सैन्य, राष्ट्रवाद आणि भ्रष्टाचारविरोध - मिलिंद मुरुगकर

सध्या सैन्यातला भ्रष्टाचार हा ऐरणीवरचा विषय आहे. त्याला संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुख यांच्यातल्या वादाची फोडणी मिळाली आहे. त्याशिवाय अण्णा हजारेंचं भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन चालू होऊन वर्ष झाल्याची बातमी काल वाहिन्यांवर येत होती. आजच्या महाराष्ट्र टाईम्समधला मिलिंद मुरुगकर यांचा एक लेख भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन आणि सैन्यातला भ्रष्टाचार यांविषयी काही रोचक मांडणी करतो. याविषयी 'ऐसी अक्षरे'करांचं मत जाणून घ्यायला आवडेल.

वरवर पाहता सैन्यातल्या भ्रष्टाचाराच्या या बातम्यांमुळे भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला बळ मिळेल असं वाटणं साहजिक आहे. पण मुरुगकर यांच्या मते राजकारण्यांपेक्षा सेनाधिकार्‍यांच्या भ्रष्टाचाराच्या खबरी या मध्यमवर्गीयांच्या काहीशा बाळबोध राष्ट्रवादी प्रेरणेतून बळ घेणार्‍या या आंदोलनाला मारक ठरू शकतात. कारण या आंदोलनाला मिळणार्‍या जनाधाराचं मूळ राजकारण्यांविषयी चीड असण्यातून आलेलं आहे. या चिडीचा संबंध देशप्रेमाशी लागतो आणि देशाचं रक्षण करणार्‍या सैन्यदलाविषयी प्रेम ही या देशप्रेमाचीच एक बाजू आहे (काहीशा उजवीकडे झुकणार्‍या मध्यमवर्गाविषयी हे विधान असावं). याउलट प्रगल्भ लोकशाहीमध्ये भ्रष्टाचाराचा संबंध राष्ट्राभिमानाशी नसतो, तर तो 'आपल्याला ज्या कामाचा मोबदला, पगार मिळतो ते काम आपण चोखपणे केले पाहिजे' या वृत्तीशी असतो असं मुरुगकर म्हणतात. त्यांच्या मते अण्णा हजारे किंवा रामदेवबाबांच्या मांडणीतला 'शत्रुकेंद्री राष्ट्रवाद आणि परंपरावाद ह्या गोष्टी लोकशाहीतील नागरिक घडवण्याच्या सांस्कृतिक परिवर्तनाच्या लढाईतील मोठे अडथळे आहेत'.

मूळ लेखः सैन्य, राष्ट्रवाद आणि भ्रष्टाचारविरोध - मिलिंद मुरुगकर (स्रोत - म.टा.)

