदाज की तुम्ही छोटी वांगी वापरली आहेत. घरापासून चालत्/सायकलने जाण्याच्या अंतरावर असलेल्या दुकानात मोठी, भरताची वांगीच मिळतात. त्याची या प्रकारे भाजी केली तर कशी लागतील काही अंदाज?

भाजी करून पहातेच; फक्त तिखटाचं आणि माझं वाकडं आहे, तर मी त्याला लांबूनच नमस्कार करेन.

आणि ही प्रोसेस बराच वेळ चालू राहिली तर वांग्याची पेस्ट खायला लागते...स्वानुभवावारून :P)

मग तर हाथ मिलाओच. चुकत माकत मी पण बर्‍याच गोष्टी बनवायला आता शिकले आहे. पोळीचा पापड करणं बर्‍याच लोकांना जमतं; पण लिटरभर दूध करपून पातेल्याचाही कोळसा बनवत "कोण मेलं घरी वांगं भाजतंय" इथपासून ते "जरा लक्ष द्या की स्वयंपाकघरात" अशा दुष्ट कॉमेंट्स इतरांवरच करणं, घावन एकसंध न निघाल्यामुळे त्यांची "भुरजी" बनवणं, टोमॅटॉ ऑमलेटचं टोमॅटो पिठलं बनवणं वगैरे प्रकारही झाले आहेत. पण नाक वर करून "मला हेच तर बनवायचं होतं", भाजी किंवा काही पातेल्याला लागलं तर "कसा खरपूस स्वाद आलाय पहा" वगैरे वाक्य टाकणं सगळ्यांना जमतं असं नाही.

(स्वयंघोषित अन्नपूर्णा ओगले) अदिती

गणपा Tue, 25/10/2011 - 15:02

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

एक प्रश्न आहे, वांग्याच्या फोडी पाण्यात का घालायच्या?

कापलेली वांगी लवकर काळी पडतात. म्हणुन फोडी पाण्यात ठेवायच्या.
- (किंचीत शेफ आरलेला) गणा

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 25/10/2011 - 21:37

In reply to by गणपा

हां, हे लक्षात आलं नाही. वांग्यातलं लोह हवेच्या संपर्काने ऑक्सिडाईज होऊन वांगं काळं दिसतं. पाण्यात टाकल्यास ऑक्सिजनशी संपर्क येणार नाही म्हणून पाणी. पण मग पाण्यात विरघळणारी पोषणमूल्य कमी होतील ना?
त्यापेक्षा एकेक वांगं चिरून लगेच पातेल्यात असं केलं तर?

किंचीत शेफ आरलेला

हा हा हा हा

Nile Tue, 25/10/2011 - 02:11

In reply to by शहराजाद

तसं वांग्याचं भरीत सोडून आपण काय खात नाही. पण चित्र पाहून मात्र खाण्याची इच्छा निर्माण झाली. इथं हाफिसात टॅकोवर जगताना जास्तच यातना झाल्या! ;-)

बिपिन कार्यकर्ते Tue, 25/10/2011 - 22:25

In reply to by Nile

मेल्या नायल्या मग आता तुला या विकांताला जवळपास कुठे चालत अथवा सायकलवर जाऊन यायच्या अंतरात कोणत्या दुकानात असली वांगी कुठे मिळतात हे शोधणं आलं की रे! तुमच्या इथे एखादे अफगाणी दुकान नाही का? तिथे चिकनमधे मुरवलेली वांगी चांगली मिळतात बघ!

क्षिप्रा Tue, 25/10/2011 - 09:35

भाजी खल्लास दिसते आहे. तिखटावर विशेष प्रेम असल्याने खूपच आवडली आहे. मला हे असं प्रायोगिक किचन खूप आवडतं. विशेषतः उगाचच खूप काटेकोर मोजमाप नसलेलं.
अजुनही प्रयोग येऊ देत!

गणपा Tue, 25/10/2011 - 14:52

शेवटचे दोन्ही फोटु कातील आहेत.
मस्त ज्वारी/बाजरीची भाकरी, झणझणीत वांग्याचा रस्सा तो झणझणीत पणा कमी वाटावा असा हिरवाकंच ठेचा/खरडा, सोबतील कांदा आणि थंडगार मठ्ठा/ताक.
वाह !!! काय बेत आहे.
बाकी त्या दह्या ऐवजी एक लिंबूची फोड चालेल मला ;)

पालवी Tue, 25/10/2011 - 22:26

धन्यवाद लोक्स, प्रतीक्रियांसाठी आणि पुढच्या प्रयोगासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल.

अदिती- बरोबर, वांगी काळी पडतात म्हणून पण्यात टाकायची. आता गणपा शेफ नि सांगितल्यावर मी आणखी काय सांगणार.
बाकी एक एक वांगी चिरून पातेल्यात घालण्याची आयडिया भारी !! :)