Skip to main content

खाद्यसंस्कृतीचं औद्योगीकरण

(व्यवस्थापन : 'सध्या काय वाचताय?' धाग्यातल्या नंदन यांच्या ह्या प्रतिसादातून निघालेली चर्चा विषयानुसार वेगळी केली आहे.)
मूळ प्रतिसाद -

* The Omnivore's Dilemma (2006) - Michael Pollan
'सध्या काय वाचताय?'च्या गेल्या भागातला हा प्रतिसाद वाचून हे पुस्तक हाती घेतलं. अमेरिकेतल्या खुल्या अर्थव्यवस्थेला न जुमानता उभे राहिलेले मक्याचे साम्राज्य, त्याच्या घसरत्या किंमती आणि वाढतं उत्पादन, परिणामी सामान्य जनतेच्या खाण्याच्या सवयींवर आणि आरोग्यावर होणारा परिणाम इ. बाबी आणि 'ऑर्गॅनिक' ह्या लेबलची मर्यादा या गोष्टी मायकल पोलनचेच निवेदन असणार्‍या Food, Inc. व तत्सम काही डॉक्युमेंटरीजमुळे परिचित होत्या - पण आपल्या चार निरनिराळ्या जेवणातल्या पदार्थांचा स्रोतापर्यंत (किंवा शब्दशः मुळापर्यंत) जाऊन घेतलेला शोध आणि मांसाहारी व्यक्तीला पडू शकणारे काही नैतिक प्रश्न, हे भाग वाचायला हवेत असेच.

पॉलनची पुस्तकं मला आवडतातच, पण काही बाबतीत खूप चिडचिड होते. खाद्यसंस्कृतीच्या औद्योगीकरणाची टीका अगदी रास्त आहे. पण त्याला तोड म्हणून "माझी आजी कशी दिवसातून तीनदा गरमागरम जेवण तयार करायची" सारखे स्मरणरंजक विश्व उभारून चालत नाही. औद्योगीकरणाचा राजकीय, आर्थिक इतिहास जसा आहे, तसाच सामाजिकही आहे. स्त्रियांचे मोठ्या प्रमाणात औद्योगिक वर्कफोर्स मधे शिरणे, घरकाम आणि बाहेरचे काम दोन्ही सांभाळणे, शेतीत स्लेवरी किंवा जातसंस्थे द्वारे पूर्वी मिळणारा, आणि विसाव्या शतकात राजकीय-सामाजिक चळवळी, शहरीकरण, इत्यादींमुळे घटत जाणारा लेबर पुरवठा, औद्योगिक शेतीचा आणि या सामाजिक बदलांचा अन्योन्य संबंध, या सगळ्या प्रश्नांची दखल तो घेत नाही. शेवटी खाद्यपदार्थांवर, आणि शेती-निसर्गाशी त्यांच्या संबंधावर त्याचे लक्ष केंद्रित असते, आणि अगदीच टोकाला गेलेल्या प्रोसेस्ड फूड्स विरुद्ध "डिफेन्स ऑफ फूड" ठीक आहे, गरजेचे आहे. पण खाद्यसंस्कृती देखील घरच्या आणि समाजाच्या राजकारणाहून अलिप्त नाही; घरकाम कोण करतं, घरातले निर्णय कोण घेतं, यावर ही अवलंबून आहे. त्याला पॉलन कडे फक्त "माझी आजी किती मस्त ताजा ब्रेड तयार करायची" सारखे स्मरणरंजन आहे, ते फारच असमाधानकारक आहे.

(एक्सप्लोडिंग मँगोज आवडलं नाही, थोडी पानं वाचूनच ठेवून दिलं...)

रोचना Fri, 04/07/2014 - 13:10

In reply to by मेघना भुस्कुटे

पॉलन च्या तर्कापुरतंच सांगायचं झालं तरः
एकेकाळी सगळं कसं सुरळीत छान होणं असं दर्शवणं टाळणं. कारण असं कधीच नव्हतं. आजी घरी जेवण तयार करत असे, पण प्रचंड राबून, मुलांना सांभाळून, काटकसर करून. आजीला तयार माइक्रोवेवेबल काही मिळालं असतं तर तिने नाक मुरडून पुन्हा कणीक मळायला घेतली असती याची आपल्याला खात्री नाही. "लेबर सेविंग डिवाइसेस" उगाच नाही लोकप्रिय झाले. प्रोसेस्ड फूड्स च्या आक्रमणाविरुद्ध स्वतः स्वयपाकघरात पुन्हा शिरायलाच पाहिजे हा पॉलनचा मुद्दा अगदी मान्य. पण नेमके कोण स्वयपाक करणार आहे? नवरा बायको दोघं नोकरी करत असले तर दोघांवर ही जबाबदारी पडायला पाहिजे - आजीच्या जमान्यासारखंच पुन्हा नाही चालणार. बायका कामाला बाहेर पडू लागल्यावर सगळी खाद्यसंस्कृती कोसळली, आणि याला स्त्रीवाद जबाबदार आहे, असा त्यातून युक्तीवाद निघतो.

वर, आजचे स्वयपाकघरातले सगळे लेबर-सेविंग डिवाइसेस हे विजेवर चालतात. पॉलनच्या एकूण पर्यावरणीय दृष्टीकोनात हे अति-आधुनिक स्वयपाकघर नेमके कसे बसते? बॅक टू बेसिक्स मधे फ्रिज राहील की नाही? नसल्यास नोकर्‍या सांभाळून हे सगळे कसे जमणार? का ताजे जेवण तर पाहिजे, पण असू दे फ्रिज लागला तर, पण माइक्रोवेव नको, त्यापेक्षा फूड प्रोसेसर असू दे, वेळ वाचेल, असं काहीतरी?

सामाजिक समता विरुद्ध पर्यावरणीय दक्षता हा द्वंद्व कृत्रिम आहे हे मला ही मान्य आहे. आणि या प्रश्नाला सरळसोपे उत्तर उपाय ही नाही. पण घरकामाच्या लेबर वाटपाला केंद्रस्थानी ठेवूनच खाद्यसंस्कृतीच्या पुनर्वसनाचा विचार झाला पाहिजे, कुटुंबातील सर्वांना त्यात कसे सामिल करावे यावर भर दिला पाहिजे. या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून पॉलनचे बाकीचे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आत्मसात करणे हा निव्वळ लाइफ्स्टाइलचे प्रश्न आहेत, खाद्यसंस्कृतीत परिवर्तन आणणारे होत नाहीत.

रोचना Fri, 04/07/2014 - 13:14

In reply to by मेघना भुस्कुटे

पॉलनच्या दृष्टीकोनावर हा लेख असेच काहीसे म्हणतो:

the question of who cooks, and who doesn’t, has always been a vexing one. I suspect that through most of history, cooking was generally something to be avoided–an activity people strived to be able to pay (or force) someone else to do. And that history, no doubt, explains much of the appeal of fast food and convenience food. In Child’s time, “middle class people had maids or someone to help” cook; today, everyone does. Just walk into a McDonald’s with the equivalent of an hour’s minimum wage in your pocket, and you can eat like a king (at least in calorie terms).

