याच आडनावाच्या एका भारतीय डॉक्टरने माझ्या आईचं बुडाचं हाड मोडलं होतं
नुकतंच हे वाक्य वाचनात आलं.
"याच आडनावाच्या एका भारतीय डॉक्टरने माझ्या आईचं बुडाचं हाड मोडलं होतं त्यावर गेल्या आठवड्यात शस्त्रक्रिया केली."
त्यावर सुनील यांनी म्हटलं की, विरामचिह्नांचा वापर केला नाही तर ते
याच आडनावाच्या एका भारतीय डॉक्टरने माझ्या आईचं बुडाचं हाड मोडलं होतं, त्यावर गेल्या आठवड्यात शस्त्रक्रिया केली.
असे वाचले जाईल!
या लेखाचा उद्देश मौजमजेचा आहे.
१. याच वाक्यातले शब्द तेच ठेवून पण क्रम बदलून आणि विरामचिह्नं वापरून किती वेगवेगळे अर्थ अन्-अर्थ करता येतात? थोडेसे विभक्ती प्रत्यय बदलायलाही हरकत नाही.
२. पार्सिंग एररमुळे भलताच अर्थ निघतो अशी इतर उदाहरणं तुम्हाला माहीत आहेत का?
कस्ला वैट्ट टाईमपास आहे
एका भारतीय डॉक्टरने त्यावर माझ्या गेल्या आडनावाच्या आईचं बुडाचं हाड मोडलं होतं, त्यावर याच आठवड्यात शस्त्रक्रिया केली
एका भारतीय डॉक्टरने त्यावर माझ्या आडनावाच्या आईचं गेल्या बुडाचं हाड मोडलं होतं! त्यावर याच आठवड्यात शस्त्रक्रिया केली
एका डॉक्टरने त्यावर माझ्या भारतीय आडनावाच्या आईचं गेल्या बुडाचं हाड मोडलं होतं, त्यावर याच आठवड्यात शस्त्रक्रिया केली
वगैरे वगैरे.. बरेच वेरीएबल असल्याने खूप शक्यता आहेत वाचायला मजा येणारेय
माझ्या आईचं बुडाचं हाड याच
माझ्या आईचं बुडाचं हाड याच आडनावाच्या एका भारतीय डॉक्टरने मोडलं होतं त्यावर गेल्या आठवड्यात शस्त्रक्रिया केली.
माझ्या आईचं बुडाचं हाड मोडलं होतं त्यावर याच आडनावाच्या एका भारतीय डॉक्टरने गेल्या आठवड्यात शस्त्रक्रिया केली.
याच आडनावाच्या माझ्या आईचं बुडाचं हाड मोडलं होतं त्यावर एका भारतीय डॉक्टरने गेल्या आठवड्यात शस्त्रक्रिया केली.
याच आडनावाच्या माझ्या आईचं बुडाचं हाड एका भारतीय डॉक्टरने मोडलं होतं त्यावर गेल्या आठवड्यात शस्त्रक्रिया केली.
गेल्या आठवड्यात याच आडनावाच्या माझ्या आईचं बुडाचं हाड एका भारतीय डॉक्टरने मोडलं होतं त्यावर शस्त्रक्रिया केली.
गेल्या आठवड्यात माझ्या आईचं बुडाचं हाड याच आडनावाच्या एका भारतीय डॉक्टरने मोडलं होतं त्यावर शस्त्रक्रिया केली.
गेल्या आठवड्यात माझ्या आईचं बुडाचं हाड मोडलं होतं त्यावर याच आडनावाच्या एका भारतीय डॉक्टरने शस्त्रक्रिया केली.
याच आडनावाच्या एका भारतीय डॉक्टरने गेल्या आठवड्यात माझ्या आईचं बुडाचं हाड मोडलं होतं त्यावर शस्त्रक्रिया केली.
याच आडनावाच्या एका डॉक्टरने गेल्या आठवड्यात माझ्या भारतीय आईचं बुडाचं हाड मोडलं होतं त्यावर शस्त्रक्रिया केली.
माझ्या भारतीय आईचं बुडाचं हाड मोडलं होतं त्यावर याच आडनावाच्या एका डॉक्टरने गेल्या आठवड्यात शस्त्रक्रिया केली.
हुश्श... बास्स. कंटाळलो आता. ;-)
छान
पण तुमची प्रतिभा थोडी मोकाट सोडा राव. विभक्ती प्रत्ययांचं स्वातंत्र्य दिलं आहे ते घ्या, म्हणजे मस्त अनर्थ करता येतील.
माझ्या आईचं हाड शस्त्रक्रियेने मोडलं होतं त्यावर गेल्या आठवड्यात याच बुडाच्या एका भारतीय डॉक्टरने आडनावाची केली.
