'पुणे ५२' - अस्वस्थ वर्तमानावरचं टोकदार भाष्य

डिटेक्टिव्हकथा ही साहित्यविधा म्हणून मराठीत नवी नाही. बाबुराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक, सुहास शिरवळकर अशा अनेक लेखकांनी मराठीत हा प्रकार लोकप्रिय केला. त्यांच्या लिखाणामागची परदेशी मुळं ही स्पष्ट होती. मात्र परदेशी डिटेक्टिव्हकथांशी तुलना केली, तर त्यांचे मराठी अवतार खुजे वाटत राहतात. अमेरिकेत डॅशिएल हॅमेटनं मंदीच्या काळातल्या आपल्या लिखाणात चांगल्या-वाइटाच्या रुढ कल्पनांना धक्के दिले. रेमंड चॅन्डलरनं आपल्या कथांत सामाजिक वास्तवाचं चित्रण केलं. यापूर्वीची डिटेक्टिव्हकथा ही मुख्यत: दोन गोष्टींवर भर देत असे - एक म्हणजे केलेला गुन्हा पचवता येत नाही, आणि दुसरं म्हणजे अखेरच्या रहस्यभेदानं निर्दोष व्यक्तीला न्याय मिळतो. शेरलॉक होम्स किंवा अगाथा ख्रिस्तीच्या प्वारोपेक्षा चॅन्डलरचे डिटेक्टिव्ह मातीच्या पायांचे होते. त्यांनी जुने फॉर्म्युले उलटेपालटे केले. फ्रान्समध्ये जॉर्ज सिमेनोंसारख्यांनी हे धडे गिरवत चक्क मानवी अस्तित्वविषयक प्रश्नांना ह्या लोकप्रिय विधेतून हात घातला. 'ल मोंद'सारख्या उच्चभ्रू फ्रेंच वृत्तपत्राच्या विसाव्या शतकातल्या सर्वोत्कृष्ट पुस्तकांच्या यादीमध्ये चॅन्डलर, सिमेनों किंवा जेम्स हॅडली चेससारख्या लेखकांच्या पुस्तकांचा समावेश होतो, ह्यावरून जागतिक स्तरावर ह्या विधेचं साहित्यिक योगदान लक्षात यावं. मराठी डिटेक्टिव्हकथांत मात्र पाश्चात्य साहित्यातल्यासारखी नैतिक गुंतागुंत, सामाजिक-राजकीय वास्तवाचं चित्रण किंवा अस्तित्वविषयक प्रश्नांना हात घालणं आढळत नाही.

पाश्चात्य डिटेक्टिव्हकथांनी चित्रपटांनाही पुष्कळ खाद्य पुरवलं. बिली वाइल्डरचा 'डबल इन्डेम्निटी' सुप्रसिद्ध आहे. हम्फ्रे बोगार्टनं साकारलेले 'बिग स्लीप' किंवा 'मॉल्टीज फाल्कन'मधले डिटेक्टिव्ह अजरामर आहेत. अनैतिक वाटणारे पण प्रेक्षकाची सहानुभूती खेचणारे नायक, धोकादायक वाटणारी पण नायकाची आणि प्रेक्षकाची अनुकंपा मिळवणारी व्हॅम्प आणि कथानकातल्या नैतिक तिढ्याला गडद करणारं काळं वातावरण असलेले 'न्वार' चित्रपट अशी एक वेगळी विधाच ह्या प्रकारच्या चित्रपटांनी निर्माण झाली. फ्रान्समध्ये क्लूझो, क्लोद शाब्रोल अशा अनेक दिग्दर्शकांनी ह्या प्रकारच्या कथानकांवर केलेले चित्रपट आज अभिजात गणले जातात. हिंदी चित्रपटांत राज खोसला (सी.आय.डी.) शक्ति सामंत (हावडा ब्रिज), गुरु दत्त (बाझी) यांच्या काही चित्रपटांत ही न्वार चित्रपटांची वैशिष्ट्यं दिसतात. मराठीत मात्र डिटेक्टिव्हकथांवर आधारित आणि अशी गुणवैशिष्ट्यं असणाऱ्या चित्रपटांची परंपरा निर्माण झालेली दिसत नाही. ह्या पार्श्वभूमीवर निखिल महाजन दिग्दर्शित 'पुणे ५२' ह्या ताज्या चित्रपटानं मराठीत काहीतरी अनोखं करून दाखवलं आहे असं म्हणता येईल.

(चित्रपटाचं कथासूत्र अनेक परीक्षणांमध्ये आलेलं आहे. त्यामुळे इथं ते वेगळं दिलेलं नाही, तर मांडलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगानं गरजेपुरता त्याचा उल्लेख केला आहे.)