This idea of cooking as a virtue–as something one should do, like exercising and tooth brushing–seems quite new. Not wrong–just new. And that means that by giving up cooking, we’re not becoming less human, as Pollan suggests, but succumbing to an all-too-human impulse.

Nevertheless, given population growth and the social, ecological, and public-health devastations of industrial agriculture, the mass flight from the kitchen doesn’t seem like an impulse we can indulge very much longer. Pollan was right: people do need to revalue the craft of cooking, to embrace it as a quotidian pleasure, not a mere chore. But if we manage convince them of that, we’ll have achieved something new, not returned to a lost past.

ऋषिकेश Fri, 04/07/2014 - 13:18

In reply to by रोचना

वा! उत्तम चर्चा सरू झाली आहे.
याबाबतीत माझं मत रोचना यांच्यासारखंच आहे. कुणीतरी वेगळा तर्क मांडावा नी माझं मत बदलावं अशी फार इच्छा मात्र आहे.

एकुणच खरोखर पदार्थ घरी करण्याऐवजी फारतर "घर्गुती पदार्थ" असे लेबल असलेल्या व्यावसायिक पदार्थांशिवाय सध्याच्या जीवनमानात अनेकांना दुसरा पर्याय नाही हेच खरं ;)

चिंतातुर जंतू Fri, 04/07/2014 - 13:24

>> खाद्यसंस्कृतीच्या औद्योगीकरणाची टीका अगदी रास्त आहे. पण त्याला तोड म्हणून "माझी आजी कशी दिवसातून तीनदा गरमागरम जेवण तयार करायची" सारखे स्मरणरंजक विश्व उभारून चालत नाही.

>> पॉलन कडे फक्त "माझी आजी किती मस्त ताजा ब्रेड तयार करायची" सारखे स्मरणरंजन आहे, ते फारच असमाधानकारक आहे.

कुणाला आवडो न आवडो, पण ह्यावर फ्रेंचांनी एक उपाय केला आहे. जुन्या पाककृतींनुसार पारंपरिक प्रोसेसिंग करून ब्रेड बनवणारा बेकर असेल तर त्याला तसं सर्टिफिकेट मिळतं. 'artisan boulanger' म्हणून तो ओळखला जातो. अशी बेकरी 'entreprises artisanales' श्रेणीमध्ये येते. थोडक्यात, अगदी कलाकार (आर्टिस्ट) नाही तरी कारागीर (क्राफ्टसमन) म्हणून अशा लोकांना कायदेशीर मान्यता मिळते. असेच नियम वाईन, चीज वगैरेंसाठी आहेत. असे पदार्थ अधिक महाग विकले जातात. काही बाबतींत त्यांना सरकारी ग्रँट्सद्वारे प्रोत्साहन किंवा करसवलत मिळते. धकाधकीच्या आयुष्यात फ्रेंच माणूस अशा संस्थांद्वारे आपली हौस फेडू शकतो. पारंपरिक पद्धती टिकू शकतात. उद्योगीकरणात अंतर्भूत असलेल्या 'कमीत कमी खर्चात/वेळात/मनुष्यबळात जास्तीत जास्त माल' बनवण्याच्या दबावापुढे फ्रेंच पाककला आणि एकंदरीत संस्कृती अशा प्रकारे टिकू शकते.

चिंतातुर जंतू Fri, 04/07/2014 - 13:32

In reply to by अनुप ढेरे

>> परंपरेला फ्रेंच विचारवंत झोडपून काढत नाहीत का?

शब्दांनी यच्चयावत सगळ्याला झोडपून काढतानाच कृतीनं रसिकपणा टिकवता आला तरच ते खरे फ्रेंच ;-)

बॅटमॅन Fri, 04/07/2014 - 13:54

In reply to by अनुप ढेरे

मॉडर्निटी त्यांनीच सुरू केली, सबब त्यानंतर ते परंपरेला शिव्या घालू शकतच नाहीत. बाकी ठिकाणी तो आयात माल असल्याने तत्रस्थांवर जुन्या मालाला शिव्या घालण्याची जबाबदारी येत असावी बहुधा. त्याशिवाय नवा माल खपणे कठीणच म्हणा.

मेघना भुस्कुटे Fri, 04/07/2014 - 14:19

In reply to by चिंतातुर जंतू

भारतीय - किंवा अजून संकुचित, महाराष्ट्रीय - खाद्यपदार्थ व्यावसायिक तत्त्वावर आणि पारंपरिक पद्धती वापरून उपलब्ध करून देणार्‍या काही कंपन्या / उत्पादनं माहीत आहेत का?

अनुप ढेरे Fri, 04/07/2014 - 14:23

In reply to by मेघना भुस्कुटे

कोथरूडमध्ये फक्त सीकेपी पदार्थ विकणार्‍या एकांबद्दल ऐकलय. पण ते हाटील नाहीये बहुदा. फक्त केटरींग.

मी Fri, 04/07/2014 - 14:29

In reply to by मेघना भुस्कुटे

समजले नाही, सध्या बाजारात थालपिठापासून ते सुरळीच्या वड्या, उकडीचे मोदक, पुरणपोळीपर्यंत सगळेच तर मिळते आणि ते पारंपारीक पद्दत वापरुनच बनवत असावेत, फक्त श्रीखंड बनवण्याची पद्धत बदलली असेल.

ऋषिकेश Fri, 04/07/2014 - 14:34

In reply to by मी

नसावे, म्हंजे सुरळीच्या वड्याबद्दल कल्पना नै,
पण आता उकडीचे मोदक घ्या, पारंपरिक पद्धतीत छान मोदक पात्रात, हळदीच्या का कसल्याश्या पानावर उकडलेल्या मोदकांना त्या पानाचा सुवासाचाही स्पर्श होतो.
घरी बनवल्या जाणार्‍या थालिपिठाचे पीठ आणि व्यावसायिक तयार पीठ यात अनेक प्रकारचा फरक असतो.
पुरळपोळिचा पोत, भरलेल्या पुरणाची मात्रा, पुरण घाटायची पद्धत सगळेच व्यावसायिक स्तरावर केले की बदलते. इतकेच नाही तर बाजारात मिळणार्‍या पुरणपोळ्या या तद्दन पश्चिम महाराष्ट्रातील ब्राह्मणी (ते ही धड नाहीच) प्रकारच्या असतात (तरी त्यात जायफळ नसतेच त्यात अनेकदा). विविध प्रांतात पुरणाचे, भरण्याच्या पद्धतीत व चवीत फरक असतो. (गेल्याच रविवारी एम्पीतील मराठी शेजार्‍यांनी खिलवलेली पुरणपोळी अगदी वेगळी तरीही अहाहा होती)

मेघना अश्या पद्धतीने बनवलेल्या - मग ते कमी प्रमाणात का असेना - पदार्थांच्या विक्रीबद्दल बोलत असेल असा माझा अंदाज.

