जर्मनी - स्वित्झर्लँड : अन्न

१.तयारी | २.अन्न | ३.लोक | ४.वास्तव्य | ५.प्रवास व घटना | (६.समारोप)
नोंदः
१. माझी पत्नी गौरी हिने या लेखात घातलेली भर हिरव्या रंगात आहे. (टंकन मीच केले आहे - ते शुद्धलेखनातील चुकांवरून समजेलच म्हणा).
२. लेखात छायाचित्रे अगदी गरजेचे वाटल्याशिवाय घातले जाणार नाही. क्षमस्व! शब्दांतून प्रत्येकासाठी एक चित्र मनात उभं रहातं ते त्याच्यापुरतं तसंच राहु द्यावं असं माझं जुनं मत इथे चिंत्य आहे. लेखमालेच्या शेवटी निवडक छायाचित्रांची वेगळी लिंक दिली जाईल.
३. या भागात काही पदार्थांबद्दल अधिक माहिती समजावी यासाठी विकीदुवे दिले आहेत. तिथे पदार्थांची चित्रेही मिळतील
=====
प्रवासवर्णनाची सुरुवात ही प्रवासाची कशी सुरुवात झाली, कोणकोण सोडायला आले होते, विमानाचा नाहीतर गेलाबाजार ट्याक्सीवाल्याने घातलेला गोंधळ, मातृभूमीला वगैरे सोडताना एका डोळ्यात आलेले पाणी नी दुसर्‍या डोळ्यातली उत्सुकता (हे नेमके कसे करतात ते पर्यटकच जाणोत. काहिंना एकच भिवई उंचावता येते, मला एक डोळा मारता येतो, काहिंना दोन्ही बुब्बुळे नाकाजवळ नेता येतात पण हे एका डोळ्यात पाणी नी दुसर्‍यात उत्सुकता कशी काय जमवतात बॉ - बहुदा एका डोळ्यात बोट घालत असावेत - हे मला नेहमी पडलेले कोडेच आहे.), परदेशातील विमानतळावरचे चकचकीतपणा, कित्ती कित्ती बै स्वच्छता नैतर आपल्या देशात कश्शी कश्शी बै घाणच घाण, त्या लोकांचा वक्तशीरपणा कस्सा ग्रेट - ट्रेन ९-११ म्हणजे ९:११ला सुटली वगैरे वर्णने करून करायचा संकेत आहे. पण आमच्यात "आधी पोटोबा" पद्धत असल्याने भटकंती, स्थळे, अनुभव वगैरेवर बोलण्याआधी ट्रीपला केलेली खादाडी हा विषय आधी हातावेगळा करायचे ठरवले आहे.

ट्रीपचा खर्च काढताना तिथे खाणे स्वस्त नाही हे आधीच समजले होते. त्यामुळे घरातून निघताना २-३ दिवस पुरतील एवढे मेथीचे ठेपले सोबत घेतले होते - तेवढीच बचत. परंतु फ्रँकफुर्टची (अपेक्षेपेक्षा बरीच थंड) हवा लागली आणि आम्ही जणू काही सोमालियातून आलो आहोत नी कित्येक दिवस उपाशी आहोत अशी भूक लागू लागली. हा हवेचा परिणाम की भरपूर चालण्याचा यावर फार मोठा परिसंवाद न करता - तिथे ऐसीचा अ‍ॅक्सेस नव्हता ना! - खाणे सुरू केले. आता गंमत अशीये की गौरी "नो मीट" पंथातील आहे नी मी घराबाहेर "ओन्ली मीट". हाटेलवर गेल्या गेल्या चापलेले ३-४ पराठे पुढील दोन तासात कुठे जिरले देव जाणे पण भयंकर भूक दोघांनाही लागल्यावर समोर उत्तम टाऊन हॉल दिसत असूनही आमची अकरा नंबरची गाडी शेजारच्या बेकरीकडे वळली.

पहिल्याच दिवशी उत्कृष्ट खाण्याने सुरुवात झाली. जर्मन बेकरी प्रॉडक्ट्सबद्दल ऐकले होते, जालावर अनेकदा वाचले होते पण प्रतिमेहून प्रत्यक्ष उत्कट असा क्वचित मिळणारा अनुभव इथे आला. इथे खाण्यासारखे काही असेल तर 'ब्रेड', न वाचता येणारी नावे -वाचता आली तर प्रत्यक्षात वेगळाच उच्चार असल्याचे लक्षात आल्याने- लवकरच आम्ही मांडलेल्या सँडविचांकडे बोट दाखवून "व्हेज?" असा सवाल करू लागलो. हे ही लवकरच कळले की जर्मन लोक g या अक्षराचा उच्चार प्रामाणिकपणे 'ग' असा करतात नी सँडविच हे 'व्हेजी' नसून 'व्हेगी' असते. हातात आलेले सँडविच काही मिनिटात गट्टम होऊ लागले. खरंतर या सँडविचांमध्ये फारसे काही वेगळे नसायचे आईसबर्ग लेट्युस, प्रसंगी चायनीज लेट्युस (स्टेम लेट्युस), रोमन लेट्युस (सिझर सलाडमध्ये वापरतात ते), शिवाय काही फ्रेश अर्ब्ज , पिकल्स, काकडी, टोमॅटो, उकडलेली अंडी (आणि माझ्या सँडविचात एक/दोन प्रकारच्या मीटचे स्लायसेस), सॉल्ट-पेपर नावाला नी चविष्ट चीज! पण मुळातच ब्रेड्स इतके चविष्ट असायचे की पुछो मत!

