अलीकडे काय पाहिलंत - ११
यातला आधीच्या भागात १००+ प्रतिसाद झाल्याने हा नवीन भाग.
याआधीचे भाग :१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ । ९ | १०
याच महिन्यात आलेला, विकास बहल दिग्दर्शित, कंगना रानावतची प्रमुख भूमिका असलेला, "क्वीन".
काही मित्रमैत्रिणींनी याबद्दल सांगितलं होतं. यावेळी संधी न दवडतां सिनेमा पाहिला. सल्ला दिलेल्या मित्रमैत्रिणींचा आभारी आहे.
----------स्पॉईलर अलर्ट : चित्रपटकथेचा काही भाग इथे येतो. चित्रपट पाहू इच्छिणार्यांनी हा भाग वाचू नये. ---------
चित्रपटाचा जीव म्हण्टला तर खूप लहान आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी नाकारलेली गेलेली मुलगी "रानी" आपल्या, आधीच ठरलेल्या "हनिमूनला" - पण एकटीच - जाते. नव्या देशात, नव्या अनुभवांमधून तिचा जणू पुनर्जन्म होतो. तिच्या या आनंदयात्रेचा हा सिनेमा.
----------स्पॉईलर अलर्ट समाप्त. ---------
चित्रपटाला एका परीकथेचं अंग आहे असं वाटतं. इथे परीकथा म्हणाजे चमत्कार किंवा नेत्रदीपक व्हिज्युअल्स असं काहीही नाही. तर एखाद्या गावातल्या मुलीला अशी सफर एकटीला करायला मिळावी, आणि तिच्यातून सुरवंटाचं फुलपाखरू व्हायला मिळावं हीच एक परीकथा आहे - किमान भारतातल्या संदर्भांत. सुरवंटाचं फुलपाखरू होणं हा म्हण्टला तरी क्लीशेच. त्यामुळे अशा परीकथेला नको तितकं निरागस आणि गोग्गोड होण्याचा धोका असतो. तो इथे निश्चितच टाळला आहे. रानीला भेटलेले लोक, त्यांची आयुष्यं, त्यांचे दृष्टीकोन या सार्यामधे जिवंतपणा, रसरशीत आणि ताजेपणा जाणवतो.
चित्रपटातला विनोद हे त्याचं मोठं बलस्थान आहे. अचकट विनोद, "आयटम साँग", सेक्स कॉमेडी यांची भेळ म्हणजे एकंदर आजकालचा बॉलीवूडचा कॉमेडीचा फ्लेवर दिसतो. "क्वीन"मधला विनोद यापासून फारकत घेतलेला, हलकाफुलका आणि तरीही मनमुराद हसवणारा आहे. खरं सांगायचं तर सटल् असणार्या या विनोदीपटाने बॉक्स ऑफिसवर चांगल्यापैकी पैसे कमवावेत हेदेखील एक सुखद आश्चर्य. (अर्थातच हा काही "पाचशे कोटी पायजेतच" अशी प्रतिज्ञा वहाणारा बूम आणि धूमपट नव्हे हेदेखील नमूद केलेले बरे. तसे चित्रपट खानावळीच्या ग्राहकांकरता लखलाभ.)
चित्रपटाचं आशयसूत्र म्हण्टलं तर बरंच लहान असताना, व्यक्तिरेखांना आकार नि जिवंतपणा आणणं हे जे अभिप्रेत असतं ते इथे आलं आहे. "आणि ते सुखाने नि आनंदाने एकत्र नांदू लागले" या टीप्पीकल स्टिरिओटाईपला गेल्या पांच दहा वर्षांत बर्यापैकी धक्के बसलेले आहेतच. "क्वीन" याही बाबत आनंददायक.
याआधीच्या काळात हिंदी सिनेमात परदेशचित्रण म्हणजे यश चोप्रा प्रणित तोकड्या कपड्यांतल्या नायिकांना स्विस पर्वतराजीत नायकाबरोबर गाणे गातानाचा दिखाऊपणा असं समीकरण होतं. (चोप्रांचा हा फॉर्मुला गेल्या पंचवीस वर्षांत इतरानीही उचलून पुनःपुन्हा वापरलाच.) त्यामुळे परदेशचित्रण ही जी डोकेदुखी वाटायला लागली होती त्यालाही हा सिनेमा पूर्णपणे तडा देतो. पॅरीस व अॅमस्टरडॅमचं चित्रण "हे पहा पॉश एरिया" असं न येता चित्रपटाला साजेशा नैसर्गिकपणे येतं.
कंगना रानावतचे सिनेमे मी या आधी पाहिले होते आणि तिचं काम नेहमी चांगलं होत असलं तरी एकदंर चित्रपट मला तोकडे वाटले होते. ("फॅशन" सकट. "फॅशन" चांगला होता. पण नाही म्हण्टलं तरी मधुरभांडारकरी फॉर्म्युलाईकच.) या चित्रपटात मात्र बाईंनी भारी काम केलंय आणि जरादेखील दिखाऊपणा नसल्याने कोंदणही सुरेख जमून आलेलं आहे.
असो. सिनेमा आवडला. जमल्यास इतरांनीही पहावा.
"क्वीन"च्या निमित्ताने सुचलेली तुलना/आलेले विचार
काही महिन्यांपूर्वी मी "इंग्लिश विंग्लिश" हा सिनेमा पाहिलेला होता. कदाचित त्याची ऐसीअक्षरेवर कुठेतरी चर्चा झाली असावी.
"इंग्लिश विंग्लिश" आणि "क्वीन" यांच्यात साम्य शोधणं तसं सोपं आहे. दोन्ही चित्रपटांचा विषय भारतीय स्त्रीसंदर्भातला आहे. दोन्ही चित्रपट नायिकाप्रधान. एका ढोबळ अर्थाने भारतीय समाजव्यवस्थेच्या बंधनांपलिकडे जाऊ पाहणार्या मध्यमवर्गीय स्त्रियांची कहाणी ते रेखाटतात. दोन्ही चित्रपटांची सामाजिक पार्श्वभूमी मध्यमवर्गाची आहे. दोन्ही चित्रपटांमधला विनोद हलकाफुलका आहे. दोन्हींमधे परदेश-वास्तव्य आणि/किंवा परदेशातल्या व्यक्तींशी संपर्क यांतून नायिकेच्या जीवनात काहीतरी नवं फुलतं असा भाग. मी म्हण्टल्याप्रमाणे, दोन्हींमधे साम्य शोधणं तसं सोपं आहे.
मात्र "क्वीन" मधल्या नायिकेचं मानसिक द्वंद्व आणि तिची यात्रा/अंतर्यात्रा "लग्न" या संस्थेच्या संदर्भातला आहे तर "इंग्लिश विंग्लिश" मधली शशी "कुटुंब" या संस्थेच्या घुसमटीतून मोकळा श्वास घेऊ पहाते. दोन्ही सिनेमांमधे नायिकांच्या आयुष्यातल्या पुरुषांना नायिकांच्या "मूल्याची" जाणीव होते. परंतु "क्वीन"मधे ती त्या पुरुषाला नाकारते. मात्र "इंग्लिश विंगिश" मधली शशी मूकपणे त्याला माफ करते.
थोडक्यात, अन्यायकारक वाटाव्या अशा लग्नसंस्थेला धुत्कारायला मेनस्ट्रीम सिनेमा तयार होतो आहे. हा अन्याय म्हणजे बटबटीत मेलोड्रमॅटिक डायलॉगबाजीयुक्त असला पाहिजे असंही नाहीच. "क्वीन" मधला नवरामुलगा हा स्वार्थी आणि उथळ वगैरे वाटतो, पण "भारतीय संस्कृती" वगैरे पोपट्पंची करताना दिसत नाही. त्यालाही पोरीबरोबर फिरायचे, "कूल पॉईंट्स" हवे आहेत. त्यामुळे बटबटीत नसलेलला तरी अन्यायकारक व्यवस्थाच हवी असणारा भावी नवरा नाकारण्यापर्यंत सिनेमा आलेला आहे.
मात्र कुटुंबव्यवस्था नाकारलेलं दाखवण्याकरता याहून पुष्कळ अधिक अजूनही हवंय. त्याकरता नवरा मारहाण करणारा, व्यसनाधीन, लैंगिक शोषण करणारा किंवा दुसर्या स्त्रियांबरोबर झोपणारा यापैकी कुणीतरी हवा. सोफिस्टिकेटेड असलेला परंतु स्त्रीला तुच्छ लेखणारा नवरा आणि आपल्या आईला हिडीसफिडीस करणारी टीनएजर मुलं यांच्या विरुद्ध बंड पुकारावं आणि त्या व्यवस्थेला सोडून चालतं व्हावं इथवर हिंदी सिनेमाची आणि पर्यायाने भारतीय प्रेक्षकवर्गाची मानसिक स्थिती आली आहे असं दिसत नाही.
"क्वीन"चं, न झालेलं लग्न नाकारणं हे सोपं नाही, परंतु कुटुंबव्यवस्थेला नाकारणं हे अधिक कठीण, अधिक कटु अशा परिस्थितीला सामोरं जाणारं आव्हान आहे. कुटुंबव्यवस्थेला फारफार तर "सुधारता" येण्याची हलकीफुलकी स्वप्नं "इंग्लिश विंग्लिश" सारख्या गोष्टींतून पहाता येतील. मात्र अशा कटु, बिकट, खर्या अर्थाने बंडखोर प्रकाराला अजून आपण नि आपला सिनेमा तयार व्हायचा आहे हे खरं आहे.
"क्वीन" पाहिलेला नाही, पण
"क्वीन" पाहिलेला नाही, पण बघेनच.
कुटुंबव्यवस्था नाकारलेलं दाखवण्याकरता याहून पुष्कळ अधिक यामधे माझ्या अपेक्षा बऱ्याच जास्त अाहेत. नवरा-बायकोपैंकी कोणीही उथळ, लोभी, व्यसनाधीन, शोषण करणारे किंवा दुसऱ्याला त्रास देण्यासाठी एकनिष्ठता मोडणारे नाहीत; दोघेही सामान्य लोक आहेत, दोघांच्यातही काही चांगल्या गोष्टी आहेत, काही दोष आहेत, या गुणदोषांसकट एकमेकांना स्वीकारलेलं आहे. पण काही काळानंतर, लग्नाला पाच-सात-पंधरा वर्ष झाल्यानंतर दोघेही आपापल्या दिशांनी वेगवेगळे वाढले आहेत. आणि म्हणून वेगळे झाले. 'भेजा फ्राय'मधे हा मुद्दा महत्त्वाचा नाही, पण त्यात सारीकाचं पात्र आपल्या आधीच्या नवऱ्यापासून निराळं झालेलं आहे तरीही त्यांच्यात कडवटपणा नाही.