मेघना भुस्कुटे Fri, 04/07/2014 - 14:40

In reply to by ऋषिकेश

अशा प्रकारचं प्रमाणीकरण भारतात कितपत शक्य आहे मला सांगता येत नाही. कारण मुळात पद्धतींमध्येच इतकी विविधता आहे, की एक थालीपिठाची भाजणी घेतली तरी कोकणातल्या लोकांना मुख्य धान्य म्हणून तांदूळ वापरायची सवय, देशावरच्या लोकांना गहू. शिवाय जाती आणि पोटजातींमुळे पडणारे घटकपदार्थांमधले फरक, बदलणारी नावं आणि शिजवायच्या पद्धती. अशात प्रमाणीकरण जवळजवळ अशक्यच दिसतं.

मग आपण सरकारी प्रमाणपत्रं, करसवलती आणि प्रोत्साहनं देण्याच्या भरवशावर कसे काय राहू शकणार?

बरं, हे झालं शिजवण्याच्या पद्धतींचं. जे घटक पदार्थ वापरायचे, ते सेंद्रिय आहेत की नाहीत, ते नक्की पारंपरिकरीत्या वापरल्या जाणार्‍या प्रजातीचेच आहेत की नाहीत.. हे अजून महत्त्वाचे प्रश्न.

ऋषिकेश Fri, 04/07/2014 - 14:44

In reply to by मेघना भुस्कुटे

प्रमाणीकरण होऊ नये हीच तर इच्छा आहे ना.
प्रमाणीकरण टाळून प्रत्येकाला आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यासह व्यवसाय करता येण्याचे ते प्रमाणपत्र/लायसन्स/प्रोत्साहन हवे.

मी Fri, 04/07/2014 - 14:46

In reply to by ऋषिकेश

पुरळपोळिचा पोत, भरलेल्या पुरणाची मात्रा, पुरण घाटायची पद्धत सगळेच व्यावसायिक स्तरावर केले की बदलते.इतकेच नाही तर बाजारात मिळणार्‍या पुरणपोळ्या या तद्दन पश्चिम महाराष्ट्रातील ब्राह्मणी (ते ही धड नाहीच) प्रकारच्या असतात (तरी त्यात जायफळ नसतेच त्यात अनेकदा).

पारंपारिक ते काय हे कसे ठरवणार? कोकणात कैरीचे लोणचे मोहरी फेसुन फोडणी देऊन केले जाते, देशावर मात्र फक्त मोहरीची फोडणी असते. दोन्ही प्रकारची लोणची बाजारात मिळण्याची शक्यता आहेच, कदाचीत कोकण्स्थ पद्धतिचे अभावानेच मिळेल, पण मिळण्याची शक्यता आहेच.

चिंतातुर जंतू Fri, 04/07/2014 - 15:03

In reply to by मी

>> पारंपारिक ते काय हे कसे ठरवणार? कोकणात कैरीचे लोणचे मोहरी फेसुन फोडणी देऊन केले जाते, देशावर मात्र फक्त मोहरीची फोडणी असते. दोन्ही प्रकारची लोणची बाजारात मिळण्याची शक्यता आहेच, कदाचीत कोकण्स्थ पद्धतिचे अभावानेच मिळेल, पण मिळण्याची शक्यता आहेच.

परंपरांच्या विविधतेला मान्यता देणारे फ्रेंच दोन्हींना पारंपरिकच मानतील. कारण इथे मुद्दा 'आमची ती परंपरा तुमचा तो भ्रष्ट व्यवहार' असा नसून 'असेंब्ली लाईन' किंवा वेळ/पैसा/श्रम वाचवण्यासाठी खटाटोप टाळून शॉर्टकट घेण्याचा आहे.

मी Fri, 04/07/2014 - 15:16

In reply to by चिंतातुर जंतू

होय की, पण ऋषिकेशचे म्हणणे होते की पश्चिम महाराष्ट्रातल्या ब्राह्मणी घाटाच्या पुरणपोळ्या खर्‍या नव्हेतच...म्हणून विचारणं आलं कि ब्वा नक्की पारंपारिक ते काय? ;)

ऋषिकेश Fri, 04/07/2014 - 15:23

In reply to by मी

मी कधि हो असं म्हटलं?
बाजारात मिळणार्या पश्चिम महाराष्ट्रातल्या ब्राह्मणी घाटाच्या पुरणपोळ्या याच फक्त खर्‍या पुरणपोळ्या नव्हेत अस मी म्हणतोय

अनुप ढेरे Fri, 04/07/2014 - 17:18

In reply to by मी

हेच ते... ज्याला मनोबा श्या घालतो. व्यवस्थित एक अर्थ ध्वनित करायचा पण अशी वाक्यरचना करायची की तो तांत्रिक दृष्ट्या तो अर्थ नाहीच असही झालं पाहिजे. एखादा नवखा अल्गद अडकतो जाळ्यात :P

मी Fri, 04/07/2014 - 17:28

In reply to by अनुप ढेरे

हेच ते...एकाच प्रतिसादात मनोबा, मी, ऋषिकेश ह्या सगळ्यांना टोमणे मारायचे, नवखा अगदी अल्ग्द मार्मिक देऊन जातो.

मस्त कलंदर Fri, 04/07/2014 - 15:31

In reply to by मी

मराठवाड्यातल्या पुरणपोळ्या खाल्ल्या की पश्चिम महाराष्ट्रातल्या आवडेनाशा होतात. ;-) प.म. मध्ये पुरण साधारन कमी घातलं जातं, अगदी तेलाच्या आणि पिठाच्या दोन्ही प्रकारांमध्ये. मराठवाड्यात पोळी फुटून पुरण बाहेर येईल असे वाटण्याइतकं पुरण आत ठासून भरलेलं असतं.

चिंतातुर जंतू Fri, 04/07/2014 - 14:41

In reply to by मेघना भुस्कुटे

>> महाराष्ट्रीय - खाद्यपदार्थ व्यावसायिक तत्त्वावर आणि पारंपरिक पद्धती वापरून उपलब्ध करून देणार्‍या काही कंपन्या / उत्पादनं माहीत आहेत का?

पद्धती पारंपरिकच वापरतात का, ह्याविषयी खात्रीनं सांगणं कठीण आहे, पण पुण्यात भाजपच्या नगरसेविका असलेल्या माधुरी सहस्रबुद्धे ह्यांच्या 'सकस' उत्पादनांचा माझा अनुभव चांगला आहे. पदार्थांच्या चवीवरून ते घरगुती वाटतात. तेला-तुपाचा दर्जा चांगला असतो. त्यांच्या बंगल्यातच पाठीमागे काही महिला पदार्थ बनवत असतात. त्यामुळे यंत्रांचा वापर माफकच असावा. हे एक उदाहरण झालं. असे अनेक कुटिरोद्योग पुण्यात आहेत.