या ब्रेड्सपैकी काही ब्रेडप्रकारांचे नाव घेणे अनिवार्य आहे. एक आहे 'बटरब्रेझल'. एकूणच विविध प्रकारचे व चवींचे प्रेझल्स जर्मनीत सर्रास दिसतात. पैकी सर्वात कॉमन असणारे व बटरब्रेझेल नावाने ओळखला जाणारा हा ब्रेड, जर्मन लोकांच्या रोजच्या नाश्त्याचा महत्त्वाचा भाग. सॉल्टेड प्रेझेलला आत-कधी थोडे वरूनही - मुबलक बटर चोपडून आपल्याला दिले जाते, सोबत कपुचिनो किंवा लाटे घ्यावी अतिशय (तुलनेने) स्वस्त नी मस्त ब्रेकफास्ट. 'वेगी' लोकांना जर्मनीत निव्वळ वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड्स खाऊन महिनाभर राहता यावे. बटर ब्रेझल व्यतिरिक्त सिसमी, सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया वगैरे चिकटवलेले प्रेझल्स वगैरेही तसेच रुचकर असतात. (आम्रिकन कसे 'बेगल्स' वर पुष्ट होतात तसे हे प्रेझल्स इथे हाथोहाथ खपतात. नी त्या बेगल्ससारखेच बरीच व्हरायटी असलेले आणि किंचित अधिकच चविष्ट वाटले.)

वेगी नसणार्‍या अर्थात तिथल्या सामान्य मंडळींच्या हातात या विविध प्रेझेल्स/ब्रेझेल्स सोबत वेस्सवर्स्ट (Weißwurst) नावाचे सफेद सॉसेजही दिसते. क्वचित प्रेझेल ऐवजी लाय्-रोल नावाचा गब्बु ब्रेडही दिसतो (तो खाऊन बघितला नाही). जर्मन सॉसेजेस हा ही तसा थोर प्रकार. त्यातही करीवर्स्ट नावाचा हॉट-डॉगसम दिसणारा प्रकार तर अतीथोर आहे. ब्रेड, लाल सॉसेज आणि त्यावर 'करी सॉस' नावाचा एक अतिरुचकर सॉस घालून हा प्रकार नाक्यानाक्यावर खिलवला व खाल्ला जातो. सॉसेजबरोबर हा करी सॉस या कॉम्बिनेशनच्या तर प्रेमातच पडावे इतका तुफान लागतो. जर्मनीत सगळे लेकाचे/लेकाच्या किमान सहा फूट उंचीचे नी सतत काहीतरी खात नाहीतर बोलत असताना दिसतात. मात्र खरंच आम्हालाही भारतापेक्षा जास्त भूक लागू लागली, नी विविध ठिकाणी फिरताना आमच्याही हातात अनेकदा सँडविच दिसू लागले.सुरवातीला एका जागी बसून वगैरे खाणारे आम्ही, ट्रीप संपेपर्यंत जर्मनांसारखे जिथे जायचे आहे तिथे खात खात हिंडू लागलो होतो.

सकाळचा नाश्ता व मधल्या माफक खाण्याची जबाबदारी सँडविचेसने/ब्रेझनले/ब्रेड संप्रदायाने उचलली होती तरी इतर खाण्याच्यावेळी प्रत्येक दिवशी काही अनोखे अनुभव आले. हेडलबर्गला आम्ही पहिल्यांदाच हॉस्टेलवर राहिलो होतो. हेडलबर्ग हे गेली काही शतके युनिव्हर्सिटी टाऊन आहे. इथे आम्ही 'लोट्टे' नावाच्या अतिशय लहान व दोन मैत्रिणींनी मिळून चालवलेल्या हॉस्टेलवर राहिलो होतो. इथे २० ते २५ लोकांची राहायची सोय होती. भरपूर भांडी, मसाले, सॉस वगैरेंनी सुसज्ज एक किचनही होते (इतरही बरेच काही इंटरेस्टिंग होते पण ते वेगळ्या भागात). इथे आम्ही संध्याकाळी भटकून पोचलो. ट्रीपचा दुसराच दिवस असल्याने ठेपले शिल्लक होते. आम्ही हेडलबर्गचा किल्ला बघून परतलो होतो. बाहेरून मस्त आइसक्रीम खाऊन आलो होतो. इथे खाल्लेल्या तिरामिसु फ्लेवरच्या आईसक्रीमची चव अन्य कोणत्याही शहरात मिळाली नाही. तरी आल्यावर भूक लागली. पुन्हा खादाडी-रस्ता ५ मिनिटांवर असला तरी बाहेर पडायचे जीवावर आले होते. मग मोर्चा ठेपल्यांकडे वळवला. किचनमध्ये मायक्रोवेव्ह होता त्यात गरम करू, आदल्या दिवशी घेतलेले दही होते ते व सोबत नेलेली दाण्याची चटणी असा बेत डोक्यात होता. किचनमध्ये गेलो तर काही कोरियन मंडळींची धावपळ चालली होती. ही मंडळी फुलफ्लेज्ड जेवण बनवत होती. आम्ही तिथे ते बघत थांबलो. प्रत्येकाने आपल्याला हवे ते सूप करून घेतले, शिवाय नूडल्स, भात सगळे काही तयार होत होते. चार शेगड्यांवर चार पदार्थ कोणत्याही गोंधळाशिवाय बनत होते.