९०च्या दशकात पी.व्ही. नरसिंह रावांच्या सरकारनं अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवले. त्याची फळं आजचा मध्यमवर्ग चाखतो आहे. भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातला हा एक महत्त्वाचा कालखंड होता. अनेक गोष्टी ह्या काळात बदलू लागल्या. मध्यमवर्गाच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीतही त्या काळानं मोठे बदल घडवले. हे सगळं आपल्याला परिचित आहे. पण त्याकडे वेगळ्या नजरेनं पाहण्याचा प्रयत्न 'पुणे ५२' करतो.

अमर आपटे (गिरिश कुलकर्णी) हा खाजगी डिटेक्टिव्ह आपल्या कामात वाकबगार आहे, पण लौकिक आयुष्यात अयशस्वी आहे. त्याच्या बायकोनं (सोनाली कुलकर्णी) घरच्यांचा रोष पत्करून त्याच्याशी लग्न केलेलं आहे. बिलं थकवून थकवून ती कसाबसा संसार रेटते आहे. नवरा आपल्यावर प्रेम करतो; तो आपल्याशी प्रामाणिक आहे ह्याचा तिला रास्त अभिमान अाहे. पण 'तुला सुखात ठेवता येत नसेल तर ह्या त्याच्या गुणांना काय चाटायचंय?' ह्या अापल्या आईच्या (भारती आचरेकर) व्यवहारी प्रश्नानं तीही निरुत्तर होते. नवरा-बायकोत पैशावरून सतत चिडचिड होते. पैशासाठीची तिची भूणभूण अमरला वैताग आणते. अशा परिस्थितीत पैसे मिळवण्यासाठी तो एक काम हातात घेतो आणि आपल्या अशीलात (सई ताम्हणकर) गुरफटत जातो. अापलं नक्की काय होतंय, हे कळायच्या आत तो अनेक पातळ्यांवर अनैतिक होत जातो. मात्र त्याची ही नैतिक अधोगतीच त्याच्या आर्थिक उन्नतीची वाट ठरते.

हा गुंता प्रेक्षकाला अनेक पातळ्यांवर भंजाळून टाकणारा आहे. सई ताम्हणकरची व्यक्तिरेखा वरवर जे दाखवते आहे तशी वस्तुस्थिती नाही, हे प्रेक्षकाला आणि अमरलाही हळूहळू लक्षात येतं. तरीही अमर तिला जाब विचारत नाही; उलट तिच्यात गुंतत जातो. घरच्या कटकटी पाहता त्याचं हे वागणं स्वाभाविक वाटतं. पण त्यामुळे मराठी चित्रपटातल्या नायकाच्या रुढ प्रतिमेला अमर आपटेचं गुंतागुंतीचं व्यक्तिमत्व छेद देतं. आणि तरीही, म्हणजे बायकोशी प्रतारणा करत असूनही अमर प्रेक्षकाच्या नजरेतून उतरत नाही हे कथानकाचं सामर्थ्य म्हणता येईल. कोणत्याही मोहाच्या प्रसंगी नाही म्हणणं त्याला शक्य असतं, पण तो मोहाच्या गर्तेत अडकत जातो. आणि इथे कुठेतरी कथानकातलं सामाजिक भाष्य हळूहळू लक्षात येऊ लागतं.

घरात पैसा खेळू लागतो तशी बायको आणि सासूची वागणूक बदलत जाते. आर्थिक परिस्थितीत फरक पडतो तशी अमरला सामाजिक प्रतिष्ठाही मिळू लागते. पण हे सगळं कमावण्यासाठी त्याला आपल्यातल्या सत्वाशीच तडजोडी करायला लागलेल्या असतात. परस्त्रीबरोबर झोपून केलेल्या प्रतारणेपेक्षासुद्धा ही प्रतारणा जीवघेणी असते. आपल्या नैतिक अध:पतनाची जाणीव असूनही घरचे आपल्याला माफ करताहेत याचं कारण म्हणजे निव्वळ आपण घरात आणतो तो पैसा आहे; इतकंच नव्हे, तर नैतिक अधिष्ठान टिकवून परिस्थिती जैसे थे ठेवण्यात त्यांना रस नाही, ह्याची जाणीव अमरला हादरून टाकणारी आहे. वेगवेगळ्या प्रकारचे भ्रष्ट व्यवहार करून ज्या मध्यमवर्गानं आपल्या पोळीवर तूप वाढून घेतलं त्यांच्यापुढे अमर आपटेचा नैतिक तिढा एक आरसा ठेवतो. कथानकातलं रहस्य हे एकाच वेळी उत्कंठा वाढवत नेतं आणि हा तिढा हळूहळू अधोरेखित करत जातं. ह्या प्रकारची गुंतागुंतीची पटकथा ही अर्थात नैतिक उपदेशाचे धडे देणाऱ्या सरधोपट मराठी चित्रपटांपेक्षा वेगळी आहे आणि म्हणूनच विशेष दखलपात्र आहे. कथानकात पुढे काय घडेल याविषयीची उत्सुकता इथे प्रेक्षकाला खिळवून ठेवते आणि त्याच वेळी त्यामागच्या सामाजिक टीकेमध्ये त्याला अंतर्मुख करण्याची ताकद आहे. अनैतिक वागल्यामुळे इथे शिक्षा होत नाही, तर बक्षीस मिळतं. पण मनाची कुरतड काही थांबत नाही. पारंपरिक नैतिक मूल्यं आणि भौतिक समृद्धीचं आमिष यांच्यातला हा टोकदार आणि जीवघेणा संघर्ष चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातो.

