वासुदेव

थंडी छान पडायला लागली होती. डिसेंबर चा दुसरा आठवडा संपत आला होता. बंद खिडक्यांच्या न दिसणाऱ्या फटीतून झिरपणाऱ्या थंडीनी मला जाग आणली होती. अंगावरून घरंगळणाऱ्या गोधडीच्या काठांना दोन्ही हातांच्या पंज्यात घट्ट पकडीत मी स्वतःला मानेपर्यंत लपेटून घेतलं. हातापायाची जुडी करून शरीराच्या जास्तीत जास्त जवळ आणत तशीच कुशीवर पडून राहिले. किलकिलत्या डोळ्यांनी घड्याळाकडे पाहिलं, त्याने उठायला अजून अर्ध्यातासाची परवानगी दिली होती. मग मी तश्शीच पडून रहिले……अगदी छान वाटत होतं.
इतक्यात दूरून एक किनऱ्यां पण चढ्या स्वरातील शब्द आणि त्या पाठोपाठ घंटेचा किंवा घुंगरा सारखा आवाज ऐकू आला. मी सावध होऊन नीट कान देऊन ऐकू लगले. आवाजात काहीतरी खूप ओळखीचं वाटत होतं . आपलं कोणीतरी जवळचं माणूस अचानक भेटावं आणि त्याचे नाव आपल्याला पटकन आठवू नये अशी काहीशी मनाची अवस्था झाली… तो आवाज आता जवळ आल्यासारखा वाटला, शब्द स्पष्ट कळत नव्हते,पण ते उच्चारण्याची ती विशिष्ठ लय अगदी ऐकल्यासारखी…….
हां …… वासुदेव……!! वासुदेव आलाय बहुदा…… लहानपणी भुरळ पाडणार वासुदेवाच ते रूपडं लेकीला दाखवाव म्हणून तिच्याकडे वळले,पण ती शांत झोपली होती. झोपलेली लहान मुले किती निरागस दिसतात… मला खुपदा जाणवणारी गोष्ट आत्ता परत एकदा जाणवली. तिला उठवायचं मी रद्द केले.
आणि माझं मन मात्र दुडूदुडू धावत माझ्या बालपणात पोहचलं. त्यावेळी वासुदेवाच असं दारी येण अपूर्वाइच नसलं तरी त्याच्या बद्दल वाटणाऱ्या प्रचंड आकर्षणाने त्याच्या भोवती मुलांचा खूप घोळका जमत असे.या वासुदेवाबद्दल आजही वाटणारी ओढ हि माझ्या मनात रुजली ती माझ्या आजोळी…….
अगदी उजाडता उजाडता तो लयबद्ध किणकिणनारा घंटीचा आवाज आला कि एरव्ही हाका मारूनही उठण्याचा आळस करणारी आम्ही भावंडे, ताडकन उठून, धावतच सोप्यावर येत असू आणि त्याचवेळी घराचा उंबरा ओलांडत वासुदेव अंगणात येत असे. वासुदेवाची स्वारी त्यावेळी इतकी दुर्मिळ नसली तरी प्रत्येक वेळी त्याच्या येण्याने तेव्हडाच आनंद होत असे. त्याची ती किंचित खांद्यात वाकलेली मूर्ती आजही आठवते…… मनगटापर्यंत बाह्या असणारा त्याच तो घोळदार झगा आणि त्याखाली धोतर…. कधीतरी खांद्यावर उपराण्यासारख फडके… काखेत अडकवलेली झोळी आणि ती मोरपिसांची टोपी…….!! त्याच्या उजव्या हाताच्या अंगठा आणि त्या शेजारच्या बोटाच्या पकडीत धरलेली ती लहानखुरी घंटा कसा नेमका आवाज करत असे. वासुदेव रंगात आला की, आपला एक हात डोक्यावर उंचावत, कमरेत किंचित वाकून, दुसर्या हाताने घंटी वाजवत, स्वतः भोवती अर्धवर्तुळात गिरक्या घेत असे, त्यावेळी त्याचा तो घोळदार झगा त्याच लयीत इकडून तिकडे हेलकावत असे.
वासुदेवाला पाहण्यात आम्हां मुलांचे मोठ्ठे आकर्षण म्हणजे त्याची ती मोरपिसांची टोपी !!!!!! शाळेत सुद्धा ज्या मुला मुली कडे पूर्ण मोरपीस असे, त्याला वर्गात खूपच भाव असे. एखाद्या रंगीत पेन्सील चा तुकडा किंवा लिमलेटच्या गोळीची लाच देऊन त्या मोरपिसांचे दर्शन होत असे. अशा वयात टोपीवर कितीतरी मोरपिसे असणारा तो वासुदेव खूप श्रीमंत वाटत असे. मोरापिसांच्याच लांबलचक पांढुरक्या काड्या चकली सारख्या गोल गुंडाळून त्यांचीच त्या टोपीवर नक्षी केलेली असे. टोपीच्या काठाला आलेल्या मोरपिसांच्या त्या ओळीने वासुदेवाचे कपाळ झाकले जाई,त्यामुळे त्याच्या चेहऱ्या कडे पाहिलं की,दिसत त्याचे डोळे……. शांत आणि प्रेमळ……! त्याच्या चेहऱ्यावरच एकप्रकारची सौम्यता भासे ……. आपलेपणा वाटावा अशी.