मन Fri, 04/07/2014 - 20:00

In reply to by चिंतातुर जंतू

+१ सकसची उत्पादने मस्तच आहेत.
अशी कैक इतर उत्पादनेही निदान पुणयत आहेत, अगदि गनबोटँच्या चिअवड्यापासून ते टाटा मोटर्सच्या कर्मचारी संघाच्या कुटुंबियांनी चालवलेल्या घरगुती पदार्थांच्या विक्रीच्या स्टॉल्सपर्यंत.
पुण्यात एका गोष्टॅएचा लक्षणीय अभाव जाणवतो तो म्हणजे पोळी - भाजी केंद्रे.
पुण्यात वर्किंग कपल्स बरीच असलयने अशी केंद्रे औरंगाबादसारखीच मोठ्या प्रमाणात असतील असे वाटले होते;
पण तसे अजिबातच नाही; हे पाहून आश्चर्य वाटले.
औरंगाबादमध्ये अनेकानेक पोळी भाजी केंद्रे मागील पंधरा वर्षात उघडलीत. "स्वयंपाक घर" हा तिथला सर्वात नावाजलेला आणि किंचित महाग, पण उत्तम दर्जाचा ब्रॅण्ड. इतरही अनेक तिथे आहेत.

ॲमी Sat, 05/07/2014 - 08:32

In reply to by मन

+१ पोळी भाजी केंद्र नाहीतच आणि विकत पोळ्या मिळतात त्यादेखील खास नसतात.
कॉलेज, विद्यार्थ्यांची गर्दी असलेल्या भागात खानावळचा पर्याय असतो. पण इतर ठिकाणी काहीच नाही. आता आमच्या भागातच बघ, कितीतरी ब्याचलर्स, वर्किंग कपल्स राहतात. पण सगळ्यांनी ग्यास घेणे, भांडीकुंडी जमा करणे, स्वयंपाकाला बाई लावणे, ती इकडेतिकडे पीठ सांडून ठेवणार म्हणून सहा महीने/वर्षाला पेस्ट कंट्रोल करणे याशिवाय पर्यायच नाही. एका माणसाचा एक वेळचा स्वयंपाक, तीन पोळ्या भाजी वरण भात करायला ५००रू हा योग्य दर आहे का? २०१४मधे योग्य वाटतील कदाचीत पण २००७मधेदेखील हेच दर होते.

चिंतातुर जंतू Sat, 05/07/2014 - 11:40

In reply to by मन

>> पुण्यात एका गोष्टॅएचा लक्षणीय अभाव जाणवतो तो म्हणजे पोळी - भाजी केंद्रे.
पुण्यात वर्किंग कपल्स बरीच असलयने अशी केंद्रे औरंगाबादसारखीच मोठ्या प्रमाणात असतील असे वाटले होते;
पण तसे अजिबातच नाही; हे पाहून आश्चर्य वाटले.

पुण्यातला शिरस्ता म्हणजे अनेक ठिकाणी घरगुती जेवणाचे डबे घरपोच मिळतात. तुमच्या आवडीनुसार त्यात अख्खा डबा (आमटी-भातासह - बॅचलरांना सोयीचा) ते (घरी जाऊन कुकर लावत असाल तर) फक्त पोळी-भाजी असे पर्याय असतात. घरच्या घरीच अनेक बायका हे उद्योग करून कमाई करतात. अधिक चोखंदळ पर्याय हवे असले तर डेक्कनचं आशा डायनिंग हॉल, सदाशिव पेठेतलं बादशाही / पूना बोर्डिंग, नळ स्टॉपचं स्वीकार / मनोहर अशा अनेक थाळीच्या ठिकाणांहूनही लोक हव्या त्या पदार्थांचा डबा घरी नेतात. माझ्यासारख्याला ह्यात पुरेसं वैविध्य मिळतं - पालेभाज्या, उसळी ते अगदी रसम किंवा केळ्याची कोशिंबीर वगैरे.

मन Mon, 07/07/2014 - 15:01

In reply to by चिंतातुर जंतू

आशा डायनिंग ,स्वीकार ,बादशाही / पूना बोर्डिंग इथे मीही दीर्घकाळपासून जात आहे. माझ्या विशेष आवडीची अशी ही सर्वच ठिकाणे आहेत.
पण ही क्याटेगरी वेगळी आहे. मी म्हणतो आहे तो प्रकार म्हणजे नुसतेच पोळी भाजी जाता येता उपलब्ध असणे अशा प्रकाराबद्दल.
(वडापाव किंवा इडली उपलब्ध असते ना, त्या धर्तीवर.)
जे घरगुती डबे म्हणताय, त्यासाठी पुरेसे अड्डे ठाउक असणं आवश्यक आहे. शिवाय नियमित डबे लावणार असाल तर ते देण्यास अधिक उत्सुक असतात. असच एखाद दिवस घरातील स्वयंपाकघर सांभाळणारी व्यक्ती आजारी आहे; उपलब्ध नाही; अशी अवस्था असेल; तर चटकन जाउन
भाजी पोळी घेउन येता अलं पाहिजे.(नेमकं सांगता येणं कठीण आहे; हा प्रत्यक्ष अनुभवायचा प्रकार आहे. औरंगाबादमध्ये जाता येता दुकानांच्या पाट्या दिसाव्यात तशा "पोळी भाजी केंद्र" अशा पाट्या दिसतात. त्या मुख्य रस्त्यावर असतात; परिसराचा फार काही सूक्ष्म अभ्यास करावा लागत नाही. नियमित मेंबरशिप घ्यावी लागत नाही.)
पिंपरी चिंचवड लिंक रोडवर असे एक पोळी भाजी केंद्र आहे; किंवा चिंचवडातील मोरया देवस्थानपाशी भाकरी व भाजी/वरण मिळते;
मी त्या धर्तीच्या गोष्टी म्हणत आहे.

अवांतर :-
आशा डायनिंग ,स्वीकार ,बादशाही / पूना बोर्डिंग ही सर्व ठिकाणे मला अत्यंत प्रिय आहेत.

पण आशा डायनिंग, अतिथी सारख्या ठिकाणी फक्त पोळी भाजी घेउन येता येतं. माझी मैत्रिण बोअरिंग भाजी असेल तर आशा मधून फक्त कोशिंबिर आणि पोळी घेउन येते.

मन Mon, 07/07/2014 - 15:54

In reply to by केतकी आकडे

ओह , हे ठौक नव्हते. थ्यांक्स. (मी गेलो की आख्खी थाळी खाउनच निघतो.)
म्हणजे पुण्यातही चाळीसेक रुपयात एकवेळची पोळी - भाजी; किंवा पोळी - कोशिंबिर खाता येइल की!

ऐकून बरं वाटलं राव; कधी ह्या मंडळींना हे असं विचारुन पाहिलच नव्हतं.

Nile Fri, 18/07/2014 - 00:25

In reply to by मन

साला आम्ही कालेजात असताना प्लास्टीकच्या पिशवीत उसळ, कांदा-बटाटा वगैरे भाज्या आणि प्लास्टीकच्या पिशवीच्याच जाडीच्या पोळ्या असे कित्येकदा घेऊन खात होतो. अगदी डहाणूकर, वारजे माळवाडीतही आम्हाला मिळायच्या या गोष्टी. दहा-बारा रुपड्यात काम व्हायचं! सालं पूर्वीचं पुणं राहिलं नाही हेच खरं!

