मसरबाई

ती माझ्यावर एकदम जोरात ओरडली.

आमच्या संवादाची सुरुवात मोठी विचित्र झाली होती खरी. कामाच्या निमित्ताने, आमच्या विकास कार्यक्रमांची पाहणी करण्यासाठी, आढावा घेण्यासाठी सगळीकडे जात असते नेहमी मी – आज तशी नंदूरबार भागात आले होते. आम्ही एका शेतात होतो. तिथल्या चांगल्या फळझाड लागवडीबाबत आम्ही बोलत होतो. आंबा तर चांगला वाढलेला दिसतच होता आणि सोबत भाजीपालाही दिसत हो्ता चांगला उगवलेला. म्हणून मी त्या शेताचा फोटो काढत होते. त्यावर एक स्त्री माझ्यावर ओरडली, “मला न सांगता तू माझा फोटू का घेतलास?” म्हणून.

माझी आणि त्या स्त्रीची काही ओळख नव्हती; आमची पहिलीच भेट होती ती. ती तिच्या भाषेत म्हणजे ‘मावची’ भाषेत बोलत होती. ही भाषाही इतर अनेक भाषांप्रमाणे मला ‘अंदाजाने' समजते. त्यावेळी माझ्याभोवती आणखी सहा माणसं – सगळे पुरुष - होती. त्या स्त्रीच ओरडणं ऐकून वातावरणात एकदम तणाव निर्माण झाल्याच मला जाणवलं. एक पुरुष रागारागाने त्या स्त्रीशी बोलायला लागला. मी त्या सगळ्या पुरुषांना ‘काही न बोलण्याची’ विनंती केली. त्या स्त्रीची माफी मागत मी तिला सांगितलं ,” अगं, शेत फार छान दिसतय तुझ, म्हणून मी त्याचा फोटो काढत होते.”

माझ्या शांत स्वरामुळे की काय पण तिचा राग थोडा निवळला.

ती मराठीत म्हणाली, “तुला काही आमची मावची कळत नसेल. कळती का?”

“अगदी थोडी,” मी हसून सांगितलं.

तीही हसली. म्हणाली, “तुम्ही लोक शाळेत जाऊन शिकता एवढ आणि तरी तुम्हाला काही आमची भाषा येत नाही. मी कधी शाळेत गेले नाही, पण मला बघ तुझी पण भाषा बोलता येते." तिच्या या चमकदार प्रतिक्रियेच मला छान हसू आलं. आणि बरोबरच होतं ती काय म्हणाली ते!

ती पुढे आली. माझा हात पकडून तिने शेताच्या एका कोप-यात असलेल्या झोपडीकडे मला खेचून नेलं. त्या झोपडीत बरच सामान होतं. त्याची उलथापालथ करून तिने एक हिरवागार कापडाचा तुकडा शोधून काढला. तो स्वत:च्या डोक्यावर घेऊन, त्यातला काही भाग खांद्यावर ओढून ती मला म्हणाली, “हं , काढ आता माझा फोटो.”

मी तिच्या हुकुमानुसार तिचा फोटो काढला. डिजीटल कॅमेरा असल्याने मी तिला तिचा फोटो लगेच दाखवू शकले.
“छान आलाय ना फोटो?” मी तिला विचारलं.

ती लहान मुलासारखं हसली. म्हणाली, “आता कसा बेश आलाय फोटू. आता तो छाप तू.”

“फोटो छापायचा? कुठे? “– मी गोंधळले होते.

तिला आता माझा गोंधळ पाहून मजा वाटत होती बहुतेक. “कुठे म्हणजे काय? छाप पेपरात. मला काय माहिती? मला कशाला विचारतेस? ”

मला माझी चूक लक्षात आली. तिचा आधीचा फोटो मी डिलीट करून टाकला तिच्यासमोर.

मी तिला तिचा फोटो दाखवला आणि त्यापेक्षाही आधीचा काढून टाकला म्हणून बहुतेक मसरबाई (हे त्या स्त्रीचं नाव) माझ्यावर एकदम खूष झाली आणि माझ्याशी गप्पा मारायला लागली. साधारण ४०च्या आसपास वय असेल तिचं, तिला एक मुलगा आणि एक मुलगी होती. त्या दोघांचही लग्न झालेलं होत. एक दोन एकर जमीनीवर मसरबाई आणि तिचा नवरा राबत होते. मसरबाई कधीच शाळेत गेलेली नव्ह्ती.

