घन तमी शुक्र बघ राज्य करी

.
'घन तमी शुक्र बघ राज्य करी' आज पुन्हा हे गाणं ऐकलं. भा रा तांबे यांचे, हे गाणं ऐकायला घेतलं की आपोआप ते गाणंच सदा वाजत रहातं. तदुपरांत, अन्य कोणत्याच गाण्यावरती मन जात नाही. हृदयनाथ मंगेशकरांनी चढ उतार असलेली विलक्षण चाल या गाण्याला लावलेली आहे. गाणं ऐकताना, हृदयात, काहीतरी लकलक हलत रहातं. सरीअल वाटत रहातं. कोणत्या मनोवस्थेत हृदयनाथांना ही चाल सुचली असेल! अतोनात, गोड, दैवी सूरात हे गाणे लतादीदींनी गायलेले आहे.
................'घन तमी शुक्र बघ राज्य करी,'...........
गाणं सुरु झालं की चमचमणारा शुक्र तारा डोळ्यासमोर येतो. घनदाट काळोखात चमकणारा, काळोखावरती अधिराज्य गाजवणारा, शुक्र डोळ्यासमोर येतो. अन्य गाण्यांमध्ये असे चित्र चटकन डोळ्यांसमोर येत नाही. मला वाटतं ही चित्रमयता तांबे यांच्या कवितांची खासियत असावी का? कारण 'तीन्ही सांजा सखे मिळाल्या' मध्येदेखील अशीच दुपार पश्चात संध्याकाळ अशी संक्रमणाची, सांजवेळ हमखास डोळ्यासमोर येते. १४-१५ वर्षांची मी बालकनीत उभी असते, केशरी, गूढ संधीप्रकाश आणि समोर तांबड्या ज्वाळांत पेटलेला गुलमोहर हेच दृष्य दरवेळी दिसतं मला. असे म्हणतात, आयुष्याच्या अंतिम समयी, तुमच्या आयुष्यातील घटनांचा चलतपट झरझर डोळ्यांसमोरुन सरकत जातो. मला अन्य कोणती दृष्ये दिसतील, न दिसतील परंतु त्या आडनिड्या वयातली, त्या दिवशीची, ती संधीप्रकाशाचा वेळ नक्की दिसणार, खात्री आहे.
.........'रे खिन्न मना बघ जरा तरी' ............
या बघ जरा तरी आलापात कमालीचं आर्जव आहे. उदास मनाला, समजविण्याची शक्ती आहे.
गाणं जसं पुढेपुढे जात रहातं, काहीतरी आठवत रहातं. काय आठवतं ते चिमटीत पकडता येत नाही. एक अनामिक हुरहूर लागते. पण आभाळ दाटुन आलेली व्याकुळ हुरहूर नसते ती. अंहं! ती असते कोणत्या तरी ओळखीच्या पण आता विस्मृतीत गेलेल्या प्रसंगांची चाहूल. 'gossamer' हाच शब्द बरोबर आहे. स्मृतीच्या कप्प्यात, एक झिरझिरीत फुलपाखराच्या पंखासारखा, चंद्रवर्खी gossamer, पडदा, हलत रहातो आणि हलता हलता त्या पडद्याआडचं दिसतं न दिसतं - दिसतं, न दिसतं. मला वाटतं पूर्वजन्माशी निगडीत स्मृती चाळवल्या जातात. दर्शन घडते न घडते तोच त्या आठवणी झिरझिरीत पडद्याआड लोपतात. हे गाणे ऐकताना, गूढ अनुभूती येते मला. काही अमूर्त स्मृती , मूर्त मनात प्रकट होताहोता रहातात. गाणे वरचेवर ऐकायला हवे. न जाणो कधीतरी सबक्कॉन्शसमध्ये फार खोलवर दडलेली पुरातन शिंपल्याची डबी उघडेल व माझ्या हाती आठवणीचा टपोरा पाणीदार मोती लागेल.
------------------------------------------------------ पूर्ण कविता-----------------------------------------------------
घन तमीं शुक्र बघ राज्य करी
रे खिन्न मना, बघ जरा तरी !