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

मुरूगकरांच्या सैद्धांतीक अंगानं जाणाऱ्या मांडणीशी बहुतांशी सहमत.
आतिवास यांच्या धाग्यावर मी लिहिलं होतं, "एका स्थानिक व्याप्तीच्या कोअर कमिटी बैठकीत (अण्णांच्या टीममधले कोअरचे चार सदस्य त्यावेळी उपस्थित होते) भ्रष्टाचारविरोधी लढा आणि राष्ट्रवाद यांची सांगड घालण्याचा प्रयत्न झाला. मी त्यावर प्रश्न उपस्थित केला. थोडे सुलभीकरण करूनच मी हा प्रश्न टाकला. "मी भ्रष्टाचाराचा विरोधक आहे. पण मी सीमेवर जाऊन देशासाठी प्राणत्याग करण्यास तयार नाही. त्याचवेळी तिथं लढणाऱ्या जवानासाठी सामग्रीची वाहतूक करणारा आणि त्यासाठी प्राणत्याग करण्यास तयार असणारा एक लष्करी अधिकारी आहे, जो एरवी आर्मी सर्विस कोअरमध्ये भ्रष्टाचार करतो. या दोघांमध्ये कोणाला राष्ट्रवादी ठरवायचे आणि कोणाला भ्रष्टाचारी? मग सीमेवर जाऊन लढणारा भ्रष्ट असला तरी, तो राष्ट्रवादी असल्याने त्याचा भ्रष्टाचार माफ होणार का?" त्याचे उत्तर मिळाले नाही."
सध्याच्या संरक्षण मंत्र्यांविषयी ते स्वच्छ प्रतिमेचे आहेत अशा आशयाचे मत मुरुगकरांनी मांडले आहे. त्याच्याशी सहमत होऊनही एक प्रश्न राहतो (हा प्रश्न त्या लेखाचा विषय नाही, पण इथं चर्चा असल्यानं मांडतो आहे). म्हैस चारित्र्यसंपन्न असून उपयोग काय, दूध देणं हेही तिचं काम आहे*! अँटनी कोणतीही कारवाई करण्यास स्वच्छ प्रतिमेपोटी कचरत असतील तर त्याचा उपयोग नाही. ते काय किंवा मनमोहन काय, दोघंही लष्करातील या भ्रष्टाचारासंबंधात तसेच वागताना दिसताहेत. या दोघांपेक्षा या एका संदर्भातदेखील नरसिंहराव बरे होते. कृती न करणे हीही एक कृती आहे, असं ते म्हणाले तरी एकदा. हे दोघं तत्वज्ञानही करत नाहीत, व्यवहारातही रहात नाहीत. व्यवस्थेतील घटकांचा मात्र मध्येच बट्ट्याबोळ होतो.
*श्रेयअव्हेर - एकदोन बैठकांत व्यंकाप्पा पत्की यांच्याकडून ऐकलेला हा 'अलंकार'!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लष्कर म्हणल्यावर त्याची सांगड देशप्रेमाशी घातली असल्याने तिथे भ्रष्टाचार होतो हे पचवण्यास बर्‍याच लोकांना कठीण जाते. तिथे होणारा भ्रष्टाचार हा सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन व्यवहाराशी संबंधीत नसतो. समजा हायपोथेटीकली भ्रष्टाचार संपला म्हणजे देशाची प्रगती झाली हे मानणे देखील धारिष्ट्याचे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

इतर देशांबद्दल ठाऊक नाही, पण भारतातील मध्यमवर्गीय हे परंपरागत हितसंबंध असलेले आणि ते जपले जावेत अशी इच्छा बाळगणारे लोक आहेत. (भारतात वर्गावर्गांत सांपत्तिक अभिसरण फारसे होत नसते). अश्यांच्या साठी लोकशाही आणि त्यातून इतरांमध्ये उद्भवणारी समानतेची आकांक्षा त्या रेट्याखाली व्यवस्थेत घडणारे बदल हे नेहमीच थ्रेटनिंग असतात. त्यामुळे हे लोक मनातून नेहमीच लोकशाहीविरोधी असतात. परंतु उघडपणे लोकशाही विरोधी भूमिका घेता येत नाही (पुरोगामी असण्याचे सोंग नीट वठवले जात असते).

त्यामुळे या ना त्या मार्गाने लोकशाहीला डिसक्रेडिट करण्याचे कार्य चालू असते. त्यातलाच एक भाग म्हणजे राजकीय नेतृत्वाविषयी तिरस्कार आणि लोकशाही प्रक्रिया मुळीच नसलेल्या सैन्यदले, न्यायव्यवस्था यांच्याबद्दल आत्यंतिक आदर/प्रेम.

राजकीय नेतृत्वाच्याबाबतच्या मतात सुद्धा ऐतिहासिक परिवर्तन येत गेले आहे. जुन्या राजकीय डिसकोर्समध्ये (सन २००० पर्यंत) दोन गट असत आणि त्यातला एक गट वाईट/नकोसा आणि दुसरा हवासा होता. याचे कारण या दुसर्‍या गटाकडे सत्ता आली की आपले हितसंबंध जपणारी व्यवस्था अस्तित्वात येईल अशी आशा मध्यमवर्गीय बाळगून होते. परंतु पुढे या दुसर्‍या गटाकडे सत्ता आली तरी आपल्याला हवी ती व्यवस्था लोकशाहीचा डोलारा असेपर्यंत अस्तित्वात येऊ शकत नाही हे लवकरच कळून चुकले. त्यानंतर हे दोन गटांमधले द्वैत संपून सर्व राजकीय व्यवस्था हीच तिरस्काराची धनी बनली.