किंवा 'क्वीन'चा विचार करता, या मुलीवर अन्याय झाल्यामुळे ती स्वतःचा शोध घेण्याचं ठरवते (असं दिसतंय). पण ते होण्यासाठी दुसरी बाजू लंगडी, तोकडीच का असावी? तो तिचा चांगला मित्र आहे, किंवा तो ही चांगला मनुष्य आहे पण या दोघांचं जुळणार नाही असं लक्षात आल्यामुळे निराशा टाळण्यासाठी ती स्वतःचा शोध घेण्यासाठी अतरंगी गोष्टी करायला सुरूवात करते आणि त्यात शहाणी होते, असं काही बघायला मला आवडेल.
Museum Hoursमधल्या योहानच्या आयुष्यासारखं काही.
---
कंगनाचा अभिनय वगैरे प्रतिक्रियांबद्दल सहमत.
केवळ प्रेक्षक नाही
सोफिस्टिकेटेड असलेला परंतु स्त्रीला तुच्छ लेखणारा नवरा आणि आपल्या आईला हिडीसफिडीस करणारी टीनएजर मुलं यांच्या विरुद्ध बंड पुकारावं आणि त्या व्यवस्थेला सोडून चालतं व्हावं इथवर हिंदी सिनेमाची आणि पर्यायाने भारतीय प्रेक्षकवर्गाची मानसिक स्थिती आली आहे असं दिसत नाही.
प्रेक्षकच नाही तर एकुणच समाज याला फारसा तयार नाहिये. त्या दृष्टीने इंग्लिश विंग्लिश सध्याच्या वास्तवाशी फारकत घेत नाही असे वाटते. (आणि क्वीनही)
भारतात फक्त नवरा नी मुलं टाकून बोलतात यावरून नवर्याला टाकून देणे योग्य वाटण्याइतकी समाजाची स्थिती आली असती तर लग्नसंस्थाही एकत्रकुटुंब संस्थेसारखी एवाना पार मोडकळीस येऊ लागली असती. ;) किंबहुना सध्याचे जाऊद्या, आमच्या आधीच्या पिढीतीलच कित्येक लग्ने आजपावेतो मोडलेली असती :P
बाकी तुलना, निरीक्षण आवडले. मलाही इंग्लिश विंग्लिशची आठवण झाली होती पण इतक्या नेमकेपणाने तुलना करता आली नव्हती.
कुटुंबव्यवस्थेला नाकारणं हे
कुटुंबव्यवस्थेला नाकारणं हे अधिक कठीण
कुटुंब व्यवस्थेला नाकारणं म्हणजे काय हे नीट समजलं नाही. आयुष्यभर एकटं रहाणं फार अवघड असेल असं वाटतं. त्यामुळे एका नाहीतर दुसर्या कुटुंबामध्येच रहाणं पसंत करतील लोक.
आणि लग्नसंस्थेमध्ये बायको हीच कायम शोषित(exploited) असते आणि नवरा कायम शोषक (exploiter) असतो या संकल्पनेस छेद देणारं काही बघायला आवडेल.
+
हो ना! आणि त्यातल्या त्या '(शर्म आती है मगर आज यह कहना होगा,) हमें अब आप के कदमों में ही जीना होगा' या गाण्याचा अर्थ 'आता आम्हाला (कायम) आपल्या तंगड्यांतच जगावे लागेल' असा (अंमळ चुकीचा) घेतल्याने डोके अंमळ औट झाले होते. असो.
(हो,पण संदर्भ सोडून एखादे वाक्य प्रमाणाबाहेर ताणले की हे असले शाळकरी निष्कर्ष निघायचेच१. पुन्हा असो.)
-------------------------------------------------------------------------------------------------------
१ श्री. बॅटमॅन यांजकडून साभार.
अनुपच्या प्रतिसादावरून तशी
अनुपच्या प्रतिसादावरून तशी बरीच कुटुंबे असावीत असे वाटतेय.
माझ्या माहितीतही काही आहेत पैकी दोन इंटरेस्टिंग केसेस सांगतो
१. एक परिचित जोडपे बहुतेकदा भांडताना दिसते. जरा अधिक तपशीलात शिरले तर कळते की ते भांडण नाहीये तर नवर्याची खरडपट्टी काढणे चाललेय. अधिक तपशीलात शिरलात तर कळेल नवरा घराबाहेर उभा आहे नी बायको कोणत्याशा साध्याशा कारणावरून घरात राहुन त्याला ओरडतेय (जसे ही भाजी नीट आणता येत नव्हती? अशा छाप गोष्टी)
२. माझ्या परिचयातील एक कंपनीने काढून टाकलेले सद्गृहस्थ आहेत. उत्तम वाचन, भरपूर माहिती वगैरे आहेच. मात्र घरी तोंडही उघडता येत नाही. बायको, मुले अगदीच अमानवी वागतात हे बाहेरूनही कळते. कोणत्याही सण समारंभात त्यांना भाग घेऊ देत नाहित, घेतलाच तर ते बोलु लागताच वाक्ये तोडतात. अल्पपरिचय असलेल्या पाहुण्यांसमोरही "त्यांना नका हो विचारू, येतंय काय त्यांना, घरीच तर असतात, मी सांगते काय ते नैतर XXXला विचारा (त्यांच्या मुलाला)" वगैरे वाक्ये फेकली जातात. नवरा कमवत नाही याबद्दल त्याला तिर्हाईतांसमोरही ऐकवलेले पाहिले आहे.
अर्थात अश्या केसेस आहेत हे मान्यच आहे. फक्त फारच क्वचित दिसल्या आहेत.
कॉलेजात असताना एक मित्राकडे
कॉलेजात असताना एक मित्राकडे अभ्यासाला जायचो. त्याच्या शेजारची बाई आपल्या नवरर्याला मारयची. "अग अग मारतेस काय?" "ओरडायला काय झालं?" असे प्रेमळ संवाद ऐकले आहेत. पण वर अदितीनी म्हटलय तसं लग्नाचा जोडीदार नकोसा होणं यासाठी फक्त हिंसाचार हेच कारण नसतं. केवळ incompatibility हे पण असू शकतं. माझ्या मूळ प्रतिसादात असं वाटण पुरुषांमध्ये पण साहजिक आहे असं म्हणायचं होतं.
प्रतिक्रिया
अशा चित्रपटांचा धोका काय ते मी फेसबुकवर लिहिलेलं होतं. अशा चित्रपटांचा 'ऐसी अक्षरे' वरचा धोका हा की चर्चा तात्काळ नायिकेवर अन्याय, तिला नाही म्हणणारा तो कोण टिकोजीराव, तुज्या मनात येयील तवा तुला झोपायला बायको व्हय रं भाड्या, बर्न दी ब्राज या त्यंत परिचित, कंठाळ्या आणि अगदी लोकसभेच्या जिवंत प्रक्षेपणाइतक्या कंटाळवाण्या अतिपरिचित वळणांनी जाते. म्हणून चित्रपट आवडला असेही न म्हणता थांबतो.
लांडगा आला रे आला
>>अशा चित्रपटांचा 'ऐसी अक्षरे' वरचा धोका
प्रस्तुत धाग्यावर उपरोल्लेखित धोका नक्की कुठे वास्तवात आला आहे ते पहायला उत्सुक आहे.
अवांतर : "ठिबक ठाकडे झनन झांझरे पाहिले न पाहिले " अशी कायशीशी कविता आहे. याच न्यायाने हा चित्रपट "आवडला न आवडला" अशा मन-धुक्यात-धुकं-मनातल्या धुक्मनावस्थेतली पोस्ट वाटते आहे :-)
या धाग्यावर हा विषय अवांतर
या धाग्यावर हा विषय अवांतर आहे. पण निमित्त इथेच आहे, त्यामुळे...
***
'तुमचा' स्त्रीवाद कंठाळी, आक्रस्ताळा, बटबटीत, एकांगी, मधुराभक्ती करणारा, उग्गाच... असे आरोप इथे कायम केले जातात. कधी त्यांत तथ्य असतं, कधी नसतं. दर आरोपागणिक माझ्या डोक्यातली चौकट थोडथोडी बदलते. त्याबद्दल थोडी व्यक्तिनिरपेक्ष चर्चा झाली तर माझी चौकट पक्की होईल / विस्तारेल / बदलेल, शिवाय पुढचे काही उगाच वाद टळू शकतील. तर प्रश्न असा(से) की-
१. तुम्ही स्वतःला स्त्रीवादी मानता का? तुमच्या लिंगभावामुळे या उत्तरात फरक पडला आहे असं वाटतं तुम्हांला? का?
२. स्त्रीवादी बाई आणि स्त्रीवादी पुरुष या दोन संकल्पना तुमच्या डोक्यात कुठलं चित्र उभं करतात?
३. हे आदर्श चित्र आहे की वास्तवातलं?
४. तुमच्या स्वतःच्या भवतालात स्त्रीवरच्या अन्यायाबद्दल जागरूक राहण्याची गरज अजूनही शिल्लक आहे, की नाही? सिनेमे, नाटकं, पुस्तकं, आजूबाजूच्या माणसांबद्दलचे सकारात्मक-नकारात्मक अनुभव... या सगळ्यांचीच उदाहरणं इथे महत्त्वाची ठरतील.
प्रश्न अर्थातच फक्त दिशादर्शक आहेत. त्या निमित्तानं स्त्रीवाद या घोळदार संकल्पनेचं थोडं नेमकीकरण व्हावं, इतकंच.
ट्रेन बर्डस
ट्रेन बर्डस नावाचा १९९८ मधला नितांतसुंदर जर्मन सिनेमा बघितला . हान्स नावाचा साधा , निष्पाप नायक, ट्रेनचे वेगवान रुट्स सांगायच्या इंटरनॅशनल टाईम टेबल स्पर्धेत भाग घ्यायला फिनलंड मध्ये इनारी येथे जात असतो . युरोपमधला त्याचा सर्व ट्रेन प्रवास खरा आणि मजेशीर तर आहेच आणि त्यातला अनपेक्षित असा पाठलाग उत्सुकता वाढवत जातो . त्याला नमुनेदार प्रवासी भेटतात आणि प्रवासात दृश्यमान निसर्ग विलक्षण शांतीचा अनुभव देतो .
कुणीही कुणाला (बाई-बाप्या
कुणीही कुणाला (बाई-बाप्या यांच्यातले सगळे पर्म्युटेशन्स कॉम्बीनेशन्स) डिच केल्यानंतरची कथा अशा वळणाने जाऊ शकते.
चर्चाही.
केल्याने देशाटन, सुरवंटाचं फुलपाखरू(आत्मविश्वास येणे) ह्या प्रमुख थीम्स आहेत. त्या लिंगनिरपेक्ष असू शकतात. दुसर्या भागात सपाटीकरण होताना परिस्थितीजन्य इंटररेस ग्लोबल कुटुंबे कशी असतील याचीही झलक आहे. ती कितपत वास्तवदर्शी आहेत हा एक प्रश्न आहे. भारतीय लोक सगळ्या पाकविधांची कशी वाट लावतात यावरही खुमासदार टिपण्णी आहे.