ये बाहेरी अंडे फोडुनि
शुद्ध मोकळ्या वातावरणी
का गुदमरशी आतच कुढुनी ?
रे ! मार भरारी जरा वरी
प्रसवे अवस सुवर्णा अरुणा
उषा प्रसवते अनंत किरणा
पहा कशी ही वाहे करुणा
का बागुल तू रचितोस घरी ?
फूल हसे काट्यांत बघ कसे
काळ्या ढगि बघ तेज रसरसे
तीव्र हिमांतुनि वसंतहि हसे
रे, उघड नयन, कळ पळे दुरी
फूल गळे, फळ गोड जाहले
बीज नुरे, डौलात तरु डुले
तेल जळे, बघ ज्योत पाजळे
का मरणि अमरता ही न खरी ?
मना, वृथा का भिशी मरणा ?
दार सुखाचे ते हरि-करुणा !
आई पाही वाट रे मना
पसरोनी बाहु कवळण्या उरी
- हा लेख फेसबुकवर टाकणार होते परंतु नाही टाकणार. काही वडीलधारी काका, मामा लगेच 'काळजी घ्या' वगैरे उपदेश सुरु करतात. The point gets totally lost on them. असो.
ललित लेखनाचा प्रकार
...
हृदयनाथ मंगेशकरांनी चढ उतार असलेली विलक्षण चाल या गाण्याला लावलेली आहे. गाणं ऐकताना, हृदयात, काहीतरी लकलक हलत रहातं. सरीअल वाटत रहातं. कोणत्या मनोवस्थेत हृदयनाथांना ही चाल सुचली असेल!
हे गाणे ॲज़ सच कधी ऐकलेले नाही (बोले तो, तांब्यांची अशी कविता आहे, हे ठाऊक होते, परंतु ती आकाशवाणीवर किंवा अन्यत्र वाजवलेली कधी ऐकलेली नाही), परंतु (तांब्यांच्याच) 'नववधू प्रिया मी बावरते'ची चाल बहुधा याला फिट्ट बसावी. (म्हणजे, बहुधा त्याच जातीतले१ असावेसे वाटते (चूभूद्याघ्या.), सबब ती चाल फिट्ट बसण्यास प्रत्यवाय नसावा.)
बाकी, ती 'नववधू'सुद्धा त्याच पठडीतली. 'काळजी घ्या' म्हणायला लावणारी. बोले तो, ही जी कोणी 'नववधू' आहे२, तिचा 'प्रिय', 'प्राणसखा' वगैरे ज्याला उद्देशून ती गात आहे, तो साक्षात मृत्यू आहे, अशी कविकल्पना आहे असे काहीसे ऐकलेले आहे. (खरेखोटे ते एक दिवंगत तांबेच जाणोत! पण प्लॉज़िबल वाटते. 'कळे मला तू प्राणसखा जरि ... मन जवळ यावया गांगरते'वाले कडवे पाहा.)
बाकी, 'मधु मागशि माझ्या सख्या, परी'मध्ये तर सरळसरळ, उघडउघड, अगदी खुल्लमखुल्ला 'लागले नेत्र रे पैलतिरी'चा ज़िक्र केलेला आहे. अर्थात, एका अर्थाने ते बरोबरच आहे म्हणा. किंवदंतेनुसार, तांब्यांना कोणीतरी कवितेची मागणी केली असता, त्या मागणीकर्त्याला, 'बाबा रे! आता मी म्हातारा झालो. आता माझ्याच्याने कविताबिविता काही होत नाही. तेव्हा कृपा करून मला कविता मागू नकोस.' हे कळविण्याकरिता तांब्यांनी त्याला ही कविता करून पाठविली म्हणे. आता, आपले आर्ग्युमेंट वर्मी लागावे, म्हणून त्यात थोडा पेथोस३ वगैरे घुसडण्याकरिता, ते इंग्रजीत म्हणतात ना, 'इतका म्हातारा, की एक पाय थडग्यात आहे', त्या धर्तीवर 'लागले नेत्र रे पैलतिरी' ठेवून दिले, झाले. (शिवाय वर, फॉर गुड मेझर, 'ढळला रे ढळला दिन सखया, संध्याछाया भिवविती हृदया' हेही त्या मिश्रणात बचकभर फेकून दिले. अल्काझाम! आहे काय, नि नाही काय?) चालायचेच.