खेदाची गोष्ट म्हणजे अनेक परीक्षणं वाचता हे लक्षात येतं की लोकांना चित्रपट नीटसा कळलेलाच नाही. उदाहरणार्थ, 'लोकसत्ता'तल्या परीक्षणात असं म्हटलं आहे की अमरवर नेमकं कोण पाळत ठेवत असतं आणि कशासाठी, हे शेवटपर्यंत कळलेलं नाही. 'अमर आपटेला ट्रॅप करणाऱ्या यंत्रणेचे संदर्भ उत्तरार्धात सापडत नाहीत' असं 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये म्हटलेलं आहे. खरं तर कथानकाच्या रहस्यभेदातून ह्या गोष्टीचा खुलासा होतो, पण ते ह्या परीक्षणकर्त्यांना समजलेलं नाही असं दिसतं. (रहस्यभेद उघड करून रसभंग होईल म्हणून प्रत्यक्ष खुलासा देणं इथं टाळलं आहे, पण कुणाला हवं असलं तर व्यक्तिगत संवादात ते सांगता येईल)

मायबोलीच्या परीक्षणकर्त्याला दळवीकाकांच्या पात्राचं प्रयोजन समजलेलं नाही. खरं तर ही पटकथेतली एक अत्यंत महत्त्वाची आणि अनोखी व्यक्तिरेखा आहे.बदलत चाललेल्या जगाविषयी अमर आपटेला सजग करण्याचं काम हे पात्र करतं. अमरची व्यक्तिरेखा सभोवारच्या ह्या बदलणाऱ्या परिस्थितीची आपल्या व्यक्तिगत आयुष्याशी सांगड घालू शकत नाही ही अमरची खरी शोकांतिका आहे. दळवीकाका त्याला जे सांगत असतात त्यामुळे हे अधोरेखित होत जातं आणि शोकांतिका अधिक गहिरी होत जाते. शिवाय, दळवीकाकांनी रात्री चॅन्डलर वाचण्यासाठी घराबाहेर दिवा लावून घेणं हे ह्या पटकथेच्या पूर्वसुरींचा उल्लेख म्हणून येतं. त्यात एक गंमत आहे. चित्रपटाचा काळपट 'लुक'देखील चॅन्डलरच्या कथानकांवर आधारित न्वार चित्रपटांना साजेसा आणि कथानकातलं गांभीर्य गडद करणारा आहे.

'पटकथाकाराने पटकथेला नेमकं टोक दिलं नसल्यानं चित्रपट अर्धवट संपल्यासारखा वाटतो' असंही 'लोकसत्ता'त म्हटलेलं आहे. मायबोलीवर कथेला ओपन-एंडेड म्हटलेलं आहे. खरं तर आपल्या सर्व कृष्णकृत्यांची जाणीव करून दिल्यानंतरही बायकोला त्याचं काही विशेष वाटत नाही आहे, हे जेव्हा अमरच्या लक्षात येतं तेव्हा आपला सगळा जीवनसंघर्षच संपल्याचं त्याला जाणवतं. ज्या डोलाऱ्यावर आपलं चिमुकलं घरटं आपण उभारलं होतं, तोच किती पोकळ होता त्याची ही जाणीव आहे. ती खरं तर पाहणाऱ्याला आतूनबाहेरून हलवणारी आहे. प्रेक्षकाला सुन्न करण्याची ताकद त्यात आहे. वरवर पाहता चकचकीत समृद्धी पण खोलवर पाहता गडद ऱ्हास अशा एका भकास भविष्यातल्या प्रकाशाकडे नायक-नायिकेचा प्रवास सुरू झालेला आपल्याला दिसतो. गडद अंधारात काम करणाऱ्या अमरविषयी आपल्याला ज्या कारणानं अनुकंपा वाटते तेच नाहीसं झालेलं आहे. आता त्याचा प्रवास प्रकाशाकडे आहे, पण हा प्रकाश उबदार नाही तर रखरखीत आहे. अशा एका टोकावर नायकाला आणून चित्रपट संपतो. पण हा आशयच परीक्षणकर्त्यांपर्यंत पोहोचलेला नाही हे अशा प्रतिक्रियांवरून दिसून येतं.