भ्रष्टाचारी माणूस नि त्याची
भ्रष्टाचारी माणूस नि त्याची पिसाट पिपासा दिसते हल्ली "भ्रष्टाचार मुक्त भारत "वाल्यांना दिसते.
पण त्याच्यामागे संपत्तीचा तगादा लावणारी स्त्री कुणाला दिसत नाही.
कारण शेवटी सगळे स्त्रीदाक्षिण्यपरायण असतात. जालीय कूल प्वाइंट्स मिळाल्याशी कारण!
शेवटी तुरुंग भ्रष्टाचार करणार्यालाच होतो; "करायला लावणार्याला " नाहीच.
त्यात 'करायला लावणारी' असेल तर ती बायॉलॉजिकल प्रेरणा वगैरे असते. या प्रेरणेस अनुसरून पुरुषांनी काही केलं की पुरुषद्वेष्ट्यांच्या लेखी ते स्त्रीद्वेष्टे ठरतात.
त्यात 'करायला लावणारी' असेल
त्यात 'करायला लावणारी' असेल तर ती बायॉलॉजिकल प्रेरणा वगैरे असते. या प्रेरणेस अनुसरून पुरुषांनी काही केलं की पुरुषद्वेष्ट्यांच्या लेखी ते स्त्रीद्वेष्टे ठरतात.
जगातले बहुसंख्य गुन्हे, गोध्रापासून निर्भयावरचे अत्याचार आणि पाकिटमारीपासून पीडोफिलोयापर्यंत, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कोणत्या-ना-कोणत्या मूलभूत प्रेरणेमुळेच होतात. त्यांचं इतपत उघडंनागडं समर्थन फार वेळा दिसत नाही.
भ्रष्टाचारी माणूस नि त्याची
भ्रष्टाचारी माणूस नि त्याची पिसाट पिपासा दिसते हल्ली "भ्रष्टाचार मुक्त भारत "वाल्यांना दिसते.
पण त्याच्यामागे संपत्तीचा तगादा लावणारी स्त्री कुणाला दिसत नाही.
शेवटी तुरुंग भ्रष्टाचार करणार्यालाच होतो; "करायला लावणार्याला " नाहीच.
Moreover, since she contributes more to your birth, she owns you more. And therefore ... she should be thought of as more of a driver of your actions than you imagine. But despite that she is automatically absolved.
या प्रतिसादात 'मनुस्मृतीतली
या प्रतिसादात 'मनुस्मृतीतली तत्त्वे राबवणार्यांचे किंवा त्यांना सपोर्ट करणार्यांचे इतरांप्रतीचे जण्रल अॅटिट्यूड मनुस्मृती ऑर नो मनुस्मृती-बदलू शकतच नाही' असं छुपं अॅझम्प्शन आहे, पण त्यामुळे मनुस्मृतीला अॅबसॉल्व्ह करता येत नाही. त्या अॅझम्प्शनला पूरक विदाही कुठे दिसला नै.
मिन्स टू अन एन्ड
या प्रतिसादात 'मनुस्मृतीतली तत्त्वे राबवणार्यांचे किंवा त्यांना सपोर्ट करणार्यांचे इतरांप्रतीचे जण्रल अॅटिट्यूड मनुस्मृती ऑर नो मनुस्मृती-बदलू शकतच नाही' असं छुपं अॅझम्प्शन आहे,
छुपं नाही उघड-उघड आहे. उलट मनुस्मृतीला महत्त्व देऊन तुम्ही 'राबवणार्यांच्या किंवा त्यांना सपोर्ट करणार्यांच्या' बुद्धिमत्तेवर आणि क्रुरतेवर अन्याय करत आहात.
त्या अॅझम्प्शनला पूरक विदाही कुठे दिसला नै.
वर्णभेद किंवा कुठलाही भेद करणार्यांना मनुस्मृतीची गरज पडत नाही असे मत आहे.
उलट मनुस्मृतीला महत्त्व देऊन
उलट मनुस्मृतीला महत्त्व देऊन तुम्ही 'राबवणार्यांच्या किंवा त्यांना सपोर्ट करणार्यांच्या' बुद्धिमत्तेवर आणि क्रुरतेवर अन्याय करत आहात.
अदरवाईज डोके ठिकाणावर असलेले लोक निव्वळ धर्मसंमत आहे म्हणून भेदभाव करतात तेव्हाही मनुस्मृती किंवा त्यातील शिकवण त्याला जबाबदार नाही असे म्हणायचे असेल तर त्याइतके चुकीचे विधान दुसरे नसावे.
मुळात अशी विचारसरणी राबवू पाहणार्यांच्या ताकदीत बरीच भर घालायचे काम मनुस्मृतीसारखे ग्रंथ करतात म्हणून त्यांवर जबाबदारी टाकावीच लागते.
अ प्रायरी लोकांचे वर्गीकरण इथे केलेले आहे तेच चुकते आहे. लोक इर्रिडीमेबल असतात असे सुचवायचे आहे असे वाटते अन ते अतिशय शाळकरी वर्गीकरण आहे.
शंका
>>अदरवाईज डोके ठिकाणावर असलेले लोक निव्वळ धर्मसंमत आहे म्हणून भेदभाव करतात तेव्हाही मनुस्मृती किंवा त्यातील शिकवण त्याला जबाबदार नाही असे म्हणायचे असेल तर त्याइतके चुकीचे विधान दुसरे नसावे.
बहुदा तुम्हाला डोके ठिकाणावर नसलेले लोक असे म्हणावयाचे असावे, 'अदरवाईज' हा शब्दप्रयोग वाक्याला लोडेड बनवतो.
>>मुळात अशी विचारसरणी राबवू पाहणार्यांच्या ताकदीत बरीच भर घालायचे काम मनुस्मृतीसारखे ग्रंथ करतात म्हणून त्यांवर जबाबदारी टाकावीच लागते.
सो तुम्ही अ प्रायरी वर्गीकरणाला सपोर्ट करु पहात आहात?
>>अ प्रायरी लोकांचे वर्गीकरण इथे केलेले आहे तेच चुकते आहे. लोक इर्रिडीमेबल असतात असे सुचवायचे आहे असे वाटते अन ते अतिशय शाळकरी वर्गीकरण आहे.
वरील प्रश्नाच्या उत्तरानंतर ह्याचा खुलासा केला जाईल.
हर्कत नै.
बहुदा तुम्हाला डोके ठिकाणावर नसलेले लोक असे म्हणावयाचे असावे, 'अदरवाईज' हा शब्दप्रयोग वाक्याला लोडेड बनवतो.
नक्की काय म्हणायचे आहे ते परत सांगतो. समजा एक माणूस आहे जो सर्वांशी चांगले वागतो, मात्र धर्माच्या पगड्यामुळे काही गोष्टी तो करू धजावत नाही, उदा. एका मर्यादेपलीकडे स्त्रियांना शिकू न देणे, दलितांशी जाचक नसला तरी भेदभावयुक्त व्यवहार करणे. त्या केसमध्ये दोष कुणाचा? तुमच्या वर्गीकरणानुसार तो माणूस काही वाईट गोष्टी करतो म्ह. तो मुळातच वाईटच आहे, नै का? तुमच्या वर्गीकरणाआधारे त्याचे रिडेम्प्शन शक्यच नाही, कारण मुळात काही गोष्टींत भेदभाव करणारा माणूस अन्य काही गोष्टींत चांगलाही वागू शकतो हा अॅस्पेक्ट नजरेआड होतोय. तो माणूस चांगल्यावाईट दोन्ही गोष्टी करतो, मात्र त्याच्या वाईट गोष्टी अधोरेखित करून सर्व केसेसमध्ये तो तस्साच वागेल असा निर्णय तुमच्या विचारपद्धतीनुसार येतोय, जो मूलत:च चूक आहे.
इथे गांधीस्टाईल हृदयपरिवर्तन इ. मी बोलतच नाहीये. तो माणूस मूलतः तसा सत्प्रवृत्त इ. आहे, पण त्याचा काही शिकवणींवर विश्वास असल्याने तो वागतो तसा वागतो. ती शिकवण त्याच्या वागणुकीस जबाबदार असते आणि ती अंतिमतः धर्मग्रंथांतून येते. म्हणून धर्मग्रंथ हे समाजाच्या वागणुकीवर परिणाम करतात.
आता तो माणूस समाजाच्या विरुद्ध जाऊन काही गोष्टी करू धजावत नाही इ.इ. वरूनच तो तद्दन प्रंप्रावादी अतएव दुराचारी आहे इ.इ. लेबले लावत सुटले तर त्याला काय अर्थ आहे ते कळत नै.
सो तुम्ही अ प्रायरी वर्गीकरणाला सपोर्ट करु पहात आहात?
आजिबात नाही. माझा अगोदरपासूनचा मुद्दा असा आहे, की जे बोलूनचालून हरामी असतात ते आपल्या स्वार्थासाठी धर्मग्रंथाची मदत घेतातच, पण त्यांची संख्या लै कमी. तुलनेने बरेच बरे वागणारे पण 'धर्मभीरू' असलेले लोक जसे वागतात ते बदलणे शक्य असते, आणि त्यासाठी ते श्रद्धेय मानत असलेल्या शिकवणीवर हल्ला चढवणे अतिशय गरजेचे असते.
याच भूमिकेवरून तर मनुस्मृतीचा अन त्या शिकवणुकीचा विरोध केला गेला म्हणून तर हिंदू समाजात माजायची तेवढी खळबळ तरी माजली!!! दलितांविरुद्ध दंगे करणारे आणि धर्माच्या प्रभावाखाली त्यांना माजघरात प्रवेश नाकारणारे पण बाकी त्रास न देणारे एकाच तागडीने तोलायचे असतील तर त्याच्याइतके हास्यास्पद दुसरे काहीच नाही.
आता जिहादाचा मुद्दा घेऊ. सगळे जिहादी काय मूलतःच वाईट असतात का, की काही भडकाऊ शिकवण तरी ते आत्महत्या करायला मागेपुढे धजावणार नाहीत? त्यांच्या एकूण मनोऽवस्थेत धर्माचा काहीच पार्ट नसतो का?
एकूण सारांश असा दिसतो आहे, की एकेका माणसाची स्वयंभू प्रवृत्ती ठरलेली असते आणि कुठलाही धर्मग्रंथ किंवा अजून काही ते बदलू शकत नाही. पण अनुभव अतिशय विपरीत आहे. एक साधे उदा. घेऊ, इस्लामिक राज्यकर्त्यांनी जी देवळे फोडली ती धर्म इ. नसता तरीही फोडलीच असती असे म्हणायचे आहे का? एका राजाची दुसर्या राजावर स्वारी हे प्रीइस्लामिक काळापासून चालत आलेलंच आहे. पण सिस्टिमॅटिकली देवळे फोडणे असे प्रीइस्लामिक काळात कोणी केलेले दिसत नाही. देवळे फोडून काय राजकीय लाभ होत होता म्हणून तसे करतील??? डजंट मेक एनी सेन्स व्हॉटसोएव्हर.
खुलासा
उदाहरण आवडले.