मुरुगकरांच्या लेखाची मांडणी ठीकच आहे. परंतु त्यांचा बाळबोधपणाचा मुद्दा तितकासा पटला नाही. ज्यांचे प्रेम मध्यमवर्गाला वाटते त्यांच्यात भ्रष्टाचार नाही अशी मध्यमवर्गाची बाळबोध समजूत असण्याची शक्यता खूपच कमी आहे. तिथे (लष्कर आणि न्याययंत्रणा) भ्रष्टाचार आहे हे त्यांना ठाऊकच असणार कारण या दोन्ही ठिकाणी यांच्यातले लोक नोकर्‍या करतच असतात. तेव्हा राजकारण्यांचा भ्रष्टाचार आणि त्याचा विरोध हे केवळ एक पोश्चरिंग आहे. लोकशाही नको म्हणण्यासाठी एक निमित्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मुरुगकरांचा लेख 'महाराष्ट्र टाईम्स'मधल्या डॉ. विवेक कोरडे यांच्या लेखापेक्षा (http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12513441.cms) संतुलित भाषेत लिहिलेला दिसतो आहे. सैन्यातील भ्रष्टाचाराच्या बातम्या काही नव्या नाहीत पण बहुसंख्य सैनिक आणि सेनाधिकारी देशप्रेमी आहेत असे मानण्याकडे लोकांचा साधारणपणे कल दिसतो. या दृष्टीने श्रावण मोडक यांनी दिलेले स्थानिक कोअर कमिटीच्या बैठकीचे उदाहरण बोलके आहे.

फक्त एकच राजकीय पक्ष भ्रष्टाचारी नसून सगळ्याच राजकीय पक्षांत (आणि पर्यायाने सध्याच्या राजकीय व्यवस्थेत) प्रश्न आहेत इथवरचा प्रवास 'भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने' केला आहे असे दिसते. समाजातल्या अनेक नागरिकांनाही नियम आणि कायदे पालनापेक्षा 'शॉर्ट कट' शोधण्यात रस असतो - जा एकमार्गी रस्त्याने, प्रवेश बंद पाटीला दाद न देता, पकडलेच पोलिसाने तर पाच-पन्नास रुपये देऊन सुटका करून घेऊ - असा विचार करणारे पुष्कळ निघतात. पण त्यांना अजून आंदोलन प्रश्न विचारत नाही.

एका वेळी किती आघाडयांवर लढायची आंदोलनाची तयारी आहे याचा अंदाज आंदोलनाला घ्यावा लागेल आणि प्राधान्यक्रम ठरवावा लागेल. पण असा प्राधान्यक्रम ठरवणे हे तत्त्वतः पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे असते.

त्यामुळे मुरुगकरांनी मांडलेले प्रश्न काल्पनिक नाहीत - फक्त या सर्वाचे पडसाद जनमानसात कसे उमटतात आणि त्यातली नेमकी कोणती दिशा आंदोलन घेते याकडे मीही उत्सुकतेने बघत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. "शत्रूकेंद्री राष्ट्रवाद" या शब्दांचा प्रस्तुत संदर्भातला नेमका अर्थ काय ? पाकिस्तानकेंद्रित राष्ट्रवाद की ब्रिटीश-वसाहतवाद-केंद्रित राष्ट्रवाद ? जो काही असेल , त्याचा प्रस्तुत विवेचनाशी नेमका संदर्भ कसा जोडायचा ? हजारे आणि मंडळींचे आंदोलन "शत्रूकेंद्रित राष्ट्रवाद" प्रेरित आहे हे कशावरून सिद्ध झाले आहे ?