उपाशी बोका Thu, 17/07/2014 - 09:34

In reply to by चिंतातुर जंतू

घरगुती पदार्थ म्हटले की ते लिमिटेड प्रमाणात उपलब्ध होणारे पाहिजेत, आणि त्यांच्या लिमिटेड उपलब्धतेमुळे आणि चांगल्या क्वालिटीमुळे ते प्रिमियम ब्रँड असले पाहिजेत. नाहीतर चितळ्यांच्या बाकरवडीसारखे व्हायचे. व्यावसाईक प्रमाणात भसाभस केलेल्या उत्पादनामुळे त्याला चांगला ब्रँड म्हणता येईल, पण घरगुती म्हणता येणार नाही.

रामदास Sun, 06/07/2014 - 13:11

In reply to by मेघना भुस्कुटे

गृहस्थ असे बरेच पदार्थ बनवतात. झालंच तर ठोसर नावाचे गृहस्थ त्यांच्यापेक्षा जास्त चांगल्या दर्जाची उत्पादने बनवतात.चार पैशे खुळखुळत असतील तेव्हा खास चिरोटे खाण्यासाठी मी ठोसराकडे जातो. चार घरी घेउन जातो. ठोसर नावाचे एक गृहस्थ संसार नेटका करावे असे म्हटलेत्य म्हणून.

रोचना Fri, 04/07/2014 - 14:57

In reply to by चिंतातुर जंतू

फ्रांस चे उदाहरण हे पॉलन चे आवडते आहेच - उगाच नाही तो फ्रांसमधे, उत्तर कॅलिफोर्नियाच्या बर्कलीत राहात! पण तेथे सुद्धा युरोपीय (फ्रेंच असो, किंवा पूर्व युरोपीय यहूदी खाद्यसंस्कृती असो) पद्धतींची बरीच अनैतिहासिक चर्चा होते - अमेरिकेतल्या परिस्थिती विरुद्ध त्यांचे खूप रोमँटिक वर्णन करतो.

नंदन Fri, 04/07/2014 - 15:05

'Omnivore's...'मध्ये तितकासा हा सूर जाणवला नाही. 'मदर जोन्स'चा लेख वाचून वाटतंय की 'Cooked' सारख्या नवीन पुस्तकांत/निबंधांत तशी भूमिका डोकावते आहे. बाकी औद्योगिकीकरणाची आवश्यक मर्यादा किती आणि इंडस्ट्रियल अ‍ॅग्रिकल्चरचा अतिरेक यातला ग्रे एरिया आणि त्याला मिळणार्‍या कौटुंबिक/सामाजिक परिमाणामुळे वाढणारी गुंतागुंत हाताळणं अवघड खरंच.

अवांतर - 'दाल फ्राय'च्या रेडीमेड पाकीटावरून रंगलेली एक आंतरजालीय चर्चा आठवली :)

रोचना Fri, 04/07/2014 - 16:34

In reply to by नंदन

बरोबर आहे, म्हणूनच मला ऑम्निवोर्स खूपच आवडलं - पण इन डिफेन्स ऑफ फूड पासून तोचतोचपणा जाणवायला लागला. बर्कलीत असताना अनेकदा मुलाखती, चर्चा वगैरे ऐकल्या होत्या, त्यातून ही हा सूर जाणवायचा. पण या विषयावर लिहीणार्‍यांपैकी त्याची शैली चांगली आहे यात प्रश्नच नाही. ऑम्निवोर्स मी अगदी सहज, काहीच माहित नसताना सिटी लाइट्स मधे उचललं होतं, आणि घरी येईपर्यंत बार्ट मधे आर्धं वाचून ही झालं - पॉलीफेस फार्मच्या प्रकरणात शेवटी सूफलेची चव अगदी माझ्या जिभेवर होती.

राजेश घासकडवी Fri, 04/07/2014 - 19:04

सामाजिक समता विरुद्ध पर्यावरणीय दक्षता हा द्वंद्व कृत्रिम आहे हे मला ही मान्य आहे.

मला हे द्वंद्व कृत्रिम वाटत नाही. मुळात पुरुषांनी बाहेर काम करायचं ही व्यवस्था स्त्रियांच्या गर्भधारणेवर नियंत्रण नसल्यामुळे आली. वयाच्या सोळाव्या वर्षापासून ते चाळिसाव्या वर्षापर्यंतच्या सुमारे पंचवीस वर्षांच्या काळात सात ते आठ बाळंतपणं करायची तर स्त्रीला व्यवसाय करणं, त्यात नाव कमावणं, ग्राहकांना धरून ठेवणं हे महाकठीण काम होतं. त्यात बहुतांश व्यवसायात भरपूर शरीरश्रम होते. मग त्या पंचवीस वर्षांतली पाच-दहा वर्षं गरोदर असण्यात, गरोदरपणातून उद्भवणारी आजारपणं काढण्यात आणि बालसंगोपनासाठी घरी राहण्यात घालवायची असतील तर सर्वच घरकामं स्त्रीने करावी आणि बाहेरचा व्यवसाय पुरुषाने करावा हे अर्थशास्त्रीय दृष्टीकोनातून कुटुंबाला फायद्याचं होतं. या अर्थशास्त्रातून झालेल्या विभागणीचा परिणाम ध्रुवीकरणात झाला. आणि हे ध्रुवीकरण झाल्यामुळे स्त्रीला घराच्या चार भिंतींची मर्यादा आली. आणि या मर्यादेतून सामाजिक असमता आली.

पर्यावरणाचा विचार करायचा की वेळ वाचवयचा, कष्ट वाचवायचे हा असाच अर्थशास्त्रीय हिशोब आहे. ध्रुवीकरण/असमता हीदेखील फायद्याच्या आकडेमोडीतून आलेली. आता परिस्थिती बदललेली आहे. स्त्रीचं आयुर्मान अधिक, बाळंतपणं दोन, त्यातून वाचण्याची शक्यता खूप जास्त, आणि संगोपनासाठी उपलब्ध असलेली यंत्रणा यातून हे ध्रुवीकरण कमी होतं आहे. त्यामुळे या गणितांची सूत्रं बदलत आहेत. या बदलणाऱ्या सूत्रांत पर्यावरण, समानता, मोकळ्या वेळांची गणितं, आणि त्यातून मिळणाऱ्या आनंदाचं प्रमाण हे सर्व संलग्न आहे. त्यामुळे हे द्वंद्व खरं आहे.

यावर उपाय काय? तर एक काळ असा येईल, जेव्हा पर्यावरणावर वाईट परिणाम न करणारं तंत्रज्ञान उपलब्ध होईल. त्याच्या सहाय्याने कष्ट अजून कमी होतील, आणि प्रत्येकालाच अधिक मोकळा वेळ मिळेल. स्वयंपाक ही कला म्हणून पाहणारांना महत्त्व येईल. कदाचित चिंतातुर जंतूंनी दिलेल्या फ्रेंचांच्या उदाहरणाप्रमाणे काही उपाय निघतील.