माझ्या आडनावाच्या बुडाची शस्त्रक्रिया एका भारतीय डॉक्टरने केली. त्यावर याच आईचं हाड गेल्या आठवड्यात मोडलं होतं.
आज आनंदी आनंद झाली
आज आनंदी आनंद झाला या ऐवजी आज आनंदी आनंद झाली किंवा आनंद आनंदी झाला असे हवे होते.
संदर्भ :- आजचा लोकसत्ता
पायात बूट की बुटात पाय?
आपण पायात बूट घालतो की बुटात पाय? अंगात सदरा की सदर्यात अंग?
शब्द वेगळ्या पद्धतीने तोडण्याची मोरोपंती गंमत पाहा:
अनलसमीहित साधी राया वारा महीवरा कामा|
अनलस मीहि तसा धीरा यावा रामही वराका मा||
अन्वयः महीवरा राया, (जसा) वारा अनलसमीहित साधी तसा (हे) धीरा, अनलस मीहि कामा यावा, रामही (यावा), वराका मा (दुसरे काय करणार? तीहि येईल.) (कंसातील शब्द अध्याहृत वाचायचे आहेत.)
मराठीत (!) अर्थ: हे पृथ्वीवरील श्रेष्ठ राजा, वारा जसा अनला(अग्नि)चे इच्छित साधतो (वार्यामुळे आग उफाळते), तसा हे धैर्यवान पुरुषा, मीहि अनलस (आळस न करता) तुझ्या कामाला (साहाय्याला ) येईन, तसाच बलरामहि येईल. त्यानंतर वराका (बिचारी) मा (लक्ष्मी - येथे कृष्णाची पत्नी रुक्मिणी) - तीहि येईल.
शब्दांची उलटापालट झाली तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. आमच्या शाळेच्या रस्त्यावर एक भिंतभर रंगविलेली जाहिरात होती. ती रोज येताजाता वाचून आम्ही खोखो हसत असू. जाहिरात होती पर्गोलॅक्स - गोड जुलाबाच्या गोळ्यांची.
इंग्रजीत spoonerism ची अनेक उदाहरणे आहेत, जसे I gave him a blushing crow (crushing blow).
झारची अमर्याद सत्ता रशियात चालत असे तेव्हाची एक गोष्ट. एका राजकीय कैद्याला खटला होऊन मृत्युदंडाची शिक्षा झाली. त्याने झारकडे दयेचा अर्ज केला. झारने अर्जावर हुकूम लिहिला простить нельзя казнить. (क्षमा करणे न मारणे). स्वल्पविराम टाकण्याचे झार विसरला. हुकूम बाहेर आला तेव्हा अधिकारी बुचकळ्यात पडले. अर्थ काय लावायचा - क्षमा न करणे, मारणे की क्षमा करणे, न मारणे? झारकडे पुनः जाऊन अर्थ विचारण्याचे धैर्य कोणीच केले नाही. त्यांच्या दृष्टीने सुरक्षित असा अर्थ त्यांनी लावला - क्षमा न करणे, मारणे आणि कैद्याच्या आयुष्याची दोरी तुटली!
(अवांतर) पर्गोलॅक्सः एक वेरिएशन
शब्दांची उलटापालट झाली तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. आमच्या शाळेच्या रस्त्यावर एक भिंतभर रंगविलेली जाहिरात होती. ती रोज येताजाता वाचून आम्ही खोखो हसत असू. जाहिरात होती पर्गोलॅक्स - गोड जुलाबाच्या गोळ्यांची.
हीच जाहिरात आम्ही 'पर्गोलॅक्स - गुलाबाच्या जोडगोळ्या' अशी वाचत असू.
मोरोपंत
उदाहरण मनोरंजक अाहे, पण मोरोपंतांना ही खोडच होती असं वाटतं. त्यामुळे शब्दांचे चमत्कार करण्याच्या अट्टाहासापायी अर्थाची तुटेपर्यंत अोढाताण करावी लागते असं त्यांच्या काव्यात फारवेळा झालेलं अाहे. त्यात ते शीघ्रकवी होते, म्हणजे कुठलाही शब्दप्रयोग ऐकला की तो मधेमधे तोडून त्याचं कसकसं वाटोळं करता येईल ह्याचा त्यांना ताबडतोब वास लागत असणार.
ते रोजच दुपारी बायकोला 'अातजाऊनचहाकर' असं म्हणत असल्यामुळे ती वैतागलेली होती, अाणि काहीवेळा मुद्दाम गार झालेला चहा अाणून देत असे, असा प्रवाद ऐकलेला अाहे.
(सॉरी. असा काही प्रवाद नाही. मी अात्ताच तो तयार केला.)
