चाल वाकुडी
मला काही वाईट खोडी आहेत. फार नाहीत, थोड्याशाच. त्यातली एक खोड म्हणजे गाण्यांच्या चाली बदलून गाणी म्हणणं. परवाच लताच्या आवाजातलं घनगंभीर "मालवून टाक दीप" लागलं होतं. त्यात रंगून जाण्याचा मूड त्यावेळी तरी नव्हता. मग मी तेच शब्द नुसतेच गुणगुणले. थोडी चाल वेडीवाकडी करून बघितली. आणि काय आश्चर्य, 'आओ बच्चो तुम्हें दिखाए झॉंकी हिंदुस्तान की' ची चाल मस्त बसली. त्या चालीवर म्हटले की त्या अर्थपूर्ण शब्दांचं आणि त्यातल्या शृंगारिकतेचं सुंदर भजं होतं. विशेषतः 'लाधला निवांत संग' नंतर आपोआपच तोंडात वंदे मातरम् येतं तेव्हा.
'खबरदार जर टाच मारूनि जाल पुढे
चिंधड्या उडविन मी राईराईएवढ्या'
ही मर्दुमकीयुक्त कविता
'दिल दिवाना बिन सजनका के माने ना
ये पगला है समझानेसे समझेना'
या गाण्याच्या चालीवर म्हणता येते. दुसऱ्या ओळीत थोडी ओढाताण करावी लागते - चींधड्याउड्विन मी राई राईएव्ढ्या - असं म्हणावं लागतं. पण ते अशा विचित्र चालीवर ऐकलं की लोकांच्या चेहऱ्यावर जे भाव येतात ते पाहून आत्मा अगदी तृप्त होतो.
किंवा 'ऐ मेरे वतन के लोगो' हे गाणं 'ऐ मेरे दिल कही और चल' च्या चालीवर म्हटलं दुःखाचा पोत बदलतो. गाण्याचा तालच बिघडतो.
तुमची जर अशी काही चाल बदलून म्हणण्याची खास गाणी असतील तर जरूर सांगा.
हा हा हा. मस्त. मेहन्दी लगा
हा हा हा. मस्त.
मेहन्दी लगा के रखना हे 'या झोपडीत माझ्या' च्या चालीवर म्हणता येतं. ती चाल नक्की कुठची हे ठरवण्यासाठी इथे झालेली चर्चा पहा.
त्यात काय एवढे?
'सदा सर्वदा योग तूझा घडावा' हे कधी 'ये दुनिया अगर मिल भी जाए, तो क्या है'च्या चालीवर म्हणून पाहिले आहे?
(खरे तर 'सदा सर्वदा' हे 'जिन्हें नाज़ है हिन्द पर, वो कहाँ है'च्या चालीवरही म्हणता यावे. परंतु मग त्यापुढील 'कहाँ है, कहाँ है, कहाँ हैऽऽऽऽ' या आर्तस्वरातील आरोळीच्या ठिकाणी 'चिआता, चिआता, चिआताऽऽऽऽ' हे तोडून म्हणायला कसेसेच वाटते. म्हणजे, एकता कपूरच्या कोठल्याही सीरियलमध्ये एखाद्या संवादवाक्यातील शेवटच्या शब्दाची (त्याबरोबरील हालचालींसह) तीनतीनदा पुनरावृत्ती होते, तसे काहीसे.)
+१
चौथीच्या पुस्तकात "तळ्याकाठी गाती लाटा" अशी धीवर पक्ष्यावर कविता होती ती आम्ही "मेरा दिल ये पुकारे आजा" च्या चालीवर (मूळ गाणे माहित नसताना) म्हणायचो. नंतर लवकरच मूळ गाणे ऐकले तेव्हा प्रचंड आश्चर्य वगैरे वाटले होते.
बालकवींच्या "श्रावण मासी" ला बीथोवेनची सिंफनीही बर्यापैकी बसते.(नंबर आठवत नाही, पण तीच ती "इतनाना मुझसे तू प्यार बढा" वाली).
पटले नाही
'मालवून टाक दीप' हे 'आओ बच्चों तुम्हे दिखा दूं'च्या चालीवर (खूपच ओढाताण केल्याशिवाय, इतकी, की आफ्टर द्याट, द एक्सर्साइझ जस्ट डझण्ट रिमेन वर्थ इट) बसत नाही. त्यामुळे त्यात मजा नाही. तीच गोष्ट 'खबरदार जर टाच मारुनी' हे 'दिल दीवाना बिन सजना के'च्या चालीवर म्हणण्याबाबत.