आता तो माणूस समाजाच्या विरुद्ध जाऊन काही गोष्टी करू धजावत नाही इ.इ. वरूनच तो तद्दन प्रंप्रावादी अतएव दुराचारी आहे इ.इ. लेबले लावत सुटले तर त्याला काय अर्थ आहे ते कळत नै.
इथे समाज आणि माणुसच 'दुराचारी' वर्तनास जबाबदार आहेत असे लक्षात येते, तुम्ही इथे कुठल्याही ग्रंथाचा उल्लेख का टाळला असावा? "मनुस्मृतीच्या विरुद्ध जाऊन" अशी शब्दयोजना करता येईल काय?
असो, मुद्द्याशी 'रुढ' अर्थाने सहमत आहे. फक्त वैचारीक प्रतिवाद करायचा म्हणून सांगतो - मुद्दा १. समाजाच्या भयाने एखादा माणुस जर कोणासही 'जाचक*' असे कर्म करत असल्यास तो अदरवाईज कितीही चांगला असल्यास त्या जाचक कर्मासाठी त्याला दुराचारी म्हणण्यात काय गैर असावे हे समजले नाही. मुद्दा २. समाजमान्य परंपरा पाळताना एखादा माणुस जर कोणासही 'जाचक*' असे कर्म करत नसल्यास म्हणजे जाचक वागण्याची वेळ आल्यास स्वताचे डोके वापरुन व समाजाला न घाबरता योग्य वर्तन करत असल्यास त्यास विवेकी परंपरावादी म्हणण्यात गैर नसावे. (हेच तुम्हास अपेक्षीत असावे). दोन्हीही मुद्द्यात कर्म करणार्यालाच श्रेय मिळणे स्पष्ट आहे.
*जाचक - शारिरीक इजा, संधींची उपेक्षा वगैरे. मानसिक इजा ह्यातुन वगळली आहे.
याच भूमिकेवरून तर मनुस्मृतीचा अन त्या शिकवणुकीचा विरोध केला गेला म्हणून तर हिंदू समाजात माजायची तेवढी खळबळ तरी माजली!!! दलितांविरुद्ध दंगे करणारे आणि धर्माच्या प्रभावाखाली त्यांना माजघरात प्रवेश नाकारणारे पण बाकी त्रास न देणारे एकाच तागडीने तोलायचे असतील तर त्याच्याइतके हास्यास्पद दुसरे काहीच नाही.
खाजगीमधे वर्तनासाठी धर्मग्रंथांचाच आधार पाहिजे असे नाही, आणि त्यामुळे त्यांचे वर्तन 'जाचक' कसे होते हे समजले नाही.
एकूण सारांश असा दिसतो आहे, की एकेका माणसाची स्वयंभू प्रवृत्ती ठरलेली असते आणि कुठलाही धर्मग्रंथ किंवा अजून काही ते बदलू शकत नाही.
समाज, राज्यसत्ता, परंपरा ह्या स्वयंभू प्रवृत्ती बदलण्यास कारणीभूत होऊ शकतात हे बहुदा गैर नसावे. धर्मग्रंथांचे 'पालन' करणे गैर ठरु शकते.
बंदूका 'वापरण्याबद्दल' असलेल्या 'विधेयकाबद्दल' अमेरिकेत सामान्य जनतेत रोष दिसतो, बंदूकांबद्दल नव्हे.
इतर मुद्द्यांचा प्रतिवाद थोड्यावेळाने करतो.
इथे समाज आणि माणुसच
इथे समाज आणि माणुसच 'दुराचारी' वर्तनास जबाबदार आहेत असे लक्षात येते, तुम्ही इथे कुठल्याही ग्रंथाचा उल्लेख का टाळला असावा? "मनुस्मृतीच्या विरुद्ध जाऊन" अशी शब्दयोजना करता येईल काय?
समाज अन माणूस का जबाबदार आहेत हे पाहिले तर धर्माचा/धर्मग्रंथाचा रोल लक्षात यावा इतकाच मुद्दा आहे. समाज अन माणसाला अमुक एक गोष्ट अंगीकारावी का वाटली, या प्रश्नाकडे पाहिले तर धर्मग्रंथ नक्कीच दिसतो. तदुपरि नामोल्लेख टाळण्याचे खास काही कारण नाही.
असो, मुद्द्याशी 'रुढ' अर्थाने सहमत आहे. फक्त वैचारीक प्रतिवाद करायचा म्हणून सांगतो - मुद्दा १. समाजाच्या भयाने एखादा माणुस जर कोणासही 'जाचक*' असे कर्म करत असल्यास तो अदरवाईज कितीही चांगला असल्यास त्या जाचक कर्मासाठी त्याला दुराचारी म्हणण्यात काय गैर असावे हे समजले नाही. मुद्दा २. समाजमान्य परंपरा पाळताना एखादा माणुस जर कोणासही 'जाचक*' असे कर्म करत नसल्यास म्हणजे जाचक वागण्याची वेळ आल्यास स्वताचे डोके वापरुन व समाजाला न घाबरता योग्य वर्तन करत असल्यास त्यास विवेकी परंपरावादी म्हणण्यात गैर नसावे. (हेच तुम्हास अपेक्षीत असावे). दोन्हीही मुद्द्यात कर्म करणार्यालाच श्रेय मिळणे स्पष्ट आहे.
*जाचक - शारिरीक इजा, संधींची उपेक्षा वगैरे. मानसिक इजा ह्यातुन वगळली आहे.
त्या त्या कर्मासाठी त्याला अवश्य शिव्या घालाव्यात, पण सरसकट एकच एक लेबल लावू नये असे म्हणणे आहे.
समाज, राज्यसत्ता, परंपरा ह्या स्वयंभू प्रवृत्ती बदलण्यास कारणीभूत होऊ शकतात हे बहुदा गैर नसावे. धर्मग्रंथांचे 'पालन' करणे गैर ठरु शकते.
बंदूका 'वापरण्याबद्दल' असलेल्या 'विधेयकाबद्दल' अमेरिकेत सामान्य जनतेत रोष दिसतो, बंदूकांबद्दल नव्हे.
इतर मुद्द्यांचा प्रतिवाद थोड्यावेळाने करतो.
ओके, पण मग धर्मावर टीका करणारे राममोहन रॉयांपासूनचे सगळे सुधारक चुकले होते असे वाटत नाही. असो.
समाजाच्या भयाने एखादा माणुस
समाजाच्या भयाने एखादा माणुस जर कोणासही 'जाचक*' असे कर्म करत असल्यास तो अदरवाईज कितीही चांगला असल्यास त्या जाचक कर्मासाठी त्याला दुराचारी म्हणण्यात काय गैर असावे हे समजले नाही.
हे म्हणणं रिस्की आहे. आता एकाहून जास्त बायका असणं हे जाचक समजलं जातं. पण २-३शे वर्षापूर्वी एखाद्यानी समाजमान्य आहे किंवा प्रचलित आहे म्हणून केली असतील ३-४ लग्न तर त्याला , आज, डायरेक्ट दुराचारी म्हणावं का?
शंका
>>हे म्हणणं रिस्की आहे. आता एकाहून जास्त बायका असणं हे जाचक समजलं जातं. पण २-३शे वर्षापूर्वी एखाद्यानी समाजमान्य आहे किंवा प्रचलित आहे म्हणून केली असतील ३-४ लग्न तर त्याला , आज, डायरेक्ट दुराचारी म्हणावं का?
जास्त बायका करणं हे निरपेक्षपणे योग्य आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? किंवा जास्त बायका करणं हे सापेक्षपणे(त्या-त्या समाजचौकटीत) योग्य आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे?
... पण मनुस्मृतीला जबाबदार
... पण मनुस्मृतीला जबाबदार धरणे गैर वाटते.
स्त्रीवाद या संकल्पनेने मूळ धरलं साधारण दुसऱ्या महायुद्धानंतर. 'द सेकंड सेक्स'ने स्त्रीवादाचा सैद्धांतिक पाया घातला. या पुस्तकाशिवायही स्त्रीवाद असताच आणि समानतेसाठी लढा सुरू झालाच असता. पण स्त्रियांना आपल्या शोषणामागचं मूळ काय आणि त्याचा-आपला संबंध काय हे या पुस्तकामुळे समजलं. त्यामुळे इतिहासात, या पुस्तकाची नोंद स्त्रीवादाचं बायबल / पाश्चात्य देशात स्त्रीवादी चळवळीला सैद्धांतिक पाया देणारं पुस्तक अशी होते.
जसं कौतुक करताना श्रेय एखाद्या ग्रंथाला मिळू शकतं, तितपत टीका मनुस्मृतीवरही व्हायला हरकत नसावी.
कोंबडी आधी
सेकंड सेक्स ह्या पुस्तकाचे महत्त्व निर्विवाद आहे. ते पुस्तक किंवा दी बोव्व्हार ह्यांचे लेखन स्त्रीस्वातंत्र्य-चळवळीतला एक महत्त्वाचा टप्पा आहे, पण चळवळ त्यापुर्वीही चालू होतीच आणि त्या पुस्तकाचा गंधही नसलेल्या जगाच्या इतर भागात स्त्री-स्वातंत्र्याविषयी अनेक यशस्वी प्रयत्न झालेच असणार. मुद्दा असा की अमुक एका चळवळीतले साहित्याचे मूल्य मान्य केले तरी चळवळ साहित्यामुळे उभी राहिली नसून बव्हंशी चळवळीवरुन प्रेरीत होऊन साहित्याची निर्मिती झाली आहे व त्याने चळवळीला अधिक बळ दिले आहे.
बव्हंशी चळवळीवरुन प्रेरीत
बव्हंशी चळवळीवरुन प्रेरीत होऊन साहित्याची निर्मिती झाली आहे व त्याने चळवळीला अधिक बळ दिले आहे.
'द सेकंड सेक्स'ची प्रेरणा चळवळीतून आलेली नाही. ते प्रकाशित झालं दुसऱ्या महायुद्धानंतर. युद्धाच्या काळात स्त्रियांना नोकऱ्या मिळत होत्या कारण पुरुष लढत होते किंवा युद्धोपयोगी गोष्टी निर्माण करत होते. स्त्रियांना स्वातंत्र्य, उत्पन्न, जगाची ओळख वगैरे गोष्टी मिळाल्या त्या युद्धकाळात. युद्धानंतर पुरुष जसे परत आले तशा बायका परत घर नामक खुराड्यात परतल्या आणि तिथेच रमल्या. मतदानाचा हक्क मिळालेला आहे तेव्हा आणखी काय हवं, अशी परिस्थिती तेव्हा होती. (खुद्द सिमोनचंही मत सुरूवातीला असंच होतं.) ती ज्या फ्रान्समधे होती तिथे पुढची दोनेक दशकं फारशी स्त्रीवादी हालचाल झाली नाही. जेव्हा बहुतांश स्त्रिया खुराड्यात आनंद साजरा करत होत्या तेव्हा सिमोनने हे पुस्तक लिहीलं. आणि त्या काळात पुस्तकाला प्र-चं-ड विरोध झाला. सिमोनच्या मेंदूबद्दल बोलणे ते तिच्या अॅनाटोमीबद्दल अश्लील पत्र तिला पाठवणे वगैरे प्रकारही झाले.