अशीच एक गोष्ट
वरील श्लोक
कं संजघान कृष्ण: का शीतलवाहिनी गङ्गा |
के दारपोषणरता: कं बलवन्तं न बाधते शीतम् ||
प्रसिद्ध आहे पण पुढील चुटका पहा:
एक राजा तसा असंस्कृत होता पण आपल्या ज्ञानाचा त्याला मोठा गर्व होता. त्याने अशी आज्ञा काढली होती की राजपरिवारात सर्व संभाषण केवळ संस्कृतमध्येच चालेल.
एकदा आपल्या राण्यांसह तो जलक्रीडा करीत असता त्याने एका राणीवर पाणी उडविले. ती त्याला म्हणाली, 'मोदकै: सिञ्च माम् !' राजाने लगेच सेवकाला मुदपाकखान्याकडे पिटाळले आणि मोदक आणवून राणीवर टाकले.
राणीला म्हणायचे होते 'मा उदकै: सिञ्च माम्' माझ्यावर पाणी उडवू नकोस !
क्रमचय
एक्सेल वापरून क्रमचय(permutations) पद्धतिने 20,922,789,888,000 एवढी वाक्ये तयार करता येणे शक्य आहे.
वानगीदाखल -
मोडलं शस्त्रक्रिया त्यावर आडनावाच्या हाड गेल्या भारतीय होतं, याच बुडाचं आठवड्यात एका आईचं केली. माझ्या डॉक्टरने
आईचं मोडलं हाड होतं, भारतीय त्यावर माझ्या एका आठवड्यात गेल्या डॉक्टरने शस्त्रक्रिया बुडाचं आडनावाच्या केली. याच
आडनावाच्या होतं, मोडलं एका माझ्या भारतीय गेल्या त्यावर बुडाचं आठवड्यात आईचं हाड शस्त्रक्रिया याच केली. डॉक्टरने
एका शस्त्रक्रिया बुडाचं डॉक्टरने गेल्या मोडलं त्यावर याच भारतीय होतं, माझ्या आडनावाच्या केली. आईचं आठवड्यात हाड
आले हे लगेच चुका काढायला,
चिच्चा कुणीकडचे!
असो. कालच वाचनात आलेली गोष्ट. संदर्भ लोकमान्य ते महात्मा, खंड दोन. लेखक सदानंद मोरे. (प्रकरण १०४, पृष्ठ क्र: ६१९)
लिखाणातला संदर्भ असा, गोहत्या अगदी वेदकालापासून निषिद्ध आहे असं सिद्ध करायचं होतं. महाभारताच्या शेवटी, भीष्म शरपंजरी पडले असता बाणांची टोकं कशी टोचतात याचं वर्णन, "माघमासे गवा इव" असे आहे. गायीच्या बलिदानाचा माघ महिन्यातल्या धर्मकृत्याशी संबंध लागतो. मग त्याची मोडतोड करून "माघमा सेगवा इव" करून विंचवाच्या नांगीचा संदर्भ आणला.
हिंदूचे मटण
जयवंत दळवी आणि अनंत काणेकर एकदा कुठेसे जात होते. मधेच काणेकरांना एक लहानसे हॉटेल दिसले. 'चला दळवी, आज भंडार्याच्या हॉटेलात खाऊया' म्हणून काणेकर त्यांना तिथे घेऊन गेले.
मालक ऑर्डर घ्यायला आला. काणेकरांची ऑर्डर, ' दोन प्लेट हिन्दू '. मालक बुचकळ्यात पडला. दळव्यांना, काणेकर काहीतरी विनोद करत आहेत एवढे लक्षात आले, पण काय ते कळेना.
त्या हॉटेलवरच्या पाटीवर लिहिलेले होते, 'हिंदूचे मटणाचे हॉटेल'. ते वाचून काणेकर हिंदूचे मटण मागत होते. नंतर काणेकरांनी मालकाला चूक समजावून सांगितली आणि योग्य वाक्य कागदावर लिहून दिले. काही दिवसांनी तिथे नवी पाटी दिसू लागली, 'मटणाचे हिंदू हॉटेल'
चा, ची, चे - चे, च्या, ची
>>जरा ओढून ताणून जोक वाटला. 'हिंदूचे मटणाचे दुकान' वाचल्यावर माझ्या मनात हिंदूचे 'मटणाचे दुकान' असेच आले. जर तिथे 'हिंदूचे मटण' मिळते असे दाखवून नाव द्यायचे असेल तर ते 'हिंदूच्या मटणाचे दुकान' होईल, 'हिंदूचे' नव्हे! इथे 'मटणाचे' हे हॉटेलचे विशेषण वाटते.
