Skip to main content

आसनं समर्पयामि!

हा लेख मायबोलीच्या २०१४ च्या गणेशोत्सवामधे पूर्वप्रकाशित
-------------------------------------------------------------------------------
"या दगडातून काहीतरी करून दे बरं मला वायर वापरून!"
डिसेंबरमधे शूटच्या दरम्यान नदीकाठच्या लोकेशनवर एक दगड दाखवत आमचा डिओपी संजय मेमाणे म्हणाला. दगड होता अगदी गणपतीबाप्पाची आठवण करून देणारा.
01
वायर रॅप हे तंत्र मी कोणे एके काळी 'सॅन्टा फे ऑपेरा'मध्ये काम करताना शिकले. गेली एक-दोन वर्षे तारा वळवून विविध प्रकारचे दागिने बनवण्याचे माझे प्रयोग चालू आहेत. कामानिमित्ताने जंगल, नदी फिरत असताना विविध आकार, रंग, पोताचे दगड गोळा करणे हा चाळा पहिल्यापासून होताच. या अश्या दगडांना वेगवेगळ्या प्रकारे तारांमधे गुंडाळून त्यातून कलाकृती, कलात्मक दागिने बनवणे यावर गेले काही महिने माझा भर आहे. मी बनवलेल्या काही वस्तू, काही दागिने संजयने नुकतेच बघितले होते. ते त्याला आवडले होते, त्यामुळे तो गणपतीच्या आकाराचा दगड मिळाल्यावर लगेच घरात ठेवायला त्या दगडाचे तारा वापरून मी काहीतरी करून द्यावे अशी इच्छा त्याने व्यक्त केली.
दगडाला त्याचा आकार, रंग, रूप हे सगळं नैसर्गिकरीत्या प्राप्त होतं. जिथे तो दगड सापडला असेल तिथल्या वातावरणाचा, भौगोलिक परिस्थितीचा परिपाक म्हणून कुठलाही दगड तयार होतो. मी गोळा केलेले सगळे दगड कोकण-गोव्यातल्या नदीकाठचे. एकेक दगड हाताळताना, त्याचे रूप बघताना, त्याचा पोत अनुभवताना जाणवतं की हा एकेक दगड म्हणजे नदीच्या वाहण्याची कहाणी आहे! अश्या दगडांना तारांनी बांधून वस्तू तयार करणे म्हणजे नदीच्या वाहण्याच्या कहाणीला सजवून मांडणे. त्यामुळे सजावट ही फक्त कहाणीला उठाव देणारी हवी.
या सगळ्याला हा गणपतीच्या आकाराचा दगडही अपवाद नव्हता. त्या आकाराचे 'गणपती'पण महत्वाचे, ते दिसले पाहिजे. पण गणपतीचा आकार हा तारांनी दाखवायचा नाही अन्यथा या दगडाच्या गणपतीपणाला काहीच अर्थ नाही. त्यामुळे गणपतीला एखाद्या बेसवर बसवायचे आणि बाजूने मखर करायचे हे ठरले.
बेससाठी तांब्याची १८ गेजची तार घेऊन स्पायरल करून एक चकती तयार केली. पितळ्याच्या २१ गेजच्या तारा घेऊन त्याच्या पाकळ्या तयार केल्या. त्या पाकळ्यांच्या दांड्यांची जुडी बांधली आणि पाकळ्या सर्व दिशांना सूर्यकिरणासारख्या मुडपल्या. हा झाला पाया. या पाकळ्या आता सर्व बाजूंनी वजनाला बॅलन्स करणार. या जुडीच्या वरती तांब्याची चकती बसवली. हे झाले बाप्पांचे बसण्यासाठीचे स्टूल. सिंहासनाच्या पायाशी पाकळ्यांच्या दांड्यांच्यामधे तांब्याच्या २२ गेजच्या तारेने विणून घेतले. याच्यामुळे पाया जास्त स्टेबल झाला.
02