२. हजारेप्रणित आंदोलन राजकारण्यांविरुद्ध आणि केवळ राजकारण्यांविरुद्धच आहे; अन्य शासनसंस्थेमधल्या भ्रष्टाचाराशी त्याचा संबंध नाही हे कशावरून ठरले ? अण्णाहजारे पुरस्कृत जनलोकपाल बिलामधे अन्य शासनसंस्था - ज्यामधे सैन्यबळही आलंच - समाविष्ट नव्हते - किंवा त्या संस्थांना अगदी ठसठशीतपणे वगळ्ण्यात आलेले होते काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

हजारेप्रणित आंदोलन राजकारण्यांविरुद्ध नाही; ते काँग्रेसविरुद्ध आहे. त्यांना असलेला (फेसबुकी + रामलीला) पाठिंबा मात्र राजकारण्यांविरुद्ध आहे. (शासनसंस्थेतला सर्व पातळ्यांवरील भ्रष्टाचार हा राजकारण्यांमुळेच आहे अशी मांडणी पाठिंबा देणार्‍यांची आहे.)

टीम अण्णा प्रणित भ्रष्टाचाराची संकल्पना ही फक्त शासकीय/राजकीय भ्रष्टाचाराचीच आहे. म्हणून त्यांच्या लोकपाल संकल्पनेत एनजीओ आणि कॉर्पोरेट्स कव्हर्ड नव्हते. आणि किरण बेदींचे कृत्य न-भ्रष्टाचार ठरवणे शक्य होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

>>आणि किरण बेदींचे कृत्य न-भ्रष्टाचार ठरवणे शक्य होते. <<

या गोष्टीवर जरा अधिक प्रकाश टाकाल काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मला वाटले की ही गोष्ट* पुरेशी चर्चिली गेली आहे.

*१. इकॉनॉमी क्लासने प्रवास करून बिझिनेसक्लासचे पैसे क्लेम करणे.
२. आपल्या मुलीला दिल्लीच्या महाविद्यालयात मणिपूर कोट्यातून प्रवेश मिळवून देणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

खरी गोष्ट अशी आहे की सरकारी जनलोकपाल विधेयकानुसार एन्जीओंवर, त्यांच्या प्रचंड भ्रष्टाचारावर मोठा अंकुश बसणार आहे. यामुळेच केजरीवाल, बेदी आदींचा पोटशूळ उठला आहे व त्यांनी अण्णांना पुढे करून हे आंदोलन चालविले आहे. इतकी वर्षे अण्णांचे हे साथीदार कधी अण्णांसोबत दिसले होते का?

शासकीय भ्रष्टाचार यकश्चित वाटावा इतका मोठा भ्रष्टाचार खासगी कार्पोरेट व औद्योगिक क्षेत्रात होतो आणि या सर्व प्रकारच्या भ्रष्टाचारांत मोलाची भुमिका बजावतात ते एन्जीओज्. एनजीओंच्या अस्तित्त्वाशिवाय या लोकांना भ्रष्टाचार करणे अशक्य आहे.

एनजीओ + भ्रष्टाचार हे घनिष्ट नाते समजून घ्यायचे असेल तर कविता महाजन यांचे 'ब्र' हे पुस्तक वाचुन काढा.
एनजीओज्च्या माध्यमातून लहान मुलांचे लैंगिक शोषण आदी दुष्कृत्येही घडत असतात हे समजून घ्यायचे असेल तर मधूर भांडारकर यांचा पेज थ्री चित्रपट पाहा.
खासगी औद्योगिक व कार्पोरेट भ्रष्टाचाराची अनेक उदाहरणे आढळतील तरी जास्त बारकाईने हे समजून घ्यायचे असेल तर मधूर भांडारकर यांचा कार्पोरेट चित्रपट पाहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

शासकीय भ्रष्टाचार यकश्चित वाटावा इतका मोठा भ्रष्टाचार खासगी कार्पोरेट व औद्योगिक क्षेत्रात होतो

आणि म्हणूनच अण्णांच्या आंदोलनाला कार्पोरेटमधील अनेकांचा उघड-उघड (आणि कदाचित अनेकांचा छुपा) पाठिंबा होता.या कंपन्यांनी सगळे नियम-कायदेकानू धाब्यावर बसवून सार्वजनिक मालमत्ता बेसुमार ओरबाडली आहे आणि स्वतःचे खिसे भरले आहेत.

अण्णांच्या आंदोलनातून एक गोष्ट नक्कीच साध्य झाली आणि ती म्हणजे सामान्य लोकांचे सगळे लक्ष सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराकडे वळले म्हणजे भ्रष्ट सरकारी अधिकार्यांना पैसे खायला घालणारे कंपनीवाले नामानिराळे.