माझ्या मते जुन्या मराठीत 'चे' हा विभक्तिप्रत्यय 'च्या' या अर्थानंही वापरला जाई. उदा : 'तिचे कुंतली फूल चाफ्याचे' यातला पहिला 'चे' आज वापरला जात नाही. त्याऐवजी आज 'तिच्या कुंतली' म्हटलं जाईल, पण दुसरा 'चे' आजही वापरला जातो.
तांबडा पांढरा रस्सा
"खास खवैय्यांसाठी तांबडा-पांढरा रस्सा मिळण्याचे कोल्हापुरातील प्रसिद्ध ठिकाण...."
यात वरवर वाचता फरक जाणवत नाही. पण आम्ही ती मालकाला अनर्थ घडू शकणारी चूक दाखविली होती. 'खास खवैय्यांसाठी" याचा अर्थ इतरांना तिथे प्रवेश निषिद्ध असाही होऊ शकतो. विशेष म्हणजे कोल्हापुरी मालकाला ते पटले आणि मग बदल झाला "खवैय्यांसाठी खास तांबडा-पांढरा रस्सा मिळण्याचे कोल्हापुरातील एकमेव ठिकाण...."
२. मंगळवार पेठेत एस.टी.डी.बूथ बोर्ड होता :
"एक रुपयात लोकल कॉल जगात कुठेही बोला." मग नित्याची ग्राहकांची शाब्दिक मारामारी. एक रुपयात जगात कुठेही कसे बोलता येईल ? पंक्च्युएशनचे महत्व पटविले गेले. बोर्ड आता झाला. "एक रुपयत लोकल कॉल. तसेच जगात कुठेही कॉल करू शकता."
अशोक पाटील
चर्चगेट्च्या भुयारी मार्गात
चर्चगेट्च्या भुयारी मार्गात असलेल्या एका दुकानासमोर एक पाटी वाचली होती. New jeans available. All colours guaranteed. मी आणि माझा मित्र ते वाचून कल्पना करू लागलो, की याचा अर्थ - एक जीन्स विकत घेतली की कालान्तराने सगळे तिला सगळे रङ्ग प्राप्त होतील, याची खात्री ! इथे विरामचिह्ने असूनही अनर्थ होतो.
विनंती
उपक्रमावरील काही सदस्यांना या संस्थळावर प्रवेश द्यावा. त्या सदस्यांना हा पार्सिंगचा प्रकार भलताच भावलेला दिसतो. पण उपक्रमावर मौजमजेला बंदी असल्यामुळे त्यांची कुचंबणा होते.
ज्याचात्याचा राम!
मौजमजेला बंदी असल्यामुळे त्यांची कुचंबणा होते.
त्यांचा रामच * फुटका, त्याला कोण काय करणार! **
* राम = दैव = नशीब असा काही अर्थ होत असावा, असा आमचा आपला एक संशयसिद्धांत (पूर्वीच्या भाषेत 'अटकळ') आहे. (त्या रामाला हे 'दैवत्व' कधी प्राप्त झाले, यावर मात्र विद्वानांच्या मतांचे 'ऐकत्व' काही केल्या साधत नाही, असे काहीतरी आम्ही बुवा ऐकत आहोत. जाऊद्या. त्यांना साधकबाधक चर्चा करू द्या. आपण आपले ऐकत राहावे झाले.)
** राम आणि पांडू यांना एकत्र आणणारी अशाच अर्थाची काही नवी म्हण या निमित्ताने सुचली होती. ती येथे ठोकून देण्याचा मोह मोठ्या कष्टाने आवरला. असो.
मला उपक्रम संकेतस्थळ आवडते
मला उपक्रम संकेतस्थळ आवडते.
नितिन थत्त्यांनी निर्देश केलेल्या चर्चेत मी "ऐसी अक्षरे"वरील चर्चेचे समर्थन केलेले आहे. आणि येथे उपक्रम संकेतस्थळावरील "राम, देवत्व" चर्चेचे समर्थन करत आहे.
मला या संकेतस्थळ-चिखलफेकीबाबत वाईट वाटते आहे. अर्थात चिखलफेकीचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य हवे. आणि चिखलफेक आवडत नाही हे म्हणण्याचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य हवे.
मी सुरूवात करतो. माझ्या, याच
मी सुरूवात करतो.
माझ्या, याच आडनावाच्या आईचं एका भारतीय डॉक्टरने बुडाचं हाड मोडलं, त्यावर गेल्या आठवड्यात शस्त्रक्रिया केली.
माझ्या आडनावाच्या याच आईचं एका भारतीय डॉक्टरने बुडाचं हाड मोडलं, त्यावर गेल्या आठवड्यात शस्त्रक्रिया केली.