कां कुणास ठावूक पण तिला मला ब-याच गोष्टी सांगाव्याशा वाटत होत्या. ती मावची आणि मराठी अशा मिश्र भाषेत बोलत होती आणि मावची बोलली की ‘समजलं का तुला मी काय बोलले ते?’ असा प्रश्न विचारून खात्री करून घेत होती. मी दोन तीन वेळा ‘हो, समजतय' अस म्हटलं तरी तिचा बहुतेक विश्वास नाही बसला. कारण ती म्हणाली, “या लोकांना (सोबत असलेले पुरुष) माझ्यापेक्षा जास्त चांगली येते तुझी भाषा, त्यामुळे काही समजलं नाही, तर त्यांना विचार. समजलं नाही तर तशीच गप्प नको बसू.” मला तिच्या या हुकुमाची गंमत वाटली आणि मी आमच्या संवादात मनापासून रमले. तिची माझ्यावरची हुकुमत मला खुपत नव्हती तर तिच्या आत्मविश्वासाचं मला कौतुक वाटत होतं.

मसरबाईला शेतावरचं काम सोडून जाता येत नव्हतं आणि झोपडीत तर मला देण्याजोगं काही नव्हतं. मग ती माझ्या सहका-यांना (जे त्या गावात नियमित जात असतात), म्हणाली, “ताईला माझ्या घरी घेऊन जा आणि चहा पाजा.” तिचं घर तिथून निदान दोन किलोमीटर अंतरावर होतं. “तू आणि तुझा नवरा तर इकडेच आहेत, मग तुझ्या घरी मला कोण चहा पाजणार?” या माझ्या प्रश्नावर तिचे “पोरग्याची बायको असेल की घरी” हे उत्तर तयार होतं. मग माझ्या सहका-याकडे वळून ती म्हणाली, “आणि ती नसेल घरात, तर तू दे रे करून चहा ताईला." आम्ही सगळे हसलो. मग “पुढच्या वेळी नक्की तुझ्या घरी चहा घेईन" अशी कशीबशी मी तिची समजूत घातली आणि चहाचा विषय संपला.

तिच्या घराच्या आवक-जावकाची चर्चा मी चालू केली. घरात वर्षभरात कुठून आणि किती पैसे येतात आणि कशा कशावर ते खर्च होतात, कर्ज घ्यावं लागतं कां, ते कुठून मिळतं, व्याजाचा दर काय असतो – अशी चर्चा मी गावात गेले की करते साधारणपणे. गरीब कुटुंबांना नेमक्या कशा प्रकारच्या विकास कार्यक्रमाची गरज आहे याचा अंदाज यायला अशा अनौपचारिक चर्चा मला नेहमीच मोलाच्या आणि मार्गदर्शक ठरल्या आहेत. गप्पा चालू असताना स्थानिक पुरुषांपैकी एकजण हसून म्हणाला, “तुझे दारूवर किती पैसे जातात ते पण सांग की ताईला."

मसरबाई बोलायची एकदम थांबली. मलाही क्षणभर काय बोलावे ते सुचेना. मसरबाईने थेट माझ्या नजरेला नजर भिडवून विचारलं, “तू नाही दारू पीत?’

“नाही, मी नाही पीत दारू”, मी शांतपणे सांगितलं.

“का?’ तिचा पुढचा प्रश्न तयारच होता.

मला तो प्रश्न त्या क्षणी एकदम अवघड वाटला कारण तिच्या दारू पिण्याबद्दल मला काही म्हणायचं नव्हत, ते अयोग्य आहे असं म्हणून तिला शरमिंदा नव्हतं करायचं मला!

“आमच्या समाजात नाही दारूची परंपरा , म्हणून नाही पीत मी ती” – तिला समजेल अशा भाषेत मी उत्तर दिलं. आदिवासी समाजाच्या प्रथांबाबत संवेदनशील असण्याचा माझ्या परीनं मी प्रयत्न करत होते.

