प्रवास - अनुभव, वर्णन, वाचन आणि दर्शन!
मी आत्तापर्यंत लंडन, माथेरान, महाबळेश्वर, अलिबाग, गणपतीपुळे, कोल्हापूर, अजिंठा, कार्ला, मुंबई एवढी ठिकाणे फक्त बघितली आहेत.
ही चर्चा प्रवास वर्णन आणि संबंधित पुस्तके, मासिके, चॅनेल्स यासंदर्भात आहे. यापूर्वी मी प्रवास वर्णने कधी वाचली नव्हती.पण नुकतीच मीना प्रभूंची दक्षिणरंग (द्क्षिण अमेरिकेवर आधारित) आणि मेक्सिको पर्व ही लायब्ररीतली पुस्तके हाती लागली आणि मला प्रवासवर्णन वाचनाची आवड निर्माण झाली. मीना प्रभूंच्या इतर देशांवरील आणि इतर अनेक लेखकांची प्रवास वर्णनाची पुस्तके मी शोधून विकत घेतली आणि जसा वेळ मिळाला तसा वाचायला लागलो.
उदा: दक्षिणायन - रणजीत मिरजे (दक्षिण अमेरिकेवर आधारित),
गूढ रम्य महाराष्ट्र - मिलिंद गुणाजी,
अफलातून ऑस्ट्रेलिया - जयश्री कुलकर्णी,
पूर्व अपूर्व - द्वारकानाथ संझगिरी
वगैरे.
तसेच नेशनल जिओग्राफिक ट्रेव्ह्लर इंडिया हे मासिक अधून मधून वाचले. मिसळपाव, मायबोली सारख्या वेबसाईट वर सुद्धा अनेक प्रवास वर्णने वाचायला मिळाली.
प्रवासवर्णनावरचे पुस्तक वाचन, मासिक वाचन आणि चॅनेल्स बघणे यात स्वत:चे वेगळे असे फायदे- तोटे आहेत, तो भाग वेगळा!
नंतर, मी प्रवास वर्णनाला-दर्शनाला वाहिलेल्या काही वाहिन्या (चॅनेल्स) शोधल्या. प्रवास आणि जगभरची प्रेक्षणिय स्थळे याला वाहिलेल्या तशा अनेक वाहिन्या दिसायला दिसतात आणि असायला आहेत. पण त्यातली एकही निखळ प्रवास वर्णन आणि दर्शन दाखवत नाही असे मला वाटते. त्यापेक्षा ८० टक्के खाद्य संस्कृती दाखवण्यात त्यांचा वेळ जातो. फोक्स ट्रेव्ह्लर ने पण नांव बदलून फोक्स लाईफ केले आहे. TLC, नेशनल जिओग्राफिक वगैरे पण काही खास प्रवास दर्शन घडवत नाहीत किंवा मला त्यांच्या सगळ्या कार्यक्रमांची रूपरेषा तरी माहित नसावी. कुणाला निखळ प्रवास वर्णन दाखवणारी कोणत्याही भाषेतली (इंग्रजी, मराठी, हिंदी) चॅनेल्स माहित असल्यास येथे शेअर करावीत!
या चर्चेचा उद्देश असा की ज्यांनी प्रवास वर्णने वाचली आहेत किंवा त्या विषयाला वाहिलेली मासिके वाचतात आणि चॅनेल्स बघतात त्यांनी येथे त्याबद्दल माहिती द्यावी, थोडक्यात समिक्षण लिहावे ज्यायोगे इतर त्याचा लाभ घेवू शकतील. आपण सगळे जग फिरू शकत नाही पण प्रवास वर्णनाद्वारे तेथे गेल्याचे काही टक्के समाधान मिळते.
प्रवास वर्णनावरची कोणती चॅनेल्स, मासिके, पुस्तके तुम्ही वाचतात/बघतात?
विषय जिव्हाळ्याचा आहे. फिरणे
विषय जिव्हाळ्याचा आहे.