मायक्रोवेव्ह रिकामा झाला. आम्ही ठेपले गरम करून घेतले. डायनिंग टेबलवर आलो तर आमच्याच खोलीत राहणारे कोरियन मुलगा-मुलगी तिथे किचन रिकामे व्हायची वाट पाहत बसले होते. सुरवातीच्या हाय नी येता जाता दिलेली स्माईल सोडल्यास बोलणे झाले नव्हते. आमचाही पहिलाच हॉस्टेल अनुभव असल्याने काहीशी भीड होतीच. कोरियन मुलीने तोडक्यामोडक्या इंग्रजीत सुरुवात केली. सोबतच्या मुलाची ओळख तिने "ही इज माय फादर" अशी करून दिल्यावर मात्र आम्ही खुर्चीतून सव्वा इंच उडालो. इतक्यात त्यांना जागा मिळाली नी ते जेवण बनवायला गेले. मी नी गौरीने तोवर "हा तरुण दिसणारा मुलगेलासा पुरूष तिचे वडील आहेत!!?. काय ना! या कोरियन लोकांकडे बघून त्यांचे वय समजतच नाही. ते मासे खूप खातात ना त्यामुळे त्यांची स्कीन इतकी तजेलदार असते." वगैरे बरेच रिकामपणाचे गॉसिप करून घेतले. नंतर ती परत आली नी मग समजले की तो तिचा भाऊ आहे. तिला म्हणे भावाला 'ब्रदर' हा विंग्रजी शब्द आठवत नव्हता :). आम्हाला आमच्याच गॉसिपवर खूप हसू आलं. अजूनही तो बसलेला धक्का आठवून आम्हाला चांगलंच हसू येतं. तिचा भाऊ जर्मनीतच शिकतो नी ही सुट्टीत त्याच्यासोबत जर्मनी बघायला आली होती. थोड्यावेळाने ती किचनमध्ये गेली नी भाऊ परत आला. तोवर गौरीने दोन पराठे प्लेटमध्ये काढले होते व त्याच्या समोर प्लेट करून त्यातील तुकडा चवीपुरता खाऊन बघ असं बोलून त्याच्या पुढे केला. अगदी कॅज्युअली एका हाताने! त्याने मात्र तुकडा तोडण्याऐवजी अख्खी प्लेटच घेतली, दोन्ही हाताने नी अगदी कमरेतून वाकून - तेही तीनदा - आम्हाला थँक्यु पोचवला. नशीब आम्ही काही ठेपले खाल्ले होते नी प्लेटमध्ये दोनच ठेवले होते, नाहीतर ती रात्र कोरियन जेवण जेवून घालवायला लागली असती ;). तसे त्यांनीही त्यांचे जेवण दिले. ते सॉसेजेसच्या तुकड्यांनी भरलेले सार/सूप होते. मला ठीक वाटले. त्यातली सॉसेजेस गट्टम केली मग फारसे सूप उरलेच नाही.

वेगी लोकांना 'फलाफल' हासुद्धा एक चांगला ऑप्शन जर्मनीत सर्वत्र उपलब्ध आहे. जर्मनीत येणारे "तुर्की" हा सुद्धा पश्चिम, दक्षिण जर्मनीत चर्चेचा विषय आहे. आपल्याकडे भैय्याकडे जसे बघितले जाते तसे इथे तुर्की मंडळींकडे. मात्र त्याच लोकांमुळे सर्वत्र अतिशय चविष्ट फलाफल मिळते. अमेरिकेत खाल्लेले फलाफल मला आवडायचे, इथे तर अधिकच आवडले. अमेरिकेत व भारतातही पिटाब्रेड बरोबर (पिशवीसदृश आकारात) दिले जाणारे फलाफल इथे मात्र बहुतेक ठिकाणी एका रॅपमध्ये गुंडाळून दिलेले असते (अर्थातच खात-खात चालायचे असते ना! म्हणून Smile ). इथे मिळणार्‍या हमुस वगैरेत अस्सल ऑलिव्ह ऑइल असल्याची खात्री वाटावी अशी चव असते. ते भाजणीचे वडेही किंचित वेगळे लागतात मात्र तेही रुचकर! इथे फलाफलमध्येच असे नाही तर बर्‍याच पदार्थात खारवलेले नवलकोल, खारवलेला कांदा वगैरे गोष्टीही घातल्या जातात. मला त्यांची चव आवडली, गौरीला मात्र ते घटक आवडले नाहीत. (विकी दुव्यावरील माहिती/चित्रे आर्मिकासेंट्रिक वाटली.)