गब्बर सिंग Sat, 05/07/2014 - 02:54

In reply to by राजेश घासकडवी

मुळात पुरुषांनी बाहेर काम करायचं ही व्यवस्था स्त्रियांच्या गर्भधारणेवर नियंत्रण नसल्यामुळे आली. वयाच्या सोळाव्या वर्षापासून ते चाळिसाव्या वर्षापर्यंतच्या सुमारे पंचवीस वर्षांच्या काळात सात ते आठ बाळंतपणं करायची तर स्त्रीला व्यवसाय करणं, त्यात नाव कमावणं, ग्राहकांना धरून ठेवणं हे महाकठीण काम होतं. त्यात बहुतांश व्यवसायात भरपूर शरीरश्रम होते. मग त्या पंचवीस वर्षांतली पाच-दहा वर्षं गरोदर असण्यात, गरोदरपणातून उद्भवणारी आजारपणं काढण्यात आणि बालसंगोपनासाठी घरी राहण्यात घालवायची असतील तर सर्वच घरकामं स्त्रीने करावी आणि बाहेरचा व्यवसाय पुरुषाने करावा हे अर्थशास्त्रीय दृष्टीकोनातून कुटुंबाला फायद्याचं होतं. या अर्थशास्त्रातून झालेल्या विभागणीचा परिणाम ध्रुवीकरणात झाला. आणि हे ध्रुवीकरण झाल्यामुळे स्त्रीला घराच्या चार भिंतींची मर्यादा आली. आणि या मर्यादेतून सामाजिक असमता आली.

कंपॅरॅटिव्ह अ‍ॅडव्हांटेज व डिव्हिजन ऑफ लेबर (स्पेशलायझेशन) या दोन संकल्पनांचा इतका मस्त मेळ असलेला मराठी परिच्छेद वाचण्यात नाही.

चिंतातुर जंतू Wed, 16/07/2014 - 13:38

फ्रेंच रेस्टॉरंटमध्ये दिलं जाणारं खाणं जर घरगुती पद्धतीनं बनवलेलं असलं आणि त्यात औद्योगिक प्रक्रियांनी बनवलेले तयार घटक नसले तर मेनूमध्ये अशा पदार्थांसोबत वेगळा लोगो देऊन घरगुती जेवणाला प्रोत्साहन देणारा कायदा फ्रान्सनं पारित केला आहे.

मी Wed, 16/07/2014 - 17:16

In reply to by चिंतातुर जंतू

हे परवडण्यासारखे असेल काय? घरगुती पद्धतिने पदार्थ करायला लागणारा वेळ आणि व्यवसायाचे गणित जमवणे अवघड वाटते म्हणूनच हॉटेलची(मास प्रॉडक्शन) गरज निर्माण झाली, आणि फ्रेंच लोकं घरगुती पदार्थ घरीच खातील न? हे जर आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी असल्यास त्यांना तसेही घरगुती आणि इतर चवीतला फरक कळणे अवघड असावा, अमुक चिन्ह असलेला पदार्थ स्टेपल अन्न आहे असा निर्देश कदाचीत माहितीसाठी उपयोगी पडेल पण चवीचे घरगुती व्यवसायिक गणित जमवणे अवघड वाटते.

बॅटमॅन Wed, 16/07/2014 - 17:20

In reply to by मी

मलाही तीच शंका आहे. बादशाहीसारखा प्रकार भारतात स्वस्त आणि मस्त या क्याटेगरीत मोडत असल्याने चालतो, तिकडं मस्त असलं तरी स्वस्त नसेल तर लोक घेतील का? की खाईन तर घरगुतीशी असे म्हणत पैशे खर्च करतील?

चिंतातुर जंतू Wed, 16/07/2014 - 17:26

In reply to by मी

>> फ्रेंच लोकं घरगुती पदार्थ घरीच खातील न? हे जर आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी असल्यास त्यांना तसेही घरगुती आणि इतर चवीतला फरक कळणे अवघड असावा, अमुक चिन्ह असलेला पदार्थ स्टेपल अन्न आहे असा निर्देश कदाचीत माहितीसाठी उपयोगी पडेल पण चवीचे घरगुती व्यवसायिक गणित जमवणे अवघड वाटते.

साधेसुधे पदार्थ घरी केले जातात, पण मेहनतीचे किंवा वेळखाऊ पदार्थ नेहमी घरीच करत बसणं व्यवहार्य नसतं. उदा : पिझ्झा बेस घरी करायला वेळ द्यावा लागतो. रेस्टॉरंटच्या, म्हणजे व्यावसायिक किचनमध्ये ते होऊन जातं. पुन्हा इथे 'घरगुती'ला काही विशिष्ट अर्थ आहे आणि तो यंत्रावर बनलेले रेडिमेड घटक (उदा : पिझ्झा/टार्टचा बेस, स्टॉक क्यूब्ज़, तयार कापलेले माशांचे फिले पीस, स्टेक्स वगैरे) न वापरणं असा आहे. अशा घरगुती गोष्टींना अधिक पैसे आकारता येतात आणि ते देणारा उच्चमध्यमवर्ग असतो.

मी Wed, 16/07/2014 - 18:18

In reply to by चिंतातुर जंतू

धन्यवाद.

घरगुतीचे संदर्भ असे कालपरत्वे बदलत असावेत हे गमतीशीर वाटले, म्हणजे घरीच बनवलेल्या चक्क्यापासून श्रीखंड बनवणे आणि तयार चक्क्यापासुन श्रीखंड बनवणे ह्या दोन्ही पदार्थांना वेग-वेगळ्या कालचौकटीत घरगुती असे संबोधता यावे पण कालांतराने घरगुतीची व्याख्याच बदलल्यास नवल नाही.

नितिन थत्ते Wed, 16/07/2014 - 19:26

In reply to by चिंतातुर जंतू

याचा अर्थ हे बनवायला लै कष्ट लागले आहेत असे समजून जास्त पैसे द्यायचे.

हे जरा मार्क्सच्या व्हॅल्यू संकल्पनेवर आधारलेले वाटते. ग्राहकाला त्यातून काय मिळते तर काही केमिकल न वापरलेला पदार्थ (आणि कोणाला तरी बरेच कष्ट करायला लागले आहेत याचा सॅडिस्ट आनंद?)

राजेश घासकडवी Wed, 16/07/2014 - 19:50

In reply to by नितिन थत्ते

ग्राहकाला त्यातून काय मिळते तर काही केमिकल न वापरलेला पदार्थ (आणि कोणाला तरी बरेच कष्ट करायला लागले आहेत याचा सॅडिस्ट आनंद?)

गृहितक असं आहे की यापलिकडे काहीतरी मिळतं. उदाहरणार्थ, अनेकजण 'मिक्सरमधल्या चटणीपेक्षा खलबत्त्यात कुटलेली चटणी जास्त चांगली लागते' असं म्हणतात. आता अशा प्रकारामुळे खलबत्त्यात कुटलेली चटणी महाग पडेल. प्रश्न असा आहे की या सुधारित चवीसाठी तसं म्हणणारे लोक जास्त किंमत देऊ करणार आहेत का? म्हणजे अक्षरशः, आर दे विलिंग टु पुट देअर मनी व्हेअर देअर माउथ इज?