परंतु म्हणजे, या मनुष्याला मृत्यूचे आत्यंतिक ऑब्सेशन असावे, अशी शंका येते. अर्थात, तांबे हे कऱ्हाडे ब्राह्मण असल्याकारणाने, यात आश्चर्यकारक असे फारसे काही नसावे४, परंतु मग, 'तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा' मधल्या 'मोत्यांच्या माळा' म्हणजेसुद्धा काही फासबीस असावेत की काय, अशी उगाच शंका येऊ लागते.
जाऊद्या. टेन्शन नहीं लेने का. आपण आपले 'कळा ज्या लागल्या जीवा' हे 'मुहब्बत ऐसी धड़कन है'च्या चालीवर गाऊन त्याची मजा लुटू या, कसे? (अर्थात, 'कळा ज्या लागल्या जीवा'मध्येसुद्धा 'नदी लंघून जे गेले' त्यांची हाक कानी आल्याचा ज़िक्र - पुन्हा मृत्यूचे ऑब्सेशन! - आहेच म्हणा, परंतु त्याकडे दुर्लक्ष करू या. च्यामारी, आयुष्यात रडून रडून म्हणून रडायचे तरी किती? त्याला काही सुमार?)
असो.
-----------
तळटीपा:
१ जाति बोले तो मात्रावृत्त ना? (चूभूद्याघ्या.)
२ म्हणजे बहुधा भा.रा. तांबे स्वतः. (चूभूद्याघ्या.)
३ पोर नुकतेच बारावी झाले. बारावीला इंग्रजी विषयाला होत्या त्यांना त्या ईथोस, लोगोस नि पेथोस वगैरे भानगडी. नि गृहपाठाला हे मोठे उतारे, नि त्या उताऱ्यांत कोठकोठल्या वाक्यांत या ईथोस/लोगोस/पेथोसपैकी कायकाय वापरले आहे, याची चिरफाड करायला असायची. (छळ नुसता!३अ) म्हणून मला या भानगडी ऐकून ठाऊक. अर्थात, अजूनही त्या तीनमध्ये घोटाळा होतो, पण हू केअर्स? चालायचेच.
३अ जगातल्या तमाम भाषाविषयाच्या शालेय शिक्षकांना मरणोत्तर नरकवास नि त्या नरकवासात जगाच्या अंतापर्यंत उकळत्या तेलात शीर्षासन करताकरता उजव्या हाताने प्राणायाम आणि एकसमयावच्छेदेकरून डावा हात (स्वतःच्या) पोटावरून गोलगोल फिरवीत राहण्याची शिक्षा आहे.३अ१ एका (खिशास झेपेल त्याप्रमाणे कधीमधी गोमांस खाणाऱ्या का होईना, परंतु) देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणाचा शाप तथा एका बापाचा तळतळाट लागू आहे.
३अ१ सभ्यतासंकोचास्तव इतकेच.
४ त्या पिढीतल्या कऱ्हाडे ब्राह्मणांत ही रडी टेंडन्सी मोठ्या प्रमाणावर निरीक्षिलेली आहे.४अ इतकी, की झाशीची राणी४ब हे बहुधा एखादे काल्पनिक पात्र असावे, अशी कोणासही शंका यावी.४क
४अ आपल्या पितृसत्ताक पद्धतीत वडिलोपार्जित जातीने जरी कऱ्हाडे ब्राह्मण नसलो, तरी गणगोतात - नि किमान एका बाजूच्या पूर्वजांत - कऱ्हाड्यांचा प्रादुर्भाव असल्याकारणाने, काही निरीक्षणे ही चक्षुर्वै सत्यं न्यायाने मांडू शकतो.