चित्रपट चालू असताना आणि संपल्यावर प्रेक्षकांच्या ज्या प्रतिक्रिया येत होत्या, त्यादेखील हताश करणाऱ्या होत्या. खुल्या आर्थिक धोरणांचे फायदे ज्या वर्गानं करून घेतले आणि ते करताना कमालीच्या नैतिक तडजोडीही ज्यांनी केल्या असा मध्यमवर्ग कोथरुडातल्या मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहायला आला होता. लोक गंभीर प्रसंगांना हसत होते. सिनेमागृहातून बाहेर पडता पडता मोबाईलवरून फेसबुकवर सिनेमा पाहिल्याचं स्टेटस कसं टाकलं हे आपल्यासोबत आलेल्या दोस्तांना सांगत होते. अशा प्रतिक्रियांवरून हे लक्षात आलं, की चंगळवादाचे फायदे उपसता उपसता हा मध्यमवर्ग आता इतका सुजीर आणि कोडगा झालाय, की चित्रपटात आपल्याचविषयी काहीतरी सखोल आणि गंभीर म्हटलं आहे, आणि आपल्याला अंतर्मुख करणं हा चित्रपटाचा हेतू आहे हेच त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे. चित्रपटाचा विदीर्ण करणारा आशय ह्यामुळे अधिकच महत्त्वाचा वाटू लागतो. अनेक सरधोपट मराठी चित्रपटांची तोंडभरून स्तुती करणारा, पण सघन चित्रपटांपर्यंत पोहोचूच न शकणारा प्रेक्षक कधी तरी थोडं आत्मपरीक्षण करेल का, असा प्रश्न मात्र मनात शिल्लक राहतो.

इतर परीक्षणांचे संदर्भ -
http://www.maayboli.com/node/40365
http://www.loksatta.com/manoranja-news/pune-52one-abstract-painting-44993/
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18082403.cms

field_vote: 
4.714285
Your rating: None Average: 4.7 (7 votes)

प्रतिक्रिया

अमर आपटे, हा या बदलत्या जगाच्या व्यावहारिक मागण्यांनी बदलला जातोय, हे काही मनाला पटलं नाही

तुम्ही सुजीर आणि कोडगे असल्याचा परिणाम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाहिला, आवडला.

कथानकात पुढे काय घडेल याविषयीची उत्सुकता इथे प्रेक्षकाला खिळवून ठेवते आणि त्याच वेळी त्यामागच्या सामाजिक टीकेमध्ये त्याला अंतर्मुख करण्याची ताकद आहे. अनैतिक वागल्यामुळे इथे शिक्षा होत नाही, तर बक्षीस मिळतं. पण मनाची कुरतड काही थांबत नाही. पारंपरिक नैतिक मूल्यं आणि भौतिक समृद्धीचं आमिष यांच्यातला हा टोकदार आणि जीवघेणा संघर्ष चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातो.

चित्रपट निर्मितीमध्ये तुमचा हात कुठल्याच प्रकारे नव्हता हे मान्य करणं शक्य नाही.

नितीन महाजन जर असे चित्रपट देऊ शकत असेल तर खरच दिवस चांगले आले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हा सिनेमा काल एकदाचा यू-ट्यूबवर पाहिला. फार कौतुक करण्यासारखा वाटला नाही. (माझी प्रतिक्रिया मला न विचारता 'राधिका' आणि 'अस्वल' यांनी आधीच थोडीथोडी करून लिहून टाकलेली आहे.) एकच सिनेमानाटककविताकादंबरी वेगवेगळ्या लोकांना फार वेगवेगळ्या गुणवत्तेच्या वाटू शकतात हा नेहमीचा धडा पुन्हा शिकल्यामुळे नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा अंतर्मुख झालो. ठीक आहे. शेवटी अंतर्मुख होण्याला महत्त्व आहे. त्यामागच्या कारणाला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

युट्यूबवरच्या उपलब्धतेचा लाभ अखेर एकदाचा मीही घेतला आणि मेजर निराशा झाली.
राधिका यांच्या प्रतिसादाशी सहमत आहे.
चित्रपटात 'न्वार'पणा कमी पडला आहे आणि इतरवेळी संथपणे चालणार्‍या चित्रपटात महत्त्वाचे प्रसंग मात्र गडबडीत संपवले आहेत.
प्रेक्षकावर परिणाम होण्यासाठी नक्की कशाचा बळी जातोय ते अधिक स्पष्ट पाहिजे आणि नायक ज्या मोहात अडकत जातो ते प्रेक्षकालाही आकर्षक वाटायला हवं असं मला वाटलं.
छायाचित्रण मात्र छान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेजर निराशा झाली.