अंगणात आल्यापासून तोंडानी अखंड आशीर्वादाचे बोल आणि सोबत तो घंटीचा आवाज…… अंगणातली ती सकाळ कशी भाराल्यासारखी वाटे…वासुदेवाचे ते बोल…. "खंडोबाच्या नावांनी दान पावलं …. आंबाबाईच्या नावानी दान पावलं " वासुदेव गेला तरी दिवस भर या ओळी तोंडात घोळत असत …….
त्यावेळी वासुदेवानी अंगणात येण पुरेसे असे,त्याला वेगळ दान मागावं लागत नसे. वासुदेव आल्याची वर्दी घरात समजल्यावर,कोठीच्या खोलीची कडी निघून चांगल सूपभर धान्य त्याच्या झोळीत पडे. जसे मागणे नव्हते,तसेच मिळवण्याचा हक्क पण जाणवत नसे. पूर्वापार चालत आलेल्या परंपरांचा सहजपणे जोपासलेला तो एक भाग होता. त्यात माझ्या आजोळच घर म्हणजे गावच्या कुलकर्ण्यांच…… त्यामुळे धान्या बरोबरच जुने कपडे वगैरे मिळण्याची शक्यता असे ……. तरीसुद्धा झोळीत काय पडतंय यावर त्याच्या चेहऱ्यावरील सौम्यतेची एक हि रेषा बदलत नसे. मिळेल ते घेऊन, तोंडभर आशीर्वाद देत वासुदेव दुसऱ्या अंगणात जात असे. आणि पुढे थोडावेळ आम्हां मुलांना उगीचच चुटपूट लागून राही ………!!
माझ्या आज्जी बद्दल आदर असणाऱ्या त्या वासुदेवाकडे अज्जीचाच वशिला लाऊन त्याच्या टोपीतील अनेक मोरपिसापैकी एखादे मोरपीस आपण मिळवावे असे मला अनेकदा वाटे.पण वासुदेवाच्या त्या मोरपिसी टोपीचा बालमनाला एक धार्मिक धाक असे ,त्यामुळेच माझी ती इच्छा मला व्यक्तच करता आली नसावी……
थोड्यावेळापूर्वी लांबून येणारा तो ओळखीचा स्वर आता अगदीच जवळ आल्यासारखा वाटत होता. माझ्या बालपणाच्या तंद्रीतून मी जागी झाले. त्या आठवणीच्या उबदार गोधाडीतून स्वतःला अलगद बाजूला करत उठले. बऱ्यापैकी थंडी होती तरीही तशीच टेरेसचे दार उघडून बाहेर आले. हिवाळ्यातील ती थंड बोचरी हवा अंगाला कडकडून भेटली. हाताची घडी छातीशी घट्ट करीत मी वासुदेवाला पाहू लागले,आज पहाटे पहाटे मला माझ्या बालपणीच्या आठवणींची सफर करून आणणाऱ्या वासुदेवाला पाहण्यासाठी मी माझ्या वयाला न शोभणाऱ्या गतीने बिल्डींगच्या पायऱ्या उतरून खाली आले .
चांगला उंचेला होता हा वासुदेव… काळासावला पण तरतरीत वाटला…… तरुणही…… नजर चलाख वाटली. नेहमी पान खाणाऱ्यांचे ओठ कसे लाल काळपट दिसतात तसे त्याचे ओठ दिसत होते. त्याचे हे रूप,नजर,चेहऱ्यावरील भाव माझ्यामानातील वासुदेवाशी जूळेतनाच……. त्याचा पोशाख मात्र जवळपास तसाच होता. खांद्यावर झोळी ऐवजी शबनम होती. त्याच्या हातातील घड्याळ नि पायातील चप्पल मला उगीचच खटकले. त्याची मोरपिसी टोपी मात्र अगदी तशीच होती. पण त्यातील एक हि मोरपीस आज मला खुणावेना……. किती परका परका वाटतोय आज वासुदेव……
मी दिलेल्या दहा रूपयाच्या नोटेवर तो फारसा खूष नाही वाटला… तरी स्वत:जवळील कापडी पिशवीतून त्याने मला लावण्यासाठी अंगारा काढला …….वासुदेवाकडून अंगारा लाऊन घेण्यासाठी आम्ही लहानपणी आमची कपाळ कशी त्याच्या पुढे पुढे कारायचो…… त्याच्या त्या बोटाच्या स्पर्शातून काहीतरी मिळाल्या सारखे वाटे. आज मात्र मी माझे अंग चोरत त्याच्या पुढे तळवा केला. इतर घरांच्या बंद दाराकडे बघत नाराजीने तो आमच्या बिल्डिंग च्या बाहेर पडला.
खाली उतरून येतांना माझ्या पायात जे बाल्य संचारलं होत ते कुठल्या कुठे पळालं …… घरात येउन मी परत स्वतःला पांघरुणात वेढून घेतलं.
आपल्या भोवतालच जग किती झपाट्यानी बदलत चाललंय……. सगळेच बदल कुठे मनापासून स्वीकारतो आपण? तरी सहन करतोच ना ? मग जगाबरोबर बदललेल्या वासुदेवाचं रुपड्यानी मला उदास का करावं? आणि माझ्या मनातल्या वासुदेवाचं चित्र इतक्या वर्षांनी तस्सच राहावं हा वेडा अट्टाहास मी तरी का करावा ?