आता ही खरोखरच सुधारित चव असते, की प्लासिबो समाधान असतं याने फारसा फरक पडत नाही.

नितिन थत्ते Thu, 17/07/2014 - 09:23

In reply to by राजेश घासकडवी

खलबत्त्यात "कुटलेल्या" दाण्यांची चव मिक्सरवर "बारीक कापलेल्या" दाण्यांपेक्षा वेगळी लागेल हे मान्य आहे.

पण पण पण

खलबत्ता हाताने न चालवता मशीनने चालवला तर चवीत फरक पडेल का? (स्ट्रोक्स पर मिनिट तितकेच ठेवले आहेत असे गृहीत धरणे).
बहुधा पडू नये. मग जोवर प्रोसेसमध्ये काही फरक नसेल तोवर त्या "मशीन-खलबत्त्यात कुटलेल्या" चटणीला कमी लेखले जावे का?

आर यू इंटरेस्टेड इन टेस्ट ऑर इन द एफर्ट्स ? हा प्रश्न आहे.

चिंतातुर जंतू Thu, 17/07/2014 - 11:32

In reply to by नितिन थत्ते

>> खलबत्ता हाताने न चालवता मशीनने चालवला तर चवीत फरक पडेल का? (स्ट्रोक्स पर मिनिट तितकेच ठेवले आहेत असे गृहीत धरणे).

औद्योगिक प्रक्रियांच्या वापरामध्ये कमीत कमी वेळ/श्रमात अधिकाधिक उत्पादन हे मूलतत्त्व असतं. त्यामुळे उत्पादनखर्च आणि बौद्धिक क्षमता वापरून बनवलेलं मशीन अधिक नफ्यासाठी वापरणं लोकांना सोयीचं वाटतं. त्यातून कमीत कमी वेळात अधिकाधिक दाणे कसे कुटले जातील हे पाहताना अशी गोष्ट ('खलबत्त्यासारखंच घरगुती' हे मूल्य) मागे पडणं साहजिक आहे. जोवर त्यासाठी 'प्रीमियम रेट' आकारता येत नाही तोवर कुणी असं का करावं?

नितिन थत्ते Thu, 17/07/2014 - 14:34

In reply to by चिंतातुर जंतू

त्यासाठी अधिक पैसे देणार की नाही ही गोष्ट अलाहिदा. पण खलबत्त्यात हाताने कुटलेले दाणे खलबत्ता-मशीनवर कुटलेल्या दाण्यांपेक्षा कमी लेखण्याची परंपरा (गृहिणीचं प्रेम वगैरे) आहे. म्हणून हा प्रश्न....

मन Thu, 17/07/2014 - 14:53

In reply to by नितिन थत्ते

खलबत्त्यात कुटणं आणि मिक्सरमधून काढणं ह्यात नक्कीच चवीचा फरक पडतो असं निरीक्षण आहे.
(हातकुटीची शेंगदाण्याची चटणी असेल तर तिला अधिक व्यवस्थित तेल सुटलेले असते; व वेगळी चव जाणवते.
पण अर्थात ही गोष्ट विक्रेत्यांनाही ठाउक असल्याने हल्ली हातकुटाची म्हणून चटणी कुणी आणली तर ती
बाहेरुन तेल शिंपडून केली असावी असेच वाटते.
)
गृहिनीचा खलबत्ता व यांत्रिक खलबत्ता ह्यांची अजून तुलना करण्याची संधी मिळाली नाही.

चिंतातुर जंतू Thu, 17/07/2014 - 15:26

In reply to by नितिन थत्ते

>> पण खलबत्त्यात हाताने कुटलेले दाणे खलबत्ता-मशीनवर कुटलेल्या दाण्यांपेक्षा कमी लेखण्याची परंपरा (गृहिणीचं प्रेम वगैरे) आहे.

कमी लेखण्याची परंपरा आहे की जास्त लेखण्याची? 'आमची आज्जी करायची त्याची सर बाजारच्या तयार वस्तूला नाही'छाप स्मरणरंजनानुसार तर परंपरा आज्जीच्या हाताला जास्त लेखण्याची दिसते.

रमा Thu, 17/07/2014 - 15:13

खलबत्ता/पाटा-वरवंटा आणि मिक्सर ह्या दोघांच्या कार्यपध्तीत फरक आहे म्हणुन चवीत फरक जाणवतो. तो प्लासिबो इफेक्ट नाहि. मिक्सर मध्ये पदार्थ वेगाने फिरवल्याने मोठ्या कणांपासुन लहान कण बनत जातात पण ह्या कणांवर दाब न पडल्याने इसेंशियल ऑइल्स (ज्यांच्याम्उळे आपल्याला स्वाद जाणवतो) कमि/नगण्य प्रमाणात बाहेर पडतात. तर खलबत्यात कुटताना कणांवर दाब पडुन ते फुटतात त्यामुळे इसेंशइल्स ज्यास्त प्रमाणात बाहेर पडतात म्हणुन स्वाद ज्यास्त जाणवतो.

राही Thu, 17/07/2014 - 18:13

वरती श्री. थत्ते यांनी खलबत्त्याचे मशीनमध्ये रूपांतर करण्याची कल्पना मांडली आहे. मिरचीच्या कांडपामध्ये अशी मशीन्स कित्येक वर्षे वापरात आहेत. पूर्वी उखळात मुसळाचे घाव घालून मिरच्या कांडत असत. आमच्याइथे दहा वर्षांपूर्वीपर्यंत अशा कांडपिणी यायच्या. मग क्रमाक्रमाने आठदहा घरांचे तिखट कांडप व्हायचे. हळूहळू त्यांच्या म्हातारपणामुळे म्हणा किंवा कांडप-दर त्यांना आणि आम्हांलाही परवडेनासे झाल्यावर मग सगळ्यांचा मोर्चा दणक्यांकडे वळला. उन्हाळ्यात मुंबईत जागोजागी ह्या दणक्या/डंक्या (एकवचन दणकी, डंकी) दिसतात. जमिनीतल्या लोखंडी उखळसदृश खड्डयामध्ये
दोन बत्ते मोटरच्या साहाय्याने वरखाली होत असतात. मिरचीवर पडलेल्या दणक्यामुळे उसळलेले तिखट पुन्हा खड्ड्यात ढकलण्यासाठी दोनतीन बाप्ये तोंडाला रुमाल लावून आणि हातात ढकलझाडणी घेऊन बसलेले असतात. परळला गणेशगल्ली, चिवडागल्लीमध्ये कित्येकवेळा हे दृश्य पहाताना 'ओल्ड वर्ल्ड चार्म'चा खकाणा अनुभवला आहे. अलीकडे पोर्टेबल दणक्या जास्त दिसतात.