मेजर निराशा झाली याच्याशी सहमत. पडद्यावर नक्की काय चाललंय हे कळतच नव्हते. काही काही दृश्ये भयंकर संथ होती. खुली अर्थव्यवस्था वगैरे गोष्टींना चित्रपटातील रेडिओवरच्या बातम्यांमध्ये ऐकल्यासारखे आठवते. मात्र चित्रपटात जीवनशैलीतील बदल हे खुल्या अर्थव्यवस्थेमुळेच झाल्याचे ठळकपणे समोर आले नाही. (निव्वळ मूल्यांशी प्रतारणा वगैरे सिंहासन-मुंबई दिनांकमधील विषय चित्रपटांमध्ये पूर्वी येऊन गेलेच आहेत. त्यादृष्टीने पुणे ५२ मध्ये वेगळे काय?)
चित्रपटाचे छायाचित्रण वगैरे दर्जेदार वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडला. पण थोडा संथ आहे.
पुणे ५२ आणि अय्या हे दोन चित्रपट, जर जंतूंनी केलेली समिक्षा न वाचता पाहीले असते, तर कितपत आवडले/समजले असते शंका आहे. त्यामुळे जंतूंचे आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समिक्षा न वाचता पाहीले असते, तर कितपत आवडले/समजले असते शंका आहे.

हा मुद्दा महत्वाचा वाटतो. चित्रपट बघताना जितकं कोरं डोकं असेल, चित्रपटाविषयी जितकं कमी वाचलं असेल तितका चित्रपटाचां अनुभव जास्तित जास्तं unadulterated असतो. समीक्षा/परिक्षण वगैरे वाचून आपण अनेक अपेक्षा/पूर्वग्रह घेऊन चित्रपट बघतो. त्यात मजा कमी येते असं मला वाटतं. त्यामुळे अजूनही हा धागा वाचलेला नाही. फक्त प्रतिक्रिया चाळल्या आहेत. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तत्वतः मान्य आहे.
पण काही चित्रपट सर्वसामान्यांना समजण्यास अवघड असतात. त्यातला सिंबॉलीझम नीट कळत नाही. उदा. पुणे ५२मधले दळवी किंवा अय्यामधली मैना, धोतर फेडणे वगैरे. जर जंतूंची समिक्षा न वाचताच मी अय्या पाहीला असतातर मैना जबरदस्त डोक्यात गेली असती आणि कदाचीत मी चित्रपट अर्धवट सोडून दिला असता. पण समिक्षा वाचल्याने ते पात्र तसे का आहे हे माहीत झाले होते. पण राणीच्या आजीबद्दल जंतूंनी लिहीले नव्हते; त्यामुळे ते पात्र डोक्यात गेलेच.
तेच जर समजण्यास सोपे चित्रपट असतील तर समिक्षा न/वाचल्याने काहीच फरक पडत नाही. उदा. मी वेकअप सिद, रॉकऑन, चख दे इंडीयाची फ्रेम टू फ्रेम कथा ऐकलेली तरी ते चित्रपट आवडले. पण तेच लंचबॉक्स, बरनचे कौतूक करणारी समिक्षा वाचूनही ते आवडले नाही.
तर मुद्दा हा आहे की समिक्षा वाचल्याने झालाचतर फायदाच होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काहीसा असहमत. समीक्षा ही कलाकृतीचा भाग नसते/नसावी. समीक्षेशिवाय intended target audiance ला एखादी कलाकृती समजत नसेल म्हणजे काहीच बोध होत नसेल तर तो दिग्दर्शकाचा दोष आहे असं मला वाटतं. किंवा ती दिग्दर्शक्/प्रेक्षक यांच्यातली incompatibility असते. पण समीक्षा वाचून चित्रपट बघणं मला नाही आवडत. नाहीच समजला एखादा चित्रपट तर तो २-३ वेळा बघावा. हेच कविता किंवा चित्र यांच्याबाबतीतही म्हणता यावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मी सुद्धा समिक्षा सहसा आधी वाचत नाही.
मात्र चित्रपट - वा कोणतीही कलाकृती; विशेषतः पर्फॉर्मिंग आर्ट- पाहिल्यावर शक्य तितक्या व्यक्तींनी केलेली समीक्षा वाचतो. त्यामुळे विविध कंगोरे लक्षात येतातच, शिवाय पुढिल वेळी कलाकृती बघताना नव्या आयामांचा विचार होऊ लागतो. जर एखाद्या संस्कृतींचा/दिग्दर्शकाचा/शैलीचा परिचय नसेल तर कितीही वेळा चित्रपट पाहिला तरी त्यातील रुपकांचा, प्रतिमांचा व चिन्हांचा अर्थबोध होईलच असे नसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पर्फॉर्मिंग आर्ट- पाहिल्यावर शक्य तितक्या व्यक्तींनी केलेली समीक्षा वाचतो.

हे मीही करतो. पण दोनदातरी पाहतो पिच्चर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

चित्रपट पाहिला. अस्वल यांच्या वचुन्का-पहिल्या मुद्द्याशी सहमत.
सोनाली कुलकर्णीच्या संवाद फेकीचा कंटाळा आला आहे.

