Skip to main content

'पुरुष', 'खरा मर्द' वगैरे उतरंडीपलीकडून

लैंगिकदृष्ट्या मानवी नराचा देह धारण करून जन्माला आल्यावर, सध्याच्या काळातल्या भारतीय समाजाने 'पुरुष' म्हणून आधीच ठरवून ठेवलेले जगण्याचे निकष शिकवण्यासाठी माझ्या आयुष्यात लहानपणी कोणीही नव्हते, हे माझं सुदैवच ! चालण्या-उठण्या-बसण्या-बोलण्याबाबत, विचार-कृती करण्याबाबत, आवडी-निवडी असण्याबाबत समाजाने पुरुष म्हणन ज्या अपेक्षा लादल्या असतात, व आजूबाजूचे सर्व मनुष्यनर त्या अभिमानाने बाळगत-पार पाडत असतात; त्या अपेक्षांचं अस्तित्वच मला बराच काळ कळलं नाही. शेवटी समज आल्यावर त्या अपेक्षांच्या प्रमाणे न वागल्याने घरच्यांसकट सर्वांनी बहिष्कारात्मक कुत्सित वागणूक दिल्याने, त्या असतात हे माझ्या लक्षात आलं. "खरा मर्द" वगैरे सन्माननीय सर्वोच्च प्रकार व त्याखालोखाल इतर सर्व - मर्दानी बाई, लेडीज महिला, बायकी पुरुष, षंढ, तृतीयपंथी इ उतरंड असते हे दिसल्यावर कळलं की मीसुद्धा कुठल्यातरी प्रकारच्या व्याखेत बसावं आणि माझ्याबाबत उलगडा पडावा म्हणून इतर लोक चक्क प्रयत्नशील वगैरे आहेत. त्या प्रयत्नांमुळे त्या कच्च्या वयात मनात बऱ्याच गुंतवळी निर्माण झाल्या. ते पुरुषीपणा जोखण्याचे सर्व निकष किती पोकळ तकलादू आहेत, व त्यांची आखणी किती स्वार्थीपणे पुरुषसत्ताक समाजाने केली आहे, हे खूप उशिरा स्वतंत्र विचार करण्याची क्षमता आल्यावर जाणवले. अजून जटिल असा सखोल विचार केल्यावर ते निकष पुरुषांच्यासाठीसुद्धा कसे जास्त तोट्याचेच आहेत हे समजलं. आणि स्त्रीपणाचेसुद्धा तसेच गैरफायदे असतात हे सरळ दिसत होतेच. नैसर्गिकरीत्याच मला जीवाच्या गाभ्यातून कधीही ना 'पुरुष' असल्यासारखं वाटलं, ना कधी 'स्त्री' वा इतर काही/कोणी. अंगभूत निरागसतेने मी बऱ्याचदा नकळत माणूसपणाचेसुद्धा निकष झिडकारले आहेत. कोणतंही बंड करायची इच्छा नसताना, केवळ स्वतःसाठी. माझं शरीर, लिंग, लैंगिकता, लिंगभाव यांचा माझ्या मानसिक अस्तित्वाशी आणि त्याबद्दलच्या आसक्तींशी काहीच संबंध मला जुळवता आला नाही. आणि त्यामुळे माझं जगणं अतिशय मुक्त नितळ बनतं, ते मला निसर्गाशी जास्त एकरूप बनवतं. जगण्याची खूप ओझी-दडपणं माझ्यापुरती नष्ट होतात. आणि माझं आयुष्य, त्याचा प्रवाहीपणा आणि मार्ग, मैलांचे दगड, गृहितकं, निर्णय, अपेक्षा आणि हेतू इ. मला स्वतःला हवे तसे आखता-रचता-बदलता येतात. माझं अस्तित्व स्त्री-पुरुषत्वाचं द्वंद्व संपूर्णपणे नाकारतं, आणि एनर्जीचा फक्त एक धुमकेतू गोळा म्हणून स्वच्छंद वावरतं. इतर लोकांशी वागताना, माझ्या मानसिक जगाच्या बाहेरच्या जगाशी घडामोडी होताना, मला जाणवतं की, स्त्री व पुरुष या केवळ समाजाने बनवलेल्या आणि लादलेल्या संकल्पना आहेत . त्या आहेत तशा बनवण्याची कारणं चक्क फक्त व्यवहारिक सोय व्हावी म्हणून आहेत. नाहीतर जननेंद्रियं शरीराच्या आत किंवा बाहेर असण्यापलीकडे फरकच काय आहे माणसामाणसांत ?

Node read time
2 minutes

ललित लेखनाचा प्रकार

2 minutes

चिमणराव Wed, 02/05/2018 - 21:16

दारुच्या वगैरे कंपूतून कुणी दारू सोडून बाहेर पडायला बघू लागला की इतर त्याला "मर्दासारखा राहा," वगैरे बोलून पुन्हा मर्द बनवतात.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 02/05/2018 - 21:52

एकंदरच, स्वतंत्र व्यक्तींना ठरावीक लेबलं लावून, त्यांनी त्या-त्या साच्यात बसावं म्हणून बहुतांश व्यक्ती झुंड बनून फार प्रयत्नशील असतात. या अशा लोकांची असून अडचण नसून खोळंबा अशी गत असते.

मला एकंदरच खवचट, दुष्ट, आगाऊ, हिच्याशी-बोलण्यात-हशील-नाही अशी स्वतःची प्रतिमा आवडते. फारच क्वचित मी ती प्रतिमा सोडून देते. लोकांना माझ्याबद्दल काय म्हणायचं असेल तर म्हणू देत. मला त्यांचा उपद्रव होत नाही. हे अंगाला तेल लावून घराबाहेर पडणं.

गब्बर सिंग Thu, 03/05/2018 - 20:48

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मला एकंदरच खवचट, दुष्ट, आगाऊ, हिच्याशी-बोलण्यात-हशील-नाही अशी स्वतःची प्रतिमा आवडते.

तुम्ही चक्क थापा मारताय.
.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 03/05/2018 - 22:25

In reply to by गब्बर सिंग

बाईला स्वतःची प्रतिमा कशी आवडते, हे स्वतःचं स्वतःला समजत नाही असा दावा करणारा, तूच खरा मर्द!

तिरशिंगराव Thu, 03/05/2018 - 10:04

देवाने मनुष्य शरीर बनवतानाचा दोन्हीही + आणि - युक्त असलेली शरीरं बनवायला हवी होती. म्हणजे सर्वांना समान न्याय मिळाला असता.
दोघांनाही बाळं झाली असती, दोघांनाही कुठलेही कपडे घालता आले असते, दोघांवरही बलात्कार झाले असते. आणि कोणालाच अमुक अमुक मुक्तीसाठी लढा द्यावा लागला नसता. फक्त 'बळी तो कान पिळी' हा एकच न्याय राहिला असता.

'न'वी बाजू Thu, 03/05/2018 - 15:01

In reply to by तिरशिंगराव

फक्त 'बळी तो कान पिळी' हा एकच न्याय राहिला असता.

...आत्ता तरी याहून नेमके वेगळे काय आहे?