आता बाप्पांना त्यावर बसवायचे तर टेकायला काहीतरी हवे आणि बाप्पा स्टुलावरून हलू नयेत म्हणून त्यांना धरून ठेवणारेही काहीतरी हवे. ते तांब्याच्या १८ गेजच्या तारेतून तयार केले. पण ते तयार करताना एकही तार बाप्पांच्या पुढून क्रॉस होणार नाही आणि गणपतीचा आकार झाकणार नाही ही काळजी घेतली. इथे बाप्पांनी माझी परिक्षा घेतली. विविध पद्धतीने तारा बांधून बघितल्या पण बाप्पा काही स्थिर बसायला तयार नाहीत. काही करा स्टुलावरून उडी मारणे चालूच.
अजून तारा वापरल्या, जास्त गुंडाळले तर पक्के बसणार पण मग गणपतीपण हरवून जाणार... अश्या काहीतरी खोड्यात अडकले होते. कला तुम्हाला आयुष्याविषयी बरंच काही शिकवून जाते ती अशी वगैरे फिलॉसॉफीही सुचत होती त्या दरम्यान. पण उडी कशी थांबवायची? बाप्पा कसे जागेवर रहातील? ते काही समजत नव्हते. सगळं गुंडाळून बाजूला ठेवून दिलं आणि जरा वेळ घेऊन नव्याने विचार करावा, केलेलं काम जाऊ देत, अजून काही वेगळी कल्पना लढवूया असे ठरवले.
'सगळ्या गोष्टींची वेळ यावी लागते' हे एक वारंवार वापरून गुळगुळीत झालेलं वाक्य इथेही खरं ठरलं. तब्बल दीड महिन्यांनी गुंडाळून ठेवलेले बाप्पा आणि त्यांचं अर्धवट झालेलं सिंहासन बाहेर काढलं. केलेलं सगळं खारीज वगैरे करण्यापूर्वी एक शेवटचा प्रयत्न म्हणून आधीच्याच टेक्निकने बाप्पांना बांधून घालायचा प्रयत्न केला आणि काय आश्चर्य बाप्पा शहाण्या मुलासारखे एका जागी बसले. एक महत्वाचे काम झाले होते. अडकलेलं काहीतरी सुटून पुढे वाहतं व्हावं तसं काहीतरी वाटलं मला.
मग मागची प्रभावळ करायला घेतली. पायामधे असलेल्या पाकळ्यांच्या सारखेच काहीतरी करायचे ठरवले कारण खूप वेगळं काही केलं तर पूर्ण डिझाइनचा तोलच ढळला असता. पाकळ्यांचा पिसारा तयार करून बाप्पांच्या मागे बसवला. नंतर त्या पाकळ्यांच्या मधे मधे तांब्याच्या २२ गेज तारेने विणून घेतले.
03
वायर रॅप टेक्निकमधे केलेली वस्तू जरी एकाच बाजूने बघायची असली तरी मागची बाजू दृष्टीस पडली तर ती सुबकच दिसली पाहिजे या नियमाला फार महत्व असते. त्यामुळे पिसारा बसवल्यानंतर मागच्या बाजूनेही तारा विणून सगळे जोडकाम वगैरे झाकून टाकले.
04
मग बाप्पांच्या सिंहासनाला गादी बनवली. तिच्या चारी बाजूंनी तारेने धावदोरा घातला आणि पाटाच्या कोपर्‍यांना फुलं बसवावी तसे त्या तारांचे छोटे स्पायरल्स बसवले.
05
अश्या तर्‍हेने बाप्पा पूर्ण तयार होऊन आता आपल्या योग्य स्थळी जाण्यास सिद्ध झाले.
06
-----------------------------------------------
या लेखानंतर हे तारांचे काम अजून वाढवले आहे. नुकतीच या तारांपासून दागिने बनवून ती ज्वेलरी लाइन लाँच केलीये. फेसबुकावर पेज आहे. https://www.facebook.com/NeeCreation
- नी

स्पर्धा का इतर?