“तू मटण खातेस का?” मसरबाईचा पुढचा प्रश्न. मी त्यावर काही न बोलता नुसती हसले. हसून उत्तर टाळण्याचा माझा तो क्षीण प्रयत्न होता.

“मला मटण आवडतं आणि कोंबडी तर फारच आवडते. तू कधी खाल्ली आहेस कोंबडी?” मसरबाई काही मला तशी सोडणार नव्हती तर!

मसरबाईने माझ्यावर असा प्रश्नांचा भडिमार सुरु केल्यावर माझे सहकारी आणि गावातले पुरुष रागावले. त्यांच्या मते मी प्रश्न विचारायला तिथं आले होते. मसरबाईने मला प्रश्न – आणि तेही दारू आणि मांसाहार याबद्दल – विचारणं बहुधा कोणालाच अपेक्षित नव्हतं. पण मी जर मसरबाईला खासगी स्वरूपाचे प्रश्न विचारू शकते, तर मसरबाईलाही तसे प्रश्न मला विचारण्याचा अधिकार आहे अशी माझी सरळ साधी भूमिका होती. असे प्रश्न विचारून तिच्या जगण्यात आणि माझ्या जगण्यात काही साम्य आहे का , कुठे नेमके आमचे नाते जुळू शकते याचा ती अंदाज घेत होती असं मला वाटलं. तिच्या पद्धतीने ती मला अजमावत होती आणि त्यात माझ्या मते काही गैर नव्हतं. माझ्यावर तिने का म्हणून विश्वास टाकावा मी तिच्यावर तसाच विश्वास टाकून खासगी माहिती तिला दिल्याविना?

मी मसरबाईला म्हटलं, “नाही, मी मटण आणि कोंबडी दोन्ही खात नाही. पण तुला आवडते ना, मग पुढच्या वेळी आले की तुझ्या घरी खाईन मी. “

तिने मान हलवली आणि माझा समजूतदारपणा एकदम मोडीत काढला. “तुला एखादी गोष्ट पसंत नसेल, तर कशाला मी म्हणते ती दुस-यासाठी करायची? मला खूष करायला तुला कशाला मटण आणि कोंबडी खायला पाहिजे मनाविरोधात? हे काही मला तुझं पटलं नाही बघ ताई.”

मी तिच्या विचारांच्या स्पष्टतेने चकित झाले होते. मला काय उत्तर द्यायचे ते सुचले नाही. मी गप्प बसले.

दोन मिनिटं मसरबाईही शांत होती. तिच्या मनात काहीतरी चाललं होत ते कळत होत त्यामुळे मीही बोलायची घाई केली नाही.

मग निश्चय केल्याप्रमाणे मसरबाई म्हणाली, “बरं मी दारू सोडेन, पण मटण आणि कोंबडी मात्र मी खाणारच.”

“ चालेल ना ताई?” तिने परत एकदा खात्री करून घेतली.

तिच्याच तर्काने तिने माझ्यासाठी काही करायची गरज नव्ह्ती खर तर; पण “नाही तू दारू प्यालीस तरी माझी काही हरकत नाही” असंही मी तिला म्हणू शकत नव्ह्ते!! शिवाय असल्या क्षणिक भावनेत केलेला निश्चय ती खरच अंमलात आणेल की नाही हे काळच सांगेल.

पण मला मसरबाईच्या व्यक्‍तिमत्त्वाच फार नवल वाटलं. खेड्यात वाढलेली, शाळेत जाण्याची संधी कधीच न मिळालेली ही एक आदिवासी स्त्री. पण तिच्या विचारांत एक प्रकारची स्पष्टता आणि सहजता होती. मी तिच्यासारखी नव्हते तरी तिने मला सहजतेने स्वीकारले. तिच्या आवडीनिवडी एकदम स्पष्ट आहेत पण त्याचबरोबर दुस-या प्रकारच्या लोकांचा आदर करण्याची भावनाही तिच्यात मला आढळली. स्वत:चच मत माझ्यावर लादण्याची कसलाही प्रयत्न तिने केला नाही आणि माझ्यासमोर तिला कसलाही न्यूनगंड वाटत नव्हता हे विशेष होते. ती बदलायला तयार आहे, स्वत: च्या सवयींना मुरड घालायला तयार आहे.