उलटपक्षी, 'ज्याक अॅण्ड जिल वेण्टप द हिल' हे 'आओ बच्चों तुम्हे दिखा दूं'च्या चालीवर म्हणून पहावे, म्हणजे मजा कशाला म्हणतात, ते कळेल. (किंवा, 'बा बा ब्ल्याक शीप' हे 'याद किया दिल ने कहाँ हो तुम'च्या चालीवर. आमच्या चिरंजीवांच्या बालपणी त्यांच्यावर या प्रयोगाचा आमच्याकडून इतका भडिमार झाला होता, की त्यानंतर बर्याच वर्षांनी त्यांना खरेखुरे 'याद किया दिल ने कहाँ हो तुम' जेव्हा ऐकायला मिळाले, तेव्हा त्यांची प्रामाणिक समजूत "ही 'बा बा ब्ल्याक शीप'ची हिंदी आवृत्ती आहे" अशी झाली होती. ती निस्तरता निस्तरता नाकी नऊ आले. तर ते एक असो.)
बाकी, कसरतीच करायची हौस असेल, तर 'कळा ज्या लागल्या जीवा' हे 'मुहब्बत ऐसी धडकन है'च्या चालीवर (किंवा वाइसे वर्सा) म्हणून पहायला हरकत नसावी.
किंवा, 'साउंड ऑफ म्यूझिक' मधील 'रेन्ड्रॉप्स ऑन रोझेस, अँड व्हिस्कर्स ऑन किटन्स'च्या चालीवर 'पूसी क्याट, पूसी क्याट, व्हेअर ह्याड यू बीन' म्हणावे. ते साधारणपणे 'दीज़ आर अ फ्यू ऑफ माय फेवरिट थींऽऽऽऽग्ज़'च्या ठिकाणी 'फ्राइटन्ड अ मा-आ-उस अंडर हर चेऽऽऽऽयर'पाशी येऊन संपते. मग पुढील एकदोन कडव्यांत मारिया आपल्या इतर "फेवरिट थिंग्ज़"बद्दल सांगते, त्या सर्व कडव्यांच्या ठिकाणी हवे तर 'पूसी क्याट'चीच आवर्तने (जेथे मूळ कडव्याची चाल बदललेली आहे तेथे ती त्यानुसार बदलून *) करावी. (त्याठिकाणी आणखी काही घालता येईल का यावर संशोधन करणे रोचक ठरावे.) मग त्यापुढे 'व्हेन द डॉऽऽऽऽग बाइट्स, व्हेन द बीऽऽऽऽ स्टिंग्ज़, व्हेन आय अॅम फीलिंग स्याऽऽऽऽड, आय सिंप्ली रिमेंबर माय फेवरिट थिंग्ज़, अॅण्ड देन आय वोण्ट फीऽऽऽऽल, सोऽऽऽऽ ब्याऽऽऽऽड'च्या जागी खुशाल 'लिटिल ज्याऽऽऽऽक हॉर्नर, स्याऽऽऽऽट इन अ कॉर्नर, ईटिंग हिज़ ख्रीऽऽऽऽस-मस पाऽऽऽऽय, ही पुट इन हिज़ थंब अॅण्ड पुल्ड औट अ प्लम, अॅण्ड सेड व्हॉट अ गुड बॉऽऽऽऽय, अॅऽऽऽऽम आऽऽऽऽय!' हे ठेवून द्यावे.
* 'व्हेन द डॉग बाइट्स'च्या अगोदरचे 'दीज आर अ फ्यू ऑफ माय फेवरिट थींऽऽऽऽग्ज़' हे वरची पट्टी गाठू पाहते, हे चाणाक्षांच्या नजरेतून निसटले नसावे.
किंवा, 'साउंड ऑफ म्यूझिक'
किंवा, 'साउंड ऑफ म्यूझिक' मधील 'रेन्ड्रॉप्स ऑन रोझेस, अँड व्हिस्कर्स ऑन किटन्स'च्या चालीवर 'पूसी क्याट, पूसी क्याट, व्हेअर ह्याड यू बीन' म्हणावे... पासून पुढला परिच्छेद
सादर प्रणामाचा स्वीकार करावा! _/\_
बाकी वर राजेशने दिलेले किंवा तुम्ही दिलेले इतर बरेचसे (शिवाय इतरही काही)'थालेपारट' कधीतरी कानावर पडले आहेत. मात्र सांग म्हटल्यावर एकही आठवेल तर शपथ!
मलाही
'चेहरा है या चाँद खिला है...' तमाशातल्या सवाल-जवाबांच्या चालीवर ऐकल्याचं आठवतं. शिवाय त्यात "माझ्या सर्जा तु रं, माझ्या राज्या तु रं" असं पालुपदही जोडलेलं होतं.
तसं 'ये रे ये रे पावसा' निदान वीस हिंदी गाण्यांच्या चालीवर ऐकल्याचं आठवतं. पण ती गाणी कोणती हे आता आठवत नाहीत.
जादू तेरी नजर
डर मधले "जादू तेरी नजर" आम्ही "ओम जय जगदिश हरे, स्वामी जय जगदिश हरे" च्या चालीवर पर्फेक्ट बसवत असू त्याची आठवण झाली.
शिवाय कवी अनिल ह्यांची सातवीला कविता होती "घननीळ सागराचा घननाद येत कानी" ती आम्ही मस्तपैकी "मेहन्दी लगा के रखना" च्या चालित आरामात म्हणायचो.