प्राची दुबळे यांचे आदीवासी संगीतावरील व्याख्यान

मी तसा जमिनीपासून काही दशांगुळे वर तरंगणारा मनुष्य आहे. हरभर्‍याचे झाड मला अतिशय प्रिय असल्याने मी त्यावर सतत चढून बसत असतो. अशावेळी माझे कुटुंबीय आणि मित्र मला जमिनीवर खेचायची भूमिका इमाने इतबारे निभावत असतात. मात्र काहीवेळा एखादा लहानसा कार्यक्रम आपल्याला आपणहून जमिनीची ओढ लावतो याचा प्रत्यय मी रविवारी 'सुदर्शन'ला प्राची दुबळे यांच्या व्याख्यानादरम्यान घेतला.

"शेवंतीचं बन" हा प्राची दुबळे व माधुरी पुरंदरे यांच्या कार्यक्रमाची ओळख मला मकीने काही दिवसांपूर्वीच करून दिली. त्या गाण्याची माझे कान त्यानंतर कित्येक दिवस व्यापलेले होते - आहेत. पैकी प्राची दुबळे या आदिवासी संगीताच्या अभ्यासक आहेत व देशभर फिरून त्या संगीताचा अभ्यास करत आहेत एवढीच माहिती मला मिळालेली होती. मात्र या व्याख्यानात या विषयाचा आवाका, त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत बघून त्यांच्या कार्यापुढे लोटांगण घालायचे मनात होते (पण 'सुदर्शन'ला शिंची जागाच कमी हो! Wink )

व्याख्यान हे रूढार्थाने होणार्‍या 'व्याख्याना'पेक्षा अधिक इन्फॉर्मल होतं. म्हणजे प्रेक्षकांचा सहभाग वगैरे नसला तरी सादरीकरणाची पद्धत आणि बोलण्याची ढब ही दिवाणखान्यात बसून अगदी घरच्यांशी नाही तरी क्वचित येणार्‍या (मात्र) जिव्हाळ्याच्या पाहुण्यांशी गप्पा माराव्यात अशी होती. शिवाय हे व्याख्यान निव्वळा गद्य न ठेवल्याने त्याचे "लेक्चर" कधी झाले नाही. सोबत प्रत्यक्ष आदिवासींनी गायलेल्या गाण्याचे, वाद्यांचे तुकडे (ऑडियो) होत्याच शिवाय काही व्हिडियो होते आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे स्वतः प्राची उत्तम आवाजात काही रचना अधिक सुस्पष्ट आवाजात पेश करत होत्या.

सुरवातीला 'स्वर' या विषयावर बोलताना विविध आदिवासी आवाजांत, संगीतात सूर शोधायचा त्यांनी प्रयत्न केल्याचे सांगितले. मुळात हे संगीत "रॉ" असते. ते का गातात? याचे उत्तर त्यांना गायला आवडते म्हणून इतकेच देता यावे हे त्यांचे उत्तर मला फार आवडले. विविध प्रांताच्या आवाजात आढळणार्‍या स्वरांचा उपयोग, त्यात असणारे फरक यावर बोलताना संबंधित ऑडियो ऐकवणे चालूच असते. विविध जमातींच्या संगीतातील वेगळेपण उलगडून दाखवताना त्यांच्या "सिग्नेचर" लकबी जेव्हा त्या उलगडून दाखवत होत्या तेव्हा कामातील क्लिष्टतेची तोंडओळख होऊ पाहत होती. १२ सुरांना "लिहून" दाखवण्याच्या सोयी असताना हे दोन सुरांमधील आवाज काही ध्वनी यांनी नटलेली गाणी लिहायला त्यांना (त्यांच्या गुरुजींच्या साथीने) नवी लेखनपद्धती विकसीत करावी लागली. त्यांच्या मते प्रत्येक आदिवासी समाजाचा असा स्वतंत्र अभ्यास करावा लागतोय कारण एकाच भागातील आदिवासी जमावाच्या गायन पद्धतीत बारीक बारीक परंतू महत्त्वाचे - सिग्नेचर असावेत इतके - फरक आहेत. त्यानंतर लय, ताल यांच्याबद्दलही त्या बरेच बोलल्या. काही अनवट लयीत बांधलेली गाणी त्यांनी दाखवली साडे पाच व अडीच मात्रांवर रचलेली तालरचना त्यांनी ऐकवली व त्यासोबत मात्र मोजूनही दाखवल्या. सुरुवातीला त्यांना लय समजत नसताना आदिवासीपैकी काहींनी त्यांचा हात धरून ताल शिकवला ती आठवही हृद्य होती. डोंगरावरील आदिवासींच्या आवाजाची पट्टी, नद्यांच्या खोर्‍यात रहाणार्‍यांचे स्वर यातही असलेला फरक त्यांनी छान उलगडून दाखवला.