कुठ शिकली असेल मसरबाई हे सगळ?
त्या अर्ध्या तासात मसरबाईला मी काहीच शिकवलं नाही खर तर, मी मात्र तिच्याकडून बरच काही शिकले. माझ्या डोक्यात थोडा प्रकाश पडला तिच्याशी झालेल्या बोलण्यातून .

‘आपण जसे आहोत तसे स्वत: ला स्वीकारले पाहिजे’ याची जाण झाली मला परत एकदा!
**
पूर्वप्रसिद्धी: http://abdashabda.blogspot.in/2012/02/blog-post_26.html

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (7 votes)

प्रतिक्रिया

कमाल आहे! मानलं मसरबाईंना
शिक्षण आणि सुजाणपणा यांचा फारसा संबंध नाही हे पुन्हा अधोरेखीत झालं!

मस्त परिचय!

बाकी ऐसीअक्षरेवर स्वागत! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लिखाण आवडलं. अशाच इतर व्यक्तिरेखांबद्दल बोलता आलं तर आवडेल.

मावची भाषा कुठल्या भागात बोलली जाते ? कुठल्या उपप्रकारामधे ही मोडते ? त्यातली काही वाक्यं इथे म्हणून दाखवता येतील का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

ऐसीवर स्वागत. लेख आवडला आणि त्यावरून माझ्या लहानपणी घ्डलेला एक प्रसंग आठवला. आमच्या गावी 'अखिल भारतीय महिला संमेलन' झाले होते. वक्ते, कार्यकर्ते, स्थानिक पुढारी, वार्ताहर यांची नुसती रीघ लागली होती. त्यातच आमच्या गल्लीतल्या कोणाचे तरी लग्न निघाले होते म्हणून दळणाची वगैरे कामे चालली होती आणि गावात एवढे मोठे संमेलन वगैरे असल्याने सहाजिकच त्यावर बोलणं चाललं होतं. त्यातली एक कामवाली मावशी (जी जरा तोंडाळ म्हणूनच प्रसिद्ध होती) मला म्हणते कशी "ताई, या सगळ्या बायकांनी इथं येऊन, आमच्या प्रश्नांवर, ही मोठ्ठी भाषणं केली तरी आमच्या नशीबी लागलेली ही धुणी-भांडी आणि दळणं-कांडपं संपणार आहेत काय? फुकट भाषणबाजी नुसती!"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार ऋषिकेश, मुक्तसुनीत आणि रुची.

मुक्तसुनीत,
मावची भाषा माझ्या अनुभवानुसार नंदूरबार, शहादा, धुळे या भागात बोलली जाते - मुख्यत्वे सातपुडयात. या जिल्ह्यांना लागून असलेल्या गुजरातच्या भागातही ही भाषा बोलली जाते. मावची हे एका आदिवासी समूहाचे नाव आहे - ही भिल्लांची पोटजात आहे. मावची बोलतात ती मावची भाषा - या शब्दाचा नेमका अर्थ काय ते शोधावे लागेल मला जरा त्या काळातल्या माझ्या टिपणांमध्ये. मला काही ही भाषा नीट बोलता येत नाही आणि जी काही थोडीफार शिकले होते ती आता विसरले. काही सापडले, आठवले तर कळवेन.
हे पुस्तक कदाचित उपयोगी पडेलः कोठावदे, सुधीर, ‘मावची बोली : समाज आणि संस्कृती’, आशापुरी प्रकाशन, साक्री. २०००.

रुची, तुम्ही सांगितलेला अनुभव पदोपदी येतो. त्या कामवाल्या मावशींच्या विचारांत पण मसरबाईसारखी स्पष्टता आहे. आपल्यासारख्यांनी यावर विचार केला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऋषिकेश व मुसु यांच्याशी सहमत.
लिखाण खरच खूप आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिखाण आवडलं. एका छोट्याशा प्रसंगातून एक धारदार व्यक्तीमत्वाचं चित्रण झालेलं आहे. मसरबाईचा ताठ कणा या प्रसंगाला एक उभारी देऊन जातो.