या समिक्षे बद्द्ल: चित्रपटातील एखादी गोष्ट न कळल्याचा दोष पूर्णपणे प्रेक्षकावर ढकलणारी एकतर्फी समीक्षा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कालच्या प्रतिसादात एक लिहायचे राहून गेले. यातली चुंबनदृष्य खरोखरच चांगली चित्रीत केली आहेत. गिरीश आणि सई दोघेही कंफरटेबल इन स्किन वाटतात ती दृष्य साकारताना. मराठी चित्रपटासाठी मला ते बरेच बोल्ड आणि छान वाटले. त्यामानाने कित्येक हिंदी चित्रपटातील स्टार कलाकार असलेली चुंबनदृष्ये ऑकवर्ड आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> समीक्षा ही कलाकृतीचा भाग नसते/नसावी. समीक्षेशिवाय intended target audiance ला एखादी कलाकृती समजत नसेल म्हणजे काहीच बोध होत नसेल तर तो दिग्दर्शकाचा दोष आहे असं मला वाटतं. किंवा ती दिग्दर्शक्/प्रेक्षक यांच्यातली incompatibility असते. <<

>> चित्रपटातील एखादी गोष्ट न कळल्याचा दोष पूर्णपणे प्रेक्षकावर ढकलणारी एकतर्फी समीक्षा आहे. <<

दोष पूर्णतः दिग्दर्शकाचा आहे किंवा प्रेक्षकाचा आहे असं म्हणणं हे एकांगी आणि अतिसरसकट होईल. माझ्या मते कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत कोणत्याही कलाविष्काराचे काही प्रवाह रूढ असतात. चित्रपटाचं उदाहरण घेतलं, तर बहुसंख्य दिग्दर्शक ह्या रूढ चाकोरींपैकी एखादी निवडून त्यानुसार चित्रपट बनवतात. प्रत्येक वेळी ही प्रेक्षकशरणताच असते असंही म्हणता येत नाही, कारण त्या चाकोरीत बरे चित्रपट बनतातही. मात्र, तो मुद्दा इथे महत्त्वाचा नाही. मग महत्त्वाचं काय आहे? तर ही चौकट मोडून जेव्हा एखादा दिग्दर्शक काही वेगळं करू पाहतो तेव्हा त्याला प्रेक्षकांनी कसं सामोरं जावं? ते अपरिचित असल्यामुळे काही जण ते पूर्ण नाकारतील हे उघड आहे. निव्वळ वैयक्तिक आवडनिवड किंवा incompatibility वगैरे आहे असं म्हणून सोडून देण्यापेक्षा अशा वेळी प्रेक्षकाचा हात धरून त्याला थोडी मदत करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तसं करण्याचा मी इथे प्रयत्न केला (आणि ह्याआधीही आणि नंतरही केला आहे). ती मदत कुणी कशी घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याबद्दल मी काही मत व्यक्त करणं अप्रस्तुत होईल. पण कुणावर तरी दोष ढकलणं हा लेखनामागचा एकतर्फी हेतू असल्याच्या आरोपाचा प्रतिवाद फारच सोपा आहे. ज्याला केवळ इतरांवर दोष ढकलण्यात स्वारस्य असतं तो अशी हात धरून मदत करायला सहसा जात नाही एवढंच मी म्हणेन.

१ - वेगळं म्हणजे चांगलं असेलच असंही नाही. नव्या वाटा धुंडाळणारा चित्रपट फसलेला असू शकतो; किंबहुना रूढ चौकटीचा आधार सोडताना तीच शक्यता अधिक असते. पण त्या निमित्तानं, ती एक संधी आहे असं मानून प्रेक्षक स्वतःला थोड्या वेगळ्या कलाविष्काराला सामोरं जाण्यासाठी जर तयार करू शकला तर ते एक प्रकारचं वाईटातून चांगलं असं मी समजतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

समीक्षेमुळे डोक्यात पूर्वग्रह रहातात आणि ते तुमच्या enjoyment मध्ये बाधा आणतात असं मला वाटतं. मला जे म्हणायचय ते शेल्डननी आधीच छान म्हटलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अर्थातच. पिच्चर पैल्यांदा शक्यतोवर विथौट समीक्षा पहावा. परग्रहावर आल्यागत वाटल्यास किंवा लैच बोअर झाल्यास मग समीक्षा पहावी, म्हणजे मग अप्रीशिएट करायला सोपे होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पण कुणावर तरी दोष ढकलणं हा लेखनामागचा एकतर्फी हेतू असल्याच्या आरोपाचा प्रतिवाद फारच सोपा आहे.