बाकी त्या व्याख्यानात संगीताबद्दल बराच उहापोह होताच, त्याला समांतर असे तेथील सामाजिक बदल, चालीरीती यावरही त्यांनी केलेले भाष्य विचार करायला भाग पाडत होते. निव्वळ विणकाम करताना हातमागाच्या तालाप्रमाणे असलेले त्यांचे संगीत औद्योगिकीकरणानंतर कसे लोप पावते किंवा चालताना शरीरात भिनलेला ताल वाहने आल्यावर कसा नाहीसा होतो वगैरे बाबी रोचक होत्या. त्याहून आवडले ते याबाबत त्यांचा सुर हा तक्रारीचा नव्हता. बदलत्या परिस्थितीबद्दल, हातातून निसटणार्‍या अमोल ठेव्याबद्दल खंत होती, हळहळ होती पण तक्रार, चिडचिड व/वा त्रागा नव्हता.

व्याख्यानात त्यांची आदिवासी पाड्यांवरील अनुभवही होते. ७०, ८० व ९० अशा तीन आजोबांनी नाचत गाऊन दाखवलेल्या एका गाण्याचा व्हिडियो मोठा रंजक होता. यातील बरीच तालवाद्ये आणि त्यांचेही काही प्राण्यांच्या शिकारीवरील बंदीमुळे (ज्यांच्या चामड्यापासून म्हणा किंवा इतरही भागांपासून बनणार्‍या वाद्यांच्या भागाच्या अनुपलब्धतेमुळे)वाद्यांचे लोप पावणे सुद्धा "पर्यावरणाचे रक्षण" करण्याच्या अट्टहासाचा वेगळा आयाम दाखवून गेला. काही आदिवासी घरांवर आता दिसू लागलेले डिश अँटेना बरेच काही सांगून जात होते. त्या आजोबांचे "हे नाच व गाणी येणारी आमची शेवटाची पिढी" ही जाणीव खिन्न करणारी होती.

व्याख्यानात केवळ स्वर, लय, ताल, संस्कारगीते वगैरेच नव्हती तर शब्दांनाही महत्त्व होते. नव्या युगात शब्दात होणारे बदल (जसे गाण्यात "रोड" येणे, "मारुती" कार म्हणून येणे) छान टिपले होते. या लोकांमध्ये "कलाकार असे वेगळे काही नसतेच, प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग म्हणूनच ते येते. आज मूड आला आहे बैठक जमवली आहे, तंबोरा लावला आहे नी मग मैफल जमवली आहे हे कितीही छान असलं तरी ते पुढे येतं. त्याची सुरुवात संगीत रोजच्या आयुष्याचा भाग असण्यातून येते." वगैरे म्हटली तर वर्णनात्मक नैतर चिंतनात्मक वाक्ये मार्मिक होती.

पूर्वोत्तर राज्यातील आदिवासी समाजावर भुपेन हजारिका यांचा प्रभाव, त्यांनी केलेले काम वगैरेंचा उल्लेखही अपरिहार्य होता. मात्र त्याचवेळी "यांच्याकडून आपण नागर जन काहितरी घेऊन जात असतो. आमच्यासारखे अभ्यासक म्हणवणारेही त्यांची गाणी रेकॉर्ड करतात. पण या कामाच्या उपयोगाची व्याप्ती फारशी मोठी नसल्याने ते चालून जाते. मात्र कित्येक व्यावसायिक टीम्स बनवून आदिवासी संगीत घेऊन जातात त्यावर संस्करण करून कोट्यवधी रुपये कमावतात तेव्हा एक प्रश्न अधिक मोठ्या प्रमाणात पुढे येतो की आपण त्या समाजाला बदल्यात काय देतोय?" हा त्यांनी केलेला शेवट आत्मचिंतनास प्रवृत्त करणारा होता.

थोडक्यात मला बरेच "सजग" करणारे, खूप काही नवे देणारे व्याख्यान असे मी त्याचे वर्णन करेन

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (4 votes)

प्रतिसाद आवडला. मस्त माहिती मिळाली आणि अजून उत्सुकताही पैदा केली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माहितीपूर्ण अशी श्रेणी देण्यात येत आहे. (अधिक थोडा मत्सर. थोडी हळहळ.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वा! रसग्रहण आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद रे ऋ. घरातील दुर्दैवी घडामोडींमुळे व्यवस्थित वेळ राखून ठेवलेला हा कार्यक्रम चुकवावा लागला. थोडीफार रुखरुख भरून निघाली. थोडे अधिक विस्ताराने लिहिल्यास वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

वेगळा धागा काढला हे उत्तम.

प्राची दुबळेंचा गझलगायनाचा कार्यक्रम ऐकला होता आणि तो कार्यक्रम आवडलाही होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी यांनी गायलेल्या गालिब यांच्या गझलांची फीत ऐकली, तेव्हाच प्रभावीत झाले होते. या कार्यक्रमाच्या माहितीबद्द्ल धन्यवाद.
प्राची दुबळे यांची मुलाखत येथे ऐकायला मिळेल.
http://www.youtube.com/watch?v=Vaoi--IGJqI

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऋषिकेश,

तुझा हा आदिवासी संगीताच्या अभ्यासाचा अभ्यासपूर्ण आस्वाद फेसबुकवर शेअर केल्यावाचून रहावलंच नाही...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0