Skip to main content

रात्रप्रवास

संधीप्रकाशी अवकाशी त्या, सूर्यास्त मी पाहत होतो,
सावळ्या रंगात न्हात चंद्रोदय न्याहाळत होतो

चंद्रोदय होऊन आकाश चांदण्यासंगे सजलेले
रेशमी नात्यास गुंफत इवले, पाखरू घरटी निजलेले

उंबरा बहरून जाई पुरता, जाई डोले आसमानी
गंध वाटती, फुले उमलली, हेवा वाटे गगनी

कोण कुठला माणूस पडला, खाटेवरती पसरून पाय
मनातील भावना वाचून, आता चांदणे थकले काय?

डुलक्या घेती सारी शेते, महावृक्ष गाती अंगाई
प्रकाश उधळून दावी काजवा, त्याची त्याची अपूर्वाई

घुबड बैसले पत्रे वाचित , रातकिड्यांची भरली मैफल
धरून फांदी, झोके घेऊन, वटवाघूळ ते पाही दलदल

ब्रम्हमुहूर्ती ध्यानी दर्दी, बाकी घोरत असती गर्दी
निरोप घेऊन येई चांदणे, दिधली सूर्योदयाची वर्दी
- चित्तरंजन ओंकार कोर्टीकर

पर्स्पेक्टिव्ह Thu, 10/09/2020 - 19:52

संधिप्रकाश हा सूर्यास्तानंतर होतो ना?

परंतु खालील ह्या अप्रतिम ओळींसाठी वरील आक्षेप माफ!

कोण कुठला माणूस पडला, खाटेवरती पसरून पाय
मनातील भावना वाचून, आता चांदणे थकले काय?