माझ्या मते हा लेख थोडा अपुरा आहे. अजून खूप खुलवता येईल.
- मसरबाई कशी दिसते याचं जवळपास काहीच वर्णन नाही. पहिल्या प्रश्नोत्तरानंतर लेखिका आणि मसरबाईंनी एकमेकांना न्याहाळलं असलं पाहिजे. फोटो आला त्याचंही वर्णन करता येईल.
- मावची भाषेची थोडीशी डूब आली तर लेख अधिक जिवंत होईल. फार नाही, तिच्या तोंडून दोन तीन वाक्यं...“मला न सांगता तू माझा फोटू का घेतलास?” हे पहिलं वाक्यं लेखाच्या सुरूवातीला मावची भाषेत आलं तर उत्तम.
- शेवटचे परिच्छेद काहीसे तात्पर्यात्मक वाटले. मसरबाईच्या आधीच्या वर्णनातून त्यातलं बरंच वाचकापर्यंत पोचलं आहे. मात्र स्वतःचा आदर करायला शिकणं हे महत्त्वाचं आहे. पण ती एक ओळ येण्याऐवजी नंतरच्या लेखिकेच्या आयुष्यातला एखादा छोटासा प्रसंग आला असता तर मसरबाईने लेखिकेवर केलेला परिणाम दिसून आला असता.

एवढं सांगितलं याचा अर्थ असा नाही की मला लेख आवडल्यापेक्षा नावडला. आवडला म्हणूनच इतकं लिहिलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मसरबाई खूप आवडली, पण घासकडवींच्या इतर मुद्द्यांशी असहमत आहे.
मसरबाई कशी दिसते याचा माझ्या मते या व्यक्तिचित्राशी काही संबंध नाही. माझ्या मते मसरबाई हे एका व्यक्तीचे चित्रणच नाही. मसरबाई ही एक मनात कोणताही गोंधळ नसलेली, स्वतःबद्दल कोणताही गंड नसलेली, ताठ कण्याची रोखठोक वृत्ती आहे. ती दिसते कशी, तिची बोली कशी आहे याचा तसा फारसा काही संबंध नाही. मसरबाई कोणीही असू शकते तुम आजाद हो, और तुम, और तुम... घासकडवींनी सुचवलेल्या सुधारणा मसरबाईच्या व्यक्तिचित्राकडे एक 'क्राफ्ट' म्हणून बघतात. माझ्या मते ही 'आर्ट' इतकी रसरशीत आहे की तिला असल्या क्राफ्टमनशिपची गरज नाही. एखादा प्रसंग टाका, एखादा फोटो टाका, एकदोन टाळीची वाक्ये टाका असली नायजेला लॉसन पाककृती केली की मग त्याची 'रोशनी' होते. जनतेमध्ये लई टाळ्यापिटू, अश्रुपाती शिरवळकरी, गोडबोलट लोकप्रिय, पण पातळ, विसविशीत, जिवंत नसलेली.
मसरबाई तशी नसेल, तशी नसावी असे वाटले म्हणून एवढे सगळे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

राजेश घासकडवी,
तुम्ही सांगितलेल्या मुद्यांबद्दल आभारी आहे.
हा लेख मी आधी इंग्रजीत लिहिला होता आणि त्या ब्लॉगवर मसरबाईंचा फोटो टाकला होता. पण जालीय विश्वात मला न समजणा-या अनेक गोष्टी आहेत हे लक्षात आलं आणि नंतर मी मला भेटलेल्या स्त्रियांचे फोटो टाकण बंद केलं - त्यांचा गैरवापर कोणी करू नये म्हणून. माझी ही भीती अनाठायी असेलही - पण ती आहे.

आता या अनुभवाला काही वर्ष होऊन गेल्यामुळे मूळ मावची वाक्य आठवत नाही. ते काहीतरी ठोकून देण्यात अर्थ नव्हता, त्यामुळे ते लिहिले नाही.
बाकी सूचनांचा पुढील लेखनात उपयोग करण्याचा प्रयत्न करेन - पण किती व्यक्त करायचं आणि किती वाचकांवर सोडायच याची प्रत्येकाची/ प्रत्येकीची एक स्वतःची म्हणून शैली ठरलेली असते - ती कितपत बदलेल माझी ते माहिती नाही.