रोचना Wed, 20/05/2015 - 10:25

फारच सुंदर! मोराच्या पिसार्‍यात बसलेला बाप्पा खूप आवडला. तारेत दगडाला बसवताना बाप्पाला दिलेले 'हात' अगदी नेमक्या ठिकाणी बसले आहेत. दुव्यावरचे दागिनेही खूप रेखीव आणि क्रियेटिव आहेत. आंब्याच्या आकाराचे कानातले खास आवडले, पान लाइकवले आहे, अजून असेच येऊ द्या!
एक प्रश्न - सोन्याच्या तारेचे पण असेच दागिने करता येतात का?

नीधप Wed, 20/05/2015 - 10:52

In reply to by रोचना

हो येईल सोन्याच्या तारांचे पण अर्थातच २२ किंवा २४ कॅरेट नाही. ते खूप सॉफ्ट होते.
१४ ते १८ कॅरेट उत्तम यासाठी.
सोन्याच्या तारेमधे काम करायला प्रेसिजन प्रचंड लागेल कारण वेस्टेज कमीतकमी ठेवावे लागेल.
अजून माझे काम तेवढे सुपर फाइन झालेले नाही. अजून बरीच प्रॅक्टिस करायची आहे.
पण भविष्यात सोन्याची तार वापरून कस्टम मेड दागिने बनवण्याचा विचार नक्की आहे.

खरंतर पारंपरीक सोनारकामामधे सोन्याच्या तारांचे कामही अंतर्भूत होते पण आपल्याकडच्या सगळ्याच हस्तकौशल्याच्या गोष्टी मरत चालल्या आहेत त्यात कुणाला फारशी चाहूल पण लागू न देता शेवटचे आचके देणार्‍या कलांपैकी ही एक आहे.

काव्या Wed, 20/05/2015 - 16:07

In reply to by नीधप

खरंतर पारंपरीक सोनारकामामधे सोन्याच्या तारांचे कामही अंतर्भूत होते पण आपल्याकडच्या सगळ्याच हस्तकौशल्याच्या गोष्टी मरत चालल्या आहेत त्यात कुणाला फारशी चाहूल पण लागू न देता शेवटचे आचके देणार्‍या कलांपैकी ही एक आहे.

छान आहे. मला कमळाचा बेस फारच आवडला. कमळासारख्या पाकळ्या वेड लावतात.

काव्या Wed, 20/05/2015 - 16:13

In reply to by रोचना

दुव्यावरचे दागिनेही खूप रेखीव आणि क्रियेटिव आहेत.

दुव्यावरचे दागिने आवडलेच पण कव्हर फोटोत जे दगडांवरचं काम आहे ते फारच आवडले.

अंतराआनंद Wed, 20/05/2015 - 10:59

किती छान ,फारच सुंदर. (आपल्याला असं काही येत नाही ( आणि वरच्यासारखी प्रांजळ प्रतिक्रियाही देता येत नाही ) याचं वाईट वाटतं. :( )

नंदन Wed, 20/05/2015 - 14:05

मस्त!

अश्या दगडांना तारांनी बांधून वस्तू तयार करणे म्हणजे नदीच्या वाहण्याच्या कहाणीला सजवून मांडणे. त्यामुळे सजावट ही फक्त कहाणीला उठाव देणारी हवी.

हे वाचून आरती प्रभूंची 'तारांवरी पडावा केव्हा चुकून हात, विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा' ही ओळ आठवली.

'न'वी बाजू Wed, 20/05/2015 - 16:07

In reply to by नंदन

'तारांवरी पडावा केव्हा चुकून हात, विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा'

यातल्या 'तारा' बोले तो विजेच्या काय हो? कारण त्या तसल्या तारांवर ('चुकून'!) हात पडल्यास तो विस्तीर्ण पोकळीचा गंधार की काय तो तोच काय, पण आणखीही बरेच कायकाय 'सापडून' जाईल, असा अंदाज आहे.