या पुस्तकाचं महत्त्व असं की मुळात स्त्रियांच्या प्रश्नांचं मूळ कशात आहे याचा विचार तिने केला. मूळ सापडत नाही तोपर्यंत वरवरची मलमपट्टी होत राहते. तिच्या लेखनामुळे स्त्रीवादी चळवळ प्रचंड पुढे गेली. (आपल्याकडे 'द सेकंड सेक्स' आलं असलं तरीही लोक अजून "स्त्रियांवर अन्याय झालाच नाही" किंवा "स्त्रीवाद ही होली काऊ आहे" यात अडकलेले आहेत. जिथे ते विश्लेषण पोहोचलंच नसेल तिथे काय स्थिती असेल? मध्ये ऐसीवर जपानी स्त्रियांबद्दल चर्चा झाली; पण तिथेही स्त्रियांच्या गटांमधे 'द सेकंड सेक्स'ची वाचनं झाल्येत.)
इथला मनुस्मृतीवरचा आक्षेप असा की स्त्रीवादाला - ५०% समाजाला समान हक्क मिळण्यासाठी चळवळीला चालना द्यायला - 'द सेकंड सेक्स'ने मदत केली तशी असमानता पसरवायला मनुस्मृतीने मदत केली. यात मनुस्मृतीला मिळालेल्या नैतिक अधिष्ठानाचा दोष आहेच. मनूने समाजाचे नियम फक्त लिहून काढले, एक प्रकारचं लांगूलचालन. सिमोनने समाजातल्या असमानतेच्या नियमांवर जशी सडकून टीका केली तशी केली नाही, हा दोष आहे.
या निमित्ताने सेकंड सेक्स
या निमित्ताने सेकंड सेक्स बद्दल लेख यावा असे सुचवितो. त्यावर साधकबाधक चर्चा झाली तर पाहिजेच आहे. त्या एका पुस्तकात लिमिटेड राहण्याइतका स्त्रीवाद अविकसित नसावा असे वाटते-यद्यपि ते पुस्तक सोडून ज्युडिथ बटलर इ. लोकांचा साधा उल्लेखही केला जात नाही.
तेही असो, किमान यावर जरी लेख आला तरी ठीक आहे. सुझॅन लिलार नामक बैंनी यावर एक क्रिटिक लिहिलंय त्याबद्दलचा हा प्यारा रोचक ठरावा. दुवा
And yet even Beauvoir sensed that there was something not quite right about her revolutionary thesis, "one is not born a woman, one becomes one."
Twenty years after "The Second Sex" was first published, author Suzanne Lilar wrote a brilliant critique of this groundbreaking work of modern feminism, an article that at least persuaded Beauvoir to admit to the genetic, hormonal and anatomical differences between the sexes. Nevertheless, she remained steadfast, and rightfully so, in her conviction that culture shapes our perception of femininity, a perception that constantly fluctuates between idealization and demonization.
'द सेकंड सेक्स फॉर डमीज'
जे विश्लेषणात्मक पुस्तक मुळातूनच वाचावं (आणि सगळ्यांना भाषा समजेल) असं आहे अशा पुस्तकाबद्दल लिहीणं फार कठीण आहे. 'द सेकंड सेक्स फॉर डमीज' असं काही पुस्तक कोणीतरी लिहीलेलं असेल कदाचित; माझी तरी असं काही लिहीण्याची कुवत नाही. इंग्लिश विकीपीडीयावर त्यातले मोजके मुद्दे लिहीलेले आहेत. त्याचं मराठी विकीपानासाठी भाषांतर करता येईल.
ज्युडीथ बटलर, तिचं 'जेंडर ट्रबल' (प्रकाशन वर्ष १९९०), वगैरे नावं चांगली आहेत लिहायला, पण काय करणार! अजून बेसिकमध्येच जिथे लोचा दिसतो तिथे बारकावे सांगण्यात काय हशील? मराठी जालावर 'द सेकंड सेक्स'च्या पलिकडे जायचं तर बहुदा 'फेमिनाईन मिस्टीक' - बेटी फ्रीडनपर्यंतच (प्रकाशन वर्ष १९६३) थांबावं लागेल.
ऋणःप्रमाण
१. २०० मिली पाणी नि ५ मिली लिंबाचा रस टाकून लिंबूरस बनवला तर कोणते contribution more वा more worthful आहे हे कसे ठरवावे?
२. वेळ नि शारिरीक गुंतवणून हेच ओनरशिपचे निकष आहेत का? माझ्या कलिगजवळ मी रोज ८-९ तास बसतो, बॉसच्या कामासाठी झिजतो हे पाहून काय अर्थ काढावा? कि माझा त्यांच्यावर अधिकार आहे?
३. अवयवदान, सरोगेट मदर, स्पर्म डोनेशन करणारे "महान, जवळचे, मालकीधारक " का?
४. स्त्री व पुरुषाचा एक मिनिमम नॅचरल रोल आहे. कमित कमी तितकी त्यांना निभावावाच लागणार. त्यालाच कमी जास्त म्हणणे गैर आहे. कारण त्यात ढवळाढवळ करून समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला तर मनुष्यवंश खूंटू शकतो. माझ्या मूलाच्या जन्मात माझा रोल कमी राहिला आहे हे "आरोप म्हणून" स्वीकार्य नाही.
५. वैद्यकीय दृष्ट्या, अपत्याच्या जन्मासाठी स्त्रीयांचा रोल पुरुषांपेक्षा जास्त आहे, तो त्या आनंदाने पूर्ण करतात. यामागे नैसर्गिक, सांस्कृतिक, वा उत्क्रांतिक प्रेरणा असू शकते.
६. एक सामान्य व्यक्ति म्हणून आपल्या जन्मासाठी, संगोपनासाठी प्रत्येकाने आपल्या आईप्रती ॠणी राहिले पाहिजे. परंतु पित्याचे ऋण आणि मातेचे ॠण यांचा रेशो काढायचा प्रयत्न टाळावा.
Rake
शिर्षकातच नायकाबाबत सर्व सांगणारी ही नुकतीच सुरू झालेली मालिका सद्ध्या पाहतो आहे. मालिकेतील मुख्य पात्रं ही व्यवसायाने वकिल आहेत आणि उरलेली पात्रं मुख्यतः त्यांचे अशील. कथा नायक 'कीगन डीन' हा एक जात्याच हुशार वकील पण 'नायकाचे' कोणतेही गुण नसणारा असा. प्रत्येक अंकाची कथा हलकीफुलकी असली तरी त्यातील विनोद ताजा आहे. (घिसापिटा नाही.) मालिकेत घडणार्या घटनांनी मालिकेच्या "ड्रामा" कॅटेगरीलाही न्याय दिला आहे. मराठीत ज्याला आपण "गॉन केस" म्हणतो असा नायक बनवणं आणि तो प्रभावीपणे दाखवणं तसं सोपं नाही. सद्ध्यातरी ही मालिका मला फार आवडली आहे.
इंग्लिश विँग्लिश पाहिला.
इंग्लिश विँग्लिश पाहिला. सुरुवातीचा आणि शेवटचा सेँटीमेँटी भाग सोडुन बाकी चित्रपट आवडला. वेल, खरंतर तो फ्रेँच कनेक्शन इन युएसए जेव्हा जेव्हा स्क्रिनवर असतो तो भाग आवडला. त्याशिवाय बोलण्यासारखं काही नाही चित्रपटात. नेहमीचीच रड 'आम्ही घरात यंव करतो- त्यंव करतो... तरी नवरा अस्सं बोलतो... आणि मुलं तश्शी वागतात...'
नेब्रास्का
विमानात प्रवास करताना काही टुकार अॅक्शन सिनेमे पाहिले. स्क्रीनवर सतत होणाऱ्या बिल्डिंगींची मोडतोड थांबवावी म्हणून नेब्रास्का लावला, आणि एरवी त्रासदायक झालेल्या प्रवासाचं थोडंसं सार्थक झालं.
एक सत्तरीच्या जवळचा म्हातारा - अमेरिकेच्या उत्तर भागात - मोंटानामध्ये राहणारा. त्याला 'तुम्हाला एक मिलियन डॉलरचं बक्षिस मिळालेलं आहे' टाइपचं पत्र येतं. आणि मग तो ते बक्षिस मिळवण्यासाठी घराबाहेर पडून नेब्रास्का राज्यातल्या लिंकन शहराकडे चालत निघतो. त्याचं डोकं ठिकाणावर नाही म्हणून त्याला त्याचा मुलगा परत घरी आणतो. तरी तो म्हातारा ध्यास सोडत नाही. काहीही करून त्याला तिथे जाऊन ते बक्षिस मिळवायचं असतं. त्याचा मुलगाही आपलं तुटक्याफुटक्या आयुष्याला कंटाळतो. त्यात बापाचं हे विचित्र वागणं. आणि कजाग आईची कटकट. वैतागून त्याला तो घेऊन जायला तयार होतो. आणि तिथून त्यांच्या प्रवासाची गंमत सुरू होते.
वाटेत ते नेब्रास्कामधल्या म्हाताऱ्याच्या मूळ गावात थांबतात. हे अमेरिकन खेडेगावासारखं असतं, श्रीमंत, पण तशीच सामुदायिक मानसिकता असलेलं. याला एक मिलियन डॉलर मिळाले आहेत ही बातमी वणव्यासारखी पसरते. आणि मग पुढे सगळी गंमत सुरू होते.
रोड मूव्ही या सिनेप्रकारात हा सिनेमा फिट्ट बसतो. बाप आणि मुलगा यांच्या प्रवासाचं चित्रण यात आहे. मुलाला यातून आपल्या बापाबद्दल बरीच नवीन माहिती कळते. गावातल्या सभ्य दिसणाऱ्या गोड म्हाताऱ्यांच्या गोड मुखवट्याखाली काय काय गमतीदार चीजा दडलेल्या आहेत हेही त्याला दिसतं. सगळीकडेच नर्म विनोद आहे. तरी काही सावल्या डोकावत राहतात. त्यांमुळे विनोदाची जातकुळी काहीशी डार्क ह्यूमरची आहे.
सिनेमा संपूर्णपणे ब्लॅक अॅंड व्हाइटमध्ये आहे, आणि उत्तम सिनेमॅटोग्राफीमुळे डोळ्यांना आल्हाददायक आहे. मॉंटाना-नेब्रास्कामधल्या विस्तीर्ण मोकळ्या उजाड तरीही कोरड्या नसलेल्या निसर्गाची पार्श्वभूमी छान वापरली आहे. म्हाताऱ्याचं व्यक्तिमत्व त्यात मिसळून जातं.
नक्की पहावा असा हा सिनेमा आहे.