सन्जोप राव, तुम्ही एक वेगळा दृष्टिकोन मांडला आहेत इथं. तुम्ही म्हणता तस हे एक व्यक्तीचित्र आहे म्हणण्यापेक्षा अनपेक्षितपणे (जिथं अपेक्षा नव्हती तिथ या अर्थाने) आलेला एक वेगळा अनुभव आहे - तो मांडण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी आर्ट आणि क्राफ्ट या वादातलं मला काही कळत नाही म्हणून त्याविषयी मी न बोलणच योग्य होईल. तुमचेही आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संजोपरावांशी सहमत!

नैसर्गिक उर्मीत केलेले लेखन जास्त ताजेतवाने असते असे मला वाटले (जसे इथे मसरबाइबद्दल झाले आहे).
सतत लिहीते राहून स्वत:ची लेखनशैली शोधेणे हे जास्त सयुक्तिक असेल.

- (लहान तोंडी मोठा घास घेतलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मसरबाई आवडली. "हे काही मला तुझं पटलं नाही बघ ताई.” यामुळे तर फारच जास्त आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मसरबाई चे व्यक्तीचित्रण खूप आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाईंचं व्यक्तिचित्र आवडलं. राजेश घासकडवींनी म्हटल्याप्रमाणे आणाखी प्रभावी करता येईल.
या लेखनावरून तुमचा अशा अनेक मसरबाईंशी - पक्षी तत्सम व्यक्तिमत्त्वांशी - संबंध येत असावा, असा अंदाज आहे. अशा इतर व्यक्तिरेखा इथे चितारत्या आल्या, तर वाचायला नक्कीच आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चक्रपाणि

लेखनशैली आवडली .
बहुतांश ( आमच्यासारख्या) लोकांप्रमाणे मर्यादित वर्तुळात फिरलेल्या आपण वाटत नाही. आपल्या अनुभवांबद्दल वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मसरबाईचं व्यक्तिचित्र आणि तुमची लिखाणाची शैली, दोन्ही आवडले. मसरबाईची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहिली. तिचा आत्मविश्वास तर संसर्गजन्य वाटतोय Smile
असेच आणखी अनुभव आमच्यासोबत शेअर करा, वाचायला नक्कीच आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

अनुभवलेखन आवडले. तुमच्या ब्लॉगवरचे इतर लेखनही वाचले.
मावची भाषा धुळे, शहादा परिसरात मला फारशी दिसली नाही. ती आहे नवापूर परिसरात. साक्रीचा पश्चिम भाग, नवापूर, त्याखाली आहवा, डांग, थोडा नाशिकचा उत्तर-पश्चिम पट्टा अशा ठिकाणी दिसते. नंदुरबार तालुक्याच्या दक्षिणेला नवापूर तालुक्याशी संलग्न भागात ती दिसते. उत्तरेकडे सरकू तसं पावरी, भिलोली सुरू होतात.
व्यक्तिचित्र म्हणण्यासाठी आणखी काही गोष्टी हव्यात, पण सन्जोप रावांनी दिलेली सावधानतेची सूचना पाळूनच. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लेखन!

मसरबाईचा स्पष्टवक्तेपणा आवडला आणि प्रभावित करून गेला.

मला तो प्रश्न त्या क्षणी एकदम अवघड वाटला कारण तिच्या दारू पिण्याबद्दल मला काही म्हणायचं नव्हत,

हे ठीक आहे पण...

ते अयोग्य आहे असं म्हणून तिला शरमिंदा नव्हतं करायचं मला!

हे काही पटले नाही.

- (प्रभावित) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अदिती, सारिका, सोकाजीराव, चक्रपाणि, शहराजाद, स्मिता, श्रावण मोडक आभार.

श्रावण मोडक, माझी माहिती दुरुस्त केल्याबद्दल आभारी आहे. आता ब-याच काळात त्या भागात गेलेले नाही - आठवणींची नुसती सरमिसळ आहे डोक्यात!!

मी जे लिहिलय त्याला 'व्यक्तिचित्र' अस नाव इथल्या वाचकांनी दिलेलं दिसतय.. माझ्या परीने मी एक अनुभव तुम्हाला सांगत होते. पण सर्वांच्या सूचनांबद्दल मनःपूर्वक आभार.