त्या हेतूनेच तुम्ही लिहिलेत असा अजिबात आरोप केला नाहीये - चित्रपटातील बारकावे अधोरेखित करून ते प्रेक्षकाला थोडे अ‍ॅक्सेसिबल करण्याचाही हेतू असेल (किंवा काहीही असला तरी माझे काही म्हणणे नाही). पण जे 'समि़क्षा' सदरात लिहिले आहे ते एकांगी झाले आहे. काही बाबतीत चित्रपट प्रेक्षका पर्यंत पोहोचण्यात थोडा कमी पडला आहे हा मुद्दा लेखात कुठेच न आल्यामुळे 'दोष ढकलणे' असा समज करून घ्यायला तुम्ही वाव ठेवला आहे/ राहिला आहे.
हा लेख समीक्षा नसून रसग्रहण/ माहिती सदरात जास्त फिट बसेल. तसा असता तर एकांगी असण्याबद्द्ल काहीही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक मार्मिक माझ्याकडून लागू!

मला अगदी हेच वाटते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

काही बाबतीत चित्रपट प्रेक्षका पर्यंत पोहोचण्यात थोडा कमी पडला आहे.

खरंय.
हा लेख वाचून मला "अच्छा, असं म्हणायचं होतं काय दिग्दर्शकाला?" असा प्रश्न पडला. आता ही समीक्षा वाचून मी चित्रपट पाहिला, तरीही ते मला चित्रपटात शोधावं लागलं.
अर्थात चित्रपट मनासारखा झाला आहे की नाही, हे केवळ दिग्दर्शकच सांगू शकतो. जर ही धूसरता, अस्पष्टता हेतूपूर्वक रचलेली असेल तर पुणे ५२ कमालीचा यशस्वी झाला आहे.
(प्रे़क्षकांना ते कितपत समजेल हा वेगळा मुद्दा!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा लेख वाचून मला "अच्छा, असं म्हणायचं होतं काय दिग्दर्शकाला?" असा प्रश्न पडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Mandar Katre

इतर काही चित्रपटांबद्दल परीक्षणं, समीक्षा वाचून ते पाहिले (किंवा पाहिलेल्या चित्रपटांबद्दल वाचलं) त्यामुळे पुढचे अनेक चित्रपट अधिक समजायला मदत झाली.
पुणे-५२ अजूनपर्यंत पाहिलेला नाही. हा धागा वाचून काही महिने झाल्यामुळे वाचलेलं विस्मरणात गेलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माहीमच्या सिटीलाइट चित्रपटगृहात सध्या मराठी चित्रपटांचा एक महोत्सव चालू आहे. त्यात १८ जूनला संध्याकाळी ७:४५ वाजता 'पुणे-५२' दाखवला जाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

काल एकदाचा चित्रपट (घरीच) पाहिला

मला एकुणात आवडला. हा संक्रमणकाळातला चित्रपट आहे, आर्थिक उदारीकरण नी समाजाशी संबंध आहे हे चित्रपटाची पहिली नावे दिसत असतानाच स्क्रीनवरील बातम्यांमधीन दिसते. Change is coming का अशाच अर्थाचे मथळे आपले लक्ष वेधून घेतात.
चित्रपट पाहिल्यावर परिक्षण वाचले, अधिकच आवडले. त्याहून एक बरे वाटले की आपण नोटिस केलेल्या बहुतांश गोष्टी योग्य होत्या. (याआधी परिक्षण वाचून बराच काळ उलटल्याने विस्मरणात गेल्या होत्या). छायालेखनही अतिशय आवडले, ध्वनी योजना अधिशय मार्मिक आहे. कित्येक महत्त्वाच्या घटना केवळ ध्वनीने सुचित होतात. (वर चिंजंनी उल्लेख केलेला झिपचा व कमरेच्या पट्ट्याचे हुक काढल्याचा आवाज, एका अंधारातील प्रणय प्रसंगात चुंबनाचा आवाज किंवा कारचा आवाज वगैरे)

मला खटकल्या त्या दोन गोष्टी:
१. काही प्रसंगांत दिग्दर्श्काचे काळाचे सुटलेले भान. घरातील वस्तु,बंगल्याच्या डोअर लॅचचा प्रकार हे १९९२ला नक्कीच नव्हते. जुन्या फोनचा आवाज हे हल्ली जुना आवाज म्हणून जो साऊंड ट्रॅक मिळतो त्याच्यासारखा आहे. मुळात आवाज वेगळा असे. फोनचा आत्यंतिक वापर व सहज उपलब्धता तेव्हा नव्हती. अगदी एका प्रसंगात दिसलेले ट्रेनचे इंजिनही नव्या प्रकारचे आहे. आर्थिक उदारीकरणामुळे या तांत्रिक बाबी-सोयी भारतात आल्या तरी १९९२मध्ये यातील अनेक गोष्टी इतक्या सहज उपलब्ध नव्हत्या.

२. घरात आलेली सुबत्ता ज्या अ‍ॅनिमेशनने दाखवली आहे ते अधिक सटलपणे दाखवता आले असते असे वाटते.

काही आवडलेली रुपके
१. चिमणीचे घरटे. तिने अंडी घातली आहेत म्हणजे तिला आता हुसकता येणार नाही हा संवाद मोठा मार्मिक आहे
२. दळवी, चँडलर वगैरे
३. अख्खे सई ताम्हणकरचे पात्र

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अज्ञतेबद्दल क्षमा असावी, पण (spoiler alert -->) सई ताम्हणकरचा खरोखर खून होतो की नाही?