नितिन थत्ते Thu, 17/07/2014 - 18:26

In reply to by राही

ती मशीन पाहिली होती म्हणूनच गुणात्मक फरक नसलेल्या उत्पादनाची कल्पना सुचली. आई किंवा आजी दोन तीन तास कांडप केले तर दमून जातील. त्या ऐवजी मशीन २४ तास कांडप करू शकते. कांडपात गुणात्मक* फरक न पडता मसाल्याचे कमर्शिअल प्रॉडक्शन होऊ शकते. अशा मशीन निर्मित पदार्थांना नाके मुरडण्याचे काही कारण नाही.

*जात्यावर दळणे आणि गिरणीत दळणे याची अ‍ॅक्शन एकच असली तरी गिरणीत जास्त उष्णता निर्माण होऊन पिठाचे मसाल्याचे गुणधर्म बदलू शकतील असे गृहीत धरून......

चिंतातुर जंतू Thu, 17/07/2014 - 19:16

In reply to by राही

>> मिरचीच्या कांडपामध्ये अशी मशीन्स कित्येक वर्षे वापरात आहेत. [...] मग सगळ्यांचा मोर्चा दणक्यांकडे वळला.

वरच्या 'घरगुती' फ्रेंच बातमीच्या संदर्भात इथे एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. आधी कुटून तयार ठेवलेले मसाले वगैरे गोष्टींना फ्रेंच जेवणात कमी प्रतिष्ठा आहे. म्हणजे मिरची वापरायची असेल तर ताजी दळून वापरली तर प्रतिष्ठा अधिक आणि वर्षभरासाठी कुटून ठेवली किंवा बाजारातून तयार पूड आणली तर कमी प्रतिष्ठा असा मामला आहे. ह्याचा चवीशी अर्थात संबंध आहे - ताजं तिखट आणि कांडून काही दिवस झालेलं तिखट ह्यांच्या चवीत फरक पडतो. त्यामुळे 'प्रत्येक वेळी यंत्राचा वापर वाईटच' ह्यापेक्षा त्यांच्या संकल्पना थोड्या वेगळ्या आहेत.

मी Thu, 17/07/2014 - 19:38

In reply to by चिंतातुर जंतू

आयत्या वेळेस किसलेलं आलं, चिरलेल्या मिरच्या, कोथिंबीर आणि इतर साहित्य चवींच प्रमाण वाढवतं असं निरिक्षण आहे.

नितिन थत्ते Fri, 18/07/2014 - 09:18

In reply to by चिंतातुर जंतू

माझे प्रतिसाद घरगुती वि कमर्शिअलच्या फ्रेंच फॅडासंबंधाने नैच्चैत. ते "आजीच्या हातच्या थालीपिठासंबंधी" आहेत.

तिखट मशीनवर पण आजच कुटलेलं (काही दिवस न झालेलं) असं मिळू लागलं तर चालेल ना?

जिथे ताजेपणाचा प्रश्न आहे तिथे चवीत फरक पडेल, मशीनची अ‍ॅक्शन वेगळी असेल तर फरक पडेल हे मान्य केल्यावर जिथे तसे नाही तिथे ते पदार्थ मशीनवर केले असतील त्याने फरक का पडावा? आणि तशा पदार्थांच्या कमर्शिअल प्रॉडक्शनला (आणि लोकांनी ते कन्झ्यूम करण्याला) विरोध का असावा?

अवांतर: घरी मिक्सरमध्ये कुटलेल्या (बारीक कापलेल्या) दाण्यांच्या चटणीची ५०-१०० वर्षे लोकांना सवय झाली की कुटलेल्या दाण्यांची चटणी कमर्शिअली उपलब्ध असली तरी "माझ्या आईने मिक्सरमध्ये केलेल्या दाण्याच्या चटणीची सर त्या बाजारातल्या कुटलेल्या दाण्यांच्या चटणीला नाही" असे लोक म्हणतीलच बहुधा.

राही Fri, 18/07/2014 - 12:31

In reply to by नितिन थत्ते

तेच तर.
अवांतर : सोलापूरच्या 'नसले यांची शेंगाचटणी' ची जाहिरात 'गिरणीवर न दळलेली' अशी करतात पण त्यांचे प्रतिस्पर्धी मात्र 'तसे काही नसते हो, उलट त्यांच्या चटणीत चिंचोक्यांचे पीठ असते' असे सांगतात. आणि आपणां ग्राहकांना ती घरगुती कुटाची खास चवही कळत नाही आणि त्या चिंचोक्यांच्या पिठाचीही कळत नाही.

मन Fri, 18/07/2014 - 13:36

In reply to by राही

आम्ही मित्रांसोबत राहत असू तेव्हा कुणीतरी 'नसले यांची शेंगाचटणी' आणून दिली होती.
अगदि सर्वसाधारण वाटली. पण तसं बोलून दाखवणं उचित ठरलं नसतं; म्हणून तेव्हा काहीही मतप्रदर्शनही केलं नाही.

चिंतातुर जंतू Fri, 18/07/2014 - 13:46

In reply to by नितिन थत्ते

>> जिथे ताजेपणाचा प्रश्न आहे तिथे चवीत फरक पडेल, मशीनची अ‍ॅक्शन वेगळी असेल तर फरक पडेल हे मान्य केल्यावर जिथे तसे नाही तिथे ते पदार्थ मशीनवर केले असतील त्याने फरक का पडावा? आणि तशा पदार्थांच्या कमर्शिअल प्रॉडक्शनला (आणि लोकांनी ते कन्झ्यूम करण्याला) विरोध का असावा?

इथे तुमच्या-माझ्यात तरी मतांतर नाही आहे. किंबहुना म्हणूनच मी तुम्हाला 'घरगुती' फ्रेंच जेवणाविषयीच्या बातमीचा पुन्हापुन्हा संदर्भ देतो आहे आणि पुन्हापुन्हा हे सांगू इच्छितो आहे की - १. यंत्राच्या वापराला विरोधासाठी विरोध इथे अपेक्षित नाही. २. बातमीतले पदार्थ हॉटेलमध्येच म्हणजे व्यावसायिकरीत्याच मिळणारे आहेत.

अजो१२३ Thu, 17/07/2014 - 20:36

औद्योगीकरणाचा राजकीय, आर्थिक इतिहास, तसाच सामाजिक इतिहास, स्त्रियांचे मोठ्या प्रमाणात औद्योगिक वर्कफोर्स मधे शिरणे, घरकाम आणि बाहेरचे काम दोन्ही सांभाळणे, शेतीत स्लेवरी किंवा जातसंस्थेद्वारे पूर्वी मिळणारा, आणि विसाव्या शतकात राजकीय-सामाजिक चळवळी, शहरीकरण, इत्यादींमुळे घटत जाणारा लेबर पुरवठा, औद्योगिक शेतीचा आणि या सामाजिक बदलांचा अन्योन्य संबंध, खाद्यपदार्थ, शेती-निसर्गाशी संबंध, प्रोसेस्ड फूड्स विरुद्ध "डिफेन्स ऑफ फूड" थीम, घरकाम कोण करतं, घरातले निर्णय कोण घेतं, इ इ

इतका विचार केल्यावर

"माझी आजी किती मस्त ताजा ब्रेड तयार करायची"

हे अपुरे वाटणारच.