Skip to main content

सेलेब्रेटीची आत्महत्या

प्रत्युष्या बॅनर्जीच्या आत्महत्याच्या चर्चेत एका ब्रेकअप झालेल्या सेलेब्रेटीची आत्महत्या असाही सुर आहे. पण ब्रेकअप हे फक्त एकच कारण नाहीये, अनेक कारणांपैकी ते एक कारण असू शकते. प्रत्युश्याकडे फक्त एक सेलेब्रेटी म्हणून न बघता आत्ताच्या तरूण पिढीची एक प्रतिनिधी म्हणून ही बघावे लागेल आपल्याला.
वयाच्या १८ व्या वर्षी बालिकावधू सारखी मालिका तिला मिळाली. एखादा सामान्य माणूस वयाच्या २२/२३ व्या वर्षी एका वर्षात मिळवेल एवढा पैसा एका महिन्यात तिला मिळत होता. वयाच्या २४ व्या वर्षी ब्रेकअप बरोबरच कर्ज वसूली करण्यासाठी आलेल्या व्यक्तीवर विनयभंगाचा आरोप तिने केला होता. तो आरोप खरा खोटा ह्या वादात न पडता कर्जवसूली अधिकारी तिच्या घरी येतो ही गोष्ट खटकते मला.
आपल्या आयुष्याचे यशापयश हे आता करीअर मधल्या अचिव्हमेंट्स न राहता तिथून मिळाणारा पैसा , राहणीमान हे झालेय. ज्या गोष्टी साधन असायला हव्यात त्या आता साध्य झाल्यात. उदाहरणार्थ मोबाईल फोन हे संपर्कात राहयचे साधन न राहता तुम्ही किती कमविता याचा मापदंड झालाय. तुम्ही अॅपल 5S वापरत असाल तर तुम्हाला नंतरचा फोन 6S च लागतो. नाहीतर तुमचे तितके बरे नाही चाललेय असं तुम्हाला आणि इतरांनाही वाटायला लागते.
हेच प्रत्येक बाबतीत, तुम्ही वापरत असलेले कपडे, चप्पल, घड्याळ, गाडी एवढेच नव्हे तर तुम्ही राहत असलेल्या घराचा पत्ता. सगळे सगळे तुमचे अचिव्हमेंट म्हणून पाहिले जाते.
प्रत्युष्याच्या बाबतीत पण तिच्या अभिनयातील प्रगती वर किती बोलले गेले? आजच्या भागातील तिचा अभिनय लाजवाब होता वगैरे. ह्या मालिका 3/4 वर्षे चालतात आणि बंद होतात.
आपल्या मनोरंजनाची व्याख्या पण किती बदललेली आहे. आम्हाला फक्त हलकंफुलकं पहायचेय. शेजारच्या बैठकीत डोकावून पहाण्या पलीकडे आता आम्हाला मालिकेंमधल्या वेगवेगळ्या कुटुंबाच्या बेडरूममध्ये, किचनमध्ये काय चालते, हे आम्हाला पाहयचेय. बालिकावधू सोडल्यावर तिने Big Boss, काही रिअॅलिटी शोज केले. त्याचा आणि अभिनयाचा काय संबंध..? बालिकावधू सोडतानाची काही गणितं चुकली किंवा चॅनलच्या राजकारणात ती फसली असेल.
अश्या वेळी तुमची सपोर्ट सिस्टीम किती भक्कम आहे यावर तुम्ही यातून कसे बाहेर येता हे ठरते. तसे तर एका वर्षात चार चार ब्लॉकब्लास्टर देण्यार्या दिपीका पदुकोनला पण निराशेने ग्रासले होतेच की. पण ते तिने मान्य केले, खरं तर अश्या गोष्टी दुसर्यासमोर मान्य करण्याआधी स्वःताशी मान्य करणे जास्त अवघड असते.
अश्यावेळी व्यावसायिक मदत घेवून किंवा तिच्या वडिलांच्या खेळाडू असण्याचा.. अप्सडाऊनला सामोरे जाण्याचा अनुभव मुळे तिला यातून बाहेर यायला जमले असेल.
नाहीतर सर्वोच्च भागीदारीचा विक्रम करणार्या दोन खेळाडूमधील एक कारकीर्दीच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान होतो आणि दुसरा मात्र वाटेत कुठेतरि हरवून जातो, असं का? सचिनच्या यशात त्याला कुटुंबाकडून मिळालेला सपोर्टही तेवढाच महत्वाचा वाटतो मला.
आपल्या मुलांना पण ह्या रस्त्यावरूनच प्रवास करायचा आहे. सचिनला लवकर समजले की खेळामुळे मिळणारे पुरस्कार, पैसा, जाहिराती, राहणीमान ही आपली मिळकत नसून खेळामधील विक्रम, तंदुरुस्ती, स्टॅमीना ह्या महत्त्वाच्या आहेत. बाकीच्या गोष्टी ह्या याच्या पाठोपाठ आपोआप येणार आहेत.
कुटुंबाच्या भक्कम आधारा सोबतच व्यावसायीक मदत लागली तर घ्यायला काय हरकत आहे ?त्यात कमीपणा न मानता. आजकाल प्रत्येक बाबतीत व्यावसायीक मदत आपण घेतच असतो अगदी घरातले कार्यक्रम पण आपण इव्हेंट मॅनेजमेंट वाल्यांच्या हातात देतो. मग आपल्या मुलांच्या बाबतीत, आपल्या स्वतः बाबतीत पण अशी गरज लागली तर ती नक्की घ्यावी. कृष्ण हा अर्जुनाचा personal counselors च होता नाही का...? ह्या स्पर्धात्मक जगात तरून जायला आपल्या प्रत्येकाला एका कृष्णाची गरज आहे एवढे खर!!!!!
साभार :- एका मित्राकडून प्राप्त संदेश