आम्ही स्टुटगार्टजवळ ब्लॅकफॉरेस्टच्या वाटेवरील एका लहान काउंटित राहत होतो तेव्हा एका खास जर्मन पब कम रेस्तरॉमध्ये रात्रीच्या जेवणाला गेलो होतो. अगदी छोटेखानी रेस्तरॉ - पब. एकावेळी १०-१२ लोकांनाच बसायची सोय. अशा ठिकाणी असते तशी मंद दिव्यांची रचना. त्या हॉटेलच्या मालकीणबाईंचे आवडते कुत्रे इथे-तिथे करत होते नी सारखे नव्या कस्टमरवर भुंकत होते. गौरीने आपली कुत्र्यांबद्दलची भिती माफकशा किंकाळीसह आवाजी मतदान करून व्यक्त केल्यावर त्या बैंनी त्याला बांधून ठेवले. आजूबाजूची पहाडासारखी उंच 'कष्टंबर'लोकं वेगवेगळ्या रंगाचे मांसाचे लचके तोडत, मोठमोठ्याने हास्यविनोद करत होती. स्मितहास्य वगैरे नाजूक प्रकार तिथल्या बायका/मुलींनाही करताना पाहिले नाही. तिथे मी आधीच 'श्नित्झेल' ट्राय करायचे ठरवलेले होते. त्या बिचार्‍याने मला श्नित्झेल कशाबरोबर हवे हे विचारले असावे कारण त्याने इंग्रजीत राईस? ब्रेड? की जर्मन नूडल्स? (Spätzle) असे विचारले नी मला साउंड ऑफ म्युझिक या चित्रपटातील (ज्यातूनच हा पदार्थ मला कळला होता)'These are few of my favorite things' गाणे अक्षरशः मनात गाऊन श्नित्झेल विथ नूडल्स मागवले. श्नित्झेल हे मूलतः पोर्कचे बनले असते, मला ते तसेच खायचे होते. पण आधी न विचारल्याने/सांगितल्याने समोर चिकनचे आले. अर्थात तेही उत्तम होते. पण त्यासोबत दिलेल्या नूडल्ससारख्या प्रकाराला अंड्याचा प्रचंड वास येत होता. मला ते अजिबातच खाववले नाही. मात्र, निव्वळ श्नित्झेल इतके चविष्ट निघाले की माझे जेवण ते व सोबत आलेल्या अतिशय अनोख्या सलाडसह (त्याचे ड्रेसिंग वेगळे होते) पोट भरले (अर्थात ड्रेसिंग कोणते वगैरे विचारून समजणे अवघडच - भाषेचा प्रश्न. ऑर्डरच कशीबशी पोचवली होती मेनूवर बोटं ठेवून).