अशा हावरटांची हाव केवळ सरकारी यंत्रणाच (जी काही चांगली यंत्रणा उरली आहे तीच-- आठवा मध्य प्रदेशात माफियांनी क्रूरपणे हत्या घडवून आणलेले आय.पी.एस अधिकारी नरेंद्र कुमार) त्या कायद्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करून थांबवू शकेल.पण अण्णांच्या आंदोलनामुळे पूर्ण सरकारी यंत्रणेलाच आरोपीच्या पिंजर्यात उभे केले.सरकारी यंत्रणेची उरलीसुरली परिणामकारकता पण संपुष्टात येईल असा सरकारी यंत्रणेविषयीचा दुस्वास याच आंदोलनाची फळे! आपसूकच कंपन्यांना त्यांच्या भ्रष्ट कारभारावर अंकूश ठेवायची थोडी तरी शक्यता असलेली सरकारी यंत्रणाच गलितगात्र झाली तर ते कंपन्यांना हवेच आहे ना? तेव्हा अण्णांना पुढे करून (आणि आपण किती मोठी देशसेवा करतो असा आविर्भाव आणत) हेच कंपनीवाले लांबून मजा बघणार!!

आणि अण्णांच्या आंदोलनाविरूध्द असलेले असे काही आ़क्षेप मांडले तरी "भ्रष्टाचाराचे समर्थक" असे लेबल लावायला अनेक मंडळी मागेपुढे बघत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>. "शत्रूकेंद्री राष्ट्रवाद" या शब्दांचा प्रस्तुत संदर्भातला नेमका अर्थ काय ? पाकिस्तानकेंद्रित राष्ट्रवाद की ब्रिटीश-वसाहतवाद-केंद्रित राष्ट्रवाद ? जो काही असेल , त्याचा प्रस्तुत विवेचनाशी नेमका संदर्भ कसा जोडायचा ? हजारे आणि मंडळींचे आंदोलन "शत्रूकेंद्रित राष्ट्रवाद" प्रेरित आहे हे कशावरून सिद्ध झाले आहे ? <<

'शत्रूकेंद्री राष्ट्रवाद' याचा मला समजलेला अर्थ असा: एखाद्या स्व-बाह्य घटकाला शत्रू मानायचं. ही स्व-बाह्य गोष्ट पाकिस्तान किंवा इस्लामी दहशतवाद असू शकते; किंवा माओवादी असू शकतात; किंवा राजकारणी असू शकतात; किंवा पाश्चिमात्य संस्कृती असू शकते; किंवा हुसेन/पिकासोसारखे कलाकारदेखील असू शकतात (पाहा - वाङमय वृत्त धागा). महत्त्वाचा मुद्दा असा की या राष्ट्रवादी भूमिकेला ज्या माणसांचा पाठिंबा मिळवायचा आहे ते स्वतःला शत्रूपासून वेगळं काढून सर्व जबाबदारी शत्रूवर टाकू शकतात. पण उदाहरणार्थ सावरकर किंवा गांधींचा राष्ट्रवाद यात बसत नाही - कारण ते स्वकीयांवर टीका करत होते आणि 'स्वतःला बदलण्यापासून राष्ट्रवादाची सुरुवात होते' असं त्यांना म्हणत होते. हजारे यांच्यावरचा गांधीवादी प्रभाव मान्य करूनही त्यांच्या राष्ट्रवादात ही आत्मटीका दिसत नाही असा मुद्दा असावा असा माझा अंदाज आहे.