फिरणे हे कसेही असले तरी आनंददायी असते. पर्यटन स्थळाला जाऊन प्रसिद्ध ठिकाणे टिक करण्याच्या "स्टँडर्ड" पद्धतीपासून माझीही पर्यटनाला सुरूवात झाली आहे ते आता आता बॅगपॅकिंगपर्यंत अनेक प्रकारे फिरलो आहे.
आता फिरणे म्हणजे ठिकाणे, प्रसिद्ध स्थळे लायनीत बसवून (टाइमटेबलप्रमाणे) बघण्यापेक्षा "प्रवास" आणि त्यात दिसणारा परिसर, माणसे, समाज, तेथील प्राणी, पक्षी, खाणे, माती आदी निरीक्षणे करत बघायला आवडते. शिवाय स्कुबा डायविंग हा ही एक आवडता प्रकार झाला आहे.
तेव्हा मी सध्या यासाठी काउचसर्फिंग, विविध हिच हायकर्सचे ब्लॉग्ज्/साईट्स, काही स्कुबा डायविंग साईट्स/ब्लॉग्ज्स इत्यादी अनेकदा वाचतो. त्याव्यतिरिक्त काही इंग्रजी वृत्तपत्रे, मासिके यांत येणारे लेख, हल्लीच ब्रिटीश लायब्ररीत गावलेले बायसिकल टाइम्स हे मासिक वगैरेही वाचु लागलो आहे.
वेगवेगळ्या ट्रॅव्हल
वेगवेगळ्या ट्रॅव्हल कंपन्यांच्या tour itineraries वाचायच्या. मग त्यातल्या ठिकाणांचा गूगल शोध घ्यायचा. गूगल मॅपवर रुट्स बघायचे. भरपूर रोचक माहिती मिळते. विकीपीडिया देश, शहर वगैरे याबाबत अत्यंत चांगली माहिती देत असतो.
आफ्रिका किंवा द. अमेरिकेतला एखादा random देश घेऊन उगीचच (म्हणजे जायचा बेत नसतानाही) त्याची विकीपीडिया पेजेस वाचत बसणे हाही एक उत्तम माहिती देणारा सोर्स आहे.
मी या मार्गाने चाड, नायजर असे देश पाहात पाहात चाळीसपन्नास देश सहासात महिन्यात वाचून काढले. इतिहास, महत्वाची शहरं, हवामान, इकॉनॉमी, भाषा, राजकारण, लोकसंख्या, कल्चर (इन्क्लुडिंग फूड) वगैरे बरेच सेक्शन्स असतात. रोचक वाटतं.
मस्त. मला फिरायला जेवढं आवडतं
मस्त. मला फिरायला जेवढं आवडतं तेवढंच भटकंती बद्दल वाचायला/पहायला सुद्धा जाम आवडतं. त्यातल्या त्यात कुणा जवळच्या व्यक्तीचे भटकंतीचे स्वानुभव असतील तर अजूनच मस्त वाटते.
कुणाला निखळ प्रवास वर्णन दाखवणारी कोणत्याही भाषेतली (इंग्रजी, मराठी, हिंदी) चॅनेल्स माहित असल्यास येथे शेअर करावीत!
एक संपूर्ण असं चॅनल माझ्या माहितीत तरी नाही जे फक्त ट्रॅव्हल वर प्रोग्रॅम दाखवतात. पण डिस्कवरी च्या एच.डी. चॅनलवर 'वॉटरफ्रंट सिटी(ज)' आणि 'वर्ल्ड फ्रॉम अबोव्ह' हे दोन कार्यक्रम विशेष छान आहेत आणि त्या त्या शहराबद्दल माहिती देतात - ती ट्रॅव्हल ह्या विभागात मोडता यावी इतपत माहिती असते. 'वर्ल्ड फ्रॉम अबोव्ह' मधे शक्यतो शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल जास्त माहिती असते.