उत्तर हो असेल तर रहस्यकथा ठीकठाक आहे.
उत्तर नाही असेल तर रहस्यकथा जबरदस्त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

या प्रश्नाचे थेट उत्तर आवश्यक नाही!
<स्पॉईलर सुरु>**ती जीवनातून 'हरवली' आहे / 'गायबली आहे' इतके पुरेसे ठरावे. मला जितके समजले त्यावरून तिची योजना विपरीत परिस्थितीतही टिकु पाहणारी बदलापूर्वीची मुल्ये व नैतिकला दर्शवते.**<स्पॉईलर संपला>

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उत्तरातच आशयाचं एक महत्त्वाचं अंग आहे असं वाटत नाही का? 'हो' उत्तर त्या आशयालाच धक्का पोहचवतं त्यामुळे ते असणं शक्य नाही हे चित्रपट न पहाता देखिल सांगता येईल नं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाय कळ्ळं भो...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

नाय कळ्ळं

ती गचकली का असं ईचारायचं म्हंजी 'माह्या म्हशीला झालं कोकरू' असं सांगितल्यावर 'म्हंजी तुझी म्हस गाभन व्हती का?' असं विचारन्यासारखं हाये, नाय का? सईचं पात्र सातत्याने खोटं वागत असतं पण ते माहित असूनही अमर गुंतत जातो तिच्या टाळूवरचं लोणी खाण्यात सगळेच सहभागी असतात पण वापरलं जातं फक्त अमरला, काहीही घडलेलं नसताना त्याचा फायदा उचलला आहे हे त्याला कळण्यातच गोष्ट शेवटाकडे सरकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म. पण तसं प्रिझ्यूम करायचं असेल, तर (स्पॉयलर) आपट्याच्या अंगी अशी कोणतीतरी कला/शक्ती आहे ज्यायोगे तो त्या बिल्डराला अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याला आपल्या बाजूला वळवण्यासाठी बिल्डर वाट्टेल त्या थराला जायला तयार आहे (इति स्पॉयलर) असं काहीसं प्रिझम्शनही करायला लागेल.

फिक्चर बघून असं काही वाटलं नाही ब्वा. बिल्डराला अशी माणसं पैसे फेकून भरपूर मिळाली असती. आपट्यालाच काय सोनं चिकटलं होतं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आपट्यालाच काय सोनं चिकटलं होतं?

प्रश्नातच दडले उत्तर Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Lol

च्यायला सरळ उत्तर कोणी देईना राव...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

पण वाकड्यातही कळालेच की तुम्हांला Smile असो. सिनेरसिक मंडळी काय ते उत्तर देतीलच. आम्ही पिच्चर पाहिलेला नाही, सबब संदर्भयुक्त उत्तर देणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छायालेखनही अतिशय आवडले, ध्वनी योजना अधिशय मार्मिक आहे.

या गोष्टींशी सहमत आहे. हॅंड-हेल्ड छायाचित्रण का काय म्हणतात ते हेच का? नक्कीच परिणामकारक छायाचित्रण आहे.
संवाद अगदीच सुमार आहेत पण.
मनोरमा वागळेंच्या तोंडी एक वाक्य आहे "वेळ बदलतोय. पैशाला महत्व येणार म्हणे अस कोणीतरी म्हणत होतं"
अरे??? काय अर्थय या वाक्याला.
काळ बदलतोय असं मुद्दाम म्हणतात अनेक डायलॉग्स मध्ये काही पात्र. ते नाही आवडलं. शेजारच्या म्हातार्‍याचं पात्रही अगदीच तसंच. खूप ठोकळाबाज वाक्य आहेत त्याच्या तोंडी.
पण नवा प्रयोग म्हणून बघायला काहिच हरकत नाही.
सिनेमा बघताना चायनाटाऊन, मनोरमा सिक्स फीट अंडर आदी सिनेमांची आठवण येते. या दोन सिनेमांवरून प्रेरणा घेतली आहे असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मनोरमा वागळेंच्या तोंडी एक वाक्य आहे "वेळ बदलतोय. पैशाला महत्व येणार म्हणे अस कोणीतरी म्हणत होतं"

भारती आचरेकर, ते पात्र तेवढचं उथळ आहे असं दाखवायचं असल्यास?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय होय त्याच...
पात्राचा उथळपणा इतरही गोष्टींमधून दाखवता येऊ शकला असता. किंबहुना तो दाखवला गेला आहे. पैसा आल्यावर एकदम पल्टी खाणं वगैरे यातून. तो मला जाणवला. वरचं वाक्य अगदीच ineffective वाटलं मला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

कुणाला रस असल्यास - ‘पुणे ५२’ आता अमेझॉनवर उपलब्ध आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चकटफू

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

पाने