नेब्रास्काविषयी
नेब्रास्काविषयी मी दोन-चार ओळी लिहील्या होत्या. तुम्ही तर ष्टोरीच सांगितली की.
कॉल द मिडवाइफ
कामासाठी सध्या बाहेरगावी आहे. दुसरे कुठले मनोरंजन नसल्याने अपार्टमेंट मध्ये वीकएंड ला चॅनेल फिरवत बसले होते. त्यात अचानक पीबीएस या चॅनेल वर "कॉल द मिडवाइफ" नावाच्या सिरीयल चे एपिसोड लागले होते. सेकंड सीझन चे एपिसोड लागोपाठ लागले होते, जवळजवळ सर्व पाहिले. ५० मधले लंडन आणि तिथला बकाल भाग चांगला उभा केला आहे.
जेनिफर वर्थ या नर्स/संगीतकार/लेखिकेच्या अनुभवांवर आधारित
Call the Midwife
Shadows of the Workhouse
Farewell to the East End
या पुस्तकांवर आधारित आहे.
आता शोधून पहिला आणि तिसरा (अजून तरी तीनच सीझन झालेत असे दिसतेय!) सीझन पाहायला पाहिजे असे वाटतेय!
'द गॉड इज ऑलवेज विथ यु ' (vaya con dios )
जर्मनीतली आपली प्राचीन मोनेस्ट्री सोडून पायीच, अपरिचित , आधुनिक ,वेगवान जगात इटलीला प्रवासाला निघालेल्या ३ प्रिस्टची कथा 'द गॉड इज ऑलवेज विथ यु ' (vaya con dios )या २००२ मधल्या जर्मन फिल्म मध्ये रंगवली आहे . कर्णमधुर चर्च संगीत , अप्रतिम अभिनय आणि खुमासदार विनोद फिल्मची रंजकता वाढवतात . अतिशय बोलका चेहेरा असलेला अर्बो नावाचा तरुण,सुरेख , भाबडा आणि निष्ठावंत प्रिस्ट म्हणजे मूर्तिमंत सात्विकता . टसिलो नावाचा रांगडा मध्यमवयीन प्रिस्ट आणि सगळ्यात ज्येष्ठ बेनो अगदी भिन्न स्वभावाचे प्रिस्ट आणि नायिका कियारा सगळ्यांनीच समरसून आपल्या भूमिकांना न्याय दिला आहे . हिरवा निसर्ग , सोनेरी सूर्यकिरणे , भव्य चर्चेसमध्ये आणि रानावनात , टेकड्यातून प्रतिध्वनित होणारे रुहानी संगीत मंत्रमुग्ध करतात .
"द स्टेशन एजंट"
२००३ साली आलेला अमेरिकन चित्रपट "द स्टेशन एजंट".
------ स्पॉईलर अलर्ट : चित्रपटाचं कथानक पुढील भागात आलेलं आहे. -------------
न्यूयॉर्कमधल्या एका उपनगरात एक शांत आयुष्य फिन व्यतीत करतो. फिन एकटाच आहे. फिन अबोल आहे. फिनला आगगाड्यांचा छंद आहे. आगगाड्या पहाव्यात, त्याबद्दलचे चित्रपट पहावेत. फिन जन्मतःच अबोल आहे की त्याच्या चार फूट उंचीमधे व्यतीत होत असलेल्या आयुष्याने त्याला अबोल बनवलेले आहे? कदाचित दोन्ही. फिन त्याच्यासारख्याच अबोल अशा मित्राच्या सहवासात आपलं सर्वार्थाने छोटं असलेलं आयुष्य त्याबद्दलच्या मूक संमतीबरोबर काढतो आहे. फिन आणि त्याचा मित्र दोघेही अविवाहित, दोघेही अबोल. दोघेही आगगाड्यांचे शौकीन. एकमेकांचे अबोल मित्र. दोघांच्याही आयुष्यात स्त्रियांचा वावर असल्याचं चिन्ह नाही. आगगाडीचे रूळ जसे हजारो मैल समांतर एकमेकांच्या साक्षीने जातात तसे बहुदा यांचे होणार.
आणि एक दिवस अचानक मित्र हार्ट अटॅकने दगावतो. फिनला कळलंय की या मित्राचं कुठल्यातरी गावाकडल्या भागात एक खोपट होतं. फिनला हेही कळलंय की मित्राने आपल्या मृत्यूपत्रात फिनच्या नावे ते खोपट आणि चार पैसे सोडलेले आहेत.
एक नवे गाव. एका बिनवापरत्या रेल्वेमार्गाच्या काठी असलेलं खोपट. जुन्या अबोल आयुष्याचा अबोलपणे त्याग करून फिन इथे आलेला आहे. चार फुटाच्या देहाने जुन्या कामधंद्याला, जुन्या आयुष्याला रामराम ठोकलेला आहे.
गाव तसं तुरळक वस्तीचं. नेमका घराशेजारी एक बडबड्या दुकानदार "जो" येऊन बसतो. बडबड्या नि भोचक असलेला "जो", अबोल फिनच्या आयुष्यात चंचूप्रवेश करतोच. फिनच्या आविर्भावात एक अथांग अशी शांतता तर "जो"ला शेवटी "दुसरा कुणीतरी" आपली बडबड ऐकायला मिळाल्याचा आनंद. छोट्या गावामधे फिनच्या बुटकेपणाकडे अर्थपूर्ण कटाक्ष टाकणारे नवे चेहरे. यातला एक चेहरा ऑलिव्हियाचा. खरे तर आपल्याआपल्यामधे असणार्या, एकलकोंडं आयुष्य जगणार्या ऑलिव्हियाचे रस्ते तितक्याच अलिप्त अशा फिनशी येऊन कधीच मिळाले नसते. पण तसं काहीसं जुळून येतं खरं. या तीन मित्रांच्या नात्यामधली चलबिचल, "जो"चा बडबडा निरागसपणा आणि तिघांची आयुष्यं एकमेकांमधे अडकवणारे अनामिक असे संबंध. बस्स. चित्रपटाचा जीव म्हणावा तर इतकाच.
------ स्पॉईलर अलर्ट : समाप्त -----------
चित्रपटाची सगळी हाताळणी अतिशय शांतपणाची आहे. पण याचा अर्थ रटाळपणाची नव्हे. फिनची भूमिका करणार्या चार फुटाची उंची असलेल्या पीटर डिंकलेज् या नटाचं काम अप्रतिम म्हणावं असं आहे. इतरांच्या नजरांमधे असणारं त्याच्याबद्दलचं कुतुहल, त्यावरची त्याची मूक प्रतिक्रिया, आयुष्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन या सर्व गोष्टी एका शब्दाशिवाय व्यक्त करण्याचं सामर्थ्य एखाद्यामधे किती असावं याचं प्रत्यंतर हा चित्रपट पाहताना येतं. चित्रपटामधला विनोद अतिशय सुंदर, मार्मिक आहे.
पीटर डिंकलेजने रंगवलेलं आयुष्य, त्याची भूमिका, त्याचं असं अनामिक गावामधे (अनामिक नव्हे पण अनोळखी, छोट्या) गावात अनामिकतेनं जगू पहाणं, आयुष्याचा मूक स्वीकार, त्यातली करुणा आणि सौंदर्य हे सारं अनुभवण्याकरता हा चित्रपट पहावा असं सुचवतो.
जेम्स कॅमरून निर्माता
जेम्स कॅमरून निर्माता असलेल्या "Years of Living Dangerously" या मालिकेचा एक भाग पाहिला.
हवामान बदलाबाबत जाणीव निर्माण करणारांबद्दल कौतुक वाटून घ्यावे की बहुसंख्य माणसांच्या अमर्याद मूर्खपणाबद्दल व लोभीपणाबद्दल वाईट वाटून घ्यावे हाच प्रश्न पुन्हा नव्याने पडला.
टेक्सासमधील प्लेनव्ह्यु गावातला दुष्काळ, सीरियातले यादवी युद्ध आणि इंडोनेशियातली बेसुमार जंगलतोड अशा वेगवेगळ्या घटनांचा आढावा घेतानाच माणसांची आयुष्यं, ठाम राजकीय व धार्मिक अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, लघुदृष्टी याचा अलगद अनुभव देणारी ही मालिका दिसतेय.
हवामान बदलाचे प्रकरण व त्यामागचे राजकारण यावर फुकाचा वाद न घालता लोकांवर होणारे परिणाम व त्यांचे विचार यावर जास्त भर दिल्याने इतर फिल्म्सपेक्षा ही थोडी वेगळी वाटली.
पण हॅरिसन फोर्ड जेव्हा "आय कॅननॉट वेट टू सी द मिनिस्टर" वगैरे आवेशाने म्हणतो ते लै विनोदी वाटतं.
http://youtu.be/brvhCnYvxQQ
गेल्या आठवड्यात हे चित्रपट
गेल्या आठवड्यात हे चित्रपट पाहिले
If Only हा चित्रपट पाहिला. एक प्रियकर-प्रेयसी एकत्र रहात असतात त्यातील एक दिवस एका भीषण घटनेने संपतो. दुसर्या दिवशी नायक जागा झाल्यावर त्याला तो दिवस पुन्हा जगायची संधी मिळते, तेव्हा काय होते असा या चित्रपटाचा ढोबळ विषय. रोचक विषय व पहिल्या हाफ मध्ये छान मांडणी झालेला हा चित्रपट सेकंड हाफ मध्ये काहिसा संथ होत जातो.
एकुणात ६/१०
येलो हा मराठी चित्रपट पाहिला, आवडला.
वेगळी कथा, बर्यापैकी फोकस्ड पटकथा आणि तीनही कसलेल्या अभिनेत्यांचा सहज अभिनय या जमेच्या बाजु. संवादही मोजके व कथेला पुरक. संगीत/गाणी दोन्ही ठीक.
एकदा नक्की पाहण्यासारखा.
७/१०
To Sire, With Love (१९६७) हा क्लासिक चित्रपट बघितला. सदर पुस्तक आधीच वाचले होते, तरीही बहुतांश चित्रपट आवडला. पुस्तकात असणारे माझे आवडते एखाद-दोन संवाद कापले आहेत, पण त्याने मुळ कथानकाला/वेगाला बाधा पोचत नाही. पटकथेत रुपांतरही मस्त! सगळ्या पात्रांचा अभिनय, पात्रयोजना सगळेच आवडले. चित्रपट नक्की बघा असे सुचवतो!
८/१०
मगधीरा
जालावरच्या चित्रपट तज्ञांनी वारेमाप स्तुती केलेला दक्षिण भारतीय चित्रपट मगधीरा पाहण्यात आला.
छान रंजक कमर्शियलपट आहे.
पण असा अद्भुत, जगावेगळा , न भूतो न भैष्यति, नितांत सुंदर वगैरे वगैरे विशेषणे जोडण्यासारखं त्यात नेमकं काय आहे
ते काही समजलं नाही. अगदि दोनदा पाहूनही समजलं नाही.