सोकाजीराव, तुम्हाला काय पटले नाही ते कळले नाही. पण अर्थातच मी लिहिलेले सगळे तुम्हाला पटायलाच पाहिजे असे तरी कुठे आहे? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>सोकाजीराव, तुम्हाला काय पटले नाही ते कळले नाही.<<

अहो ते मदिराप्रेमी आहेत. त्यामुळे कुणाचं दारू पिणं अयोग्य वाटणं त्यांना पटणार नाही Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चिं.जं. धन्यु!

एका ओळीच्या ह्या प्रतिसादाबद्दल, कारण मला एक लंब्याचौड्या व्यनीची यातायात करावी लागली होती ते समजवायला. Wink

- (आभारी) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मसरबाईंप्रमानेच इतरही अनेक व्यक्तिमत्त्वं तुम्हाला भेटली असतील असे लेखावरून वाटते, त्यांबद्दल वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मसरबाईचे “तुम्ही लोक शाळेत जाऊन शिकता एवढ आणि तरी तुम्हाला काही आमची भाषा येत नाही. मी कधी शाळेत गेले नाही, पण मला बघ तुझी पण भाषा बोलता येते." हे वाक्य मला सर्वाधिक आवडले. Smile

राधिका

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

सोकाजीराव, खर तर एका वाक्यात - ते एकदम स्पष्ट (जस चिंतातूर जंतू यांनी सांगितलं तस!) असेल तर - वाचणा-याला पण समजत. आता तुम्ही लंब्याचौडया व्यनिची यातायात का केलीत ते तुम्हालाच माहिती Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण अर्थातच मी लिहिलेले सगळे तुम्हाला पटायलाच पाहिजे असे तरी कुठे आहे?

आत तुम्ही हे असे लिहीलेत म्हटल्यावर मग व्यनितून स्पष्टीकरण करणे आलेच, धाग्याची खव करण्यात काय पॉइंट Biggrin

- (स्पष्टवक्ता) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा. मसरबाई आवडल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख अतिशय आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. (खरं तर अजूनही पूर्ण वाचलेला नाही, पण इतके सगळे जण चांगला म्हणत आहेत त्याअर्थी आवडला असे सांगायला काही हरकत नाही. पण मुद्दा तो नाही) लेख आवडल्याचे कळवलेल्यांनी अजून तुमची पोतडी उघडा, तुमच्याकडे अजून अनुभव असतीलच वगैरे केलेली विनंती/त्या कृत्रिम वाटतात. लेखाच्या खालीच लेखकाने (लेखिकेने?) ब्लॉगची लिंक दिली आहे (ह्याला जाहिरात म्हणावे का? ऐसीअक्षरेवर जाहिराती नाहीत/नसाव्यात त्यामुळे संकेतस्थळा चालकांना तरी ह्यातुन काही फायदा होत नसावा*). तर वस्तुस्थिती अशी आहे की त्या लिंकवर अनेक लेख आहेत, म्हणजेच पोतडी आधीच उघडलेली आहे. त्यातील सगळे लेख पुन्हा एकेक करुन इथे वाचायची निदान मला इच्छा नाही. (अर्थात आणखी एका टिचकीचे कष्ट वाचावेत म्हणून इथेच सगळे वाचायला मिळावे असाही काहींचा आग्रह असू शकतो हे मान्य आहेच आणि त्यांच्या ह्या निवडीचा** आदर आहेच.)

*अंदाज आहे
**मराठीत प्रेफरन्स

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- पंडित गागाभट्ट.


"I don't owe the world an explanation."

पंगा,
आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.