आम्ही नंतर एकदा स्टुटगार्ट जवळच्या एका खेड्यात गाव-जत्रा भरली होती तिला गेलो होतो. फुल टु धमाल चालू होती. अगदी "ट्रॅडिशनल" ड्रेसमधील मुलामुलींचे जत्थेच्या जत्थे स्टेशनवरून जत्रेच्या मैदानात चाललेले दिसत होते. जाताना पठ्ठे मोठेमोठ्याने गाणी म्हणत होते. जत्रेच्या ठिकाणी पोचेपर्यंत तर या गर्दीचे प्रमाण बरेच वाढले. पुढे सरकायला मिनिट मिनिट जाऊ लागला. इथे प्रत्येकाच्या हातात बियरच्या बाटल्या होत्याच, सोबत एकमेकांना दारूत नहा(व)णे, त्याचवेळी दुसर्‍या हातातील पदार्थ खाणे, नव्या मित्रमैत्रिणी आल्यावर पुन्हा एकदा बियरची राउंड, मग गोल करून नाचणे, चुंबनांची देवाणघेवाण, वेगवेगळ्या दारूच्या झाकणांच्या उघडण्याचा आवाज, त्यात वेगवेगळ्या खेळाच्या तंबूत जायची घाई, दूरवर चालू असलेल्या डिस्कोचा ठेका, काही रोलरकोस्टरसारख्या (फक्त आकाराने लहान) खेळण्यांचे आवाज, काही ठिकाणी सोडलेला धूर याने एकूणच वातावरणात वेगळाच कैफ भरलेला होता. बरं अशा ठिकाणी मुलांना आणू नये वगैरे काही संकेत दिसले नाहीत अगदी न चालता येणार्‍या पोरांना ढकलगाडीतून आणले होते. अर्थात, जो काही दंगा चालू होता तो आपापल्या ग्रुपमध्ये इतरांना त्रास नव्हता. आम्ही सुद्धा काही टाईमपास गेम्स खेळलो, आमच्या घरासाठी एक लाकडी नेमप्लेट करून घेतली नी मग पोटपूजेसाठी काय खावे विचार करत होतो. इतक्यात नजर हंगेरीयन Lángos लिहिलेल्या एका गाडीकडे वळली. तिथे गेल्यावर त्या बयेला विंग्रजी येत होते. तिने सांगितले की हा खास हंगेरीयन ब्रेडचा प्रकार आहे, हा ब्रेड तळलेला असतो. वेगवेगळे हंगेरीयन सॉस, चीज, व काही खट्ट्या-मिठ्या पावडरी यांच्यासोबत तो खायचा. आम्ही आधी दोघांत मिळून एक घेतला. तळून काढलेला हा पाव व त्यावर पसरलेले भरपूर भरपूर चीज, मेयो, चाट मसाल्याच्या लाईनीवर जाणारा कसलातरी मसाला हे कॉम्बिनेशन अतिचविष्ट होते. फक्त भरपूर जड होता. दोघांत एक खाऊनही बास झाले. बाकी खाताना सभोवती फिरणारी 'ट्रेडिसनल' हिरवळ दोघांचेही डोळे सुखावत होती हे तो ब्रेड आवडण्याचं कारण नसावं Wink

आईसक्रीम, केक्स, पेस्ट्रीज, कुकीज, बिस्किटे, गोळ्या, चॉकलेटे (लहान मुलांची हरिबो'ज) वगैरेवर लिहायचे ठरवले तर अजून एक वेगळा लेख होईल. सुदैवाने स्वतःच गेलो असल्याने वेगवेगळ्या शहरातील गल्लीबोळातून भटकताना याही प्रकारचेही खाणे चिक्कार खाल्ले. (गोळ्या-चॉकलेटांची वेंडिंगमशीन्सच असायची काही सेंट्समध्ये उत्कृष्ट व्हरायटी चाखायला मिळायची) पण लेखनाचीही एक सीमा असते. बाकी इथल्या अनेक पदार्थांच्या आठवणी पुढील कित्येक दिवस खरंतर कित्येक वर्षे आठवणींचे कढ काढून झुरायला पुरेशा आहेत.

=======
गौरी:
माझ्यासाठी इतर काही खायला मिळाले नाही तरी 'वेगी बर्गर' सर्वत्र मिळे. स्वित्झर्लँडला इंटरलाकेनमध्ये एक लहानसे दुकान आमच्या यूथ हॉस्टेलच्या समोरच्या चौकातच होते. तिथे आम्ही बर्गर खायला गेलो. मॅकडी किंवा बर्गर किंगमधे एकाच चवीचा बर्गर मिळतो. इथे मात्र त्याने कटलेटपासून सगळे आमच्या समोर बनवले. अगदी ताज्या सामग्रीने आणि कोणता सॉस, कोणते चीज वगैरे विचारत, तयार झालेला तो कस्टमाईज बर्गर मला अतिशय आवडला. वर ऋषिकेश म्हणाला तसे सँडविचेसही बरीच ट्राय केली, नी ब्रेड्स चवीला अप्रतिम असल्याने आवडलीही. पण मुळात ती थंड अर्थात कोल्ड सँडविचेस होती. ती ट्रीपच्या शेवटच्या दिवसात खायचा कंटाळा येऊ लागला होता.

शेवटचे दोन दिवस होते आणि आम्ही म्युनिकमध्ये होतो. आतापर्यंतची ट्रीप आम्ही ठरवलेल्या बजेटच्या आतच होती. काही म्युझियम्स अनपेक्षितपणे स्वीस-पासमध्ये कव्हर्ड असल्याने थोडे पैसे वाचले होते. (एरवी स्विस भलतेच महाग!). तेव्हा अपेक्षेपेक्षा काही ठिकाणी खर्च कमीच झाला होता. तेव्हा आम्ही 'वेल इन बजेट' होतो म्हणा किंवा आता पोळी-भाजी खायची गरज वाटायला लागली होती म्हणून म्हणा, पण किमान मलातरी वाटायला लागलं होतं की आता इंडियन रेस्टॉरंट ट्राय केलं पाहिजे. आमचा प्रश्न असा होता की आम्ही म्युनिकला एका जर्मन कुटुंबाकडे उतरलो होतो. हे जर्मन कुटुंब म्युनिकच्या एका उपनगरात राहत होतं. तो भाग पूर्णपणे रेसिडेन्शियल असला तरी त्या भागात आम्हाला औषधालाही इंडियन दिसले नव्हते.