त्यापेक्षा ८० टक्के खाद्य संस्कृती दाखवण्यात त्यांचा वेळ जातो
"वेळ जातो" हे "वेळ वाया जातो" असं 'साऊंड' होतय ... असं नका हो म्हणू. खाद्य संस्कृती आणि त्या अनुषंगाने असलेले प्रवास वर्णनं आमच्या विशेष जिव्हाळ्याचे. खाण्या-पिण्या वरील प्रोग्रॅम मी आयुष्यभर विनातक्रार/न कंटाळता पाहू शकतो :)
बर्याचदा खाद्य-पदार्थाच्या (कुकरी शोज) कार्यक्रमात ही सुंदर प्रवासवर्णनं असतात. टोनिया बक्स्टन (अप्सरा) ह्या शेफ च्या 'माय ग्रिक किचन ह्या कार्यक्रमात ती ग्रीस मधल्या छोट्या छोट्या खेड्यांमधे जाऊन तिथले पारंपारिक खाद्यपदार्थ शिकते. ह्या दरम्यान केवळ खाद्य-पदार्थच/संस्कृतीच नव्हे तर तिथल्या गावांची सफरही होते तो अनुभव पहायला फार रोचक असतो.
हा सगळाच प्रतिसाद अवांतरही
हा सगळाच प्रतिसाद अवांतरही ठरू शकेल तसे असेल तर त्याचे काय करायचे ते संपादक करतीलच, पण चर्चाप्रस्तावावरून काही मजेशीर ट्रेन ऑफ थॉट सुरु झाली म्हणून उगाच टंकत बसलोय.
अगदी सुरुवातीला आठदहा वर्षापूर्वी नोकरीच्या निमित्ताने कुठेही जायचे असेल तर त्या ठिकाणाची सगळी माहिती विकीपिडीया आणि विकीट्रावेलवरून जमा करणे, फ्लाईट तिकीट स्वतःच्या डोळ्यांनी कंफर्म करणे, हॉटेलला स्वतः फोन करून बुकिंग आहे याची खात्री करणे, त्यानंतर प्रवासाच्या दिवशी पहाटेच दचकून जाग येणे इत्यादी सोपस्कार पार पडून प्रवास सुरु आणि कसाबसा पूर्ण व्हायचा... प्रत्येक नवीन ठिकाणी जाताना तिथे बघायला, खायला, काय असेल, काय एन्जॉय करता येईल याची चेकलिस्ट असायची कितीही कष्ट करून तिथे जाऊन एन्जॉय करायची तयारी असायची.
आता आठवलं की हसायला येतं पण परदेशात जाताना फ्लाईट तिकीट, हॉटेलचा पत्ता आणि भारतीय एम्बसीचा पत्ता बायकोकडे आणि एका मित्राकडे दिलेला असायचा.
त्यानंतर जसाजसा प्रवास वाढू लागला तसं हे सगळ कमी कमी होत गेलं आणि आताशा पूर्ण बंदही झालं... बेफिकिरी येत गेली,
आताशा कसलीच माहिती जमावाविशी वाटत नाही, फक्त तिकीट आणि व्हिसा स्वतःच्या डोळ्यांनी कंफर्म करायचा शिरस्ता अजून ठेवला आहे.
आता कुठल्याही देशात गेलं तरी कुणी विचारत नाही, कधी जाणार कुठे जाणार याबद्दल चर्चा होत नाही घरात, "अमुक तारखेला घरी असणार आहेस का त्यादिवशी अमुकतमुक काम आहे" एवढासा प्रश्न इतकाच काय तो प्रवासाचा संबंध रोजच्या जगण्यात येतो...
ठरलेल्या ठिकाणी जाणे, आणि परत येणे एवढंच उरलं आहे. काही वेगळं वाटत नाही, काहीही बघायची, बोलायची असोशी उरली नाही.... इतका कसा निबर होत गेलो च्यायला...
इतका कसा निबर होत गेलो..(अवांतर)
ठरलेल्या ठिकाणी जाणे, आणि परत येणे एवढंच उरलं आहे. काही वेगळं वाटत नाही, काहीही बघायची, बोलायची असोशी उरली नाही.... इतका कसा निबर होत गेलो च्यायला...
..............प्रतिसाद वाचून सतीश काळसेकरांच्या 'आपलं आपल्याला असं तर व्हायला नको होतं' ही आणि 'अधुनमधून मी' ह्या कविता आठवल्या.