कुठलाही इतर मला बरा, चार घटका करमणूक देणारा चित्रपट दिसला की लागोपाठ त्यावर सडकून केलेली टीकाही
जाल तज्ञांकडून व समीक्षकांकडून दिसते.
हा चित्रपट आवडला, नाही असे नाही; पण हाही इतरांसारखाच वाटला.
हल्ली समीक्षकांना आवडलेले पिच्चर जबरदस्तीने आवडून घेण्याचा कंटाळा यायला लागलाय.
जागा
जागा अपुरी पडण्याचा संभव आहे.
मी सोडून जालावरचे आघाडिचे लेखक प्रतिसादक हे मला डिफॉल्ट समीक्षक वगैरे वाटतात.
अवांतर :-
म्हणजे, एखाद्या फडतूस माणसाला ही विद्वान व बर्यापैकी पोट भरलेली माणसं तुडवून सहज जातील थेट्रात.
थेट्रात पिच्चर पाहतील -- त्याच तुडवल्या जाणार्या वगैरे माणसाचा!
बाहेर येउन पुन्हा "तो तुच्छ आहे. क्षुद्र सामान्य आहे" म्हणत झिडकारतील.
अरे ? सामान्य व्यक्तीवर बनवलेली कलाकृती आणि त्याची सुख दु:ख वगैरेच्या गप्पा चालतात.
पण तीच व्यक्ती बाहेर भेटली तर ती सामान्य!
आणि सामान्य म्हणजेच तुच्छ!
+१
अँड्रे बीटेल साहेबांचे वाक्य पुनरेकवार आठवले. साउण्ड्स फमीलियर?
"The Indian intelligentsia has somewhat mixed attitudes towards the Indian village. While educated Indians are inclined to think or at least speak well of the village, they do not show much inclination for the company of villagers."
http://www.hindu.com/mag/2005/12/04/stories/2005120400480300.htm
हेच
अगदि नेमके.
हे असेच म्हणायचे होते.
elites लागलिच "सामान्यांचा कळवळा " , "त्यांची सुख दु:खे" वगैरे वगैरे बडबडतात.
"विकासाला मानवी चेहरा मिळाला पाहिजे " ; "अरे, आपलेच आहेत"; "त्याच्याकडे पैसा कमी आहे, म्हणून तो आपल्याहून कनिष्ठ नव्हे",
"मानवता हो मानवता." , "आपलं स्वातंत्र्य" , "इवल्या जगातली त्यांची आभाळाएवढी स्वप्नं" वगैरे बद्दल बडबड करुन स्वतः संवेदनशील असल्याचं पुनः पुनः
दाखवू इच्छितात (नक्की कुणापुढे हा संवेदनशीलतेचा मुखवटा दाखवू इच्छितात, ते नेमकं सांगता यायचं नाही)
थोडक्यात स्वतःची पोटं भरलचा guilt ह्यांना येत असावा. मग आपल्या तथाकथित मोकळेपणा आणि कृत्रिम संवेदनशीलता ह्याने guilt झाकू पाहतात.
AC मधून बाहेर आले की समोर दिसणार्या निढळाच्या घामाने थबथबलेल्या तशाच माणसाकडे तुच्छतापूर्ण व किळसयुक्त कटाक्ष टाकून आपल्या
सुखचैनीच्या वाटचालीत पुन्हा घाइने दंग होतात.
खोटारडे साले.
माणूस बाय डिफॉल्ट खोटारडाच असतो का काय असा अत्यंत निराशावादी विचार अशा वर्तनाकडे पाहून क्षणभर मनात चमकून जातो.
AC मधून बाहेर आले की समोर
AC मधून बाहेर आले की समोर दिसणार्या निढळाच्या घामाने थबथबलेल्या तशाच माणसाकडे तुच्छतापूर्ण व किळसयुक्त कटाक्ष टाकून आपल्या सुखचैनीच्या वाटचालीत पुन्हा घाइने दंग होतात.
हे योग्य आहे. असेच व्हायला हवे.
अशा वर्तनास बक्षीस मिळायला हवे.
-----
"विकासाला मानवी चेहरा मिळाला पाहिजे "
रिफॉर्मस विथ ह्युमन फेस.
बट विथ इनह्युमन कोअर.
---
"The Indian intelligentsia has somewhat mixed attitudes towards the Indian village. While educated Indians are inclined to think or at least speak well of the village, they do not show much inclination for the company of villagers."
हे सुयोग्यच आहे.
खेडे हे अधोगती, अशिक्षा, रिस्क-अव्हर्सनेस, रिट्रोग्रेड गोष्टींचे आगर आहे. It is characterized by Extreme unwillingness to adopt new technology. त्याची नालस्ती व्हायलाच हवी. खेडे हे फडतूस या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. उगीचच उदो उदो करण्यात काही हशील नाही. हा किळसवाणा उद्योग गांधींनी चालू केला. म्हणे खेड्याकडे चला. बकवास.
खेडे, खेडवळ, खेडूत या गोष्टी कमीपणा आणणार्या आहेत व ते सुयोग्यच आहे.
१ व २: एकच मुद्दा. वेगळी
१ व २: एकच मुद्दा. वेगळी जीवनशैली व त्यावर डिव्हेलपमेंट एट ऑल मुळे येणारी संक्रांत यामुळे कौतुक होते पण तीच जीवनशैली अंगीकारणारे आपल्या क्लोज संपर्कात आले की हेटाळणी होते-विविध प्रकारच्या पूर्वग्रहांपायी.
३. तस्मात कन्सिस्टन्सी पाहिजे ती प्रतिक्रियांत आणि त्या मुद्यांत असे म्हण्णे आहे.
शहरी लोकांनी गावकर्यांची
शहरी लोकांनी गावकर्यांची हेटाळणी करणे हे चूक आहे असा मुख्य मुद्दा आहे.
बाकी "निव्वळ कन्सिस्टंट आहे म्हणून योग्य" ही शब्दयोजना कन्सिस्टन्सी योग्य नसते असे सुचवते असे दिसते. मुद्दा इतकाच की ज्या मुद्यावरून गावकर्यांना सहानुभूती दिल्या जाते त्याच मुद्द्यावरून त्यांची हेटाळणी करणे हा दुटप्पीपणा नाही काय? अन असेल तर मग या दुटप्पी लोकांना सीरियसलि का घ्यावे?
अन असेल तर मग या दुटप्पी
अन असेल तर मग या दुटप्पी लोकांना सीरियसलि का घ्यावे?
त्या व्यक्तींना सिरीयली नकाच घेऊ. तो व्यक्तीदोष झाला.
पण म्हणून त्यांचे मत चुकीचे असेलच असे नाही! तुम्ही त्या व्यक्तीला झिडकारा/दुटप्पी म्हणा, पण मताला झिडकारायला निव्वळ दुटप्पी व्यक्तीने व्यक्त केलेले मत म्हणून झिडकारणे हे पुरेसे कारण वाटत नाही. मत स्वीकारणे वा झिडकारणे हे त्या मताच्या कंटेट व्हॅल्युवर हवे, कोणी व्यक्त केलेय त्यावर नाही.
बाकी यावर आधी अनेकदा बोललो आहोत त्यामुळे माझ्याकडून इत्यलम
हिटलरने शांततेवर केलेले भाषण,
हिटलरने शांततेवर केलेले भाषण, स्वतःच्या बायकोला रोज मारहाण-शिवीगाळ करणार्या पुढार्याचे स्त्रीपुरुषसमतेवरचे भाषण, इ. तुम्हांला सीरियसलि घ्यायचे असेल तर घ्या की. अगदी अवश्य घ्या, तुम्हांला सांगणारा मी कोण?
पण समाज एखाद्या मतास स्वीकृती देण्याची शक्यता तेव्हाच जास्त असते, जेव्हा अशी काहीएक सुसंगती दिसते. तुमच्यासारखा विचार समाज करत नसल्याने समाजाचे नुकसान झाले असेल तर तसे सप्रमाण दाखवा, मग बोलू. अन्यथा हा फक्त वितंडवाद आहे.
स्वार्थी इ. असूदे की, पण मग
स्वार्थी इ. असूदे की, पण मग आचारविचारांत फरक असेल तर त्याचे मत कुणी कशाला ग्राह्य मानेल? काही बोललो स्वतः काय वाट्टेल ते आचरणार आणि ती विसंगती लोकांनी पाहू नये अशी अपेक्षा करणार्या लोकांना एक प्रश्न इच्यारावासा वाट्टो:
स्त्रीमुक्ती एट ऑल बद्दल लेक्चरे झोडून बायकोला मारणारा पती किंवा तशी लेक्चरे झोडून नवर्याला त्रास देणारी बायको यांचे विचार कोणी ग्राह्य का मानेल?
रिओ -२
रिओ -२ ३डी पाहिला. अर्थातच ईशान्यला फार आवडला. निळा मकाऊ पालतू पक्षी अमेझॉनच्या खोर्यात आपल्या स्पेसि(स)च्या इतर लोकांना भेटतो नि लाकूडतोड्यांना अद्दल घडवतो अशी रोचक कहाणी आहे.
माझा ३-डी चष्मा खराब होता कि चित्रपटात दुरच्या गोष्टींसाठी शार्पनेस साधता आला नाही, माहीत नाही, पण कुंगू फू पांडा सारखा क्लिअर वाटला नाही.
विकांताला न पाहिल्याने दिल्लीत पहिल्यांदाच ३०० रु.ला तीन तिकिटे आली, अन्यथा विकांताला ३डी म्हंजे फार खर्चिक (याच्या चौपटीपेक्षा जास्त) प्रकरण असायचे.
तंत्रज्ञानाला दोष द्यायचे दिवस ३डी बाबत अजून आहेत.
तुम्हाला ३डी मधे पाहायला आवडत नाही म्हणून मी काही कॉमेंट देऊ शकत नाही. हे ३ डी पट ३डी मधेच पाहावेत, तेच त्यांचे बलस्थान असते. रिओ -१ मी घरी ३ डी टीव्ही वर पाहिला. त्याची क्लॅरिटी अमेझिंग होती. थेटरात रिओ-२ अस्पष्ट वाटला. पण तो जर तितकाच स्प्ष्ट दिसला असता तर रिओ -१ पेक्षा खचितच कितीतरी पट सरस आहे. ( आता आम्हा तिघांच्या वाट्याला जे चष्मे आले होते त्यात प्रत्येकात क्लॅरिटी वेगवेगळी होती. शेवटी मी माझा चष्मा बदलला, दुसरा मागून घेतला. तरीही सीनमधे सर्वात दूरचा एरीया अंधुकच दिसत होता. ) अमेझॉनचे खोरे, दुसरे काय. उदा. अर्जेंटीना, ब्राझिल नि पेराग्वेची सीमा!
अटोनमेंट - २००७
काल रात्री अटोनमेंट (२००७) बघितला.
मला अत्यंत आवडला.