>>२. हजारेप्रणित आंदोलन राजकारण्यांविरुद्ध आणि केवळ राजकारण्यांविरुद्धच आहे; अन्य शासनसंस्थेमधल्या भ्रष्टाचाराशी त्याचा संबंध नाही हे कशावरून ठरले ? अण्णाहजारे पुरस्कृत जनलोकपाल बिलामधे अन्य शासनसंस्था - ज्यामधे सैन्यबळही आलंच - समाविष्ट नव्हते - किंवा त्या संस्थांना अगदी ठसठशीतपणे वगळ्ण्यात आलेले होते काय ?<<

ठसठशीतपणे वगळण्याचा मुद्दा इथे नसावा. ज्या मुद्द्यांवरून आंदोलनाला जनआधार मिळाला ते मुख्यतः 'सर्व राजकारणी भ्रष्ट असतात' याच्याशी जोडले गेले होते. 'मीसुद्धा भ्रष्ट आहे' याच्याशी नाही. म्हणून 'मी अण्णा आहे' असं म्हणता येतं. हा मध्यमवर्गाला सोयीस्कर पवित्रा आहे असं मुरुगकरांचं म्हणणं असावं असं मला वाटतं. देशाच्या अधोगतीला जबाबदार सर्वच आहेत (माझ्यापासून ते अगदी सेनादळांपर्यंत) अशी भ्रष्टाचाराची सर्वसमावेशक मांडणी अंतर्मुख करेल; तशी ती नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

शत्रूकेंद्री राष्ट्रवाद म्हणजे काय असावे असा प्रश्न या चर्चेत उभा राहिला आहे.त्याचा माझ्या मते साधा अर्थ म्हणजे आपले अपयश झाकण्यासाठी आपल्याच समाजातील एखाद्या घटकाविरूध्द वातावरणनिर्मिती करणे आणि अशा समाजघटकापासून आपल्या देशाला धोका आहे असे चित्र उभे करणे. म्हणजे दाखविताना आपण किती मोठे राष्ट्रवादी, देशाच्या हिताची काळजी केवळ आपल्यालाच आहे, बाकी सगळे स्वार्थी आहेत असे दाखविणे. आणि ते लोकांसमोर दाखवावे कसे? "बघा मी सांगतोय की अमकाअमका समाजघटक आपल्या देशाविरोधात कारवाया करत आहे. त्याविरूध्द इतर कोणी बोलत आहे का? कोणीच नाही. फक्त मीच बोलत आहे." अशा स्वरूपाची विधाने करून!! एखादी खोटी गोष्ट हजार वेळा ओरडून सांगितली की ती खरी वाटायला लागते या गोबेल्सच्या मार्गाचा पुरेपूर अवलंब करून!!या गोष्टींचा अवलंब अनेकांनी मोठ्या प्रभावीपणे केला.

हिटलरने ज्यूंविरूध्द असेच वातावरण जर्मनीत निर्माण केले. १९८४ मध्ये शीखांविरोधी वातावरण असेच कांग्रेस पक्षाने निर्माण केले. अयोध्या आंदोलनाच्या वेळी मुस्लिमविरोधी वातावरण संघ परिवाराने निर्माण केले. असेच वातावरण उत्तर भारतीयांविरूध्द राज ठाकरे निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत. १९७० च्या दशकात बाळ ठाकरेंनी हाच प्रकार दक्षिण भारतीयांविरूध्द केला होता. अशा प्रकारच्या वातावरण निर्मितीतून लोकांना अनामिक भिती वाटायला लागते.आणि अशी भिती प्रत्यक्षात आली तर त्यापासून आपले रक्षण कोण करणार? तर जो ती भिती मुळात निर्माण करतो तोच! अशी मानसिकता बनू लागते. आणि त्यावर पोळी भाजायचे काम अगदी चोखपणे केले जाते आणि त्याहूनही वाईट म्हणजे या किळसवाण्या प्रकाराला राष्ट्रवादाचा मुलामा दिला जातो.

थोडक्यात शत्रूकेंद्री राष्ट्रवाद म्हणजे नसलेले शत्रू आपल्याच कल्पनेतून निर्माण करायचे आणि त्या शत्रूंविरूध्द आपल्याच लोकांना आपल्यामागे उभे राहायला भाग पडेल असा विखारी प्रचार करायचा आणि आपण देशाच्या हिताचे काम करत आहोत असा आभास उभा करायचा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगली चर्चा. वाचतेय.
याविषया बद्द्ल चर्चेत सहभाग घेण्याइतकी माहिती किंवा अभ्यास नाही. मात्र, अधिक जाणून घ्यायला आवडेल.

अशाच चांगल्या चर्चा इतरही विषयांवर व्हाव्या असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0