'लेख आवडला' असे लिहून - आणि त्यानंतर तो खर तर तुम्ही अजून पूर्ण वाचलेला नाही हे स्पष्ट करून तुम्ही काय साधलेत हे कळत नाही. बरं, आपली ओळखही नाही; त्यामुळे तुम्ही एखादा जुना हिशोब चुकता करता आहात अशी स्वतःची समजूत काढायलाही काही वाव नाही. Smile

माझा लेख आवडला पाहिजे वाचकांना नेहमीच अशी माझी अपेक्षा असते पण तसे घडणे शक्य नाही हेही मला कळते. लेखक म्हणून माझ्या मर्यादा आहेत याची मला जाणीव आहे. लेख आवडला नाही असे कळवणारेही (हाच लेख असं नाही, इतरही लेख) वाचक होते, आहेत आणि असतीलही. त्यांच्या मतांचा मी पूर्ण आदर करते. मी लिहायला शिकते आहे त्यामुळे टीका, सूचना यातून शिकण्याचा माझा प्रयत्न असतो.

लेखाच्या खाली जी ब्लॉगची लिंक दिली आहे ती द्यावी की नाही असा मला प्रश्न होता. द्यावी तर तुम्हाला वाटले तसे ब्लॉगची जाहिरात केल्यासारखे वाटते हे खरेच.
पण ती लिंक नाही दिली तर जुनाच लेख नव्याने प्रसिद्ध केल्याचा आव आणल्यासारखे होते. संकेतस्थळावर कुठेही 'इथे प्रकाशित करण्याचे लेख अन्य कोठेही पूर्वप्रकाशित असू नयेत' अशा आशयाची सूचना, नियम, अट दिसली नाही. ती असल्यास आणि माझ्याकडून पाहिली गेली नसल्यास माझी चूक मला मान्य आहे.

इतर वाचकांच्या प्रतिसादावर तुमचे जे काही मत आहे, त्याबद्दल ते वाचक त्यांना जे काय म्हणायचे ते म्हणतीलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मसरबाईंचं रोखठोक व्यक्तिचित्र आवडलं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखन अतिशय आवडले.
सोनाली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका शब्दपेक्षा दोन बरे.

लेख आवडला.

कुठ शिकली असेल मसरबाई हे सगळ?

जीचा काही ठराविक अभ्यासक्रम नसतो त्या 'जीवन' नावाच्या शाळेत.... दुसर काय?
बरच काही शिकवते ती शाळा. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
- माझी खादाडी : खा रे खा

गणपाभाऊ, जीवनाच्या शाळेत आपण सगळेच काही शिकत नाही; म्हणून तर मसरबाई वेगळी ठरते. पण औपचारिक शिकण्यातून शहाणपण येण्याची खात्री नसते असं तुम्हाला म्हणायच असलं तर, आपण एकच गोष्ट म्हणतो आहोत Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जीवनाच्या शाळेत आपण सगळेच काही शिकत नाही; म्हणून तर मसरबाई वेगळी ठरते.

पुर्णपणे सहमत.

पण औपचारिक शिकण्यातून शहाणपण येण्याची खात्री नसते

याची उदाहरणं आपण अवती भवती पहातोच की रोज. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
- माझी खादाडी : खा रे खा

व्यक्तिचित्र आवडले. नेमके उतरले आहे. फारसा फापटपसारा नाही. मसरबाई नेमकी कळली. तथाकथित शिक्षितांनाही हजार गोष्टी शिकवून जातील असे तथाकथित अडाणी सुदैवाने बघायला मिळाले आहेतच. मसरबाई त्याच पठडीतली.

संजोपरावांनी नेमकं लिहिलं आहे. हे लेखन असंच जिवंत असलं पाहिजे. कृत्रिमता नकोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

मसरबाई आवडली. आपल्या आजू बाजूला अश्या कितीतरी व्यक्ती भेटतात, कि ज्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आपल्याला अचंबित करून टाकतो. मसर बाई सारख्या व्यक्तींना "फटकळ तोंडाची" किंवा "जिभेला हाड नाही" वगैरे सारखी विशेषणे लागतात. त्यांच्या फटकळ तोंडाच्या मागचा स्पष्टवक्तेपणा, धाडसीपणा काहीच व्यक्तीना गवसतो. आणि तो तुम्हाला चांगलाच उमजला आहे आणि तो तेवढ्याच स्पष्टपणे मांडता आला आहे असं मला वाटते. आता कथा वाढवायची आणि अजून थोडी रंजक करायची तर करता येईल, पण तो लेखकाचा निर्णय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह.. खूप छान.

लेख आवडला,

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार बिपिन कार्यकर्ते, रुपाली जगदाळे आणि अर्धवट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0