त्या दिवशी आम्ही रात्री काय जेवायचे हे ठरवत असताना वाटेत "आंगन" नावाची पाटी दिसली. आधी काहीतरी जर्मन असावं असं वाटलं (कारण आम्हाला भारतीयच नाहीत तर काही वेळा मराठी शब्द त्याच अर्थाने वापरलेले दिसले होते. उदा. मॅकडीमध्ये मँगो-अननस स्मुदी सर्रास मिळे, नी 'अननस' म्हणजे खरंच अननसच होतं.)
पण ते भारतीय रेस्टॉरंटच निघालं. तेथील पद्धतीप्रमाणे मेनू कार्ड बाहेरच लावलेलं होतं. मी नी ऋषिकेशने काय खाल्ल्यास किती बिल येईल याची गणिते दारातच करायला सुरुवात केली आणि भर रस्त्यावर "अरे रोटी आणि सब्जी घेतली तर दोघांचे १८ युरो होतील" - मी
"त्यापेक्षा 'वेगी' थाळी घेऊन एक्स्ट्रा रोट्या मागवल्या तर बरंच स्वस्तात पडेल" ऋषिकेश
अशा भारतीय नवराबायकोच्या 'सुसंवादाचा' दाखला देणारे संभाषण आम्ही त्या फुटपाथवर मुक्तपणे करत होते. इतक्यात दार उघडले नी एक माणूस येऊन अस्खलित हिंदीत "आयीये अंदर, हमारे यह खाने का स्वाद बहुत अच्छा है" असं म्हणाला. त्याला काय माहीत आम्ही स्वादापेक्षा खिशाला काय अच्छा आहे ते बघत होतो. Blum 3

त्याच्या मागून आम्ही आत गेलो, एखादे भरलेले टेबल सोडल्यास अख्खे हॉटेल रिकामे होते, त्यामुळे मी सवयीने समोर जिथे रिकामी जागा दिसली नी आवडली, तिथे जाऊन बसले. ऋषिकेश मागेच उभा होता, मला कळलंच नाही की हा तिथे काय करतोय. मग मालकाने माझ्याकडे हात केल्यावर तो आला. मग मला एकदम चूक उमगली. नंतर तिथे येणार्‍या प्रत्येक जर्मन गिर्‍हाईकांकडे मी बघत होते, हॉटेल रिकामे असले तरी मालकाने निर्देश केल्याशिवाय ते जागेवर बसत नसत. आम्ही सगळी कॅल्युलेशन्स करून व भुकेचा अंदाज घेऊन शेवटी सब्जी-रोटी मागवली. आधी तो नुसता पापडच घेऊन आला सोबत २-३ वेगवेगळ्या चटण्या. हे कॉप्लिमेंटरी असेल अशी समजूत करून घेत (जी खरी निघाली पुढे) आम्ही लगेच खाल्ला. मधे बराच म्हणजे बराच वेळ गेला. काहीच येईना. आम्हाला भुकाही लागल्या होत्या. खरंतर तो छान कँडल्स लावून गेला होता. अनप्लान्ड कँडल लाइट डिनरचा योगही जुळून आला होता. पण लग्नाला चार वर्षे झाल्यानंतर (खरंतर लग्नाआधीपासूनच Wink ) जेवतेवेळी/आधी भूक लागली असता फार गप्पा आम्ही दोघेही मारत नाही - आणि भुकेल्या पोटी गप्पांचा प्रयत्न केला तर एका नव्या वादाला तोंड तुटते :P. इथे तर, आधीची ४-५ वर्षे जाऊ द्यात, गेले १३ दिवस फक्त एकमेकांशी बोलल्याने आधीच बोलायला काही (उरले) नव्हते नी हे काही आणूनही देत नव्हते. शेवटी एकदाची प्रतीक्षा संपली नी एक बाई वाडगाभर भात घेऊन आली. मी आणि ऋषिकेश एकाच वेळी ऑलमोस्ट ओरडलो "बट वी हॅवन्ट.."
"इट्स फ्री" आम्हाला वाक्य पुरं करूही न देता, हसून बघत ती म्हणाली.
आम्हाला आमच्याच वागण्याचं हसूही येत होतं नी फुकट भात मिळाल्याचा आनंदही वाटत होता. (अर्थात भाजीचेच पैसे इतके होते की इथे त्यात तांदळाचं पोतं आलं असतं Wink )

मग जरा पोटात गेल्यावर आम्हाला सभोवतालचं छान वातावरण - अ‍ॅम्बियन्स - जाणवू लागला, हॉटेलात फक्त आम्हीच भारतीय आहोत ही जाणीव झाली, कानावर पडणारा आवाज कर्नाटकी संगीत आहे हे समजलं, कँडल लाइट्समुळे एकमेकांच्या चेहर्‍यावर पसरलेला थरारता प्रकाश जाणवू लागला, अधिक पोट भरल्यावर ऋषिकेशला वाचा फुटली नी त्याने पदार्थातील चवींची चिकित्सा सुरू केली आणि शेवटल्या दिवशी शेवटी भारतीय जेवण जेवून, आइसक्रीम चापून, भरपूर बिल भरून, "जीवाचं म्युनिक" करत बाहेर पडलो आणि दुसर्‍या दिवशी भारतात निघायची तयारी करू लागलो.