४ब ऐकीव माहितीनुसार, प्रत्येक कऱ्हाडा ब्राह्मण हा या पात्राशी आपले काही ना काहीतरी ओढूनताणून नाते सांगतो. किंबहुना, ही विभूती माझ्या आईच्या आजीच्या खापरपणजीची सख्खी बहीण (की अशीच कोणीतरी; नक्की नाते विसरलो.) असल्याचे मलाही सांगण्यात आलेले आहे. खरे तर झाशीची राणी ही काल्पनिक असावी अशी शंका येण्याकरिता एवढे एकच कारण पुरेसे ठरावे. कारण, तिचे तथाकथित सद्गुण (शौर्य, पराक्रम, स्वजनांबद्दलची आस्था, वगैरे) माझ्यात तर सोडाच, परंतु माझ्या निरीक्षणातल्या एकाही कऱ्हाड्यात उतरलेले निदान मला तरी आढळलेले नाहीत. किंबहुना, झाशीची राणी ही जर खरी असती, तर (१) इंग्रजांविरुद्ध लढली नसती, (२) झाशीची मागणी करावयास आलेल्या ह्यू रोज़ला 'मेरी झाशी नहीं दूंगी!' म्हणून ठणकावले नसते, (३) उलट, 'अलेलेलेलेले! आमचे जॉइंट्ट्ट फ्यामिलीतले इंग्रज! चो च्वीट!' असे म्हणून ह्यू रोज़चा गालगुच्चा घेऊन, डलहौसीचा मुका घ्यायला त्याच्याबरोबर लगबगीने निघून गेली असती, नि जाताजाता (४) तेथे टपकलेल्या तात्या टोपे, नानासाहेब वगैरे 'आपल्या लोकां'ना 'हॅट साले! ह्या इंग्रजांपुढे तुमची काय लायकी आहे काय? आलेत मोठे क्रांती करणारे! हुडूत्!' म्हणून त्यांना हिणवून, वेडावून दाखवले असते.४ब१ किंवा मग, ह्यू रोज़ टपकण्याअगोदरच्या काळात, (तात्या टोपे आणि नानासाहेब हे कऱ्हाडे नव्हते म्हणून, नाहीतर) नानासाहेबाच्या अनुपस्थितीत तात्याबरोबर नानासाहेबाच्या नि तात्याच्या अनुपस्थितीत नानासाहेबाबरोबर तात्याच्या कुचाळक्या करत फिदीफिदी हसत बसली असती.४ब२ (किंबहुना, तात्या नि नानासाहेब हेसुद्धा जर कऱ्हाडे असते, तर तेसुद्धा झाशीच्या राणीच्या अनुपस्थितीत तिच्या कुचाळक्या करून आपसांत फिदीफिदी हसले असते. परंतु ते सोडून देऊ.)
४ब१ स्वतःच्या मुलाबाळांना कमी लेखणे आणि 'जॉइंट्ट्ट फ्यामिली'च्या नावाखाली कोठल्यातरी भडभुंजाचे - खास करून स्वतःच्या इमीजिएट फ्यामिलीसमोर - वारेमाप कौतुक करून त्याला डोक्यावर चढवून ठेवणे, ही टेंडन्सीसुद्धा या जमातीत पुष्कळ निरीक्षिली आहे.
४ब२ 'जॉइंट्ट्ट फ्यामिली'च्या नावाखाली घोळक्याने जमून, प्रसंगी उपस्थित नसलेल्या ('जॉइंट्ट्ट फ्यामिली'पैकीच) कोणाच्यातरी कुचाळक्या करणे, हादेखील एक स्थायीभाव पाहिलेला आहे.
४क किंबहुना, कम टू थिंक ऑफ इट, झाशीची राणी हीसुद्धा (सपोज़ेडली) 'तांबे'च! मग ही तांबीण जर इतकी (सपोज़ेडली) शूर, तर मग हाच तांबे इतका कसा रड्या, असा प्रश्न पडतो. झाशीची राणी म्हणाली असती काय 'लागले नेत्र रे पैलतिरी'? (खरी असती, तर अवश्य म्हणाली असती, असे आमचे प्रतिपादन आहे; परंतु ते एक असो.) आणि, 'रे हिंदबांधवा, थांब या स्थळी, अश्रु दोन ढाळी, ही पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशिवाली' ही कविता लिहिणारे हेच का ते तांबे? (अर्थात, त्या कवितेतसुद्धा, अंतिमतः, मेलेल्या झाशीच्या राणीच्या नावाने अश्रू ढाळणे हाच रडा कार्यक्रम दिसतो. जाऊद्या झाले!)