तुमच्या प्रतिसादातल्या शेवटच्या ओळीत व्यक्त झालेल्या 'निगरगट्ट/निबर होत जाण्या'च्या पलीकडे जात अधिक अस्वस्थ करणारा विचार काळसेकर 'अधुनमधून मी' कवितेत मांडतात -
...
...
पायपीट करत उन्हातून रेल्वे स्टेशन गाठतो
पायांनी चालण्याची सवय विसरू नये म्हणून
मधूनच गर्दीत बॅग उचलून माथ्यावर घेतो
माथ्याला ओझ्याचे भय वाटू नये म्हणून
बदलत राहतो बारा गावचं पाणी थांब्याथांब्यावर
यकृताने हतबल होऊ नये धीर सोडून
गटाराचं पाणी मिसळल्यावर प्यायच्या पाण्यात
कुठल्याही अन्नावर तुटून पडतो
दुष्काळी प्रदेशातून परतल्यासारखा
बालपणात कमावलेलं जठर राहावं मजबूत म्हणून
मी हे करतो असले सर्व व्यवहार
कारण याहून दुसरे पर्याय
आता आपल्याला उपलब्ध नाहीत
आणि याहून दुसरे पर्याय
आता आपल्याला शोधायचे नाहीत
म्हणून.
सर्वच प्रतिसाद {न हलवलेले}
सर्वच प्रतिसाद {न हलवलेले} आवडले अगदी घडयाळाचा गजर लावण्याच्या तयारीपासून ते न जाण्याच्या गावाची माहिती काढणे पर्यँत सर्वच मनोरंजक आहे. लिहायचे ठरले तर यांचा एकेक वेगळा धागा होईल. अथेन्सचं स्पार्टन सटीप पाककौशल्य आणखीनच पंडोराज बॉक्स उघडेल.
NHKWORLD (डिशटिवी आणि डिटिएच)या चानेलवर रोज एक वेगळ्या प्रकारचा ट्रावल कार्यक्रम असतो ४५ मिनिटांचा.
रेल्वे येण्याअगोदर काशीला पायी जाणाऱ्यास वेशीपर्यँत "पोहोचवून "येत असत कारण तो परत येण्याचा आणि उद्यापन करताना वर्णन ऐकण्याचा भरवसा नसायचा.
डेर्व्ला मर्फी
डेर्व्ला मर्फी यांची अनेक प्रवासवर्णने मला वाचनीय वाटली. आयर्लंड ते भारत हा मध्यपूर्वेतून अफगाणिस्तानमार्गे सायकलवरुन केलेला प्रवास, दक्षिण भारतातला पायी प्रवास किंवा चक्क खेचराच्या मदतीने केलेली आफ्रिकेतली रपेट असे अनेक मनोरंजक प्रवास आहेत. भारत, नेपाळ, तिबेट, झिंबाब्वे, केनिया, इथिओपिया वगैरे ठिकाणचे त्यांचे प्रवास अवश्य वाचा.
टुरिस्ट गाइड
भरपूर वाचन असणारे माझे काही मित्र मीना प्रभूंच्या लिखाणाला "टुरिस्ट गाइडछाप" लिखाण म्हंजे प्रवासवर्णन नव्हे; असा शेरा देतात.
ते तसं का म्हणत असावेत ; ह्याची कल्पना नाही.
मला वाचायची उत्सुकता असलेल्या गोष्टी.
इब्न बतूता ह्याने हजारभर वर्षापूर्वी बरेचसे जग पालथे घातले. त्याचं थेट लिखाण वाचायची इच्छा आहे.
तीच गत मार्को पोलोची. इटालीचा प्रवासी विद्वान चीनपर्यंत प्रवासाला जातो; बर्राच काळ मुक्काम ठोकतो;
चीन-युरोप सांस्कृतिक देवाणघेवाणीतला महत्वाची भूमिका निभावतो; हे सगळं खूपच भारी वाटतं. वाचायचय.