.

field_vote: 
4.25
Your rating: None Average: 4.3 (4 votes)

प्रतिक्रिया

स्मरणरंजन आवडले. लहानपणीच्या भाबड्या आठवणी बरेचदा, त्या "बाल्याचा" ठेवा असतात. पुढे अगदी जसेच्या तसे तसेच घडले तरी अगदी तेच पडसाद कदाचित उमटू शकत नसावेत.

बाकी- वासुदेव किंवा अंगावर आसूड ओढणारे (आता नाव आठवत नाही :() या पोटापाण्याच्या प्रथा कालौघात बंद झाल्या हे चांगलेच झाले असे कधीकधी वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंवा अंगावर आसूड ओढणारे

ह्यांना 'कडकलक्ष्मी' म्हटलेलं ऐकलं आहे. हे सापडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद. पोतराज=कडकलक्ष्मी अगदी बरोबर!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी- वासुदेव किंवा अंगावर आसूड ओढणारे (आता नाव आठवत नाही ) या पोटापाण्याच्या प्रथा कालौघात बंद झाल्या हे चांगलेच झाले असे कधीकधी वाटते.

असे म्हणणे हा मूर्खपणा आहे.
हे वाचा :-
http://www.aisiakshare.com/node/2057

ह्यात शेवटची ओळ अतिशय प्रेरणादायी आहे :-
कोणकोण तयार आहे करिअर इन पोतराज करायला ?

ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लेख आवडला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

लेखन आवडलं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

छान लिहीलय. स्मरणरंजन आवडले.
बाकी सारीकाशी सहमत. पोतराज, डोंबारी, मदारी (मंजे वानर माकडाचे खेळ करणारे ना?), दरवेशी (अस्वल घेऊन यायचे), रामोशी, जिप्सी जेवढे कमी होतील तेवढे चांगलेच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लेख. ऐसीअक्षरेवर स्वागत!

या निमित्ताने काळाच्या पडद्याआड गेलेली अनेक माणसे नी त्यांच्यावर लिहिलेले हा आजी-आजोबांची माणसे नावाचा लेख दोन्ही एकदमच आठवले.

अजून असे लेखन येत राहु दे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऐसी वरील माझ्या पहिल्या प्रयत्नाला दिलेल्या प्रतिसादा बद्द्ल धन्यवाद !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनोहारी भावव्यक्ति.

आपल्या भोवतालच जग किती झपाट्यानी बदलत चाललंय……. सगळेच बदल कुठे मनापासून स्वीकारतो आपण? तरी सहन करतोच ना ? मग जगाबरोबर बदललेल्या वासुदेवाचं रुपड्यानी मला उदास का करावं? आणि माझ्या मनातल्या वासुदेवाचं चित्र इतक्या वर्षांनी तस्सच राहावं हा वेडा अट्टाहास मी तरी का करावा ?

वासुदेवच का? चाळीसीला पोहचताना मला विश्व -व्हर्जन २ मधे आल्यासारखं वाटतं. तरीही मी भारतातच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.