घाटावरचे भट Wed, 06/04/2016 - 16:13

कृष्ण हा अर्जुनाचा personal counselors च होता नाही का...? ह्या स्पर्धात्मक जगात तरून जायला आपल्या प्रत्येकाला एका कृष्णाची गरज आहे एवढे खर!!!!!

या दोन वाक्यांनी आख्ख्या लेखाची 'ऐसीकंपॅटिबिलिटी' मातीत घातली बघा....

-प्रणव- Thu, 07/04/2016 - 09:11

लेखाच्या आशयाशी सहमत.

तो आरोप खरा खोटा ह्या वादात न पडता कर्जवसूली अधिकारी तिच्या घरी येतो ही गोष्ट खटकते मला.

या वाक्याचे प्रयोजन काय नाही कळालं. का खटकते?

उडन खटोला Thu, 07/04/2016 - 13:38

मंडळी
अतिशय आभार अन धन्यवाद
मला हे आर्टिकल मेसेज स्वरुपात आलेले होते . त्याच्या मूळ लेखिका चैत्राली मेणकर यां आहेत ,त्यांनी पोस्ट फेसबुकवर टाकली होती व ती गुगल प्लस / whatsapp /फेसबुक वरुण मग व्हायरल झाली
त्यांचे आभार्स

अनु राव Thu, 07/04/2016 - 13:44

प्रत्युश्याकडे फक्त एक सेलेब्रेटी म्हणून न बघता आत्ताच्या तरूण पिढीची एक प्रतिनिधी म्हणून ही बघावे लागेल आपल्याला.

भारतात आत्ता १८ ते २५ वयोगटातले कमीतकमी १५ कोटी तरी लोक असतील. २-४ किंवा १०-१५ आत्महत्या झाल्या तर त्यांना एकदम तरुण पिढीची प्रतिनिधी कसे समजता येइल. बरं प्रतिनिधी समजण्यासाठी ह्या प्रत्युषा आणि बाकीच्या १५ कोटी लोकांमधे काय साम्य आहे? प्रत्युषा कदाचित एखाद लाख लोकांपैकी असेल आर्थिक, सामाजिक, जातीय दृष्ट्या. तरी पण तिला त्या १ लाख लोकांचे प्रतिनिधी समजायचे कारण काय?

कर्जवसूली अधिकारी तिच्या घरी येतो ही गोष्ट खटकते मला.

ह्यात खटकण्यासारखे काय आहे, तिला पण मल्यासारखी राजेशाही ट्रीटमेंट मिळावी अशी तुमची अपेक्षा आहे का?

अनु राव Thu, 07/04/2016 - 13:47

करीअर मधल्या अचिव्हमेंट्स न राहता तिथून मिळाणारा पैसा , राहणीमान हे झालेय. ज्या गोष्टी साधन असायला हव्यात त्या आता साध्य झाल्यात

"आता" म्हणजे काय? असे २०, ३० किंवा ४० वर्षापूर्वी नव्हते असे म्हणायचे आहे का तुम्हाला? पूर्वी पण अगदी असेच होते. पैसाच महत्वाचा होता.

लेखातला कृष्णाचा उल्लेख वगैरे तर नुस्ता भंपक पणा आहे.

नितिन थत्ते Thu, 07/04/2016 - 18:29

>>आपल्या आयुष्याचे यशापयश हे आता करीअर मधल्या अचिव्हमेंट्स न राहता तिथून मिळाणारा पैसा , राहणीमान हे झालेय. ज्या गोष्टी साधन असायला हव्यात त्या आता साध्य झाल्यात.

जे लोक शो बिझिनेसमध्ये असतात त्यांना राहणीमान टिकवणे भाग पडते. आणि हे फार पूर्वीपासून सत्य आहे. अनेक मोठ्या यशस्वी कलाकारांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात फार ओढगस्तीची स्थिती येते याचे कारण हे 'टिकवून ठेवावे लागणारे राहणीमान' असायचे.