(क्रमशः)
----
१.तयारी | २.अन्न | ३.लोक | ४.वास्तव्य | ५.प्रवास व घटना | (६.समारोप)

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (4 votes)

प्रतिक्रिया

छान लिहिलय. मजा आली वाचताना
ब्रेड सोडून इतर फरमेंटेड गोष्टी ट्राय केल्या का नाय? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

नाही. तसे आम्ही कर्मदरिद्री आहोत Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा भाग आवडला, 'अन्नाच्या' एवजी 'खादाडी' अधिक नेमकं झालं असतं.

रोज डायरी लिहित होतात काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डायरी लिहिलेली नाही.
नुकताच परतल्याने डोक्यात ताजे आहे.

बाकी खादाडी हे शीर्षक अधिक चपखल -> +१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋषिकेश यांना जळजळ केल्याबद्दल सक्त म्ह. अतिशय सक्त ताकीद दिली जावी. चिंतातुरजंतूंच्या शिवीविरहित तरी खौचट कमेंटी जशा लागट असतात तद्वतच फटूविरहित लिखाण असूनही फटू काय जळवतील असे जळवण्यात ऋषिकेश यशस्वी झालेले आहेत.

अप्रतिम लेखन, नुस्ते वाचूनही भूक चाळवणारे आणि तितकेच माहितीपूर्णही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> आईसक्रीम, केक्स, पेस्ट्रीज, कुकीज, बिस्किटे, गोळ्या, चॉकलेटे (लहान मुलांची हरिबो'ज) वगैरेवर लिहायचे ठरवले तर अजून एक वेगळा लेख होईल. <<

हेही येऊ द्या, कारण जर्मन खाण्याबद्दल लेख आणि Kaffee und Kuchenवर अन्याय? जनता माफ करणार नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आयला, इतकं लिहिलंय तरी कमीच वाटतंय. चाकलेटांबद्दलही लिवा की हो. अजून एक भाग वाढवा वर, हाय काय नि नाय काय!

मस्त झालाय हाही भाग. गौरीचा लेखही भारीच. Biggrin

पण तुम्ही जर्मन बियरबद्दल काहीच नाही लिहिणार? Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

छळा च्यायला!

ऋषिकेशा, छान लिहिलेस हो... अगदी तू लेखात म्हटल्याप्रमाणे फोटो न टाकताही जे साधायचं ते साधलस - तोंडाला पूर आलाय, ओठांना उगीच तो मऊ ब्रेडचा स्पर्श झाल्याचा भास होतोय, डोळ्यापुढे ब्रेड शिवाय काही दिसत नाहिये नी तो खंमग खरपूस बेकरी-ब्रेडस चा वास काही केल्या नाकातून जात नाहीये, थोडक्यात काय तर डोकं पार भंडावलय.

तरीही फोटोची वाट पाहतो आहेच लेखमालेच्या शेवटी.

ब्रेड, चिझ, बटर, मेयोनिज, वेगवेगळे सॉस, सॅलड - स्वर्ग!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रवासवर्णन लिहायची मस्त शैली. असं "स्वतः" जाण्याचं मला फार कौतुक आहे. त्यात जी बंधनं नसतात त्याचं सुख अपार आहे. शिवाय तुला ही किचकट नावं लक्षात कशी राहतात? अजून येऊ देत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आभार. सगळी नावे लक्षात नाहित.

उदा. इंटरलाकेनला एक पदार्थ खाल्ला होता. त्याचे वर्णन असे
दिसायला पिझ्झा प्रमाणे होता, पण कोल्ड. खाली बिस्कीटसदृश ठिसूळ बेस, वर अंड, फरसबी, गाजर, काही अर्ब्ज (ओळखु नाहि शकलो) होते. गोडसर चव.
मात्र यात सगळ्यात खास होते ते किंचित केशर आणि बर्‍यापैकी जायफळ! यांची हलकिशी चव!