श्रेणी १०१: 'रोचक'बद्दल...
'रोचक' हा शब्द दर्शनीमूल्यावर घेतल्यामुळे झालेला आपला गोंधळ समजू शकतो. अर्थात, 'रोचक' या शब्दाच्या '(Hmmm...) Interesting!१' या (बहुधा) अमेरिकन अवताराशी आपण अनभिज्ञ असावात, अशी शक्यता निदर्शनास येते.
'रोचक' आणि 'रोचक!' यांमध्ये अर्थच्छटेचा किंचित नव्हे, चांगला १८० अंशांचा फरक आहे. नुसते 'रोचक' म्हणजे रोचक, तर 'रोचक!' म्हटल्यावर 'काय बरळून राह्यलाय बे!' असा संदेश सुज्ञांस अभिप्रेत व्हावा.
गंमत म्हणजे, 'रोचक' ही श्रेणी 'रोचक' तथा 'रोचक!' अशा दोन्हीं अर्थांनी वापरता येते!
(थोडक्यात, 'पकाऊ' ही श्रेणी काय, कोणीही देईल. परंतु त्याजागी 'रोचक' देण्यास एक विशेष प्रकारचे टंगिन्चीकित्व लागते.)
याव्यतिरिक्त, 'रोचक' ही श्रेणी 'मार्मिक' या श्रेणीशी काँट्रास्ट केली असता 'रोचक'चा आणखी एक अर्थपैलू उलगडण्यास मदत व्हावी. 'मार्मिक' म्हटले, की 'कसे बोललात!' असा अर्थ, आणि पर्यायाने श्रेणीदात्याची प्रतिसादाशी उघडउघड तथा शतप्रतिशत सहमती अभिप्रेत होते. याउलट, 'रोचक'मध्ये, 'या प्रतिसादातल्या मजकुराशी किंवा त्यातील आशयाच्या गाभ्याशी मी सहमत आहेच, असे नाही - किंबहुना, कदाचित किंवा बहुधा नसेनही - परंतु, असा(ही) विचार (किंवा अविचार, टेक युअर पिक!) कोणी मांडावा, ही बाब रोचक आहे', ही(सुद्धा एक) अर्थच्छटा आहे.
असो.
----------
१ अधिक चर्चा इथे.
शरदजी, ही कवितादेखील
शरदजी, ही कवितादेखील मृत्युबद्दलच आहे.
>>>>मना, वृथा का भिशी मरणा ?
दार सुखाचे ते हरि-करुणा !
आई पाही वाट रे मना
पसरोनी बाहु कवळण्या उरी>>>> फार गोड कविकल्पना आहे ही. की साक्षात ईश्वर जो की वात्सल्यरुप आई आहे, तो जीवन-मरणाच्या उंबरठ्यापलिकडे आहे. तेही कसा तर बाहू पसरुन, आपल्याला कुशीत घेण्याकरता.
.
या गंभीर व नितांत सुंदर कवितेस चाल लावण्यास हृदयनाथ लाभले हे आपले नशीब. नाहीतर कोणीही थिल्लर किंवा सपक चाल लावून विचका करुन ठेवला असता.
हे गाणे ऐकताना, गूढ अनुभूती
हे गाणे ऐकताना, गूढ अनुभूती येते मला. काही अमूर्त स्मृती , मूर्त मनात प्रकट होताहोता रहातात. गाणे वरचेवर ऐकायला हवे. न जाणो कधीतरी सबक्कॉन्शसमध्ये फार खोलवर दडलेली पुरातन शिंपल्याची डबी उघडेल व माझ्या हाती आठवणीचा टपोरा पाणीदार मोती लागेल.
वा! काय मस्त गूढार्थ
'काळजी घ्या' वगैरे
'काळजी घ्या' वगैरे
लिहिणार होतो.
पण -
पुरातन शिंपल्याची डबी उघडून माझ्या हाती आठवणीचा टपोरा पाणीदार मोती लागला आहे!