असो.

गवि Wed, 20/05/2015 - 16:17

In reply to by 'न'वी बाजू

हाय रे दैवा.
ये नवी बाजुओंको समझताच नही किधर क्या प्रतिसाद देनेका.. दिडदा दिडदा सतार वाजी ऐसा वर्णन किया तोभी ये दिडदा + दिडदा = तीनदा ऐसा बोलेंगे.

बॅटमॅन Wed, 20/05/2015 - 16:18

In reply to by गवि

नैतर नवी बाजू म्हणायचं कशाला ओ?

बाकी दिडदा दिडदा वगैरे वाचून आमच्याही मनी प्रथम प्रतिक्रिया हीच उमटली होती हा भाग वेगळा.

(तीनशहाणा) बॅटमॅन.

नीधप Wed, 20/05/2015 - 16:38

In reply to by गवि

एकाच ठिकाणी उलटसुलट कशाला पिळायची पण?
सुरूवातीला शिकताना वळण देणे, सरळ करणे परत वळण देणे वगैरे होते कारण चुका होत असतात. तेव्हा तुटू शकते. किंवा ट्विस्ट करताना अंदाज न आल्याने तुटू शकते.
पण एकदा तारांचा अंदाज आला की हे वेस्टेज कमी कमी होत जाते.

गवि Wed, 20/05/2015 - 16:45

In reply to by नीधप

तेच म्हणायचे होते. नेमके योग्य जागी फोल्ड न बसल्याने किंवा वेढे न बसल्याने पुन्हापुन्हा सोडवून घेऊन पुन्हा वळवल्याने होत असावे असं वाटलं होतं.

चांदीच्या/जस्ती / शुभ्र चकाकी असलेली सोल्डरिंग वायर या कामासाठी वापरली तर ? असा विचारही आत्ता आला.

ही वायर अत्यंत मऊ आणि नाजूक ठरु शकेल, पण दृश्य परिणाम वेगळा आणि चांगला होईल असं वाटतं. कॉलेजात असताना सोल्डरिंग करताना असे निरनिराळे शेप्स उगीचच बनवलेले आठवतात. शिवाय ती तार एन्ड्सजवळ सोल्डरिंगचा डाग देऊन एकजीवही करता येईल असं वाटतं.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 20/05/2015 - 20:36

In reply to by गवि

सोल्डरिंगची तार टिकणार नाही, २२ किंवा २४ कॅरट सोन्याबद्दल नीधपने दिलंय तेच कारण. सोल्डरींगची तारतर त्यापेक्षाही जास्त मऊ असावी.

नीधप, मस्त दिसतंय गं इनस्टॉलेशन. आणि लेखनही आवडलं.

नीधप Wed, 20/05/2015 - 22:40

In reply to by राजेश घासकडवी

अनेकदा वस्तू तयार होत असताना फोटो काढण्यासाठी थांबण्याने घोळ होतो.
काम चालू असताना वर्क टेबलवर पसारा झालेला असतो. तो सगळा बाजूला करून फोटो योग्य सेटप करून फोटो काढणे यामधे लिंक तुटते.
त्यामुळे मी शक्यतो अधेमधे फोटो काढत नाही. पण प्रयत्न करेन नक्कीच.
वेळ लागेल त्याला कारण सध्या वायरवर्क, लेखन, स्केचिंग आणि उजव्या हातावर जोर येईल अशी कुठलीही कामे करायला बंदी आहे.
खरंतर सतत माऊस हाताळण्यावरही बंदी आहे पण व्यसन...
असो..
प्रयत्न करेन एखादा इंट्रिकेट पिस तयार करत असेन तेव्हा.