एक साधी कथा इतक्या वेगळ्या प्रकारे फुलवली आहे की एकेक भुमिका लक्षात रहाते. एका मुलीच्या नजरेतून घडलेली एक घटना, एक गुन्हा आणि तिने दोषी ठरवलेल्या व्यक्तीला भोगायला लागलेले भोग, दुसर्या युद्धात होरपळणारी जनता, होरपळलेली शहरे, होरपळलेले नातेसंबंध यांच्या पार्श्वभूमीवर या कथानायिकेचे होरपळलेले, पश्चातापदग्ध मन याचा इतका "दृश्य" अविष्कार रेअर असावा.
काहिसा संथ, सुरवातीला गोंधळवणारा चित्रपट, जरा 'टडे रहके' बघावा लागतो, पण एकदा का कथेने पकड घेतली की थेट संपेपर्यंत बेचैन करते.
मुव्ही संपल्यावर खरंतर डोक्यात तरळणार्या दृश्यांनी मुव्ही बघताना वाटली त्याहून अधिक आवडु लागली असा एक दुमिळ अनुभवही आला.
माझ्याकडून ८/१०, नक्की बघा ही शिफारस!
जाता जाता: बेनेडिक्ट कंबरबाकचीही एक छोटेखानी महत्त्वाची भुमिका यात आहे.
द वुमन इन ब्लॅक
"द वुमन इन ब्लॅक" (१९८९) हा सूसन हिलच्या भूतकादंबरीवर आधारित टीवी चित्रपट पाहिला. ही एक पारंपरिक भूतकथा आहे. ब्रिटनमध्ये समुद्रकिनारी वसलेल्या एका छोट्या गावात एकट्या राहणार्या एका श्रीमंत विधवेच्या मृत्यूनंतर शहरातून तिचा वकील त्याच्या हाताखालील एका तरूण सॉलिसिटरला तिच्या इस्टेटीची विल्हेवाट लावण्याकरिता तिच्या गावी धाडतो. गावातील लोक मात्र तिच्याविशयी बोलायला, गावापासून थोड्या अंतरावर असलेल्या तिच्या घरापर्यंत त्याच्यासोबत जायला तयार नसतात. त्याला दिसणार्या कृष्णवस्त्रांकित बाईविषयीही कोणी काही बोलत नाहीत, किंबहुना ती दिसते हे मान्यच करत नाहीत. चित्रपट जसजसा पुढे सरकतो तसतशी त्यावर रहस्याची, गूढतेची व भीतीची गडद छाया दाटत जाते. गोष्टीबद्दल अधिक सांगितल्यास पाहू इच्छिणार्यांचा रसभंग होईल. चित्रपटात रक्तपात, कापाकापी, कोथळे निघणे, एलियन इत्यादी नाहीत. आहे तो चांगला अभिनय व दिग्दर्शन, प्रभावी वातावरणनिर्मिती व थरारक समारोप. भयपट म्हणजे केवळ रक्तमांसाचा चिखल नव्हे असे मानणार्यांनी अवश्य पाहावा असा हा चित्रपट आहे.
(ह्याच कादंबरीवर २०१२ सालीही ह्याच नावाने एक चित्रपट आला होता. त्यात प्रमुख पुरुष भूमिकेत डॅनियल रॅडक्लिफ होता. हॅरी पॉटर चित्रमालिकेनंतर हा बहुधा त्याचा पहिला महत्त्वपूर्ण चित्रपट असावा.)
२ स्टेट्स
एखादं पुस्तक आपण वाचतो नी ते आपल्याला फारसं काही आवडत नाही पण वाचतानाच इतकं जाणवतं की त्यात पुरेपूर हिंदी फिल्मी मसाला आहे. काही वर्षांतच त्यावर हिंदी बॉलिवुड पट बनतो सुद्धा!
अर्थात २ स्टेट्स बद्दल बोलतोय. एक अत्यंत ठोकळेबाज व काहिशी रटाळ कथा, त्यात काही तद्दन फिल्मी मसालेदार प्रसंग घालुन फुलवलेली. एक पुस्तक म्हणून फारसे (खरंतर बर्यापैकी) आवडले नसले तरी कदाचित टिपिकल हिंदी चित्रपट म्हणून तरी निव्वळ करमणूक होईल म्हणून बघायला गेलो. मुळात कथा आणि पटकथा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत यावर हिंदी चित्रपट सृष्टीत कोणाचा समज असेलसे वाटत नाही. हा चित्रपट बनवण्यापेक्षा त्याचा अभिवाचनाचा कार्यक्रम करायला हवा होता, बर्याच स्वस्तात झाला असता.
कादंबरीहून रटाळ चित्रपट, कंटाळवाण्या पारोश्या चेहर्याने सबंध चित्रपटभर वावरणारा नायक, तितकेच टुकार संगीत - ध्वनी - प्रकाश व मोठ्या स्क्रीनवर हाऊसफुल गर्दित तल्याने कमी पडणारा एसी यामुळे पुरता वैतागुन गेलो. त्यातल्या त्यात हिरवाईनीने आपले सुंदर दिसण्याचे काम चोख बजावल्याने मधेमधे डोळे सुखावत होते. शिवाय दोघांच्याही पालकांच्या भुमिकेत असणार्या चौघांनीही आक्रस्तळेपणा सोडून अपेक्षेहून बरीच उजवी भुमिका केली आहे. शिवाय पार्श्वभूमीला दिसणारे वास्तवदर्र्शी घरे, बिल्डिंगा, दारू पिणार्या पंजाबी बायका (हा हल्ली नवा स्तिरीयोटाईप होतोयसं दिस्तय - वास्तवदर्शी चित्रण म्हणजे दारू पिणार्या पंजाबी बायका आल्याच पाहिजेत :( ), कचर, तुंबलेली गटारे, वायर्समुळे झालेली विद्रुप शहरे जसेच्या तसे येत असल्याने किमान चित्रपटाला एक वास्तवदर्शी अवकाश मिळते.
बाकी, अधिक काय लिहिणे ४/१०, फुकट मिळाला नी दुसरे काहीच करायला नसेल तर झोप येईपर्यंत पहा!
ब्लाइन्ड चान्स
किस्लोवास्कीची ब्लाइन्ड चान्स (१९८७)हि फिल्म , ट्रेन चुकण्या सारखी एक घटना एखाद्या सामान्य माणसाच्या जीवनात कशाप्रकारे बदल घडवू शकेल या शक्यता तीन प्रकारे मांडते .पोलंड मधली अस्वस्थ राजकीय परिस्थिती , संशयाचे वातावरण आणि सुरुवातीला पात्रांची ओळख नीटशी होईपर्यंत फिल्ममध्ये ये क्या हो रहा है प्रभू ,अशी अवस्था प्राप्त झाली होती .सुमार इंग्रजी अनुवाद असलेले संवाद जास्त होतेच त्यात अस्मादिकांच्या नेत्रगतिमंदत्वामुळे काही हुकले असावेत . सिनेमा वेगळा आणि बहुदा चांगला असून मला फारसा आवडला नाही .फिल्मने माझ्या मन किंवा बुद्धीचा ताबा घेतला नाही. तर ते असो .
मूलतः अॅडम प्रवृत्तीचा, डॉक्टर असलेला नायक तिन्ही शक्यतांच्या कथाभागात, स्त्रीपात्राजवळ २ मिनिटापेक्षा जास्त वेळ आला की स्त्रीचे आपोआप वस्त्रहरण होऊन लगेच संभोगाला आरंभ व्हायचा . मैत्रीण किंवा बायको ठीक आहे पण मित्राची मोठी विवाहित बहिण असूनही याचा भगिनीभाव चुकुनही जागृत होत नाही . ते ओळखून मित्राच्या बहिणीने तुला माझ्यासोबत सेक्सायचे आहे ना म्हटल्यावर हा पडत्या फळाची आज्ञा झेलायला आतुरलेला असतोच . मित्राची बहिण ही त्याची टीनेज फ्यांटसी असते. पुढे तर हा एखाद्या पुरुषासोबत जास्त वेळ दिसला तरी मला धडधडायला होऊ लागले की आता यातून काही दिव्य दर्शन होऊन माझं प्राणपाखरू उडून जात की काय ....... जा उडुनी जा पाखरा ..........
किंचित मदत
गंमत म्हणून असं म्हणणं ठीक आहे, पण चित्रपटातल्या स्त्री-पुरुष संबंधांकडे थोडंसं वेगळ्या दृष्टीनं पाहण्याची आवश्यकता असावी असं ह्या प्रतिसादावरून सूचित होतं. किंचित मदत म्हणून सांगतो -
राजकीय परिस्थितीवर टीका हा ह्या चित्रपटाचा गाभा आहे. कम्युनिस्ट राजवटीत माणसाचं काय व्हायचं हे त्यात दाखवलं आहे. पण ते तेवढ्यापुरतं मर्यादित नाही, तर जगण्यातली अब्सर्डिटी हासुद्धा चित्रपटाचा गाभा आहे. म्हणजे काय, तर काही शक्यतांमध्ये नायक कम्युनिस्ट असेल, तर काहींत त्याच्या विरोधात असेल; त्याला कौटुंबिक स्वास्थ्य मिळेल किंवा अनेक स्त्रियांचा सहवास मिळेल; कधी तो धर्मिक असेल, तर कधी नास्तिक असेल, पण अखेर त्याला काय गवसतं? काहीही झालं तरी त्याची गोचीच आहे. जगण्याच्या वेगवेगळ्या पैलूंमध्ये राजकारण, धर्म अशांसारख्या गोष्टींबरोबरच कौटुंबिक जीवन, स्त्री-पुरुष सहवास आणि पर्यायानं शरीरसंबंध ह्यांचाही समावेश आहे. त्यामुळे 'काहीही केलं तरी अब्सर्डिटी आहेच' ह्या विधानाला सर्वसमावेशकता आणि वजन येतं.
आणखी एक गोष्ट - जगणं जितकं अधिकाधिक कठीण होत जातं तितकं माणूस इतरांच्या सहवासानं ते सुसह्य करण्याच्या आशेत डेस्परेटली वाहात जातो. कम्युनिस्ट राजवटीत असं व्हायचं (इतरत्र होत नाही असं नाही). अशा परिस्थितीत सहवाससुखाच्या आनंदाच्या शक्यता असलेला एक भाग म्हणून शरीरसंबंधांकडे पाहायला हवं. त्यामुळे तो कौटुंबिक सुखाहून पूर्णपणे भिन्न असा एक महत्त्वाचा घटक होतो. आपल्याकडे ह्या वास्तवाकडे दुर्लक्ष केलं जातं (प्रत्यक्ष आयुष्यातही आणि कलाविष्कारातही). त्यामुळे वेगळ्या संस्कृतीतले कलाविष्कार घेताना आकलनाच्या काही अडचणी उत्पन्न होण्याची शक्यता वाढते.
चित्रपटाला एका परीकथेचं अंग
+१. डायरे़क्टरने पण हे सांगायचा प्रयत्न केला आहे. कंगना राणावत अॅम्सस्टरडॅममध्ये २-३ दृश्यांमध्ये alice in wonderland चा स्वेटशर्ट घातलेली दिसते.