अंड, फरसबी, जायफळ आणि बिस्किटसदृश ठिसूळ-गोडसर बेस आदींचे एकत्रित काँबिनेशन इतके जायकेदार असेल असे मला कोणी सांगितले असते तर मी त्याला वेड्यात काढले असते. याचे काहिसे वेगळेच असणारे नाव लक्षात ठेवायला हवे असे स्वतःला बजावूनही आता विसरलो आहे Sad

या पदार्थाचा फोटो घरी गेल्यावर डकवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयला! तुला सादर सादर दंडवत!
नाव हेच होतं का अजिबातच आठवत नाहिये पण पदार्थ दिसत तरी असाच होता. (जर्मन नाव किंवा स्वीत्झलँडमधील जर्मन डायलेक्टमध्ये नाव वेगळे असल्यास कल्पना नाही)

त्याची रेसिपी बघितली, त्यातही प्रेस्ट्री शेल्स (मी ज्याला खालचे बिस्कीट सदृश म्हणतोय ते) वापरलेले दिसतेय (आशा करतो दोराबजीमध्ये हे मिळेल, नैतर मागे अ‍ॅपल पाय बनवतेवेळी स्वतः बनवल्याचा अनुभव आहे म्हणा). आतील कंटेन्ट्स बदलत असतात, त्यामुळे हेच असावे!
(आणि हे असो नसो, हे कीश करायचा घरगुती प्रयत्न नक्की करणार आहे)

अनेक आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जर्मन खाण्याच्या धाग्यावर फ्रेंच पदार्थाचं गुणगान! जनता तुम्हाला माफ करणार नाही Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बघा बघा विकी काय म्हणते:
Although known as a classic French dish, the quiche originated in Germany.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'कीश काढणे' हा पीजे मारण्याचा मोह आवरला नाही Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किशेर Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इंटरलाकेन बोले तो स्वित्झर्लंड ना?

मग जर्मन काय, फ्रेंच काय, चलता है... Wink

==============================================================================================================================================
अवांतर:

The word "quiche" comes from French, which ultimately borrowed the word from Lorraine Franconian "Küeche" (meaning "cake").

(विकीवरून.)

हा लॉरेन म्हणजे तोच प्रदेश ना, जो फ्रान्स आणि जर्मनीमध्ये अनेकदा हात बदलता झाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि मग ते अजिबात गोड नसणारे, खरंतर तिखटामीठाचे असे मराठीत म्हणता येतील असे पालक-रिकोटा, टमेटो-चीज कीश असतात ते हो काय? धर्मबुडवेपणा का काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पुढील भागांची उत्सुकता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त! _/\_
फादर ब्रदर किस्सा ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लेखमाला. माहितीचे उत्तम संकलन. खाण्याच्या पदार्थांच्या वर्णनाने भूक चाळवली. ह्या देशांमध्ये प्रवास 'सुखकर' असणे म्हणजे काय याचा प्रत्यय येतो नक्कीच.

लेखनावरच भर दिलेला असल्याने (आणि तेही आवर्जून परत परत सांगितल्याने) थोडी त्याबद्द्ल टीका खिलाडूपणे घ्याल असे वाटून पुढे लिहीत आहे. शीर्षक फारच 'कोरडे' आहे-उत्सुकता न वाढवणारे, कोरडी माहिती देण्याचा उपक्रम(विकी पाने) वाटेल असे. लेखांमध्ये बै, बॉ वगैरे शब्दप्रयोग मला तरी अतिशय क्रुत्रीम (हा शब्द कसा लिहितात?असो.) वाटतात. पहिला लेख चाळून नि या लेखाची सुरूवात स्किप करून पुढे वाचले ते आवडले. या लेखात एखाद दोन फोटो चालले असते हे माझे मत. सगळ्या गोड प्रतिसादांमध्ये हा मिठाचा खडा टाकल्याबद्द्ल आगाऊ क्षमस्व.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शीर्षक बदलावेच की काय विचारात आहे. मलाहि ते कोरडे वाटते आहे.
पण एकदा दिले त्यात बदल नको म्हणून अजून तसेच ठेवले आहे.

बाकी बै, बॉ वगैरे बद्दल भापो. परंतु असे शब्द काहिशा खवचटपणा आणतात असा माझा समज आहे. साधारणतः जिथे उपरोधाने काही लिहायचे आहे तिथे ते शब्दप्रयोग केले आहेत.

बाकी हा मीठाचा खडा नसला तरी पुढेही खरोखर मीठाचे/साखरेचे खडे टाकल्यासही चालतील. नुसते गोड प्रतिसादच हवेत असं काही काही! Smile
आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बाकी फोटो नाहीत हे ही खपवून घेता येईल, पण जर्मन जत्रेचे फोटो बघायला आवडतील. डोक्यात काही कल्पना आहेत त्या कितपत खऱ्याखोट्या हे पाहता येईल. बाकी खादाडीचं वर्णन आवडलंच.

(‍ऋता, कृत्रिम - kRutrim)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रुचकर लेख!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचतोय.

युरोपात फ्रेंच, इटालियन आणि झालंच तर भूमध्यसामुद्रीक खानपानाचा दबदबा ऐकून (आणि थोडाबहुत चाखून) माहित होता. परंतु जर्मन खाणेदेखिल चविष्ट असते, ही माहिती नवी आणि रोचक आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! सुरेख वर्णन ऋषीकेश!!! अजून येऊंद्या. वाचतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान शैली!

"भाजीचेच पैसे इतके होते की इथे त्यात तांदळाचं पोतं आलं असतं"
Biggrin
आमच्या मातोश्री डिट्टो हेच म्हणाल्या होत्या...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0