अल् बेरुनी गझनीच्या मेहमुदाचा समकालीन. त्यानेही विविध देश, समाज समूह ह्यांच्याबद्दलची निरीक्षणं लिहिलीत म्हणे
विविध ठिकाणी जाउन आल्यावर.जमल्यास तेही वाचायचय ऑथेंटिक प्रतींमधून.
विविध कारणानं चर्चेत असलेली गोडसे भटजींची डायरी पुन्हा एकदा वाचायची आहे.
(१८५७ च्या काळात भटजी महाराश्ट्रातून उत्तर भारतात गेले.
नेमके त्याच वेळी बंड/राष्ट्रिय उठाव ऐन भरात होते.)
+१
विविध कारणानं चर्चेत असलेली गोडसे भटजींची डायरी पुन्हा एकदा वाचायची आहे.
(१८५७ च्या काळात भटजी महाराश्ट्रातून उत्तर भारतात गेले.
नेमके त्याच वेळी बंड/राष्ट्रिय उठाव ऐन भरात होते.)
जालावर उपलब्ध आहे. चकटफू. मी डाउनलोडवले आहे.
१८५७ च्या उठावाकडे एखाद्या त्रयस्थाने, तटस्थपणे लिहावे, तसे लिहिले आहे.
इब्न बतूता ह्याने हजारभर वर्षापूर्वी बरेचसे जग पालथे घातले. त्याचं थेट लिखाण वाचायची इच्छा आहे.
मलाही.
तसा त्याचा गोषवारा, जयंत कुलकर्णी यांनी मिपावर दिला होता. लिंका शोधायला हव्यात.
तीच गत मार्को पोलोची. इटालीचा प्रवासी विद्वान चीनपर्यंत प्रवासाला जातो; बर्राच काळ मुक्काम ठोकतो;
चीन-युरोप सांस्कृतिक देवाणघेवाणीतला महत्वाची भूमिका निभावतो; हे सगळं खूपच भारी वाटतं. वाचायचय.
ऐकीव माहिती नुसारे, इटालियन पास्त्याचे मूळ चिनी नूड्ल्समध्ये आहे!
यप्स
ऐकीव माहिती नुसारे, इटालियन पास्त्याचे मूळ चिनी नूड्ल्समध्ये आहे!
आणि आइसक्रीम नामक पदार्थही युरोपनं चीनकडून शिकला म्हणे, साताठशे वर्षापूर्वी!
चीनी लोक त्याला मिल्कआइस असं काहीतरी म्हणत स्थानिक भाषेत. त्याचं ह्यांनी आइसक्रीम केलं.
शिवाय छपाईपासून ते चुंबकाच्या चमत्कृतीपूर्ण वापरापर्यंत इतरही बर्याच गोष्टी आहेत.
कोणी वर्णन ललितपद्धतीने
कोणी वर्णन ललितपद्धतीने लिहितात -अहो फाफटपसारा नको मूर्ती किती कमनीय आहेत रस्ते किती छान आहेत ते बघणारच आहोत .कुठं काय मिळतं ते लिहा.
मोजकंच कसे कुठे गेलो लिहिलं की-अहो ते टाइमटेबल छाप होतंय.
प्रकाशकाकडे गेलात की -फारच गुळमुळीत आहे काही सनसनाटी वाक्ये टाका आणि हॉटेलची स्तुती वगैरे
इतिहास खरडला की-खादाडीचं आणि शॉपिंगचं काय ?
हा माझा खास आवडीचा विषय होता
हा माझा खास आवडीचा विषय होता आणि अजूनही आहे. आता काळानुरूप प्रवासवर्णनात काय अंतर्भूत करायचे ते माध्यमाप्रमाणे बदलले आहे म्हणूनच आपल्यालाही बदलावे लागते. चानेलप्रेक्षकांची आवड बदलली. पुस्तकाचे वाचकांना हॉटेल्स आणि तिथे काय चांगले खाण्यास मिळते ते हवे आहे.
माझे आवडते पुस्तक 'लोनली प्लैनिट 'ची जुनी आणि नवी पुस्तके आणि त्या देशांची/ राज्यांची प्रसिद्धी पत्रके.